जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित राय यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. पुढच्या वर्षी २ मे २०२१ रोजी त्याची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने हा एक विशेष लेख…
..................................................................................................................................................................
सत्यजित राय यांचा ‘गणशत्रू’ प्रदर्शित झाला, त्या वेळी त्याचं स्वागत काहीसं थंडच झालं होतं. त्याची कारणं वेगवेगळी असली तरीही त्यांनी ज्या समस्येकडे लक्ष्य वेधायचा प्रयत्न केला होता, ती समस्या आजही तशीच आहे.
सत्यजित राय यांनी एकंदर ३६ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. निखळ कलावादी दृष्टी ठेवून चित्रपट करणाऱ्या या प्रतिभावंतानं स्वत:चा असा एक ‘cult’ निर्माण केला. त्यांच्या चित्रपटांना ‘समांतर सिनेमा’ म्हणता येत नाही आणि ‘कमर्शिअल सिनेमा’ही नाही. तो फक्त ‘सत्यजित राय यांचा सिनेमा’ होता. ‘पाथेर पांचाली’पासून ते शेवटच्या ‘आगंतुक’पर्यंत त्यांच्या सर्वच सिनेमावर त्यांची स्वत:ची अशी एक मोहोर होती. मात्र त्यांचे सर्वच चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होते असं नाही.
१९८३च्या ‘घरे बाहिरे’च्या निर्मिती दरम्यान सत्यजित राय यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा तो सिनेमा त्यांनी कसाबसा पूर्ण केला. मात्र त्यानंतर त्यांच्यावर काही बंधनं आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता त्यांना बाह्य-चित्रण आणि प्रवास शक्य नव्हता. शिवाय कॅमेऱ्याच्या मागेदेखील फार वेळ उभं राहणं शक्य नव्हतं. निसर्ग आणि माणूस यांच्यामधील साधर्म्य आणि लागेबांधे हा खरं तर त्यांच्या जिव्हाळ्याचा भाग. मात्र त्यांनी त्यातून मार्ग काढला, बंदिस्त चित्रण करण्याचा निर्णय घेतला.
‘गणशत्रू’ त्यापैकी एक. सत्यजित राय यांचे चित्रपट कुठल्या ना कुठल्या साहित्यकृतीवर आधारलेले असत. इब्सेन या सुप्रसिद्ध नाटककाराच्या एका नाटकाचं कथानक त्यांनी ‘गणशत्रू’साठी निवडलं. ‘गणशत्रू’ व्यावसायिकदृष्ट्या सफल झाला नाही हे खरं, मात्र त्याचा विषय सार्वकालीन ठरावा असा होता, आहे.
माणसाच्या आशावादी दृष्टीकोनाची, त्याच्या जिद्दीची, त्याच वेळी त्याच्या संकुचित दृष्टीची आणि स्वार्थाची कथा ‘गणशत्रू’मध्ये आहे. ही कथा (वा चित्रपट) आजही आठवावी अशीच आहे. भारतीय मानसिकता, त्यातील गुंतागुंत आणि वास्तविक स्वरूप सत्यजित राय आपल्यापुढे ठेवतात, आणि तेही तसा कुठला संदेश न देता…
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
आपल्या वैद्यकीय पेशाबद्दल समर्पित भावना असणाऱ्या एका सुसंस्कृत डॉ. अशोक गुप्ताची ही कथा आहे. चंडीपूर या लहान गावात ही कथा घडते. आपल्या कुटुंबात आणि कामात ते समाधानी असतात. एका संध्याकाळी थोड्या काळजीनं ते घरी येतात. त्यांच्या मनात एक शंका असते की, शहरात काविळीचा प्रदुर्भाव होतो आहे. दाट लोकवस्ती असलेल्या चंडीपूरच्या एका भागात पाण्यातून ही साथ पसरत आहे, असं सुतोवाच ते आपल्या पत्नीजवळ – मायाजवळ करतात. चित्रपटाची सुरुवात ही अशी होते.
