गांधी हा काहींच्या टवाळीचा विषय असतो. आपण सर्वज्ञ आहोत अशी समजूत करून घेतली की, हे ओघाने येतेच.
ग्रंथनामा - आगामी
रावसाहेब कसबे
  • ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ या ग्रंथाचे मुखपृष्ठ
  • Fri , 02 October 2020
  • ग्रंथनामा आगामी गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा Gandhi - Parabhut Rajkarni aani Vijayi Mahatma रावसाहेब कसबे Raosaheb Kasabe

प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांचा ‘गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा’ हा ग्रंथ लवकरच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत आहे. गांधी या महात्म्याची नव्याने ओळख करून देणारा हा ऐतिहासिक म्हणावा असा ग्रंथ आहे. या ग्रंथाला कसबे यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

कोणत्याही महापुरुषाला त्याच्या पूर्ण रूपात समजून घेणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यातल्या त्यात गांधीजींना. त्यांनी आयुष्यभर माणसाच्या नैसर्गिक प्रेरणांशी म्हणजे पोटाची भूक आणि शरीरातील कामवासनेशी, समाजाशी आणि स्वत:शी केलेला संघर्ष अतिशय जटिल स्वरूपाचा होता. त्याला अनेक परिमाणे होती. त्यांनी सामाजिक जीवनात आणि व्यक्तिगत जीवनात अनेक प्रयोग केले. त्या वेळी त्यांच्या मनात कोणती आंदोलने उठत होती आणि ते त्यांना कसा प्रतिसाद देत होते, याचा मानसशास्त्रीय अभ्यास एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाने केला. परंतु त्यांच्या ‘Gandhi's Truth : On the origins of Militent Non-Voilence’ या महत्त्वाच्या ग्रंथाची आपल्याकडे फारशी चर्चा झाली नाही. गांधीजींच्या जीवनात, त्यांच्या सहवासात विविध व्यक्तिमत्त्वांच्या अनेक स्वदेशी आणि परदेशी स्त्रिया आल्या. गांधीजींचे त्या स्त्रियांशी संबंध नेमके कसे होते, हे व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय गांधीचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. याचा अतिशय महत्त्वाचा अभ्यास थॉमस वेबर यांनी त्याच्या ‘Going Native, Gandhi's Relationship with Western Women’ या ग्रंथात केला आहे. भारतीय स्त्रियांबाबतचा अभ्यास अद्याप व्हावयाचा आहे.

गांधीजींना सर्वात छळले ते त्यांच्यात तीव्र रूपात असलेल्या कामवासनेने. म्हणून त्यांना सिग्मंड फ्रॉईड समजून घेण्याची इच्छा होती. ते काम प्रा. निर्मलकुमार बोस करणार होते. परंतु ते अपूर्णच राहिले. जगातील अनेक संस्कृतींनी कामवासनेला अतिशय तुच्छ, अपवित्र, अनैतिक मानून तिचा धिक्कार केलेला आहे. भारतीय हिंदू संस्कृतीने तर अधिक. कारण वर्ण आणि जातिसंकराची भीती होती. त्यामुळे अन्नाइतकेच महत्त्व असलेल्या या नैसर्गिक प्रेरणेचे, कामवासनेचे कृत्रिमरीत्या दमन करणारे जग हे दमनाचे कारागृहच बनले होते. सध्याच्या काळात ते तितके राहिलेले नाही.

सिग्मंड फ्रॉईड हे पहिले मानसशास्त्रज्ञ की, ज्यांनी माणसाच्या मानसशास्त्रीय अभ्यासात दोन प्रमुख क्रांतिकारी शोध लावले. पहिला, त्यांनी सत्याच्या संकल्पनेला व्यापक रूप देऊन माणसातील कामवासनेचा संबंध थेट सत्याशी जोडला. दुसरा, माणसाच्या अबोध मनाचा (Unconscious) किंवा नेणिवेचा शोध. या शोधांचा संबंधही माणसाच्या बाह्य आणि अंतर्विश्वाशी आहे. फ्रॉईड यांनी सत्याचा संबंध माणूस जाणते-अजाणतेपणे ज्याचा विचार करतो किंवा ज्यावर विश्वास ठेवतो केवळ त्याच्याशीच जोडला असे नाही, तर आपल्याला विचारच करायला लागू नये म्हणून माणूस ज्या गोष्टींचे दमन करतो त्याच्याशी थेट जोडला. माणूस ज्या गोष्टींना सत्य समजतो ते त्या गोष्टींच्या पलीकडे असते. या वास्तवापर्यंत भिडण्याची पद्धती त्यांनी शोधून काढली.

फ्रॉईड हे करू शकले कारण त्यांनी माणसाच्या दमन करण्याच्या प्रवृत्तीचे आणि दमनाच्या समर्थनाचे परिणाम शोधून काढले होते. माणसाची असत्यापासूनची मुक्ती ही त्याच्या मनाच्या ठेवणीत आणि पर्यायाने त्याच्या दमनमुक्तीत आहे, हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले. माणूस सत्य त्याच वेळी जाणू शकतो, ज्या वेळी तो आपले सामाजिक जीवन मानवी पद्धतीने, सन्मानपूर्वक, विवेकी मार्गाने भयमुक्त अवस्थेत आणि कोणत्याही लालसेशिवाय व्यतीत करीत असतो. फ्रॉईड यांच्यावर त्यांचे गुरू वॉन ब्रुक (Von Bruck)) यांचा फार प्रभाव होता आणि ते यांत्रिक भौतिकवादी होते. त्यामुळे फ्रॉईड यांना दमनमुक्तीचे इतरही काही मार्ग आहेत, याची माहिती नव्हती. ज्यापैकी एका मार्गाचा गांधीजींनी अवलंब केला होता. अर्थात १९२० नंतर फ्रॉईड यांच्या विचारांचाही विकास झाला आणि ते माणसातील सहज प्रेरणांबद्दल नव्याने विचार करू लागले.

२.

विसाव्या शतकाने भारताला महत्त्वाचे तीन सुपुत्र दिले. पैकी एक म. गांधी, दुसरे पं. जवाहरलाल नेहरू आणि तिसरे डॉ. आंबेडकर. पहिल्याने भारतीय जनतेला राजकीय जाणीव देऊन तिला स्वतंत्र केले. दुसऱ्याने स्वतंत्र भारताचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पाया मजबूत केला. आणि तिसऱ्याने भारताचे भवितव्य संविधानाची निर्मिती करून वचनबद्ध केले. त्यांपैकी नेहरूंचा गेल्या सात-आठ वर्षांपासून त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्धरीत्या द्वेषमूलक प्रचार करून त्यांना इतिहासातून अदृश्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसते. ही अज्ञान आणि सुडाच्या भावनेतून आलेली कृतघ्नता आहे.

नेहरू केवळ भारताचे राजकीय नेते नव्हते तर ते जागतिक पातळीवरील एक प्रमुख नेते होते, याची सरदार वल्लभभाई पटेल यांनी म. गांधींसमोर कबुली दिलेली होती. भारतासारख्या नवस्वतंत्र देशाच्या प्रगतीसाठी भारतात आणि जगात शांतता असणे, ही भारताची प्रमुख गरज होती. कारण शांतता ही प्रगतीची पूर्वअट असते. म्हणून ते जागतिक स्तरावरील शांततेचे अग्रदूत बनले. त्या वेळचे अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहावर आणि रशियाचे कृश्चेव यांच्या मध्यभागी उभे राहून त्या दोघांचे हात आपल्या दोन हातांत घेऊन त्यांनी होऊ घातलेले जागतिक युद्ध थांबविले. त्यांनी स्वत:हून कधीही कोणाला मिठी मारली नाही आणि कोणाला झोक्यात बसवून झोके दिले नाहीत.

जागतिक राजकारणात त्यांचा एक आदरयुक्त दरारा होता. संपूर्ण आशिया खंडात शांतता नांदावी म्हणून त्यांनी चीनला यूनोचे सदस्य बनवण्यासाठी स्वत: प्रयत्न केले आणि त्याला यूनोच्या नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. त्यांनी भारताच्या परराष्ट्रधोरणाचा पाया भक्कम केला. त्यांच्या तटस्थतेच्या धोरणाचा अर्थ कोणत्याही जागतिक सैनिकी गटात सामील न होणे आणि सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, असा होता. त्यांचा जागतिक आणि भारतीय इतिहासाचा तसेच राजकारणाचा व्यासंग आश्चर्यचकित करणारा होता. ते नेहमीच जनतेशी संवाद करीत. फुशारक्या मारण्याऐवजी स्वत:च्या मर्यादा सांगत. काय करायचे राहून गेले त्याबद्दल दु:ख व्यक्त करत. त्यांची दृष्टी भविष्याभिमुख होती. असा सुसंस्कृत, व्यासंगी आणि कलासक्त नेता भारताचा पहिला पंतप्रधान व्हावा, हे भारताचे भाग्य होते. भारताच्या उभारणीत त्यांचे असलेले योगदान कोणतीही शक्ती पुसून टाकू शकत नाही. निर्बुद्ध आणि प्रतिगामी तर नाहीच नाही.

या ग्रंथाचा दुसरा विभाग गांधीजी आणि डॉ. आंबेडकर यांच्या संबंधांची विस्तृत चर्चा करणारा आहे. त्यापैकी कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ हे ठरवण्याचा नाही, ना त्यांचा एकत्रित मेळ घालण्याचा. ते दोघेही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच होते. ते दोघेही काळाच्या फार पुढे गेलेले होते. डॉ. आंबेडकर अधिक. म्हणूनच त्यांच्या शत्रुस्थानी असलेल्या सत्ताधाऱ्यांनासुद्धा त्यांचे नामस्मरण केल्याशिवाय सत्ता हाती घेता येत नाही आणि ती टिकवताही येत नाही. त्याचप्रमाणे आज त्यांच्या फोटोंचे फलक हातात घेतल्याशिवाय कोणतेही जनआंदोलन - मग ते विद्यार्थ्यांचे असो की स्त्रियांचे किंवा आणखी कुणाचेही - यशस्वी होऊ शकत नाही. आज जग त्यांच्याच नावाने भारताला ओळखते.

३.

गांधी मुखाने सनातन हिंदू धर्माची माळ जपत होते, परंतु कृतीने अस्पृश्यतानिवारण, आंतरजातीय सहभोजने आणि आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करीत होते. हा त्यांचा कृती कार्यक्रम सनातन हिंदू धर्माचा पायाच उखडून टाकत होता, हे भारतातील पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि विशेषत: दलित तरुणांनी नीट समजून घेतले पाहिजे. आंबेडकरांच्या घणाघाती टीकेमुळे काँग्रेसमधील पहिल्या पिढीतील नेतृत्व खुजे, ड्वार्फ, बनण्याऐवजी विकसित होत गेले. सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, मौ. अबुल कलम आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी इत्यादी ही त्याची उदाहरणे आहेत.

दक्षिण आफ्रिकेत जे घडेल, ज्याची चिंता अँन्ड्र्यूज यांना वाटत होती, ते भारतात घडले नाही. वातावरण मोकळे झालेले होते. पं. जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून स्वदेशी येताना फेबियन सोशॅलिझमचे संस्कार घेऊन आल्यामुळे ते दोघेही सुरुवातीपासून गांधीविचारांच्या विरोधी होते. परंतु नेहरूंनी गांधीजींचे नेतृत्व स्वीकारले. आंबेडकरांनी ते स्वीकारले नाही. आंबेडकर गांधीजींच्या भेटीत त्यांना सतत काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे देशाचे नेतृत्व करण्याचा सल्ला देत होते. आंबेडकरांसोबत झालेल्या पहिल्या भेटीनंतर तीनच वर्षांत म्हणजे १९३४ साली गांधीजी काँग्रेसमधून बाहेर पडले. तरीही ते मार्गदर्शक म्हणून राहिलेच.

४.

गांधी-आंबेडकर संघर्षात आंबेडकरही बदलले. त्यांनी समाजातील एका गटाचे राजकारण करण्याऐवजी ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांचाही विचार करू लागले. त्यांनी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करून ते कामगार नेते बनले. त्यांनी त्यांच्या राजकीय विचारांचा पाया (States and Minorities) या नवीन प्रसिद्ध झालेल्या अहवालात घातला. १९४० दशकाच्या सुरुवातीलाच त्यांनी भारताच्या फाळणीनिमित्ताने लिहिलेल्या ‘Pakistan or Partition of India’ या ग्रंथात भारताचा राजकीय इतिहास आणि समकालीन भारतातील राजकीय समस्यांची मूलभूत मांडणी केली. जीना आणि गांधी पाकिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा करताना त्याच ग्रंथाचा आधार घेत होते.

१९४५ साली त्यांनी ‘What Congress and Gandhi have done to Untouchales’ हा ग्रंथ लिहून गांधी आणि काँग्रेसशी असलेले मतभेद स्पष्ट केले. त्या ग्रंथाच्या निमित्ताने आंबेडकर गांधींचे सर्वात प्रभावी टीकाकार बनले. गांधीजींची राष्ट्रापेक्षा मोठी होत असलेली प्रतिमा हा आंबेडकरांच्या चिंतेचा विषय बनला होता. त्यांच्यासमोर भारताचा इतिहास आणि त्यातील अंधश्रद्ध आणि व्यक्तिपूजक समूह होता. भारताचा इतिहास दीर्घकालीन गुलामगिरीचा बनण्याचे कारण भारतीय जनता श्रेष्ठ पुरुषाच्या चरणी आपला स्वाभिमान आणि स्वातंत्र्य अर्पण करून त्याच्या छायाछत्राखाली सुरक्षित जीवन जगणे पसंत करणारी आहे. मग तो परकीय असो की स्वकीय. भारतीय माणसाला मनातून स्वातंत्र्याचे भय वाटते. कारण त्यामुळे केवळ माणसाचे जीवनच असुरक्षित होते, असे नाही तर खास भारतीय असलेली वर्णाश्रम आणि जातिसंस्थेवर उभी असलेली समाजव्यवस्थाही अस्थिर होते. भारतीयांना तर ती प्राणप्रिय होती.

या साऱ्या गोष्टी लोकशाहीला मारक होत्या. भारतीयांना भयमुक्त करण्यासाठी ते सार्वत्रिक प्रौढमताधिकाराचा आग्रह धरीत होते. त्यांची लोकशाहीची कल्पना केवळ ‘एक व्यक्ती - एक मत’ यावर उभी नव्हती तर ‘एक व्यक्ती - एक मूल्य’ या मानवतावादी विचारावर उभी होती. आंबेडकर गांधी आणि काँग्रेसविरुद्ध जी अतिशय कठोर भाषा बोलत होते ती फक्त गांधीजींनाच समजत होती. म्हणून काँग्रेस त्यांचे काहीही ऐकत नसल्याच्या काळात गांधीजींनी आंबेडकरांना संविधान सभेत पुन्हा आणण्याचा हट्ट धरला. त्यांना मसुदा समितीचे अध्यक्ष केले. संविधाननिर्मितीचे श्रेय आंबेडकरांना मिळावे, म्हणून त्यांना कायदेमंत्री बनवावे, असे सुचविले. ते पद स्वत: राजेंद्र प्रसाद यांना हवे होते, हे माहीत असतानासुद्धा.

गांधी आंबेडकरांना कायदेतज्ज्ञ समजत होते. १९३५च्या कायद्याचा आराखडा तयार करण्यातील त्यांचा सहभाग गांधींनी अनुभवला होता. आंबेडकरांनीही गांधी आणि काँग्रेसला खुल्या मनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. आंबेडकरही दोन पावले मागे गेले. १९४५ साली गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले? असा प्रश्न विचारणारे आंबेडकर १९४६ साली त्याच काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून संविधान सभेवर निवडून गेले. स्वत: गांधींनी लिहून ठेवले आहे की ते येरवडा कारागृहात असताना त्यांच्या नयनचक्षूसमोर आंबेडकर असत. त्याचप्रमाणे १४ ऑक्टोबर १९५६ रोजीही धर्मांतराच्या वेळी आंबेडकरांच्या मनात गांधी होते. आपण गांधीजींना दिलेला शब्द पाळला, याबद्दल पत्रकार परिषदेत आंबेडकर धन्यता मानीत होते. त्यामुळे गांधींना समजून घ्यायचे असेल तर आधी आंबेडकरांना पूर्वग्रहविरहितपणे समजावून घेणे आवश्यक असते आणि आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर खुल्या मनाने गांधींना. त्यासाठी अभ्यासकांना एक नवी दृष्टी कमवावी लागेल. तिच्या अनेक खुणा या ग्रंथात सापडतील.

५.

या ग्रंथातील गांधी-आंबेडकरांच्या विस्तृत चर्चेचे दुसरे कारण मराठी भाषा हे आहे. गांधींचे भारतीय चरित्रकार मग ते डी. जी. तेंडुलकर, प्यारेलाल, सुशीला नायर, निर्मलकुमार बोस, बी. आर. नंदा किंवा भिकू पारेख वगैरे असोत. त्यांच्या इंग्रजी भाषेतील लिखाणात आंबेडकरांचा उल्लेख आनुषंगिक येतो. प्यारेलाल, राजमोहन गांधी आणि रामचंद्र गुहा यांचे लिखाण त्याला थोडा अपवाद. रामचंद्र गुहांनी गांधींच्या आयुष्यावर आंबेडकरांच्या प्रभावाचा अधिक सहृदयपणे विचार केलेला आहे, तो त्यांच्या या विषयावरील शेवटच्या ग्रंथात. गांधींचे परदेशी चरित्रकार लुई फिशर, रॉबर्ट प्येन (Robert Payen), ज्युडिथ ब्राऊन, रॉड्रिक मॅथ्यू, जॅड अॅडम्स, क्लाऊड मार्कोविट्स (Claud Markovits), चार्ल्स डिसॉल्वो या आणि यांच्यासारख्या अन्य अभ्यासकांनी आंबेडकरांचा केवळ पुणे कराराच्या संदर्भात ओझरता उल्लेख केलेला आहे. त्यांना मराठी भाषा येत नव्हती तरीही त्यांनी ज्या प्रकारे गांधी जगाला समजावून सांगितला त्याबद्दल अभ्यासक त्यांच्याप्रति निश्चित कृतज्ञ राहतील. गांधी-आंबेडकर संघर्ष ज्या काळात अतिशय तीव्र बनला होता, त्या काळातील सर्व घटनांचा बारीकसारीक साद्यंत वृत्तान्त, त्यासंबंधीचे वैचारिक मंथन इंग्रजीत नव्हे तर मराठी नियतकालिकांत आलेले होते. त्यामुळे गांधीजींचे अमराठी चरित्रकार त्यापासून वंचित राहणे साहजिक होते. हा संघर्ष व्यवस्थित समजून घेण्याची मूळ साधने होती ती मराठी भाषेतील ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ आणि ‘समता’ या नियतकालिकांत. त्याचप्रमाणे चां. भ. खैरमोडे यांनी अनेक खंडांत परंतु अतिशय विस्कळीतपणे बाबासाहेबांचे लिहिलेले चरित्र. धनंजय कीर यांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिलेले आंबेडकरांचे संपूर्ण चरित्र पहिलेवहिले असले तरी कीर सावरकरवादी असल्याने काही गोष्टी त्यांनी दृष्टिआड केल्या. या मराठी साधनांचा उपयोग केल्याशिवाय ना त्या काळातील गांधी समजून घेता येत ना आंबेडकर.

हा माझा ग्रंथ जेव्हा इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांत प्रसिद्ध होईल, तेव्हा अन्य भाषांतील संशोधक आणि अभ्यासक यांना जुन्या मांडणीतील चुका आणि मर्यादा यांची पुनर्मांडणी करण्यासाठी आणि नव्या मांडणीसाठीची सर्व दालने खुली होतील, असा विश्वास वाटतो.

..................................................................................................................................................................

या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा - 

https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......