काँग्रेस - पक्ष की समृद्ध अडगळ?
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी आणि सोनिया गांधी
  • Sat , 12 September 2020
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi काँग्रेस Congress

सध्या जी काही अंतर्गत सुंदोपसुंदी माजलेली आहे, कलह सुरू आहे आणि त्यातच अध्यक्षपदाचा सावळागोंधळ सुरू आहे, त्यामुळे देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष एक समृद्ध अडगळ झाल्यासारखी स्थिती आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांच्या पराभवाच्या मानसिकतेतून हा पक्ष सावरणं, कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करून संघटना मजबूत करणं आणि काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तसंच भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हे सध्याच्या घडीला तरी ‘मुंगेरीलाल के सपने’ दिसू लागलेलं आहे, इतका हा पक्ष (राहुल गांधी वगळता) निष्क्रिय झालेला आहे!

या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान असणारा, पंतप्रधानपदी राहिलेल्या दोघांच्या प्राणाचे बलिदान दिलेल्या, सत्तेत तब्बल सहा दशकं राहिलेल्या, या देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या आणि अगदी गाव-खेड्यापर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली आहे. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून हा पक्ष अधिकाधिक व्यक्तीकेंद्रीत होत गेला, गांधी कुटुंब तसंच काही नेते आणि त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित झाला, पक्ष संघटनेची वीण उसवली आणि कार्यकर्ता पक्षापासून दुरावत गेला, ही वस्तुस्थिती आहे.

कधी काळी संसदेच्या सभागृहात कायम बहुमतात असणाऱ्या या पक्षाला गेल्या दोन निवडणुकांत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्याइतक्याही जागा संपादन करता आलेल्या नाहीत, इतकी या पक्षाची वाताहत झालेली आहे, कारण साडेतीन-चार दशकात या पक्षाची रीतसर संघटनात्मक बांधणी झालेली नाही. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत आणि दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत ‘तेच ते’ नेते आहेत. नवीन कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज उभारलेली गेलेली नाही, असं घडलं तर त्या तरुण रक्ताला वाव द्यावा लागेल, अशी विद्यमान नेत्यांना भीती आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

त्यातच गेल्या सुमारे सव्वावर्षापासून या पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नसतानाही कोणतंही सोयरसुतक या पक्षाच्या नेत्यांना आणि नेतृत्व करणाऱ्या गांधी घराण्याला नाही, अशी चारही बाजूंनी मोडकळीस आलेल्या वाड्यासारखी अवस्था सध्या पाहायला मिळते आहे. याचं एक कारण म्हणजे या पक्षाला शीर्षस्थानी आवश्यक आहे, तसं खंबीर नेतृत्व सध्या नाही. जे काही शीर्षनेतृत्व ‘गांधी’ घराण्याचं आहे, ती एक अपरिहार्य अगतिकता आहे. पण आता त्या गांधी नावाचा करिष्मा ओसरू लागलेला आहे, असं म्हणण्यास खूप वाव असल्यासारखे निवडणुकांचे निकाल आहेत.

त्यात सोनिया गांधी यांना नेतृत्व सोडायचं आहे, असं दिसत नाही आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावरही पक्षावरची पकड ढिली होऊ देण्यास राहुल गांधी तयार नाहीत, असा हा एकंदरीत  तिढा आहे. आहे त्या नेतृत्वाभोवती बहुसंख्येनं स्वार्थी, बेरके, जनाधार नसलेल्या आणि जुनाट विचारांच्या (Fossil), खुज्या उंचीच्या नेतृत्वाचा (खरं तर सरदार म्हणा किंवा मनसबदार!) भरणा आहे. या बहुसंख्य नेत्यांची मानसिकता पराभूततेची आणि नव्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करणारी आहे. या बहुसंख्य नेत्यांना शीर्षनेतृत्व म्हणून कुणी तरी गांधी तर हवे आहेत, पण त्यांची पूर्ण हुकमत मात्र नको आहे, असा हा अवघड गुंता आहे आणि त्या गुंत्यात काँग्रेस पक्ष पूर्णपणे अडकलेला आहे.

यामुळे पक्षाची स्थिती आणखी वाईट होत चाललेली आहे. अलीकडच्या काळात भाजपशी लढण्याची नुसती भाषा आहे. प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्याशिवाय त्या आघाडीवर अन्य कुणीच लढताना दिसत नाही. सर्व विरोधी पक्षांना या लढाईसाठी एकत्र आणण्यातही काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरलेला आहे. उमेद हरवलेलं, पराभूत मानसिकता असणारं सैन्य लढाई जिंकू शकत नाही, हेही भान काँग्रेसला राहिलेलं नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पक्षाला उभारी देण्याऐवजी राहुल गांधी यांना बळ प्राप्त करून देण्याऐवजी काँग्रेस नेते कसे बेजबाबदार वागत आहेत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात २३ नेत्यांनी केलेल्या बंडाकडे पाहायला हवं. पक्षाची इतकी काळजी आहे तर पक्ष पातळीवरच चर्चा होऊ देण्याऐवजी या नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेलं पत्र माध्यमांकडे पोहोचतं केलं आणि तेही या पत्रावर चर्चा करण्याचं मान्य केलेलं असल्यावर. याचा अर्थ ते पत्र/बंड/कळकळ एक स्टंट होता. पक्षाची वाईट स्थिती झालेली आहे, याचं भान या नेत्याना आलं हे चांगलंच होतं असं म्हणता आलं असतं, पण अशी स्थिती निर्माण होण्यासाठी गांधी घराणं वगळता, या नेत्यांपैकी कोणी कोणती जबाबदारी पेलायला हवी होती आणि ती पेलण्यात त्यांना अपयश कसं आणि का आलेलं आहे, याचा ऊहापोह या पत्रात करण्यात आलेला नाही.

इतकी वर्षं पक्षात पदं आणि सत्तेत प्रदीर्घ काळ खुर्ची उबवूनही यापैकी एकही नेता किमान राज्यात तरी पूर्ण जनाधार मिळवू शकलेला नाही, याची प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धाडस या नेत्यांनी दाखवलं नाही. राहुल गांधी यांनी या पत्रासंदर्भात हल्ला चढवताच या नेत्यांनी ते पक्षाशी कसे एकनिष्ठ आहेत आणि आजवर त्यांनी कशी पक्षात बंडखोरी केलेली नाही, याचा दाखला दिला. पण गेल्या सहा-सात वर्षांत राहुल गांधी देशभर फिरून नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे नेते का सहभागी झाले नाहीत, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला असता तर हे सर्व नेते निरुत्तर झाले असते. राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हते तरी किती वेळा या नेत्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले, विविध संसदीय अस्त्रांचा वापर करून किती प्रसंगात सत्ताधारी भाजपची कोंडी लोकसभा आणि राज्यसभेत केली, याही प्रश्नांची उत्तरे जर या नेत्यांनी दिली असती तर चांगलं झालं असतं.

भाजपकडून होणाऱ्या गळचेपी विरुद्ध, फिरवल्या जाणाऱ्या वरवंट्याविरुद्ध, घाईत लादलेल्या नोटबंदी, वस्तू आणि सेवा कराविरुद्ध, राफेल विमानाच्या खरेदीच्या संदर्भात रान पेटवत राहुल गांधी यांनी पुकारलेल्या लढाईत काँग्रेसच्या यापैकी कोणत्या नेत्यानं समिधा टाकण्याचा कधी प्रयत्न केला, याचंही उत्तर मिळायला हवं.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सामूहिक नेतृत्वाची ‘पिपाणी’ आणि त्रात्याचा ‘शंख’!

..................................................................................................................................................................

राहुल गांधी यांचे काही आरोप अंगलट आले हे खरं आहे, राजकारणात तसं घडतच असतंच, पण त्याचसोबत राहुल यांच्यामागे यापैकी किती नेते पूर्ण ताकदीने उभे राहिले हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण त्या लढाईत पूर्ण ताकदीनं सहभागी न होऊन या बहुसंख्य नेत्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केलेली आहे. राजकारणात पक्षनिष्ठा महत्त्वाच्या असतातच, पण त्यासोबत वेळोवेळी प्रतिस्पर्धी पक्षाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेतली, हेही त्याइतकंच महत्त्वाचं असतं. अशा भूमिकातून त्या नेत्याचं नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा झळाळून निघत असते. काँग्रेसच्या या बहुसंख्य नेत्यांनी या काळात स्वीकारलेल्या मौनी भूमिकेला म्हणूनच ‘सोयीस्कर’ असा अर्थ प्राप्त झाला आणि भाजपला अप्रत्यक्षपणे बळ मिळालं, हे विसरता येणार नाही.

या पत्रावर गंभीर चर्चा करवून आणण्याऐवजी श्रीमती सोनिया गांधी यांनी त्रागा व्यक्त करण्यातून काहीही साध्य झालेलं नाही, हेही सांगून टाकायला हवंच. पक्षाच्या प्रती त्यांचं असणारं योगदान कुणीही कधीही (अगदी त्यांच्या विरोधकांनीही) नाकारलेलं नसताना आणि आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राहणं शक्य नसताना, त्यांनी पुन्हा हंगामी असेना अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं. कोणत्याही दबावाला बळी न पडता सोनिया गांधी यांनी एक तर राहुल गांधी यांच्याकडे झुकणारा त्यांचा कल स्पष्ट सांगायला हवा होता आणि राहुल गांधी यांची रीतसर निवड होईपर्यंत एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपद सोपवून दूर होणं इष्ट ठरलं असतं किंवा गांधी घराण्याला या पदाचा कोणताही मोह नाही, हे एकदा निक्षून सांगून टाकत पक्षाच्या सर्व कटकटीतून मुक्त होत अन्य इच्छुकासाठी अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करून द्यायला हवा होता. पुन्हा हंगामी का असेना पद स्वीकारून, हे पद त्या ‘गांधी घराण्या’तच ठेवू इच्छितात असा संदेश (नकळतपणे का होईना) श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडून दिला गेला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

राहुल गांधी यांना खरंच जर अध्यक्षपदात रस नसेल तर त्यांनीही ते स्पष्ट करायला हवं आणि त्या पदासाठी एखाद्या उमेदवाराचं नाव सुचवण्याचा उमदेपणा दाखवायला हवा किंवा सलग तिसऱ्या पराभवाची भीती न बाळगता, जुन्या धेंडांना कठोरपणे बाजूला सारत त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेत पक्षाची नव्यानं बांधणी करायला हवी. सर्व स्तरावर नवे चेहरे देत पक्षाचा चेहरा ‘तरुण’ करायला हवा. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा तर दिला, पण सोनिया गांधी यांचं स्वास्थ्य ठीक नसल्यानं निर्णयाधिकार राहुल यांच्याकडेच आहेत, हे एक उघड गुपित आहे.

ताजं उदाहरण राज्यसभेतील उपनेतेपद गौरव गोगोई आणि प्रतोदपद रवनीतसिंग बिटू यांच्या नियुक्तीचं आहे. गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, चिदंबरम यांसारख्या ज्येष्ठांना डावलून या नियुक्त्या झाल्या आहेत. असाच खमकेपणा यापुढे राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ते जमत नसेल तर त्यांनी पक्षाची आणखी वाताहत होऊ देण्यापेक्षा अन्य कुणाच्या सूत्रं देणं इष्ट ठरेल. देशाच्या राजकारणात नुसती अडगळ बनून राहण्यापेक्षा काँग्रेसनं ‘समृद्ध अडगळ’ होणं बरं असेल, कारण त्यामुळे दिवाणखान्यात शोभेची वस्तू म्हणून तरी स्थान मिळेल!    

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vivek Date

Wed , 16 September 2020

Why the journalists are wasting their and reader time in writing about Sonia and Rahul. Both are politically dead. Rahul did not take any position of responsibility during 10 years of M M Singh leadership as PM. Even now he does not see anyone after six in the evening as reported by Rajdeep Sardesai. Sonia has been running a kitchen cabinet for over 20 years. The leadership and responsible opposition role has to evolve though we see no chance of happening that in Congress. That has to come from people who care.


Vividh Vachak

Sun , 13 September 2020

आपण सोनिया गांधींच्या योगदानाबद्दल बोललात, ते नक्की काय होते हे समजू शकेल का? आणि त्यांचे राजकीय विरोधक जर हे समजत असतील तर ते कुठल्यातरी दुसऱ्या जगात जगतात असे म्हणावे लागेल. तसेच गांधी घराण्याला सत्तेचा मोह नाही हाही एक शोधच म्हणावा लागेल. पदावर नसतानाही एक समांतर सरकार चालवण्याचे कर्तृत्व केवळ त्यांच्याच नावावर आहे आणि त्यातून केलेल्या भ्रष्टाचाराच्या कथा अजून चर्चिल्या जाताहेत . मुळात सत्तेचा मोह नसता तर राजकारण सोडून त्यांनी कधीच काॅंग्रेस पक्ष इतरांच्या हातात सोडला असता. असो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......