आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रंगकर्मी आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे पहिले संचालक इब्राहिम अल्काझी यांचे ४ ऑगस्ट २०२० रोजी दुबई येथे निधन झाले. डॉ. श्रीराम लागू-दीपा लागू यांच्या ‘रूपवेध’ या संस्थेतर्फे दरवर्षी ज्येष्ठ नाट्यधर्मीसाठी तन्वीर सन्मान दिला जातो. ९ डिसेंबर २००४ रोजी ‘पहिला तन्वीर सन्मान’ इब्राहिम अल्काझी यांना प्रदान करण्यात आला होता. महेश एलकुंचवार, गिरीश कार्नाड आणि नासिरुद्दीन शहा हे प्रमुख वक्ते असलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष होत्या विजया मेहता. या प्रसंगी इब्राहिम अल्काझी यांनी उत्तरादाखल केलेल्या भाषणाचे हे भाषांतर.
..................................................................................................................................................................
सभ्य स्त्रीपुरुषहो, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या प्रेमानं आणि औदार्यानं मी अगदी भारावून गेलोय. पण कदाचित तुमच्याशी बोलण्याची माझ्या आयुष्यातील ही दुर्मीळ आणि एकमेव संधी असू शकेल, म्हणूनच मला तुमच्याशी बोलायचंय आणि तुमचे माझ्याविषयीचे काही गैरसमज दूर करायचेत. आता एक महत्त्वाची गोष्ट. मी खूपच तरुण होतो, तेव्हा केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सचिव अश्फाक हुसैन यांनी मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी एक योजना तयार करायला सांगितली. कारण मी रॉयल अकॅडेमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमध्ये शिकलो होतो, त्यामुळे तुम्ही हे करू शकाल असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यानुसार मी एक योजना बनवली. पण तिचा आणि मी रॉयल अकॅडेमीत जे शिकलो त्याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नव्हता. रॉयल अकॅडेमीत मी शिकलो ते हे की काय करू नये, विशेषतः भारतीय संदर्भात काय करू नये. तर मी एक रोजना बनवली आणि सरकारला सादर केली. त्यांनी मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा संचालक होण्याविषयी विचारलं. मी नकार दिला. मी ते नाकारलं, कारण माझी खात्री होती की, ते काम करायला मी फार लहान होतो. तसं मी त्यांना कळवलंही. मी फार लहान आहे, मी हे करू शकत नाही, कारण मला अजून परिपक्वता यायची आहे. खूप अनुभव घ्यायचा आहे आणि मी प्रत्यक्ष रंगभूमीवर जे करेन त्यातूनच तो मला मिळू शकेल. तर तेव्हा अनेकांना यासाठी विचारणा करण्यात आली आणि सर्वांत आधी एशियन थिएटर इन्स्टिट्यूट उभी राहिली. तिला युनेस्कोनं आर्थिक पाठबळ पुरवलं होतं. ती कशीबशी रखडत काही वर्ष चालू राहिली. युनेस्कोनं एशियन थिएटर इन्स्टिट्यूटच्या तपासणीनंतर नाराजी व्यक्त केली. तिसऱ्या वर्षी त्यांनी ‘अशीच स्थिती राहिली तर यापुढे फंड मिळणार नाही,’ म्हणून सांगितलं. आणि एशियन थिएटर इन्स्टिट्यूट बंद पडायच्या मार्गाला लागली. मग संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष मुंबईला माझ्याकडे आले. मी तेव्हा थिएटर युनिटमध्ये काम करत होतो. ते म्हणाले, ‘हे पहा मि. अल्काझी, आपल्याला ही शेवटची संधी आहे. तुम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची जबाबदारी घ्या, अन्यथा ते आता कायमचं बंद पडेल.’
तेव्हा माझी कारकीर्द ऐन भरात होती. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि जबरदस्त कलावंतांबरोबर काम करत होतो. आणि मला उज्ज्वल भविष्य मुंबईतच आहे, असं वाटत होतं. त्यामुळे मला वाटलं की, काय या विलक्षण परिस्थितीला तोंड द्यायची वेळ आलीये, माझ्यासोबत जवळजवळ १०-१२ वर्षे काम केलेल्या या लोकांना सोडून जायचं, त्यांना सांगायचं की, ‘सॉरी, मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात जातोय.’ माझी फार द्विधा मनःस्थिती झाली. एकीकडे या ग्रुपशी असणारी बांधिलकी आणि दुसरीकडे संपूर्ण देशाचा विचार करता झालेली जबाबदारीची जाणीव. एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य प्रोफेसर बॅनर्जी यांना माझं काम ठाऊक होतं. थिएटर युनिटमध्ये येऊन सगळ्यांना उद्देशून ते म्हणाले, ‘हे पहा, अल्काझींनी जाण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. इथे त्यांनी खूपच चांगली कामगिरी बजावली असली तरी आता त्यांच्यापुढे याहीपेक्षा मोठं आव्हान आहे. आणि त्यांनी ते स्वीकारायला हवं.’
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
मी दिल्लीला जाण्यापूर्वी माझे मित्र सत्यदेव दुबे यांनी मला मोहन राकेशचं ‘आषाढ का एक दिन’ आणि धर्मवीर भारतींचं ‘अंधायुग’ या नाटकांबद्दल सांगितलं होतं. मलाही ही दोन नाटकं महत्त्वाची वाटल्याने मी ती करायची असं ठरवलं. आतापर्यंत माझी ओळख फक्त इंग्रजी नाटकांपुरतीच होती. मी हिंदीतही नाटक करू शकतो, हे मला सोबतच्या रंगकर्मींना, माझ्या प्रेक्षकांना आणि माझ्या टीकाकारांना पटवून द्यायचं होतं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जेव्हा मी ही कल्पना मांडली, तेव्हा तिथल्या हिंदी भाषेच्या जाणकार विद्वानांची प्रतिक्रिया होती - ‘आषाढ का एक दिन’? ते तर नभोनाट्य आहे! ते रंगमंचावर करणं शक्य नाही! अन ‘अंधायुग’? धर्मवीर भारती? ते तर केवळ पद्य आहे! नभोनाट्यच तेही! ते रंगमंचावर उभं करताच येणार नाही.’ म्हणून मग मी हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं.
मी सुरुवात केली तेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा म्हणवणाऱ्या या संस्थेत रंगमंच नव्हता, प्रेक्षागृह नव्हतं. तिथे कलावंत नाटक करू शकतील अशी जागा नव्हती. कारण तेव्हा ही संस्था एका छोट्या बंगल्यात होती. त्यामुळे मग मी त्या बंगल्यामागची जागा वापरायची ठरवलं. माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन मातीचा एक रंगमंच उभारला. दगडविटांचे तुकडे, माती घेऊन एका बाजूला कट्टा तयार केला. बरेचसे विद्यार्थी तेव्हा छोट्या छोट्या गावांतून, खेड्यांतून आले होते. त्यांच्यासाठी हे काम नवीन नव्हतं. मातीत हात मळवणं त्यांना ठाऊक होतं. त्यातून मी त्यांना स्वतःचा परिसर उभा करायला लावला. ‘आषाढ का एक दिन’मधली मल्लिका, अंबिका आणि कालिदास रंगवणारा ओम शिवपुरी - या सर्वांनी स्वतःच्या हाताने स्वतःचं पर्यावरण, अवकाश तयार केला. आणि नाटकात सगळ्यात आधी हेच शिकायचं असतं. तुम्ही कलावंतांनी, तुमचं स्वतःचं पर्यावरण तुम्हीच बनवायला हवं. तुम्ही सुतारासाठी खोळंबता कामा नये. तो येईल, रंगमंचावर काही फ्लॅट्स उभे करेल - आणि मग तुमचं नेपथ्य बनेल. आपण हे करायला पाहिजे, कारण आपण नाटकातले लोक आहोत. म्हणून आम्हीच ते केलं.
आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की, कुणीही प्रेक्षक इकडे फिरकणार नाही, कारण नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा तेव्हा दिल्लीच्या हद्दीला असलेल्या कैलास कॉलनीत होतं. कुठलाच टॅक्सीवाला वा स्कूटरवाला प्रेक्षकांना तिकडे घेऊन यायला तेव्हा तयार नसे.
आणि आम्ही तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात प्रयोग केले. अनेक रात्री गच्च भरलेल्या प्रेक्षागृहात आम्ही खेळ केले. ‘आषाढ का एक दिन’ जबरदस्त यशस्वी ठरलं. इतकं की अखेरीस मोहन राकेशनी आपला पत्रकारितेचा व्यवसाय सोडून दिला आणि ते पूर्णवेळ नाटककार बनले! आमच्या प्रयोगानंतर हे नाटक बी.ए.च्या अभ्यासक्रमाला लावलं गेलं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
मोहन राकेश मला म्हणाले, ‘तुम्ही मला माझा व्यवसाय मिळवून दिलात!’ पण मी त्यांना म्हणालो, ‘हे पहा, आपण तुमच्या नाटकातल्या भाषेविषयी बोलू.’ उदाहरणार्थ, ‘आषाढ का एक दिन’ची भाषा घेऊ. हे नाटक कालिदासाच्या आयुष्याविषयी आहे आणि गावाकडच्या एका गरीब, खेडवळ साध्या मुलीच्या नात्याविषयी आहे. त्याला राजधानीतून बोलावणं येतं. म्हणून हा श्रेष्ठकवी एका महत्त्वाकांक्षेनं प्रेरित होऊन स्वतःचं मोल सिद्ध करण्यासाठी त्या मुलीला सोडून जातो. माझ्या लक्षात आलं की, हे आत्मचरित्रात्मक आहे. हा मोहन कालिदास नाही, तो मोहन राकेश आहे. आणि मोहन राकेश जे सादर करू पाहात होता, ती त्याची स्वतःची परिस्थितीच होती. पण मी त्यांच्याशी नाटकातल्या भाषेविषयी बोलायला सुरुवात केली.
मी म्हणालो, “हे पहा, या नाटकातील ही शेतकरी मुलगी सुरुवातीला जे शब्द उच्चारते, संस्कृतप्रचुर भाषेत. ‘संभवतः आज वर्षा होगी,’ असं कुठलाच शेतकरी किंवा त्याची मुलगी बोलणार नाही. पहिल्या काही ओळींतच कालिदासासारखा उच्चविद्याविभूषित, सुसंस्कृत माणूस बोलेल तशी संस्कृतप्रचुर भाषा आणि राणा-डोंगरातलली मल्लिका बोलेल ती भाषा यातला संघर्ष दाखवायला हवा. या दोघांच्या भाषा वेगळ्याच असायला हव्यात. त्यांच्यातल्या अंतरातच या नाटकाचा आवश्यक असलेला आशय येतो.”
नाटकाच्या अगदी सुरुवातीलाच तुम्ही हे नातं तुटणार आहे असं सूचित करू लागता. मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही लिहिलेलं ‘लहरों के राजहंस’ हे दुसरं एक नाटकही संस्कृतप्रचुर भाषेत आहे. तुम्ही सामान्य माणसांची भाषा का वापरत नाहीत? तुम्ही त्यांची स्वतःची आयुष्यं का रंगवत नाहीत? तुम्ही रस्त्यावर बोलली जाणारी भाषा बघा. तिला एक आकार आहे, लवचीकता आहे. एक रांगडेपणा, रोखठोकपणा, खरखरीतपणा आहे. तिला स्वतःची ताकद आहे. एक प्रकारचा जोमदारपणा आहे तिच्यात. हे सगळं फार महत्त्वाचं आहे.’
मग त्यानं ‘आधे अधुरे’ लिहिलं! बुद्धजयंती पार्कमध्ये त्यानं मला आणि नोहाजींना ते वाचून दाखवलं. मी म्हणालो- ‘हां, आता तुला तुझा खरा आवाज सापडलाय.’ ही समकालीन भारतीय नाटकाची भाषा असणार आहे. आणि त्यानंतर त्यांना नेहरू फेलोशिप मिळाली. त्याचा विषय होता ‘नाटकातला शब्द : रंगभूमीची भाषा.’
अशा पद्धतीने मी नाटककारांसोबत काम करायचो. अशा तऱ्हेनं पहिलं नाटक कैलास कॉलनीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या मागच्या अंगणात झालं. हळूहळू मी दिल्लीत रुळत गेलो. मी चौकस होतो. मला या ऐतिहासिक शहरात रस होता. इथली अनेक स्मारकं मला डोळ्यांनी दिसत होती. खुणावत होती. मला वाटलं ही वापरली जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तयार जागा! तयार प्रेक्षागृह! काही थोडे फेरफार करून जराशा कल्पनेने या जागा सुंदर प्रेक्षागृहात रूपांतरित होऊ शकत होत्या. आणि वर्षातले नऊ महिने वापरता येण्याजोग्या होत्या. वातानूकुलित भयानक प्रेक्षागृह बांधण्याऐवजी, - आणि त्यावेळी तर वातानूकुलित यंत्रणा नव्हतीच. भयानक आवाज करणारे कूलर्स असायचे. अजिबात आरामदायक नसायचे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : इब्राहिम अल्काझी : आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक, नाटकाच्या क्षेत्रातला ‘ऋषी’
..................................................................................................................................................................
मी फिरोझशहा कोटला मिळवलं. तिथे एक प्रचंड भिंत आहे आणि या आश्चर्यकारक वास्तुशिल्पात आम्ही ९६ फूटलांबीचा रंगमंच उभारला. त्यावर एकमोठं चक्र होतं - मोडलेलं चक्र- काळ बदलला हे दर्शवणारं होतं. त्यावर आम्ही धर्मवीर भारतींचं ‘अंधायुग’ केलं! योगायोगानं जवाहरलाल नेहरू ते नाटक पाहायला आले. त्यांच्याबरोबर राजनैतिक अधिकाऱ्यांचा पूर्ण ताफा आला. संपूर्ण जगातून आपापल्या देशाचं प्रतिनिधित्व करायला ते दिल्लीला आले होते. भारतीय नाटक असतं तरी काय अशी एक तुच्छता त्यात असणार. आणि या नाटकानं अतिशय असाधारण परिणाम केला. पहिल्यांदाच मला भारतीय रंगभूमीबद्दल आणि भारतीय नाटकांबद्दल आणि स्वतःचाही अभिमान वाटला!
‘आषाढ का एक दिन’ आणि ‘अंधायुग’ या नाटकांनंतर मी केलेलं तिसरं नाटक म्हणजे गिरीश कार्नाडांचं संस्कृतमधलं ‘अभिज्ञान शाकुंतलम’. आंतरराष्ट्रीय पौर्वात्य संस्कृतीच्या विद्वान आणि अभ्यासकांच्या परिषदेत अतिशय प्रतिष्ठित प्रेक्षकांसमोर ते झालं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा संचालक म्हणून मला संस्कृतमधलं हे नाटक करायला सांगितलं होतं. माझ्याकडे फक्त हौशी कलावंत मंडळी होती. आणि त्यात समावेश करता येईल अशी एकमेव व्यक्ती होती- उत्तरा बावकर. तिचा संस्कृतचा अभ्यास होता आणि ती शकुंतला करू शकत होती. मी ही अशी आव्हाने स्वीकारली. कारण देशभरातल्या लोकांसमोर मला स्वतःला सिद्ध करणं आवश्यक वाटत होतं.
याचबरोबर काही औपचारिकताही पाळाव्या लागल्या. रोज सकाळी सहा वाजता येऊन मला हिंदी शिकवेल अशा एका प्रशिक्षकाची नेमणूक मी केली. सगळं नाटक मी त्याच्याबरोबर बसून समजून घेतलं. हा प्रशिक्षक मला म्हणाला, ‘ये क्या बकवास है? हे काय बकवास तू अभ्यासतोयस? हे काय बकवास तू मला शिकवायला सांगतोयस?’ किती अविश्वसनीय होतं हे! तुमच्याकडे हिंदी भाषेचे जाणकार आहेत, हिंदी साहित्याचे विद्वान आहेत. पण त्यांना रंगभूमीची किंचितही जाण नाही! अशा वेळी तुम्हीच स्वतःचे शिक्षक होता - स्वतःच शिकता!
टहदीशिवाय मी ‘सुलताना रझिया’ केलं - बलवंतसिंग गार्गीचं. मी गिरीश कार्नाडांचं ‘तुघलक’ केलं. मी ‘सूर्यमुख’ केलं डॉ. लक्ष्मीनारायण लाल यांनी लिहिलेलं. प्रेमचंदच्या ‘गोदान’वर आधारित ‘होरी’ केलं. मला ती लांबलचक यादी देण्यात रस नाही. पण माझ्या कामाविषयीचे गैरसमज यामुळे दूर व्हावेत.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
याशिवाय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये विद्यार्थ्यांनी ‘यक्षगान’ शिकावं असं वाटलं म्हणून मी ते शिकवू शकेल अशा माणसाच्या शोधात होतो. त्यासाठी मी पूर्ण देशभर - संपूर्ण दक्षिण भारतात फिरलो. आणि अखेरीस शिवराम कारंथांकडे पोहोचलो. ते म्हणाले, ‘मला मुळीच रस नाही.’ हा माणूस अतिशय हेकट म्हणावा इतका जिद्दी होता. अशा माणसांना समजावणं कठीणच असतं. पण अखेरीस मी बाजी मारली. आणि त्यांना दिल्लीला आणू शकलो. तेव्हाच ते ८० वर्षांचे होते आणि तरीही दिवसातून १६ तास गायक-वादकांबरोबर काम करायचे. या गायक-वादकांनी यक्षगान या जोरदार, समर्थ अशा नाट्यप्रकारात प्रत्यक्ष साथ केली होती. त्यांना आम्ही मुद्दाम दक्षिण भारतातून बोलावलं होतं. डॉ. कारंथ तत्काळ या नाटकात रंगून गेले.
तिथे खूप उत्साही, नाटकात, लोकनाट्यात काम करणारे विविध भाषांचे लोक तालमी पाहायला येत. डॉ. अवस्थी हे त्यांपैकीच एक. ते संगीत नाटक अकादमीचे सचिव होते. तालमी पाहताना ते आनंदाने बेहोश होत म्हणत, ‘वाह! वाह! काय सुंदर आहे हे!’ डॉ. शिवराम कारंथ त्यांच्याजवळ जात एकदा म्हणाले, ‘तो इतका गचाळ गातोय आणि तुम्ही वाह वाह म्हणताय!’ इथं जाणवतंय की, चुकीच्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात उत्साहाचं प्रदर्शन होत असतं. खरोखरीचं ज्ञान असणं महत्त्वाचं. उगीचच उत्साही, दिखाऊ, सगळ्याचविषयी भावविवश असलेलं प्रेम नसावं. कारण नौटंकी, यक्षगान इत्यादी लोककला प्रकारांत नकळत खूप गचाळपणा शिरला आहे. फक्त संहितेतच, केवळ आविष्कारात नव्हे, केवळ रंगमंचीय सादरीकरणात नव्हे, केवळ शब्दोच्चारात नव्हे, तर एकूण सगळ्याच गोष्टींत.
आणखी एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचंय. डॉ. शिवराम कारंथांना हे सगळं एका काळ्या पडद्यासमोर सादर व्हावं असं वाटत होतं. आम्ही श्रीराम सेंटरच्या रंगमंचावर शेवटच्या तालमी करत होतो. मी प्रेक्षागृहाच्या मधोमध बसून तालमी पाहत होतो. दासगुप्ता नावाचे आमचे प्रकाशयोजनाकार होते. अप्रतिम पात्रं, त्यांचे अप्रतिम मुखवटे... त्या काळ्या पडद्याच्या पार्श्वभूमीवर दिसत होते. मी दासगुप्तांना म्हणालो, तो काळा पडदा हळूहळू उचला! ते म्हणाले, ‘कारंथ फार रागावतील!’ तरी मी म्हणालो- ‘तालीम चालू असताना...सावकाश तो वर न्या!’ आणि त्यांनी तो पडदा बाजूला केला. तिथे सायक्लोरामा होता. त्यामुळे जेव्हा काळ्या पडद्यावर ते घडत होतं, तेव्हा तिथं ही पात्रं म्हणजे कठपुतळ्या वाटत होत्या. रंगीबेरंगी आणि आकारानं मोठ्या अशा कठपुतळ्या! मला त्याला आणखी एक परिमाण द्यावंसं वाटत होतं. खोली आणि अवकाशाचं परिमाण!
डॉ. कारंथ माझ्यापाशी आले. ते मारणारच होते मला. पण मी म्हणालो- ‘थांबा! मी सायक्लोरामा प्रकाशमान केला. पात्रं जशी मागून पुढे - समोर आली, तसं काळाचंही परिमाण त्याला मिळालं! म्हणजे अवकाशाचं, रंगमंचाच्या पूर्ण खोलीचं आणि शिवाय काळाचंही परिमाण मिळालं. वातावरणाचंही मिळालं.’
सायक्लोरामावर विविध रंग वापरून ते निर्माण केलं होतं! त्यामुळे जेव्हा आपल्या क्षेत्रात अतिशय तज्ज्ञ, निष्णात असणाऱ्या व्यक्तींबरोबर जेव्हा आपण हे काम करत असतो, तेव्हा हे लक्षात ठेवायला हवं की, या रंगमंचावर- पवित्र जागेवर - जे आवश्यक आणि गरजेचं असतं ते करायलाच हवं. जगातल्या विविध संस्कृतींमध्ये रंगभूमीला पवित्र जागा म्हणून कसं आणि का मानलं जातं किंवा नाही त्याची आपल्याला काही कल्पना नाही. पण माझा असा दृढ विश्वास आहे की, त्यासाठी घाम आणि रक्त आटवावं लागतं. त्यामुळेच सबंध ग्रीक रंगभूमी सर्वस्वाच्या त्यागावर उभी आहे. रक्ताच्या त्यागावर उभी आहे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : इब्राहिम अल्काझी : आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक, नाटकाच्या क्षेत्रातला ‘ऋषी’
..................................................................................................................................................................
आपल्या संस्कृतीत, आपल्या परंपरेत रंगमंचाविषयी आदर दाखवण्याची प्रथा आहे. कुणीही कलावंत जेव्हा रंगमंचावर येतो, तेव्हा तो वाकून रंगमंचाला स्पर्श करतो, वंदन करतो आणि क्षणभर आदराने उभा राहतो. आणि दुसऱ्या क्षणी ‘थू…’ म्हणून थुंकतो! एका क्षणी तुम्ही इथे गुडघे टेकवता, तुमचा आदरभाव दर्शवता आणि दुसऱ्या क्षणी त्या जागेची पिकदाणी बनवता? हे असं आहे. आणि हे फक्त अभिधेच्या अर्थानं नव्हे, तर आपण स्वतःला लोकांसमोर सादर करतो, त्या बौद्धिक, सांस्कृतिक अर्थानंसुद्धा आहे.
यक्षगान केल्यावर अतिपूर्वेकडच्या रंगभूमीची ओळख व्हावी, जपानच्या नोह आणि काबुकीची - म्हणून आम्ही अमेरिकेतून शोजो सातो या जाणकार दिग्दर्शकाला बोलावलं. तो स्वतः काबुकी कुटुंबातला होता. आणि या दोन्ही नाट्यप्रकारांची त्याला जाण होती. इबाराकी या नाटकात हे दोन्ही प्रकार एकवटले होते. आम्ही त्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये बोलावलं आणि साधारण १५ दिवसांत इबाराकीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग केला. आपल्या विद्यार्थ्यांना त्यातल्या बारकाव्यांसह ते पोहोचवणं जमेल का म्हणून मी फार सचिंत आणि दोलायमान अवस्थेत होतो. ही वैशिष्ट्यर्ण रंगभूषा, वेशभूषा या शैलीदार हालचाली - हे सगळं १५ दिवसात कसं जमणार... पण ते म्हणाले, ‘काळजी करू नका, अल्काझी! मी तुमच्या विद्यार्थ्यांना ओळखतो. ते बुद्धिमान कलावंत आहेत. तुमचे हे विद्यार्थी १५ दिवसांत जे करू शकतात ते मला माझ्या विद्यार्थ्यांकडून सहा महिन्यांतही करून घेता आलेलं नाही.’
त्यानंतर मग ब्रेख्त करायचं ठरवलं. तो काही वर्षं आधीच मरण पावला होता. पण त्याची नाटकं मात्र बर्लिनर ऑन्सॉम्ब्लमध्ये सातत्याने होत होती. आपण अभिजात रंगभूमीकडून श्रेष्ठ नाटकं घेतली आणि शैली, आकृतिबंध अशा अनेक बाबतीत ती पाश्चिमात्र संकल्पनांशी जोडून घेतली. त्या दृष्टीने ब्रेख्त फार अर्थपूर्ण आणि अतिशयच महत्त्वाचा आहे. मला वाटत होतं आपल्या पद्धतीने आपण त्याचं आकलन करून घेणं महत्त्वाचं आहे. आणि तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे ज्यानं प्रत्यक्ष ब्रेख्तबरोबर काम केलंय अशा माणसाच्या शोधात मी होतो. आणि मला अमेरिकेत असलेल्या कार्ल वेबरचा पत्ता लागला. त्यांनी ब्रेख्तबरोबर आठ वर्षं काम केलं होतं. आम्ही त्यांना बोलावलं, ते आले आणि त्यांनी आमच्याबरोबर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये काम केलं. सुरुवातीला आम्ही त्याचे प्रयोग खुल्या रंगमंचावर केले. आणि नंतर प्रस्थापित नाट्यगृहांतून सर्व देशभर केले.
त्यानंतर वायमारमध्ये असणारा फ्रिट्झ बेनेविट्झ आम्हाला भेटला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त्याला इतकं आवडलं की, त्याच्या उर्वरित आयुष्यात तो अनेकदा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आला. कलावंत म्हणून जे वैविध्य आवश्यक असतं, ते आम्हाला या सर्व नाटकांच्या रूपाने एकत्रितपणे मिळालं.
अल्काझी कडक शिस्तीचे आहेत असं लोक म्हणतात. ही माझी शिस्त नाही, जो कलाप्रकार तुम्ही निवडलाय त्याची शिस्त आहे. यक्षगानसारखा नाट्यप्रकार करायला जी शिस्त लागते, त्यासाठी १२-१६ वर्षे शिकावं लागतं. ते सगळं वर वर केवळ तुम्ही तीन वर्षांत करू पाहता, आणि तुम्हाला रंगभूमीवर सर्वोत्तम भूमिका मिळाव्यात अशी आकांक्षा असते! मला हे चालणार नाही.
मुंबईहून मी दिल्लीला जाणं याचा माझ्यासाठी काय अर्थ होता, याविषयी मला तुम्हाला सांगायचंय. दिल्लीतले माझे ते अगदी सुरुवातीचे दिवस होते. तिथे मी एकदा विलक्षण, विचित्र गोष्ट पाहिली. मुख्य रस्त्याच्या खालच्या नाल्यात मला दोन माणसं एका गाढवाचं कलेवर सायकलवर चढवण्यासाठी धडपडत असलेली दिसली. मी जवळ जवळ अर्धा तास त्यांची ती धडपड पाहत होतो. शेवटी त्यांनी निराश होऊन ते सोडून दिलं. मग ते एकमेकांशी झगडायला लागले. एकानं दुसऱ्याला जोरदार दणका दिला आणि पाडलं. मग अचानक तोल जाऊन तो स्वतःही पडला. मी भारल्यासारखा ते दृश्य पाहत होतो. तिथे ते गाढवाचं प्रेत पाठीवर, चारही पार हवेत असं पडलं होतं. आणि जवळच त्या निपचित पडलेल्या त्या माणसांच्या आकृत्या! आणि सायकल!
..................................................................................................................................................................
हेही वाचा : इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी निस्सिम इझिकेल यांनी लिहिलेली कविता
..................................................................................................................................................................
मला त्यातून एक गूढ तात्त्विक अर्थ प्रतीत झाला. काही महिन्यांनी दिल्लीत रुळल्यावर त्या अनुभवाचा अर्थ माझ्या लक्षात आला. ते मृत गाढव ही दिल्लीमधली मरणोन्मुख नोकरशाही, ती सायकल म्हणजे चेहरा हरवलेली दिल्लीतली राज्यव्यवस्था आणि त्या कोसळलेल्या मानवाकृती म्हणजे सरकार आणि विरोधी पक्ष! मी सगळ्यांकडेच दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामाकडे वळलो. आणि १६ वर्षे ते केलं. मी सगळ्या सरकारी खात्यांकडे जशी पाठ फिरवली, तशी माझ्या वाटेत आलेल्या सर्व प्रलोभनांकडेही, आणि शांतपणे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी निर्माण केलेल्या साध्यासुध्या वातावरणात माझं काम चालू ठेवलं.
आता थोडं माझ्या स्वतःविषयी. तुम्हाला ते कदाचित ठाऊक नसणार. मी पुणेकर आहे! मी या शहरात जन्मलो आहे. माझा जन्म इथला असावा हे तुमच्यापैकी काहींना कदाचित आवडणार नाही. पण या शहरात माझं बालपण गेलं. माझं भरणपोषण झालं. माझ्या आयुष्यातला अतिशय आनंददायी आणि संस्मरणीय भाग या शहरात गेला. नैतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यं माझ्यात इथं रुजली. त्यांनी मला घडवलं. लाल देवळाजवळच्या आमच्या घराच्या पहिल्या मजल्यावर बिछान्यात पडल्या पडल्या अनेक रात्री मी लावणी आणि पोवाड्यांचे सूर ऐकले.
मी दहा वर्षांचा असताना आमच्या सेंट विन्सेंट हारस्कूलचे फादर आम्हाला ‘संत तुकाराम’ पाहायला घेऊन गेले. या सिनेमानं माझ्यावर कायमची, खोलवर छाप पाडली आहे. इतकी की, त्यानं दिलेल्या काही समजुतींना, काही आदर्शांना मी आयुष्यभर घट्ट धरून राहिलोय.
महाराष्ट्रानं माझ्यावर भरभरून प्रेम केलं, खूप आदर दाखवला. श्री. मामा वरेरकर, मौजेचे श्री. भागवत, पॉप्युलर प्रकाशनचे श्री. रामदास भटकळ, इंटरनॅशनल बुक सर्व्हिसचे दिवंगत विठ्ठलराव दीक्षित, दिवंगत के. नारायण काळे, श्री. पु. ल. देशपांडे, श्रीमती विजया मेहता, श्री. ज्ञानेश्वर नाडकर्णी, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, जब्बार पटेल, मोहन आगाशे मोठे कलावंत. चित्रकार गायतोंडे, सुधीर पटवर्धन, सध्या न्यू यॉर्कमध्ये असलेले मोहन सामंत आणि माझे अनेक सहकारी-विद्यार्थी ही यादी अक्षरशः न संपणारी आहे.
या शहरानं, या मुलखानं मला जे दिलं ते विसरणं शक्या नाही. माझ्या सर्व महाराष्ट्रीय विद्यार्थी-विद्यार्थिनींबद्दल मला खास प्रेम आणि आदर आहे, याची त्यांना जाणीव आहे. कारण त्यांनीही मला ते भरभरून दिलंय. देशाच्या विविध भागांतून आलेल्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांशी माझं खास नातं आहे. विशेषतः महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांशी! आणि याचा मला फार अभिमान आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आता थोडं व्यक्तिगत - आणि माझ्या कुटुंबाबद्दल. मी स्वतःला ‘महाराष्ट्रीय अरब’ म्हणवतो. आम्ही नऊ भावंडे होतो. गोदाबाई म्हणून आमची एक महाराष्ट्रीय शेजारीण होती. तिला माझ्या आईचं फार कौतुक होतं. त्यांचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं. एक दिवस तिनं माझ्या आईला एक धार्मिक विधी करायला लावला. तिने आईला मांडी घालून खाली बसायला सांगितलं आणि माझ्या आईची फळं आणि भाज्यांनी ओटी भरली! तिनं आईला नमस्कार केला. उराशी धरलं. आणि आईला विधीपूर्वक बहीण म्हणून दत्तक घेतलं. त्यामुळे आमची दोन्ही घरं एका सुंदर नात्यानं बांधली गेली, जवळ आली. मी हे सगळं तुम्हाला सांगतोय, कारण मी माझा तो वारसा सांगायला आणि हक्क बजावण्यासाठी पासष्ट वर्षांनंतर पुण्याला आलोय.
ज्या अरब बाईला गोदाबाईनं बहीण म्हणून दत्तक घेतलं होतं, त्या बाईचा मी मुलगा आहे. त्यामुळे मला महाराष्ट्रीयन म्हणवून घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे. १८ ऑक्टोबर १९२५ रोजी ससून हॉस्पिटलच्या रूम नंबर १०मध्ये माझा जन्म झाला. लोकमान्य टिळकांविषयी पूर्ण आदर व्यक्त करून मी इथं तुम्हा सर्वांसमोर जाहीरपणे सांगतोय की, महाराष्ट्रीय म्हणून ओळखलं जाणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!
भाषांतर : डॉ. वंदना बोकिल-कुलकर्णी
(‘मायमावशी’ या नियतकालिकाच्या ‘पावसाळा २०२०’ या अंकातून पूर्वपरवानगीसह साभार)
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vivek Date
Wed , 30 September 2020
I joined Elphinstone College in 1961 for liberal arts and Prof. G C Banerjee of English was the Principal and he retired next year, A brilliant teacher and a gentleman, I have witnessed plays directed by Alkazi at Akashganga where Rangayan was born. Those were the days. Prof. Pu Shi Rege succeeded Prof. Banerjee as Principal. He was B S of London School fo Economics and on first day of the class he declared that the economics he studied was too old and he is not current in the subject. As a teacher of Economics he was disaster. The junior professor in the Department told us in the first lecture that Rege is not going to teach anything and he will cover the syllabus and teach and he did that faithfully and well. A Government teaching job with guaranteed salary then was a place that Rege and some other professors misused, though not all. Some taught us well and I am grateful to that college to really teaching us.
Gamma Pailvan
Sun , 27 September 2020
अलकाझी यांनी महाराष्ट्राप्रती दाखवलेल्या कृतज्ञतेस अभिवादन. ही माहिती ते हयात असतांना मिळायला हवी होती. असो. ईश्वरेच्छा बलीयसी.
-गामा पैलवान