अजूनकाही
निष्ठा, त्याग, निष्कलंक वर्तन आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये सत्तेच्या राजकारणात केवढी निरर्थक ठरली आहेत, ते शंभर पानांच्या एका दीर्घकथेत मांडणे तसे अवघड. कारण एवढा सारा मूल्यात्मक कारभार मांडायला प्रदीर्घ कादंबरीच आवश्यक. पण कथाकार उदय प्रकाश यांनी मोठ्या चातुर्याने हा विषय हाती घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक कथानायक केला अन् त्याचा शोकांत दाखवला की, त्यात आलेच सारे अशी त्यांची अटकळ. म्हणून ते संघाने तयार करून ठेवलेल्या मूल्यांचा एक वाहकच आपल्या समोर आणतात.
संघाने आपल्या वर्तनाचा एक देखावा रचलेला आहे. त्यानुसार तो राष्ट्रवादी, धर्मनिष्ठ, अभ्रष्ट आणि सेवाभावी माणून घडवत निघाला आहे, असा कांगावा, सांगावा… सारेच आपल्याला माहीत आहे! त्या पलीकडे असलेला संघ या भव्यदिव्य, प्रतिमेआड पुरता झाकला जातो. उदय प्रकाश यांनी ‘…और अंत में प्रार्थना’ या कथेत आणि त्याच शीर्षकाच्या कथासंग्रहात लबाड, सत्तालंपट, भ्रष्ट आणि नीतिशून्य संघसेवकही पुढे आणला आहे. तोच कसा गेल्या १५-२० वर्षांत वरचढ ठरत चालला आहे, हे या कथानकात फार भेदक रीतीने त्यांनी सांगितले आहे.
कथा तशी जुनी म्हणजे अंदाजे १४-१५ वर्षांपूर्वीची. केंद्रातले भाजपचे सरकार सहा वर्षे सत्ता उपभोगून आटोपल्यानंतरचा काळ या कथेचा आहे. मात्र तीन राज्यांत भाजप सत्तेत आलेला आहे. कथानायक मराठी नावाचा डॉक्टर असला तरी त्याची वाढ मध्य प्रदेशासारख्या हिंदी भाषक राज्यात झाली आहे. त्यामुळे कथा घडते त्या व आसपासच्या राज्यांत. अमराठी वातावरणात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
डॉ. दिनेश मनोहर वाकणकर एक हुशार डॉक्टर व संशोधक आहेत. ते सरकारच्या आरोग्य खात्यात सेवारत आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमावेळीच ते संघाच्या शाखेत जाऊ लागतात. मूळचे महाराष्ट्रीय असल्याने की काय त्यांचा ओढा सावरकर, टिळक, गोळवलकर, हेडगेवार यांच्याकडे जातो. आपल्या मराठी स्व-जातीय स्वाभिमानालाच ते ‘राष्ट्रीय भावना’ म्हणणे सुरू करतात. शिवाजीमहारज त्यांचे नवे नायक बनले असे उदय प्रकाश लिहितात. कारण त्याआधी वाकणकरांनी गांधी, मार्क्स, बुद्ध वाचलेले असतात.
डॉक्टरी पेशा व संघ यांवर त्यांची फार निष्ठा असते. ते इमानदार आणि प्रतिबद्ध असतात. पगाराव्यतिरिक्त ते कोणाकडूनही ना पैसे घेतात, ना आणखी काही. खाजगी उपचारही करत नाहीत. फार्मसी दुकाने, अन्य डॉक्टर्स यांच्या कमिशनमध्ये ते सहभागी नसतात. उघड आहे, असा ताठ कण्याचा डॉक्टर त्यांच्या आरोग्य खात्यालाच तापदायक ठरतो!
मग ते डायरी लिहू लागतात. त्यांची तगमग व लाडकी मते ते टिपून ठेवतात. भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे, अखंड भारत असला पाहिजे अशी मते घडत असतानाच डॉ. वाकणकर त्यांच्या वाचनाने व लिखाणाने गंभीर व सखोल विचार करू लागतात. हिंसा त्यांना अस्वस्थ करते. गांधीजींची हत्या त्यांना पटत नाही. एकीकडे वंशवाद त्यांना भुरळ घालतो, पण अंतर्मन तो नाकारतो. धर्म व वंश या आधारावर माणसे मारून टाकायची, हा सिद्धान्त त्यांना राक्षसी वाटतो. दैनंदिनीत ते लिहितात - पृथ्वीवर बलवान आणि विकसित जीवच का म्हणून राहावेत? दुर्बल, अल्पविकसित जीवही जगले पाहिजेत. परमपिता परमात्म्याने रचलेली ही सृष्टी आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकार आणि त्याचे तत्त्वज्ञान मांडून कोण कसा काय नष्ट करू शकतो? मला वाटते, फासिझम किंवा तसा सर्वसत्तावादी वंशवाद ईश्वराविरुद्ध सैतानाने केलेला कट आहे!
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘अ दिल्ली ऑब्सेशन’ : मोदीराष्ट्र आणि हिंदू-मुस्लीम नात्याचा वेध
..................................................................................................................................................................
डॉ. वाकणकरांचा एक मित्र सलाईनमधल्या भेसळीमुळे मरतो. ते या भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करतात. पण लगेच त्यांच्या बदलीचा आदेश जारी होतो. त्याविषयी डॉ. वाकणकर दैनंदिनीत लिहितात – आमच्या देशात हिंदू मारला जातो आहे तो बहुतांश हिंदूकडूनच. डॉ. मिश्रा हिंदूच होते आणि थुकरा महाराज (त्यांचा मित्र) हिंदू होता. जीवघेण्या नकली औषधांचे व्यापारी हिंदूच आहेत. हद्द अशी की, यातले अनेक जण हिंदू राष्ट्राचे समर्थक आहेत. संघाला पैसे आदींची मदत करत असतात… भविष्यात कधी हिंदूराष्ट्र बनलेच तर ते कोणत्या हिंदूंचे राष्ट्र असेल? डॉ. मिश्रांचे की थुकरा महाराजांचे?
वाकणकरांची बदली दूर आदिवासीबहुल गावात केली जाते. तिथे ते १४ वर्षे काढतात. मनापासून रुग्णसेवा करतात. आदिवासी जीवनाचा अभ्यास करतात. त्यांच्यातल्या पारंपरिक औषधांवर निबंध लिहितात. त्या भागात पिण्याच्या पाण्यापासून खूप रोगराई वाढते. वाकणकर त्याविरुद्ध तक्रार करतात. मात्र त्यांना धुडकावले जाते. डॉक्टरांच्या गावातच पंतप्रधानांचा दौरा असतो, तेव्हा जिल्हाधिकारी अपमानास्पदरीत्या वाकणकरांना पंतप्रधानांची खानपानसेवा सांभाळण्याचे काम सोपवतो. ते प्रदूषित पाणी पंतप्रधान प्यायला हातात घेतात, तेवढ्यात ते वाकणकर ओढून त्यांना थांबवतात. मग काय, वाकणकरांचे महत्त्व एकदम वाढते. पण ते संघाचे स्वयंसेवक असल्याचा सीआयडीचा अहवाल जातो आणि त्यांची पुन्हा बदली होते.
नवे बदलीचे गाव एका खाणीमुळे नावारूपाला आलेले असते. पूर्वीच्या गावी वाकणकर जी लोकसेवा बजावत त्याने नक्षलवादी कारवायांचा धोका असल्याचा अहवाल गेल्याने डॉ. वाकणकर बुचकळ्यात पडलेले असतात. संघ व नक्षलवादी सारखे कसे काय असू शकतात? आपल्याला त्यांचे काही पटत नसताना आपण व ते यांत साधर्म्य कसे काय? असा प्रश्न ते स्वत:ला करत नव्या गावीही संघाच्या शाखेत सक्रिय होतात. शाखा त्यांच्यामुळे वाढत जाते.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘अ बर्निंग’ : असहाय, निरपराध, गरीब, मुसलमान तरुणीची करुण, टोकदार शोकांतिका
..................................................................................................................................................................
या गावी वाकणकरांना काही उलगडा होतो. ते पाहतात की, संघाचा कारभार व कार्यक्रम व्यापारी व सवर्ण यांच्यापुरतेच मर्यादित असतात. आदिवासी व अन्य जाती शाखेत आणाव्यात असे वाकणकर इच्छितात, पण त्यांना संघाची रचना तसे करू देत नाही. ते त्याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करतात. त्यांना त्रोटक उत्तरे मिळतात. हिंदूमध्ये एकत्वाची भावना निर्माण करायला आणि वेद, उपनिषद, पुराणे यांतल्या धर्माच्या मूळ रूपातला समाज तयार करायला संघ सांगतो खरा. मात्र त्याचा उद्देश काही वेगळाच असावा असा संशय वाकणकरांना येत राहतो.
त्यांच्यात संघ इतका मुरलेला असतो की, त्यांनी चारही मुलींची नावे पूजा, उपासना, प्रार्थना व तपस्या अशी ठेवलेली असतात. पण त्यांच्या इमानदार, त्यागी व निष्ठावंत जगण्याला त्यांची बायको वैतागलेली असते. ज्योत्स्ना वाकणकरांना आपला नवरा एक क्रूर हुकूमशहा असून वरकरणी तो मुलांसारखा सरळ व निष्कपट वाटतो. कित्येक वर्षे आपण त्याच्या कैदेत आहोत, पण आता हा हुकूमशहा शक्तीहीन झाला असून त्याविरुद्ध कधीही बंड होऊ शकते, अशी काळजीही त्यांना वाटत राहते.
होतेही तसेच. मध्य प्रदेश व अन्य तीन राज्ये भाजपच्या हातात जातात. डॉ. वाकणकरांना मंदिर-मशिद वाद, हिंदू-मुस्लीम तेढ या ध्रुवीकरणाचे धक्के जाणवत राहतात. सत्ता मिळताच सरकारी योजनांत अनेक संघ कार्यकर्ते हिस्सा मिळवू लागतात. कंत्राटे, कमिशन, परमिट, परवाना, नोकरशाही यांना अमाप महत्त्व प्राप्त होते. मित्र त्यांना सांगतात, डॉक्टर आता चांगल्या ठिकाणी बदली करवून घ्या! संघामुळे जो त्रास भोगावा लागला, त्याची वसुली आता करा!
मग डॉक्टर दैनंदिनीत लिहितात – आजकाल संघात जी स्थिती उदभवलीय तिने मी विचलित झालो आहे. गुरुजींनी संघसदस्यांना नैतिक व धार्मिक निष्ठा निर्धारित करून दिल्या होत्या. त्यांची कोणाला आज पर्वाच नाही. राज्य असे काही शक्तीतंत्र दिसते, जे त्याच्याजवळ येणाऱ्या पक्षाला, संघटनेला, विचारधारेला गिळून टाकते की काय! साऱ्यांना आपला तो जुना, परिचित चेहरा बहाल करत सुटते. आजकाल मी संघात वेगळा पडत चाललो आहे. असे वाटते की, वर्षानुवर्षे बुभुक्षित, अतृप्त, लोलुप लोकांची जमात संघात एकत्र होती आणि आता पक्वान्ने दिसल्याबरोबर त्यावर अश्लील व अनैतिक रूपात तुटून पडली आहे. हेच लोक मला अव्यवहारी ठरवत आहेत! भ्रष्ट व लाचखोर अधिकाऱ्यांची आम्ही यादी बनवली, ती नेत्यांनी दाबून टाकली!
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अशी ही कथा संपता संपता वाकणकरांच्या गावात एक दंगल होते. पोलिसांच्या गोळीने एक मुस्लीम ठार होतो. पण ‘तो दगडफेकीत मेला असा अहवाल शवविच्छेदनानंतर द्या’, असा दबाव वाकणकरांवर येतो. त्यांना मंत्री, जिल्हाधिकारी वगैरे धमकी देतात. प्रलोभनही दाखवतात. शेवटी वाकणकर शवविच्छेदनाला तयार होतात. जीपमधून जाताना ‘नमस्ते सदा वत्सले’ गुणगुणतात. शल्यकर्म करता करता ‘गणेशस्तोत्र’ म्हणतात आणि शेवटी अहवालात नोंदवतात की, गोळी लागूनच माणूस मेला आहे. त्याच ठिकाणी ब्रेन हॅमरेज होऊन वाकणकर गतप्राण होतात. इकडे त्या मुस्लिमाचा मृतदेह, तिकडे डॉ. वाकणकर. उभे सारे अधिकारी त्यांच्या नावे शिव्या घालत राहतात. कथा संपते.
भाजपचे राज्य आणि संघाचा एक निष्ठावंत डॉक्टर यांच्यातला हा मूल्यात्मक संघर्ष उदय प्रकाश असा काही चितारतात की, तो वाचताना त्याचे अनेक बारकावे आपल्याला थक्क करून जातात. ‘इस कहानी के सभी पात्र काल्पनिक है’ अशी सूचना लेखकाने दिलेली असूनही तो असे लिहीत जातो, जणू तोच वाकणकर आहे. संघाचा दुटप्पीपणा आणि सत्ता, भ्रष्टाचार, नीतीमत्ता याबद्दलचा डळमळीत व्यवहार वाकणकरांएवढाच वाचकालाही उद्विग्न करत जातो. एक उच्चशिक्षित व्यावसायिक मूल्यनिष्ठ जगू पाहतो, पण त्याने ही जी मूल्ये घेतली तीच किती ठिसूळ आणि संधीसाधू असतात, हा त्याला झालेला उलगडा खरे तर तमाम संघ स्वयंसेवक व चाहते यांच्या डोळ्यांत अंजन घालणाराच आहे.
नरेंद्र मोदी यांची आपली अपयश झाकण्याची तारांबळ आणि अत्यंत हटवादीपणे मोदींनाच भजणारी भारतीय जनता पाहता, देशाचा अंत डॉक्टरांसारखा होणार, याची खात्री आहेच. तो कधी ओढवणार हाच प्रश्न आहे…
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment