शांतता! नाटकांचे प्रयोग ‘लाईव्ह’ सुरू होत आहेत...
कला-संस्कृती - नौटंकी
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘स्नॅपशॉटस फ्रॉम अ‍ॅन आल्बम’ या नाटकातील दृश्यं
  • Mon , 21 September 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki अविनाश कोल्हे Avinash Kolhe स्नॅपशॉटस फ्रॉम अ‍ॅन आल्बम SNAPSHOTS FROM AN ALBUM भूपेंद्र देशमुख ‌Bhupendra Deshmukh ऑप्टीमस व्हर्च्यूअल थिएटर - लाईव्ह OPTIMUS VIRTUAL THEATRE - LIVE

करोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २२ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन जाहीर केला आणि अचानक दैनंदिन जीवनाला ब्रेक लागला. तो अजूनही पूर्णपणे निघालेला नाही. एवढेच नव्हे तर नजीकच्या काळात निघेल अशी चिन्हं दिसत नाहीत.

लॉकडाऊनचा अर्थ समजायला सुरुवातीचे काही दिवस गेले. दरम्यान हँडवॉश, सोशल डिस्टन्सिंग वगैरे शब्द आपल्या जीवनाचा भाग झाले. करोनात जसा गोरगरिबांचा रोजगार मारला गेला, अर्थव्यवस्था ठप्प झाली; त्याचप्रमाणे समाजाच्या करमणुकीच्या गरजा भागणे थांबले. चित्रपटगृहं बंद, नाट्यगृहं बंद, मद्यपींना अतिप्रिय असलेले बार बंद… हा जीवनाचा मार्ग भयानक आहे. याचे आर्थिक परिणाम झाले, शिवाय सांस्कृतिक परिणामही झाले.

या संदर्भात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ज्या प्रकारचे जीवन घराच्या चार भिंतींच्या आत राहून जगता येत होते, तेथे फारसा परिणाम झालेला नाही. उदाहरणार्थ जुने चित्रपट बघणे सुरू होते, तसेच जुन्या क्रिकेट आणि फुटबॉलच्या मॅचेस. हे शक्य होते कारण क्रीडा क्षेत्रात ‘लाईव्ह टेलिकास्ट’ हा प्रकार एव्हाना चांगलाच स्थिरावला आहे. तसेच सिनेमांचे. अर्थात थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर चित्रपट बघणे आणि टीव्हीवर बघणे यात जमीनअस्मानचा फरक असतो.

मात्र रंगभूमी? जेथे समोर बसलेला आणि नाटकातील प्रसंगानुरूप हसणारा, रडणारा, टाळ्या देत दाद देणारा प्रेक्षक. तो नसेल तर रंगभूमी कशी तगेल? लॉकडाऊन कधी उठेल? याचा कोणालाच अंदाज नसल्यामुळे सुरुवातीला काही महिन्यांनंतर काही रंगकर्मींनी कंबर कसली. त्यांनी अभिवाचन, गाजलेल्या नाटकांतील काही प्रसंगांचे सादरीकरण वगैरे प्रकारांद्वारे रंगभूमी जिवंत ठेवण्याचे स्तुत्य प्रयत्न केले. या काळात अनेक रंगकर्मींनी नाटकाविषयी काही प्रयोग करून बघितले. काही मंडळींनी स्वगतं सादर केली, तर श्रेयस तळपदेनं ‘ऑनलाईन नाटक’ची कल्पना मांडली. असे प्रयत्न अजूनही छोट्या-मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

..................................................................................................................................................................

‘मायलेकी-बापलेकी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

पण हे प्रयत्न रसिकांना पूर्णपणे नाटक बघण्याचा आनंद देत होते, असे म्हणता येत नाही. यासाठी मुंबईकर रंगकर्मी भूपेंद्र देशमुख या तरुणाने ‘ऑनलाईन नाटका’चा पण अतिशय वेगळा प्रयोग सुरू केला आहे. त्याची नाट्यसंस्था ‘ऑप्टीमस व्हर्च्यूअल थिएटर - लाईव्ह’तर्फे काही चांगली नाटकं नाट्यरसिकांच्या सेवेत सादर होणार आहेत. या उपक्रमात मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटकं रसिकांना पाहता येणार आहेत. यातील पहिलं नाटक म्हणजे ‘स्नॅपशॉटस फ्रॉम अ‍ॅन आल्बम’. या इंग्रजी नाटकाचे प्रयोग २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान होणार आहेत.

भूपेंद्र आणि त्याचा ग्रूप सादर करू इच्छित असलेली नाटकं आगळ्या प्रकारे सादर केली जाणार आहेत. त्याची काही वैशिष्ट्यं आहेत. एक म्हणजे यात जास्तीत जास्त चार पात्रं असलेलीच नाटकं यात सादर केली जाणार आहेत. त्यासाठी हा ग्रूप सिनेमाचं तंत्र, लाईव्ह टेलिकास्टचं तंत्र वापरणार आहे.

दुसरं वैशिष्ट्यं म्हणजे नाटकाच्या शुटिंगसाठी कमीत कमी आठ कॅमेरे वापरले जाणार आहेत. प्रत्यक्ष नाटक सुरू असताना सभागृहात ‘ऑनलाईन एडिटर’ (स्वप्नील शेटे) ही सर्व दृश्यं संपादित करून घरी बसून बघत असलेल्या प्रेक्षकांच्या टीव्ही सेटवर, लॅपटॉपवर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतील. याचा अर्थ असा की, नाट्यगृहात बसून नाटक बघण्याचा जो जिवंत अनुभव नाट्यरसिक घेत असतात, त्या अनुभवाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा कौतुकास्पद प्रयत्न आहे.

या उपक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्यं म्हणजे नाटकांचं छायाचित्रण चक्क थिएटरमध्ये केलं जाणार आहे. भूपेंद्रने यासाठी गोरेगाव पूर्वेला असलेल्या नंदादीप शाळेतला ‘डॉ. भानुबेन नानावटी कलाघर’ हा हॉल बुक केला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

नाट्यगृहात कलाकार जमतील. मात्र मेकअप करणारा, कपड्यांसाठी मदत करणारा वगैरे नेहमीची टीम नसेल. प्रत्येक कलाकार स्वतःचा मेकअप स्वतः करेल, स्वतःचे कपडे स्वतः आणेल. इतर तांत्रिक बाबीं म्हणजे नेपथ्य, प्रकाशयोजना (अमोघ फडके), पार्श्वसंगीत वगैरेसाठी तंत्रज्ञ असतील. हे छायाचित्रण जरी नाट्यगृहात होत असलं तरी समोर प्रेक्षक नसतील!

नेमकं हेच खरं आव्हान आहे. समोर प्रेक्षक नसताना नाटक रंगेल का? आजकाल शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांना ऑनलाईन वर्ग घ्यावे लागत आहेत. तेथेसुद्धा समोर विद्यार्थी नसतात. तसंच या प्रयोगांचं आहे. ‘रंगभूमी’ या कलाप्रकाराचं हेच तर वैशिष्ट्य आहे. जिथं नटांसमोर प्रेक्षक बसलेले असतात, जे नाटकात रंगून जातात. त्यांचं रंगून जाणं किंवा न जाणं नटांच्या सादरीकरणावर परिणाम करते.

या नव्या तांत्रिक पद्धतीत नटांना हाडामासांचे प्रेक्षक समोर नसताना अभिनय करणं जमेल का? ‘हे वेगळं आव्हान असेल यात शंका नाही’ या नाटकात प्रमुख करत असलेली दिव्या जगदाळे सांगत होती, ‘हे नाटक आम्ही २०००मध्ये रसिकांसमोर आणले. तेव्हा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा ते नाटक नवीन माध्यमाद्वारे रसिकांसमोर करत आहोत. याचं नाही म्हटलं तरी आम्हा सर्वांवर थोडं दडपण आहेच. पण बदललेल्या परिस्थितीत आम्हा कलाकारांनासुद्धा बदलावं लागेलच. शिवाय नाट्यगृहात प्रेक्षक नसले तरी ते आपापल्या घरी बसून आमचा प्रयोग बघत आहेत ही भावना आम्हाला प्रेरणा देत राहिल’.

हा मुद्दा अभिनयाचा झाला. नाटकाच्या आशयाचे काय? २००० साली जे नाटक कमालीचं लोकप्रिय झालं, ते आज २०२०मधील नव्या पिढीला आवडेल का? ‘म्हणूनच आम्ही जुन्या संहितेत अगदी थोडे बदल केले आहेत. जुन्या नाटकात ब्रायन अ‍ॅडॅमचं त्या काळी अतिशय लोकप्रिय गाणं होतं - Have You Ever Really Loved a Woman? त्यातल्या ओळी होत्या -

To really love a woman/To understand her you gotta
know her deep inside/Hear every thought see every dream/And give her
wings when she wants to fly/ Then when you find yourself lyin' helpless
in her arms/ You know ya really love a woman...

हे गाणं आणि अशी काहीशी कालबाह्य झालेली गाणी आम्ही नव्या प्रयोगात काढून टाकली आहेत. त्याऐवजी नवीन संगीताचे तुकडे घेतले आहेत, जे ओंकार गोखलेने तयार केले आहेत.’ नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक शिव सुब्रमण्यम सांगत होते.

या नवीन तंत्रांची जशी काही आव्हानं आहेत, ताण आहेत; तसेच काही फायदेसुद्धा आहेत. हे नाटक एकाच वेळी दिल्ली, कोलकोता, बंगलोर वगैरे महाराष्ट्राबाहेरील महानगरांप्रमाणेच पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती वगैरे ठिकाणी असलेले रसिकही बघू शकतील.

..................................................................................................................................................................

करोनामुळे निर्माण झालेल्या कसोटीच्या काळात मानवाच्या जगण्याचा मुद्दा खूप महत्त्वाचा झालेला आहे, याबाबत दुमत होऊ शकत नाही. पण त्याच बरोबरीने त्याने आत्तापर्यंत निर्माण केलेली कला-संस्कृतीची मानचिन्हेसुद्धा टिकवायला हवीत, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल, का? कशासाठी? इथे जीवावर ऊठलेल्या परिस्थितीशी दोन हात करत सद्यस्थितीत स्वतःला टिकून राहणं तेवढंच महत्त्वाचं नाही का? तर हो… ते खरंच आहे, पण त्याचबरोबर निव्वळ तशा प्रकारे टिकून राहण्याला आणि तसं जगण्याला काही अर्थ राहील का, याचाही विचार व्हायला हवा. पशुपक्ष्यांसारखं फक्त पोटाचा आणि सुरक्षित जगण्याचा विचार मानव करत नाही, कारण फक्त जगणं म्हणजे जीवन नव्हे, याची प्रखर जाणीव त्याचा मेंदू त्याला सतत करून देत असतो. त्यामुळे त्याला त्याच्या संवर्धनासाठी कला आणि सांस्कृतिक बैठकीचा आधार लागतोच. ती भूक त्याचं जगणं संतुलित करतं.

नाटक ही एक जिवंत कला आहे. संपूर्ण विश्वातील जीवन व्यवहारातील भावनाट्य नाटकात प्रगट होतं, यावरून नाट्यकलेची व्याप्ती लक्षात येईल. त्यामुळेच प्रेक्षकांना जीवनाचा अर्थ आणि   जीवनातील जटिल प्रश्नांची उत्तरे शोधण्यास नाट्यकला विशेष मदत करत असते. याची जाण ठेवून  कलाक्षेत्रातील अनेक लोक आपापल्या परीने तसे अथक प्रयत्न करत असतात.

आज नाट्यगृहं बंद आहेत आणि पुढेही करोनाच्या छायेत संसर्ग होण्याची भीती सतत सोबत असणारच आहे. आपला वावर आणि  प्रवास अधिकच जटिल होत चालला असल्यानं प्रत्यक्ष रंगमंचीय प्रस्तुतीकरणाचा अनुभव मिळणं अधिकच दुरापास्त झालं आहे.

या सर्व परिस्थितीवर आणि बाबींवर गेले अनेक आठवडे आम्ही आमचे सहकलाकार, मित्र, बुजुर्ग, कलाक्षेत्रातील विद्वान अशा अनेकांशी विचारविनिमय करत होतो. त्या विचारमंथनातूनच  आमच्या ‘ड्रीम कॅसल इंटरटेन्मेंट प्राइव्हेट लिमिटेड’तर्फे ‘ऑप्टिमस व्हर्च्युएल थिएटर–लाईव्ह’ सुरू करण्याचा विचार पुढे आला.

या उपक्रमाअंतर्गत आम्ही काही आगळीवेगळी आधुनिक शैलीतील नाटकं आणि नाटकाशी संबंधित कार्यक्रम प्रेक्षकांसाठी माफक दरात त्यांच्या घरापर्यंत घेऊन येत आहोत. आम्ही सादर करत असलेल्या नाटकांचे प्रयोग लाईव्ह असणार आहेत. मुख्य म्हणजे ते ‘नाटक’, सिनेमा किंवा सिरिअलच्या फॉर्ममध्ये न दाखवता प्रेक्षकांना घर बसल्या नाटकाच्या रंगमंचीय सादरीकरणाचा प्रत्यक्ष थेट अनुभव देण्याचा प्रयत्न आम्ही अद्ययावत उच्च तंत्रज्ञान आणि अनुभवी तंत्रज्ञ कलाकारांना घेऊन करत आहोत.

आता आपल्या संवर्धनासाठी कला टिकायला हवी असेल तर कलेचा विकास व्हायला हवा आणि त्यासाठी मुळात कलाकार जगायला हवा आणि हे अर्थाशिवाय शक्य होणार नाही.

या उपक्रमाअंतर्गत सादर होणाऱ्या नाटकांचं तिकिट माफक दरात आणि फॅमिली तिकीटही म्हणून उपलब्ध होतील. प्रयोगातून आम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नातील मोठा हिस्सा, हा त्या त्या नाटकातील कलाकारांना/तंत्रज्ञ कलाकारांना देण्यात येणार आहे. तेव्हा आपण समस्त नाट्य रसिकांनी आमच्या या उपक्रमाला भरघोस पाठिंबा द्यावा ही विनंती.

- भूपेंद्र देशमुख, शो निर्मिती प्रमुख आणि निर्माता

..................................................................................................................................................................

भूपेंद्रने काळाची पावलं ओळखून परदेशस्थ नाट्यरसिकांसाठीसुद्धा त्यांच्या वेळांनुसार प्रयोगांची आखणी केली आहे. २५ तारखेचा प्रयोग संध्याकाळी साडेआठ वाजता सुरू होईल, तर २६ तारखेचा प्रयोग संध्याकाळी साडेसातला सुरू होईल. साडेसातचा प्रयोग भारताप्रमाणे युएई, दक्षिण आफ्रिका, ब्रिटन येथील प्रेक्षकांना त्याच वेळी बघता येईल. अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी हा प्रयोग २७ तारखेला आपल्याकडे सकाळी सात वाजता मंचित होईल. या उपक्रमातील पहिलं नाटक ‘स्नॅपशॉटस फ्रॉम अ‍ॅन आल्बम’ हे सुमारे दीड तासांचं आहे. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

https://www.ticketkhidakee.com/snapshots या वेबसाईटवर या उपक्रमाची, त्यात सादर होणाऱ्या नाटकांची माहिती उपलब्ध आहे. तिकीट विक्री ऑनलाईन होईल. ‘एरवीपेक्षा तुलनेनं कमी दरात लोकांना घरी बसून दर्जेदार नाटकं बघता येतील. त्यामुळे या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळेल याची खात्री वाटते’, भूपेंद्र देशमुखाचा आशावाद खरा ठरेल आणि पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजेल. या नव्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा!

..................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.

nashkohl@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख