‘सार्थ ज्ञानेश्वरी’ हा ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या मूळ ९००० ओव्यांसहित आणि ‘श्रीमद्भग्वद्गीते’च्या मूळ ७०० श्लोकांसहित मराठी अर्थ-परिचयाने नटलेला, १००० पृष्ठांचा ग्रंथराज शंकर वामन दांडेकरांनी (श्री सोनोपंत) सज्ज केला आहे.
ते पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात (एस. पी. कॉलेज) ‘तत्त्वज्ञाना’चे प्राचार्य होते. ‘ज्ञानदेव आणि प्लेटो’ हा त्यांचा संशोधनपर ग्रंथ. के. वि. बेलसरे यांच्या ‘सार्थ श्री दासबोधा’चे साक्षेपी संपादन त्यांनीच केले.
मराठी संतसाहित्यात मोलाची भर घालणारे हे दोन उपक्रम त्यांच्या संपादकीय परीसस्पर्शाने लखलखत आहेत. त्यांनी जणू आपल्या बुद्धीवैभवाने या ग्रंथांची आध्यात्मिक पूर्वपीठिका अभ्यासकांसाठी आणि जिज्ञासूंसाठी अनिवार्य करून ठेवली आहे, इतकी ती या मूळ स्वयंप्रकाशित ग्रंथांचा अविभाज्य भाग बनली आहेत. पुण्याच्या ‘प्रसाद प्रकाशना’ने (आता ‘कॉन्टिनेन्टल’) ‘सार्थ ज्ञानेश्वरी’चे अंतरंग अतिशय श्रद्धेने घडवले आहे. प्रत्येक अध्यायात एका सुरेख रंगीत चित्राचा समावेश आहे. ते त्या अध्यायातील एखाद्या ‘ओवी’च्या साधर्म्याने काढले आहे. याची पहिली आवृत्ती १९५३ मध्ये प्रकाशित करण्यात आली.
दांडेकरांनी या पुस्तकाला अभ्यासपूर्ण प्रस्तावना जोडली आहे. त्यातून आपली संपादकीय व तत्त्वज्ञानविषयक भूमिका मांडली आहे. यात श्री ज्ञानेश्वर महाराजांचे संक्षिप्त चरित्र, विवाद्य स्थळे, वेगवेगळ्या प्रती व त्यामागील मत-मतांतरे, नाथसंप्रदाय, संत ज्ञानेश्वरांची गीतेकडे पाहण्याची दृष्टी, ‘कर्म’, ‘भक्ती’ वा ‘ज्ञान’ -योग ही भूमिका, तसेच आत्मसाक्षात्कार यासंबंधी विस्तृत विवेचन आहे, ही प्रस्तावनाच १४५ पृष्ठांची आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
१९७५मध्ये ‘मोगरा फुलला’ ही गो. नी. दांडेकरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरांवरील उत्कृष्ट चरित्रात्मक कादंबरी आली. जरी भाषेच्या बाबतीत प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीला वाट पुसत ती लिहिली असली तरी, प्रसंगसाधर्म्य मात्र ‘सार्थ ज्ञानेश्वरी’त आलेल्या ज्ञानदेवांच्या चरित्राशी आहे. या नितळ चरित्राचे वाचन ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या अभ्यासकांना अपरिहार्य म्हटले पाहिजे, किंबहुना ते पहिली पायरीच ठरावे असे आहे. कार्याचा अभ्यास करताना कर्त्याचे चरित्र समजून घेणे आवश्यक आहे. यातून ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ मुळातून वाचण्याची ओढ निर्माण होते.
ज्यांना पद्याची किंवा भक्तिरसप्रधान कीर्तनाची आवड आहे, त्यांनी ‘श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र’, हे संतकवी श्री दासगणू महाराजांनी लिहिलेले कीर्तनोपयोगी आख्यान अभ्यासावे, म्हणजे भक्तीरसाचा परिपोष घडवत कसे संतांचे चरित्र गायचे असते, याची अनुभूती येते.
मराठी भाषेला ललामभूत असा ‘श्री ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ वाङ्मयाच्या अभ्यासकांसाठी ‘पाठ’ (धडा या अर्थी) म्हणून आणि भाविकांसाठी ‘पाठ’ (पारायण या अर्थी) मान्यता पावलेला आहे. त्याचे केलेले हे साक्षेपी संपादन ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ संग्रही असावे असेच साधले आहे.
ग्रंथात १८ अध्यायांची मांडणी अभ्यासकाच्या सोयीने केली आहे. प्रत्येक अध्यायात एक ओवी निवडून त्यावर सुंदर तैलचित्र काढले आहे. आरंभी गद्यरूपांत अध्यायाचा सारांश दिला आहे. डाव्या बाजूस गीतेतील श्लोक आणि त्याखाली ज्ञानेश्वरांनी ओवीरूपात केलेली टीका आणि उजव्या पृष्ठावर नेमक्या तेवढ्याच ओव्यांचा गद्यरूपी संक्षिप्त अनुवाद. या अनुवादाचा आधार घेत-घेत ओवीरूपातील ज्ञानेश्वरी समजून घेण्यास मदत होते.
अभ्यास करताना ज्या विशेष वाटल्या अशा काही ओव्या पुढे दिल्या आहेत. त्या पुस्तकात १-१८ अध्यायात क्रमाने येतात. एखाद्या वाचकाला त्याला भावलेली एखादी ओवी यात न सापडण्याचा संभव आहे. ९००० ओव्यांतून निवडलेले हे ‘नवनीत’ मात्र आहे. यातील काही ओव्यांची गीतं झाली आहेत. त्यामुळे आपल्याला हवे ते मूल्य शोधात गेल्यास ते ज्ञानेश्वरीत सापडते. चंद्रशेखर आठवले यांनी ‘ज्ञानेश्वरीतील विज्ञानदर्शन’ शोधले आहे. तत्सम काही अभ्यासक, संशोधक आपल्या इच्छेप्रमाणे शोधू जातील तर नवी रत्नं मिळत जातील, असा हा ग्रंथराज आहे. त्याचे नावीन्य ७३० वर्षांनंतरही उणावत नाही, हे त्याचे खरे मूल्य.
श्री गणेशाय नमः ॐ नमोजी आद्या...उपरि दशोपनिषदें...अकार चरणयुगुल...जैसे शारदियेचे चंद्रकळे...तरी न्यून ते पुरते...म्हणोनि स्वधर्मानुष्ठान...जगीं कीर्ति रुढवी...अगा स्वधर्मु हा आपुला...मग संवादसुख भोगावे गीताख्य हे...सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी...एऱ्हवीं तरी पाही...चाऱ्ही आहेती हे वर्ण सृजिले म्यां गुण-कर्मभागें...जैसें न चलता सूर्याचें चालणें...जयां ऐहिक धड नाहीं...एक ज्ञान हें उत्तम होये...कीजे आठां रसांची ओवाळणी...म्हणोनि सर्वत्र सदा सम...माझा मराठाचि बोलु कौतुकें...बोलीं अरुपाचे रूप दावीन...जिये मार्गीचा कापडी महेशु अझुनी...हा मार्गु जैं देखिजे तैं तहान भूक विसरिजे...तया अनाहताचेनि मेघें...जें उन्मनियेचें लावण्य...जे आकाराचा प्रान्तु...जें विश्वाचे मूळ...जें महाभूतांचे बीज...तैसें म्यां जग धरिलें सबाह्याभ्यंतरीं...तें मी गा विश्वबीज...तें स्वरूप माझें...तो मी म्हणे आत्मारामु...देखिला अक्षरांचा मेळावा...बोलिजेल नीट मऱ्हाटी...तो अधियज्ञु मी...जें परमाणुहूनि सानें...हें एकाक्षर ब्रह्म...तैसें अनेकत्व जेथ सामावलें तें साम्य म्हणिपे...जैसा न चलवितेनि रवी लोकु चाले...तयां आस्तिकांचा आश्रमु...जें निगर्वाचें गौरव...जें अचिंतां अनाथांचे मायपोट...जो जिवाचा जिव्हाळा...बाळक बापाचिये ताटीं...तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे...म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नोहे श्रोतेनविण...परि आमुचिये जीवींचे पडो तुझां जीवीं...तुज ज्ञान विज्ञान तैसें वांटूनि देऊं...तैसा हृदयामध्यें मी रामु...तैसें अमूर्तमुर्ति मियां विस्तारलें...मी ये परीचा भूतभावनु परि सर्व भूतांसि अभिन्नु...तैसें प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयीं...जैशी रायें अधिष्ठिली प्रजा...मी स्वानंदाभिरामु...तयावरी जैत रे जैत...स्वाहा मी स्वधा...म्हणोनि ऋग्यजु:सामु हे तीन्ही म्हणें मी आत्मारामु...म्यां बोलविल्या वेदू बोले...जेथ अमरत्व हेंचि सिंहासन...जियें गांवी खिल्लारें कामधेनूंची...सैंघ चिंतामणीचिया भूमिका...लोकपाळरांगेचे राउत जिये पदींचे...आणि दिधलियाचा निर्वाहो तोही मीचि करीं...हा योगक्षेमु आघवा...ते शरीर जातियेक्षणीं देवचि जाले...जैं जगा धाकुटें होइजे तैं जवळीक माझी...आम्ही भावाचे पाहुणे...तरि तो सर्वभूतीं सदा सरिसा...परि मजसीं तुकितां तुका तुटी नाही... म्हणोनि कुळ जाति वर्ण हें आघवेंचि गा अकारण...अव्यंग निजधाम माझें...ऐसे सांवळेनि परब्रह्में...अर्जुना दावील सिद्धांचा रावो...तैं नवरसदीपांचा थावो लाभे... जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी...सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो...ते विदग्धा रसवृत्ती...तरि ओंविया होती लेणे साहित्यासी...मग रचिलें अगण्य गीतातत्व...जें अक्षरें लेऊनि परब्रह्म...एथ वेद मुके जाहाले...अहिंसा आणि समता हे मम रूपची पांडुसुता...जें जें भेटे भूत तें तें मानिजे भगवंत...तूं जीवकळेची अधिष्ठात्री...मी आत्मा असें एकैका भूतमात्राचां ठायीं...सर्वभूतांकुरे बीज विरुढत असे तें मी...जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया असती ठाया ते ते जाण धनंजया विभूति माझी...जिये प्रभेचिये झळाळा...जाहलासि विश्वरूपा विश्वेशा...देवा तू अक्षर... जें आकाराचे आयतन...तू धर्माचा वोलावा...तूं आदिमध्यांतरहितु...त्रिभुवनाचया आद्या...जी श्रुतीचिया लोचना स्वरूपसुख तूं अभिन्ना...तूं योगियांचे समाधिसुख...हें ज्ञानतेजाचें निखळ विश्वात्मक केवळ...मऱ्हाठिचेयां नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं...अभिमानु न संडी स्वजातीचा...त्यागास्तव आंगवे शांति सगळी...उत्तमातें धरिजे अधम तरि अव्हेरिजे...तो वल्लभा मी कांतु ऐसे पढिये...आणि जयपरौतेकांही नाही...तैंसा जो सकळिकां भूतां समु...हें विश्वचि माझें घर...तेचि रसाळ कथा मऱ्हाठिया प्रतिपथा...कां भूमीचें मार्दव सांगे कोंभाचे लवलव...हे अनाक्रोश क्षमा...वारियाची धांव तैसे सरळ भाव...अमृताची धार तैसें उजू अंतर...गुरूस्नेहाचिये वृष्टी...गुरु क्षेत्र गुरु देवता...म्हणोनि अंतरी ज्ञान व्हावें मग बाह्य लाभेल स्वभावें...तया नांव शुचित्वपण...जायची आज्ञा आपण शिरीं वाहे अंतःकरण मनुष्याकारें जाण ज्ञानचि तो...जरि ज्ञानाचेनि प्रकाशे...तंव सर्वज्ञांचा रावो...जेथ नाहीं रिगावा द्वैतभावासी...कार्यकर्तृत्वकारणा प्रकृति मूळ हे राणा...गगनभरी धारा...तैसा वाग्विलास विस्तारुं गीतार्थे विश्व भरुं...दिसो परतत्व डोळां पाहो सुखाचा सोहळा...लेववीन सुलक्षणें विवेकाची...जैसा वन्ही काष्ठी भरे...तया अक्षराआंतील भावो पाववीन मी तुमचा ठावो...सूर्यें अधिष्ठिली प्राची...तेवीं अज्ञानमूळ यया ज्ञानची खङग...तैसा सज्ञानांसी मी सुख दुःख तो अज्ञानासी... विश्रांतीचाही विश्रामु ...उपनिषदां सौरभ्य कमळदळां जेवीं...हें शब्दब्रह्माचें मथितें...जे ज्ञानामृताची जान्हवी...तैसें घडतें प्रमेय घेइजे उणें ते मज देइजे...तैसे संत माहेर माझें...मावळतीत विश्वाभासु...जो प्रकाश्येवीण सुरवाडु प्रकाशाचा...कैवल्यमार्गीचा अभिज्ञु सांगाती हा...पैं अहितापासूनि काढिती...नाहीं श्रुतीपरौती माउली जगा...तरी सर्वविषयीं वितृष्णु...अद्वितीय गूढु आनंदघनु...आचाराचें मूळपीठ वेदांची उतारपेठ... एवं ॐतत्सदाकारु... हा न पुसता हे गोंठी... तैसेंचि एथही आहे, जे एकेंचि येणें अध्यायें, आघवाचि दृष्ट होये, गीतासमु हा... मी कळसु याचि कारणें अठरावा अध्यायो म्हणें ...अठरावा अध्यावो नोहे, हे एकाध्यायी गीताचि आहे... भक्त जैसेनि जेथ पाहे... वाचे बरवें कवित्व, कवित्वीं बरवें रसिकत्व... तैसें मानवाच्यादेहांचे... आइका सूर्याचिया प्रकाशा... नाना वाग्देवता वानावी... जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय, हें जगाचें बीजत्रय... तरी शब्द स्पर्शु रूप गंध रसु... आणि अपेयाचेनि पानें... तो नवगुणरत्नाकरू... आदित्याचीं झाडें, सदा सन्मुख सूर्याकडे... पैं आपुलेंचि रत्न थितें... तया सर्वात्मका ईश्वरा... अगा आपुला हा स्वधर्मु... आणि स्वधर्मुचि पाळावा, परधर्मु तो गाळावा ...आणि ज्ञाना ऐसें जिव्हार... घडतां महोदधीसी... तैसा आत्मबोधीं उद्यमु... उदया येतां गभस्ती... येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी... तें अज्ञान आतां फिटलें... चेइलिया स्वप्न नाशे... जाणे अजु मी अजरु... अचळु मी अच्युतु...ईश्य मी ईश्वरु... स्वामी मी सदोदितु ...नवा मी पुराणु... अक्रियु मी येकु... अशब्दु मी अश्रोत्रु... कीं क्रमयोगप्रसादाचा...तैसा आत्मदर्शनीं आडळु... तया अध्यात्मशास्त्रांसी... भानुभूषिता प्राचिया... चंदु तेथें चंद्रिका, शंभु तेथें अंबिका... विजयी नामें अर्जुन विख्यातु, विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु, श्रियेसीं विजय निश्चितु, तेथेंचि असे... तोचि गा विजयासि ठावो...म्हणौनि जेथ श्री श्रीमंतु... जेथ तो श्रीवल्लभु... जी आपुलेनि अवकाशें... राजहंसाचें चालणें... यालागीं आम्हां प्राकृतां, देशिकारें बंधें गीता... तैसा व्यासाचा मागोवा घेतु, भाष्यकारांते वाट पुसतु... आतां विश्वात्मकें देवें...येणें वरें ज्ञानदेवो सुखिया झाला...केले ज्ञानदेवें गीते देशीकार लेणें...
‘श्रीज्ञानेश्वरी’च्या निर्मितीला या वर्षी ७३० वर्षे पूर्ण होतात. या अनुभव ग्रंथातील ओवीच्या अस्सलतेची ओळख ती स्वतःच देते. ‘ज्ञानदेवांची ही ओवी’ अशा अर्थाने आजकाल सोशल मीडियावर येणाऱ्या रचना मूळ ज्ञानेश्वरीतील आहेत का, हे पाहण्याची कसोटी म्हणजे- एक तर त्यात शब्दार्थापेक्षा अधिक आध्यात्मिक लक्षणार्थ दडला असला पाहिजे, पहिल्या तीन चरणांचे यमक जुळले पाहिजे, तर तीवर विचार तरी करावा. संत एकनाथांनी ज्ञानदेवांच्या नावावर स्वतःची ओवी खपवणाऱ्या लोकांना आधीच इशारा देऊन ठेवला आहे- ‘ज्ञानेश्वरीपाठीं । जो ओंवी करील मऱ्हाठी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेविली॥'
ज्ञानेश्वरांच्या वाणीचे वैशिट्य हे की, त्यांनी ती सामान्य-सुलभ केली, गीतामृत लोकांपर्यंत पोचवले, आणि ते शब्दज्ञान नव्हते, अनुभवज्ञान होते. आज आपल्याला शब्दकोश हाताशी असला तरी अनुभव नसल्यामुळे त्याची रसनिष्पत्ती होत नाही, म्हणून या मार्गावरचे जे अनुभवसंपन्न भाष्यकार आहेत, त्यांच्या भाष्याचा आश्रय घ्यावा लागतो. ज्ञानेश्वरीतील निरूपण आज कळायला अवघड जाते. एकेका ओवीचे सौंदर्य ग्रहण करण्यासाठी ती उलगडावी लागते. हा साधकाच्या आणि अभ्यासकाच्या दृष्टीने प्रवासच आहे. ज्याला याची गोडी आहे त्याला हा रस चाखता येतो. म्हणून आज ही एवढ्या शतकांनंतर ‘ज्ञानेश्वरी’चे वाचक, अभ्यासक, टीकाकार भेटतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘सार्थ ज्ञानेश्वरी’ने एकेका ओवीचा अर्थ मराठीत उलगडून त्यांची सोय केली आहे. त्यापुढील प्रयत्न आपणच करायचे आहेत. एक मात्र खरे ‘श्री ज्ञानेश्वरी’च्या कमीत कमी भाषा सौंदर्याची ज्याने गोडी चाखली नाही, त्याने तरी मराठी आपली मातृभाषा असून आपण हे करू शकलो नाही, तर काही ‘न्यून’ राहिले, हे मोकळेपणाने मान्य करावे, साहित्यिक म्हणवणाऱ्यांनी तर अवश्य करावे.
शिवाय ज्ञानेश्वरीत आलेल्या वचनांमागची पृष्ठभूमी स्पष्ट करणारी ‘पौराणिक कथानके’ येथे थोडक्यात सांगितली आहेत. गीता श्लोकांची आणि ओव्यांची ‘वर्णानुक्रमणिका’ दिली आहे. अभ्यासकाला एखादा श्लोक किंवा ओवी कोणत्या पृष्ठावर आहे, हे शोधण्यास याचा निश्चित उपयोग होतो. शिवाय ‘कठीण शब्दांचा कोश’ ही आहेच. मराठी अभिजात भाषा आहेच, यातील जुन्या ग्रंथांचे अभ्यासू विद्वानांनी श्रीमंत संपादन करून ठेवले आहे, याच आवलीतील ‘सार्थ-ज्ञानेश्वरी’ हा एक अनुभवसंपन्न ग्रंथराज!
मूळ गीतेत १८ अध्याय, त्यात ७०० संस्कृत श्लोक, त्यावर ९००० ओव्यांचे संत ज्ञानेश्वरांचे भाष्य आणि ९ ओव्यांतील त्याचा अर्क म्हणजे ‘पसायदान’. प्रा राम शेवाळकरांनी ‘पसायदाना’वर फार सुरेख विवेचन केले आहे.
या सर्व गीतार्थाचे अंतरंगी प्रकटलेले भाष्य गद्यरूपात दांडेकरांनी घडवले आहे आणि पद्यरूपात ब्रह्मलीन स्वामी वरदानंद भारतींनी (पूर्वाश्रमीचे प्रा. अनंत दामोदर आठवले). स्वामीजींचा पद्यरूपी उद्गार ‘अनुवाद ज्ञानेश्वरी’ या नावेने ‘श्री राधा दामोदर प्रतिष्ठान, पुणे’ यांनी १९७०मध्ये प्रसिद्ध केला. याचीही पृष्ठसंख्या साधारणतः १००० आहे आणि यास ह. भ. प. धुंडा महाराज देगलूरकरांची व्यासंगी प्रस्तावना आहे.
या दोन्ही ग्रंथांच्या अभ्यासानंतर आपले मराठी भाषेचे आकलन अजून परिपक्व व्हायचे आहे, याची जाणीव होते. ज्ञानेश्वरीतील शब्दांचा वाच्यार्थ प्रयासाने कळला तरी एखाद्या दृष्टांताच्या मागचा लक्षणार्थ कळतोच असे नाही; तिथे अध्यात्म मार्गावरील वाटाड्या (गुरु) शोधावा लागतो, मग गोडवा आणि जिज्ञासा जागृत होते. त्यातून मग ‘गीतारहस्य’ हा लो. टिळकांनी लिहिलेला ६०० पृष्ठांचा जागतिक तत्त्वज्ञानाच्या परिशीलनातून घडलेला ‘कर्मयोग’ हातात घेण्याची इच्छा बळावते आणि अशा मराठी वाचकाला साध्या भाषेत गीता समजावण्यासाठी आचार्य विनोबा भावेंची ठळक अक्षरांतील १०० पृष्ठांची ‘गीताई’ माऊली होऊन येते.
मराठीत एवढे समृद्ध साहित्य असताना आपण या चारपैकी एक तरी ग्रंथ वेळ काढून वाचावा, म्हणजे ‘माणसाचे जीवन समृद्ध व्हावे’. म्हणजे भारतीय संस्कृतीत किती मूलभूत विचार झाला आहे, याचा प्रत्यय येईल.
..................................................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment