अजूनकाही
शब्दांचे वेध : पुष्प नववे
‘पलभर के लिये कोई हमें प्यार कर ले’ हे गाणे गात गात पडद्यावर देव आनंद हेमा मालिनीच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करतो. ती त्याच्या तोंडावर दारामागून दारं आणि खिडकीमागून खिडकी आपटत त्याला बाहेरच ठेवण्याचा प्रयत्न करते.
हे गाणे जेव्हा जेव्हा मी टीव्हीवर बघतो, तेव्हा मला सुमारे ५० वर्षांपूर्वी वाचलेल्या एका पुस्तकातल्या एका विशिष्ट वर्णनाची आठवण येते. (बहुधा रमेश मंत्रींचे ते पुस्तक होते.) त्याचे नाव मला आज आठवत नाही. गंमत म्हणजे हे पुस्तक मला नंतर कधीच वाचायला मिळाले नाही. यात कुठल्याश्या युरोपियन देशात (फ्रान्स, बेल्जियम, किंवा नेदरलंड यापैकी एक) कॉलेजच्या मुलामुलींमध्ये खेळल्या जाणाऱ्या ‘फनेत्र’ नावाच्या जराश्या चावट गेमचा उल्लेख केला आहे. का कोण जाणे, त्या खेळाचे नाव एकदा वाचून ५० वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात इतके फिट्ट बसले की, कोणतीही ‘फ्रेंच विंडो’ पाहिली की, ते मला आठवते. फ्रेंच भाषेत ‘फनेत्र’ (fenêtre) म्हणजे खिडकी. हा देव आनंद जसा खिडक्यांमधून आत घुसण्याचा प्रयत्न करतो, तसाच प्रयत्न ती युरोपातली मुलेही करतात. म्हणून त्या खेळाचे नाव ‘फनेत्र’. त्या गेमचा यापुढचा विनोदी तपशील मी येथे सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला ते पुस्तक मुळातूनच वाचावे लागेल.
दरवाजे बंद असतात, तेव्हा आत शिरण्यासाठी खिडकीला राजमार्ग समजणारे लोक बहुतेक वेळा चोर असतात. पण कधीकधी आणीबाणीच्या प्रसंगी इतरांनाही त्याशिवाय गत्यंतर नसते. वुडहाऊसच्या ‘Money For Nothing’ या कादंबरीत हा प्रसंग एक घरमालक स्वतःवरच ओढवून घेतो. ‘Sam The Sudden’मध्ये सॅमलाही पावसापासून स्वतःचा बचाव करायला असेच करावे लागते. या दोन्ही साध्या, नेहमीच्या खिडक्या होत्या. पण काही वेळा दरवाजाच्या आकाराच्या खिडक्यांमधूनही अशी ये–जा होते. या दुसऱ्या प्रकारच्या खिडकीला इंग्रजीत ‘फ्रेंच विंडो’ म्हणतात, तर फ्रान्समध्ये ‘porte-fenêtre’ (windowed doors or door-sized windows) असे म्हणतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
रीतसर दरवाजे असताना ‘फ्रेंच विंडो’ बसवायची काय गरज भासते, हे एखादा वास्तूशास्त्रज्ञ चांगले समजावून सांगू शकेल. पण थोडक्यात बघायचे झाले तर “If you’re looking for a timeless and elegant window that will let natural light stream into your home, then a French window could be a great option” असे सांगितले जाते. आता गंमत म्हणजे फ्रेंच विंडो जन्माने फ्रेंच नाही. १७व्या शतकात फ्रान्स आणि इटली यांच्यातल्या युद्धाच्या शेवटी फ्रेंच लोकांनी इटलीतून ‘Renaissance’ (सांस्कृतिक पुनर्जीवन किंवा प्रबोधन) च्या ज्या ज्या संकल्पना आपल्या देशात आयात केल्या, त्यात हीदेखील होती. तिथून पुढे ती इंग्लंड आणि अन्य देशांत पसरली.
फ्रेंच भाषेत ‘fenêtre’ म्हणजे खिडकी हे तर कळले. याशिवाय बऱ्याच युरोपियन भाषांतही ‘fenêtre’शी मिळतेजुळते शब्द खिडकीसाठी वापरले जातात. या सगळ्या शब्दांचे मूळ लॅटिन भाषेतील ‘fenestra’ किंवा ‘fēstra’ या शब्दांत आहे. लॅटिन ‘fenestra’ म्हणजे opening, छिद्र, भोक. इट्रस्कन (Etruscan) या प्राचीन भाषेने लॅटिनला या शब्दाची देणगी दिली असे मानले जाते. याच ‘fenestra’चा पुढे लॅटिनमध्ये खिडकी अशा अर्थाने वापर केला जाऊ लागला. तिथून तो इटलियन भाषेत finestra, फ्रेंचमध्ये fenêtre, जर्मनमध्ये Fenster, डचमध्ये venster, रोमेनियनमध्ये fereastră, पोर्तुगीज व स्पॅनिशमध्ये fenestra, तर स्विडिशमध्ये fönster बनला. इंग्रजीचे काय? जुन्या इंग्रजीतही (Old English) ‘fenester’ने शिरकाव केला. मात्र आधुनिक इंग्रजीत आता ‘fenestra’ हा शब्द फक्त वैद्यकशास्त्र आणि प्राणीशास्त्रांत एक तांत्रिक संज्ञा म्हणून वापरला जातो. आपल्याकडे आपण याचे भाषांतर ‘गवाक्ष’, ‘झरोका’ असे करतो.
घराच्या खिडकीसाठी सध्या इंग्रजीत ‘window’ हा शब्द वापरतात. १२व्या शतकात ओल्ड नॉर्स भाषेतल्या ‘vindauga’ या शब्दापासून हा शब्द तयार झाला असे मानतात. याचा अर्थ वाऱ्याचा डोळा (wind eye) किंवा घरात हवा येऊ द्यायला छपराला केलेले छिद्र. या छपरातल्या छोट्या भोकाचे खिडकीत कसे रूपांतर झाले, हा वास्तूशास्त्राच्या इतिहासाचा विषय आहे. आपण ‘विंडो शॉपिंग’ केल्यासारखे त्याच्यावर फक्त एक नजर टाकतो आहोत!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
इंग्रज लोक महाधूर्त आणि चतुर आहेत, हे तर आपण जाणतोच. तसेच ते दुटप्पी पण आहेत. त्यांना फ्रेंच लोकांचा अतोनात राग आहे, पण सोयीसाठी ते हा राग विसरून आपला फायदा करून घ्यायला फ्रेंचांचे तळवेही चाटतात. फ्रेंच कपडे, फ्रेंच फॅशन, फ्रेंच पर्फ्युम, फ्रेंच वाईन्स, फ्रेंच पदार्थ, यासोबतच फ्रेंच स्त्रिया, या सगळ्या गोष्टी त्यांना आकर्षित करतात. याखेरीज आणखी एक बाब आहे. ती म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना वरच्या पातळीच्या, ‘प्रतिष्ठित’ अशा भाषेत बोलायचे असेल तेव्हा ते फ्रेंच शब्दांचा वापर करतात. दरबारी, न्यायिक, राजनैतिक अशा औपचारिक कारणांसाठी इंग्रजीने फ्रेंच किंवा लॅटिन शब्दांचा आधार घेतला असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
आता या ‘fenestra’ शब्दाचेच बघा ना. खिडकीसाठी इंग्रज ‘window’ हा शब्द वापरतात, पण एखाद्याला औपचारिकरीत्या डच्चू द्यायच्या कृतीला मात्र ते म्हणतात ‘defenestration’. म्हणजे खिडकीतून बाहेर फेकणे. देव आनंदला खोलीतून बाहेर काढण्यासाठी हेमा मालिनीने जर त्याला खिडकीतून बाहेर फेकले असते तर ते ‘डीफेनिस्ट्रेशन’ झाले असते. ‘Show him the door’ सारखे ‘throw him out of the window’ असेही इंग्रज म्हणू शकले असते, पण त्यांना जरा पॉश, कानाला बरा वाटावा असा नाविन्यपूर्ण शब्द हवा होता, जो ऐकून फेकले गेलेल्या माणसालाही बरे वाटावे असा, म्हणून त्यांनी निवड केली ‘Defenestration’. आहे ना गंमत?
‘Defenestration’ या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो - खिडकीतून खाली फेकणे. De म्हणजे काढून टाकणे, हटवणे, दूर करणे, इत्यादी. de- + Latin fenestr(a) “window” + -ation. ‘The Defenestrations of Prague’ या ऐतिहासिक घटनांतून या शब्दाची निर्मिती झाली असे म्हणतात.
अधिक माहितीसाठी बघा - https://en.wikipedia.org/wiki/Defenestrations_of_Prague#
प्राग शहरात सन १६१८मध्ये प्रोटेस्टंट लोकांनी राजाच्या दोन अधिकाऱ्यांना खिडकीतून बाहेर फेकून दिले होते, ही याची पार्श्वभूमी. एखाद्याला शारिरीकरीत्या खिडकीतून बाहेर फेकून देणे म्हणजे ‘Defenestration’.
पुढे मात्र या शब्दाला सांकेतिक अर्थ प्राप्त झाला. एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला पदावरून तडकाफडकी काढून टाकणे, त्याची अपमानास्पद पद्धतीने हकालपट्टी करणे, त्याला लाथ मारून हाकलून देणे, त्याला डच्चू देणे, या सगळ्या गोष्टींचे ‘Defenestration’ या शब्दाने वर्णन करता येते.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ऑपेरातल्या जाड्या बाईने गायलेली भैरवी आणि नानंद
..................................................................................................................................................................
दुसऱ्या महायुद्धाचा महानायक म्हणून ज्याचे वर्णन केले जाते, त्या विन्स्टन चर्चिलला युद्धानंतर लगेच झालेल्या निवडणुकांत जनतेने असेच ‘डीफेनिस्ट्रेट’ करून घरी बसवले होते. १६ जून १९७७ रोजी रशियात (तत्कालीन USSR) लेनिद ब्रेझन्येव्हने तेव्हाचा राष्ट्राध्यक्ष निकोलाय पॉडगॉर्नी याची अशीच ‘हकालपट्टी’ केली होती. वसंतराव नाईकांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून अगदी असेच अचानक, तडकाफडकी जावे लागले होते. अर्थात ही सगळी राजकीय कारणे आहेत, अन्य कारणांवरूनही असे घडू शकते. एखादा अप्रिय, भ्रष्ट अधिकारी असो किंवा राजकारण्यांना डोईजड ठरणारा एखादा प्रामाणिक अधिकारी असो, त्यालाही असेच पदावरून हटवले जाण्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत आणि यापुढेही बघत राहू. हे सगळे ‘Defenestration’चे शिकार आहेत.
‘Defenestration’ला बरेच पर्यायी मराठी शब्द आहेत. त्यामुळे आपण तेच वापरू या. पॉडगॉर्नीची गच्छंती झाल्यावर दुसऱ्या दिवशीच्या एका वर्तमानपत्राची (बहुतेक ‘महाराष्ट्र टाईम्स’) हेडलाईन होती – ‘पॉडगॉर्नी यांना अर्धचंद्र’. ही हेडलाईन मला अजूनही आठवते. त्यांची ‘उचलबांगडी झाली’ किंवा त्यांना ‘गचांडी मिळाली’ असेही तुम्ही म्हणू शकता. मात्र ‘हकालपट्टी’, ‘डच्चू’, ‘पदावरून दूर केले’ या साध्या शब्दांत ‘Defenestration’ची नक्की छटा येत नाही.
गचांडी म्हणजे एखाद्याच्या मानेला घट्ट् धरून त्याला धक्का देणे. किंवा हाताचा पंजा मानेवर ठेवून दिलेला धक्का; अर्धचंद्र.
अर्धचंद्रच का? गचांडी देताना हाताचा आकार अर्धचंद्रासारखा होतो म्हणून हा शब्द बनला.
आणि उचलबांगडीची मजा तर काही औरच आहे. या शब्दातली ही बांगडी हे ‘mondegreen’चे उदाहरण आहे. कानात घुसलेला चुकीचा ध्वनी. खरा शब्द आहे, उचलपांगडी. त्याचे झाले उचलबांगडी. दाते शब्दकोशानुसार याचे अर्थ असे -
१) हातपाय धरून उचलणें; बलात्कारानें नेणें (लहान मुलांना शाळेंत नेण्यासाठीं प्रयोग).
२) बलात्काराने घालवून देणें; हकालपट्टी करणें उच्चाटण. ‘मुधोजीची उचलबांगडी होण्याचा वेळ आला होता.’ -विवि ८.६. १११. [उचल + पांग-डी = कोळ्याचें जाळें (हें मोठें असल्यास दोघे, चौघे उचलतात.)]
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
थोडक्यात ‘पांगडी’ हे कोळ्याचे मोठे जाळे असते. या ‘पांगडी’ची ‘बांगडी’ कशी आणि केव्हा झाली, कोण जाणे!
खिडकी ते कोळ्याचे जाळे एवढा मोठा प्रवास केल्यामुळे आता मला रमेश मंत्रींचे(?) ते पुस्तक पुन्हा वाचायची हुक्की आली आहे. त्याचे नाव तुम्हाला आठवत असेल तर मला नक्की कळवा.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment