अजूनकाही
‘द सोशल डिलेमा’ हा जेफ ओर्लोवस्की यांनी दिग्दर्शित केलेला डॉक्युमेंटरी-ड्रामा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियाचा वाढत चाललेला प्रभाव आणि त्यातून होत असलेली समाजाची हानी, हा मुख्य विषय घेऊन हा डॉक्युमेंटरी-ड्रामा बनवला गेला आहे. यामध्ये सोशल मीडियाच्या वास्तवासंबंधी ज्येष्ठ तज्ज्ञांच्या मुलाखती आणि कथा या दोन्ही गोष्टी समांतर चालतात. मुख्य मुलाखतीमध्ये ‘गुगल’ कंपनीचे माजी डिझाईन नीतिशास्त्रज्ञ आणि ‘सेंटर फॉर ह्युमन टेक्नोलॉजी’चे संस्थापक ट्रिस्टन हॅरीस आणि त्यांचे सहकारी अझा रस्किन, तसेच ‘फेसबुक’चे लाईक बटन निर्माते जस्टीन रोसिस्टीन, हार्वर्डच्या प्राध्यापिका शोशाना झोबॉफ, ‘पिंटरेस्ट’चे माजी अध्यक्ष टीम केंडाल इ. व्यक्तींचा समावेश आहे.
सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होत असलेल्या समस्या यांमुळे संपूर्ण जग सध्या चिंतेच्या वातावरणात आहे. तरुणांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन वाढत चालले आहे. मानसिक आजार, तसेच आत्महत्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. युवकांचे आयुष्य एका मोबाईल फोनमध्ये कैद झाले आहे.
या डॉक्युमेंटरी-ड्रामामध्ये सोशल मीडियापूर्वीची अमेरिकेतील युवकांची मानसिक परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यावरील संशोधन दिलं आहे. सोशल मीडियाच्या आगमनानंतर अमेरिकेत युवकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले असे आढळले आहे. तसेच मोबाईलमुळे मुले एकलकोंडी बनली आहेत. ती कोणत्याही नवीन गोष्टी करण्याचे धाडस गमावत चालली आहेत. याचे विश्लेषण म्हणून अमेरिकेत ड्रायव्हिंग लायसेन्सची नोंदणी युवकांमध्ये तुलनेने कमी होत चालली आहे, असे या संशोधनात आढळून आले आहे. एकूणच युवकांच्या आयुष्याला सोशल मीडियाचा विळखा बसला आहे, हे या डॉक्युमेंटरी-ड्रामातून योग्य पद्धतीने सांगितले आहे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘c u soon’ : ‘रिअल लाइफ’मधल्या तरुणांचं ‘व्हर्च्युअल’ दर्शन घडवणारा उत्कृष्ट मल्याळम सिनेमा
..................................................................................................................................................................
आपण सोशल मीडियाचा वापर करत असतो, तेव्हा आपल्या संपूर्ण हालचालींचा तंतोतंत अभ्यास करणारे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हे तंत्र काम करत असते. त्याचा आढावा घेऊन संबंध युजर्सच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन जाहिरातींचा मारा करून त्यांना एक प्रॉडक्ट म्हणून वापर करण्याचा भांडवली खेळ सुरू असतो. इंटरनेट वापरकर्ता हा एका महाकाय भांडवलदारी व्यवस्थेत विनला गेला आहे, असे लक्षात येते. जिथे त्याला ‘यूजर’ म्हणून संबोधले जाते.
या डॉक्यु-ड्रामामध्ये एक अवतरण आहे. त्यामध्ये सांगितले आहे की, एखाद्या व्यक्तीला ‘यूजर’ म्हणणारे केवळ दोनच व्यवसाय या जगात आहेत आणि ते म्हणजे ‘ड्रग्स व्यवसाय’ आणि ‘सॉफ्टवेअर’.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, अल्गोरिदम हे केवळ युजर्सच्या इंटरनेटवरील डाटाचा लेखाजोखा ठेवून जाहिरातीचा मारा करणारे तंत्र म्हणून दिसत असले तरी ते त्याहूनही भयंकर असे एक शस्त्र आहे, जे आपले व्यक्तिमत्त्व, आपले विचार यांमध्येही परिवर्तन शकते. तसेच एकाच गोष्टीची सत्यता विसंगत पद्धतीनेसुद्धा दाखवण्याची व्यवस्था त्यामध्ये आहे. याचे उदाहरण देताना सांगितले आहे की, हवामान बदलाच्या बाबतीत गुगल प्रत्येक देशात वेगवेगळे सर्च देतो. ठिकाण बदलले, ‘यूजर’ बदलला की, एक वेगळेच विश्व भासवण्याची ताकद त्यांच्यात आहे. फेसबुकवर मित्र सारखे असले तरी प्रत्येकाला वेगळा कंटेंट पाहावयास मिळतो, जो तुमचा स्वभाव लक्षात घेऊन डिझाइन केलेला असतो.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : लोकशाहीला नवा धोका सोशल मीडियाचा?
..................................................................................................................................................................
अमेरिकेतील निवडणूक, युरोपमधील निवडणुका, तसेच आपल्या भारतातील २०१४ची निवडणूक यांमधील सोशल मीडियाचा हस्तक्षेप आता लपून राहिलेला नाही. त्या हस्तक्षेपात दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. निवडणुकीत सोशल मीडियाद्वारे युवकांच्या विचारात बदल करून त्यांचा वापर करणे जगभर सुरू आहे. रशियाने याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीदरम्यान हडबडी केली होती, असे निदर्शनास आले आहे. या नवीन तंत्रांमार्फत फेक न्यूज, हिंसक व्हिडिओ, अफवा अशा अनेक गोष्टींचा वापर करून समाजापुढे राजकीय फायद्यासाठी एक ‘भ्रामक वास्तव’ निर्माण करून मतदारांना सहज कोणत्याही बाजूस फिरण्याची यंत्रणा निर्माण केली जात आहे. त्यांचे ध्रुवीकरण करण्यात येते आहे. अनेक देशात सोशल मीडियाच्या प्रचारामुळे हिंसक वळणे लागली आहेत. सोशल मीडियाद्वारे सत्य विपरीत करून त्यातून निर्माण केले जात असलेले भ्रामक वास्तव, हे आजच्या काळातील भयानक वास्तव बनले आहे.
ट्रिस्टन हॅरीस जगभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून राजकीय षडयंत्रे कशी रचली जातात, हे सांगताना म्हणतात की, “पृथ्वी सपाट आहे यावर विश्वास ठेवणारी १०० माणसे फेअबुवर मिळाली की, फेसबुकला अशी अजून १००० माणसे शोधून देण्याची मागणी करायची’’ अशा प्रकारे षडयंत्र रचत जायचे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची समाजात बदल निर्माण करण्याची ताकद लक्षात घेऊन वेगवेगळ्या देशांतील लोकशाही विरोधी पक्ष त्याचा वापर सांस्कृतिक आणि राजकीय ढाचा बदलण्यासाठी करताना दिसत आहेत. धर्म, वंश इत्यादीच्या आधारावर द्वेष पसरवणे, लोकशाहीबद्दल अनादर निर्माण करणे, अनागोंदी निर्माण करणे, समाजातल्या मुख्य प्रश्नांना बाजूला सारून केवळ राजकीय प्रपोगंडा चालवणे, केवळ राजकीय विषयांवर लोकांची भूमिका निर्माण करणे, अशा गोष्टींमुळे लोकशाहीविरोधी राजकीय पक्ष जगभरात बळकट होताना दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात लोकशाही व्यवस्था अडचणीत येण्यामागची कारणमीमांसा केली जाईल, तेव्हा सोशल मीडिया आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हीच बहुधा प्रमुख कारणे ठरतील.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सोशल मीडिया पूर्वी हिंसा नव्हता का? प्रपोगंडा निर्माण करणारी व्यवस्था नव्हता का? अफवा पसरवणारा, खोट्या बातम्या पसरवणारी यंत्रणा नव्हता का? तर निश्चित होता, पण त्याचा वेग कमी होता. आज मात्र तो वेग कैकपटीने वाढला आहे. या आधी हे प्रकार तात्पुरत्या स्वरूपाचे असत. आता या नवीन तंत्रांच्या आधारे भांडवली शक्ती मानवी स्वभाव बदलण्याच्या मार्गावर आहेत. एकंदर मानवी संस्कृतीचेच विद्रूपीकरण करण्याची क्षमता या तंत्रज्ञानात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जगभरातील कोणतीही नागरी व्यवस्था कोणत्याही वळणावर भयानक, हिंस्र रूप धारण करू शकते आणि ‘सिव्हिल वॉर’सारख्या घटना घडू शकतात, अशी काळजी काही ज्येष्ठ तंत्रज्ञांनी या डॉक्युमेंटरी-ड्रामामध्ये व्यक्त केली आहे. एव्हाना अशा घटना घडतदेखील आहेत, याचेही पुरावेही दिले आहेत.
‘सेन्टर फॉर ह्युमन टेक्नॉलॉजी’सारख्या NGOच्या माध्यमातून ट्रिस्टन हॅरीस यांनी एक मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या मते भांडवली लोकांवर नियंत्रण करणारी शासकीय व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, जेणेकरून ‘युजर्स’ना ‘ह्युमन’ म्हणून दर्जा मिळेल. मानवी हितासाठी तंत्रज्ञान वापरले जाईल. एकूणच समाजासाठी सकारात्मक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
सोशल मीडिया आपल्या आयुष्यात किती हावी झाला आहे आणि त्याचे किती गंभीर परिणाम होताहेत, याची जाणीव करून देणारा, डोळे उघडणारा हा डॉक्युमेंटरी-ड्रामा आहे.
..................................................................................................................................................................
लेखक सुरेंद्रनाथ बाबर शिवाजी विद्यापीठाच्या (कोल्हापूर) समाजशास्त्र विभागात संशोधक विद्यार्थी आहेत.
advbaabar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment