अजूनकाही
१. सरकारी कार्यालयात देवदेवतांच्या तसबिरी लावण्यास आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यास मनाई करणारा आदेश राज्य सरकारने मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. हा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईही होणार आहे.
फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र राज्यघटनेच्या तत्त्वांनुसार पुरोगामी आणि सेक्युलर बनण्याचा जो एक चिमुकला धोका या आदेशाने निर्माण झाला होता, तो अत्यंत धाडसाने मोडून काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. राज्यघटनेच्या जागी भगव्या बासनात गुंडाळलेल्या एखाद्या पोथीची प्राणप्रतिष्ठा लवकरात लवकर केलीत की, प्रबोधनकारांच्या आत्म्याला शांतता लाभेल.
…………………………………
२. केंद्रातील मोदी सरकारचा निम्म्याहून जास्त कालावधी पूर्ण झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारची लोकप्रियता अद्याप कायम आहे, असे इंडिया टुडे समूह आणि कार्वे इनसाईट्स यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे. आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ३६० जागा मिळतील. तर संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) अवघ्या ६० जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य पक्षांना १२३ जागा मिळतील. बहुतेक लोक नोटाबंदीच्या निर्णयावरही खूष असल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं आहे.
आता निवडणुका होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे सर्वेक्षण खरं की खोटं ठरतं हे कळायला काही मार्ग नाही. सर्वेक्षणात इतकी सगळी आकडेवारी छातीठोकपणे देणारे हे सर्वेक्षणकार ते कुठे केलं, किती माणसांचा त्यात समावेश होता, ही माहिती का देत नाहीत देव जाणे. शिवाय एक प्रयोग म्हणून आपल्या ओळखीच्या कोणाही दहाबारा माणसांना विचारून पाहा. ज्याला कोणत्याही सर्वेक्षणातल्या कोणा माणसाने प्रश्न विचारलाय, असा माणूस सापडायचा नाही. मग हे सर्वेक्षण करतात कुठे? चंद्रावर?
…………………………………
३. सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण चुकून तिकडे गेला असं भारतीय सेना म्हणत असताना तो वरिष्ठांशी भांडण झाल्यामुळे पाकिस्तानात आला, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. ड्युटीवरून चव्हाण यांचा वरिष्ठांशी वाद झाला होता. त्यानंतर ते चौकीतून गायब झाले होते, अशी प्राथमिक माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही दिली होती.
अरे देवा, आपल्याला जो जुमानत नाही, वाद घालतो, होयबा म्हणायला नकार देतो, विरोधी मत व्यक्त करतो, त्याला देशद्रोही ठरवून 'पाकिस्तानात जा' असे फतवे काढण्याची पद्धत लष्करातही पोहोचली की काय! तिथे माणूस खरोखरच पाकिस्तानात जाऊ शकतो, हे लक्षात घेतलं नसावं बहुतेक वरिष्ठांनी.
…………………………………
४. काळवीट शिकार प्रकरणात आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात आपल्याला वनविभागाने गोवलं आहे, असा दावा अभिनेता सलमान खान याने केला असून आपण निर्दोष आहोत, असा जबाब त्याने नोंदवला आहे.
उगी उगी सल्लू! तू नमोअंकलबरोबर पतंग उडवता उडवता सगळं सांगितलंयस ना? त्यांच्या सांगण्याप्रमाणेच तू पतंग उडवशील, हे सांगितलंयस ना? मग झालं तर. आता या देशात साक्षात परमेश्वरही तुझं कूस वाकडं करू शकत नाही. तू निर्दोष म्हणतोस ना, तर तू निर्दोष. उगी उगी. एखादी लँडक्रूझर हवीये का खेळायला?
…………………………………
५. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सोव्हिएत संघाने काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाला पैसे पुरवले होते, अशी माहिती सीआयएच्या अहवालातून बाहेर आली आहे. इंदिरा गांधींच्या काळात त्यांच्या ४० टक्के खासदारांना सोव्हिएत संघाने पैसे दिले होते. सोव्हिएत संघाच्या दूतावासातील अधिकारी काँग्रेस-नेत्यांना गुपचूप भेटून पैसे देत होते, असं अहवालात म्हटलेलं आहे.
सीआयएच्या अहवालात केजीबीवर आरोप नसतील, तर काय त्यांनी वाटलेल्या पैशांचे हिशोब मांडून दाखवले असतील? हा अहवाल आताच फुटावा, त्यात हेच तपशील असावेत, हे विनोदीही नाही, हास्यास्पद आहे. सीआयएच्या अधिकाऱ्यांनी जेम्स बाँडचे सिनेमे पाहिले तरी त्यांना जरा बऱ्या फिल्मी युक्त्या शिकता येतील.
……………………………….
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment