करोनामुळे यंदाच्या गणेशोत्सवात इब्राहिमभाईंच्या ‘पंख्यां’ना यु-ट्यूबवरच समाधान मानावं लागलं...
पडघम - सांस्कृतिक
मिलिंद दामले
  • इब्राहिमभाई
  • Mon , 14 September 2020
  • पडघम सांस्कृतिक इब्राहिमभाई Ibrahim Bhai गणेशोत्सव Ganeshotsav कच्छी बाजा Kacchi Baja

यंदाचा गणेशोत्सव आला कधी आणि गेला कधी ते कळलंही नाही. माझ्यासारखे दूर असलेले अनेक गिरगावकर गिरगावपर्यंत पोहचू शकले नाहीत. दूरस्थ भक्तांकडून श्रींची सेवा यंदा ऑनलाईन केली गेली. त्यामुळेच मांडवात साधेपणानं झालेल्या विसर्जनानंतर अनेक आठवणींना आपोआपच उजळा दिला गेला.

गिरगाव सोडून सुमारे ३० वर्षं झाली. स्थलांतर झालं, मानसिक स्थित्यंतर झालं नाही. आजही कोणी विचारलं ‘आपण कुठले?’ तर ‘गिरगाव मुंबई-४’ असं उत्तर कुठलाही विचार न करता आपसूक बाहेर पडतं. हे उत्तर भौगोलिक नसून सांस्कृतिक आहे, असं माझं मन मला सांगतं. प्रश्न विचारणाऱ्याला कधी कधी अजून एखादा प्रश्न पडतो, कधी कधी उत्सुकता वाटते, कधी कधी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्यही व्यक्त होतं. मला मात्र या प्रश्नानंतर फक्त आनंद होतो. माझ्या हृदयाचे ठोके थोडे जास्त जोरात वाजायला लागतात, त्यांचा वेग थोडासा वाढतो आणि मन काहीतरी वेगळं होतं. कारण गिरगावात आनंदात घालवलेले ते सोनेरी दिवस! या सांस्कृतिक जडणघडणीत सर्वांत मोठा वाटा ‘गणेशोत्सवाचा’… कुठल्याही गिरगावकराचं याबाबतीत दुमत असणार नाही.

श्रींची मूर्ती, त्यांचं हसणं, त्यांचं दहा दिवस असणं, त्यांच्या भोवतालची आरास, दिव्यांची रोषणाई, वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल, नाना परिमळ, दुर्वा, शेंदूर, शमीपत्र आणि वर्षात एकदाच भेटणारी काही खास फुलं… त्यांची केली जाणारी सजावट, वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे नैवेद्य आणि त्यांचं प्रसादात होणार परिवर्तन… या सर्व गोष्टी खूप मजेदार आणि तजेलदार राहिल्या आहेत!

या सर्वांबरोबरच श्रींच्या आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणूक ही गिरगावकराच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे! मिरवणुकीच्या रूपात, त्याच्या ढंगात, मिरवणूक काढणाऱ्यांच्या स्वभावात, वैशिष्ट्यांत, पेहरावात, त्याच्यावर केल्या जाणाऱ्या खर्चात आणि मिरवणुकीच्या अग्रभागी असलेल्या वादनाच्या प्रकारात खूप स्थित्यंतरं झाली. ढोली बाजा, नाशिक बाजा, बेंजो पार्टी, ब्रास बँड, डीजे आणि अजून बऱ्याच गोष्टी त्याच्यात येत गेल्या. काही काळ ‘बुलबुल तरंग’ने गाजवला. या सर्वांमध्ये आपलं वेगळेपण जपत, वादनाच्या चढत्या ठेक्यानुसार गिरगावकरांशी आपलं नातं अधिक घट्ट करत राहिला, तो म्हणजे ‘कच्छी बाजा’!

शशिकांत (शशी) पोंक्षे, कै. पुरुषोत्तम साळुंखे, नव्या दमाचा मिलिंद जंगम यांसारख्या अनेक मातब्बरांनी वर्षानुवर्षं आपल्या ठेक्यावर गिरगावकरांना ताल धरायला लावला आहे. काही खास ठिकाणी ढोलकीपटू विजय चव्हाणसुद्धा जुगलबंदीत सामील दिसतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोणत्या विसर्जनाच्या ठिकाणी कुठला ‘कच्छी बाजावाला’ भेटेल हे ठरलेलं असतं. वर्षानुवर्षं हे गणित न सुटता असच सुरू राहिलं आहे. पक्का गिरगावकर आपल्या आवडत्या वादकांच्या ठेक्याचा माग काढत बरोबर त्या ठिकाणी पोहोचतो.

या सर्वांमध्ये अग्रणी म्हणजे इब्राहिमभाई आणि त्यांचा भाऊ हारून. इब्राहिमभाईंच्या वादनाचं गारुड गेल्या ५५-६० वर्षांपासून गिरगावकरांच्या मनावर आरूढ आहे.

नळबाजार, घाटी गल्लीमध्ये दाऊदभाई त्यांच्या भावाबरोबर आपल्या दुकानात ढोल विकायचे. बडोद्याहून आणलेले ढोल तयार करून ही मंडळी मुंबईत विकत असत. दाऊदभाई हे स्वतः उत्तम सनई वाजवत. त्यांची शहनाई ऐकण्याकरता गुजराती समाज आपल्या सणसमारंभासाठी, लग्नकार्यासाठी सहा सहा महिने आधी तारीख बुक करून ठेवत असत. कच्छमधून जो आला, तो ‘कच्छी’ आणि तो जे वाजवतो, तो ‘कच्छी बाजा’!

छोटा इब्राहिम वयाच्या बाराव्या वर्षांपासून आपल्या वडिलांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमांना ढोल वाजवायला जात असे. सनईपेक्षा ढोल वाजवण्याकडे त्याचा अधिक कल होता. गिरगावात एकदा गोकुळाष्टमीला त्याने ढोल वाजवला आणि एका वर्षात त्याच्या नैसर्गिक वादनामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून इब्राहिमभाईंनी मागे वळून पाहिलं नाही!

कच्छी बाजावर वाजवली जाणारी काही गाणी सर्वश्रुत आहेत. त्या गाण्यांमध्ये एक प्रकारचा ठेका आहे, जो ‘कच्छी’ ठेक्याच्या अंगानं जाणारा आहे. इब्राहिमभाईंकडे फर्माईश केलं जाणारं ‘अलबेला’ चित्रपटातलं ‘भोली सुरत दिल के खोटे’ हे गाणं म्हणजे याचा उत्तम नमुना. शम्मी कपूरवर चित्रित ‘गोविंदा आला रे आला’, अमिताभ बच्चनवर चित्रित ‘मच गया शोर सारी नगरी रे’ ही अशीच काही गाणी. ‘शाम ढले खिडकी तले’, ‘कंकरिया मार के जगाया’, ‘चमेली के मंडवेतले’, ‘नैनो में बदरा छाये’, ‘पान खाये सैया हमारो’, ‘तु मुंगडा’, ‘तुझे और क्या दू मैं दिल के सिवा’ ही अशी काही गाणी, जी मूळ जास्त चांगली आहेत का, ‘कच्छी बाजा’वर ऐकताना जास्ती चांगली वाटतात, असा प्रश्न नक्की पडू शकतो!

उडत्या चालीची गाणी, काही लोकगीतं (त्याच्यात कोळीगीतंही आली), ठेका असलेली गाणी बाजावर वाजवणं काही विशेष नाही, पण इब्राहिमभाई आरत्या, अभंग, भावगीत, भक्तीगीत, लावणी हे सर्व प्रकारही आपल्या बाजावर वाजवतात. ‘नाच रे मोरा’, ‘गेला मोहन कुणीकडे’ ही गाणी इब्राहिमभाईंकडूनच ऐकावीत… आणि ही यादी खूप मोठी आहे.

‘इब्राहिमभाई काय वाजवू शकतात?’ असा प्रश्न जर कोणाला पडला तर त्याने मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अरुण दाते यांनी गायलेलं ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ हे गाणं कच्छी बाजावर ऐकावं. अशा प्रकारचं सांगीतिक फ्युजन विरळाच!  

इब्राहिमभाई जिथं वाजवतात, त्या मिरवणुकीची सुरुवात शक्यतोवर ‘ओमकार स्वरूपा’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्यांनी होते… आणि तिथून पुढे सुमारे तीन तास मंडळी नाचतात. इब्राहिमभाईंना हरूनभाई ढोलावर आणि केदार शिंदे, प्रभाकर शिंदे सनईची साथ करतात. पूर्वी रामदास शिंदेही सनईच्या साथीला असत. मिरवणुकीत जर मुली किंवा महिला नाचत असतील, तर त्या इब्राहिमभाईंनासुद्धा आग्रह करतात. ढोल वाजवताना एका वेगळ्याच तालावर इब्राहिमभाई स्वतः नाचतात, दुडक्या चालीचा ठेका धरतात, एकाच वेळेस तीन ढोलांवर वादन करून उपस्थितांना वेड लावतात.

गिरगावात काही मंडळी अशी आहेत, जी कधीच नाचत नाहीत, पण तीन तीन तास मिरवणूक पाहत इब्राहिमभाईंच्या वादनाचा आनंद घेतात. पूर्वीच्या काळी जमिनीवर पैसे ठेवून वादकाकडून ते उचलून घ्यायची एक पद्धत होती. अलीकडच्या काळात ती कमी झालेली दिसते, परंतु मिरवणुकीत वादनाचं कौतुक करण्यासाठी उपस्थित लोक आग्रहानं इब्राहिमभाईंच्या खिशात नोटा कोंबताना दिसतात. काही हौशी इब्राहिमभाईंच्या घामेजलेल्या कपाळावर नोटा चिकटवतात किंवा त्यांच्या ओठांमध्ये नोटा अडकवतात.

इब्राहिमभाईंचा ‘फॅन क्लब’ मोठा आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या वादनाला ५० वर्षं पूर्ण झाली म्हणून गिरगावकरांनी त्यांचा सत्कार केला. मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, सुरत, इतर काही ठिकाणं आणि अगदी दुबईहूनसुद्धा काही रसिक मुद्दाम या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इब्राहिमभाईंनी देश-विदेशात वेगवेगळ्या मोठ्या स्टेडिअममध्ये, हॉलमध्ये अनेक ठिकाणी वादन केलं आहे. त्यासाठी परदेशात राहिले, परंतु गिरगावच्या रस्त्यावर उभं राहून आपल्या ‘पंख्यां’समोर वादन करण्याची ओढ त्यांना सतत भारतात परत घेऊन येत राहिली. हरूनभाईंनी तर मोठ्या पगाराची परदेशातली नोकरीही नाकारली आणि भारतात परत आले. ‘आपली मुंबई म्हणजे आपला आनंद’ असं म्हणून कोजागिरी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, सत्यनारायणाच्या पूजा, नवरात्र आणि हक्काचा गणेशोत्सव यात वादन करत रसिकांना आनंद देत आले आहेत.

इब्राहिमभाईंना चित्रपटाच्याही काही संधी चालून आल्या, परंतु ‘कट- कट’ करत तासनतास चालणाऱ्या रुक्ष शूटिंगला ते कंटाळले. त्यामुळे कदाचित एका चित्रपटातल्या आपल्या उपस्थितीवरच ते समाधानी आहेत. ‘जंजीर’ रिलीज झाल्यानंतर अनेक जणांनी इब्राहिमभाईंना येता-जाता ‘अरे इब्राहिम, पठाणी पेहनके उस गाने में दिखाई दे रहे हो’ असं सांगितलं. अमिताभ बच्चन आणि प्राणसाहेबांच्या अदाकारीनं सजलेल्या मैत्रीची महती सांगणाऱ्या ‘यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी’ या गाण्यात इब्राहिमभाई ढोल वाजवताना दिसतात. मिरवणुकीत मात्र ‘पांढरा शर्ट-पांढरी पॅंट’ याच पोशाखात इब्राहिमभाई दिसतात, क्वचित कधीतरी पांढरा पठाणी कुर्ता ‘जंजीर’ची आठवण जागी करतो.

इब्राहिमभाई आज वयाच्या सत्तरीत आहेत, तरीही २०-२० तास उभं राहून सलग वादन करायचा त्यांचा उत्साह, त्यांची उमेद दांडगी आहे, एखाद्या तरुणाला लाजवणारीसुद्धा!

मिरवणूक सुरू होताना श्रीगजाननाच्या भोवती आपल्या हातातल्या वादनाच्या काठ्या तीन वेळा फिरवून श्रींची ‘नजर उतरवणारे’ इब्राहिमभाई हे या ‘उत्सवी ऐक्या’चं, या ‘भारतीयत्वा’चं जिवंत उदाहरण आहेत.

यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणानं साजरा झाला. श्रींचं आगमन आणि विसर्जन हे आठवणीत राहावं इतक्या साधेपणानं झालं. मिरवणुकीचे मानमरातब, शानशौकत, आनंदीआनंद हे सर्व बाजूला ठेवून अत्यंत आवश्यक तेच फक्त उत्सवात केलं गेलं. यंदाच्या उत्सवात कच्छी बाजाच्या सर्वच रसिकांना, खास करून इब्राहिमभाईंच्या ‘पंख्यां’ना यु-ट्यूबवरच समाधान मानावं लागलं, कारण करोनानं सर्व जग व्यापून टाकलं आहे.

‘इब्राहिमभाई’ हा खरं तर ‘वाचायचा’ नसून ‘ऐकायचा’ विषय आहे, पण या लेखाच्या निमित्तानं काही वाचक ‘यु-ट्युब’वर जाऊन इब्राहिमभाईंना नक्की ऐकतील आणि त्यांच्या ‘पंख्या’मध्ये भर पडेल, अशी मला खात्री आहे.

एखाद्या विरह गीताला आपल्या वादनानं संपूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या इब्राहिमभाईंसारख्या कलाकारामुळे आपल्याला या आपत्तीमध्ये जगण्याची उमेद मिळो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना!  

..................................................................................................................................................................

लेखक प्रा. मिलिंद दामले ‘भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थान’ (FTII, पुणे)मध्ये टीव्ही दिग्दर्शन विभागाचे प्रमुख व प्राध्यापक आहेत.

mida_1978@yahoo.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Jetini Chiplunkar

Mon , 14 September 2020

Very nice article. It made me not only emotional but also fan of Ibrahimbahi, without listening to his Kachhi Baja. गणपति बाप्पा मोरया।


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......