याच प्रसंगात सत्यजित इतर पात्रांचीदेखील ओळख करून देतात. नितीश गुप्ता हा डॉ.अशोक यांचा भाऊ. अतिशय आत्मकेंद्री असणारा नितीश नगरपालिकेचा अध्यक्ष असतो. तो बेफिकीर, स्वार्थी आणि मुरलेला राजकारणी असतो. इंद्राणी डॉ. अशोकची मुलगी. आपल्या वडिलांच्या बुद्धिमत्तेवर आणि माणुसकीवर तिचा विश्वास असतो. ती शिक्षक असते. डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या एका तरुण लेखकासोबत इंद्राणीचं लग्न ठरलेलं असतं. एका थिएटर ग्रुपचा तो कलावंत असतो. मायाचं दीर नितीशबद्दल चांगलं मत नसतं. ‘जनवार्ता’ या स्थानिक दैनिकाचा एक पत्रकारदेखील येतो. या सहज प्रसंगातून सत्यजित आपल्याला सर्वांची ओळख करून देतात.
इंद्राणी वडिलांच्या नावे आलेलं एक पत्र त्यांना देते. पाण्याचे जे नमुने त्यांनी प्रयोगशाळेत पाठवलेले असतात, त्याचा तो रिपोर्ट असतो. त्यांचा अंदाज खरा ठरतो. शहराच्या ज्या दाट वस्तीतून हे पाणी येत असतं, तिथं एक मंदिर असतं. मंदिरातील हे पाणी सगळ्या साथीचं मूळ असतं. आपलं म्हणणं जनतेसमोर आलं पाहिजे, या भावनेनं डॉक्टर एक लेख लिहितात. मात्र तो छापून येत नाही. दैनिकावर दबाव आणला जातो. दरम्यान हे मंदिर, त्याच्याकडे असणारा भक्तांचा ओढा आणि गर्दी थांबवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत असतानाच त्यांचा भाऊ आणि नगराध्यक्ष, मंदिराचे ट्रस्टी यांचं अर्थकारण मध्ये येतं.
एक ट्रस्टी डॉ.अशोकला भेटण्यासाठी येतात. ते म्हणतात, “मंदिराच्या पाण्याला पाणी म्हणू नका, ते चरण-तीर्थ आहे. ते पवित्र तर आहेच, शिवाय त्यात तुलसी-पत्र आणि बेल-पान आहे. ते दूषित असणारच नाही.” वास्तविक ही एक गर्भित धमकीच असते. त्यांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही, हे डॉ.अशोकच्या लक्षात येतं. मग ते एक जाहीर सभा घेण्याचं ठरवतात. पण शहरातील सभागृहं, हॉल त्यांच्या सभेला मिळत नाही. अखेर एका मोकळ्या जागी ही सभा होते. डॉ. अशोक अडचणीत येतील असे अशास्त्रीय प्रश्न उपस्थित करून जनतेची दिशाभूल केली जाते. हा प्रसंग आणि त्यातील तणाव आपल्याला व्यथित करणारा आहे. तुम्ही कधी मंदिरात जात नाही, मग तुम्हाला त्या पवित्र पाण्याची ताकद कशी समजणार, या प्रश्नावर डॉक्टर हताश होतात. सभा उधळली जाते. फसवी कोष्टकं टाकून गणिती भ्रम निर्माण केला जातो. हे भयंकर गणिती तर्कट नितीश मांडतो. त्या वेळचे संवाद सत्यजित राय यांच्या संवाद लिहिण्याच्या कौशल्याचा उत्तम नमुना आहेत. जास्तीत जास्त भाविक भक्तांना मंदिर हवं आहे, ते बंद झालेलं चालणार नाही, असं चित्र निर्माण केलं जातं.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
वास्तविक डॉक्टर सर्वांच्या हिताची, आरोग्याची काळजी व्यक्त करत असतात. मंदिरातील जे दूषित पाणी लोक घेत आहेत, ते काही काळासाठी थांबवावं आणि तातडीनं दुरुस्ती करावी इतकीच त्यांची मागणी असते. प्रत्यक्षात असं चित्र उभं केलं जातं की, डॉक्टर परंपरेच्या, देवा-धर्माच्या विरोधात आहेत, पाखंडी आहेत. मुळात पारंपरिक असलेलं जनमत भडकावलं जातं. अखेर ते प्रभावी ठरतं. डॉक्टरांची सभा उधळली जाते.
आता थोडा मूळ नाटकाचा विचार करूया. हेन्रिक इब्सेन (१८२८-१९०६) यांच्या ‘Enemy of the People’ या मूळ नाटकात हा प्रश्न ‘बहुमताच्या’ भाबड्या संकल्पनेवर फोकस करणारा आहे. पर्यायानं तो लोकशाहीबद्दलदेखील प्रश्न निर्माण करतो. इब्सेनच्या नाटकात ही समस्या वेगळ्या पद्धतीनं सादर होते. समाजात प्रचलित असणारी एखादी गोष्ट किंवा विचार बहुमतानं व्यक्त झाला असेल, तर तेच योग्य आहे अशी सार्वत्रिक भावना तयार होते. ती बरोबर असेलच असं नाही. स्वत:चं वेगळं मत मांडणारी व्यक्ती नुसती एकटी पडते, असं नाही, तर ती टार्गेटसुद्धा होते.
मात्र सत्यजित राय ‘गणशत्रू’मध्ये लोकशाही हा मूलाधार ठेवतात. आणि असं करताना ते इतर विवादाला जन्म देत नाहीत. ‘Many times majority also can be at fault’ हा इब्सेनच्या नाटकातील विचार सत्यजित राय ‘गणशत्रू’मध्ये येऊ देत नाहीत. डॉक्टर व्यथित होतात. ते वर्षानुवर्षं अबाधित असलेल्या आपल्या श्रद्धेच्या विरोधात आहेत, अशी प्रतिमा निर्माण करण्यात राजकारणी यशस्वी होतात.
या सगळ्या घटनांचा विपरीत परिणाम त्यांच्या कुटुंबावरही होतो. या पराभूत मन:स्थितीत असताना त्यांची आणि इंद्राणीची नोकरी जाते. घरमालक त्यांना घर सोडायला सांगतो. उद्दाम राजकारण आणि नोकरशाही याचं हे कपट डॉक्टर सहन करू शकत नाहीत. आपल्या सचोटीला, आपल्या ज्ञानाला, सदिच्छेला कसलीच किंमत नाही, असं त्यांना वाटतं. ही पराभूत अवस्था, भ्रष्टाचारानं दिलेलं आव्हान आपण पाहण्याखेरीज काहीच करू शकत नाही, हा विचार त्यांच्या मनातून जात नाही. पत्नी आणि मुलगी त्याला नैतिक बळ देतात, मात्र डॉक्टर तरीही हताश, उद्विग्न होतात!
मात्र चित्रपट इथंच थांबत नाही. अखेरच्या पर्वात त्यांचा जावई आणि दै. ‘जनवार्ता’ सोडून आलेला एक पत्रकार यांच्या प्रयत्नातून काविळीच्या साथीची ही वार्ता कोलकात्यापर्यंत जाते. सामान्य, अंधश्रद्ध नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं मानणारा एक वर्ग डॉक्टरांच्या बाजूनं चळवळ उभी करतो. डॉक्टरांचा जावई आणि त्याचा थिएटर ग्रूप पाठिंबा देतात. ‘डॉ. अशोक गुप्ता जिंदाबाद’चे नारे देत त्यांचं मनोबल वाढवणारा तरुणांचा एक ग्रूप त्यांच्या सोबत येतो. या ‘नोट’वर ‘गणशत्रू’ संपतो.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : सत्यजित रे यांच्या मनात ‘समांतर’ चित्रपट बनवण्यासाठी ‘तिसऱ्या नेत्रा’ला ‘तिसरी नजर’ मिळण्यामागचं गौडबंगाल
..................................................................................................................................................................
राजकारण, भ्रष्टाचार, सत्तेचं पाशवी वर्तन आणि संपत्तीचा लोभ याची वाळवी समाजाला लागली आहे. सचोटी आणि प्रांजळ प्रयत्न यांची काही किंमत उरलेली नाही, याकडे निर्देश करावा असा सत्यजित राय यांचा हेतू होता. ‘Enemy of the people’ या इब्सेनच्या कलाकृतीवर हा चित्रपट आधरित होता. भारतात तो ‘गणशत्रू’ या नावानं प्रसारित झाला असला तरी इतर देशांत तो ‘Enemy of the people’ याच नावानं प्रसारित झाला. त्याचं भारतीयीकरण करताना सत्यजित यांनी आपलं जनमानस विचारात घेतलं, हे उघड आहे. आणि ते अतिशय नेमकं आणि उत्तम प्रकारे.
इब्सेनच्या नाटकातील डॉक्टरांचा भाऊ मेयर असणं, हा सगळा भाग सत्यजित यांनी तसाच ठेवला आहे. मूळ नाटकात दूषित पाण्याचा स्रोत त्या शहराच्या स्नानगृहातील आहे. स्नानगृहातील पाणी औषधी आहे अशी समजूत असते. त्यामुळे त्या गावात मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. हे औषधी पाणी(?) दूषित ठरवलं तर प्रवासी कमी होतील आणि परिणामी आपल्या महसुलावर परिणाम होईल. आपल्या सर्वांचं उत्पन्नदेखील धोक्यात येईल, असा विचार डॉक्टरांचा भाऊ करतो. नाटकात डॉक्टर ठामपणे उभे राहतात आणि व्यवस्थेच्या विरोधात लढा देत राहीन असा विश्वास व्यक्त करतात. नाटकातील डॉक्टर आक्रमक आणि काहीसे गर्विष्ठदेखील आहेत.
सत्यजित यांचे डॉ. अशोक गुप्ता मूळ नाटकापेक्षा वेगळे आहेत. ते समंजस, शांत आहेत. जनमताच्या भावनेला ते निष्ठूर आव्हान देत नाहीत. ते सौम्य शब्दांत व्यक्त होतात. मूळ कलाकृतीत डॉक्टर म्हणतात, “Strongest man in the world is the man who stands alone”. मात्र ‘गणशत्रू’मध्ये शेवटी डॉक्टरांच्या मनातील आशा पल्लवित होतात, त्या वेळी ते म्हणतात, ‘I am not alone....’
‘गणशत्रू’मधील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय केला आहे. तरीही डॉ. अशोक गुप्ताच्या भूमिकेत असलेले सौमित्र चटर्जी आणि आणि नितीश गुप्ताच्या भूमिकेतील धृतिमान चटर्जी यांचा आवर्जुन उल्लेख करावासा वाटतो. सौमित्र सत्यजित राय यांचे आवडते अभिनेते. साधी नीतीमूल्यं मानणारे डॉक्टर बदलत जातात, त्या सगळ्या छटा सौमित्र यांनी उत्तम सादर केल्या आहेत. आपल्या पेशंटची आणि नागरिकांची काळजी घेणारे डॉक्टर अखेर आपली उमेद परत आणतात. आपला भाऊ आपल्या विरुद्ध आहे, ही व्यथा व्यक्त करणारे डॉक्टर आणि अखेर ‘मी एकटा नाही’ असं म्हणणारे डॉक्टर असे सगळेच क्षण अतिशय समर्थ आणि साहजिक वाटतात.
धृतिमानचा बेमुर्वत, भ्रष्ट, सत्तापिपासू नितीशदेखील कुठे कमी पडत नाही. त्याच्या अभिनयातील संयत अविर्भाव सोपा नव्हता. कटकारस्थान करणारा नितीश व्यवस्थेचा बळी आहे, पण तो ठोकळेबाज खलनायक नाही. तो सादर करणं ही धृतिमानसाठी नक्कीच सर्कस होती. ती त्यांनी निर्विवादपणे निभावली आहे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : सत्यजित रे यांच्या मनात ‘समांतर’ चित्रपट बनवण्यासाठी ‘तिसऱ्या नेत्रा’ला ‘तिसरी नजर’ मिळण्यामागचं गौडबंगाल
..................................................................................................................................................................
सत्याच्या बाजूनं ठामपणे उभं राहणारं जनमत आणि समुदाय बघून डॉ. अशोक गुप्ता आनंदी होतात. अंधारवाटा आता संपल्या आहेत, आशेचा एक किरण त्यांना दिसतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ‘आपण आता एकटे नाही’ हा दिलासा. प्रेक्षक म्हणून आपल्यालादेखील ते आवडतं.
इब्सेनच्या नाटकातील शेवट भारतीय मानसिकतेला रुचणार नाही, असं सत्यजित यांना वाटलं होतं का? सभा उधळली गेल्यावर डॉक्टर निराश होतात. ‘I am lost’ असं म्हणतात, त्याच फ्रेमवर चित्रपट संपवला असता तर? सत्यजित राय स्वत: कलात्मकता जपणारे दिग्दर्शक होते, त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीदेखील त्यांना महत्त्वाची वाटली असणार. ज्या वर्गासाठी आपण हा चित्रपट काढला, त्याच्याबद्दल असणारी जागृत समज त्यांच्या मनात होती. आपण ते नाकारू शकत नाही.
अन्द्र्युज रॉबिन्सन हे सत्यजित राय यांचे चरित्रकार. त्यांना दिलेल्या एका मुलाखतीत सत्यजित राय म्हणतात, “I found that for once one could play with human faces and human relations rather than landscapes. Nature in its moods I have done in lot of films. Here I think it is human face human character is predominant…”
‘शाखा-प्रशाखा’, ‘गणशत्रू’ आणि ‘आगंतुक’ हे आजारपणानंतर सत्यजित राय यांनी केलेले तीन चित्रपट. त्यात त्यांनी बाह्य-चित्रण टाळलं आहे. त्यामुळे संवाद आणि माणूस अधिक केंद्रस्थानी राहिला आहे. बंगाली प्रेक्षकांनी ‘गणशत्रू’चं स्वागत कसं केलं, हे नेमकं कळलं नाही, मात्र बंगाली भाषेतील उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला.
सत्यजित राय यांचं वरील मत-प्रतिक्रिया वाचल्यावर त्यांची तडजोड ध्यानात येते. मात्र तरीही त्यात एक विचार नक्कीच आहे. निसर्गातील रंगछटा आणि निसर्गाचे विभ्रम त्यांनी नेहमीच अत्यंत सक्षमपणे मांडलेले दिसतात. ‘कांचनजंगा’सारखा चित्रपट त्याचं उत्तम उदाहरण ठरावं. या सगळ्या कल्पना बाजूला ठेवून मानवी चेहरा आणि त्याची वर्तन-छटा त्यांनी अखेरच्या तीन चित्रपटांतून साकारली. नेमका आशय आणि अर्थ व्यक्त करणारे ‘गणशत्रू’चे संवाद स्वत: सत्यजित राय यांचेच आहेत, हे महत्त्वाचं. सिनेमाचा विषय आणि आशय प्रभावीपणे व्यक्त झाला पाहिजे, याबद्दल सत्यजित राय नेहमी आग्रही होते. सिनेमा केवळ चकाचक किंवा आधुनिक करणं त्यांना मंजूर नव्हतं.
साहित्याचा आणि कलेचा वारसा त्यांना घरातून मिळाला होताच. त्यांचे आजोबा उपेन्द्रकिशोर राय उत्तम लेखक, चित्रकार आणि वायोलिन वादक होते, तर वडील सुकुमार राय लेखक होते. स्वत: सत्यजित राय यांनी काही वर्षं ‘शांतीनिकेतन’च्या वातावरणात काढली होती. साहजिक त्यांची दृष्टी कलावादी झाली होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आज सत्यजित राय श्रेष्ठ जागतिक चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. भारतीय जनमानस आणि त्याची धारणा उदध्वस्त करावी असं त्यांना वाटत नसावं. म्हणूनच त्यांनी इब्सेनच्या नाटकातील आक्रमक भाग वगळला असावा. लोकशाही ही एक कमकुवत विचारप्रणाली आहे, हे त्यांना मान्य नाही. त्याच वेळी आशावाद विसरला गेला तर सर्वच संपून जातं, ही त्यांची धारणा आहे. लोकशाही आणि त्यातून निर्माण होणारा उदारमतवाद हा अगदीच वेडगळ प्रकार आहे असं नाही. विवेकी माणसाच्या मागे काही लोक नक्की उभे राहतात आणि लढा चालू राहतो, असंच प्रांजळ चित्रण ‘गणशत्रू’मध्ये आहे. इब्सेनच्या शेवटाऐवजी सत्यजित यांचा शेवट वेगळा आहे, त्यामागे त्यांचं चिंतन आहे.
हृदयविकार जडल्यावर आलेल्या मर्यादानंतर त्यांनी हे ओळखलं होतं की, सिनेमाशिवाय आपण जगू शकणार नाही. त्यांच्या आग्रहास्तव डॉक्टरांनी त्यांना काही अटींवर परवानगी दिली होती. सत्यजित राय यांनी त्यानंतर तीन चित्रपट दिग्दर्शित केले. ‘गणशत्रू’ त्यापैकी एक! हेन्रिक इब्सेनचं नाटक १८८२ साली आलेलं. त्याची पटकथा तयार करून, चित्रीकरण संपवून ‘गणशत्रू’ प्रदर्शित झाला तो दिवस होता - १९ जानेवारी आणि वर्ष होते १९९०!
..................................................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment