अजूनकाही
पी. लंकेश हे गौरी लंकेश यांचे वडील. ते प्रसिद्ध नाटककार होते. ‘संक्रांती’ हे त्यांचे नाटक कन्नड साहित्यामधील एक मैलाचा दगड मानले जाते. ती मानवाच्या निरंतर उत्क्रांतीवर अविचल निष्ठा व्यक्त करणारी एक अप्रतिम कलाकृती आहे. त्यांनी कन्नड साहित्यात मोलाची भर घातली. ‘संक्रांती’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी महात्मा गांधींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्या नाटकाविषयी…
..................................................................................................................................................................
पी. लंकेश (१९३५-२०००) यांच्या प्रचंड अलौकिक विद्वतेबद्दल लिहिणं हे नेहमीच एक मोठं आव्हान आहे. त्यापेक्षाही त्यांच्या ‘संक्रांती’ (१९७३) आणि ‘गुनमुख’ (१९९३) या नाटकांचा आत्मा पकडणं फारच मोठं आव्हान आहे. कारण ही दोन्ही नाटकं सहज अन्वयार्थ काढण्यासाठी खूपच कठीण आहेत. असं नेहमी म्हटलं जातं की, कानडी समाजाच्या वर्तमानकालीन समस्यांचा गुंता सोडवण्यासाठी कानडी समाजाचं सामूहिक मानस पुन्हा पुन्हा ‘वचन साहित्या’कडे (बसवण्णा हे वचन साहित्याचे आद्य प्रणेता असून समता, स्वातंत्र्य व बंधुत्वाचा पुरस्कार करणारी लोकशाहीची सर्व बीजं त्यात सापडतात.) वळतं.
‘संक्रांती’ या नाटकाची मूळ संकल्पना बाराव्या शतकामधून घेतलेली असली तरी हे नाटक स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणाचा मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रमनिरास ध्वनित करतं. याच कालावधीमध्ये गिरीश कार्नाड आणि बादल सरकार यांनी अनुक्रमे ‘तुघलक’ (१९६४) व ‘एवम् इंद्रजित’ (१९६३) अशा नाटकांमधून राजकीय व्यंगाचा यशस्वी प्रयोग केला होता. १९७०च्या राज्य व राजकारणाची प्रागतिक पुनर्रचना करण्याचा युक्तिवाद करणाऱ्या प्रखर सामाजिक चळवळींच्या वादळी पार्श्वभूमीवर लिहिलेलं ‘संक्रांती’ हे नाटक सामाजिक-राजकीय रूपांतराचं काय झालं, यामध्ये स्वारस्य दाखवत नाही, तर ते क्रांतीच्या झिजणाऱ्या प्रभावाखाली, तसेच सुधारणा व निरंतर बदलाखाली अडकलेल्या व्यक्तींच्या ‘पेचप्रसंगांची’ कसून तपासणी करतं.
इतिहासातील कोणत्याही एका विशेष कालखंडाकडे अंगुलीनिर्देश करताना लंकेश चिकित्सा करताना दिसतात. ते विचारतात- त्यांच्यामध्ये एखाद्याचा अत्यावश्यक स्वभाव/चारित्र्य यांच्यामध्ये दुरुस्ती करण्याची ताकद आहे का? वेगवेगळ्या प्रकारच्या निरंतर द्वंद्वामध्ये अडकलेल्या व भिन्न जात व वर्ग यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाच्या संपूर्ण सामाजिक स्तरछेदामधून लंकेश यांनी त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखा उभ्या केल्या आहेत.
या नाटकात रुद्र हा कर्नाटकातील शुद्र गणलेल्या होलया जातीतील असून तो उषाचा प्रियकर आहे. होलया रुद्र व शरण रुद्र असा त्याचा प्रवास नाटकातील द्वंद्व अधोरेखित करतो. खालच्या जातीतून वरच्या जातीत आलेला शरण रुद्र आता मद्यपान व मांसाहार यांचा प्रचंड तिरस्कार करतो. ब्राह्मण असलेली उषा आता मात्र गुरांचा गोठा, शेण आणि घामाघूम झालेल्या होलया गंधावर प्रेम करायली लागली आहे. तिथे काही शरण आहेत, ज्यांनी जात बदलली आहे. ते आपले सामाजिक महत्त्व व प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी जिवाचा आटापिटा करताहेत आणि ब्राह्मण /जैन हे त्या शरणांचं सामाजिक उर्ध्वगामित्व फिकं करताहेत. अर्थात हे सर्व सुधारक बसवण्णांच्या कनवाळू उपस्थितीमध्ये घडत आहेत. राज्याचा प्रमुख बिज्जलाच्या (तो बसवण्णाच्या विचारधारेलाही इंधन पुरवतो. भारतात पुरोगामी चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे समाज क्रांतिकारक महात्मा बसवेश्वर उर्फ बसवण्णा) उपस्थितीमध्ये हे सर्व घडते.
या सर्वामध्ये नाटकाचा एक कायम प्रश्न राहतो की, एखाद्या व्यक्तीच्या अत्यावश्यक स्वभावामध्ये प्रागतिक पुनर्रचना करण्यामध्ये क्रांत्या, सुधारणा या खरोखरच सक्षम आहेत का? त्या तसा परिणाम करण्यामध्ये सक्षम आहेत का?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गंमतीची बाब अशी आहे की, अगदी सुरुवातीलाच रुद्रचे वडील, केंचा असं जाहीर करतात की, मद्यपान, स्त्रीशरीर सुख आणि मांसाहार वर्ज्य करणं अगदीच अशक्य आहे. क्रांतीच्या उदात्त भावनांनी लोकांना त्यांच्या बायकापोरं, जनावरं आणि शेतीभातीची काळजी करण्यापासून परावृत्त केलेलं नाहीये. लंकेश असा प्रश्न उपस्थित करतात की, खरोखरच क्रांत्या, सामाजिक सुधारणा चळवळी, विचारधारा आणि राज्यव्यवस्था हे भाषा, संस्कृती आणि अस्मिता वा ओळख यांची संपूर्णपणे नव्यानं पुनर्रचना करू शकतील का?
भपकेबाज सामाजिक क्रांती अशी आहे की, रुद्र त्याच्या प्रियतमेला ‘उषा’ असं संबोधण्याऐवजी ‘उस्स’ असं संबोधतो. म्हणजेच रुद्रलासुद्धा ‘दुरुस्त’ करण्यामध्ये ही क्रांती अयशस्वी ठरली आहे. रुद्रचं मोठमोठ्यानं श्लोक पठन करणं उषाला आवडत नाही. ती म्हणते, ‘लोकांना अन्न हवंय, प्रवचन नव्हे’. उषा रुद्रची टिंगलटवाळी करते. उषा तिचा प्रियकर होलया रुद्रला शरण रुद्रपासून वेगळं करण्यास सुरुवात करते. परिणामी रुद्र त्याचं जीवन व जगणं सोडून देतो. याचा परिणाम असा होतो की, उषाला रुद्रचं प्रेम म्हणजे एक बलात्काराची कृती वाटायला लागते. जर केंचा मद्यपान आणि स्त्री सुखापासून दूर राहू शकत नाहीत आणि जर उषाला रुद्र हा होलयासारखाच राहावा असं वाटत असेल तर त्याचा अर्थ असा होईल का, की लंकेश हे स्थितीवादी आहेत, जे श्रेणीबद्धता व वर्चस्ववादी गोष्टींमध्ये विश्वास ठेवतात?
नाटकाच्या प्रत्येक वाचनामध्ये अशा प्रश्नांचा वेध घेणं ही या नाटकाची असामान्य अशी जादू आहे. हे नाटक वर्चस्ववादाच्या मार्क्सवादी सिद्धांताचा दंभस्फोट करतं. हा सिद्धान्त असा युक्तिवाद करतो की, व्यक्तीची जाणीव वा त्याच्या अस्तित्ववादाची जाणीव ही वर्चस्ववादी शक्ती, राज्याची विचारधारा आणि समाजाच्या आर्थिक नातेसंबंधांमधून तावून सुलाखून तयार होते. तिला एक आकार प्राप्त होतो. परंतु लंकेश असं सुचवू इच्छितात की, व्यक्तीची जाणीव वा त्याचे अस्तित्व हे काही नेहमीच वर्चस्ववादी गटांकडून किंवा वर्चस्ववादी विचारधारांमुळे तयार होत नाहीत. परंतु ते राज्यकर्त्या वर्गाच्या कराल मगरमिठीच्या पल्याड सार्वभौम अवकाशात बहरत असतं. बिज्जला बसवण्णांकडून हे शोधतो - ‘माझी व्यवस्था, तुझी क्रांती....या दोन्हींच्या पल्याड काहीतरी असेलच ना... नाही का?’
कारण लंकेश व्यक्तीच्या मुक्त आत्म्यावर विश्वास आणि तिच्या हंगामी फायद्यामध्ये रुची ठेवत नाहीत. व्यक्तीचा आत्मा हा एवढा उदात्त आहे, एवढा उत्क्रांत होणारा आहे की, तो क्रांत्याबरोबर किंवा क्रांत्यांशिवाय स्फटिकासारखा सातत्याने उजळत जातो. लंकेश क्रांतीच्या नैमित्तिक उत्साही कौतुकापेक्षा चिरंतन वसंताच्या क्रांतीकडून (नित्यसंक्रांती) अधिक आशादायी आहेत. सरतेशेवटी बसवण्णांची क्रांती संस्कृत भाषा बोलणाऱ्या लोकांचं वर्चस्व संपवून कन्नड बोलणाऱ्या लोकांचं वर्चस्व स्थापित करते.
नाटकातील उज्ज आणि केंचा यांच्या व्यक्तिरेखा असं सूचित करतात की, क्रांत्या जातीच्या पातळ बाह्यांगावर परिणाम करतीलही, परंतु त्या कदाचित व्यक्तीच्या खोल अंतरंगावर परिणाम करू शकणार नाहीत. एखाद्याला आश्चर्य वाटेल की, लंकेशसारखा नाटककार उज्ज, केंचा आणि रुद्रसारख्या व्यक्तिरेखांना बाराव्या शतकातील वचन चळवळीच्या क्षणिक घटनांच्या विरुद्ध उभं करतो. यावरून लंकेश यांचं मूल्यमापन करता येईल का, याचं एखाद्यास आश्चर्य वाटेल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लंकेश यांच्या मतानुसार इतिहासाच्या सगळ्या युगारंभ करणाऱ्या घटनांना मानवी स्वभावाच्या द्वंद्वांमधून जावंच लागतं. या अर्थानं लंकेश हे म. गांधींच्या जवळ आहेत. कारण त्यांनी शरीरमनाच्या जाणीवेला वा अस्तित्वाला काळाच्या जात्यामधून भरडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकातील अनेक व्यक्तिरेखांपैकी उषा ही अशी व्यक्तिरेखा आहे, जी आपल्या मनावर दीर्घकाळ छाप सोडणारी आहे. उषा ही निःसंशयपणे कन्नड साहित्यातील सर्वांत ताकदवान अशी स्त्री आहे. लंकेश यांनी तयार केलेल्या कोणत्याही इतर मुक्त आत्म्यासारखी उषा आहे. लंकेश यांनी ‘अण्व’ (पी.लंकेश यांची एक विलक्षण काव्यकृती, १९६७)सारखी अपवादात्मक कविता लिहून अण्वसारखी व्यक्तिरेखा तयार केली. लंकेश यांनी त्यांच्या संपूर्ण साहित्यिक कारकीर्दित ‘नीलू’ ही शृंगारिक कवितेची मालिका लिहून एक मुक्त व्यक्तिरेखा उभी केली. उषा ही अण्व किंवा नीलूसारखी आहे. दुर्दैवाने उषाच्या एवढ्या प्रचंड मोठ्या हिमतीबद्दल वा तिच्या ऊर्जेबद्दल सविस्तरपणे फारच कमी लिहिले गेले आहे. स्त्री व्यक्तिरेखांवर स्त्रीवादी अन्वयार्थांचा मोठा लोंढा आलेल्या विद्यमान कालावधीत उषाबद्दल भरपूर लिहायला हवं होतं.
रुद्रच्या पुरुषी अहंकारालादेखील ती भिडते. कदाचित लंकेश निरंतरपणे ज्याचा शोध घेत होते, त्या मुक्त आत्म्याचा आविष्कार म्हणजे उषा ही व्यक्तिरेखा होय. जेव्हा रुद्र, उज्ज व केंचा यांना मद्यपान, मांसाहार सोडण्यास बळजबरी करतो, तेव्हा उषा त्यास ‘हिंसा’ म्हणते. तसेच जेव्हा रुद्र उषाला त्याच्या पुरुषी अहंकारासमोर वाकवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा उषा तिच्या संपूर्ण ऊर्जेसह बंड पुकारते. ती तिच्या बंधनमुक्त आत्म्यासह संघर्षाला उभी राहते. उषा मूलभूत मानवी स्वातंत्र्याच्या आदर्शवादावर एवढा विश्वास ठेवणारी स्त्री आहे की, ती प्रेम किंवा क्रांतीच्या माध्यमातून व्यक्तीला झुकवू पाहणाऱ्या शक्तीला सहजपणे नकार देते. ती कोणत्याही बळजबरीला किंवा धमकीला भीक घालत नाही. शृंगारिक प्रेमाच्या क्षणिक प्रलोभनांना किंवा सामाजिक परिवर्तनाला ती बळी पडत नाही. ती व्यक्ती, समाज व संस्कृती यांच्या निरंतर उत्क्रांतीवर विश्वास ठेवणारी आहे. बळजबरी करणारा रुद्र उषाच्या स्वातंत्र्यवादी मनोवृत्तीवर आघात करतो आणि अखेरीस तिला हे जाणवतं की, त्याचं प्रेम हे फक्त बलात्काराची एक कृती आहे. म्हणून ती दरबारात जाहीर करते की, रुद्रचं प्रेम हे बलात्कारापेक्षा कमी नाही. आपल्या अशा विधानामुळे रुद्र फासावर जाईल याची ती कसलीही तमा बाळगत नाही. उषाच्या अशा सडेतोड भूमिकेमुळे नाटकामध्ये एक कळसाध्याय तयार होतो. एका परमोच्च बिंदूची अवस्था येते. कमी-अधिक प्रमाणात स्त्रीवादी समीक्षा फक्त अशाच व्यक्तिरेखांचं कौतुक करतात, ज्या स्त्रीस्वातंत्र्याचा आणि समतेचा कैवार घेतात.
उषाची स्त्रीवादी ताकद एवढी प्रचंड आहे की, समता, स्वातंत्र्य आणि लैंगिक निवडीच्या मुद्द्यांशी निगडीत गोष्टींनी दबून न जाता सामाजिक परिवर्तन, क्रांतिकारी चळवळी आणि राजकीय उलथापालथीच्या विस्तृत ऐतिहासिक प्रश्नांना ती टक्कर देऊ शकते. याच गोष्टीमुळे उषा कन्नड साहित्यामधील एक अद्वितीय स्त्री व्यक्तिरेखा बनली आहे.
मराठी अनुवाद - राजक्रांती वलसे
..................................................................................................................................................................
हा मूळ लेख ‘द हिंदू’ या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये २९ सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment