साधारण दोन वर्षांपूर्वी लेखापरीक्षणाशी संबंधित कामांसाठी आमच्या कार्यालयीन पथकासोबत ‘शासकीय विश्वस्त’ या मुंबईतील काळा घोडा जवळच्या कार्यालयात गेले होते. दिवंगत अभिनेत्री परवीन बाबीच्या अनौरस फ्लॅटच्या प्रकरणासंदर्भातील फाईल तिथे होती. जुहूमधील तिच्या भल्या मोठ्या फ्लॅटबाबत तिने ‘विल’ केले नव्हते. त्यामुळे परवीन बाबीची संपत्ती शासनाने ताब्यात घेतली होती. कालांतराने न्यायलयांत जाऊन तिच्या नातेवाईकाने त्या फ्लॅटचा ताबा मिळवला आणि ते प्रकरण शासकीयदृष्ट्या बंद झाले होते. तीच फाईल पुन्हा काही संदर्भाने बघताना परवीनच्या मृत्यूनंतरचा एक संदर्भ एकदम त्या क्षणी आठवला. परवीनच्या मृत्यूनंतरचं महेश भट्ट या चित्रपट दिग्दर्शकाची टेलिव्हिजन चॅनेलवरची मुलाखत आठवली. परवीनच्या आयुष्यांत महेश भट्ट यांचेही महत्त्वाचे स्थान होते, ते महेश भट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अर्थ’, ‘फिर तेरी कहानी याद आई’ अशा काही चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत परवीनशी असलेले त्यांचे संबंध संपुष्टात आले होते.
महेश भट यांनी परवीनच्या मृत्यूच्या काही वर्षं आधीचा एक प्रसंग त्या मुलाखतीत सांगितला. ते असं म्हणाले की, परवीन मला काही दिवसांपूर्वी बांद्र्याच्या एका बुकशॉपमध्ये दिसली, तेव्हा मी पुढे जाऊन तिला भेटण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या नजरेतून माझ्याबाबतची ओळखच पूर्ण पुसली गेली होती. ती एकदम अनोळखी असल्यासारखी माझ्याकडे बघत होती. ते सगळं त्यांना फार भयंकर वाटल्याचं त्यांनी मुलाखतीत नमूद केलंय.
परवीन बाबी नावाच्या अभिनेत्रीचे हे दोन संदर्भ मला आठवले होते.
परवीन बाबी ‘मल्टीस्टारर’ हिंदी चित्रपटयुगांतील लोकप्रिय अभिनेत्री होती, तरी तिचे अमिताभ बच्चन सोबत केलेले चित्रपट सोडले तर मी तिचं काम फार बघितलं नव्हतं किंवा ती फार अव्वल दर्जाची अभिनेत्री होती, असंही कधी माझं मत झालं नाही. तिच्या अफाट वाचनाबाबतचे संदर्भ कुठेतरी चित्रपटविषयक नियतकालिकांमध्ये वाचल्याचं आठवत होतं आणि एवढंच माझं परवीनबाबतचं ज्ञान होतं.
काही दिवसांपूर्वी तिचं ‘Parveen Babi: A Life’ हे चरित्र प्रकाशित झालं आणि त्याची काही परीक्षणं वाचनात आली. ती सगळी चांगली होती. कलावंतांची अशा पद्धतीनं चरित्रं लिहिण्याची आपल्याकडे फारशी परंपरा नाही.
करिष्मा उपाध्याय या चरित्रकर्तीलाही परवीनविषयी संशोधन करण्यापूर्वी इतरांइतकीच माहिती होती. चरित्र लिहिण्यापूर्वी तिने परवीनशी संबंधित शंभरहून अधिक लोकांच्या मुलाखती घेतल्या. परवीनचं जिथं जिथं वास्तव्य होतं, त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या, तिचा संदर्भ असणाऱ्या, प्रसिद्ध झालेल्या साहित्याचं वाचन केलं. असा सगळा अभ्यास करून उपाध्याय यांनी हे चरित्र लिहिलंय.
काही महिन्यांपूर्वी मृत्यू पावलेल्या सुशांतसिंग राजपूतच्या संदर्भाने चित्रपटसृष्टीतील अनेक धक्कादायक सूत्रांची मालिका समोर येतेय. अत्यंत ग्लॅमरस समजल्या जाणाऱ्या चित्रपटसृष्टीतील बेगडी आणि काळी बाजू दिसतेय. हे आत्ताचंच नव्हे तर पूर्वीपासून थोड्या फार प्रमाणात सुरू आहे. कमी कालावधीतील प्रसिद्धी आणि पैसा यात जगण्याचा तोल ढासळत जातो, कलावंत प्रसिद्धी, जगणं, अतिरेकी व्यसनाधीनता आणि नातेसंबंधांमध्ये समतोल ठेवू शकत नाहीत, असं प्रामुख्यानं लक्षात येतं. परवीनचं चरित्र ही या बाबींचा शोध घ्यायचा प्रयत्न करतं आणि या सगळ्यात कोलमडून गेलेल्या कलावंताचा प्रवास मांडण्याचा प्रयत्न करतं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
परवीन चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीच्या पार्श्वभूमीवरचं एक प्रकरण कुठल्या तरी वर्तमानपत्रात किंवा मासिकांत वाचलं आणि तिच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. जुनागडच्या पारंपरिक मुस्लीम कुटुंबातील जन्म ते अत्यंत बोल्ड म्हणून नावाजली गेलेली अभिनेत्री असा परवीनचा प्रवास आहे. ‘टाइम’ मॅगेझिनच्या कव्हरवर झळकणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री होती आणि ही बाब जुनागडच्या पार्श्वभूमीवर अधिक लक्षवेधी होती. किंडलवर परवीनविषयीचं हे पुस्तक शोधलं आणि लगोलग ‘सॅम्पल डाऊनलोड’ करून वाचलं. सॅम्पल वाचून ते पूर्ण वाचावंसं वाटलं.
परवीनचा जन्म गुजरातमधील जुनागडचा, तिचं घराणं जुनागडच्या संस्थानिकांचं. परवीनचे वडील वली मोहम्मद खानजी हे त्या घराण्याचे वंशज. वली आणि जमल या दाम्पत्याची, त्यांच्या उतारवयात झालेली परवीन एकुलती एक मुलगी. भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानिकं खालसा झाली, त्यांच्या जमिनी कुळकायद्यांत कमी होत गेल्या. या सगळ्या वातावरणात परवीनचं बालपण निघून गेलं. परवीन लहान असतानाच तिच्या वडिलांचं निधन झालं आणि आई- जमलकडे परवीनची, संपत्तीची जबाबदारी आली. परवीनच्या आईने फारसं फॉर्मल शिक्षण घेतलं नसलं तरी ती हुशार होती, तिचं व्यहारज्ञान चांगलं होतं, शिवाय तिला वाचनाची खूप आवड होती. तीच आवड परवीनमध्येही आली. परवीनचं शालेय शिक्षण जुनागढमध्येच झालं, ती अभ्यासात चांगली होती. प्रत्येक वर्गात ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायची. परवीन जुनागढमध्ये असतानाही तिचे आईवडिलांशी फार गाढ बंध निर्माण झालेच नव्हते. ती भावनिकदृष्ट्या आई-वडिलांवर फारशी अवलंबून नव्हती. या गोष्टींची तिच्या आयुष्यात कमतरताच राहिली, म्हणून पुढच्या आयुष्यातही ती कुठल्याच नात्यांत ती स्थिर राहू शकली नाही.
उच्चशिक्षणासाठी अहमदाबादला जायचा तिने हट्ट केला, तेव्हा आईला तिने लग्न करून सेटल व्हावं असं वाटायचं, परंतु शिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्ही ठरवाल त्या मुळाशी मी लग्न करेन असं आश्वासन परवीनने दिल्यावरच आईने तिला अहमदाबादला शिक्षण घेण्यासाठी परवानगी दिली. जुनागडच्या बंदिस्त वातावरणातून बाहेर पडून अहमदाबादच्या मोकळ्या वातावरणात मिळणारं स्वातंत्र्य परवीनने भरपूर अनुभवलं. सलवार कमीज ते मिनी स्कर्ट्सपर्यंतचा प्रवास तिने कमी कालावधीत पार केला. स्वातंत्र्याचा एक आविष्कार म्हणून परवीनने स्मोकिंग करायला सुरुवात केली आणि त्याचं पुढे तिला व्यसन लागलं. एक प्रकारचं मुक्त वातावरण परवीनला अहमदाबादला मिळालं.
एका अर्थाने जुनागढच्या दबलेल्या, बंदिस्त आयुष्यावर उन्मुक्त वागून उगवलेला सूडच होता असं म्हणावं लागेल. तिच्या पुढे सातत्याने त्रासदायक ठरलेल्या नात्यांची सुरुवात अहमदाबादमध्येच झाली. सलवार कमीज सोडून मॉडर्न कपडे घालणं किंवा स्मोक करणं हे त्याचंच निदर्शक होतं.
अहमदाबादला आल्यावर झवेरीज आणि मार्क्स ही दोन्ही कुटुंबं परवीनचे स्थानिक पालक होते. दोन्ही कुटुंबातील वातावरण परस्परविरोधी होतं. त्याचाही परवीनवर प्रभाव पडला. सेंट झेवियर्समधील वातावरणाशी जुळवून घ्यायचं असेल तर इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायला लागेल हे परवीनने हेरलं. तिने डिक्शनरीचा सातत्याने वापर करून आणि वाचन वाढवून इंग्रजी भाषेवर जाणीवपूर्वक प्रभुत्व मिळवले. अवांतर अनेक गोष्टी करूनही परवीनने उत्तम गुण मिळवून शिक्षण पूर्ण केले. आईला आश्वासन दिल्याप्रमाणे तिने निवडलेल्या मुलाशी लग्न करायला मान्यता दिली. तो मुलगा पाकिस्तानमध्ये फायटर पायलट म्हणून कार्यरत होता. परवीन त्याच्यात हरखून गेली. तिचं ते रूढ अर्थानं पहिलं प्रेम, परंतु भारत-बांग्लादेशच्या युद्धानंतर ताणल्या गेलेल्या भारत-पाकिस्तानच्या संबंधात परवीनचं हे नातं संपलं आणि तिचं आयुष्यही बदलून गेलं. परवीनचा हा नात्यांचा शोध तिच्या अंतापर्यंत कायम राहिला.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
परवीन कॉलेजमधील सांस्कृतिक उपक्रमामध्ये भाग घ्यायला लागली. तिचा आग्रह असायचा की, तिने निवडलेले कपडे, मेकअप इतरांपेक्षा वेगळा असावा. परवीनच्या व्यक्तिमत्त्वातील ‘बोहेमियन इसेन्स’ तेव्हापासूनच जाणवायला लागला होता. तिचं दिसणं, तिची भाषा, शिष्टाचार आणि तिचे खुले नातेसंबंध हे अधिक त्या दिशेनं झुकणारे होतं. अहमदाबादला तिचा परिचय मल्लिका साराभाई (अभिनेत्री, शास्त्रीय नर्तिका) यांच्याशी झाला आणि परवीन त्या कलेशी संबंधित असणाऱ्या वर्तुळाचा भाग झाली. तिथेच तिचा परिचय नेवेली दमानिया या तरुणाशी झाला. परवीनचं आणि त्याच्या मैत्रीचं गाढ प्रेमात रूपांतर झालं. दोघंही एकमेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.
नेवेलीच्या व्यक्तिमत्त्वाचा गहिरा प्रभाव परवीनवर पडला. तिला त्याच्या सहवासात संगीत, वाचन आणि चित्रपटाविषयीचा अधिक चांगला दृष्टिकोन मिळाला. विशेष म्हणजे पाश्चात्य कलांची तिची ओळख झाली. त्याच काळात म्हणजे १९७०मध्ये DRAMSOC (the dramatic society of IIM, Ahmadabad)ची स्थापना झाली. त्याचे संस्थापक होते रंगकर्मी अंशुल बलबीर, अच्युत वझे आणि सिद्धार्थ भट्टाचार्य. बलबीर यांची एका कॉमन मित्रामार्फत मल्लिका साराभाई आणि परवीनशी ओळख झाली होती. १९७१ला त्यांनी या संस्थेतर्फे आयन रँडचं ‘नाईट ऑफ जानेवारी १६’ आणि बादल सरकार (बंगाली भाषेतील महत्त्वाचे नाटककार) यांचं ‘एवम इंद्रजित’ हे नाटक बसवायचं ठरवलं आणि या दोघांनाही त्यात भूमिका करण्यासाठी तयार केलं. आयन रँडच्या नाटकांत परवीनने नॅन्सी ली फॉकनर आणि ‘एवम इंद्रजित’मध्ये ‘मानसी’ची भूमिका केली. मानसीच्या भूमिकेत परवीनने अधिक गहिरे रंग भरले. ‘एवम इंद्रजित’च्या प्रत्येक प्रयोगानंतर परवीनला भेटायला प्रेक्षकांची झुंबड व्हायची.
परवीनने असा प्रतिसाद किंवा लक्षवेधी असण्याचा अनुभव यापूर्वी कधी घेतला नव्हता. ते परवीनचं प्रसिद्धी आणि प्रतिसादाशी झालेलं पहिलं एनकाउंटर. अनेक वर्षानंतर जेव्हा परवीन हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला लागली होती, तेव्हा एका फिल्मच्या शूटच्या वेळी बादल सरकार अमोल पालेकरांचं फिल्म शूट बघायला आले होते, तेव्हा परवीनच्याही चित्रपटाचं शूट सुरू होतं. बादल सरकारांना बघून परवीन त्यांच्याकडे धावत आली आणि बादल सरकारांच्या एकदम पायाच पडली. तिने ‘एवम इंद्रजित’मधील भूमिकेनं तिचं कसं आयुष्य बदलवून टाकलं हे सरकारांना अगदी भारावून सांगितलं. मग ती पालेकर आणि सरकार, या दोघांशीही सुमारे दोन तास नाटक आणि साहित्यावर बोलत बसली. अमोल पालेकरांनी परवीनचा हा अनोखा अनुभव चरित्रकर्तीला सांगितला आणि आवर्जून नमूद केलं की, हिंदी फिल्ममधील तिच्या इमेजमुळे परवीनची ही बाजू कधी समोर आली नाही.
नवरोजी आणि दिवेचा यांनी भारतातील पहिली मॉडेलिंग एजेन्सी सुरू केली होती. त्यांनी भारतातील मोठ्या शहरांत त्याचे फॅशन शोज आयोजित केले. त्यांच्या कॅलिको मिल्ससाठी करण्यात येणाऱ्या अहमदाबादमधील फॅशन शोसाठी परवीनची निवड झाली. तिच्यामध्ये मॉडेलसाठी हवे असणारे सगळे गुण होते. परवीन सुडौल होती, तिची त्वचा तजेलदार होती, तसेच सुंदर केस आणि स्वतःला उत्तम कॅरी करण्याची अदब परवीनमध्ये होती. हे गुण विशेषतः साडीची जाहिरात करण्यासाठी फार आवश्यक होते. फॅशन क्षेत्रातून परवीनचा प्रवास चित्रपटांपर्यंत झाला. फॅशन क्षेत्रातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अभिनेत्रींची सुरुवात परवीनपासून झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : महाराष्ट्रीयन म्हणून ओळखलं जाणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!
..................................................................................................................................................................
त्यानंतर जवळपास दहा वर्षानंतर ‘मिस इंडिया कॉन्टेस्ट’ ते ‘फिल्म अभिनेत्री’ बनण्याचा ट्रेंड सुरू झाला. त्या काळातील अभिनेत्रींमध्ये फारसा दिसून न येणारा ‘हेल्थ कॉन्शसनेस’ परवीनमध्ये होता. ती जेन फोंडाचे ऐरोबिक्स करायची आणि बॅलन्सड डाएटवर तिचा भर होता. या मॉडेलिंगच्या निमित्ताने परवीन पहिल्यांदा पैसे कमवायला लागली आणि तिला तिच्या आतल्या गुणांचा परिचय व्हायला लागला.
पुढे चित्रपट दिग्दर्शक किशोर साहू यांची मुलगी ममता ही नवरोजींच्या एजन्सीसोबत मॉडेल म्हणून काम करत होती, तेव्हाच तिचा परिचय परवीनशी झाला. तिने आपल्या वडिलांना परवीनचं ‘धुएं की लकीर’ या चित्रपटासाठी नाव सुचवलं. पुढे बी. आर. इशारा या दिग्दर्शकानेही परवीनला त्यांच्या चित्रपटांत घेतल्याचा दावा केला. परंतु साहू आणि इशारा यांची चर्चा होऊन सामोपचाराने हा विषय मिटवण्याचे ठरले आणि १९७३ ला बी. आर. इशारा यांचा ‘चरित्र’ हाच परवीनचा रिलीज झालेला पहिला चित्रपट ठरला.
परवीनचं राहणीमान, खुले नातेसंबंध आणि स्मोकिंग यामुळे तिची सुरुवातीपासूनच मुक्त ‘सो कॉल्ड बोल्ड’ अशी प्रतिमा झाली. त्या काळातील बहुतेक अभिनेत्री फिल्मच्या सेटवर आई, बहिणी घेऊन यायच्या. त्या पार्श्वभूमीवर परवीनचं स्वतंत्र असणं आवर्जून लक्षात येतं. त्याचं कारण परवीन उच्चशिक्षित होती. ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकायची आणि त्या निर्णयांची जबाबदारी घेण्याची तिची तयारी असायची.
परवीनने केलेल्या चित्रपटांसोबतच, तिच्या नातेसंबंधाचीही तेवढीच चर्चा झाली. त्याचं कारण तिने नातेसंबंध कधी लपवून ठेवले नाहीत आणि वेळोवेळी त्याची जाहीर कबुलीही दिलीय. तिचं ज्यांच्याशी अफेअर होतं, त्या डॅनी डेंग्झोपा, कबीर बेदी किंवा महेश भट यांच्यापैकी फक्त डॅनी हे विवाहित नव्हते. परवीन त्यामुळे तिच्या फिल्म करिअरपेक्षा तिच्या बोल्ड वागणुकीमुळे, खुल्या नातेसंबंधांमुळेच जास्त चर्चित होती. तिचे डॅनी सोबतचे ‘लिव्ह इन’ संबंध किंवा डॅनीमुळे कशी ती अधिक हॉलिवूडचे चित्रपट बघायला लागली, याबाबत ती मोकळेपणाने बोलायची.
कबीर बेदीशी संबंध येण्यापूर्वी त्यांच्या बायकोशी- प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदीशी परवीनची मैत्री होती. कबीर बेदी तेव्हा इटलीतील टेलिव्हिजन सीरिअलमधील स्टार होता आणि तो तिकडेच करिअर करण्याबाबतचा विचार करत होता. त्याच काळात १९७६ला परवीनचा ‘टाइम’ मॅगझीनच्या मुखपृष्ठावर फोटो झळकला होता. हा बहुमान मिळालेली परवीन पहिलीच भारतीय अभिनेत्री होती. या घटनेने परवीनला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि फिल्म करिअरच्या ही परवीन शिखरावर होती. मोठ्या बॅनरचे, मोठे दिग्दर्शक व अभिनेत्यासोबतचे चित्रपट तिच्या हातात होते. तरी पण परवीन तिच्या इम्पल्सिव्ह स्वभावानुसार हे सगळं तडकाफडकी सोडून कबीर बेदी सोबतच्या सहजीवनासाठी लंडनला निघून गेली. तिथे तिने करिअर करण्याचा प्रयत्न केला.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : शांतता! नाटकांचे प्रयोग ‘लाईव्ह’ सुरू होत आहेत...
..................................................................................................................................................................
‘टाइम’च्या मुखपृष्ठावर झळकल्यामुळे तिकडे आपल्याला काम मिळेल असा परवीनचा होरा होता, पण तसं काही झालं नाही. कबीर बेदीशी तिचे वाढते मतभेद आणि काम मिळत नसल्यामुळे निर्माण झालेल्या असुरक्षिततेने तिला ग्रासलं. अशा तऱ्हेने कबीर बेदीसोबतचे नातेसंबंध संपुष्टात आल्यावर ती परत भारतात आली. भावनिक आवेगाच्या भरात निर्णय घेण्याच्या स्वभावामुळे परवीनमध्ये अभिनय गुण व बुद्धिमत्ता असूनही तिला अभिनयाच्या क्षेत्रांत म्हणावी तशी वाटचाल करता आली नाही. त्याचं हे निदर्शक होतं. ती त्यानंतरही फक्त ‘मल्टीस्टारर’ चित्रपटाची अभिनेत्री म्हणूनच राहिली.
यश चोप्रा, मनमोहन देसाई किंवा प्रकाश मेहरा यांसारख्या प्रथितयश दिग्दर्शकांकडे काम करून ही परवीनच्या अभिनयाची चर्चा झाली नाही. नाही म्हणायला करिअरच्या शेवटच्या काळात हृषीकेश मुखर्जी ‘रंगबिरंगी’ किंवा विनोद पांडे यांचा ‘ये नजदिकीयां’सारखे नॉन ग्लॅमरस चित्रपट करून स्वतःच्या अभिनयाची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न तिने केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सततच्या धरसोड वृत्तीमुळे चित्रपटांतील करिअर तिच्या हातातून निसटून गेली होती.
परवीन कबीर बेदीनंतर महेश भट यांच्यात गुरफटली. महेश भट तेव्हा त्यांच्या फिल्म करिअरमध्ये ओळख मिळवण्यासाठी धडपडत होते. दोघांच्या नातेसंबंधांच्या काळातच परवीनला असणाऱ्या मानसिक आजाराची (स्किझोफ्रेनिया) चाहूल लागत गेली. परवीनचा मानसिक तोल ढळत होता. महेश भट यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘अर्थ’ चित्रपटांत परवीनची व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटांत ती व्यक्तिरेखा ‘कविता’ या नावाने स्मिता पाटीलने साकारली आहे. महेश भटच्या ‘वो लम्हे’ आणि ‘फिर तेरी कहानी याद आई’ या दोन्ही चित्रपटांत त्यांनी परवीनची व्यक्तिरेखा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. परवीनला तिच्या अनेक चित्रपटांत सहकलावंताची भूमिका करणारे अमिताभ बच्चन यांच्याविषयी टोकाचं ऑब्सेशन होतं. त्यांच्याबाबत तिला कालांतरानं भास व्हायला लागले होते. कुणीतरी तिला मारण्याचा प्रयत्न करतंय असं सारखं तिला वाटायचं.
मागच्या काही वर्षांमध्ये दीपिका पदुकोण या प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या मानसिक आजाराबाबत जाहीर वक्तव्य केलं आणि ती गोष्ट जाहीरपणे मान्य करण्याचं धैर्य दाखवलं. त्याबाबत तिची प्रशंसाही झाली. दीपिका एवढंच करून थांबली नाही तर तिने त्यासंदर्भातील हेल्प ग्रुप्सचीही स्थापना केली.
परवीन ज्या काळात या सगळ्याला सामोरी जात होती, त्या काळात मानसिक आजाराबाबतचा हा अवेअरनेस नव्हता, तरी परवीनने अनेकदा जाहीरपणे स्वतःच्या मानसिक आजाराबाबतची माहिती प्रसारमाध्यमांतून अनेकदा मुलाखतींद्वारे दिली होती आणि त्याबाबतचे अनुभवही सांगितले होते. मानसिक अस्वास्थ्याच्या या काळात परवीनला जे कृष्णमूर्ती या तत्त्वज्ञ/ विचारवंताचा मोठा आधार मिळाला. महेश भट्ट यांच्यामुळे ती कृष्णमूर्ती यांच्याजवळ जाऊ शकली. ती त्यांच्यासोबत बंगलोर, गस्ताद (स्वित्झर्लंड) आणि अमेरिकेत अनेक दिवस राहिली. कृष्णमूर्तींसोबत परवीनचे प्रेमसंबंध होते, अशा अर्थाच्या चर्चाही केल्या जायच्या. परवीनने मात्र याचा वेळोवेळी इन्कार केला होता. कृष्णमूर्ती आपल्या आयुष्यात कायम ‘मॉरल पिलर’च्या भूमिकेत होते, असं तिने वेळोवेळी नमूद केलं होतं.
परवीनला तिचे सहकारी व स्वीय सहाय्यक वेद शर्मा यांनी अनेक वर्षं साथ दिली. परवीनचे आणि तिच्या आईचे संबंध फारसे सुधारले नाहीत. आई गेल्यानंतर परवीन अजून एकाकी झाली. मानसिक आजार बळावल्यामुळे ती सगळ्यांपासून दुरावली. तिचा कुणावरही विश्वास राहिला नव्हता. संशयानं ती ग्रासली होती. अमेरिकेतून सातेक वर्षांनी भारतात परतली, पण तोवर चित्रपटसृष्टी आमूलाग्र बदलली होती. परवीन इतक्या वर्षानंतरही अमिताभ बच्चनबाबतचं ‘ऑब्सेशन कम अढी’ मनात ठेवून होती. ‘सिंपली शेखर’ या चॅट शोमधील तिचं अमिताभविषयीचं बोलणं ऐकल्यावर ते जाणवतं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
परवीनला मानसिक आजारासोबत अनेक शारीरिक व्याधींनीही ग्रासलं होतं. तिचं वजन ही बेसुमार वाढलं होतं. परवीनने कुणाशी फारसे संबंध ठेवले नव्हते, त्यामुळे तिच्या परतण्याची कुणी दखलही घेतली नाही. तिच्या संशयी स्वभावामुळे तिने कुणाला जवळही येऊ दिलं नाही. शेवटी शेवटी या असुरक्षिततेच्या भावनेने तिला एवढं ग्रासलं की, खाण्यातून कुणी विषप्रयोग करू नये म्हणून ती फक्त दूध आणि अंडी खाऊनंच रहात असे.
इंटिरिअर डिझाईनिंगची आवड असणारी, त्याचा काही काळ व्यवसाय करणाऱ्या परवीनचं घर शेवटच्या काळात अस्ताव्यस्त असायचं. कशाचंही तिला भान नव्हतं. सोफ्याचे कुशन्स खाऊन, गॅंगरिन होऊन तिचा मृत्यू झाला. दोन दिवस कुणाला कळलंही नाही. घराबाहेर लटकलेल्या दूधाच्या पिशव्या तशाच पडून होत्या. तेव्हा पोलिसांना बोलावून तिचं घर उघडलं, तिथं परवीनचा सडलेला मृतदेह सापडला. मृत्यूची बातमी कळताच तिचे अनेक नातेवाईक मृतदेहाचा ताबा घेण्यासाठी मुंबईत आले. अंत्यविधीला चित्रपटसृष्टीतील मोजके लोक उपस्थित होते, त्यांत डॅनी, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांचा समावेश होता.
परवीनच्या या झंझावाती आयुष्याला शब्दबद्ध करताना करिश्मा उपाध्याय यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही किंवा स्वत:चे मत मांडले नाही. परवीन जशी जगली तो जीवनप्रवास तटस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केलाय. चित्रपटसृष्टीतील अनेक गुपितं, अशाश्वतता, ग्लॅमर यांत गुरफटून जाणारी कितीतरी आयुष्यं परवीनच्या रूपांत दिसतात. परवीन सुंदर होती, बुद्धिमान होती तरी तिला स्वत:चं जग निर्माण करता आलं नाही किंवा स्वत:च्या भूमिका करून अभिनय क्षेत्रांत विशेष स्थान मिळवता आलं नाही. इतक्या आडवळणाचा प्रवास करून तिने चित्रपटसृष्टीत जम बसवला, पण ते स्थानही तिला टिकवता आलं नाही.
परवीन वैयक्तिक आयुष्यातही कधी स्थिरावली नाही. तिने आडवळणाचे, सामाजिक संकेतांना झुगारून, मनाचा कौल मानून वेळोवेळी निर्णय घेण्याचं धारिष्ट्य दाखवलं आणि त्याची मोठी किंमत तिला चुकवावी लागली. प्रत्यक्ष मृत्यू पावण्याआधीच अनेकांच्या दृष्टीनं ती गेली होती. काही तर्काच्या तराजूत न बसणारी आयुष्य असतात, परवीनचंही तसंच.
..................................................................................................................................................................
लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.
anjaliambekar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment