प्रिय बाई, भारताच्या संकल्पनेला ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्ती शिरजोर होत असताना तुमच्यासारख्या ‘योद्ध्या स्त्री’चं जाणं खूपच खचवणारं…
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रज्ञा दया पवार
  • प्रा. पुष्पाताई भावे (२६ मार्च १९३९ - ३ ऑक्टोबर २०२०)
  • Sat , 03 October 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली पुष्पा भावे Pushpa Bhave

सामाजिक कार्यकर्त्या, नाट्यसमीक्षक, प्राध्यापक पुष्पा भावे यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांच्याविषयी प्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार यांनी लिहिलेलं हे मनोगत...

..................................................................................................................................................................

प्रिय बाई,

या क्षणी तिकडे तुमच्या चितेची आग निवते आहे आणि माझ्या मनात आठवणींचा अक्षरशः दर्या धुमसतो आहे.

नामदेव ढसाळ यांची एक कविता आहे- ‘पाब्लोच्या मरणाने आपण काय शिकलो?’ या शीर्षकाची. माहीत नाही, ती या क्षणी का इतकी आठवते आहे? पण आठवतेय खरी. मला तुम्ही पाब्लोसारख्याच कोमल आणि काठिण्य असलेल्या वाटत आलेल्या आहात. नव्हे दिसलाही आहात अनेक वेळा. अनेक घटना-प्रसंगात. पाब्लोच्या कवितेला आणि त्यामागच्या त्याच्या दृष्टीला जग जसं सुटं सुटं दिसत नव्हतं आणि तरीही त्यातले निहायत व्यक्तीचे म्हणून असलेले पृथक पेचही आकळले होते. तसंच काहीसं होतं तुमच्या समग्र व्यक्तिमत्त्वात.

महाराष्ट्राच्या अवघ्या चर्चाविश्वाला एक आशयघन दिशा दिली तुम्ही, त्यासाठी प्रत्यक्ष कृतीचे भक्कम खांब उभे केले आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निर्भयता ही काही सहजच जाता-येता उच्चारता येणारी बाब नव्हे, त्यासाठी प्रसंगी आपलं अस्तित्वच पणाला लावावं लागतं, हेही तुम्ही ‘रमेश किणी’ प्रकरणातून दाखवून दिलं.

मी तुम्हाला अनेकदा ऐकलं. अनेक सभा-संमेलनातून, चर्चासत्रांमधून ऐकलं. अलीकडच्या काळात तुमच्यासोबत काम करण्याचा अनुभव किती वेगवेगळ्या पातळ्यांवर समृद्ध करून जाणारा असतो, हे जाणवून मन सुखावलं. पण तुमची जी पहिलीवहिली प्रतिमा माझ्या जाणिवे-नेणिवेत ठसली ती होती तुमच्या एका व्याख्यानाची. सोलापूरला तुमचा कार्यक्रम होता. वर्ष १९८८. ‘लोकमान्य टिळक’ हा तुमच्या व्याख्यानाचा विषय होता. तुम्ही टिळकांच्या एकूणच कार्यकर्तृत्वावर जी काही मांडणी केली ती ऐकून साक्षात टिळक असते तर तेही तुमच्या ‘जहाल’पणापुढे फिके पडले असते असं वाटून गेलं. ‘प्रागतिक’ शब्दाची नेमकी अर्थच्छटा आणि त्यामागची विलक्षण धग अगदी आत आत पोहोचली. टिळकांच्या सनातनी, कालबाह्य बुरसटलेपणातून किती नुकसान झालं, हे सांगताना तुम्ही एकोणिसाव्या शतकाचा अवघा पट आणि त्यातला गतिकीचा जो अन्वय लावत गेलात तो मला अजूनही स्मरतो.

‘गतिकी’ हाही तुमचाच शब्द. असे कितीतरी शब्द तुम्ही आम्हाला दिलेत. ते आता तुमच्या शेकडो विद्यार्थ्यांचे झाले आहेत. ते निव्वळ शब्द नव्हेतच. त्यामागचा नेमका विचारही तुम्ही रुजवला आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत. समाजकारणापासून नाटक, चळवळ, साहित्य, इतिहास, संस्कृती आणि खाद्यपदार्थांपर्यंत तुमच्या प्रेमाच्या असंख्य गोष्टी होत्या.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

व्यक्तिशः मला तुम्ही किती न् काय काय दिलं आहे, दरारा आणि धाक ओलांडून मी कधी तुमच्या निकट आले आणि तुम्हीही नेमक्या कोणत्या टप्प्यावर मला येऊ दिलं तुमच्याजवळ हे आता आठवत नाही. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आता कोलमडून पडते की काय, असे क्षण जेव्हा केव्हा आले, तेव्हा तुम्ही आधार दिला. माझ्यावर माया केली. मला ‘नायिका’ असं नाव ठेवलं होतं तुम्ही! आणि त्यात निखालस कौतुक असायचं भरभरून.

‘अंतःस्थ’च्या दुसऱ्या आवृत्तीला लिहिलेला ब्लर्ब असो, ‘आरपार लयीत प्राणांतिक’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनसमारंभात विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर आणि माझी कविता यातला तुम्ही लावलेला अन्वयार्थ असो की ‘धादांत खैरलांजी’ या नाटकाच्या शीर्षकातला ‘धादांत’ हा शब्द कसा वेदातांच्या विरोधातला आहे आणि त्या अर्थाने नाटकाचं हे शीर्षक चपखल आहे, असं नाट्य-वाचनाच्या वेळी सांगणं असो, माझ्या हातून लिहिल्या जाणाऱ्या सर्वच लेखनावर तुमची चिकित्सक नजर असायची.

..................................................................................................................................................................

हेही वाचा - पुष्पाबाईंसारख्या आदर्शांच्या जोरावरच समकालीन मिंधेपणाच्या दलदलीत आपण तग धरून आहोत!

..................................................................................................................................................................

भारतपणाच्या सर्वांगसुंदर संवैधानिक संकल्पनेला ध्वस्त करणाऱ्या प्रवृत्ती शिरजोर होत असताना तुमच्यासारख्या योद्ध्या स्त्रीचं असं निघून जाणं खूपच खचवणारं आहे. नयनतारा सहगल अवमानप्रसंगी एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या प्रश्नाबाबत, वैचारिक दडपशाहीबाबत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सार्वत्रिक भयाविरोधात तुम्ही आजारपण असतानाही हॉस्पिटलमधून शिवाजी मंदिरात आलात व्हीलचेअरवरून. ठामपणाने निर्धाराने बोललात. जाहीर कार्यक्रमातलं ते तुमचं शेवटचं दर्शन.

जेव्हापासून मी तुम्हाला ऐकत गेले-  माझ्या विद्यार्थिदशेपासून, तेव्हाच मनात कुठेतरी त्या कोवळ्या वयात खोलवर प्रभाव आणि ठसा उमटला तुमचा, तो आजही कायम आहे. निव्वळ माझ्यावरच नव्हे तर माझ्यासारख्या अनेकांवर आहे. एक ‘डेडली कॉम्बिनेशन’ होतं तुमच्यात. अ‍ॅकॅडेमिक, अ‍ॅक्टीव्हिस्ट आणि आर्ट क्रिटिक हे रसायन तसं दुर्मीळच! वैचारिक क्षेत्रातली बरीचशी माणसं आयव्हरी टॉवरमध्ये राहतात. तर बव्हंशी अ‍ॅक्टीव्हिस्ट मंडळी इतरांबद्दल तुच्छताभाव बाळगतात. अभ्यासाशी नातं जोडून कृतीशील राहताना तुम्ही अखेरपर्यंत जपलेला जिवंतपणा, ओलावा हा तुमचा वारसा आमच्यात निरंतर राहो.

तुमचीच,

प्रज्ञा

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Arun Shinde

Sun , 04 October 2020

प्रा पुष्पा भावे यांचे मोठेपण नेमकेपणे मांडणारे खूप भावस्पर्शी लेखन


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......