अजूनकाही
जागतिकीकरणानंतर देशात जे वादळी बदल सुरू झाले, त्यात अनेक जुन्या गोष्टी वाहून गेल्या. बजाजच्या स्कुटरसाठी वेटिंग लिस्ट लावणं बंद झालं. टेलिफोनसाठी वाट बघणं बंद झालं. २००० नंतर या बदलांची गती अजूनच वाढली. ऐंशी आणि नव्वदच्या दशकांमध्ये जन्म घेतलेल्या पिढ्यांनी जितके बदल पाहिले असतील, तितके क्वचितच कुठल्या पिढीने पाहिले असतील. त्या अर्थाने आमची पिढी ही संक्रमणावस्थेतील आहे. जागतिकीकरणाचे सगळे फायदे ओरपून घेतल्यावर त्याचे तोटे नको असणारी पिढी. प्रचंड भोवंडून टाकणाऱ्या जगाप्रमाणे बदलताना तिशीतच नॉस्टॅल्जिया आलेली पिढी. कुणी नोंद घेतली आहे कि नाही ते माहीत नाही, पण सामाजिक माध्यमांवर गेल्यावर कुणी या पिढीतल्या लोकांचं लिखाण पाहिलं तर जाणवेल की ती प्रचंड नॉस्टॅल्जिक असतात. आपल्या शाळा-होस्टेल-कॉलनीचे ग्रुप बनवून तिथे ते जुने दिवस किती भारी होते आणि आता कसं सगळं बोअर होत चाललंय असल्या चर्चा करत असतात. सध्या तिशी आणि चाळीशीत असणारे ही लोक अनेक आस्थापनांमध्ये (त्यात माध्यमं पण आली ) महत्त्वाच्या पदांवर आहेत. त्या काळात जन्मलेले लोक सध्या आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. पण आपली माध्यमं विशेषतः मराठी माध्यमं या लोकांच्या नॉस्टॅल्जियाची दखल घेतात का?
अर्थात मला इथं सिनेमा, संगीत, इतर दृकश्राव्य माध्यम यासंदर्भातला नॉस्टॅल्जिया अपेक्षित आहे. एक उदाहरण देतो. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या प्रदर्शनाला पंचवीस वर्षं पूर्ण झाली, याची दखल संपादकीयात लोकसत्ता सोडून कुणीच घेतली नव्हती. इतर वर्तमानपत्रांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. पण जेव्हा ‘शोले’च्या बाबतीत अशाच स्वरूपाचं काही घडलं, तेव्हा एकजात सगळ्यांनी त्याची दखल घेतली गेली. याची कारणमीमांसा काय असावी?
आपल्याकडे अजूनही साठीचं दशक, संगीताचा तथाकथित सुवर्णकाळ, राज कपूर-देव आनंद-दिलीपकुमार, अमिताभ बच्चन यांचा हँगओव्हर लोकांच्या आणि विशेषतः माध्यमात लिखाण करणाऱ्या लोकांच्या मनातून उतरलेला नाही.
मागच्या वर्षीचे दिवाळी अंक वाचताना मला हे प्रकर्षानं जाणवलं. दिवाळी अंक हे साधारणतः मराठी वाचकांच्या अभिरुचीची लिटमस टेस्ट मानली जाते. पण मला याच वर्षीच्या नाही तर कुठल्याच वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये नव्वदच्या दशकातला सिनेमा, त्या काळातलं संगीत, संगीत दिग्दर्शक, गीतकार यांच्याबद्दल कधीही काहीही वाचायला मिळालं नाही. कुठल्याही वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांमध्ये त्यांच्याबद्दल वाचायला मिळत नाही.
नव्वदच्या दशकातला सिनेमा आणि संगीत हे काही अपवाद वगळता पिटातल्या आणि श्रमिक वर्गाला समोर ठेवून तयार केला जायचा. सध्याचा जो अभिजन आणि ओपिनियन मेकर म्हणवून घेणारा वर्ग आहे, त्याने याला कायमच नाकं मुरडली. अर्थात आपापली आवडनिवड असते हे मान्य आहेच. पण यांच्या नाक मुरडण्यामुळे त्या काळातला सिनेमा-संगीत जे आज पण ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये पाहिलं आणि ऐकलं जातं, त्याची नोंद कधीच माध्यमांमधल्या मुख्य प्रवाहांनी घेतली नाही.
मला शंकर जयकिशन किंवा ओ.पी. नय्यरपेक्षा नव्वदच्या दशकातले आनंद-मिलिंद किंवा नदीम श्रवण जास्त आवडतात, असं विधान कुणी धाडसाने केलं, तर लोक तुमच्याकडे ‘कुठून आलंय हे येडं?’ या नजरेनं बघायला लागतात . बहुतेक लोकांची प्रतिक्रिया अशी असू शकते की, कोण आहेत हे? दुसरं म्हणजे ‘कसली छपरी आवड आहे तुझी! काही ‘क्लास’ वगैरे आहे की नाही?’ कारण आनंद-मिलिंदनी किंवा नदीम श्रवण यांनी संगीत दिलेले बहुतेक चित्रपट ‘मासेस’साठी होते. आनंद-मिलिंदच उदाहरण वानगीदाखल घेण्यासारखं आहे.
आनंद-मिलिंदनी ‘कयामत से कयामत तक’मधून बॉलिवुडमध्ये झोकात पदार्पण केलं. त्या चित्रपटाची गाणी दणकून हिट झाली. आनंद-मिलिंद हे इंडस्ट्रीमधलं मोठं नाव झालं. नंतर त्यांनी ‘बेटा’, ‘दिल’, ‘लाडला’, ‘बोल राधा बोल’, ‘मृत्युदंड’, ‘कुली नंबर वन’, ‘हिरो नंबर वन’ आणि इतर अनेक हिट सिनेमे दिले. पण मासेससाठी काम करणाऱ्या बहुतेक लोकांवर (उदा. गोविंदा आणि दादा कोंडके ) एक उथळपणाचा ठप्पा लागतो. तो आनंद-मिलिंदवर पण लागला. नव्वदच्या दशकात गोविंदा आणि डेव्हिड धवन जोडी जेव्हा फुलफॉर्मात होती, तेव्हा त्यांच्या बहुतेक चित्रपटांना आनंद-मिलिंदने संगीत दिलं होतं. नंतर मिथुन चक्रवर्तीने ‘उटी’मधून ठोकच्या भावात चित्रपटनिर्मिती सुरू केली (काही लोक त्याला चेष्टेने ‘उटीवूड’ म्हणतात!) तेव्हा त्यातल्या दहा पैकी चार चित्रपटांना आनंद-मिलिंदच संगीत असायचं. वर्षानुवर्षं हिट संगीत देऊनही आनंद-मिलिंद हळूहळू आऊटडेटेड होत गेले. अनेकजण होतात. ते ठीक आहे.
दुःख या गोष्टींचं आहे की, यांच्या संगीताबद्दल कुठं लिहून येत नाही की, कुणी संगीत समीक्षक त्यांच्या ‘मासेस’साठीच्या संगीताच विश्लेषण पण करत नाही. नदीम-श्रवण, जतिन-ललित या नव्वदच्या दशकातल्या संगीत दिग्दर्शकांचं पण तेच. माझ्या पिढीचे आवडते संगीत दिग्दर्शक. ज्यांच्या गाण्यावर आमचा नॉस्टॅल्जिया पोसला जातो ते संगीत दिग्दर्शक. म्हणजे सुवर्णकाळातले संगीत दिग्दर्शक. नंतर आर. डी. आणि नंतर रहमानच? बाकी लोकांचं काय? वर्षानुवर्षे सुरेल गाणी देणाऱ्या नव्वदमधल्या संगीत दिग्दर्शकांबद्दल काय? जिथं काळच थिजला आहे अशा ग्रामीण आणि परभणीसारख्या निमशहरी भागात, जिथं बहुसंख्य जनता राहते, तिथं अजूनही या लोकांचीच गाणी वाजतात. मध्यंतरी व्हॉटसअॅपवर एक फॉरवर्ड आला होता. ‘आजपण ‘तू प्यार है किसी और का’ हे गाणं वाजलं की, दहामधल्या आठ पोरांच्या डोळ्यात पाणी येत म्हणून. खरं तर हा विनोद नाही तर एक बुद्धिमान निरीक्षण आहे. आमच्या बारमध्ये, हॉटेलमध्ये, काळी पिवळीमध्ये नदीम श्रवण, आनंद-मिलिंद यांचीच गाणी वाजतात. आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगी अजून उदित, सानू, अभिजित यांचीच गाणी आठवतात. पण जर मला आजही मेनस्ट्रीम मीडियामध्ये पण वर्षानुवर्षं मदनमोहन, आरडी, रहमान, नय्यर यांच्यावरच वाचायला मिळतं. देशातल्या एका मोठ्या लोकसंख्येचं संगीत देणाऱ्या संगीत दिग्दर्शकांना ‘छपरी’ ठप्पा लावून बाजूला अडगळीत टाकणं, हे एकूण चित्रपटसंगीताच्या इतिहासाच्या डॉक्युमेंटेशनसाठी हानिकारक ठरणार आहे.
असंच उदाहरण गोविंदा आणि डेव्हिड धवन या जोडगोळीच्या सिनेमाचं देता येईल. या सिनेमामधला विनोद हा खालच्या पातळीचा समजला गेला. मिथुन चक्रवर्तीने याच काळात ‘बी’ आणि ‘सी’ सेंटरवरच्या लोकांसाठी तयार केलेला सिनेमा पण अनुल्लेखाने मारला गेला. एकूणच लुम्पेन वर्गाच्या सिनेमाला दुर्लक्षानं मारलं गेलं. या प्रक्रियेत नव्वदच्या दशकातला सिनेमा-संगीत भरडलं गेलं. अर्थातच नव्वदच्या सिनेमाच्या स्वतःच्या काही मर्यादा होत्या. त्यात प्रायोगिकशीलतेला शून्य जागा होती . त्या सिनेमामध्ये कुठल्याही प्रकारच्या सामाजिक जाणीवा नव्हत्या. पण प्रत्येक कालखंडाच्या स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात. तशाच नव्वदच्या दशकातल्या कलाकृतींनाही होत्या. नव्वदच्या दशकात तयार झालेले सिनेमे-संगीत यांचं जागतिकीकरणपूर्व आणि जागतिकीकरणोत्तर असे दोन उपप्रकार पडतात. ऐंशी -नव्वदीमध्ये जन्मलेली पिढी ज्याप्रमाणे संक्रणातली पिढी आहे, तीच बाब त्या काळातल्या टीव्ही, सिनेमा, संगीत यांना लागू पडते. त्या काळात बनलेला सिनेमाचा एक विशिष्ट सामाजिक आणि राजकीय संदर्भ आहे. उदाहरणार्थ खान त्रयीचा उदय याच काळात झाला. ‘यस बॉस’ चित्रपटातलं शाहरुख खानचं ‘बस इतनासा ख्वाब है’ हे गाणं तत्कालीन मध्यमवर्गाच्या उमलत्या इच्छा-आकांक्षाचं यथार्थ वर्णन करतं. ‘राजू बन गया जेंटलमॅन’ मधला शाहरुख खान श्रीमंत आणि यशस्वी तर व्हायचंय पण मूल्यांची कास पण सोडायची नाहीये, या टिपिकल मध्यमवर्गीय गुंतावळ्यात अडकलेला दिसतो. अमिताभ बच्चनची नायक म्हणून सद्दी संपण्याचा काळ हाच. भारतीय समाजानं ‘अँग्री यंग मॅन’चा चोळणा टाकून आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्याचा हाच तो काळ. अशा अनेक गोष्टी सांगता येतील नव्वदच्या दशकातल्या सिनेमाबद्दल.
हे अरण्यरुदन नाही, हे शेवटी स्पष्ट करायला हवं. आमच्या नॉस्टेल्जियाला माध्यमांमध्ये स्थान द्या हो असा टाहो पण नाही. मी स्वतः माध्यमांमध्ये लिखाण करतो आणि शक्य तेव्हा नव्वदच्या काळाबद्दल लिहितो. पण सोशल माध्यमांमध्ये लिहिणाऱ्या आणि ऐंशी-नव्वदच्या दशकात लहानाचे मोठे झालेल्या लोकांनी आपल्या पातळीवर या काळातल्या संगीताचं व चित्रपटांचं आपापल्या परीने डॉक्युमेंटेशन करत राहणं आवश्यक आहे. कारण मुख्य माध्यमांमध्ये याला स्थान मिळेल याची शक्यता कमीच आहे.
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Kalpak Mule
Mon , 30 January 2017
तुमचे म्हणणे खरे आहे. मुळात माध्यमातून चित्रपट संगीतावर लिहिणारे समीक्षकच कमी झाले आहेत. आणि जे आहेत ते ७० पूर्वीच्या कालखंडातच अडकले आहेत. ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न REDTRO FM 106.4 channel ने केला आहे. आणि त्या संगीतकार आणि गायकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे. बघूया आता इतर माध्यमं त्याची कधी दखल घेतायत. तुम्ही दखल घेतलीत म्हणून तुमचे आभार.
anirudh jadhav
Sat , 28 January 2017
मुळात नव्वदचं दशक हा अजून नॉस्टॅल्जियाच समजला जात नाहीये. कुठल्याही काळाला एकदा इतिहास समजलं गेलं की मग लोकांना त्या काळाबद्दल प्रेमाचं भरतं येतं. जसजशी ऐशी नव्वदच्या दशकात जन्मलेले माध्यमात हळुहळू केंद्रस्थानी येतील तेव्हा ह्या दशकालासुद्धा योग्य ते महत्व मिळेल