अजूनकाही
काल ११ सप्टेंबर २०२० रोजी आचार्य विनोबा भावे यांची १२५वी जयंती होती. त्यानिमित्ताने हा लेख...
..................................................................................................................................................................
मला लहानपणीच विनोबांची ओळख झाली, ती त्यांच्या ‘गीताई’च्या माध्यमातून. आजही ‘गीताई’ वाचताना विनोबांच्या प्रासादिक भाषेची ओळख होते, नव्याने जाणीव होते आणि लक्षात येते की, साने गुरुजी आणि विनोबा हे दोघेही किती अंत:करणपूर्वक लिहीत आले आहेत.
अर्थात विनोबा भावले ते मुख्यत: गांधीजींचे एक जवळचे सहकारी म्हणून, हे मुद्दाम सांगायला हवे.
विनोबांची आठवण केली की, गांधीजींची आठवण येणारच! या दोघांमधला प्रेमाचा, विचारांचा धागा म्हणजे भगवद्गीता! गांधीजी म्हणायचे, ‘गीता ही माझी माता आहे.’
विनोबांनी ते पुढील ओळीत म्हटले आहे:
“गीताई माउली माझी,
तिचा मी बाळ नेणता.
रडता रडता घेई,
उचलूनी कडेवरी!”
म्हणजे थोडक्यात ‘गीता’ ही या दोन्ही महान गुरुशिष्यांची व्यापक अर्थाने आध्यत्मिक माता आहे. विनोबांची गीताई म्हणजे भगवद्गीतेचे अतिशय सुंदर असे मराठी काव्यरूप! इतके सोपे असलेले गीतेचे भाषांतर म्हणा किंवा रूपांतर म्हणा अन्य कोणत्याही भाषेत नाही.
विनोबांनी भगवद्गीतेवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. वर्धा जिल्ह्यामधील पवनार येथील परंधाम प्रकाशनाने ही पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. ‘गीताई चिंतनिका’, ‘गीता प्रवचने’, ‘स्थितप्रज्ञ दर्शन’ या त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
विनोबांच्या ‘गीताई’च्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या असून त्रेचाळीस लाखांपेक्षा जास्त प्रती विकल्या गेल्या आहेत.
छोट्या डायरीच्या आकारातील ११२ पानांची विनोबांची ही ‘गीताई’ अवघ्या दहा रुपयात उपलब्ध आहे. पुण्याच्या ‘गांधी भवन’मध्ये विनोबांची बहुतेक सगळी पुस्तके उपलब्ध आहेत.
आरंभी म्हटल्याप्रमाणे विनोबा म्हटले की, गांधीजी आठवतात. त्यामुळे या दोन्ही असाधारण अशा गुरू-शिष्याचे नाते आपण पाहायला लागतो, त्याचा धांडोळा घेतो, तेव्हा या नात्याची मूस केवळ भावनेवर नाही, तर विचारावरदेखील कशी जोडलेली आहे, हेही आपल्या लक्षात येते. खुद्द विनोबांनी या संबंधात अतिशय तपशीलवार लिहिले आहे.
‘गांधी : जसे पाहिले जाणले विनोबांनी’, या एका संपादित पुस्तकात विनोबांनी गांधीजींबद्दल जे लिहिले आहे ते नुकतेच वाचले. जगातील एका महापुरुषाचे इतके वेगळे दर्शन जे आपल्याला आकळूही शकत नाही, अशा विविध संदर्भ आणि उदाहरणांच्या आधारे विनोबांनी घडवले आहे. ते वाचत असताना जाणवत राहते की, गांधीजी अजूनही आपल्याला पूर्णपणे समजलेले नाहीत.
जागतिक पटलावर भारतीय परंपरेचा मागोवा घेताना गांधीजींचे थोरपण आणि गांधींच्या सत्याग्रहाची महत्ता विनोबा अतिशय नेमकेपणाने नेटकेपणाने आपल्याला सांगतात. काही आठवणींच्या आधारे आणि बापूंशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आपण हे लिहीत आहोत, हा विनम्र भावही त्यांच्या लेखनात आहे.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात १९४० मध्ये वैयक्तिक सत्याग्रही म्हणून गांधीजींनी विनोबांची निवड केली होती, हे आपल्याला माहीत आहे. यासंबंधी विनोबा सांगतात –
“१९४०मध्ये एका सुंदर प्रभातसमयी मला बापूंकडून निरोप आला की, भेटून जा. मी त्यांच्यासमोर हजर झालो. बापू मला म्हणाले, “या वेळी तुझ्या सेवेची मला जरूर आहे. पण तू मोकळा आहेस किंवा नाहीस याची मला माहिती नाही. कारण तू निरंतर काही ना काही कामात गुंतलेला असतोस, पण आज आपल्याला वैयक्तिक सत्याग्रह करायचा आहे. तेव्हा माझी इच्छा आहे की, तू जर खास अडचणीशिवाय कामातून मोकळा होऊ शकशील तर प्रथम व्यक्तिगत सत्याग्रही म्हणून तयार होऊन जा.”
मी म्हणालो, “तुमचे बोलावणे आणि यमराजाचे बोलावणे माझ्या दृष्टीने सारखेच आहे. मला आता इथून परत पवनारला जाण्याची जरुरी नाही. येथूनच सरळ त्या कामासाठी जाऊ शकतो.”
मी असे म्हणालो, तेव्हा बापूंना फार बरे वाटले. नंतर मी वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निघालो नि जेलमध्ये गेलो.”
गांधीजींनी विनोबांना पुत्रवत मानले होते, यात शंकाच नाही. तर विनोबांनी गांधीजींना पितृस्थानी आणि गुरुस्थानी मानले होते, हे त्यांच्या सर्व लेखनातून दिसते. गांधीजींचा विचार या देशाला आणि या देशातील राजकारण्यांना मानवला नाही, अशी परखड टीकाही नंतरच्या काळात विनोबांनी केली होती.
‘एक सत्त्वशील संत’ असे काहीसे विनोबांचे वर्णन करता येईल. मराठीमधील अनेक नामवंत लेखकांनी विनोबांचा, त्यांच्या भूदान चळवळीचा खोलवर अभ्यास केला आहे. आचार्य जावडेकर यांच्या ‘सत्याग्रही समाजवाद’ या लेखसंग्रहात विनोबांच्या भूदान चळवळीसंबंधात काही लेख आहेत. याच संग्रहात ‘ब्रह्मर्षि विनोबा’ हा आचार्य जावडेकर यांचा लेख आहे. विनोबांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त तो त्यांनी १९५५ मध्ये लिहिला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा ग्रंथ १९९४ साली प्रकाशित केला असून प्रा. सुहास पळशीकर त्याचे संपादक आहेत. याखेरीज प्राचार्य राम शेवाळकर, प्रा.भ.ग. बापट आणि सामाजिक अभ्यासक मिलिंद बोकील यांनी विनोबा यांच्या जीवन चरित्रावर आणि विषयांवर ग्रंथलेखन केले आहे. आमचे अभ्यासक मित्र प्रा. गणेश राऊत यांनीही विनोबांच्या भूदान चळवळीवर प्रबंधासाठी संशोधन केले होते. त्यांना या संशोधनासाठी डॉक्टरेट पदवी मिळाली.
मी विनोबांच्या पवनार आश्रमाला १९९९ साली भेट दिली होती. त्या वेळी अर्थातच मी अगोदर सेवाग्रामला गेलो. तिथे योगायोगाने नव्वद वर्षांच्या निर्मलाबेन गांधी (गांधींच्या स्नुषा) आम्हाला भेटल्या. तेथून नागपूरला परतताना वाटेत पवनार आश्रमात विनोबांच्या समाधीचे दर्शन घेतले, तो परिसर पाहिला. डिसेंबर १९९९ मधील तो दिवस गांधी-विनोबा यांच्या पुण्यस्थळाला दिलेल्या भेटीने माझ्या अंत:करणात कायमचा कोरला गेला आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
विनोबांनी गांधीजींचे केलेले गुणवर्णन आणि गांधीजींचा त्यांच्यावरचा विश्वास, हे विसाव्या शतकातील एक वेगळे असे अद्वैत होते, असेच म्हटले पाहिजे. समाजकारणात, राजकारणात अशी नाती निर्माण झाली होती आणि त्यांनी आपल्या भारतीय समाजमनाचा परिघ वैश्विक केला होता, हे जाणवत राहते. आणि कधी कधी असे वाटते की, अरे आपण जे वाचले, त्या दंतकथा तर नव्हत्या?
पुन्हा एकदा मी गांधीजींविषयीच्या पुस्तकांकडे वळतो आणि माझ्या आजच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांकडे शांतपणे पाहू लागतो, तेव्हा लक्षात येते की, मनातला कल्लोळ आणि डोक्यातली अस्वस्थता संपत नाहीये! या महात्म्यांनी जो सेवाभाव, प्रेमभाव शिकवला, त्याचे आज आपण काय केले आहे, असाही प्रश्न पडतो. त्याच वेळी करोनाविरुद्ध लढणारे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस, सर्व सरकारी अधिकारी आणि समाजातील सेवाभावी कार्यकर्ते असे सगळे घटक समोर दिसायला लागतात!
आपण गांधीजी-विनोबांचा केवळ शाब्दिक वारसा घेऊन पुढे जाणार नाही, तर त्यांच्या कृतिप्रवणतेचा मार्ग स्वीकारून पुढे चाललो आहोत, असा थोडाफार दिलासा तरी या सर्वांच्या कामामुळे मिळतो आहे... तूर्त मनाला थोडा आधार याच सेवेचा!
विनोबांना विनम्र अभिवादन!
..................................................................................................................................................................
लेखक अरुण खोरे ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ (पुणे) या मासिकाचे संपादक आहेत.
arunkhore@hotmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment