सत्यजित रे यांचा जन्म २ मे १९२१ रोजी झाला. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. या निमित्तानं सत्यजित रे यांच्या मनात समांतर चित्रपट बनवण्यासाठी तिसऱ्या नेत्राला तिसरी नजर प्राप्त होण्याचं गौडबंगाल जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालय, पुणे यांच्या ‘जागतिक सिनेमा आणूया मराठीत’ या उपक्रमाच्या मिनी चित्रपट महोत्सव १२, १३ आणि १४ सप्टेंबर २०२०, ‘अपू त्रिदल’ या निमित्ताने लिहिलेला लेख शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाच्या सौजन्याने…
..................................................................................................................................................................
कलाकृतींची निर्मिती आणि तिचा रसास्वाद या प्रक्रियांच्या मुळांशी संवेदनशील माणूस आहे. माणसाला व्यक्त व्हायचं असतं आणि दुसऱ्याचं व्यक्त होणं आपलंसंदेखील करायचं असतं. त्यासाठी स्वतःचं अनुभवसंचित पणाला लावायची त्याची तयारी असते. त्यातून स्वतः समृद्ध व्हायचं असतं. हे माणसाखेरीज इतर कोणत्याही प्राण्यांना जमत नाही. परिणामी, कलाकृती आणि माणूस या दोहोंचं नातं मानवाइतकंच पुरातन आहे. याची प्रचीती पार नियांडरथल मानवप्राण्यापासून ते अगदी आजच्या आधुनिक मानवापर्यंत आणि पार गुंफा चित्रांपासून ते नुकतेच शतक पूर्ण केलेल्या चित्रपट क्षेत्रापर्यंतच्या कलाकृती देतील. सोबतच्या चौकटीतील उजवीकडील गव्याच्या आधुनिक स्केचचा संदर्भ सत्यजित रे यांच्या शेवटच्या ‘अगांतुक’ या अफलातून चित्रपटात येतो. केवळ त्यासाठी तरी तो चित्रपट आवर्जून पाहावा आणि या गूढतेच्या वलयातील मामाच्या पत्रानं अनिलाच्या सुखवस्तू घरात उडवलेला गोंधळ अनुभवावा (एक अति गंभीर सूचना : त्यातून प्रेरणा घेऊन कुणी आत्मपरीक्षण केलं आणि स्वतःच्या सुखवस्तू घरातील शांती बिघडवली, तर त्यासाठी जबाबदार केवळ स्वतः ती आणि तीच व्यक्ती राहील!).
डावीकडं स्पेनमधील आल्टमिरा गुंफेच्या छतावरील ‘गवा’ अथवा ‘जंगली बैल ’ हे मूळ चित्र आणि उजवीकडं त्यावरून काढलेलं भीतीदायक चाल करून येणाऱ्या गव्याचं आधुनिक स्केच
सत्यजित रे यांचा जन्म २ मे १९२१ रोजी झाला. हे वर्ष त्यांचं जन्मशताब्दी वर्ष. या निमित्तानं सत्यजित रे यांच्या मनात समांतर चित्रपट बनवण्यासाठी तिसऱ्या नेत्राला तिसरी नजर प्राप्त होण्याचं गौडबंगाल जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
गद्य-पद्य साहित्य, नाट्य, वाद्यसंगीत, गायन, नृत्य, चित्रकला, शिल्प, रचना-शिल्प अशा अनेक कलांच्या विकासानंतर त्यांचा योग्य मेळ घालत चित्रपट हा कलाप्रकार अवतरला. अनेक क्षेत्रांतील तांत्रिक प्रगती आणि कलावंतांच्या माध्यमांच्या मागण्या यांचा मेळ घालत आजचं चित्रपट तंत्रज्ञान विकसित झालं आहे. फ्रान्समधील ल्युमिअर (Lumiere) बंधूंनी बनवलेल्या १० चलत चित्रफिती १८९५ सालातील २८ डिसेंबर रोजी तिकिटं लावून दाखवल्या, तो दिवस चित्रपट माध्यमाचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा होतो. मूकपट, बोलपट, कृष्ण-धवल ते रंगीत चित्रपट, चित्रीकरणाची विविध तंत्रं, वाढत्या क्षमतांचे कॅमेरे, प्रकाशयोजनेसाठी विशेष दिवे आणि पूरक तंत्रं, पार्श्वगायन, हे चित्रपट विकासाचे काही टप्पे... अशा अंगांनी चित्रपटतंत्रांचा विकास होत आला आहे. परंतु अजून विकास पूर्ण व्हायचा आहे, म्हणून चित्रपट निर्मिती कधीच थांबली नाही. उलट, या काळात कलावंतांनी पौराणिक चित्रपटांसोबत सामाजिक, राजकीय, राष्ट्रभक्तीपर, कौटुंबिक, मसाला, रहस्यात्मक... असे चित्रपटांचे अनेक प्रकार (Genre) हाताळले. या लाटेत व्यावसायिक चित्रपटांना समांतर अशा कलात्मक चित्रपटांचीही निर्मिती झाली. या समांतर लाटेतील सत्यजित रे हे एक प्रमुख दिग्दर्शक. त्यांच्या चित्रपटांमुळे जगातील अनेक देशांना भारतीय चित्रपटांची आवर्जून दखल घ्यावीशी वाटली. त्यांची १९३५ ते १९७० दरम्यानची चित्रपट कारकीर्द या काळाला भारतीय चित्रपटाचं ‘सुवर्णयुग’ मानलं जाऊ लागण्यास काही अंशी तरी नक्कीच कारणीभूत होती.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
कलकत्त्यातील रायचौधुरी, हे आडनाव बंगालमध्ये श्रीमंत अभिजन (बंगालीत भद्रलोक) म्हणून प्रसिद्ध आहे. अशा एका रायचौधुरी कुटुंबात सत्यजित रे यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा, उपेंद्रकिशोर रायचौधुरी (राय) हे नावाजलेले बंगाली लेखक, चित्रकार, व्हायोलीन वादक आणि संगीतकार होते. त्यांनी कलकत्यामध्ये अगदी अद्ययावत प्रिंटिंग प्रेस सुरू केला. तिथूनच उपेन्द्रकीशोरजी ‘संदेश’ नावाचं लहान मुलांचं मासिक चालवत होते. आजोबांचा मोठा मुलगा सुकुमार रे (हा रायचौधुरी, राय आणि रे असा या आडनावाचा तिसरा टप्पा आहे) हे आपल्या सत्यजित रे यांचे वडील. त्यांनी विलायतेला जाऊन प्रिंटिंग तंत्राचा अभ्यास केला. ते उत्तम ब्लॉकमेकर होते आणि त्यांनी अखेरपर्यंत कुटुंबाचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सांभाळला. ते स्वतः नावाजलेले कवी-लेखक, व्यंगचित्रकार आणि उत्तम इल्सस्ट्रेटर होते. ते ‘संदेश’ या लहान मुलांच्या मासिकासाठी अनेक कथा-कविता लिहीत आणि भरपूर चित्रंही काढत.
या रायचौधुरी कुटुंबानं १८८० या वर्षी ‘ब्रम्हो समाजा’ची विचारसरणी स्वीकारली. साहजिकच हे पुरोगामी वातावरण पुढील पिढ्यांत प्रवाहित होत राहिलं. अशा या कुटुंबाच्या पुरोगामी वातावरणाचा वारसा सत्यजित रे यांच्या मानसिकतेचा भाग बनणे सहज साध्य होतं. कुटुंबाचा प्रिंटिंगप्रेस ही लहान मुलांच्या कुतूहलाची अनौपचारिक शाळा आणि मोठ्यांच्या शिक्षणाचं विद्यापीठ सहज बनू शकतं. परंतु सत्यजित रे जन्मले त्याच वर्षी सुकुमार रे काला-आजार नावाच्या खतरनाक साथीच्या रोगानं आजारी पडले. त्यात त्यांचा १९२३ साली मृत्यू झाला. सत्यजित तीन वर्षांचे असताना कौटुंबिक प्रेसची मालकी बदलली. त्यांच्या आईला मुलासह कुटुंबाचं आलिशान घर सोडून माहेरी यावं लागलं. तिनं सत्यजितला वयाच्या सातव्या वर्षांपर्यंत घरीच शिकवलं आणि आठव्या वर्षी शासकीय शाळेत घातलं. परंतु या मुलाचा ओढा रायचौधुरी कुटुंबाचा सांस्कृतिक वारसा प्रयत्नानं कमावण्याकडं होता. शाळेतील अभ्यासापेक्षा ग्रामोफोनवर पाश्चात्य संगीत ऐकणं, चित्रं काढणं, चित्रपट पाहणं यांत सत्यजितचं मन जास्त रमायचं. आईनं त्याला अडकाठी केली नाही. कलकत्ता हे शहर १९३१ पर्यंत ब्रिटिशांच्या भारतीय वसाहतीची राजधानी होतं. यातही कदाचित सत्यजित रे यांच्या पाश्चात्य-संगीत प्रेमाचं मूळ असू शकेल. पंधराव्या वर्षी सत्यजित मॅट्रिक झाले आणि आईच्या आग्रहाखातर त्यांनी कलकत्त्याच्या प्रसिद्ध प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अर्थशास्त्राचा अभ्यास करत त्यांनी १८व्या वर्षी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘पुढे काय करायचं’, हा त्यांच्या पुढील प्रश्न चुटकीसरशी सुटला नाही. चित्रकलेचं औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी उपजीविकेसाठी चित्रं काढण्याचा व्यवसाय करायचा विषय एकदा आईकडं काढला. तिनं खूप प्रयत्नानं आपल्या पोराचं मन शांतीनिकेतनमध्ये चित्रकलेचं औपचारिक शिक्षण घेण्यासाठी वळवलं. सत्यजितनं कुरकुरतच शांतीनिकेतनमधील ‘विश्व-भारती’ या टागोरांच्या संस्थेत प्रवेश घेतला.
तिथं त्यांच्या आयुष्यात जादू झाल्याप्रमाणं भारतासह देशोदेशींच्या चित्रकला-प्रवाहांशी त्यांची दाट मैत्री झाली. भारतीय चित्रकलेतील एखादी विशाल गोष्ट सांगण्यासाठी लहान लहान पूरक तपशील भरण्याचं तंत्र त्यांना खूप भावलं.. बिनोद बिहारी मुखर्जी या कलाशिक्षकाच्या चित्रांतून तेच वैशिष्ट्य दिसते. सत्यजित रे यांनी मोठ्या कृतज्ञतेनं या कला-शिक्षणाचं ऋण मान्य केलंय. त्याचं प्रतिबिंब सत्यजित रे यांनी ३० वर्षांनी १९७२ साली आपल्या या शिक्षकाच्या चित्रशैलीवर बनवलेल्या डॉक्युमेंटरीत दिसतं. या तंत्राचा खोल प्रभाव सत्यजित रे यांच्या मनात रुजला होता. तो त्यांच्या चित्रपटांना प्रगल्भ बनवायला पूरक ठरतो. भारतीय चित्रकलेच्या तंत्राप्रमाणं इतर छोट्या-छोट्या तपशीलांच्या माध्यमातून सत्यजित रे एक संवेदनशील दिग्दर्शक घडण्याची प्रक्रिया झाली असावी.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
कलेतील विचार समाजापर्यंत प्रवाहीपणे पोहोचवण्यासाठी सत्यजित रे यांनी चित्रपटाची सारी तंत्रं वापरली आहेत. त्यांच्या तंत्रवापरानं आशयावर कधीच कुरघोडी केलेली नसणं आणि त्यांच्या बहुतेक चित्रपटांची संवादभाषा बंगाली असणं, ही सत्यजित रे यांच्या दिग्दर्शनाची वैशिष्ट्यं आहेत. ती त्यांच्या मनात कशी मुरली हे पाहण्यासाठी सत्यजित रे यांच्या वाढीच्या वयाकडं वळलं पाहिजे.
दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान १९४२ साली जपाननं कलकत्त्यावर बॉम्बहल्ला केला होता. त्यानंतर लगेचच शांतीनिकेतन येथील शिक्षण अपूर्ण सोडून सत्यजित रे कलकत्त्याला परत आले आणि १९४३ साली त्यांनी ब्रिटिश जाहिरात कंपनीत व्हिज्युअलायझरची नौकरी स्वीकारली. ती त्यांनी १३ वर्षे मन लाऊन केली. तिथं त्यांची उपयोजित कलाप्रकारांवर पक्की हुकुमत तयार झाली. दुसरं महायुद्ध संपल्यावर कलकत्त्यात दाखवले जाणारे हॉलिवुडचे अनेक चित्रपट त्यांनी मित्रांसह आवर्जून पहिले. या मित्रांसमवेत त्यांनी १९४७ साली ‘कलकत्ता फिल्म सोसायटी’ नावाची देशातील पहिली फिल्म सोसायटी स्थापन केली. तेथील चर्चांनी त्यांना वृत्तपत्रांसाठी चित्रपट-समीक्षा लिहिण्यास उद्युक्त केलं. यामुळे चित्रपट समीक्षेचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीस बांधला गेला. साधारण १९४९ च्या सुमारास ‘द रिव्हर’ नावाच्या बंगाली चित्रपटाच्या शुटिंगसाठी योग्य लोकेशन शोधण्याच्या मोहिमेवर फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक जीन रेनोयर (Jean Renoir) कलकत्यात आले होते. सत्यजित रे त्यांना भेटले. गप्पांतून सत्यजित यांची फिल्म निर्मितीची दृष्टी, माहिती आणि उत्साह पाहून त्यांनी विचारलं की, ‘चित्रपटबित्रपट बनवायचा विचार आहे का काय?’ त्यावर दिलेलं उत्स्फुर्त उत्तर होतं, ‘‘होय, ‘पाथेर पांचाली’ या कथेवर चित्रपट करायचा विचार आहे.’’ रे यांनी दिलेल्या उत्तराचं त्यांना स्वतःलादेखील नंतर खूप आश्चर्य वाटलं. परंतु रे यांच्या या उत्तरानं त्या कादंबरीवर चित्रपट बनविण्याचं ठरलं ते ठरलंच. ‘पाथेर पांचाली’ हा सत्यजित रे यांचा पहिला चित्रपट. तो १९५५ साली प्रदर्शित झाला. त्याला बंगाल, उरलेला भारत आणि युरोपातून उत्तम प्रतिसाद मिळाला. जागतिक चित्रपट विश्वानं पहिल्यांदा भारतीय चित्रपटाची दखल घेतली. पाथेर पांचालीच्या यशानंतर त्यांनी जाहिरात कंपनीतील नौकरी सोडली आणि पूर्णपणे चित्रपट निर्मितीला वाहून घेतलं.
चित्रपटसंपदा
नंतर त्यांनी ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ हे त्या त्रिदलातील पुढील दोन चित्रपट अनुक्रमे १९५६ आणि १९५९ या वर्षी बनवले. त्यांनी १९५५ ते १९९२ या ३७ वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत फीचर फिल्म आणि डॉक्युमेंटरी मिळून तब्बल ३६ चित्रपट बनवले. गुंफा-चित्राचा उल्लेख केलेला ‘आगंतुक’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट २२ मे १९९१ रोजी प्रदर्शित झाला. पुढच्याच वर्षी सत्यजित रे निवर्तले. त्यांचे अनेक चित्रपट बंगाली साहित्यिकांच्या कलाकृतींवर आधारीत आहेत. काही चित्रपटांच्या दिग्दर्शनासह कथा-पटकथा-संगीत-चित्रीकरण अशी काही अंगे सत्यजित रे यांनी सांभाळली आहेत. एक दोन अपवाद वगळता बाकी सर्व चित्रपटांतील अभिनेते बंगाली आहेत आणि त्यांचे बहुतेक चित्रपट बंगाली संस्कृतीत खोल रुजलेले आहेत. कदाचित त्यामुळेच रे यांचे चित्रपट ग्लोबलदेखील बनले असावेत. त्यांच्या अनेक चित्रपटांना मानाची देशी-विदेशी पारितोषिकं मिळाली. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जागतिक पातळीवरील अनेक मान्यवर सिनेकलावंतांनी आणि समीक्षकांनी या चित्रपटांचं चिकित्सक कौतुक खूप केलं. त्यांनी चित्रपटांसाठी निवडलेल्या कथा सामान्य माणसांच्या असल्यानं त्यांत नायकाला ललकारत पाताळयंत्री खलनायक उभा ठाकत नाही. सत्यजित रे यांच्या चित्रपटांतील प्रत्येक पात्रं हे सुख-दु:ख, आनंद-त्रागा, संघर्ष, मानापमान, मोह, स्वभाववैशिष्ट्यं... यांनी घडलेलं अगदी एकमेव रसायन असतं. प्रत्येक पात्राचे प्रतिसाद काळ्या-पांढऱ्या रंगांच्या दरम्यान असणाऱ्या करड्या रंगांच्या अगणित छटांच्या तपशिलांनी भरलेले असतात. त्यामुळे त्यांची चित्रपटनिर्मिती हळुवार माणूसपणानं ओतप्रोत भरलेली जाणवते. तिथं भावनांचा खेळ जरूर असतो, पण भावविवशतेला थारा नसतो. त्यामुळे खलनायक संपवल्यावर चित्रपटच संपवायची नामुष्की नसते. उलट, पात्रं आणि त्यांची परस्पर नाती यांनी चित्रपटभर विणलेल्या आयुष्यांचे पोत अनुभवून प्रेक्षकाचं मन समृद्ध होण्याच्या वाटेवर चालू लागतं.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : करोना महामारी आणि त्याआडून फैलावले जात असलेले काही विषाणू
..................................................................................................................................................................
त्याशिवाय पटकथा लेखन, गीतकार, संगीतकार, संवाद लेखन, उपदिग्दर्शक अशा विविध नात्यानं आणखी ५५-६० चित्रपटनिर्मितीत त्यांनी सहभाग नोंदवला. त्याशिवाय, चित्रपटनिर्मितीच्या विविध अंगांच्या संदर्भात बंगाली आणि इंग्रजीत स्वतंत्र ग्रंथलेखन, मुलाखती देणं अशी मोलाची कामंदेखील रग्गड केली आहेत. लहान मुलांसाठी आजोबांनी सुरू केलेलं ‘संदेश’ हे मासिक पुन्हा चालू केलं. त्यानिमित्तानं त्यांची डिटेक्टिव्ह ‘फेलुदा’ आणि ‘वैज्ञानिक प्रोफेसर शोंकू’ ही दोन पात्रं बंगाली बालवाचकांच्या कल्पनाविश्वाचा भाग बनली. लिहितावाचता न येणाऱ्या लहान मुलांसाठी नादमय परंतु अर्थविरहित बडबड गीतं लिहिली. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ज्या मानवी आयुष्याबद्दल त्यांना कुतूहल आहे, त्यात उतरून ते आयुष्य मानवी विशेषांनी समृद्ध केलं.
सत्यजित रे दिग्दर्शित सर्वच चित्रपटांतून विविध प्रमाणात वरील विशेष दिसतात. याचं उदाहरण म्हणून ‘चारुलता’ या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील दोन छोट्या प्रसंगांचा विचार करू या.
चारुलता
रवींद्रनाथ टागोर लिखित (१९०१) ‘नॉष्टनीड’ (नष्ट झालेले घरटे) अशा बंगाली उच्चाराच्या लघुकादंबरीचं प्रतिमांच्या कुंचल्यानं साकारलेलं पुनर्लेखन म्हणजे ‘चारुलता’ हा चित्रपट आहे. ही कादंबरी राजाराम मोहन रॉय यांच्यापासून सुरु झालेल्या बंगालमधील ज्ञानोदयाच्या (renaissance) काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या श्रीमंत अभिजन (बंगालीत भद्र) लोकांचं आयुष्य चितारते. सत्यजित रे यांनी ‘चारुलता’ चित्रपटाची पटकथा, संगीत आणि दिग्दर्शन ही अंगं पेललेली आहेत. चित्रपटातील पात्रयोजना अशी आहे : राजकारण याच एका विषयाला वाहिलेल्या ‘सेंटीनल (जागल्या किंवा पहारेकरी)’ या इंग्रजी वृत्तपत्राचा उदारमतवादी संपादक-मालक आणि साहित्य कला यात काडीचाही रस नसणारा भूपती (शैलेन मुखर्जी), साहित्य आणि कला यात रुची असणारी परंतु महालासारख्या घरात कसलेही काम नसणारी एकटेपणाला कंटाळलेली भूपतीची पत्नी चारुलता (माधबी मुखर्जी), बंकीमचंद्रांचं साहित्य, काव्य, संगीत यांचा चाहता, वयाचं दुसरं दशक नुकतंच ओलांडलेला आणि उत्स्फूर्तता सदैव ओसंडत असणारा भूपतीचा तरुण कझिन (मामे भाऊ, आत्येभाऊ, का मावसभाऊ हे कळायची गरज नाही आणि कळत नाही) अमल (सौमित्र चॅटर्जी), वकिली नीट चालत नसल्यानं भूपतीनं कलकत्यात बोलावून घेतलेला चारुलताचा भाऊ उमपदा (श्यामल घोष) आणि नवविचारांचा स्पर्शही न झालेली उमपदाची पत्नी मंदाकिनी (गीताली रॉय) ही मुख्य पाच पात्रं. चित्रपट-कथानक घडतं १८७९ या वर्षांत.
चित्रपटाचं छायांकन सुब्रता मित्रा, संपादन दुलाल दत्ता आणि कला दिग्दर्शन बन्सी चंद्रगुप्ता यांनी केलेलं आहे. योग्य जागी विविध ध्वनीसंयोजनाचं (साऊंड) काम नृपेन पाल, अतुल चटर्जी, सुजित सरकार या तिघांनी केलं आहे. आणि चित्रपटनिर्मिती आर.डी. बन्सल यांची आहे. चित्रपटाचं इंग्रजी उपशिर्षक आहे ‘द लोन्ली वाईफ’. ‘या चित्रपटनिर्मितीत खूप कमी चुका आहेत. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा बनवायची संधी असती, तरी मी तो पुन्हा असाच बनवला असता’, असं या चित्रपटाबद्दल सत्यजित रे यांनी म्हणून ठेवलं आहे. चित्रपट जवळजवळ दोन तासांचा आहे.
अशा या चित्रपटातील इथं निवडलेला पहिला प्रसंग आहे : चारुलता ‘मी लिहिणार नाही’, असं म्हणणारा. दुसरा प्रसंग मनानं पार उध्वस्त झालेला भूपती स्वतःचं मन शांत झाल्यावर चारुलताला अवघडल्या मनानं भेटतो तेव्हाचा आहे. खरं म्हणजे या छोट्या प्रसंगांच्या क्लिप्स पाहत पाहत आणि अधे-मध्ये थांबून मित्रांशी चर्चा करत सत्यजित रे यांनी ते प्रसंग कसे हाताळले आहेत, हे पाहणं जमवायला पाहिजे. परंतु अशा लेखात ते अशक्य असल्यानं नाईलाजानं केवळ शब्दांच्या मदतीनं प्रयत्न करावा लागतोय.
बंगल्याच्या आवारातील झोकादृष्य : चारुलता आणि अमल
पहिला प्रसंग : चारुलता म्हणते- ‘मी लिहिणार नाही’
हा प्रसंग चित्रपटातील ४०व्या ते ४५ व्या मिनिटांच्या दरम्यान फार तर दोन मिनिटांचा असेल. त्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे : सुटीत भूपतीच्या घरी आलेल्या अमलला लिखाणात आपला हात चालवून पाहायचा आहे. त्यानं एक वही आणून ठेवली आहे. परंतु चारुलतानं त्याच्यासाठी एक सुंदर वही, दौत, लेखणी दिली आहे. ती त्याला आवडलीय. ‘मी दिलेल्या वहीत लिहिलेलं वहीतच राहील’, असं वचन तिनं त्याला द्यायला लावलंय. काही दिवस रोज ती दोघं घराच्या आवारातील बागेत येतात, तो लिहितो. ती झोक्यावर बसून झोके घेते, कधी गाणी म्हणते.
निवडलेल्या प्रसंगाच्या दिवशी चारुलता कधी त्याच्याकडं गाणं गुणगुणत पाहतेय. गाण्यात ‘वसंतऋतू आलाय. नवी पालवी आलीय. कोकीळ कुहुकतोय. गायिका कोकिळेला विचारतेय की, अशा वेळी मी मात्र का आनंदी नाही, ते सांग मला’. आता ती बॉयनाक्युलरमधून परिसर न्याहळू लागलीय. झाडांची वेगळाल्या आकाराची पानं दुर्बिणीसोबत सरकत राहतात. होता होता दृष्टीत वरच्या मजल्यावरचं एक घर, त्याची खिडकी, खिडकीत बाळाला उचलून घेतलेल्या बाळाचं लक्ष बाहेर कुठंसं वेधणारी त्याची (बहुतेक) तरुण आई दिसते. बाळं कशाकडं तरी पाहात हात हालवतंय. इथं दुर्बीण काही क्षण स्थिरावलीय. काही वेळानं चारुलता ती दुर्बीण डोळ्यापासून दूर करते. आता झोक्याचा वेग कमी आहे. तिचा चेहरा दु:खी भासतोय. स्वतःला मूल नाही, हे तिच्या दु:खाचं कारण असेल का? दु:खाला काही मुख्य आणि इतर अनेक दुय्यम कारणं असू शकतात. ती सांगितल्याशिवाय इतरांना कळणं अवघड असतं. पण चारुलता स्वतःला सावरू बघते.
अमल मोठ्या आनंदानं ‘निबंध लिहून पूर्ण झाल्याचं’ जाहीर करतो. तिला जवळ बोलावतो. ती चटईवर येऊन बसते. तो वाचून दाखवत असताना काही क्षणच घराच्या गॅलरीतील मंदाकिनी या दोघांकडं लांबून पाहत असल्याचं दिसतं. हळुवार आनंदाचं स्मित तिच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर पसरलंय. कुणी सांगावं, असं साहचर्य आपल्याही वाट्याला येण्याची तिला आस लागली असेल. आपण तिचं मंदस्मित तेवढं काही क्षण पाहतो. कॅमेरा पुन्हा अमलकडं वळतो. तो निबंधावर चारुचा स्पष्ट अभिप्राय मागतो. ‘निबंधाला मी काही वाईट म्हणणार नाही’. असा तिचा अभिप्राय त्याच्या मनाला लागल्याचं चेहरा लपवू शकत नाही. परंतु लगेच ती भावना मनाच्या कुठल्याशा कप्प्यात टाकून स्वस्थ चेहऱ्यानं तो त्यामागील कारण विचारतो. ती सांगते, ‘अनेक साहित्यकृतींमध्ये नद्या, चंद्र, तारे खूप वेळा आलेले आहेत. तेच इथंही दिसतंय.’ त्यावर अमल बचावाचा छोटा प्रयत्न करून पाहिल्यावर म्हणतो, ‘ठीकंय. आता लिहायची पाळी तुझी आहे’. ‘मी नाही लिहू शकणार. मला कुठं मोठी प्रतिभा आहे?’, अशा तोंडदेखल्या कारणानं नकार पक्का करू पाहते. कदाचित तिला तिच्या सध्याच्या आयुष्यावर काही लिहायचं असेल, पण ती लिहू शकत नसेल. म्हणून तिला निरुद्देश्य येणाऱ्या नद्या, निसर्ग, तारे, चंद्र साहित्यात अति झाल्येत असं वाटलं असेल. आपल्याला काय माहीत?
..................................................................................................................................................................
हेही वाचा : लोकशाहीला नवा धोका सोशल मीडियाचा?
..................................................................................................................................................................
अमल त्यावर म्हणतो, ‘तू काही लिहिलं नाहीस, तर भूपतीला मी काय उत्तर देऊ?’ आणि लगेच त्या वाक्याला एक स्पष्टीकरण जोडतो, ‘म्हणजे भूपतीनं मला काही तुझा मार्गदर्शक म्हणून नेमलेलं नाहीय’. ‘भूपतीनं सांगितलंय म्हणून हा आपला उत्साह वाढवतोय का?’, असं काहीसं तिचा चेहरा अस्फुटसं बोलत असताना, ती फणकाऱ्यानं घरात जाऊ लागते. त्याला कळत नाही, ती अशी का वागतेय. त्यानं पुढं गेलेल्या चारुलताला तसं विचारल्यावर ती उत्तरते, ‘चहाची वेळ झालीय’. हे काही खरं कारण नाही, असं जाणवून आपण विचारात पडतो. पण चित्रपट पुढे सरकतच असतो. या प्रसंगाच्या मागील कारणांच्या अनेक शक्यता चित्रपटानंतरही आपल्याला खुणावत राहतात.
दुसरा प्रसंग - भूपती चारुलताला अवघडल्या मनानं भेटतो
हा प्रसंग चित्रपटाच्या शेवटच्या पाच-एक मिनिटांपैकी वरील प्रमाणेच दोनएक मिनिटांचा आहे. चित्रपटभर बरंच काही घडलं असलं तरी या प्रसंगाला साधारणपणे तीन नुकत्याच घडलेल्या घटनांची पार्श्वभूमी आहे :
१) त्यानं स्टाफला दिलेल्या पार्टीत भूपतीला प्रथमच समजते की, चारुलाताचा एक ललित लेख ‘विश्वबंधू’ या दर्जेदार आणि नामवंत नियतकालिकात प्रसिद्ध झालाय. त्यामुळे तो दुखावलाय. आणि तरीही या कारणासाठी कौतुकाचा धनी व्हावं लागतं. भूपती नेहमी कामात व्यग्र असल्यानं ती त्याला कशी आणि केव्हा सांगणार होती, हे त्यावर तिचं स्पष्टीकरण आहे.
२) ज्या उमपदावर भूपतीनं पूर्ण विश्वास टाकला होता, त्यानंच भूपतीचे पैसे हडप केले आहेत. या विश्वासघाताचा त्याला मोठा धक्का नुकताच बसला आहे.
३) अशा वेळी आपला भार भूपतीवर पडू नये अशा भावनेनं चिठ्ठी लिहून घर सोडून गेलेल्या अमलचं मद्रासवरून पत्र आलंय. ते पत्र चारूलाताच्या हातात देऊन भूपती त्याच्या मित्राला भेटायला घराबाहेर पडतो. अमल येताना जसं वादळ झालं होतं, तसंच आताही बाहेर वादळ झालंय. त्यामुळे परत आलेल्या भूपतीला चुकून ‘अमलचं पत्र वाचून चारुलता अमलची आठवण काढून हमसून हमसून रडतेय. ती स्वतःलाच कदाचित विचारतेय, “माझं काय चुकलं, म्हणून तू असा लांब निघून गेलास?” असं दृश्य पाहताना मोठा धक्का बसतो. तो तिच्या नकळत विषण्ण मनानं पुन्हा घराबाहेर जातो. तिला ते दिसतं आणि समजतंदेखील. ती क्षणभर डोळे मिटून चेहऱ्यावरील भावना पुसायचा प्रयत्न करते. येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्याशिवाय तिला आता पर्याय नसतो. तो शांत व्हायला बग्गीतून बाहेर जातो. त्याच्या डोळ्यात एकाच वेळी राग, दु:ख आणि पाणी आहे. रुमालानं डोळे पुसून रुमाल खिशात ठेवताना त्याला रुमालावर त्याच्या नावाचे ‘B’ हे इंग्रजी अद्याक्षर दिसतं. चारुलातनंच भरतकामी कोंदणात ‘B’ रेखलेला रुमाल त्याला प्रेमानं भेट दिलेला असतो. या काडीच्या आधारावर तो आता परत घरी यायला निघालाय. इकडं चारुलता ते पत्र पुन्हा मोठ्यानं वाचते. त्यात अमलनं लिहिलंय की, तो मद्रासला त्याच्या मित्राकडं राहतोय. तो ठीक आहे आणि आता त्याच्या मनात ‘मेडिटेरॅनियन’ हा शब्द छेडलेल्या तानपुऱ्याप्रमाणं संगीतमय लयीत झंकारतोय. तर भूपतीनं बरद्वान इथून विचारणा झालेल्या स्थळाबद्दल पत्र लिहावं. त्यानं दोघांना काळजी घ्यायला सांगून पत्र पूर्ण केलंय.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : टीव्हीवर होणारा तमाशा हा नियोजनपूर्वक आखलेला कट आहे, जनतेचा आक्रोश रोखण्यासाठीची अफू आहे!
..................................................................................................................................................................
खाली ताजा कलम असा आहे : चारुलतानं लिखाण थांबवू नये. हे पत्र पुन्हा वाचून ते पत्र ती फाडून टाकते. आरशात ती स्वतःला पाहते. रडल्यानं तिचं कुंकू पुसलं गेलंय. ती पुन्हा कुंकू लावू बघते. तेव्हा तिचा थरथणारा हात प्रभातच्या ‘कुंकू’ चित्रपटाची आठवण करून देतो. कुंकू लागतं, ती भांगातही बंगाली प्रथेप्रमाणं सिंदूर भरते. भूपती मन शांत झाल्यावर परततो. येथून आपण निवडलेला प्रसंग सुरू होतो.
चारुलताने ‘ब्रजो’ अशी हाक मारून त्याला तिच्या दालनात दिवा आणायला सांगते. पुढील लाँग शॉटमध्ये ब्रज हातात दिवा घेऊन चालताना थांबलेला दिसतो. त्याच्यापासून थोड्या अंतरावर त्याचे मालक आणि मालकीणबाई उभे दिसताहेत. ब्रज थोडा वेळ थबकतो. आता कॅमेरा चारुलताच्या दालनाबाहेर उभ्या असणाऱ्या अस्वस्थ भूपतीच्या चेहऱ्यावरील भाव टिपतो. चारुलता त्याला आतूनच ‘आत यायला’ सांगू पाहतेय. तेच वाढत्या आर्जवात सांगताना हळूहळू त्या सांगण्यात जीव ओतला जातोय. शेवटी ते त्याच्या मनापर्यंत पोहोचलंय. तिनं पुढं केलेला हात हातात घेताना दोन्ही मनात चाललेले संघर्ष दोन हातांमागील दोन चेहऱ्यांवर उमटतात. थिजलेले दोन हात अत्यंत सावकाशीनं एकमेकांना स्पर्श करत असताना सैलावलेल्या देहबोली एकमेकांना काही सांगू पाहातायत. आणि इथं चित्रपट संपतो.
भूपती आणि चारुलता यांनी मनमुटाव असताना साहचर्यासाठी पुढं केलेलं हात परस्परांना मिळतांना न लपलेलं चेहऱ्यावरील अवघडलेपण
शेष प्रश्न
चारुलता, भुपती आणि अमल यांच्या सतत दोलायमान असणाऱ्या मन:स्थितीला चित्रपटभर साक्षी राहणाऱ्या ज्या प्रेक्षकांनी जगजीत सिंग यांच्या गझला ऐकल्या आहेत, त्यांना त्यांच्या आर्त स्वरातील पुढील ओळी नक्की आठवतील. किंवा हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांच्या मनात जगजीत सिंग यांच्या पुढील पंक्ती ‘चारुलता’ या चित्रपटातील काही दृश्यांच्या आठवणी जाग्या करतील :
‘गांठ अगर लग जाये तो फिर, रिssश्ते हो या डोरी
लाख करे कोशिश, खुलने वक्त तो लSSगता है’
हातात हात घेता येणं सोपंय. तुलनेनं गांठी बसलेली मनं जुळणं जास्त कठीण. त्यांच्या गांठी सुटायला बराच जास्त वेळ लागेल. कदाचित ती जुळणारही नाहीत किंवा कुणी सांगावं लगेच जुळतीलदेखील. माणसाच्या मनाचा काय भरंवसा! मनाला पडलेल्या गांठी सुटणं त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. ते ‘पर्सनल’ आहे. काही दशकांपूर्वी स्त्रीमुक्तीनं, ‘पर्सनल इज पोलिटिकल’ची घोषणा दिली होती. भूपतीच्या उदारमतवादात या घोषणेला जागा मिळाली असती का? मनं जुळायला आणि जुळलेली मनं टिकवायला दुसऱ्या मनात वेळ, ऊर्जा आणि सर्जनशीलता यांची सतत पेरणी करावी लागते. लालसर-हिरवी कोवळी पानं तरारून वर येण्याची वाट संथ मनानं पाहावी लागते. प्रत्येकाकडं असणारा मनाचा असा पैस कितपत विशाल असतो? प्रेमिक हे सारं करतात. विवाहानंतर मात्र त्याच व्यक्ती परस्परांना का गृहीत धरू लागतात? असा मनाचा पैस नसेल तर किंवा ओसरला असेल तर, विवाहसंस्थेनं आखलेल्या लक्ष्मणरेषेला स्पर्श करून परतणं किंवा कधी ती ओलांडून बाहेर जाणं ‘पर्सनल इज पोलिटिकल’च्या बाहेर आहे का आत? स्त्रीच्या हातून आणि पुरुषाच्या हातून लक्ष्मणरेषा ओलांडणं सारखंच आहे, का त्याला पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मिळणाऱ्या सर्वच क्षेत्रांतील असमान संधींची जाडीभरडी किनार आहे?
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
विवाहसंस्थेनं कितीही सांगितलं, तरी एकाच जोडीदाराकडून एका माणसाच्या सर्व अपेक्षा पुऱ्या होणं शक्य आहे का? याबद्दल मानवाचा इतिहास काय सांगतो? माणसाच्या अनेक अपेक्षा एक माणूस पुऱ्या करू शकत नसताना, फक्त एकाच जोडीदाराचा आग्रह धरणं म्हणजे ‘आकाशीचा चंद्र मागणं आहे’ का? का तो नादच सोडून देणं ‘शहाणपणा’चं आहे? आणि तो ‘शहाणपणा’ अंगी नसेल, तर प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला एकापेक्षा जास्त जोडीदार असणं समाजाला स्वीकारावं लागेल का? असा समाज कसा असेल? अशा समाजात नवजात बालकाच्या मानसिक आणि शारीरिक वाढीकडं कोण जातीनं आणि प्रेमानं लक्ष देईल? अशा व्यवस्थेची अंकुरणारी कोवळी बीजरूपं सध्या कुठं दिसतात? व्यवस्था! मग तिची नावं विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, धर्मसंस्था, जातीव्यवस्था, मनामनांतील सरंजामशाही, भांडवलशाही व्यवस्था, समाजवादी व्यवस्था... काहीही असोत, त्यात प्रत्येक माणूस कोंबून बसवता येईल? व्यवस्था माणसासाठी असाव्यात, का माणूस व्यवस्थांसाठी? रीती-रिवाज, कायदे-कानून, पोलीस-न्यायालयं कुणाचं रक्षण करतात? माणसाचं का व्यवस्थांचं? माणसानंच काल उभारलेली व्यवस्था आज का टोचायला लागते? ती मोडण्यासाठी आणि तिच्या जागी नवी व्यवस्था उभी करण्यासाठी माणूस शतकांमागून शतकं संघर्षच का करत आलाय? त्याच्या कपाळी असा संघर्ष त्यानंच का गोंदवून घेतलाय?
जॉन लेनननं स्वप्न म्हणून पाहिलेलं असं एक जग शक्यच नाही का, की जिथं कुणासाठी तरी कुणाला मरावं किंवा मारावं लागणारच नाही? शक्य असलं किंवा नसलं तरीही अशा जगाची स्वप्नं माणसाला का कायम उर्जा देत राहतात आणि राहणार आहेत?.....
काही चित्रपट अशा कित्येक प्रश्नांचे कल्लोळ मनात का जागवतात! ती मनं समृद्ध होण्याची पहिली पायरी असेल काय? माहीत नाहीय.
संदर्भ : १) https://satyajitray.org/
..................................................................................................................................................................
लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.
prakashburte123@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment