अजूनकाही
भारताच्या इतिहासातील युगप्रवर्तक क्रियाशील तत्त्वचिंतकाच्या मालिकेत महात्मा गांधी यांची प्रामुख्याने गणना करावी लागेल. सत्याग्रह दर्शनाचे प्रणेते, स्वातंत्र्यलढ्याचे सेनानी, विधायक दृष्टीचे सुधारक आणि धर्म-नीतीच्या ऐक्यभावाचा पाठपुरावा करणारे आधुनिक संत म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. गांधींचे चरित्र, विचार आणि कार्य यांवर अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. मात्र, पत्रकार म्हणून महात्माजींनी जे कार्य केलेले आहे, त्यावर स्वतंत्रपणे प्रकाश टाकणारे लेखन फारसे आढळत नाही. एक प्रकारे, गांधींजींची पत्रकारिता हा इतिहासातील एक दुर्लक्षित पैलू आहे, असे म्हटले पाहिजे!
गांधीजींचे सर्वच कार्य अद्भुत आणि अचंबित करणारे असे होते. त्यांची वृत्तपत्रीय कामगिरीही त्याला अपवाद नव्हती. पुढे अनेक वृत्तपत्रांचे संपादक आणि लेखक झालेले गांधीजी वयाच्या १९ व्या वर्षांपर्यंत वाचक म्हणूनदेखील वृत्तपत्रांच्या वाटेला गेलेले नव्हते, असे त्यांनीच आपल्या आत्मचरित्रात नोंदवून ठेवले आहे. मात्र कायद्याच्या अभ्यासासाठी ते इंग्लंडला गेले, तेव्हापासून त्यांना वृत्तपत्र वाचनाची गोडी लागली. एवढेच नव्हे, तर त्यांच्यात लेखन करण्याचीही गोडी निर्माण झाली. इंग्लंडमधील शाकाहारी संस्थेचे मुखपत्र ‘व्हेजेटेरिअन’ यात त्यांना लेखन करण्याची संधी लाभली आणि गांधीजी ‘फ्री-लान्स’ पत्रकार झाले.
१८९३ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेला प्रयाण केले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या अनेक कल्पना परिणत झाल्या. त्यांच्या जीवितकार्याची दिशा निश्चित झाली. या कार्याला पूरक म्हणून ते पत्रकार झाले. लंडनच्या व्हेजेटेरिअन सोसायटीने त्यांना लिहायला व बोलायला शिकवले, तर दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकजीवनाच्या आवर्तात सापडल्यामुळे ते आपल्या अंतःकरण प्रवृत्तीला प्रमाण मानणारे पत्रकार झाले.
..................................................................................................................................................................
या १००० रुपये किमतीच्या पुस्तकाची आजच पूर्वनोंदणी करा आणि ७५० रुपयांमध्ये मिळवा. त्यासाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5243/Gandhi---Parabhut-Rajkarani-Vijayi-Mahatma
..................................................................................................................................................................
हिंदुस्थानातील बहुतेक वर्तमानपत्रांची सहानुभूतीही त्यांनी संपादन केली होती. त्यावेळी ‘टाईम्स ऑफ इंडिया’त लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी म्हटले होते की, “प्रसिद्धी हेच आमचे एकुलते एक संरक्षणाचे शस्त्र आहे.” त्यांनी ‘ग्रीन पॅम्प्लेट’ नावाने एक पुस्तिका लिहून प्रसिद्ध केली होती. तिला भारतीय वर्तमानपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली. पायोनियर, मद्रास स्टँडर्ड, अमृतबझार पत्रिका, स्टेट्समन वगैरे वर्तमानपत्रांनी गांधीजींच्या मुलाखती छापल्या. ‘इंग्लिशमन’ पत्राचे संपादक सॉन्डर्स यांच्याशी तर त्यांची फारच गट्टी जमली होती, असे गांधीजींनीच आपल्या आत्मचरित्रात स्पष्ट केले आहे.
१८९० मध्ये ब्रिटिश काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने काढलेल्या ‘इंडिया’ साप्ताहिकाचे गांधीजी हे दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, डर्बन येथील बातमीदार म्हणून काम करत. १८९७मध्ये ‘नेटल मर्क्युरी’ पत्रात भारताबद्दल त्यांनी लिखाण केले. १८९९ मध्ये बोअर युद्धाविषयी एक लेखमाला ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये त्यांनी लिहिली होती. केवळ योगायोगाची गोष्ट अशी की, विन्स्टन चर्चिल हे याच सुमारास ‘मॉर्निंग पोस्ट’मध्ये बोअर युद्धाबद्दलच वार्तांकन करत होते.
हिंदी लोकांच्या तक्रारी व गाऱ्हाणी दूर करण्याच्या चळवळीला स्वतःचे मुखपत्र पाहिजे, असा विचार करून गांधीजींनी ‘इंडियन ओपिनियन’ हे वर्तमानपत्र सुरू केले. यातील पहिला अग्रलेख गांधीजींनीच लिहिला होता. त्यात त्यांनी हे पत्र काढण्याचा हेतू व पुढे करत राहण्याचे कार्य यासंबंधी विवेचन केले होते. ‘इंडियन ओपिनियन’मध्ये इंग्रजी, गुजराती, हिंदी व तामिळ भाषेतील मजकूर प्रसिद्ध होत असे. बाळशास्त्री जांभेकरांचा ‘दर्पण’ इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत छापला जात असे. त्याची ही पुढची आवृत्ती असे म्हणण्यास हरकत नाही! या पत्रात राजकारण, सांस्कृतिक इतिहास, स्थानिक घडामोडी याविषयी लिखाण येत असे. गांधीजींनी एकदा त्यात ‘हिंदी कलाकौशल्य’ अशा मथळ्याचा लेख त्यात लिहिला होता.
‘इंडियन ओपिनियन’ पत्रातून गांधीजींना प्राप्ती अशी काहीच झाली नाही. उलट, पहिल्याच वर्षी २००० पौंडांची तोशीश सोसावी लागली. १९०५मध्ये साडेतीन हजार तर १९०९मध्ये पाच हजार पौंडांचा तोटा सहन करावा लागला. अर्थात याचा खेद त्यांनी कधीच केला नाही. हिंदी लोकांच्या गाऱ्हाण्यांचे निराकरण करण्यासाठी ते पत्र काढले होते. हे त्याचे कार्य अविरत चालू होते. १९०३ ते १९१५ या काळात जेव्हा गांधीजी तुरुंगात नसत, तेव्हा त्यांचे लिखाण या पत्रात नियमित येत असे. गुजराती व इंग्रजी भाषेतून मुख्यतः ते लिहीत असत. दहा-अकरा वर्षांत ही जबाबदारी घेतल्यामुळे त्यांना छापखाना व वर्तमानपत्र चालवणे या उद्योगातील अनुभव, तसेच उपयोगी तपशीलवार माहिती त्यांच्यापाशी जमा झाली.
गांधीजींनी ‘यंग इंडिया’, ‘नवजीवन’ अथवा ‘हरिजन’ ही पत्रे सुरू केली. या पत्रांत त्यांनी जाहिराती कधीच घेतल्या नाहीत. ही भारतात चालवलेली त्यांची पत्रे केवळ मतपत्रे होती. १९१८-१९ नंतर त्यांनी स्वतःचे असे पत्र काढले नाही. पण ‘क्रॉनिकल’सारख्या दैनिकात लेख आणि पत्रे लिहून ते आपली मते प्रकट करत असत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
त्तपत्राबाबत आपले मत प्रकट करताना गांधीजींनी म्हटले होते, माझ्या नम्र मताप्रमाणे चरितार्थासाठी वर्तमानपत्राचा धंदा करणे चुकीचे आहे. काही कार्यक्षेत्रे अशी असतात, की त्यांचा सार्वत्रिक हितावर मोठा परिणाम होत असतो आणि त्या कार्यक्षेत्राचा वापर जीवनयात्रा चालवण्यासाठी केला तर त्या कार्यक्षेत्राचे उद्दिष्ट नाहीसे होण्यासारखे होते. त्यातूनही नफा मिळवण्यासाठी जेव्हा वर्तमानपत्र चालवण्यात येते, तेव्हा तर अनेक गैरप्रकार त्या व्यवहारात उद्भवतात. वर्तमानपत्रे मुख्यतः लोकशिक्षणासाठी चालवली पाहिजेत. त्यांना दैनंदिन घटनांची माहिती देणे भागच आहे. हे काम कोणीही व कसेही करावे असे नाही. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की, वाचकांना वर्तमानपत्रे नेहमीच विश्वासार्ह वाटत नाहीत. छापून येते एक आणि खरोखर घडलेले असते निराळे. असे होऊ नये म्हणून वर्तमानपत्रांनी नेहमीच खबरदारी घेतली पाहिजे.
१९२०-२२ या काळात गांधीजींनी वृत्तपत्रांमधून जे लिखाण केले, ते ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने राजद्रोहात्मक होते. त्यामुळे त्यांना शिक्षाही झाली. न्यायमूर्तींनी त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावली व त्यांच्या कार्याची तुलना लोकमान्य टिळकांच्या याच प्रकारच्या कार्याशी केली. गांधीजींनी शिक्षा स्वीकारताना टिळकांच्या नावाचा उल्लेख आपल्या नावाशी जोडल्यामुळे आपला फार मोठा गौरव झाला, असे उद्गार काढले. त्यांची तुरुंगातून सुमारे दोन वर्षांनी सुटका झाली. या काळात त्यांनी टिळकांची आठवण व्हावी अशा प्रकारचा विद्याव्यासंग केला.
गांधीजींनी आपल्या राजकीय विचारसरणीचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याकरता ७ एप्रिल १९१९पासून ‘सत्याग्रही’ या संपादकीय नावाखाली ‘सत्याग्रह’ नावाचे साप्ताहिक सरकारी परवान्याशिवाय प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. ‘यंग इंडिया’ हे इंग्रजी आणि ‘नवजीवन’ हे गुजराती नियतकालिक १९१९पासून गांधीजींच्या संपादकत्वाखाली प्रसिद्ध होऊ लागले. ‘ना फायदा ना तोटा’ या पद्धतीने ही प्रकाशने चालू राहिली. ११ फेब्रुवारी १९३३ रोजी येरवडा तुरुंगात असताना ‘हरिजन’ हे सुरुवातीला इंग्रजीतून व त्यानंतर हिंदीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक त्यांनी सुरू केले. गांधीजींनंतर मात्र यातले कोणतेच पत्र फार काळ चालू शकले नाही. ते संपादक असतानाही हिंदी ‘नवजीवन’चा खप कमी झाला होता.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सत्याग्रहाच्या चळवळीत सहभागी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांचे लिखाण ते यात आवर्जून छापत असत. चरखा व स्वदेशी, हरिजन सेवा, सत्याग्रहाचे व असहकारितेचे आंदोलन, आध्यात्मिक जीवनपद्धती, अहिंसेचा महिमा, ग्रामोद्योग, हिंदू-मुस्लीम ऐक्य, अस्पृश्यतानिवारण अशा विषयांवर लेखन प्रसिद्ध होत असे. या पत्रांद्वारे त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले. सहज सोपी भाषा, सहृदयता, त्यांचं व्यक्तिमत्त्व यांमुळे जनता भारून गेली.
गांधीजींचा असा विश्वास होता की, हे लिखाण त्यांच्या जीवनाचे सार आहे. गीता, बायबल आणि कुराण याप्रमाणेच हे लिखाण असल्याचे ते मानत असत. प्रत्येक वाक्य पत्रकारासाठी ब्रह्मवाक्य असते. कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती देणं अशोभनीय आहे, असे त्यांचे मत होते.
गांधीजींचे वर्तमानपत्रातील लिखाण ब्रिटिश सरकारकडून दुर्लक्षित असलेल्या सामान्य जनतेचा आवाज होता. सत्याग्रह, अहिंसा आणि सत्याचा शोध घेण्यासाठी एक मिशन म्हणून गांधीजींनी जवळपास ५० वर्षे पत्रकारिता केली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात हे फार दुर्मीळ उदाहरण आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment