वाईट पत्रकारितेला आजवर कधीही एवढी मान्यता मिळाली नव्हती. - रवीश कुमार
२०१९ साल आहे. नवीन जग दार ठोठावतं आहे. हा संदेश लिहायला सुरुवात केली आणि मला व्हॉटसअॅप मेसेज आले. इंग्रजी अक्षरात लिहिलेले— ‘आज तेरी लिंचिंग की जायेगी’. एखाद्या व्यक्तीला ठेचून मारणं आपल्यातील काही जणांना वा अनेकांना भीषण वाटतं. पण काही लोकांसाठी ती एक सामान्य कृती आहे. ज्याच्याशी तुमचं पटत नाही त्याला ठेचून मारावं, असं वाटणं हल्ली स्वाभाविक मानलं जातं.
‘झुंड’ हा केवळ शब्द नाही. दहा, शेकडो, हजारो लोकांनी झुंड बनते. पिटाई करणारे, ठार मारणारे लोक, आपल्या फोनवर त्याचं चित्रीकरण करणारे लोक, हा सर्व तमाशा पाहाणारे पण तोंडातून ब्र ही न काढणारे लोक. त्यांच्या बिरादरीतले डझनभर तरुण खुनी बनले तरीही ते काहीही बोलत नाहीत. सैनिक म्हणून त्यांचा शून्य उपयोग असतो आणि त्यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा वा हल्ल्याचा खटला चालवला जातो, तेव्हाही ते काहीही बोलत नाहीत. फिरती झुंड विलक्षण वेगाने जमवली जाते. झुंड कुठे आणि केव्हा एकत्र होईल हे सांगता येणं अशक्य आहे.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4371
..................................................................................................................................................................
झुंडीचे मानसशास्त्र - विश्वास पाटील
जनतेचा उत्साह जर जागृत करायचा असेल, तर त्याच्यासाठी आधुनिक काळात राष्ट्रवादाच्या घोषणेसारखी उत्तम घोषणा नाही. - विश्वास पाटील
क्रांतिकारी चळवळीत भाग घेतल्यास आपल्या जीवनात आकस्मिक आणि भरघोस बदल होऊ शकेल असे वाटून, चळवळीचा जोर वाढताच अनेक जण तीत भाग घेतात. समाजात बदल घडवून आणण्याचे क्रांतिकारी चळवळ हे एक ठळक साधन आहे, हे याचे कारण.
क्रांतिकारी चळवळीचे हे वैशिष्ट्य सर्वांना माहीत आहे. माहीत नाही ते हे की, असाच बदल धार्मिक आणि राष्ट्रवादी चळवळींमध्येसुद्धा घडून येतो. फार मोठा आणि झपाट्याने बदल घडवून आणायचा असल्यास लोकांमध्ये आवेश संचारावा लागतो. त्यांच्या उत्साहाला उधाण यावे लागते. असा उत्साह आणि आवेश संपत्तीच्या आशेने उत्पन्न होऊ शकतो किंवा चैतन्यपूर्ण व लढाऊ चळवळींच्या दर्शनानेही उत्पन्न होऊ शकतो. आर्थिक भरभराटीची इच्छा हे मनुष्यप्राण्यासाठी फार मोठे प्रेरणादायक आकर्षण आहे. यापैकी केवळ एका प्रेरणेच्या प्रभावामुळेसुद्धा संपूर्ण समाज स्वत:ची भौतिक प्रगती करून घेऊ शकतो. परंतु, ज्या समाजामध्ये वैयक्तिक प्रगतीच्या संधी उपलब्ध नसतात किंवा असल्याच तर अगदी कमी प्रमाणात असतात; तेथील समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, गतिहीन बनलेल्या समाजाला गती देण्यासाठी, तेथील समाजामध्ये मूलगामी सामाजिक व अन्य बदल घडवून आणण्यासाठी लोकांमध्ये उत्साह निर्माण करावा लागतो. धार्मिक, क्रांतिवादी व राष्ट्रवादी चळवळी यासाठी फार उपयोगी पडतात; कारण विशिष्ट मतप्रणालीच्या बाजूने लोकांच्या मनात आवेश उत्पन्न करण्याचे काम या चळवळी अत्यंत यशस्वीपणे करू शकतात.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4450
..................................................................................................................................................................
इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य - सॅम हॅरिस-माजिद नवाझ
सॅम हॅरिस-माजिद नवाझ यांच्या चर्चेत मुख्यत्वे इस्लाम व ख्रिश्चन धर्मांचे संदर्भ येतात, पण त्यांच्या चर्चेमागची भावना सर्वच धर्मियांना उपयुक्त ठरावी - करुणा गोखले
हॅरिस आणि नवाझ या दोघांची विचारधारांच्या बाबतीत कोणे एके काळी ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ अशी अवस्था होती. हॅरिस निरीश्वरवादी, अमेरिकन, गोरे आणि ख्रिश्चन, तर नवाझ पाकिस्तानी कौटुंबिक वारसा असलेले ब्रिटनचे नागरिक, धर्माने मुस्लीम आणि कट्टरतावादी. हॅरिस एक यशस्वी, उच्चशिक्षित, सुस्थित, व्यासंगी प्राध्यापक, तर नवाझ वयाच्या १६व्या वर्षी शाळा-कॉलेज सोडून कट्टर इस्लामवादींच्या प्रभावाखाली येऊन जगभर अतिरेकी संघटनेची सदस्य संख्या वाढवण्याच्या उद्योगाला लागलेला आणि त्यापायी इजिप्तमध्ये तुरुंगाची हवा खात बसलेला विशीतला तरुण. पण ‘अॅम्नेटी इंटरनॅशनल’ ही संस्था त्याच्या कोवळ्या वयाकडे बघून त्याला पंखाखाली घेते, त्याचे प्रदीर्घ काळ समुपदेशन करून त्याला कट्टरतावादाच्या विळख्यातून सोडवते आणि पुनश्च उच्चशिक्षण घेण्यास उद्युक्त करते.
अशा युवकाबरोबर सॅम हॅरिस का सुसंवाद साधतात असा आपल्याला प्रश्न पडू शकतो. त्याचे उत्तर आहे नवाझ यांच्यामध्ये घडून आलेल्या हृदयपरिवर्तनात. उच्चशिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये ‘क्विलिअम’ ही संस्था स्थापन केली आहे व त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे, यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत.
या चर्चेत हॅरिस इस्लाममधील कोणत्या संकल्पना मुस्लिमेतरांना अनुदार किंवा कडव्या वाटतात, हे कुठलाही आडपडदा न ठेवता नवाझ यांच्यासमोर मांडतात. ते करताना अपराधीही वाटून घेत नाहीत आणि इस्लामला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेही करत नाही. त्यावर नवाझसुद्धा स्वसमर्थनाचा पवित्रा घेत चर्चा पुढे नेतात; बाजू उलटवण्याचा प्रयत्न करत ख्रिश्चन धर्मावर प्रतिहल्ला चढवत नाहीत. ‘इस्लाम अँड फ्यूचर ऑफ टॉलरन्स’ हे पुस्तक म्हणजे हॅरिस आणि नवाझ यांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4500
..................................................................................................................................................................
मधल्या काळातील मराठी विचारवंतांचे, राज्यशास्त्रज्ञांचे, समाजशास्त्रज्ञांचे लोकप्रिय लेखन पाहा. ‘प्रोपगंडा’ हा शब्द त्यांच्या कोशातच नाही असे वाटावे. - रवि आमले
मधल्या काळातील मराठी विचारवंतांचे, राज्यशास्त्रज्ञांचे, समाजशास्त्रज्ञांचे लोकप्रिय लेखन पाहा. ‘प्रोपगंडा’ हा शब्द त्यांच्या कोशातच नाही असे वाटावे. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविरोधात देशभर आंदोलन झाले. नरहर कुरुंदकर यांच्यासारखे विचारवंत तेव्हा सरकारच्या नाकावर टिच्चून आणीबाणीविरोधात प्रचार करीत होते. कुरुंदकर यांच्या भाषणांची तऱ्हा काही निराळीच होती. ते तेव्हा इसापच्या गोष्टी सांगत असत आणि त्याद्वारे देशकालस्थितीचा परामर्ष घेत असत. लोकांना बरोबर कळे, ते काय बोलतात ते. उपहास, वक्रोक्ती, व्याजोक्ती, विनोद अशा विविध मार्गांनी ते फॅसिझमविरोधात लोकांना जागवत असत. फॅसिझमवरील त्यांचे एक भाषण आता लेखरुपात प्रसिद्ध आहे. त्यात ते फॅसिझमची लक्षणे सांगतात. त्यांच्या प्रचारपद्धती सांगतात. ‘असत्य हे सत्य म्हणून बिनधोकपणे वावरू शकेल इतकी सोय जर करता आली, तर शिष्टसंमत कल्पना म्हणून परवडणारी लोकशाही सोयीनुसार वापरणे याला फॅसिस्टांची हरकत नसते,’ असे एक महत्त्वपूर्ण वाक्य आहे त्यात. पण त्यांच्या या प्रचारातही प्रोपगंडा हा विषय केंद्रस्थानी नव्हता. याचा परिणाम असा झाला, की प्रोपगंडाचा डंख कसा असतो हे आपल्या नीट लक्षातच आले नाही. छापील शब्दांवर विश्वास ठेवण्याची आपली सामाजिक प्रवृत्तीही त्याला पोषकच ठरली. तेव्हा वृत्तपत्रेही सरकारी माहिती शहानिशा न करता खरी मानत होते. त्या माहितीमागे काही हेतू असतील, ती अर्धसत्य वा खोटी असू शकेल अशी शंका कोणी चुकूनही घेत नव्हते. घोषणांना खरे मानून चालण्याची तर रूढीच निर्माण झाली आपल्याकडे. बाकी सारे सोडा. साध्या गुन्हेवृत्तांकडे पाहा. आजही पोलिसांकडून दिली जाणारी माहिती म्हणजे ब्रह्मवाक्य असे समजूनच ती छापली जाते. एरवी पोलिसांच्या प्रामाणिकतेबाबत येता-जाता संशय घेणारे आपण याबाबत मात्र पोलिसांना सत्यवचनी हरिश्चंद्रच समजतो, तर यात काही विसंगती आहे, हेही त्या पत्रकारांच्या गावी नसते. अशा परिस्थितीमुळे मराठीमध्येच काय, भारतातील इंग्रजीसह अन्य भाषांतही ‘प्रोपगंडा’ हा विषय मुळातून समजून घेण्याची वा देण्याची निकड कोणाला भासलीच नाही. प्रोपगंडा मात्र होतच राहिला.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4009
..................................................................................................................................................................
सातपाटील कुलवृत्तांत - रंगनाथ पठारे
‘सातपाटील कुलवृत्तांत’ : मानवी ‘अहं’ना नख लावणारी कादंबरी! - नीतीन रिंढे
‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही शीर्षकातून सुचवल्याप्रमाणे सातपाटील कुळाचा शोध घेणारी कादंबरी आहे. असा स्वकुळाचा शोध घेणाऱ्या कादंबऱ्यांचा एक आकृतिबंध अलेक्स हेलीच्या ‘द रूट्स’पासून रूढ झालेला आहे. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीने हा आकृतिबंध स्वीकारलेला असला तरी ‘द रूट्स’पेक्षा ‘सातपाटील…’ काही बाबतींत पूर्णतः वेगळी आहे. महत्त्वाचं वेगळेपण असं की, ‘द रूट्स’मधला नायक काळा आहे आणि त्याचे पूर्वज गुलाम म्हणून आफ्रिकेतून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या कादंबरीतून गुलामगिरीचा इतिहास उभा राहतो. ‘सातपाटील...’चा निवेदक देवनाथ सातपाटील हा मराठा-कुणबी या सामाजिक रचनेतल्या साधारणतः मध्यम स्तरावरच्या जातीतला आहे. परंपरेने तो ग्रामव्यवस्थेतल्या बलुतेदारांचा पोशिंदा आहे. त्यामुळे या कादंबरीतून ग्रामीण समाजातल्या जातीय रचनेचा मराठाकेंद्री सामाजिक इतिहास उभा राहतो. पठारे यांनी या लेखनाला मराठाकेंद्री न होऊ देण्याचा अतिशय कसोशीने प्रयत्न केल्याचं जागोजागी जाणवतं. पण एका विशिष्ट घराण्याच्या वंशवेलीचा शोध कादंबरीच्या कथानकातलं मध्यवर्ती कथासूत्र असल्याने, आणि ते अत्यंत प्रभावी रीतीने उतरल्याने, त्यांना ही गोष्ट नीट साधता आलेली दिसून येत नाही.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4538
..................................................................................................................................................................
खाद्यसंस्कृतीच्या एखाद्या गाढ्या अभ्यासकाने हा विषय जसा हाताळला असता, त्यापेक्षा टिकेकरांची हाताळणी अगदी सहज, सुलभ आणि गोष्टीवेल्हाळ आहे. - सुहास कुलकर्णी
‘इति-आदि’ या पुस्तकात आपल्या खाद्यसंस्कृतीचा आणि घरगुती वापरातील वस्तूंच्या इतिहासाचा धांडोळा घेण्यात आला आहे. खाद्यसंस्कृतीच्या एखाद्या गाढ्या अभ्यासकाने हा विषय जसा हाताळला असता, त्यापेक्षा टिकेकरांची हाताळणी अगदी सहज, सुलभ आणि गोष्टीवेल्हाळ आहे. त्यामुळे त्यांच्या मुशाफिरीत आपण वाचकही सामील होतो आणि त्यांच्यासोबतच खाद्यसंस्कृतीच्या विविध अंगांचा आस्वाद घेऊ लागतो.
वाचक या मजकुरात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लिखाणाला गेल्या दोनशे वर्षांतील भाषासौंदर्याचा सुगंध आहे. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. हा विषय लिहिण्याचा आनंद ते स्वत: घेत असल्याचं हा मजकूर वाचताना वाटत राहतं. त्यामुळेच त्यांच्यासोबत आपणही या आनंदात सहभागी होऊ शकतो. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो’, असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात. त्यामुळे त्यांचं बोट धरून चालताना मौज तर येतेच, शिवाय लहान मुलं आजी-आजोबांकडून गोष्ट ऐकताना ‘आणखी सांगा, आणखी सांगा’ असं म्हणतात, तसंही म्हणावंसं वाटतं. टिकेकरही त्यात्या विषयातील गमतीशीर, चमकदार आणि चमत्कृतीपूर्ण माहिती सांगत जातात. या माहितीमुळे आपण या पुस्तकात रमत जातो.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4011
..................................................................................................................................................................
ब्रिट यांनी जे लिहिले, ते एका दशकानंतर भारतातील कडव्या राष्ट्रवादाच्या, फॅसिझमच्या धर्माच्या कोंदणातील अवताराला इतके तंतोतंत लागू पडेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल! - श्रीमंत माने
लॉरेन्स विल्यम ब्रिट या अमेरिकन अभ्यासकाचा ‘फॅसिझम एनीवन?’ या मथळ्याचा लेख १५ जुलै २००३ रोजी ‘फ्री इन्क्वायरी’ मासिकाच्या २२ व्या अंकाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित झाला. भारतात त्या वेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेवर होते. नरेंद्र मोदी हे नाव गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नुकतेच राजकारणाच्या प्रादेशिक क्षितिजावर पुढे आले होते. ते भविष्यात पंतप्रधान बनतील, असे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते; परंतु त्या वेळी ब्रिट यांनी जे लिहिले ते एका दशकानंतर भारतातील कडव्या राष्ट्रवादाच्या, फॅसिझमच्या धर्माच्या कोंदणातील अवताराला इतके तंतोतंत लागू पडेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल.
फॅसिस्ट किंवा प्रोटोफॅसिस्ट म्हणजे त्यासारख्या भासणाऱ्या जगभरातील किमान सात राजवटींची उदाहरणे यासाठी श्री. ब्रिट यांनी वापरली. नाझी जर्मनी, फॅसिस्ट इटली, फ्रान्कोसचे स्पेन, अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार पोर्तुगाल, पापाडोपॉलसचे ग्रीस, पिनोचेटचे चिली आणि सुहार्तोची इंडोनेशिया या त्या सात राजवटी. त्या त्या कालखंडात या राजवटी सर्वशक्तिमान वाटल्या असल्या, तरी एकविसाव्या शतकात यांपैकी एकही देश अगदी अपवाद म्हणूनदेखील जगाच्या मंचावर महासत्ता, महाशक्ती किंवा महाविचार म्हणून समोर आला नाही, येत नाही. ही एकच बाब त्या सत्ताधाऱ्यांच्या मूल्यांकनासाठी पुरेशी ठरावी. हुकूमशहा महासत्तांची उभारणी करू शकत नाही व हाच त्या राजवटींचा अंतिम निष्कर्षही मानायला हरकत नाही.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4041
..................................................................................................................................................................
डोह : एक आकलन - संपादक विजया चौधरी
श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’ने परमोच्च आविष्काराचे गाठलेले शिखर अजून तरी अनुल्ल्यंघ राहिले आहे! - विजया चौधरी, चंद्रमोहन कुलकर्णी आणि भारत सासणे
श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठीतले एक अदभुत म्हणावेत असे ललितलेखक आहेत. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ अशी अवघी चार पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या १९६५ साली प्रकाशित झालेल्या ‘डोह’ या पुस्तकाला २०१५ साली ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ‘डोह : एक आकलन’ हे एक निर्मितीमूल्यांपासून लेखनापर्यंत अतिउत्तम दर्जा असलेले नवेकोरे पुस्तक नुकतेच मौज प्रकाशन गृहाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे संपादन विजया चौधरी यांनी केले आहे.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4135
..................................................................................................................................................................
सिनेमा पाहणारा माणूस - अशोक राणे
‘सिनेमा पाहणारा माणूस’ : हे पुस्तक चित्रपट जगतातील असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे! - अमरेन्द्र धनेश्वर
अशोक राणे हे नाव चित्रपट शौकिनांच्या चांगल्या परिचयाचं आहे. चित्रपट जगतातला त्यांचा संचार हा केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यातून त्यांची कारकीर्द घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत परीक्षक (ज्युरी) म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एक व्यापक आणि विशाल असं परिमाण प्राप्त झालं. अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पटकथा-संवादलेखक म्हणून तर त्यांनी नाव मिळवलंच, परंतु दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी मुलुखगिरी केली आहे. त्यांच्या नावावर ‘मस्तीभरा है समा’, ‘माय नेम इज अॅन्थनी गोन्साल्विस’ अशा जवळपास सातआठ डॉक्युमेंटरीज आणि ‘कथा तिच्या लग्नाची’सारखा चाकोरीबाहेरचा चित्रपटही जमा आहे.
अशोक राणेंचा हा प्रवास घडला कसा? एका अतिसामान्य मालवणी कुटुंबात जन्मलेला, परंतु बुद्धी तल्लख असलेला अशोक राणे हा माणूस जन्मजात स्ट्रगलर आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये उपजिविकेसाठी नोकरी करता करता त्यांनी चित्रपट माध्यमाविषयीची आपली पॅशन पोटतिडिकेने सांभाळली, जपली आणि उत्तरोत्तर वाढवत नेली.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4188
..................................................................................................................................................................
गांधी : भारतात येण्यापूर्वी - रामचंद्र गुहा, अनुवाद शारदा साठे
गांधींचे ‘महात्मा’पण कसे घडले, कसे आकाराला आले, याची चित्तवेधक कहाणी - राम जगताप
गांधींवर आजवर पुष्कळ लिहिले गेले असले आणि त्यांची अनेकांनी विविध प्रकारची चरित्रे लिहिली असली तरी गांधींनी आपल्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ ज्या आफ्रिकेमध्ये घालवला, तेथेच गांधींची ‘महात्मा’ म्हणून खऱ्या अर्थाने जडणघडण झाली होती. मात्र हा कालखंडच सविस्तरपणे आजवर कुठल्याही चरित्रकाराने नोंदवलेला नव्हता. गुहा यांनी आपल्या द्वि-खंडी चरित्राच्या पहिल्या भागात नेमका याच कालखंडावर भर दिला आहे. त्यामुळे या चरित्राच्या निमित्ताने गांधी-चरित्रातली एक मोठी उणीव दूर झाली आहे, असे मानायला हरकत नाही. कारण आफ्रिकेमधील गांधींच्या कामाविषयीची कितीतरी कागदपत्रे, वर्तमानपत्रे, लेख, माहिती आदी दस्तावेज आजवरच्या अनेक चरित्रकारांनी मुळातून पाहिला नव्हता. तो गुहा यांनी पहिल्यांदाच तिथे जाऊन पाहिला. त्यामुळे आजवर अप्रकाशित राहिलेल्या अस्सल कागदपत्रांच्या आणि विश्वसनीय पुराव्यांच्या आधारे गुहा यांनी हे चरित्र लिहिले आहे.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4230
..................................................................................................................................................................
नाइन्टीन नाइन्टी - सचिन कुंडलकर
‘नाइन्टीन नाइन्टी’ : सचिन कुंडलकरमधील संवेदनशील वाचक, लेखक, प्रेक्षक आणि श्रोत्याला समोर आणणारं लेखन - अक्षय शेलार
सचिन कुंडलकरच्या ‘नाइन्टीन नाइन्टी’मधील जवळपास सगळंच लिखाण हे एका प्रचंड वैयक्तिक अशा अवकाशातून आलेलं आहे. ते कुंडलकर या लेखक-दिग्दर्शकाविषयी, या व्यक्तीविषयी जितकं आहे, तितकंच त्याच्या सभोवतालाविषयी आणि त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाविषयी आहे. हा दृष्टिकोन त्याच्या जडणघडणीतून आणि वैयक्तिक, सामाजिक अवकाशातून निपजलेला आहे. हे लिखाण अनेक अर्थी प्रामाणिक आहे. वयाच्या अमुक एका टप्प्यानंतर पुण्यातील सदाशिव पेठी अवकाशातून आणि मर्यादित दृष्टिकोनातून बाहेर पडण्याबाबत इथे मांडलं जातं, पण सोबतच कधीकाळी आपण नको तितके ‘नाइव्ह’ होतो, याबाबतची कन्फेशन्सही इथे आहेत.
समकालीन माध्यमं आणि समाजमाध्यमांमधील कथनव्यवस्था ही भूतकालीन जीवन आणि त्यात रममाण होण्यात गुंतलेली आहे. समकालीन जागतिक तसेच भारतीय पॉप-कल्चरमध्ये ‘नॉस्टॅल्जिया’ ही संकल्पना आणि त्याभोवती फिरणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे पुस्तक त्याचं नाव सुचवतं तितकं काही ‘नॉस्टॅल्जिया’मध्ये रमणारं नाही. या पुस्तकातील लेखनात दिसणारा कुंडलकरदेखील याच्या अगदी उलट आहे. तो नवनवीन गोष्टी आत्मसात करू पाहणारा आहे. पुस्तकाला हे नाव मिळालं त्यामागील कारण हेच की, लेखकाच्या जडणघडणीमध्ये या दशकाचा महत्त्वाचा वाटा होता.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4231
..................................................................................................................................................................
भारत, समाज आणि राजकारण - यशवंतराव चव्हाण
यशवंतराव चव्हाणांच्या या मुलाखतींचा लिप्यंतरित मजकूर एका समर्पित आणि कार्यक्षम नेत्याचा दुर्दैवी ‘राजकीय अंत’ अधोरेखित करतो! - गोविंद तळवलकर
राजकारण म्हणजे ‘आर्ट ऑफ पॉसिबल’. (राजकारणाचा संबंध योग्य काय वा सर्वोत्तम काय याच्याशी नसून तुम्ही प्रत्यक्षात काय घडवून आणू शकता याच्याशी आहे). महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (कै.) श्री. यशवंतराव चव्हाण यांनी हे तत्त्व केवळ जाणले नव्हते, तर कौशल्याने आचरणात आणले होते. डॉ. जयंत लेले यांनी काही वर्षांच्या अवधीत रेकॉर्ड केलेल्या अनेक मुलाखतींवरून हे स्पष्टपणे दिसून येते. अथक प्रयासांनी या मुलाखतींचे लिप्यंतरण करण्यात आले आहे. आता त्या यथायोग्य संपादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
सत्तरच्या दशकात मी डॉ. लेले यांना भेटलो होतो आणि तेव्हा आम्ही सामान्यत: भारतीय राजकारण आणि विशेषत: चव्हाणांची कामगिरी याबद्दलची आमची मते एकमेकांना सांगितली होती. त्यानंतर माझा त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला. परंतु आठ-दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी डॉ. लेले यांना परत भेटलो, तेव्हा त्यांनी रेकॉर्ड केलेल्या मुलाखतींचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला. जेव्हा २०१२ हे चव्हाणांचे जन्मशताब्दी वर्ष जवळ येऊ लागले, तेव्हा चव्हाण प्रतिष्ठानने त्यांचे चित्रात्मक चरित्र प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांनी मला त्याची प्रस्तावना लिहिण्यास सांगितले. त्याऐवजी मी चव्हाणांचे मराठी व इंग्रजीत चरित्र लिहून या सर्व छायाचित्रांचा त्यात अंतर्भाव केला. चव्हाण यांची जन्मशताब्दी साजरी करण्याच्या निमित्ताने २०१२ साली मराठी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4335
..................................................................................................................................................................
जागतिक आवाका असलेल्या एका प्रगल्भ संपादकाने प्रसंगपरत्वे वेळोवेळी केलेले हे लेखन आपली जाण अधिक समृद्ध करणारे आहे! - भानू काळे
स्वतःचा एक विशिष्ट वर्ल्डव्ह्यू असलेला हा संपादक आहे. हा मोठा गुणच आहे, यात शंका नाही आणि असे संपादक आज अगदी क्वचितच आढळतील. जागतिक आवाका असलेल्या एका प्रगल्भ संपादकाने प्रसंगपरत्वे वेळोवेळी केलेले हे लेखन आजही आपल्या समोरच्या वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांविषयीची आपली जाण अधिक समृद्ध करणारे आहे. याचे एक मोठे कारण म्हणजे दुर्दैवाने आजही हे सारे प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभे आहेत; प्रदूषणापासून पाणीप्रश्नापर्यंत आणि स्थलांतरापासून सार्वजनिक वाहतुकीपर्यंत कुठलेच प्रश्न आपण अजून ङ्गारसे सोडवू शकलेलो नाही. त्यामुळेच लेख जुने असले तरी प्रश्न आणि त्यांची चर्चा समकालीन वाटते. वाचकांच्या विचारांना चालना देणारे असे हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल मी सदा डुम्बरे यांचे अभिनंदन करतो.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4042
..................................................................................................................................................................
बिटविन द लाइन्स - चंद्रमोहन कुलकर्णी
वडिलांची निळी हर्क्युलसची सायकल... केवढा अभिमान होता त्यांना! - चंद्रमोहन कुलकर्णी
प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचा ‘बिटविन द लाइन्स’ हा लेखसंग्रह नुकताच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालाय. काय आहे यात? या पुस्तकाचं स्वरूप कसं आहे? पत्रकार-अनुवादक अपर्णा वेलणकर यांनी या पुस्तकाचा ब्लर्ब लिहिलाय. तो असा - “कॅनव्हासवर शब्दांनी रंगवायला घेतलेली चित्रं पुस्तकाच्या पानांवर रंगांनी लिहिली गेली तर? - अशक्य असं जे घडतं, ते म्हणजे हे पुस्तक! रंगांनी भिजलेल्या ओल्या बोटांमधून शब्द वाहते राहतात, तेव्हाच त्वचेखाली धावणारया रक्तवाहिन्यांच्या रेषा उचलून आतल्या आयुष्याचे लखलखते तुकडे असे अलगद शब्दांत बांधता येतात! ही चित्रंच आहेत. शब्दांनी रंगवलेली. पोलिस लायनीतल्या खाकी बालपणाच्या हाती रंगांची पेटी देणार् या जन्मदात्याची, वेडयावाकडया तरुण रेषांना वळण देणार् या गुरूजनांची, भणाण डोळ्यातल्या धस्कटाचा ध्यास लागलेल्या रंगीत तारूण्याची, मोकाट उनाडलेल्या जिगरी दोस्ताची, धावत्या रेषेच्या वाटेत आलेल्या काही अर्धविरामांची, काही दुखऱ्या पूर्णविरामांची ... ही शब्द‘चित्रं’!”
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4502
..................................................................................................................................................................
माझ्या लिखाणाची गोष्ट - अनिल अवचट
तुम्ही काही म्हणा, जोपर्यंत लिहावंसं वाटतंय, तोपर्यंत सुचेल तसं, सुचेल ते मी लिहीत राहणार आहे! - अनिल अवचट
माझा स्वभाव असा विचित्र की, मनापासून वाटतं तेच करणार. जिथे मन रमत नाही, तिथून हळूच सटकणार. फायदा की तोटा याचा विचार न करता. मेडिकलला शेवटच्या वर्षी जाणवलं, आपण डॉक्टर व्हायच्या स्वभावाचे नाही आहोत. मी अर्ध्यातूनच कॉलेज सोडायला निघालो होतो. पण सुनंदा म्हणाली, “तू एमबीबीएस पूर्ण कर. मग काय वाटेल ते कर.” तिने पैसे मिळवायची जबाबदारी घेतली. मला मोकळं रान! माझं सामाजिक काम वगैरे नंतर सुरू झालं. आधी चित्रं काढायचो. तेव्हा आमचं असं ठरलं की, सुनंदा मला स्टुडिओ करून देणार. मी मनसोक्त चित्रं काढत बसायचं. पण पुढे सामाजिक कामात गुंतलो. मग ठरवलं, आपण पूर्णवेळ सामाजिक कामच करायचं. जोरात मोर्चे, गेट मीटिंगा, घोषणा; पण त्यातही मन रमेना. मग हमाल पंचायत या कामगार संघटनेमध्ये थोडाफार भाग घेऊ लागलो. बरोबरच झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नावर काम करणार्या ‘झोपडी संघ’ या संघटनेचं काम करू लागलो; पण नंतर तेही झेपेना. कायम संघर्षास तयार असणं, कधीही बोलावणं आलं की निघणं, वगैरे माझ्या स्वभावाशी जुळत नव्हतं. मग तेही सोडून दिलं. आमच्या संघटनेपासून मी दुरावलो. आपले मित्र रस्त्यावर लढत आहेत आणि आपण घरी निवांत बसलोय, हेही मनाला रुचेना. तोवर माझ्या लिहिण्याची सुरुवात झाली होती. मग ठरवलं, गरिबांच्या जगण्यावर, प्रश्नांवर लिहूयात. हाच आपला सामाजिक कामातला सहभाग. म्हणून मग लिहिता झालो. त्यातही आधी ‘साधना’ साप्ताहिकात लिहायचो. संपादनही करायचो. पण राजा ढालेच्या लेखावर वादळ उठलं. तेव्हा तिथेही माझी कोंडी झाली. बाहेर पडलो. नंतर ‘मनोहर’ साप्ताहिकात लिहू लागलो, फ्रीलान्स रायटर झालो आणि मग मात्र स्वतःचं काही तरी सापडल्यासारखं झालं. वाटलं, हे कसं ब्येस झालं!
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4531
..................................................................................................................................................................
फकिरीचे वैभव - विजय यशवंत विल्हेकर
मातीवर जीव लावणाऱ्या जिवांची माती उघड्या डोळ्यांनी पाहवत नव्हती... - विजय यशवंत विल्हेकर
सहा-सात महिन्यांनी पुन्हा मुंबईला जायचा प्रसंग आला. आमच्या नगरातील विधवा काकू. तिला बाहेरूनच कळले की, मी मुंबईला जाणार आहे. तिनं मला घरी बोलावलं. तिची आतील गोष्ट सांगितली. तिची तरुण मुलगी परिवाराच्या दारिद्रयाला सावरण्यासाठी मुंबईला पळून गेली होती. तिने मला लेकरू म्हणून विश्वासात घेतले. मुलीला परत आणण्याचा आग्रह करायला लागली. पुरावा म्हणून तिने पाठवलेल्या मनिऑर्डरच्या पावत्या होत्या. ती प्रत्येक महिन्याला, पंधरवड्यात आईला आवर्जून पैसे पाठवायची. तरुण मुलीच्या जाण्याने बाई खंगून गेली होती. तिच्या खंगलेपणामुळे भारून जाऊन मी आगाऊपणाने, ‘तू काहीच काळजी करू नको. मी तिला कोणत्याही परिस्थितीत परत आणतो’ असा नेहमीच्या स्वभावाप्रमाणे आगाऊ विश्वास दिला. तिचा फोटो घेतला. निघालो.
या कामात गुन्हेगार, शूटर मित्राची बरी मदत होईल, अशी आशा मनात दडून होती; पण त्याच्या भेटीची अनिश्चितता अस्वस्थ करत होती. मुंबई रेल्वेत बसलो. पोहोचलो. मूळ कार्यक्रम आटोपून या कामाला लागलो. ज्या परिसरातील डाकघरामधून मनिऑर्डर आली होती, तो परिसर वेश्या व्यवसायाचा होता. इथं पन्नास हजार स्त्रिया देहविक्रयाचा व्यवसाय करत होत्या. या क्षेत्राला रात्रीच दिवस निघायचा. नटलेल्या मुलींनी रात्र उजाडलेली असे. मी साध्या मनाने मुलीचा फोटो घेऊन, स्त्रीशोधाच्या नादात चौफेर फिरत होतो. प्रत्येक ठिकाणी हिडीस-फिडीस व्हायची, नवं तरुण गिऱ्हाईक आलं समजून. कामुक छेडछाड करायचे. मग आपण ‘बहेनजी’ म्हणून आपली येण्याबाबतची भूमिका मांडायचो. ‘बहेनजी, मैं गाँव के माँ के जवान लडकी को ढूँढने आया हूँ. मेरे आने का मकसद निराला है. मुझे आपकी मदत की बहोत जरूरत है.’
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4534
..................................................................................................................................................................
समतानंद अनंत हरी गद्रे - भानू काळे
‘झुणका-भाकर चळवळीचे प्रवर्तक’, ‘समतानंद’, ‘प्रचारकार्यप्रवीण’, ‘जाहिरातजनार्दन’, ‘लोकमान्य टिळकांचे खास वार्ताहर’ अनंत हरी गद्रे! - भानू काळे
‘समतानंद’ अनंत हरी गद्रे हे एकेकाळी महाराष्ट्र गाजवणाऱ्या झुणका-भाकर चळवळीचे प्रवर्तक. अस्पृश्यतानिवारणार्थ महाराष्ट्रात जे प्रयत्न झाले, त्यांत या चळवळीचे स्थान खूप वरचे आहे. सत्यनारायणाची पूजा हे त्यासाठी गद्रे यांनी निवडलेले माध्यम. बहुतेक सर्व समाजस्तरांत बऱ्यापैकी प्रचलित असलेले. या पूजेत नेहमीप्रमाणे दिला जाणारा तूप-साखर घातलेल्या शिऱ्याचा महागडा प्रसाद न ठेवता सर्वसामान्यांना परवडणारा आणि सहजगत्या घरी करता येईल, असा झुणका-भाकर हाच प्रसाद ते ठेवत. विशेष म्हणजे एखाद्या हरिजन जोडप्याच्या हस्ते ही पूजा व्हायची आणि त्याहून विशेष म्हणजे पूजेच्या शेवटी त्या यजमान जोडप्याच्या पायाचे तीर्थ स्वतः गद्रे प्राशन करत. हे अद्भुत दृश्य पाहून सगळेच उपस्थित भारावून जात.
ज्या काळात कोकणस्थ आणि देशस्थ, शहाण्णव कुळी आणि कुणबी, अय्यर आणि अय्यंगार किंवा शेख आणि कुरेशी यांच्यातील वादही पराकोटीचे असत, त्या काळाचा विचार करता, हे अभूतपूर्वच होते.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3966
..................................................................................................................................................................
‘आमची काही भूमिका नाही’ हीही एका भूमिकेचीच छटा असते! - सुरेश सावंत
आधी एक लक्षात घ्यायला हवे की, माणसाचे मन कोरे वगैरे काही नसते. ज्ञानेंद्रियांद्वारा ज्या संवेदना, अनुभव त्याला मिळत असतात, त्यांच्या विश्लेषणातून तो काही सूत्र काढत असतो. अशा सूत्राच्या साहाय्याने तो पुढील अनुभवांचा अर्थ लावतो. यातून त्याचे सूत्र विकसित होत राहते. लहान मूल आकर्षणापोटी मेणबत्तीच्या ज्वाळेत हात घालते. चटका लागला की, हात झटकन मागे घेते. अशा वारंवार येणाऱ्या अनुभवातून आगीत हात घातला की, चटका लागतो हे त्याच्या समजाचे सूत्र तयार होते. वडीलधारी मंडळी त्याला असे करण्यापासून रोखत असतात, हाही अनुभव या सूत्र तयार होण्याच्या प्रक्रियेत त्याच्या गाठीशी असतो. त्यातूनच ‘आगीत हात घातला की, चटका बसतो. म्हणून आगीपासून दूर राहावे’ हे शहाणपण, विचारसूत्र, भूमिका त्याच्या मनात तयार होते; किंवा वडीलधाऱ्यांनी आधीच तयार केलेले हे शहाणपण, ही भूमिका स्वानुभवातून आता त्याचीही होते.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3980
..................................................................................................................................................................
जग थांबतं तेव्हा - गौरी कानेटकर
करोना आणि लॉकडाऊनला आपण कसे सामोरे गेलो, याचा आडवा छेद - गौरी कानेटकर
२०२० सालातले मार्च अखेर ते जुलै असे चार महिने आपण एक अभूतपूर्व काळ अनुभवत होतो. एक विषाणू जगभर लोकांना संसर्ग देत पसरतोय, लाखो लोक मृत्युमुखी पडलेत, त्याच्या भीतीने सगळे देश लॉकडाऊन मोडमध्ये गेलेत, जग ठप्प झालंय, असा अनुभव आपल्यापैकी कुणालाच याआधी आला नव्हता.
दुसरं महायुद्ध ही अलीकडच्या काळातली सर्वांत संहारक आणि मानवजातीवर सर्वाधिक परिणाम करणारी घटना होती असं मानलं जातं; पण तरीही जगाच्या कानाकोपर्यात त्या महायुद्धाचे प्रत्यक्ष परिणाम झाले नव्हते. त्यानंतरच्या सत्तर वर्षांत शीतयुद्धं झाली, नागरी युद्धं पेटली, दहशतवाद फोफावला, विविध रोगांच्या-विषाणूंच्या अनेक साथी येऊन गेल्या; पण या सर्व घडामोडी एखाद्या देशापुरत्या-काही देशांपुरत्या किंवा फार तर एखाद्या खंडापुरत्या मर्यादित होत्या. आफ्रिकेतल्या रोगाचा भारतातल्या खेड्यापाड्यांशी संबंध आला नव्हता, किंवा सीरियातल्या नागरी युद्धाची झळ दक्षिण अमेरिकेतल्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचली नव्हती.
त्या अर्थाने करोनाचा प्रसार अभूतपूर्व होता. जगातल्या जवळपास सर्व देशांमध्ये करोनाने शिरकाव केला. कोणत्या ना कोणत्या प्रकारे जगातल्या प्रत्येक माणसाच्या जगण्यावर करोनाचा किंवा त्याला रोखण्यासाठी केल्या गेलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झाला. अमेरिकेतल्या बड्या मल्टिनॅशनलच्या सीईओंपासून मुंबईत पाणीपुरी विकणार्या यूपीच्या भय्यापर्यंत सार्यांना करोनाने ग्रासलं.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4501
..................................................................................................................................................................
स्वप्नपंखांना आकाश थिटे - शिमॉन पेरेस, अनुवाद मेधा आलकरी
कटुतेच्या आणि शत्रुत्वाच्या भिंती पाडून आपण शांतीचा पाट वाहू दिला पाहिजे - शिमॉन पेरेस
२०१६ साली माझ्या पंतप्रधानपदाची कारकीर्द संपून २० वर्षं लोटली. राबिनच्या पश्चात मी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा कधी नव्हे तो सगळा देश एकजुटीने उभा होता. जटिल आणि विभाजक समस्यांवर एकमत झाल्यामुळे नव्हे तर राबिनच्या हत्येच्या अत्यंत दुःखदायक सामुदारिक धक्क्यामुळे!
राबिनच्या सांडलेल्या रक्तावर मिळालेला विजय मला नको होता. कोणत्याही परिस्थितीत, मग ती राजकीय असो वा इतर, त्याच्या मृत्यूचा उपयोग मी केला नसता. त्याऐवजी मी आमच्या अधुऱ्या स्वप्नाच्या मागे लागलो. शांतिप्रक्रियेमध्ये स्वतःला झोकून दिलं. राबिन माझ्या सोबत नव्हता; परंतु त्याचा आत्मा माझ्या हृदयात विराजमान होता. पॅलेस्टिनियनांबरोबरील वाटाघाटींचा दुसरा टप्पा अजून अपूर्ण होता आणि त्याच दरम्यान माझ्या सूचनाबरहुकूम असाद सरकारशी शांतिप्रस्तावाची बोलणी करण्यासाठी मी उरी सावीरला सिरियाला रवाना केलं होतं. दहशतवाद हा शांतिकरारातील मोठा अडथळा ठरत असल्यामुळे मी शार्म-एल-शेखला एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. तिथे जमलेले जागतिक नेते दहशतवादाच्या धोक्यावरील उपायांच्या धोरणांची चर्चा करणार होते. हा काळ माझ्यासाठी कसोटीचा आणि एकलकोंडा होता. माझ्या पक्षातील लोक निवडणुका जाहीर न केल्याच्या माझ्या निर्णयावर नाराज होते.
सविस्तर लेखासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/4492
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment