अजूनकाही
सध्याच्या लॉकडाउनच्या काळात भटकंती तर बंदच पडलीय. जागा बदलून माणसं पशु-पक्ष्यांसारखी पिंजऱ्यात ठेवल्यासारखी अडकून पडली आहेत आपल्याच घरांत - स्वतःहून स्वतःसाठीच. पण मग मध्येच कधी एकदम ‘दिडदा दिडदा’ म्हणत केशवसुत मनावर स्वार होतात नि कळत नाही की-
“काय करावे कोठे जावे
हे मज नकळे कि ......"
मग काही नाही कॅमेरा हातात घेतला नि निदान सोसायटीत तरी फेरी मारावी म्हणत बाहेर पडले.
आणि अहो आश्चर्यम!
अचानक चक्क एक सुंदरी नजरेला पडली. चारेक इंचांचा मांसल दांडा, वर काळसर तपकिरी टोपी, जाळीदार झगा! थोडं चार पावलं पुढे गेले तर तिथंही बाकी सगळी तशीच सुंदर, पण झगा तेवढा थोडा अपरा आणि वरची टोपीही पांढरी शुभ्र. नखशिखान्त गोरीपान मश्रूमबाई नजरेला पडली!
मात्र यांचं खरं सौंदर्य म्हणजे त्यांचा आकर्षक जाळीदार स्वच्छ पांढराशुभ्र झगा. तो कधी जमिनीपर्यंत लोळणारा (तो मलाही अधिकच आवडतो!), तर कधी स्कर्टसारखा असतो. कसाबसा गुडघ्यापर्यंत लांब. पण तिला पाहताच वाटतं, जणू एखादी ख्रिश्चन वधू नटून-थटून हॉलवर निघायच्या तयारीत आहे.
तसं हीचं सोपं, सरळ नाव आहे बांबू मश्रूम (Fhallus Indusiatus). अलीकडे मध्येच कधी ही मश्रूमबाई आमच्या सोसायटीत नजरेला पडते. तिच्या या सहज रूपामुळेच तिला ‘व्हेल्ड लेडी’ किंवा ‘ब्रायडल व्हेल स्टीन्कहॉर्न’ असंही म्हणतात. वूडलँडमध्ये छान कुजलेल्या लाकूडसदृश्य गोष्टी असतील तिथे ती उगवते. माती सकस असेल तर कधी बागांमधूनही नजरेला पडते. मोठा देखणा प्रकार आहे हा बुरशीचा!
या बुरशीचं आयुष्य फार कमी म्हणजे काही तासांचंच असतं. पण सौंदर्य मोहात पाडणारं आणि कीटकांना आकर्षित करणारं असतं. मुंबईत Conservation Education Centre Of BNHSचा तीन वर्षांचा ‘सिटीझन बटरफ्लाय सर्व्हे’ करताना एकदा तिच्यावर बसलेली फुलपाखरंही पाहिली आहेत. एरवी माशा आणि इतर छोटे सूक्ष्म कीटक हमखास बसलेले दिसतात!
मला तर ‘शटलकॉक’ बुरशीही खूप आवडते. स्वच्छ पांढऱ्या शुभ्र या बुरशीचा आकार अगदी तंतोतंत ‘शटलकॉक’सारखाच दिसतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही ती दृष्टीस पडते. यातला फोटो BNHSमधलाच आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
स्वयंपाकाच्या मसाल्यामध्ये आपण दगडफूल वापरतो, तीही एक प्रकारची वाळलेली बुरशीच असते. बुरशी आणि शेवाळाच्या सहयोगातून ती निर्माण होते. तिच्यामध्ये ‘मुतखडा’ प्रतिरोधक रसायनं असतात.
पण तुम्ही जर कधी पावसाळ्यात भीमाशंकरच्या डोंगरावर ट्रेकसाठी गेलात, तर तिथं रात्री एक विलोभनीय दृश्य पाहायला मिळतं. रात्रीच्या गच्च गुडूप अंधारात झाडाची साल चमकते. रंग चकमकीत हिरवागार. मला वाटतं, बहुदा गो. नी. दांडेकरांनी याला एक गोड नाव दिलंय – ‘ज्योतीवंती’.
आणि माहीत नाही का, पण आत्ता माझ्याही मनात उमटतायत बा. भ. बोरकरांच्या या गोड ओळी-
“झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे
काळोखात कोणीतरी
ज्योत घेऊन आलेले..”
तर भर रानात, रात्रीच्या मिट्ट अंधारात, पावसांत ही बुरशी दिसणं म्हणजे ‘काळोखात कोणीतरी ज्योत घेऊन आलेले’ अशीच वाटते ना!
होतं काय की, पावसाळ्यात झाडाच्या खोडावर ‘ल्युसिनिसेंट फन्गाय’ प्रकारच्या बुरशीमुळे झाड चमकतं. ही बुरशी सैतान शक्तीची करणी आहे असंही मानतात. पण ते सोडून देऊया आपण.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
अलीकडेच कोकणात सिंधुदुर्गतल्या दोडामार्ग तालुक्याच्या तिलारी परिसरातही प्रथमच या चकाकणाऱ्या बुरशीच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीसह गोव्यातील भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य, चोरला घाट या परिसरामधून अंधारात प्रकाशमान होणाऱ्या बुरशीच्या प्रजातीच्या नोंदी आहेत, असंही वाचनात आलंय.
एकूणच बुरशीचा आढळ वाळवंट, बर्फाच्छादित प्रदेश आणि खोल समुद्रांतही आहे. म्हणजेच बुरशी प्रतिकूल वातावरणातही आपले पाय पसरून आहे. म्हणजे तुमचे कॅमेरे असू देत नाही तर, वर्षभराच्या बेगमीची लोणची असू देत, बागा असू देत की जंगल की बर्फ बुरशी कुठेही उगवते.
बुरशी ही अपुष्प वर्गातील आदिम वनस्पती आहे. पाच कोटी वर्षांआधीपासून आढळणाऱ्या या बुरशीमध्ये हरितद्रव्यांचा अभाव असतो. यांची प्रजातीसंख्या कोटीमध्ये आहे. त्यापैकी सत्तरेक हजार प्रजाती मानवाने ओळखल्या आहेत. त्यातल्या दहाएक हजार प्रजाती मश्रूम वर्गातील आहेत. त्यातल्या खाण्यायोग्य दोनेक हजार प्रजाती आहेत. त्यापैकी ऐंशीच्या आसपास प्रजातींची कृत्रिमरीत्या लागवड करतात. मश्रूम (अळंबी) चवीला रुचकर असतात. त्यात प्रथिनंही भरपूर प्रमाणात असतात. अनेक देशांमध्ये, तसंच भारतातही काही अळंबीच्या काही प्रजातींचं कृत्रिम उत्पादनही केलं जातं.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ऑपेरातल्या जाड्या बाईने गायलेली भैरवी आणि नानंद
..................................................................................................................................................................
खरं तर निसर्गामध्ये बुरशीचं काम सफाई कामगाराचं आहे. म्हटलं तर हा मृतोपजीवी सजीव आहे. वनस्पतीप्रमाणे बुरशीही हालचाल करत नाहीत. एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी उठून जात नाहीत. पण यात वनस्पतीसारखं हरितद्रव्य नाही. त्यामुळे वर्गीकरण करताना शास्त्राला पडलेलं हे एक कोडंच आहे. बुरशीच्या अभ्यासाला ‘मायकोलॉजी’ किंवा ‘कवकविज्ञान’ म्हणतात.
प्राचीन काळापासून मानवाला बुरशीचे उपयोग माहीत आहेत. अगदी औषधापासून दारू, ब्रेड बेकरीच्या उत्पादनांपर्यंत बुरशीचा वापर मानव करत आला आहे. तसंच एड्स किंवा कॅन्सर यांसारख्या असाध्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या उपयोगी आहेत. अॅलेक्झांडर फ्लेमिंगला एका हिरव्या रंगाच्या बुरशीमध्ये किटाणूनाशक गुणधर्म आहेत असं लक्षात आलं आणि त्यातून ‘पेनिसिलीन’चा शोध लागला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
तर बुरशीबद्दलच्या अशा अनेक गोष्टी एका बांबू मश्रूममुळे मनात आल्या. पण तो एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. मला त्यांचे रंग, रचना, आकार, डिझाईनस लोभस वाटतात. हातात कॅमेरा असतो. मग फोटो काढते. कुतूहल म्हणून त्याबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करते, मग माहिती आपसूक जमा होत जाते.
एरवी निसर्गभ्रमंती करतानाच नव्हे तर सहज फिरतानासुद्धा अशी अनेक आश्चर्ये गुपचूप आपलं काम करत असतात. त्यांचं जीवनचक्र पुरं करत असतात. आपण जरा सजगपणे वावरलं-पाहिलं तर न पाहिलेले निसर्गजगतातले अनेक पैलू तुमच्यासमोर त्यांचं एक देखणं रूप घेऊन उभे असतात.
“शांतच वारे, शांतच तारे
शांतच हृदयी झाले सारे
असा सुखे मी सदना आलो....
दिडदा दिडदा...
दिड…दा दिड…दा …”
सतार अजून वाजतेच आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment