शब्दांचे वेध : पुष्प सातवे
माझ्या दोन्ही कानांत ‘मॉन्डिग्रीन’ आणि ‘इअरवर्म’ आहेत. माझी कर्णाभूषणे. मात्र भिकबाळी किंवा कुड्यांसारखी ती लटकत नाहीत, तर कानांच्या आत दडून बसली आहेत. कारण ती सांगितीक आहेत.
आता तुम्ही विचाराल हे कोणते दागिने आहेत बुवा? सांगतो. पण त्यासाठी तुम्हाला माझे काही किस्से वाचावे\ऐकावे लागतील.
माझी धाकटी मुलगी सहा-सात वर्षांची असताना एकदा कॅसेट प्लेअरवर जोरजोरात गाणे लावून तिची बार्बी डॉल हातात घेऊन नाचत होती. मी ते गाणे त्याआधी कधी ऐकले नव्हते. तेव्हा मला त्या गाण्याचे काही शब्द असे ऐकू आले -
“ ‘I’m a Barbie girl, in the Barbie world
United Nations, that is your creation
Bhum bhum party, let's go party”
ते ऐकताना मला हा प्रश्न पडला होता की, बार्बी बाहुलीचा United Nations म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाशी काय संबंध असेल? आणि ‘भम भाम पार्टी’ म्हणजे काय? त्याचे उत्तर तेव्हा मला मिळाले नाही. डेन्मार्कच्या अॅक्वा नावाच्या पॉप ग्रुपचे हे गाणे आहे. पुढे कधीतरी यूट्युबवर त्याचे शब्द मला वाचायला मिळाले आणि मला हसूच आले. हे मूळ शब्द असे होते -
I'm a Barbie girl, in the Barbie world
Imagination, life is your creation
Come on, Barbie, let's go party
माझ्या कानातल्या ‘मॉन्डिग्रीन’ने ‘Imagination’चे ‘United Nations’ करून टाकले होते आणि ‘Come on, Barbie’चे ‘Bhum bhum party!’ अशाच पद्धतीच्या आणखीही चुका मी केल्या आहेत, हे मग मला आठवले.
माझ्या लहानपणी लता मंगेशकर यांचे एक भावगीत रेडिओवर नेहमी ऐकू यायचे, ‘प्रतिमा उरी धरूनी’. किती तरी वर्षं मला हे ‘प्रती माऊली धरावी’ असेच ऐकू यायचे.
श्री ४२० मधले ‘रमैय्या वस्तावैया’ हे गाणे मला ‘रामिया वस्कावया’ असे ऐकू यायचे.
डॉ. वसंतराव देशपांडे हे माझे सर्वांत आवडते गायक. त्यांच्या ‘कांते फार तुला’ या नाट्यगीताची सुरुवात माझ्या कानात अशी व्हायची – ‘फळांचे हार तुला’.
वसंतरावांच्या दोन खासगी महफिलींची ध्वनिमुद्रणे यूट्युबवर उपलब्ध आहेत. ती ऐकणे म्हणजे विलक्षण अनुभव आहे. त्यातल्या एकात राजकल्याण राग आहे, तर दुसऱ्यात उग्र किंवा रौद्र पद्धतीने गायलेला मालकंस राग आहे. या राजकल्याणच्या दृत चीजेमध्ये (४४.३०व्या मिनिटाला) मला नेहमी ‘बैजू ऐसे बावरे की’ असे शब्द ऐकू येतात. हे शब्द असे नाहीत, हे मला माहीत आहे. पण प्रत्येक वेळी मला तिथे बैजू बावराच दिसतो. (खरे शब्द काय आहेत हे अजूनही कळलेले नाहीय!)
आणि त्या मालकंसाची तर गंमतच आहे. त्यात १७.३१ मिनिट झाले की, ‘इब्राहिम’ असे नाव माझ्या कानांमध्ये शिरते. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी मालकंस गातात असे साक्षात वसंतरावांनीच त्या महफिलीच्या प्रारंभी सांगितले आहे. त्यांनी जी बंदिश गायली आहे ती आहे ‘सुंदर बदन के मंदर दीपन’.
ही चीज कोणत्या इब्राहिम कवीने लिहिली असावी हे जाणून घ्यायला मी खूप उत्सूक होतो. हिंदू देवतांच्या स्तुतीपर ज्या काही मुस्लीम कवींनी बंदिशी/कवने लिहिली आहेत, त्यात एक इब्राहिमही आहे, हे मला माहीत होते - आणि त्यानेच कदाचित ही बंदिशदेखील लिहिली असावी, असे वाटत होते. (हा इब्राहिम म्हणजे बिजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शहा दुसरा (सन १५७१ ते १६२७). ‘किताबे नवरस’ हा त्याचा काव्यसंग्रह प्रसिद्ध असून त्याची सुरुवातच मुळात देवी सरस्वतीच्या स्तवनाने होते.) पण पुढे माझा याबाबतीत भ्रमनिरास झाला. मालकंसच्या या बंदिशीचे शब्द मी जेव्हा वाचले तेव्हा मला कळले की, त्यात इब्राहिम कुठेच नाही. त्या बंदिशीचे शब्द आहेत -
सा सुंदर बदन के मंदर दीपन, मनरंजन कहे जात छिपे रे.
निकसीत सुंदरता कहे लाजत, अभ्र ही मे मुखचंद्र चके रे.
पुन्हा एकदा माझे मलाच हसू आले. माझ्या कानात शिरणारा तो ‘इब्राहिम’ या ‘अभ्र ही मे’ या शब्दांचा भ्रष्ट अवतार होता तर!
याशिवाय गणेशोत्सवात सामूहिक आरतीच्या वेळी कितीतरी लोकांना मी ‘लंबोदर पीतांबर फळीवर वंदना। सरळ सोंढ वक्रतुण्ड त्रिनयना।’ असे म्हणताना ऐकले आहे, आणि लहान असताना कदाचित तसे म्हटलेही असू शकते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
आता हे जे माझ्या बाबतीतले किस्से मी सांगितले, हा काही क्वचित, एकाटदुकाट येणारा किंवा माझ्या एकट्याचाच अनुभव नाही. हे असे अनेकदा आणि अनेकांच्या बाबतीत घडले आहे आणि पुढेही घडत राहील. तुमच्या बाबतीतही असे काही झाले आहे का, हे आठवून बघा.
एखाद्या वाक्यातले, भाषणातले आणि विशेषकरून गाण्यातले, काही शब्द चुकीचे ऐकणे आणि ते तसेच लक्षात ठेवणे या गोष्टीला ‘मॉन्डिग्रीन’ (mondegreen) असे शास्त्रीय नाव आहे. ही चूक मुद्दाम होत नाही. आपण ते गाणे ऐकत असताना आपल्या नकळत आपल्या कानांवर त्यांचे भ्रष्ट रूपच पडते. मग आपले मन त्या चुकीच्या शब्दांतही अर्थ शोधते.
खूप खोलात न जाता ‘मॉन्डिग्रीन’बद्दल विकीपिडीया काय सांगते ते पाहू.
A mondegreen /ˈmɒndɪɡriːn/ is a mishearing or misinterpretation of a phrase in a way that gives it a new meaning. Mondegreens are most often created by a person listening to a poem or a song; the listener, being unable to clearly hear a lyric, substitutes words that sound similar and make some kind of sense. American writer Sylvia Wright coined the term in 1954, writing that as a girl, when her mother read to her from Percy's Reliques, she had misheard the lyric "layd him on the green" in the fourth line of the Scottish ballad "The Bonny Earl of Murray" as "Lady Mondegreen".
In a 1954 essay in Harper's Magazine, Wright described how, as a young girl, she misheard the last line of the first stanza from the seventeenth-century ballad The Bonnie Earl O' Moray. She wrote: When I was a child, my mother used to read aloud to me from Percy's Reliques, and one of my favorite poems began, as I remember :
Ye Highlands and ye Lowlands,
Oh, where hae ye been?
They hae slain the Earl o' Moray,
And Lady Mondegreen.
The correct fourth line is, "And laid him on the green". Wright explained the need for a new term: The point about what I shall hereafter call mondegreens, since no one else has thought up a word for them, is that they are better than the original. "Mondegreen" was included in the 2000 edition of the Random House Webster's College Dictionary, and in the Oxford English Dictionary in 2002. Merriam-Webster's Collegiate Dictionary added the word in 2008.
विकीपिडीयाच्या या प्रविष्टीत ‘Mondegreen’चा अनुभव का येतो, याबद्दल मानसशास्त्रीय खुलासाही करण्यात आला आहे. जिज्ञासूंसाठी https://en.wikipedia.org/wiki/Mondegreen या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘गारदी’ म्हणजे नक्की कोण, या कोड्याचे उत्तर मला तरी अजून मिळालेले नाही!
..................................................................................................................................................................
‘मॉन्डिग्रीन’ या इंग्रजी शब्दाला मराठीत समानार्थी/पर्यायी शब्द आढळत नाही. पण हिब्रू, डच, फ्रेंच, जर्मन, रशियन, पोलिश, आणि पोर्च्युगीज या भाषांमध्ये असे पर्याय आहेत. मराठीत या अर्थाचा असा एखादा नवा शब्द तयार होऊ शकेल का?
आधुनिक भाषाशास्त्रात ‘मॉन्डिग्रीन’ आणि तत्सम अनेक संकल्पनांचा अभ्यास केला गेला आहे. यात ‘ओरोनिम’, ‘एगकॉर्न’, आणि ‘पॅरिडोलिया’ यांचाही समावेश होतो.
माझ्या कानात लपून बसलेला दुसरा सांगितीक दागिना आहे – ‘इअरवर्म’ (earworm).
‘इअरवर्म’ म्हणजे कानातला कृमी (खराखुरा नाही - त्या किड्याला ‘इअरविग’ (earwig) म्हणतात.) हा इअरवर्म सांगितीक आहे. मी गाण्यावर प्रेम करणारा एक हाडाचा कानसेन आहे. त्यामुळे माझ्या कानात असे खूप गाणारे कृमी - किडे लहानपणापासूनच वळवळत आले आहेत. याही शब्दाला मराठीत नेमका प्रतिशब्द सांगता येणार नाही. कधीकधी असे होते की, तुम्हाला अत्यंत आवडलेल्या एखाद्या गाण्याचे शब्द अथवा संगीतरचनेचे सूर सतत किंवा बराच काळ तुमच्या मनात घोळत राहतात. तुम्ही जिथे जाल तिथे ते सोबत येतात, तुमचा पिच्छा सोडत नाहीत. तुम्हाला ते सतत आठवत राहतात. गुणगुणावेसे वाटतात. झोपेतसुद्धा ते साथ देतात. हा जो सांगितीक अनुभव आहे, त्याला इंग्रजीत ‘इअरवर्म’ (earworm) अशी संज्ञा आहे.
माझ्या लहानपणी (म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी) आकाशवाणी मुंबईच्या ‘अ’ केंद्रावरून रोज सकाळी अकरा वाजता ‘कामगार सभा’ नावाचा कार्यक्रम प्रसारित केला जात असे. त्यात सुमधुर मराठी गाणी ऐकवली जायची. त्या वेळी माझ्या माहितीतल्या अनेक महिला नागपूरसारख्या दूरच्या ठिकाणीसुद्धा अगदी कमजोर सिग्नल असले तरी आवर्जून आपल्या रेडिओसेटवर हा कार्यक्रम ऐकायच्या. या कार्यक्रमाची सुरुवात एका विशिष्ट सिग्नेचर ट्यूनने (परिचयात्मक धून) व्हायची. ती मला इतकी आवडायची की, मी ती सतत शिट्टीवर वाजवत असे किंवा गुणगुणत असे. वयानुसार अन्य व्यवधाने वाढली तसे माझे हा कार्यक्रम ऐकणे बंद झाले. आता अजूनही हा कार्यक्रम सादर केला जातो का, कोण जाणे! पण (आणि मुद्दा हा आहे की) आजही मला ती धून आठवते. नुसतीच आठवते असे नाही तर वेळोवेळी ती माझ्या कानात रुंजी घालत असते. माझ्या ओठांवर खेळत असते. मला ती पुन्हा ऐकायची आहे.
शक्य असेल तर माझ्या संग्रही ठेवायची आहे. पण जंगजंग पछाडले तरी या ट्यूनचे ध्वनिमुद्रण मला अद्यापी मिळाले नाही. (डी. अमेंबल यांची ही संगीतरचना असावी, असा माझा अंदाज आहे.) अशा अनेक संगीत रचना मला अधूनमधून छळत असतात. ड्यूक एलिंग्टन (Duke Ellington)च्या ‘Take the A Train’चा सुरुवातीचा तुकडा (व्हॉईस ऑफ अमेरिका रेडिओ स्टेशनवर विलिस कॉनोव्हरच्या ‘जाझ अवर’ या जगप्रसिद्ध कार्यक्रमाची ही सिग्नेअर ट्यून होती); श्री लंकेच्या राष्ट्रगीताची धून, मुग्धा वैशंपायनचे पद्मनाभा नारायणा, वसंतरावांचा जनसंमोहिनी आणि राजकल्याण, जसराजजींचा गोरखकल्याण, माणिक वर्मांची बरीच गाणी, मोगूबाई कुर्डीकरांनी गायलेले वंदे मातरम (पं. व्ही. डी. अंभईकरांची चाल); उस्ताद आमिरखांसाहेबांचा दरबारीचा तराना... किती किती नावे सांगू? या आणि अशा ‘इअरवर्म’मुळे मी बहुतेक वेळी संगीताने भारलेल्या अवस्थेत वावरत असतो.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : प्रेमाच्या अमृते रसना ओलावली (व्हलप्चस ते उमामी ते काहीतरी ‘निराकार’पर्यंत)
..................................................................................................................................................................
‘इअरवर्म’ला ‘ब्रेनवर्म’ (brainworm), ‘स्टिकी म्युझिक’ (sticky music), ‘स्टक साँग सिंड्रोम’ (stuck song syndrome), किंवा ‘इन्व्हॉलंटरी म्युझिकल इमॅजरी’ (Involuntary Musical Imagery (IMI) ) अशीही नावे आहेत. मनाला चिकटून बसलेले गाणे. ‘इअरवर्म’ या इंग्रजी शब्दाचे मूळ ‘Ohrwurm’ या जर्मन शब्दात आहे. डेस्मंड बॅगलीच्या ‘फ्लायअवे’ या १९७८ सालच्या कादंबरीत या शब्दाचा सर्वप्रथम वापर करण्यात आला, असे मानले जाते.
‘इअरवर्म’ या शब्दाला मराठीत काय म्हणायचे? मी स्वतः त्याला ‘कर्णपिशाच्च’ म्हणतो. हो, तेच, भूतांच्या जगात आढळणारे आणि त्याला वश करणाऱ्या माणसाच्या कानात लपून बसणारे सूक्ष्म अमानवी ‘अस्तित्व(?)’. एरवी मी भुतांवर विश्वास ठेवत नाही पण ‘इअरवर्म’ला ‘सांगितीक कर्णपिशाच्च’ हाच शब्द योग्य आहे असे मला वाटते. हे सांगितीक भूत सतत तुमच्या कानात गात असते. बहुतेक वेळी हा एक सुखद अनुभव असतो - पण अतिरेक झाला की, काहींना त्याचाही त्रास होऊ लागतो. कधी कधी तर ती एक वैद्यकीय समस्या बनते.
गूढविद्येवर, जादूटोण्यावर विश्वास ठेवणारे लोक बरेच आहेत. त्यातले काही लोक जसे स्वतःला ‘क्लेअरव्हॉयंट’ (clairvoyant) म्हणजे दिव्यदृष्टी असणारे म्हणवतात, तसेच काही लोक स्वतःला ‘क्लेअर-ऑडिअंट’ (clairaudient) दिव्य श्रवणशक्ती असणारे मानतात. सामान्य कानांना ऐकू न येणारे आवाज (जसे मृतात्म्यांचे आवाज) ऐकू शकण्याची दैवी शक्ती आपल्यात आहे, असा ते दावा करतात. ‘Clairvoyance’ किंवा ‘clairaudience’वर विश्वास ठेवणारे लोक खरे तर सायकिक म्हणजे मानसिक रोगी असू शकतात. शेरलॉक होम्ससारख्या तर्ककर्कश, वैज्ञानिक दृष्टी असलेल्या पात्राचा निर्माता कॉनन डॉयल हा स्वतः परलोकविद्यावादी आणि गूढविद्येवर विश्वास ठेवणारा होता, हे एक कटू सत्य आहे. कॉनन डॉयलप्रमाणेच कितीतरी इतर लोकांचा या गोष्टींवर विश्वास असतो.
विज्ञान मात्र हेच सांगते की, हे सगळे मनाचे खेळ आहेत. पण ‘इअरवर्म’ हा जरी एका अर्थाने मनाचा खेळ असला तरी त्यालाही काही वैज्ञानिक आधार आहे. ‘इअरवर्म’ आणि ‘clairaudience’मध्ये फरक आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सांगतो, त्यासारखा ‘इअरवर्म’ हा मेंदूत झालेला एक केमिकल लोच्या असतो. तो नक्की का होतो, कसा होतो, त्यामुळे काही अपाय होऊ शकतो का, त्यावर उपाय काय, हे जाणून घेण्यासाठी ‘म्युझिकोफिलिया’ (Musicophilia) नावाचे एक अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे, ते वाचा. डॉ. अलिव्हर सॅक्स यांनी यात काही केस स्टडीजद्वारे संगीत आणि मानवी मन/मेंदू यांचा किती अन्योन्य संबंध आहे, हे सप्रमाण दाखवून दिले आहे. अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक कथांसारख्या अद्भुत अशा या सत्यकथा आहेत.
एका कथेत ज्याचा संगीताशी बालपणी अगदी जुजबी संबंध आला होता, असा एक सर्जन प्रौढपणी एका अपघातानंतर कसा अचानक संगीतमय होतो आणि पुढे आपली वैद्यकी सोडून देऊन फक्त संगीताच्या सेवेत रमतो, हे सांगितले आहे. तर एका कथेत संगीतच ज्याचे जीवन होते, अशा एका माणसाला एक दिवस संगीत अचानक सोडून जाते, हे वाचायला मिळते. या अशा कहाण्या वाचताना संगीताची शक्ती बघून आपण खुळावल्यासारखे होतो. ‘Musicophilia’ म्हणजे ‘संगीतावरचे अतोनात प्रेम’.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
याउलट ‘Amusia’चे रोगी म्हणजे ज्यांना संगीताची आवड नाही, ज्यांना संगीतातले ‘ओ’ का ‘ठो’ कळत नाही, किंवा ज्यांना संगीत सोडून गेले आहे, अशा प्रकारची माणसे. शेक्सपिअरने अशा नीरस माणसांचे फार छान वर्णन केले आहे -
“The man that hath no music in himself,
Nor is not moved with concord of sweet sounds,
Is fit for treasons, stratagems, and spoils;
The motions of his spirit are dull as night,
And his affections dark as Erebus.
Let no such man be trusted. Mark the music.”
अर्थात हा एक प्रकारचा मानसिक आजारही असून शकतो, हे वैद्यकीय मत त्याच्या काळात उदयाला यायचे होते.
संगीत आणि मानवी मेंदू यांच्यातल्या संबंधांवर डॉ. अनिरुद्ध पटेल यांचे ‘Music, Language, and the Brain’ या नावाचे असेच एक नावाजलेले पुस्तक आहे. त्यात त्यांनी ‘neuroscience’ म्हणजे मज्जातंतू विज्ञानाच्या नजरेतून भाषा आणि संगीत यांच्यात काय नाते आहे, हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे. संगीत आणि विज्ञान या दोन्ही विषयांत ज्यांना रुची आहे, त्यांनी ही दोन्ही पुस्तके आवर्जून वाचायलाच हवीत. अगदीच काही नाही तर तुम्हाला खूप सारे नवीन (किंवा सामान्य लोकांना सहसा माहीत नसलेले) वैद्यकीय शब्द वाचायला मिळतील.
तात्पर्य हे आहे की तुमच्या कानात ‘इअरवर्म’ घुसला असेल तर तुम्हाला शेक्सपिअर शिव्या देणार नाही.
संगीतविषयक आणखी काही शब्द पुढच्या भागात.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Nitin
Mon , 07 September 2020
https://youtu.be/cSF-xz19x_s That tune link.