आम्हा पती-पत्नीला या महाभयानक रोगाची लागण होऊन आम्ही सुखरूपपणे त्यातून बाहेर पडलो…
पडघम - राज्यकारण
राजेंद्र मंत्री
  • राजेंद्र मंत्री आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया
  • Tue , 22 September 2020
  • पडघम राज्यकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona लॉकडाउन Lockdown

‘अनुभव प्रकाशना’चे संचालक आणि लेखक राजेंद्र मंत्री (विलेपार्ले, मुंबई) आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया या दोघांनाही करोना झाला. त्यांनी पार्ल्याच्याच कोविड सेंटरमध्ये दहा दिवस उपचार घेतले आणि नुकतेच ते घरी परतले आहेत. या कोविड सेंटरमधील त्यांचे अनुभव…

..................................................................................................................................................................

प्रत्येकाला वाटत असतं की, ‘मला करोना गाठणार नाही.’ मीही याच गोड समजुतीत होतो. पण एका रात्री पावसात भिजलो. रात्री दोन-अडीचला जाग आली, तर थंडी वाजायला लागली, अंग मोडून आलं. पण ताप नव्हता. सकाळीच डॉक्टरांना हे शुभवर्तमान कळवलं. त्यावर त्यांनी सल्ला दिला की, ‘CBC आणि CRP या टेस्ट कर.’

त्या केल्या. संध्याकाळी त्यांचे रिझल्ट मिळाले. त्यामध्ये CRP या टेस्टमध्ये एक व्हॅल्यू झिरो ते सहामध्ये पाहिजे असते, ती नऊ आलेली होती. ते रिपोर्ट डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी कोविड-१९ची स्वॅब टेस्ट (RT PCR COVID 19 SWAB TEST) करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या एका नामांकित पॅथॉलॉजीच्या लोकांना घरी बोलावून PPE किट घालून टेस्ट केली. त्याचे रिझल्ट २४ तासांनी आले. त्यामध्ये मी कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरलो.

लागलीच मोठ्या मुलाची आणि माझ्या पत्नीची टेस्ट केली. त्यात मुलगा निगेटिव्ह आला आणि पत्नी पॉझिटिव्ह. परंतु त्यांचे रिझल्ट दोन दिवसांनी मिळाले.

दरम्यान नानावटी हॉस्पिटलमध्ये जागा मिळाली नाही, म्हणून जवाहर बुक स्टोअरचे दिलीप भोगले यांच्यामार्फत आमच्या विलेपारल्याच्या शिरोडकर हॉस्पिटलमधील हेल्थ ऑफिसर उज्ज्वला लांडे यांना फोन केला. त्यांनी त्वरित बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)मधील जम्बो हॉस्पिटलमध्ये माझी व्यवस्था केली. काही वेळानं अ‍ॅम्ब्युलन्सदेखील न्यायला आली.

लागलीच सोसायटीतील सेक्रेटरी आणि इतर जणांना मोबाईलवरून ही माहिती दिली आणि मी हॉस्पिटलला जात आहे, हेदेखील सांगितले. सकाळी नऊ वाजता रिपोर्ट आला आणि साडेनऊ वाजता महानगरपालिकेचे कर्मचारी सॅनिटायझेशन करायला घरी आले.

आम्ही अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तिघेजण होतो. भर दुपारची वेळ होती आणि रजिस्ट्रेशन करायला कोणीच नव्हते. त्यामुळे रजिस्ट्रेशन लगेचच झाले. तेव्हाच ऑक्सिजन लेवल, बीपी, ब्लड शुगर तपासली. मग माझा ईसीजी आणि छातीचा एक्स-रे काढण्यात आला. नंतर माझी सर्व ‘मेडिकल हिस्टरी’ एका डॉक्टरांनी विचारून घेतली. मी माझे अलीकडचे मेडिकल रिपोर्ट, गोळ्याचे तपशील सोबत नेले होते.

त्यानंतर एका वॉर्डबॉयने मला त्याच्यासोबत येण्यास सांगितले आणि माझी रवानगी G वॉर्डमधील ३४ क्रमांकाच्या बेडवर करण्यात आली. एक लहान कपाट, त्याच्या बाजूला एक खुर्ची, एक पंखा, एक बेड आणि त्यावर चादर-उशी असा सरंजाम होता. एका वॉर्डमध्ये ५८ लोक होते. त्यांच्यासाठी दोन रेस्टरूम होत्या, तीन बाथरूम आणि पाच संडास होते. त्यापैकी तीन देशी पद्धतीचे आणि दोन-तीन कमोड. याशिवाय एक मोठी बाथरूम होती. त्याच्यामध्येही कमोड लावलेला होता. ही बाथरूम चांगली सहा फूट बाय दहा फूट अशी होती.

मी ज्या वेळेला हॉस्पिटलला पोचलो, तेव्हा भूक लागली होती. त्या वेळेला काही वेळानंतर दुपारी चारचा नाश्ता आला. तो नाश्ता म्हणजे पंजाबी समोसा आणि पाव होता. तो खाऊन होतोय ना होतोय, इतक्यात चहा आला. 

मग मी संपूर्ण वॉर्डभर एक चक्कर मारून जरा अंदाज घेतला. डॉक्टर कोणते, नर्स कोणत्या आणि वॉर्डबॉय कोणते… त्यातले पुरुष कोण आणि बायका कोण, हे कळायला काही मार्ग नव्हता, कारण त्यांनी पीपीई किट घातली होती. मात्र कोणी जवळ आलं आणि बोलायला लागलं की, कळायचं की, तो पुरुष आहे का बाई आहे. तसेच पेशंटना घरच्या कपड्यातच राहायची मूभा होती, इतर हॉस्पिटलमध्ये असतो तसा युनिफॉर्म नव्हता.

सगळ्यांना विजेचा एक पॉइंट देण्यात आला होता. त्यावर पंखा चालू असे. परंतु दिवसभर लोक मोबाईल वापरत असल्यामुळे तो रिचार्ज करायच्या वेळेला पंखा बंद करावा लागत असे. माझ्याकडे दोन इलेक्ट्रिक पॉइंट होते. त्यामुळे मी पंखा आणि मोबाइल चार्जर एकाच वेळी चालू ठेवत असे. मोबाईल मी सहसा रात्री चार्जिंगला लावत असे. त्यामुळे दिवसभर एक्स्ट्रा पॉइंट मी लोकांना मोठ्या आनंदानं वापरायला देत असे. रात्री खूप थंड होत असे, त्यामुळे मी पंखादेखील बंद करत होतो. मग माझ्या या पंख्याच्या पॉइंटवरदेखील काही लोक रात्री मोबाईल चार्जिंगला लावून जायचे. मीही त्यांना तो पॉइंट वापरायला देत असे.

सकाळी साडेसहाला नर्स यायची आणि सर्वप्रथम ब्लड सॅम्पल घ्यायची. रक्तातील शुगर तपासायची. केव्हाही सकाळी आली की, ‘राजेंद्र’ अशी हाक मारायची. कारण तिच्या हातात बेडच्या पेशंटचा चार्ट असायचा. दहा दिवसांमध्ये कोणत्याही नर्स किंवा डॉक्टरने मला ‘शुक शुक’ केलं नाही. एवढंच नव्हे तर प्रत्येकानं प्रत्येक पेशंटचं नाव घेऊनच त्याला हाक मारली, मग तो रस्त्यावरचा मजूर असेल किंवा मध्यमवर्गीय माणूस असेल!

मी घरीदेखील लवकर उठतो. त्यामुळे साडेसहानंतर मला झोप यायची नाही. काहीजण ब्लड सॅम्पल देऊन परत झोपायचे, ते साडेआठ-नऊला उठायचे! सकाळची आन्हिकं पूर्ण झाल्यावर मी मधल्या पॅसेजमध्ये फेऱ्या मारायचो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

या हॉस्पिटलची रचना एखादा फॅक्टरीसारखी होती, म्हणजे ७०-८० फूट उंच सिलिंग. त्याला मध्ये कुठे खांब नाही. वर पॉलिथॉनचं कापड चिटकवलेलं आणि चारही बाजूनं कापडाचे पडदे.

हॉस्पिटलची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची लांबी पाव किलोमीटर होती. या पॅसेजमध्ये आठ फेऱ्या मारल्या की, माझं दोन किलोमीटर चालणं व्हायचं. मी नेहमी फिरताना Run keeper हे सॉफ्टवेअर वापरतो. त्यामुळे मला ही माहिती समजली. आठ वाजेपर्यंत परतायचो, तोच नाश्त्याचे पाकीट आणि चहा कागदाच्या कपातून यायचा! हा नाश्ता आणि चहा हॉस्पिटलचे वॉर्डबॉय आपल्या बेडवर ठेवून जायचे. चहा लगेच थंड व्हायचा म्हणून मी प्रथम चहा प्यायचो आणि मग नाश्त्याकडे वळायचो. असाच नाश्ता दुपारी चार वाजतादेखील यायचा. त्यासोबत चहाही. दहा दिवसांत मला वीस प्रकारचे नाश्ते मिळाले! अर्थात काही रिपीटही झाले!

पोहे, तिखट शिरा म्हणजेच उपमा, वडापाव, समोसा पाव, सुकी भेळ, केक आणि बिस्कीटं, बेदाणे बदाम, पिस्ते, खारका असा सुकामेवा, इडली-चटणी, भजी अशा प्रकारचा हा नाश्ता होता! हा नाश्ता अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये आणला जायचा आणि त्याच्यावर पुठ्ठ्याचं झाकण लावलेलं असायचं. त्यासोबत प्लास्टिकचा चमचा दिला जायचा. नाश्ता झाल्यानंतर मेन गेटवरच्या एका मोठ्या कचऱ्याच्या डब्यात उरलेला कचरा टाकायचा. हे कचऱ्याचे डबे सोसायटीमध्ये असतात, तसे मोठे, हिरव्या झाकणाचे, खाली चाकं असलेले होते. काही वेळानं हे डबे सफाई कामगार रिकामे करायला न्यायचे. एक मोठी डस्ट बिन वार्डच्या आतील बाजूस होती.

या कचऱ्याच्या डब्याच्या बाजूला एक केबिन होती, तिथं बिसलेरी पाण्याचा सेक्शन होता. त्यामध्ये अनुक्रमे गरम पाणी, साधं पाणी आणि थंड पाणी असं तीन प्रकारचं पाणी मिळण्याची सोय होती. प्रत्येकानं आपल्या पाण्याच्या बाटल्या त्यातून भरून घ्यायच्या असत. कधीकधी आमच्या केबिनमधल्या बिसलेरीचं पाणी संपलेलं असायचं. अशा वेळेला आम्ही दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन तेथील पाणी घ्यायचो. तसंच इतर वॉर्डमधील लोकही आमच्या वॉर्डमध्ये येऊन पाणी घ्यायचे.

दुपारी बारा वाजता जेवण यायचं. चपात्या अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये दिलेल्या असत आणि भात, भाजी, आमटी ही एका प्लॅस्टिकच्या खाचे पाडलेल्या डब्यात. त्यावर पुठ्ठ्याचं झाकण असायचं. आम्ही पलंगावर बसून जेवायचो.

जेवणाचा रिकामा डबा मुख्य दरवाज्याजवळील गेटवर ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचा.  मी सकाळी सगळे जेवण संपवत असे. परंतु रात्री फक्त भात, भाजी आणि आमटी असं खात असे. आम्हाला वांगं-बटाटा भाजी, दुधीची भाजी, मसूरची जाडसर भाजी, बटाट्याची भाजी, त्यानंतर पांढरा वाटाण्याची भाजी अशा भाज्या देण्यात आल्या. आमटी मात्र रोज एकाच प्रकारची असायची. त्यामध्ये विशेष फरक नसे. तीन दिवस पाव भाजी व पुलाव देण्यात आला. जेवण मला तरी आवडायचं.

मला पहिल्यापासून जेवणाची (म्हणजे खाण्याचीच!) आवड आहे. कुठल्याही प्रकारचं जेवण मी, कुठेही घेऊ शकतो आणि मोठ्या चवीनं खाऊ शकतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या हातगाडीवर, एस.टी. डेपोतही मी आवडीनं खातो.

मला जेवणात नेहमी कांदा, मिरची लागते, तसंच ताकही लागतं. परंतु या तिन्ही गोष्टी इथं नव्हत्या, परंतु याशिवाय माझं काही अडलं नाही. रात्रीचं जेवण आठ वाजता यायचं. त्यामुळे सव्वा आठ वाजता जेवण झालेलं असायचं!

पार्ल्यात घरी मात्र ‘रात्रीस खेळ चाले’मधील अण्णा व शेवंताला पाहूनच सीरिअल संपल्यावर जेवायला बसत असे! (दरम्यान ही सीरियअलही संपली होती!)

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

दिवसातून तीनदा आमची ब्लड शुगर, शरीरामधील ऑक्सिजनची लेवल, तापमान, पल्स आणि ब्लड प्रेशर तपासलं जात असे. त्यानंतर या सर्व एन्ट्रीज कॉम्प्युटरमार्फत एका सूपर डॉक्टर नावाच्या वेबसाईटवर (superdr.in) टाकल्या जात असत. या वेबसाइटची लिंक ज्याच्याकडे पाठवली जाईल, त्याला मी माझा पासवर्ड दिल्यास, तो माझे एक्स-रे, ईसीजी आणि वरील सर्व रिपोर्ट पाहू शकत असे. मी माझ्या ओळखीच्या दोन डॉक्टरांना ही लिंक पाठवली होती. त्यामुळे दहा दिवस ते माझे सगळे रिपोर्ट पाहू शकले. तसेच माझ्या मुलालाही लिंक पाठवली होती. परंतु त्याचं बघणं चारचौघांसारखंच होतं, पण तो त्याच्या ओळखीच्या डॉक्टर मित्राकडे हे रिपोर्ट पाठवत असे, जो एका मोठ्या हॉस्पिटलच्या कोविड सेंटरचा मुख्य डॉक्टर होता. अशा तऱ्हेनं त्यांच्या घरी बसून हे तीनही डॉक्टर्स माझे रिपोर्ट पाहू शकत होते.

याव्यतिरिक्त दिवसातून एकदा डॉक्टरांची भेट घ्यावी लागे. ते एका काचेच्या दाराआड असत. बाजूला वॉर्डबॉय असायचा. तो आपले तापमान, ऑक्सिजन लेवल, बीपी मोजे आणि फाईल डॉक्टरला काचेतून दाखवे. मग फोनवरून डॉक्टर माझ्याशी बातचीत करत. या व्यतिरिक्त आणखी काही लागले तर एक सर्वसाधारण चौकशी करायला एक अधिकारी माणूस असे. तिकडे आपल्या तक्रारी किंवा प्रकृती संबंधीच्या गोष्टी सांगता येत. सुदैवानं या ठिकाणच्या दोन्ही डॉक्टरीणबाई फेसबुकवरच्या ओळखीच्या निघाल्या. माझं ब्लडप्रेशर कायम जास्त असतं. कारण खूप पूर्वीपासून मला हा रोग आहे. पण वाढत्या बीपीची त्यांना कायम काळजी वाटे. त्यातील एक डॉक्टरीणबाई मला भेटणार हे माहीत होतं, म्हणून त्यांच्यासाठी मी ‘अमेरिका! अमेरिका!!’ पुस्तक नेलं होतं. परंतु त्यांची नंतर ड्युटीच लागली नाही.

याशिवाय पाचव्या दिवशी आणि जाताना दहाव्या दिवशी आमच्या छातीचा पुन्हा एकदा एक्स-रे काढण्यात आला.

हे हॉस्पिटल एका पटांगणावर बांधले असल्यानं आणि वरती पॉलिथिन टाकलं असल्यामुळे दिवसा प्रचंड गरम व्हायचं आणि रात्री खूप थंड व्हायचं. दुपारी बारा ते पाचपर्यंत खूप उकडायचं. प्रत्येकाला एक पंखा दिलेला होता, तरीदेखील गरम व्हायचं. मी तर बऱ्याचदा गंजीफ्रॉक व हाफपँटवर असायचो. काही जण तर उघडेच बसायचे. नाही म्हणायला एक्स-रे रूमच्या बाहेर काही खुर्च्या मांडलेल्या होत्या. तो भाग एयर कंडिशन्ड होता. त्यामुळे आमच्या वॉर्डमधील काही हुशार मंडळी तिथं काही वेळ जाऊन बसत.

मात्र हॉस्पिटलमधील सर्वजण डॉक्टर, नर्स, वॉर्डबाय, कर्मचारी PPE किट घालूनच बसत. ते आतमध्ये घामानं ओलेचिंब होत. आठ तास अशा अवस्थेत काम करणे किती कठीण आहे, याची कल्पनाच केलेली बरी!

..................................................................................................................................................................

हेही वाचा : करोना महामारी आणि त्याआडून फैलावले जात असलेले काही विषाणू

..................................................................................................................................................................

एकदा एक वॉर्डबॉय मला सकाळी म्हणाला, ‘अहो! रॉजरसाहेब!!’ मी आश्चर्यचकीतच झालो, कारण हे माझं ‘अमेरिका! अमेरिका!!’ पुस्तकातील टोपणनाव आहे. ते पुस्तक मी तेथील एका महिला डॉक्टरला वाचायला दिलं होतं. तिने ते तिच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं. हा वॉर्डबाय रात्री ड्युटीवर आला, तेव्हा त्याने दोन रात्री वेळ काढून सलग वाचलं. नंतर आम्ही चांगले मित्र झालो.

आमच्यासमोर H वॉर्ड होता. एकदा मी सहज या वॉर्डमध्ये डोकावलो, तर मध्यभागी असलेल्या डॉक्टरांच्या समोरचा एक H10 हा बेड आणि त्याच्या पुढचे सगळे बेड्स रिकामे दिसले. तिकडच्या वॉर्डबॉयला विचारलं तर तो म्हणाला की, ‘हा मिश्र वार्ड आहे.’ म्हणजे इथं पुरुष आणि बायका असं दोघंही घेतात. मग मी तिकडच्या डॉक्टरांना विचारलं की, ‘हा H10 बेड मला मिळू शकेल का?’ त्या  म्हणाल्या की,  ‘तुम्ही कुठे आहात?’ तर म्हटलं, ‘मी समोर G34 मध्ये आहे.’ त्यांनी विचारलं, ‘तुम्ही इकडे का येत आहात? मी म्हटलं, ‘अहो, मला इकडे यायचं नाहीये! माझी बायको कोविड पॉझिटिव्ह आहे, ती लवकरच या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होणार आहे. त्यासाठी मी बेड बघत आहे.’ मग त्या डॉक्टरीण बाई म्हणाल्या, ‘हा बेड मी तुमच्यासाठी ठेवते. जेव्हा त्या रजिस्टेशनला येतील, त्या वेळेला तुम्ही मुख्य डॉक्टरांना हा बेड नंबर सांगा.”

सुप्रिया ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन करायला आली, त्या वेळेला बाहेर चक्क पन्नास-साठ पेशंट आले होते. त्यामुळे तिच्या रजिस्ट्रेशनला दोन तास आणि नंतर आतमध्ये एक तास असे तीन तास गेले. तिला बेड मिळस्तोवर रात्रीचे आठ वाजले, त्यामुळे ती पार दमून गेली होती. नशिबाने तिला मी सांगितलेलाच H10 बेड मिळाला.

सकाळी साडेसहाला तिची ब्लड शुगर नर्सने तपासली, तर ती ४३० आली. त्यामुळे तिला लगेच त्या प्रमाणातला इन्शुलिनचा डोस दिला. त्यामुळे तिची शुगर पुन्हा १००वर आली आणि तिला ताजेतवानं वाटू लागलं.

तिला गरम पाण्याने अंघोळ करायची सवय आहे. गरम पाण्यानं भरलेली बादली तिला उचलता आली नाही. त्यामुळे पुढील काही दिवस गरम पाणी तिच्या मोरीत ठेवण्याचं काम मी मोठ्या आनंदाने केले. नवऱ्याची सेवावृत्ती पाहून इतर बायकांनादेखील बरे वाटले असावे. त्यामुळे तिकडे काही महिलांची ओळख झाली.

म्हणता म्हणता अवघ्या एका दिवसांतच हा वॉर्ड पूर्ण भरून गेला. तिथं काही जोडपी दाखल झाली होती. त्यामधील एका नवऱ्याला मी ओळखलं. त्याला म्हटलं, ‘तुम्ही पार्ल्याचे का?’ तर तो ‘हो’ म्हणाला. मग त्याने नाव सांगितलं.

ते नवरा-बायको दोघंही सुप्रियाच्या समोरच आजूबाजूच्या बेडवर होते. गणेश चतुर्थीला सर्व कुटुंबीय एकत्र आले होते. त्यामुळे त्यांच्यातील कित्येक जणांना करोना झाला. त्या माणसाचे मोठे भाऊ ऐंशी वर्षाचे होते, ते आयसीयूमध्ये उपचार घेत होते.

सुप्रियाच्या वॉर्डमध्ये आणखी एक सारस्वत कुटुंब भेटले. त्यांच्या घरी तर किमान २० जणांना करोनाची बाधा झाली. कारण एकच-  गणेश चतुर्थीला घरी एकत्र जमले होते. या ठिकाणी त्या बाईंच्या जाऊबाई आणि त्यांची मेंटली चॅलेंज शालेयवयीन मुलगीदेखील करोनाबाधीत होती. त्या जाऊबाई मूळच्या कोल्हापूरच्या होत्या. त्यामुळे आमची चांगलाच स्नेह जमला.

त्यांची मुलगी तर इतकी निर्मळ आणि साधी होती की, तिने वॉर्डमधील सगळ्यांनाच जीव लावला. सुप्रिया जेवायला बसली की, ती आईकडची लोणच्याची बाटली आणून सुप्रियाला मोठ्या प्रेमानं लोणचं वाढायची! गरम पाण्याच्या बाटल्या भरून आण, कचरा डस्टबिनमध्ये टाक, कपडे वाळत घाल, अशी कामं ती मोठ्या उत्साहानं करत असे. सर्व वॉर्डभर भिरभिरत्या डोळ्यांनी फिरत असे. फावल्या वेळेत आम्हाला दाखवायला चित्रकलेची वही घेऊन यायची आणि तिने काढलेलं कासव, विमान, गणपती हे सर्व आम्हाला मोठ्या उत्साहानं दाखवायची!

एकदा आमच्या वॉर्डमध्ये बिसलेरी पाणी न्यायला एक शाळकरी मुलगा आला. चौथी-पाचवीतला असेल. जाताना मी त्याला नाव, शाळा विचारलं. त्याने सांगितलं. मग त्याला विचारलं की, ‘तू कोणाबरोबर आला आहेस की तुला करोना झालाय?’ तर तो म्हणाला, ‘मला झालाय.’ मी त्याला विचारलं की, ‘तुला झालाय हे कसं कळल?’ त्यावर तो म्हणाला की, ‘ते दोघे गेले ना!’ मला वाटलं की, कोण कुठेतरी गावाला वगैरे गेलं. म्हणून मी पुन्हा हलकेच विचारलं, तेव्हा तो म्हणाला, ‘अहो, आजी-आजोबा वारले ना. मग सगळ्यांचं चेकिंग केलं. आईबाबा, दादाताईही आहे इकडेच.’ माझ्या मनावर एकदम वारच झाला. मी निमूटपणे बेडवर येऊन बसलो. शांत. तासाभरानं सुप्रिया आली, मग तिच्याशी गप्पा मारताना पुन्हा भानावर आलो.

कधीकधी मेन गेटकडे बसलं की, स्ट्रेचरवर सामान, त्यावर आजीआजोबा, मागून आईबाबा, मुलं जाताहेत अ‍ॅडमिट व्हायला, असं करुण दृष्य दिसे.

या सगळ्या हॉस्पिटलमध्ये मन, भावना नसलेला एकच जणच होता. तो म्हणजे जेवण आणणारा रोबोट. वॉर्डबायच्या मागून तो निमूटपणे जाई. कधी कधी वाटे आपणही असं भावनाशून्य रोबोट बनायला पाहिजे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : करोनामुळे यंदा कोकणात निरुत्साही वातावरणात गणेशोत्सव साजरा झाला...

..................................................................................................................................................................

आम्ही आलो तेव्हा अर्धं हॉस्पिटल भरलं होतं. दहा दिवस आम्ही होतो, तोवर सगळंच भरून गेलं. अगदी Z वॉर्डपर्यत सगळे रिकामे वार्ड पेशटंनी भरून गेले.

कधी कधी सुप्रिया आमच्या वॉर्डमध्ये यायची, कधी मी तिकडे जायचो. दुपारी कधीतरी एक्स-रेचा वॉर्ड रिकामा असेल तर तिकडे बसायचो. मला उकाड्याचा त्रास होत नाही, पण सुप्रियाला प्रचंड त्रास होतो. तिचा चेहरा घामानं डबडबून जातो. मला मात्र एसीचा त्रास होतो.

मी लहानपणापासून आत्तापर्यंत कायमच मच्छरदाणीत झोपतो. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये डासांचा त्रास होईल असं वाटलं होतं, परंतु पहिल्याच रात्री एका भल्यामोठ्या डासाला मारून डासांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली आणि डासांपासून मी माझी सुटका करून घेतली!

आम्हा दोघांचेही सर्व मेडिकल पॅरामीटर्स उत्तम होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन लेवल ९७ ते ९९ या दरम्यान असायची.

हा…हा म्हणता दहा दिवस उलटले.

माझा डिस्चार्जचा दिवस उजाडला. सुप्रिया एक दिवस उशिरा अॅडमिट झाल्यामुळे तिला एक दिवस उशीरा डिस्चार्ज मिळणार होता. माझे डिस्चार्ज पेपर्स रात्रीच सही करून तयार होते. सकाळी मुख्य डॉक्टर आले आणि त्यांची सही झाली की, मला घरी जायची परवानगी होती!

सकाळी सात वाजताच मी तयार होऊन बसलो. सगळ्या सामानाची आवराआवर केली. बॅग भरली, खांद्यावरची पिशवीदेखील तयार ठेवली. सकाळी नऊ वाजता डॉक्टर येतील असे कळले होते. आमच्या वॉर्डमध्ये एकूण दहा जणांना डिस्चार्ज मिळणार होता. त्यामुळे सगळेच कासावीस झालो होतो. नऊ वाजले, दहा वाजले, अकरा वाजले तरी मुख्य डॉक्टर आलेच नाहीत. मग मी आमच्याकडच्या डॉक्टरांना विचारले, तर ते म्हणाले, “आमच्या वॉर्डला अमुक-तमुक डॉक्टर येणार होते, पण ते अद्याप आले नाहीत.” मग मी त्यांना म्हटले, “आपण बाजूच्या वॉर्डमधून डॉक्टरांना बोलावून या पेपर सह्या घेतल्या तर चालतील का?” त्या म्हणाल्या-  ‘चालतील’. 

मग त्यांनी एक वॉर्डबॉय माझ्यासोबत पाठवला. मी शेजारील वॉर्डमध्ये गेलो आणि तिकडच्या अमराठी डॉक्टरांना इंग्रजीतून विनंती केली. ते म्हणाले की, “माझं काम संपलं की, मी येतो दहा मिनिटांत!”

ते आले आणि पाच मिनिटांत सगळ्यांच्या पेपरवर सह्या केल्या आणि माझ्याजवळ येऊन म्हणाले, “झालं तुमच्या मनासारखं! आता जा घरी आनंदानं!!’ मी त्यांचे मनापासून आभार मानले!!

आमच्या डॉक्टरांनी माझ्यासोबत वॉर्डबॉय दिला आणि डिस्चार्ज पेपर दिले. मुख्य प्रवेशद्वारापाशी मी हॉस्पिटल बाहेर गेल्याची नोंद करून माझी सही घेण्यात आली. माझी बायको माझ्यासोबत मुख्य गेटपर्यंत होती. तिने मी बाहेर पडतानाचा एक व्हिडिओ तयार केला!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मी मुख्य दरवाजाबाहेर पाऊल टाकले!!

आहाहाss!

तो सूर्यप्रकाश! निळे आकाश!!

हो! हो!!

मी जिवंत होतो! मी जिवंत आहे!!

लाखो लोक या महामारीने मेले आणि मला या महाभयानक रोगाची लागण होऊन मी सुखरूपपणे बाहेर पडलो होतो!!

हे हॉस्पिटल ज्यांनी उभं केलं ती संस्था, या हॉस्पिटलमधील ज्या डॉक्टरांनी अथकपणे प्रयत्न केले ते डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, स्वच्छता कर्मचारी, आम्हाला जेवण देणारे कर्मचारी, आमचे ईसीजी - एक्स-रे करणारे डॉक्टर आणि तांत्रिक कर्मचारी, आमचे विलेपार्ल्याचे डॉ. सुहास पिंगळे, उज्वला लांडे, दिलीप भोगले, या सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने मी वाचलो होतो!!

माझ्यासारखे आणखी काही भाग्यवान माझ्यासोबत मागून येत होते!!

या सगळ्यांसोबत परमेश्वरही माझ्या मागे होता तर...!

जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती!

मी त्या निळ्या आकाशाकडे आणि हिरव्या झाडांकडे पाहून डोळे मिटले आणि नमस्कार केला!

हात खाली केले, तेव्हा त्या हातांवर डोळ्यातील अश्रू केव्हा पडले हे मला कळलेच नाही...

(या हॉस्पिटलमधील सर्व गोळ्या, ईसीजी, एक्स-रे, इन्सुलीन, ऑक्सिजन अशा सेवा, मेडिकल हेल्प, बेड, नाश्ता, चहा, जेवण, घरापासून हॉस्पिटलला जायची अ‍ॅम्ब्युलन्स हे सगळे मोफत होते. आम्हा दोघांना एकही रुपया द्यावा लागला नाही.)

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Ravi Go

Wed , 23 September 2020

Rather long article, what are readers to take away from this? You are a writer + prefer a particular jaat (Saraswat!), garam paani, chamchamit jevan aani gaav (Parle!). He saare veloveli dokawate. Aso.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......