अजूनकाही
संसदेने आता कृषी सुधारणांच्या नावावर तीन विधेयके मंजूर केली आहेत, परंतु कॉर्पोरेट घराण्यांनी खूप आधीपासूनच त्याची तयारी सुरू केली होती. या कायद्याच्या समर्थकांकडून आता व्यापारी व शेतकऱ्यांकडून दलाली खाणारे मध्यस्थ दूर केले जातील, असा दावा केला जात आहे. मग शेतकऱ्यांचा माल कोण खरेदी करणार? वस्तुस्थिती अशी आहे की, माल विकला जाईल आणि तोही एजंटच खरेदी करेल, परंतु तो एक मोठा एजंट खरेदी करेल. आता तो माल अदानीसारखा मोठा कॉर्पोरेट घेईल. गेल्या पाच वर्षांपासून अदानी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करण्याची तयारी करत आहेत.
आपण जर अदानींनी तयार केलेली अन्न साठवण प्रणाली पाहिली तर खरोखरच चकित होऊन जाऊ. अदानी यांनी पीपीपी अर्थात सरकारबरोबर सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या नावाखाली धान्य साठवण्यासाठी सायलो स्टोरेज नावाच्या मोठ्या स्टीलच्या टाक्या तयार केल्या आहेत. सायलो स्टोरेज ही स्टीलच्या टाक्यांची अशी एक प्रणाली आहे की, ज्यात मोठ्या प्रमाणात धान्य साठवता येते. त्यात अनेक मोठ्या आकाराच्या दंडगोलाकार टाक्या असतात. त्यात ओलावा आणि तापमानामुळे धान्यावर वाईट परिणाम न होता ते बऱ्याच दिवसांपर्यंत साठवले जाऊ शकते. तसेच या अद्ययावत सायलो टाक्यांतून रेल्वेच्या साईडिंगद्वारे मोठ्या प्रमाणात धान्याची चढ-उतार करणे सहज शक्य आहे. यामुळे साठवण आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसानही कमी होते.
सरकारने २०१७मध्ये (पीपीपी) सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरणाअंतर्गत १०० लाख टन साठवण करू शकणाऱ्या स्टीलच्या सायलो टाक्या तयार करण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु ३१ मे २०१९पर्यंत केवळ ६.७५ लाख टन साठवणीच्या स्टीलच्या सायलो टाक्या तयार करू शकले. मध्य प्रदेशात ४.५ लाख टन क्षमतेच्या आणि पंजाब-हरियाणामध्ये २.२५ लाख टन क्षमतेच्या टाक्यांची निर्मिती झाली आहे. आणि त्याही अदानीनेच तयार केल्या आहेत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
वास्तविक पाहता, स्टीलच्या सायलो टाक्या हेच भविष्यातील धान्य साठवणुकीचे साधन आहे. सायलो टाक्या जगात प्रथम कॅनडामध्ये तयार केल्या गेल्या. त्यानंतर कॅनडा आणि भारत सरकार यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत पंजाब, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये सायलो स्टोअरेज बांधले जात आहेत.
मात्र या कामात अदानींनी बाजी मारली आहे. त्यांच्या अॅग्री लॉजिस्टिक लिमिटेड (AALL)ने भारतीय खाद्य महामंडळाशी विशेष सेवा करार केला आहे. त्यांच्या सहकार्याने पंजाबमधील मोगा आणि हरियाणामधील कैथलमध्ये बनलेल्या सायलो टाक्यामध्ये धान्य साठवण केले जात आहे.
मागील वर्षी अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव रविकांत यांनी सोलूमाजरा येथील अदानी अॅग्रो सायलोची पाहणी केली होती. कैथल जिल्ह्यात असलेल्या या सायलो टाक्यामध्ये दोन लाख टन गहू साठवण्याची क्षमता आहे. सध्या त्यात एक लाख ६० हजार टन गहू साठा आहे. अदानी यांनी तेथील अधिकारी वर्गाला या सायलो टाक्यामध्ये गहू विक्रीसाठी आणण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे ऑनलाईन पाठवले जातील.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अदानी देशभरात असे सात तळ आणि फील्ड डेपो उभारणार असल्याचे मानले जात आहे. अदानी समूहाने तीन मुख्य कृषी कंपन्या स्थापन केल्या आहेत. अदानी विल्मर लिमिटेड (AWL), अदानी अॅग्री लॉजिस्टिक लिमिटेड (AALL) आणि अदानी अॅग्री फ्रेश लिमिटेड (AAFL) अशी त्यांची नावे आहेत. अदानी अॅग्री लॉजिस्टिक ही अन्नधान्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याची आणि तो हाताळण्याची यंत्रणा आहे. तेच भारतीय खाद्य महामंडळाला (FCI) अखंडपणे ‘एंड टू एंड होलसेल सप्लाय’ चेन पुरवते. या कंपनीकडे १३ अत्याधुनिक सायलो स्टील टाक्या आहेत आणि मोठ्या शहरांमध्ये त्यांचे स्वतःचे रेल रॅक आणि रेल्वे टर्मिनल आहेत.
यावरून हे स्पष्ट होते की, येथून पुढे छोट्या ‘गल्ला व्यापाऱ्यां’ची भूमिका संपुष्टात येणार आणि अदानी-अंबानीसारख्या मोठ्या कॉर्पोरेटसचा खेळ सुरू होणार!
..................................................................................................................................................................
हा मूळ हिंदी लेख http://www.mediavigil.com या पोर्टलवर २३ सप्टेंबर रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -
..................................................................................................................................................................
लेखक गिरीश मालवीय स्वतंत्र पत्रकार आणि आर्थिक बाबींचे जाणकार आहेत.
अनुवाद - कॉ. भीमराव बनसोड
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment