‘काबिल’ : काबिल-ए-तारीफ!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
आशुतोष जरंडीकर
  • ‘काबिल’चं पोस्टर व त्यातील एक दृश्य
  • Fri , 27 January 2017
  • हिंदी सिनेमा Bollywood काबिल Kaabil संजय गुप्ता Sanjay Gupta हृतिक रोशन Hrithik Roshan यामी गौतम Yami Gautam रोनित रॉय Ronit Roy रोहित रॉय Rohit Roy राकेश रोशन Rakesh Roshan

बॉलिवुडमध्ये चित्रपटांची टक्कर होणं, त्यातील स्टार मंडळींनी आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरणं हे काही नवीन नाही. अगदी ‘लगान’ व ‘गदर’पासून आत्ताच्या ‘रुस्तम-मोहेंजोदारो’पर्यंत बरीच उदाहरणं देता येतील. यात ‘रईस’ व ‘काबिल’ यांची अजून एक भर पडली आहे. २६ जानेवारीची सुट्टी आणि त्याला जोडून येणारा पाच दिवसांचा भला मोठा विकेंड डोळ्यासमोर ठेवून हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी, २५ जानेवारीला प्रदर्शित झाले!

बॉलिवुडमध्ये आणि पर्यायानं सिनेरसिकांत शाहरुखच्या ‘रईस’ची हवा गेल्या वर्षभर होती. त्याचं प्रमोशनसुद्धा तेजीत सुरू होतं. त्यामुळे हृतिक रोशनचा ‘काबिल’ तसा अंडरडॉग राहिला. कोणतंही प्रेशर नव्हतं. ‘मोहेंजोदारो’चा अनुभव गाठीशी असल्यामुळे अपयशाची भीती नव्हती. विदाऊट प्रेशर बॅटिंग चांगली होती!

चित्रपटाचा प्रोमो वा ट्रेलर जेव्हा प्रदर्शित झाला, तेव्हा ‘काबिल’ ही सूडकथा असणार हे माहीत झालं होतं. पण त्या ट्रेलरच्या शेवटी दिसणाऱ्या नावामुळे जरा जास्तच शंका वाटत होती. त्याला कारण होतं, संजय गुप्ता. या चित्रपटाचा दिग्दर्शक. या दिग्दर्शकाची एक ठरलेली पद्धत आहे. त्याचा कोणताही चित्रपट असो, तो एखाद्या पाश्चात्य चित्रपटावरून उचललेला असतो. त्यात तो भरपूर देसी मसाला टाकतो. कॅमेऱ्याचे अँगल तिरके अथवा कोपऱ्यातून विचित्र पद्धतीने घ्यायचे आणि छायाचित्रण अगदी वेगळंच किंबहुना गडद करून टाकायचं. याला अगदी ‘काँटे’पासून ‘जज़बा’पर्यंत संजय गुप्ताचा कोणताही चित्रपट अपवाद नाही. पण म्हणतात ना नियमाला अपवाद असतोच. ‘काबिल’ हा तो संजय गुप्ताचा अपवाद आहे!

म्हणजे यात दिग्दर्शकीय विचित्र गोष्टी नाहीत, पण मसाला आहेच. आणि त्या मसाल्याची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो परिमाणकाराक आणि संवेदनशील आहे. त्यामुळे हा तद्दन मसालापट पाहताना कंटाळा येत नाही.

‘काबिल’ ही सूडकथा आहे यातच सगळं आलं. चित्रपटाचा शेवटसुद्धा अपेक्षित आणि गोड आहे. तो तसा हवाच नाही का? पण या सगळ्यात खरं नाट्य आहे, ते म्हणजे यातला हिरो नेहमीसारखा १५-२० लोकांना लोळवणारा नसून तो चक्क अंध आहे. अर्थात तो बॉलिवुडचा हिरो असल्यामुळे स्पेशल आहेच. म्हणजे त्याची ज्ञानेंद्रियं तीक्ष्ण आहेत. तो स्वतः डबिंग आर्टिस्ट आहे. आणि अजूनही काही गोष्टी आहेत. या सर्व गोष्टी कथानकात नेमक्या जागी पेरलेल्या असल्यामुळे मजा येते.

चित्रपटाची मांडणी मात्र एकदम सरधोपट मार्गानं केली आहे. पूर्वार्धामध्ये पात्रांची ओळख, अंध नायक-नायिकेची प्रेमकथा, मग त्यांच्यावर होणारा अन्याय वगैरे वगैरे. आणि उत्तरार्धामध्ये बदला. पूर्वार्धामध्ये काही मोजके प्रसंग वगळता फार काही वेगळं अथवा विशेष पाहायला मिळत नसलं, तरी उत्तरार्धामध्ये आता पुढे काय होणार, हा अंध नायक काय युक्ती करणार, त्यात त्याला यश येणार का, बदला तो कसा घेणार, हे पाहण्यातच खरी गंमत आहे!

आता अंध नायक हे सगळं कसं करू शकतो, एवढ्या मोठ्या लोकांवर कशी काय मात करू शकतो, मुंबईचा एवढा मोठा नेता सिक्युरिटी न घेता का फिरतो, असे तर्कशुद्ध प्रश्न आपल्यापैकी कुणाच्या मनात येत असतील तर त्यांची प्रामाणिक उत्तरं या चित्रपटात मिळत नाहीत. पण असे चित्रपट पाहताना असला विचार मनात आणायचा नसतो, हे सुद्धा तितकंच खरं. पूर्वार्धामध्ये काही प्रसंग विनाकारण आल्यासारखे वाटतात. म्हणजे कथेशी त्यांचा अर्थाअर्थी काही विशेष संबंध नाही. त्यामुळे चित्रपट थोडासा रेंगाळतो. उत्तरार्धामध्येही यामी गौतम आणि हृतिकचे काही प्रसंग उगाच घुसवल्यासारखे वाटतात. मसाला चित्रपटाचा आयटम साँग हा अविभाज्य घटक असल्यासारखं तेही मध्येच येतं. आणि तेही ‘सारा जमाना’सारख्या सदाबहार गाण्याची भ्रष्ट नक्कल असल्यामुळे डोक्यात जातं.

पण तांत्रिकदृष्टया ‘काबिल’ सरस आहे. सुदीप चॅटर्जीची सिनेमॅटोग्राफी आणि रेसुल पुकट्टीचं साउंड डिझाईन उठावदार आहे. राजेश रोशनचं संगीतही आश्चर्यकारक रीतीनं चांगलं आहे. त्यामुळे या चित्रपटातील गाणी गुणगुणत राहावीत अशी आहेत. त्यात हृतिकचं सफाईदार नृत्य. अंध व्यक्तीनं केलेलं नृत्य कसं असेल, याचं भान सांभाळून ते हृतिकने केलेलं असल्याने नेहमीपेक्षा वेगळं आहे. संवाद या चित्रपटात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अगदी साधे, सोपे ते खटकेबाज अशी सगळी रेंज आहे. शिवाय त्या संवादांना पटकथेतसुद्धा महत्त्व आहे. चित्रपटाची अॅक्शनसुद्धा विचारपूर्वक आणि सांभाळून केलेली जाणवते. अर्थात ती काही ठिकाणी अति फिल्मी होते म्हणा! पण तेवढं ठिक आहे.

तसा मी हृतिक रोशनचा चाहता नाही, पण ‘काबिल’ पाहिल्यापासून मला त्याचं खूप कौतुक वाटत आहे. रोहन भटनागर साकारताना त्यानं घेतलेली मेहनत, त्याच्या अभिनयातील सहजता, त्याचा स्पर्श, त्याच्या बदलत जाणाऱ्या व्यक्तिरेखेचा आलेख, डबिंग आर्टिस्ट असल्यामुळे काही प्रसंग… सगळीकडे तो कमाल करतो! हा ऋतिकच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट अभिनय म्हणायला काहीच हरकत नाही.

यामी गौतमनेही त्याला तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे. या चित्रपटाचे खलनायक आहेत, रोनित रॉय (माधवराव शेलार) आणि त्याचा भाऊ रोहित रॉय (अमित शेलार). दोघांनी चांगलं काम केलं आहे. रोनित रॉयचं काम तर त्याचा राग यावा एवढं दमदार झालं आहे. फक्त शेलार हे आडनाव ठेवून मराठी बोलण्याचा घाट का घातला हा प्रश्न उरतो. गिरीश कुलकर्णीने आता बॉलिवूड कॉपला सोडून काहीतरी वेगळं करायला हवं. म्हणजे ‘अगली’मध्ये त्याचे संवाद आणि प्रसंग ताकदीचे असल्याने तो जास्त खुलून आला, तसं काही इथं होत नाही.

एकूणच काय तर तुम्ही मसाला चित्रपट एन्जॉय करत असाल, तर्कशुद्ध प्रश्न मनात डोकावल्यामुळे तुमचा चित्रपटातील इंटरेस्ट कमी होणार नसेल आणि जर तुम्ही हृतिकचे चाहते असाल अथवा नसाल तर ते होण्यासाठी ‘काबिल’ जरूर पाहा.

‘काबिल’ खरंच ‘काबिल-ए-तारीफ’ आहे!

 

लेखक एमबीबीएस करत असून चित्रपट आस्वादक आहेत.

ashutosh.jarandikar@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख