आज ०५ सप्टेंबर, म्हणजे ‘शिक्षक दिन’. या दिवसाचे महत्त्व आणि औचित्य आपण जाणतोच. या निमित्ताने एक अभिनव उपक्रम अकोला येथील अमित दरेकर, रामभाऊ उगले, उमेश सरप, कमलेश चौधरी आणि शैलेन्द्रकुमार कडून या शिक्षकांनी सुरू केला आहे. बरोबर तीन वर्षांपूर्वी या दिवसापासून सलग तीन दिवस ‘अक्षरनामा’वर तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक श्रीनिवास हेमाडे यांची ‘शिक्षक दिन ते मास्तरडे (मास्तर-डे!) – एक शोकांतिक प्रवास’ ही लेखमालिका प्रकाशित झाली होती. ती या शिक्षकांना फारच भावली. या लेखमालिकेत हेमाडे यांनी ‘शिक्षण’क्षेत्रातील अनेक तत्त्ववेत्त्यांची आणि त्या अनुषंगाने तत्त्वविचारांचा धावती ओळख करून दिली आहे. तिने प्रभावित होऊन या शिक्षकांनी आजपासून ‘तत्त्वमूळाक्षर वाचनकट्टा’ सुरू केला आहे. त्यातून दर्जेदार साहित्याचा आनंद सर्वांना घेता यावा आणि त्यासोबतच जगातील विविध तत्त्वज्ञानाची किमान तोंडओळख व्हावी, त्यावर चर्चा व्हावी, हा त्यांचा उद्देश आहे. या उपक्रमाची सुरुवात हेमाडे यांच्या या लेखापासून होत आहे. त्यानिमित्ताने ही लेखमालिका दोन भागात पुनर्प्रकाशित करत आहोत.
..................................................................................................................................................................
भारतीय समाजाचे दोन चेहरे आहेत. एक जाहिरातीचा आकर्षक सुंदर स्वप्नमय चेहरा आणि दुसरा अतिशय कुरूप, शोषक, भीषण वास्तव चेहरा. जाहिरातीचा चेहरा स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच ‘मेरा भारत महान’ची दवंडी पिटवून आणि स्वातंत्र्योत्तर काळानंतर ‘जगातील मोठी लोकशाही’चा बेन्जो, डीजे आदळत समोर येतो. कुरूप, शोषक चेहरा वर्णजातीयवादी राजकारणातून जाणवतो. तो खूप कष्ट घेऊन शोधावा लागतो. समोर आणला तरी तो मान्य केला जात नाही. भारताचे अधिकृत तत्त्वज्ञान म्हणून अद्वैत वेदान्ताला मान्यता आहे. ‘जीव हाच ब्रह्म’ (प्रथमपुरुषी एकवचनी = ‘‘अहं ब्रह्मास्मि!’’). ‘दोन नाही तर एकच’ ही या तत्त्वज्ञानाची शिकवण आहे. ती व्यवहारात वरील दोन चेहऱ्यांच्या अद्वैतात शोधता येते.
या जाहिरातीच्या आकर्षक, मुलायम चेहऱ्याच्या मेकअपचे फाऊंडेशन प्रामुख्याने भारतीय वैदिक हिंदू धर्मातून घालण्यात आलेले आहे. त्याचीच लागण इतर भारतीय धर्म म्हणजे जैन, बौद्ध आणि शीख या धर्मांनाही झाली आहे. नंतरच्या कालखंडात तीच लागणीची लस इथं स्थिरावलेल्या इस्लाम, ख्रिश्चन या धर्मांनाही आपसूकच टोचली गेली आहे. या नव्या अभारतीय धर्मांचाही एक आकर्षक चेहरा तयार करून त्यांनाही सनातन वैदिक धर्माने अगदी कचाट्यात पकडले आहे. त्यांचा हा जाहिरातीचा आकर्षक चेहरा म्हणजे ‘भारतीय इस्लाम’, ‘भारतीय ख्रिश्चन’ इत्यादी. त्यांचेही मूळ चेहरे भारतीय वैदिक हिंदू धर्माच्या मूळ चेहऱ्याप्रमाणे कुरूपच आहेत. विद्यमान भारत सर्वधर्मीय देश असल्याने आजच्या शिक्षणव्यवस्थेत या सर्वधर्मियांचा सहभाग आहे.
‘भारतीय शिक्षक दिन’ या दोन चेहऱ्यांच्या कात्रीत सापडला आहे. ‘शिक्षक दिन’ या शिक्षकांच्या सणाला ‘मास्तर-डे’ असे स्वरूप आलेले आहे. त्याचा शोध या लेखमालिकेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मूळ ‘मास्टर’ (Master) संकल्पनेची खिल्ली उडवून, तिचे विडंबन करून भारतात ‘मास्तर’ करण्यात आला, त्या मूळ ‘मास्टर’ (Master) संकल्पनेचा इतिहास आणि महत्त्व या लेखमालिकेत स्पष्ट केले आहे. त्यानंतर भारतात ‘शिक्षक दिन’ हा ‘मास्टर्स - डे’ (Master’s Day) ऐवजी ‘मास्तर-डे’ कसा झाला हे स्पष्ट केले आहे. त्यानंतर ‘मास्तर-डे’ होण्याच्या घटनेमागे भारतीय सामाजिक व सरकारी ध्येयधारणा कशी उभी आहे, याचे किंचित विश्लेषण केले आहे.
‘Master’ संकल्पनेचे स्वरूप
‘Master’ ही ग्रीक संकल्पना आहे. त्याचा अर्थ तज्ज्ञ पण प्रज्ञानी माणूस. प्रज्ञानी (wise) या शब्दाला विशेष अर्थ आहे. तो म्हणजे प्रज्ञानाचा प्रेमिक (Lover of Wisdom) म्हणजे Philosopher. ग्रीकांच्या मते विश्वाची गुंतागुंतीची रचना करणारा ईश्वर हाच खरा प्रज्ञानी असून माणूस प्रज्ञानी असू शकत नाही. पण माणूस ईश्वराच्या सर्वगुण संपन्नतेवर, त्याच्या प्रज्ञानावर प्रेम करणारा प्रेमिकतर असू शकतो. म्हणून ग्रीकांनी Philosopherची व्याख्या Lover of Wisdom अशी केली. ही व्याख्या पायथागोरसने शोधली.
Philosopher आणि Philosophy हे शब्दही पायथागोरसनेच शोधले, असे म्हणतात. पायथागोरसच्या काळी ग्रीसमध्ये गुरुने ज्ञानदान केवळ ज्ञानाच्या प्रसारासाठीच करावे, पैशासाठी करू नये, असा समज होता. कारण Wisdom म्हणजे ईश्वराचे ज्ञान. ही पवित्र गोष्ट असून ईश्वर ज्यांच्यावर कृपा करतो त्यांनाच तो ‘प्रसाद’ म्हणून देतो. ईश्वराचे ज्ञानाचे स्वरूप काय आहे? तर विश्वाचा निर्मिक, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, विश्वाचा चक्रवर्ती इत्यादी स्वरूपाचे असण्यातच परमेश्वराचे प्रज्ञान दडलेले आहे. हे असे उदात्त स्वरूप हाच ईश्वराचे ‘प्रज्ञान’ आहे. हा दैवी गुण असल्याचे भान ज्यांना येते ती माणसे म्हणूनच अतिशय सावध भूमिका घेतात : ती माणसे स्वत:ला ‘प्रज्ञानी माणसे’ (Wise Men) समजत नाहीत, तर केवळ प्रज्ञानाचे प्रेमिक’ (The Lover of Wisdom = Philosopher) म्हणवून घेतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
ही व्याख्या नंतर बदलत गेली. माणूसही प्रज्ञानी आहे. प्राण्याकडे प्रज्ञान असू शकत नाही. ‘प्रज्ञान’ हे मानवी व्यक्तीकडेच असणारे वैशिष्ट्य आहे. अर्थात त्याचे स्वरूप वेगळे आहे. पण म्हणून माणसातसुद्धा प्रत्येक व्यक्ती प्रज्ञानी असेल असे नाही. काही जणच प्रज्ञानी असतात. बहुतेक जण जगाच्या स्पर्धेत उतरलेले असतात. मानवी प्रज्ञान दोन प्रकारचे आहे. पहिले त्याला स्वत:ला स्वत:च्या ज्ञानाच्या मर्यादांचे ज्ञान असणे आणि दुसरे ईश्वरनिर्मित जग, माणसांचे जग, माणसाने निर्माण केलेले सामाजिक व नैसर्गिक जग यांचे ज्ञान असणे.
माणसाचे प्रज्ञान कशात आहे? ते कसे व्यक्त होते? तर मुख्य म्हणजे माणूस जन्ममृत्यूने बांधला गेलेला आहे. त्याच्या क्षमतांच्या तुलनेत माणसाचे ईश्वराविषयीचे, विश्वाविषयीचे, विश्वातील अनेक गोष्टींविषयीचे ज्ञान मर्यादित आहे. त्यात जन्ममृत्यूच्या अज्ञानाची भरसुद्धा आहेच आहे. म्हणजेच माणूस अनेक बाबतीत अज्ञानी आहे. पण हे त्याने कबुल केले पाहिजे. व्यवहारात आपण पाहतो की, अनेक माणसे स्वत:ला शहाणी समजतात, इतरांना अज्ञानी. पण मुळात माणसाचे ज्ञानच मर्यादित आहे. ते ओळखणे, हाच माणसाचे प्रज्ञान होय, अशी ग्रीकांची धारणा आहे.
थोडक्यात ईश्वरी प्रज्ञानाचे ज्ञान होऊ शकत नाही आणि स्वत:चे ज्ञान तर मर्यादितच आहे; मर्यादा म्हणजे अनेक बाबतीत अज्ञान असणे. तेव्हा स्वत:च्या अज्ञानाचे ज्ञान असणे हाचमानवी प्रज्ञान होय. आपली मर्यादा कबूल करण्याची माणसाची ही विनम्रताच तर त्याच्या ‘प्रज्ञानी’ असण्याचे प्रसादचिन्ह आहे.
पायथागोरसची ही भूमिकाच नंतर ग्रीक तत्त्वज्ञानाचा मुगुटमणी सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता सॉक्रेटीसची (इ.स.पू.४६९-३९९) अधिकृत भूमिका बनली. म्हणूनच तर सॉक्रेटीस स्वत:ला नम्रपणे अज्ञानी समजतो. तो म्हणतो ‘I do not think, that I now : what I do not know’ (‘मी असा विचार करत नाही की, मला जे माहीत नाही, ते मला माहीत आहे’.) याचा अर्थ असा की, मला काहीही ज्ञान नाही आणि असलेच काही ज्ञान तर मला माझ्या अज्ञानाचे ज्ञान आहे’. अशा स्पष्ट शब्दांत अज्ञान कबूल करणारा सॉक्रेटीस हा जगातील शहाणा माणूस आहे. (आजही!) या काटेकोर अर्थाने असे म्हणता येईल की, ‘मानवी प्रज्ञान म्हणजे सारासार विवेक, सारासार विचार, तारतम्य, commonsense’ होय. त्यात न्याय, प्रेम, करुणा, ज्ञान सहिष्णुता, वैचारिक उदारता अशा सदगुणांचा प्रज्ञानात सामावेश असतो. हा मानवी प्रज्ञान पहिला प्रकार.
मानवी प्रज्ञान दुसरा प्रकार म्हणजे ईश्वरनिर्मित जगाचे, माणसांचे, निसर्ग नियमांचे ज्ञान करून घेणे. त्यासाठी स्वत:ची बुद्धी पूर्णपणे पणाला लावणे. यातून विविध सामाजिक व निसर्ग विज्ञानांचा जन्म होतो. अशा रीतीने ज्ञानरचना करणे, शास्त्रांचा विज्ञानांचा शोध लावणे, त्यात भर टाकणे, अभ्यास करणे, संशोधन करणे हे ‘Master’ असण्याचे लक्षण आहे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘मेमरी इन द एज ऑफ अॅम्नेशिया’ : आखिर सईद अख़्तर मिर्झा को गुस्सा क्यों आता है?
..................................................................................................................................................................
अशा रीतीने दोन ज्ञानाचे ज्ञान असणे म्हणजे असणे ‘Master’ होय. पहिले स्वत:च्या अज्ञानाचे ज्ञान आणि मग ते अज्ञान दूर करण्यासाठी ज्ञानाची निर्मिती. अज्ञानी माणूस ज्ञानाचा आणि जगाचा जो शोध घेईल त्यातून विविध विषयांमध्ये तज्ज्ञ होईल. त्याला मग ‘Master’ म्हणावे. जगात असे केवळ तीनच ‘Master’ झाले. ते पाहण्यापूर्वी आपण ‘Master’ या शब्दाची माहिती घेऊ.
प्रचलित इंग्लिशमधील ‘Master’ ही संज्ञा जुन्या इंग्लिशमधील mæġester (maegester) शब्दापासून बनते. mæġester (maegester) हा शब्द लॅटिनमधील magister (chief, superior, director, teacher) या शब्दांपासून बनतो. तो जुन्या फ्रेंचमध्ये maistre, mestre असे रूप धारण करतो. magisterचा अर्थ magis (more or great 0r magnus) + -ter.
संज्ञेची व्युत्पत्ती पुरुषप्रधानतेशी जोडलेली आहे. ती विधानात अथवा वाक्यामध्ये नाम, विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद अशा कोणत्याही ठिकाणी स्थानबद्ध होऊन जन्मसिद्ध अधिकार गाजविते. Magister हे पुरुषासाठी तर Magistra हे स्त्रीसाठी वापरले जाणारे शब्द आहेत. इंग्लिशमधील Mister हे उपपद knighthood किताबप्राप्त पुरुषासाठी राखून ठेवले गेले. या Mister शब्दाची दोन लघुरूपे म्हणजे Mr. (Commonwealth English) किंवा Mr. (American English) (येथे पूर्णविराम महत्त्वाचा आहे. ते काही उगाच दिलेले टिंब नाही.) Misterचे साधारण रूप master हे झाले. Master किंवा sir हे पद विधानात जेव्हा नाम म्हणून येते, तेव्हा त्याचा अर्थ ‘तत्त्वज्ञान आणि उदारमतावादी कला यांचे विद्यापीठीय उच्चशिक्षण घेतलेला अधिकारी पुरुष’ असा असतो. येथे पुरुष म्हणजे स्त्री-पुरुष समासातील ओरिजनल पुरुष. हा मध्ययुगीन अर्थ आहे.
‘Master’ किंवा ‘MASTER’ असे पहिले अक्षर कॅपिटल किंवा सगळा शब्द कॅपिटल लिहिला की, त्याचा अर्थ ‘धर्मगुरु’ असाच होतो. तो दुसऱ्या कोणत्याही अर्थाने घ्यावयाचा नसतो. ईश्वर हाच पहिला ‘MASTER’ अथवा ‘TEACHER’ म्हणून त्याचा पुत्र येशू तोही ‘MASTER’; म्हणून येशूची वचने प्रसारित करतो, तो ‘धर्मगुरू’सुद्धा ‘MASTER’!
‘Master’चे समानार्थी शब्द इंग्लिशमध्ये अनेक आहेत, पण प्रचलित आणि रूढ तसेच विकसित झालेले शब्द पुढीलप्रमाणे : administrator, boss, captain, chief, chieftain, commandant, commander, commanding officer, conqueror, controller, director, employer, general, governor, guide, guru, head, headperson, instructor, judge, lord, manager, matriarch, overlord, overseer, owner, patriarch, pedagogue, preceptor, principal, pro, ruler, schoolmaster/ mistress, skipper, slave driver, spiritual leader, superintendent, supervisor, swami, taskmaster, teacher, top dog, tutor, wheel.
नाम म्हणून ‘Master’ ही संज्ञा १२२५ला प्रथम वापरली गेली. या संज्ञेला १३८०च्या दरम्यान शैक्षणिक अर्थ जोडला गेला. त्यामुळे ‘Master’ ही पदवी मिळवल्यामुळे ‘विद्यापीठात शिकविण्यास पात्र होणारा म्हणजे विद्यापीठ शिक्षक’ असा दर्जा त्यास आला.
‘Master’ ही पदवी
इतकी आशय समृद्धता ‘Master’ शब्दाला असल्यानेच विद्यापीठांनी तिची पदवी बनवली. M.A., M.Sc इत्यादी. बॅचलर (bachelor)च्या पदवीनंतरची ही पदवी असते. आपल्या निवडलेल्या विषयात आपण मास्टर असावे, ही किमान अपेक्षा असते. काही युरोपियन भाषांमध्ये ‘मास्टर्स’ पदवीला असेही नाव आहे. या शब्दाचा अर्थ आपण पाहिलाच आहे. या पदवीची दोन सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध?!) रूपे ‘Master of Arts’ (M.A.) म्हणजे आणि ‘Master of Science’ (M.S., M.Si., or M.Sc.); व हॉर्वर्ड आणि मॅसॅच्युएटस् इन्स्टिट्यूटमध्ये (एमआयटी) अद्यापिही ‘Master of Arts magister atrium’ किंवा ‘artium magiste’ आणि ‘Master of Science’साठी magister scientiae or scientiae magister ही लॅटिन रूपे वापरतात. लघुरूप À.M. आणि S.M.
पदवीचा संक्षिप्त इतिहास
मास्टरची पहिली पदवी अंदाजे बाराव्या शतकात प्रदान झाली असावी. रोमन सम्राट जस्टीनियन (Justinian the Grea, जन्म : ४८२, मृत्यू : १४ नोव्हेंबर ५६५) याने त्याच्या साम्राज्यातील रोम आणि कॉन्स्टॅटीनोपल (आजचे तुर्कस्थानमधील इस्तंबुल) येथील विद्यार्थ्यांना दिलेल्या पदव्यांवर मास्टरची पहिली पदवी आधारित होती. बोलोना (बोलोना, इटली स्थापना १०८८), पॅरिस (स्थापना : ११६० ते १२५९ दरम्यान) आणि ऑक्सर्ड (स्थापना अज्ञात पण १०९६ च्या आसपास अध्ययनास सुरुवात) या विद्यापीठांना युरोपियन विद्यापीठांमधील ‘ओरिजिनल थ्री’ (Original three) म्हटले जाते. या विद्यापीठांमधून कला, कायदा, वैद्यक आणि धर्मशास्त्र या ज्ञानशाखांमध्ये मास्टरची पदवी दिली जात होती. अर्थातच त्या काळात एकमेकांच्या पदव्यांना मान्यता नव्हती.
ही पदवी मिळवणे, ही विद्यापीठात शिकवण्याची मूळ पात्रता समजली जात होती किंवा खरे तर ही पदवी मिळवल्यानंतर विद्यापीठात किमान दोन वर्षे शिकवणे बंधनकारकच होते. त्या काळात ‘Doctor,’ ‘Master,’ आणि Professor’ असा भेद केला जात नव्हता, ही नामाभिधाने वेगळी समजली जात नव्हती. तीनही विद्यापीठात या पदव्या होत्या, एक मिळवली म्हणजे दुसरी मिळवली, असे मानले जात होते.
युरोपात जसे जसे सांस्कृतिक नवजीवन सर्वत्र झिरपू लागले तसतसे विद्यापीठांनी केवळ अभ्यासक्रमातच बदल केले असे नाही, तर शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. परिणामी मास्टर पदवीतही बदल झाला. त्रिकोटी आणि चतुष्कोटी शिक्षण पद्धती सुरू झाली. त्रिकोटी म्हणजे व्याकरण, तर्कशास्त्र आणि काव्यशास्त्र (Trivium = grammar, logic and rhetoric) आणि चतुष्कोटी म्हणजे भूमिती, अंकगणित, खगोलशास्त्र आणि संगीत (the Quadrivium = geometry, arithmetic, astronomy and music). या सात विद्यांचा अभ्यास हा तत्कालीन अभिजात अध्ययनाचा पाया समजला जात होता. मास्टरची पदवी मिळवण्याची प्रवेश पात्रता परीक्षा होती. ‘Trivium’चा अर्थ ‘तीन मार्ग’ आणि ‘Quadrivium’चा अर्थ ‘चार मार्ग’. Trivium आणि Quadrivium हे लॅटिन शब्द आहेत.
‘Doctor’ आणि ‘Master’ यात जो फरक आज केला जातो, तो अंदाजे सोळाव्या शतकात सुरू झाला. संपूर्ण युरोपभर पदव्या सुरू झाल्या आणि वाढू लागल्या, तसतसे मास्टर पदवीचे प्रकार आणि त्यांच्या प्रवेशांच्या अटींमध्ये बदल होऊ लागला. बोलोना विद्यापीठाने ‘बोलोना अॅकॉर्ड’ (The Bologna Accord किंवा The Bologna Process) या नियमाद्वारे युरोपियन विद्यापीठांमध्ये शिक्षण रचनेतच एकसूत्रीकरण करण्याचा पाया रचला. आज ज्या क्रेडिट सिस्टिमचा गाजावाजा चालू आहे, त्याची मूळ मांडणी या नियमानुसार करण्यात आली. त्यात अर्थात प्राथमिक पातळीवर बऱ्याच त्रुटी राहिल्या. पण मुख्य फायदा म्हणजे ‘बॅचलर’ आणि ‘मास्टर’ या दोन मूलभूत पदव्यांचे स्वरूप निश्चित होऊन सर्वत्र स्वीकारले गेले. दोन्ही पदव्यांची वेगवेगळी क्रेडिट सिस्टिम तयार झाली. अशा रीतीने मास्टर पदवीला किमान ९०० वर्षांचा इतिहास आहे. अर्थात आजही विविध जागतिक विद्यापीठांची आणि प्रत्येक देशाची मास्टर पदवीची अट, स्वरूप, रचना आणि अमलबजावणीचे नियम वेगवेगळे आहेत. कारण हा ‘बोलोना अॅकॉर्ड’ आजही परिपूर्णरीत्या स्वीकारलाच गेलेला नाही! मात्र वरील मूळ तीन विद्यापीठांचे नियम मात्र बहुतेक एकसमान आहेत.
जगातील तीन ‘Masters’
ग्रीक-पाश्चात्य परंपरेत अॅरिस्टॉटल (Aristotle- इ.स.पू. ३८४ ते ३२२) हा पहिला ‘Master’ होता. क्रमांक दोनच्या ‘Master’ पदाचा मान आधुनिक विज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीचा प्रणेता लॉर्ड फ्रान्सिस बेकन (Francis Bacon- १५६१ ते १६२६). तिसरा ‘Master’ म्हणजे होमिओपॅथीचा उद्गाता सम्युएल हनिमान (Christian Fiedrich Samuel Hahnemann- १७७५ ते १८४३). विसाव्या शतकात ‘Master’ हा मान विख्यात तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेल (Bertrand Arthur William Russell, 3rd Earl Russell- १८७२ ते १९७०) यांना देणे योग्य ठरते.
अॅरिस्टॉटल
अॅरिस्टॉटल हा असामान्य बुद्धीचा व तर्कशुद्ध रीतीने विचार करणारा महान तत्त्वज्ञ होऊन गेला. सॅाक्रेटिस, प्लेटो आणि अॅरिस्टॉटल अशी पाश्चात्य गुरु-शिष्य परंपरा आहे. सॉक्रेटिस हा आद्यगुरू असून प्लेटो त्याचा शिष्य होता आणि अॅरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य होता. ‘अॅरिस्टॉटल’ या नावाचा अर्थ ‘सर्वोत्तम हेतू’ (Aristotle = the best purpose (aristos = best + telos = purpose OR aim) वरील ग्रीक अर्थाने म्हणजे त्याला स्वत:ला स्वत:च्या ज्ञानाच्या मर्यादांचे ज्ञान होते. म्हणूनच त्याने ईश्वर, माणसांचे जग, माणसाने निर्माण केलेले सामाजिक व नैसर्गिक जग यांचे ज्ञान निर्माण केले.
सर्व ज्ञानाची सुव्यवस्थित रचना करण्याचा आणि ज्ञानाला वैज्ञानिकतेचा दर्जा देण्याचे महान कार्य अॅरिस्टॉटलनेच केले. आज जगाला ज्ञात असलेले सारे विज्ञान व वैज्ञानिक पद्धतीच्या मूळ संकल्पनेची मांडणी त्याने केली. तत्त्वज्ञानाला आणि एकूणच चिंतनविश्वाला त्याने शिस्त लावली. त्याच्या तत्त्वज्ञानाला ‘आद्य तत्त्वज्ञान’ किंवा ‘अंतिम तत्त्वज्ञानाचे चिंतन’ (Metaphysics : The First Philosophy) म्हणतात. त्याने विचार केला नाही, ज्याचे शास्त्र बनवले नाही, असा विषय या जगात नाही, असे म्हटले जाते. त्याने किमान दोनशे पुस्तके लिहिली असावीत, त्यापैकी आज केवळ एकतीसच ग्रंथ उपलब्ध होऊ शकले आहेत, असा अंदाज आहे. अॅरिस्टॉटलने तर्कशुद्ध विचार पद्धती स्पष्ट करण्यासाठी आणि विज्ञान व वैज्ञानिक पद्धतीच्या मूळ संकल्पनेची मांडणी करण्यासाठी ‘The Organon’ (instrument, tool, organ) हा सहा खंडांचा प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला. अॅरिस्टॉटलचा हा ग्रंथ नंतरच्या मानवी ज्ञानविज्ञानाच्या विकासात जणू काही ‘बायबल’ मानला गेला.
अॅरिस्टॉटलचा जन्म थ्रेस प्रांतातील (हा प्रांत आजचा ग्रीस, बल्गेरिया, टर्की या प्रदेशात विभागला आहे. बाल्कन पर्वतराजीजवळ हा भाग येतो.) स्टॅगिरस (विद्यमान ऑलिम्पीयाड नगरी) या शहरी इ.स़ पू़ ३८४ मध्ये झाला. इ स़ पू़ ३६७ मध्ये अॅरिस्टॉटल प्लेटोच्या अॅकॅडेमीत दाखल झाला. तेथे त्याने वीस वर्षे (प्लेटोच्या निधनापर्यंत) अध्ययन केले. प्लेटोच्या मृत्यूनंतर मात्र तो लगेच अॅटेनिअसचा राजा हर्मिअस याच्या दरबारी तीन-चार वर्षे जाऊन राहिला. त्यानंतर मॅसिडोनियाचा राजा फिलिप याच्या निमंत्रणावरून राजपुत्र अॅलेक्झँडर (अॅलेक्झँडर दि ग्रेट) याचा शिक्षक म्हणून त्याने इ.स.पू. ३४२-३३५ असे सात वर्षे काम केले. अॅलेक्झँडेरने आपल्या पूर्वेकडील स्वाऱ्या सुरू केल्यावर तो अॅथेन्सला परतला व त्याने लिसिअम (Lyceum) नावाचे आपले स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापीठांत त्याने १२-१३ वर्षे अध्यापन केले व विद्यापीठाचे सर्व कामकाज पाहिले. शिष्यांसमवेत बागेतून येरझारा घालत शिकवण्याच्या त्याच्या पद्धतीमुळे त्याच्या पंथाला ‘पेरिपेटेटीक स्कूल’ (Peripetetic School) म्हणजे ‘येरझाऱ्या लोकांचा पंथ’ असे नाव पडले. अॅलेक्झँडेरच्या मृत्यूनंतर त्याने यूबियामधील कॅन्सिस गावी पळ काढला व तेथेच तो इ.स पू़. ३२२मध्ये मरण पावला.
अॅरिस्टॉटलला ‘विचारवंताचा विचारवंत’ (The Thinker of the thinkers) किंवा ‘आचार्य’ (The Master) म्हटले जाते. या अर्थाने अॅरिस्टॉटल हा जगातील पहिला ‘आचार्य’ समजला जातो. महाकवि डांटे याने अॅरिस्टॉटलचा गौरव ‘ज्ञानियांचा राजा’ अशा उक्तीत केला आहे. ज्यास खऱ्या अस्सल अर्थाने गुरू (Master) म्हणता येईल, असा अॅरिस्टॉटल हाच जगातील पहिला ‘Master’ आहे.
थॉमस अॅक्विनास हा मध्ययुगीन संत-तत्त्ववेत्ता अॅरिस्टॉटलला ‘The Philosopher’ ही पदवी देतो. विल ड्युरंट हा विसाव्या शतकातील लेखक त्याचा ‘The Encyclopaedia Britannica of ancient Greece’ या शब्दात गौरव करतो. ‘‘संपूर्ण मानवजातीला गेल्या दोन हजार वर्षांत अॅरिस्टॅटलसारखा तत्त्वचिंतक निर्माण करता आला नाही,’’ या शब्दात बर्ट्रांड रसेल अॅरिस्टॉटचे कौतुक करतो.
सम्युएल हनिमान
सम्युएल हनिमान हा जर्मनवंशीय वैद्य आधुनिक आरोग्यविज्ञानाचा जनक मानला जातो. हनिमान हा अतिशय कुशाग्र बुद्धीचा होता. तो उत्तम भाषा तज्ज्ञ होता. त्याला इंग्लिश, फ्रेंच, इटालियन, ग्रीक, लॅटिन, अरबी, सिरियाक, खाल्डियन आणि हिब्रू अशा अनेक भाषा अवगत होत्या. तो अतिशय उत्तम दर्जाचा भाषांतरकार आणि लेखक होता.
हनिमानने औषधोपचारात ‘काट्याने काटा काढावा’ अशा अर्थाने प्रचलित असणारी चमत्कारिक पद्धती शोधून काढली. ती सारखेपणाच्या तत्त्वावर (Law of Similar) आधारित होती. ही पद्धती म्हणजे होमिओपॅथी. तत्कालिन औषधोपचार पद्धती आणि वैद्यकशास्त्र वास्तवात फारच अप्रगत होते. पण ते रक्तशोषक होते, असे हनिमानचे मत होते. त्यामुळे त्याने पर्यायी औषधोपचार विज्ञानाचा शोध लावला. त्याचे संशोधन त्याने ‘Organon of the Rational Art of Healing’ या ग्रंथात विशद केलेले आहे. या ग्रंथाचे नाव नंतरच्या आवृत्तीत ‘The Organon of the Healing Art’ असे बदलले गेले. या ग्रंथामुळे हनिमान जगप्रसिद्ध झाला. लोक त्याच्याकडे आकृष्ट झाले. हनिमानने पारंपरिक आरोग्यविज्ञानात मोठी क्रांती केली. या ग्रंथामुळे त्याचे नाव अॅरिस्टॉटलच्या बरोबरीने घेतले जाऊ लागले. हनिमानला ‘आरोग्यविज्ञान जगतातील अॅरिस्टॉटल’ असा मान लाभला.
लॉर्ड फ्रान्सिस बेकन
लॉर्ड फ्रान्सिस बेकन (जन्म २२ जानेवारी १५६१, मृत्यू : ०९ एप्रिल १६२६) हा इंग्लिश तत्त्ववेत्ता, राजकारणी, वैज्ञानिक, न्यायाधीश आणि लेखक-साहित्यिक होता. केवळ ब्रिटन अथवा इंग्लंडच्या नवजीवनाचाच तो अध्वर्यू नव्हता, तर संपूर्ण युरेापयीय नवजीवन काळाचा (Age of Renaissance) तो अध्वर्यू होता. बेकनच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे केवळ १२व्या वर्षी त्याला केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजात प्रवेश मिळाला. तेथे त्याला अॅरिस्टॉटलचे अध्ययन करता आले, पण अॅरिस्टॉटलविषयी त्याच्या मनात तिटकारा व घृणा निर्माण झाली. तेथूनच त्याला नव्या तर्कशास्त्राची आणि विचार पद्धतीची रचना करण्याची गरज भासली.
बेकनला ‘आधुनिक वैज्ञानिक क्रांतीचा प्रेषित’ (The Prophet of the scientific evolution) मानले जाते. तत्कालीन वैज्ञानिक क्रांतीला त्याच्या वैज्ञानिक पद्धतीमुळे विधायक कलाटणी मिळाली. जिला आज वैज्ञानिक पद्धती म्हटले जाते, ती शोधणारा बेकनच होता. त्यामुळे पद्धतीला बेकनची पद्धती म्हटले जाते. या पद्धतीमुळेच आधुनिक विज्ञानाचा पाया रचला गेला. म्हणून बेकनला ‘आधुनिक विज्ञानाचा जनक’ म्हटले जाते. त्याच्या मते ज्ञानाचे अस्सल मूल्य ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोजनात, त्याच्या उपयुक्ततेतच असते. ज्ञानाचे खरे कार्य केवळ निसर्गाच्या रहस्यांवर मानवाने विजय मिळवण्यातच आहे. बेकन निसर्गाला जणू काही स्त्री समजून पुरुषाने स्त्रीचा रहस्यभेद करावा, तसा निसर्गभेद केला पाहिजे, असे म्हणतो. विज्ञान-तंत्रज्ञानाचे तेच काम आहे. हे सारे स्पष्ट करताना तो बरीच अश्लाघ्य आणि अश्लील भाषा वापरतो.
बेकनने अॅरिस्टॉटलचे सगळेच तत्त्वज्ञान झिडकारले आणि नवे तत्त्वज्ञान रचले. अनुभववादाचा तो निर्माता होता. विशेषत: नवे तर्कशास्त्र रचले. एवढेच नव्हे तर त्याला ‘आजच्या औद्योगिक युगाचा’ही जनक मानले पाहिजे. आजच्या फ्रिझ किंवा रेफ्रिजिरेटरचा जनकही बेकनच आहे.
शेक्सपिअर आणि बेकन असाही एक प्राचीन वाद आहे. शेक्सपिअरची सारी नाटके त्यानेच लिहिली, असे म्हणतात. शिवाय इंग्लिश साहित्यविश्वात बेकन ‘निबंधकार’ (Essayeist) म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याचे एकूण कार्य लक्षात घेऊन खास त्याच्यासाठी इंग्लडंच्या महाराणीने बॅरन व्हेरूलम (the Baron Verulam) हा किताब १६१८मध्ये आणि नंतर ‘दि व्हीस्काऊंट सेंट अल्बन’ (The Viscount st. Alban) हा किताब १६२१ मध्ये निर्माण केला होता. हे किताब एक अपवाद वगळता अद्यापि कोणालाही प्रदान करण्यात आलेले नाहीत.
बेकन प्रसिद्धी आणि सत्तेसाठी नेहमीच हपापलेला असे. अशी एक कथा आहे की, प्राचीन काळी होऊन गेलेल्या सेंट जर्मेन या संताचा पुनरावतार म्हणून तो प्रगट झाला. सेंट जर्मेन हा प्राचीन काळी ईश्वराचा प्रेषित या अर्थाने ‘पुनर्अवतरित मास्टर’ म्हणून ख्रिश्चन परंपरेत ओळखला जातो. बेकनला किमयाशास्त्र अवगत होते. या किमयेचा वापर करून तो गायब झाला आणि प्रगट होऊन स्वत:ला ईश्वराचे प्रेषित म्हणून ‘पुनर्अवतरित मास्टर’ म्हणून आणि अमर असल्याचे घोषित केले. अर्थात या कथेबद्दल संशय आहे. शुद्ध वैज्ञानिक ज्ञानाचा आणि वैज्ञानिक पद्धतीचा पाया रचणारा बेकन मायावी किमयाशास्त्राचा आधार घेईल, असे वाटत नाही.
त्याला स्वत:बद्दल खूप प्रौढी व अभिमान वाटत असे. त्याला त्याचा आनंद वाटे. तो म्हणत असे, ‘‘तत्त्वज्ञानाच्या अत्यंत गूढतम प्रांतात मी प्रकाश टाकला आहे. मी मेल्यानंतर अनेक शतकानंतरच लोकांना माझे महत्त्व कळेल. थडगी उभारून, नाट्यगृहे बांधून, मंदिरे व प्रतिष्ठाने स्थापन करून, माझ्या नावाचे पुरस्कार सुरू करून आणि माझ्या नावे संस्था स्थापन करून लोक माझी स्मृती जतन करतील, माझा जयजयकार करतील. मी काही माणसाच्या अहंकराचे मनोरे बांधत नाही; तर मी या जगाच्या रूपातील पवित्र मंदिराच्या मानवी आकलनाचा पाया रचतो आहे.”
बेकनची ग्रंथसंपदा
बेकन ज्यामुळे ‘Master’ समजला जातो, ते त्याचे मुख्य लेखन वैज्ञानिक स्वरूपाचे आहे. पण त्याने सर्वच क्षेत्रात प्रचंड लेखन केले. त्याच्या लेखनावरून त्याच्या व्यापक व मूलगामी आकलनक्षमतेचा आवाका अवाक करणारा आहे. अॅरिस्टॉटल आणि इतर पोथीपंडितांचा धिक्कार करून तो त्यांना मानवी प्रगतीच्या आड आल्याबद्दल दोषी ठरवतो. मुळापासून साऱ्या ज्ञानाची नव्याने रचना करणे आणि विज्ञानाची पुनर्रचना करणे यावर तो भर देतो. विज्ञान, कला, साहित्य व सारे मानवी ज्ञान रचण्याचा त्याचा प्रयत्न म्हणजे ‘Instauratio Magna’ (The Great Instauration) ही त्याची महत्त्वाकांक्षी योजना होय. त्याने प्रत्यक्ष अनुभव व निरीक्षण या निकषांवर वैज्ञानिक पद्धती तयार केली. तिला ‘विगामी पद्धती’ (Indudctive method) किंवा ‘बेकनची पद्धती’ म्हणतात. या योजनेचाच एक भाग म्हणून बेकनने ‘New Method’ (Novum Organum :The New Organon) हा ग्रंथ लिहिला. त्याचे मूळ लॅटीन नाव ‘Novum Organum Scientiarum’ या ग्रंथातूनच त्याने अॅरिस्टॉटलचे खंडन करून स्वत:ची वैज्ञानिक पद्धती मांडली.
बेकनचे आयुष्य वादग्रस्त, अतिशय वादळी गेले. त्याला यश मिळत गेले, देशाचे सर्वोच्च पद मुख्य न्यायाधीशपद ही त्याला लाभले. इंग्लंडचा तो अॅटर्नी जनरल आणि लॉर्ड चॅन्सलर होता. पण तो बराच राजकारणी, धूर्त आणि कावेबाज होता. त्याची विवेकबुद्धी लवचीक आणि लाचार होती. न्यायाधीशपदी असताना त्याला लाच घेतल्यामुळे सर्व पदांवरून बडतर्फ होऊन नंतर मानहानीचे आयुष्य जगावे लागले. त्याला लाच घेतल्याबद्दल ४०,००० (चाळीस हजार) पौंड दंडही झाला. अलेक्झांडर पोप (१६४६-१७१७) हा इंग्लिश कवी बेकनविषयी म्हणतो, ‘‘वैश्विक शहाणपाणमुळे त्याच्या काळातील सर्वांत शहाणा, स्वत:ची सामर्थ्यशाली बुद्धी आणि निबंधलेखनाची कला असल्यामुळे अत्यंत बुद्धिमान पण दुष्ट चारित्र्यामुळे अतिशय क्षुद्र माणूस!’’ अर्थात बेकनवर इतका दुष्टपणाचा आरोप करता येणार नाही, तसे पुरावे नाहीत; असे कोपल्स्टन हा तत्त्वज्ञानाचा इतिहासकार म्हणतो.
मांस बर्फात ठेवले असता ते कसे टिकू शकेल याबाबतचे संशोधन करत असताना बेकनला न्यूमोनिया झाला. तो बरा होऊ शकला नाही. ६ (किंवा ९) एप्रिल १६२६ रोजी बेकनचा अंत झाला. बेकनच्या व्यक्तिगत जीवनातील त्रुटी अन् कसरी लक्षात घेऊनही त्याचे स्थान अतिशय उच्च दर्जाचे आहे. तो संपूर्ण विश्वाचा अॅरिस्टॉटलपेक्षा प्रगत ‘Master’ आहे. त्याने म्हटल्यानुसार आज त्याच्या नावाचे शेकडो पुरस्कार दिले जातात आणि त्याच्या नावाने जगात अनेक संशोधन संस्था कार्यरत आहेत.
‘Organon : Master’ (key)चा निकष
अॅरिस्टॉटललने जसा ‘Organon’ हा महाग्रंथ लिहिला तसा आणि त्या तोडीचा ग्रंथ लिहिणे हा ग्रीक-युरोपीय परंपरेत ज्ञानाचा, नव्या शोधाचा निकष मानला गेला होता. असा ग्रंथ लिहिणे ही काही सोपी गोष्ट निश्चितच नव्हती आणि नाही. अॅरिस्टॉटलचे खंडन करून बेकनने ‘The New Organon’ आणि हनिमानने ‘The Organon of the Healing Art’ लिहून मात्र आपापल्या क्षेत्रात संपूर्ण क्रांती केली. त्यामुळे या अॅरिस्टॉटलनंतर बेकन आणि हनिमान या दोघांना आणि अशा रीतीने तिघांन ‘Master’ मानले जाते.
आचार्य
‘Master’चे योग्य भाषांतर संस्कृतमध्ये ‘आचार्य’ असे करता येईल. भारतात सनातन आचार्य परंपरा आहे. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवतगीता या तीन ग्रंथाना वैदिक हिंदू तत्त्वज्ञानात सर्वोच्च महत्त्वाचे स्थान आहे. साऱ्या वेदांत विचारांचा किंबहुना भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास या तीन ग्रंथापासून सुरू होतो. म्हणून या ग्रंथाना वेदांत तत्त्वज्ञानाची ‘प्रस्थानत्रयी’ म्हणतात. प्रस्थान म्हणजे या ठिकाणाहून निघायचे ते ठिकाण किंवा उगम. त्रयी म्हणजे तीन. या प्रस्थानत्रयीवर वेगवेगळ्या आचार्यांनी भाष्ये केली. प्रस्थानत्रयीवर स्वतंत्रपणे भाष्य करणारा तोच आचार्य समजला जातो.
तथापि खऱ्या अर्थाने ज्यांना आचार्य मानले जाते ते केवळ आदि शंकराचार्य यांनाच. त्यांच्यानंतर हा मान शंकराचार्यांना मानणाऱ्या शिष्यांना दिला जातो. ते असे :
विसाव्या शतकात थोर जागतिक प्रवचनकार ओशो रजनीशांनी स्वत:ला ‘Master’ आणि ‘आचार्य’ म्हणवून घेतले!
शंकराचार्य
केरळातील ‘कालडी’ या गावी आठव्या शतकात इ.स. ७८८ साली आदि शंकराचार्यांचा जन्म झाला व त्यांचा मृत्यु इ.स. ८२० मध्ये झाला. या अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात शंकराचार्यांनी केवळ प्रस्थानत्रयीवरच भाष्ये लिहिली, असे नव्हे तर इतरही अनेक रचना केल्या. कवी, भक्त आणि तत्त्वज्ञ या तिन्हींचा संगम शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानात दिसून येतो. त्यांचे ‘ब्रह्मसूत्रभाष्य’ हे वेदान्तसूत्रावरील भाष्य अतिशय प्रसिद्ध असून ते ‘शांकरभाष्य’ या नावानेही ओळखले जाते. ‘उपदेशसाहस्त्री’, ‘शतलोकी’ हे ग्रंथ आणि ‘आंनदलहरी’, ‘सौंदर्यंलहरी’ ही स्त्रोते अत्यंत प्रसिद्ध आहेत.
शंकराचार्यांचे कार्य इतके उत्तुंग आणि थोर आहे की, भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे अद्वैत वेदान्त हे समीकरण त्यांच्यामुळेच तयार झाले. हजारो वर्षांपासून अनेक पुराणकथा, भाकडकथा, मिथके यात अडकलेल्या आणि त्यातच भंजाळलेल्या अद्वैत सिद्धान्ताची वेगळी स्वतंत्र निखळ, शुद्ध मांडणी त्यांनी केली. त्यांच्यापासूनच हिंदू वैदिक धर्माला चेहरा लाभला. त्यांच्या अद्वैताच्या मांडणीत वर्ण-जातिव्यवस्थेला स्थान दिलेले नाही, हे महत्त्वाचे आहे. अनेक कारणांमुळे शंकराचार्य हेच खरे भारतीय ‘आचार्य’ (पाश्चात्य परंपरेच्या परिभाषेत ‘मास्टर ऑफ दि मास्टर’) ठरतात.
‘Master’ आणि ‘Teacher’
हे दोन्ही शब्द ईश्वर आणि माणसासाठी उपयागात आणले गेले आहेत. दोन्ही संज्ञा ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रातही उपयोगात आणल्या गेल्या. ज्ञानी असतो तो ‘Master’ आणि हे ज्ञानदान करतो तो ‘Teacher’, ही साधारण संकल्पना आहे. ईश्वर ‘Teacher’ आणि ‘Master’ दोन्ही असतो, हा समज सर्व धर्मांमध्ये (बौद्ध आणि जैन हे निरीश्वरवादी धर्म वगळता) प्रचलित आहे. माणूस ‘Teacher’ आणि ‘Master’ दोन्ही असू शकतो. पण त्यावेळी संदर्भ बदलतो. ईश्वराचा शिष्य किंवा धर्मसंस्थापक अथवा धर्मसंस्थापकाचा शिष्य या अर्थाने अस्सल शिष्यच ‘Teacher’ आणि ‘Master’ दोन्ही असू शकतो.
गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे निरीश्वरवादी धर्म संस्थापक आपापल्या धर्माचे ‘Teacher’ आणि ‘Master’ आहेत. ख्रिश्चन धार्मिक परंपरेत ईश्वर आणि धर्मगुरू दोघांसाठी हे शब्द वापरले जातात. ‘बायबल’च्या ‘जुना करार’नुसार ईडनच्या बगीच्यात आदम आणि ईव्ह यांना ईश्वराने जगाच्या निर्मितीचे रहस्य शिकवले. म्हणून ईश्वर हाच पहिला ‘Teacher’ होय. त्याला विश्वाचे ज्ञान असते, म्हणून तोच पहिला ‘Master’सुद्धा आहे. ईश्वर जे सांगतो तेच धर्मगुरू सांगतात. त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूंनासुद्धा ‘Teacher’ म्हणण्याची पद्धत आहे.
तत्त्वज्ञानात या दोन्ही संज्ञाचा मिलाफ ‘ज्ञान’ या निकषाच्या आधारे या संज्ञेत केला गेला.
Teacher
इंग्लिशमधील ‘Teacher’ हे नाम ‘Teach’ या शब्दाचे क्रियापद आहे. ‘Teach’ हे पद प्राचीन इंग्लीशमधील (taeca) tǣca अथवा किंवा मध्ययुगीन इंग्लिशमधील techenपासून बनते. techenचा अर्थ दाखवणे, एखादा मुद्दा अधोरेखित करणे अथवा सूचना देणे. १२९० नंतर हा शब्द ‘तर्जनी’ (The index finger) साठी वापरला जाऊ लागला. कारण ते बोट, एखादा मुद्दा दाखवणे-मुद्द्यावर बोट ठेवणे, यासाठी उपयुक्त असल्याचे मान्य झाले होते. १३०० नंतर त्याला आज प्रचलित असलेला अर्थ लाभला. ‘(taeca) tǣca’चे इतर प्राचीन भाषेचे म्हणजे प्रोटो जर्मन, इंडियन, प्रोटो-इंडो-युरोपियन भाषेतील संदर्भ पाहता एक वेगळीच बाजू समोर येते. या भाषांनुसार ‘(taeca) tǣcaचे अर्थ दाखवणे, शिकवणे. यात दोन अर्थ लपले आहेत. पहिला अर्थ : ‘समोरल्या शिकवल्यानंतर त्याला ते कबूल आहे’ असा जणू काही आरोपच करणे आणि दुसरा अर्थ : ‘‘संबंधित व्यक्ती माझ्याकडून शिकली’’ असे जाहीर शिक्षकाने स्वत:हून जाहीर करणे’. शिकवणारा, मार्गदर्शक हा समान अर्थ खूप उशिरा म्हणजे १३व्या शतकानंतर प्रचारात आला आणि सर्वच क्षेत्रात वापरला जाऊ लागला.
‘Teacher’s Whisky’ या नावाची एक व्हिस्कीही आहे. ती अर्थात दोन्ही अर्थांनी आहे. तिचा गंमतशीर अर्थ घेतला तर ती शिक्षकांसाठीची दारू होते. मूळ अर्थ असा की, ती स्कॉटलॅण्डमधील विल्यम टीचर नावाच्या मद्यप्रेमीने १८३० साली सुरू केली. हा धंदा १८८४ साली (म्हणजे भारतीय काँग्रेस स्थापन झाली त्या वर्षी) चांगलाच भरभराटीला आला. आज ती जास्त फेमस आहे. अर्थात ‘टीचर’ हे नाव असावे का? हा प्रश्न निरर्थक आहे. आपल्याकडेही शास्त्री, गुरू, मौला, ही आडनावे आहेत. आता ‘टीचर’ अशी व्हिस्की असेल तर ‘स्टुडंट’ नावाची बियर असायला काय हरकत आहे? युरोपात म्हणच आहे ‘Student without a beer is like a dog without a tail!’ पण अद्यापि अशी बियर कुणी सुरू केलेली नाही. खरे तर भारतात ती संधी आहे. कारण भारतात ‘बियर ही दारू नाही’ अशी घोषणा होऊन ती रेशनिंगच्या दुकानात द्यावी, अशी सूचनाही आली होती. असो, म्हणजे पुन्हा एकदा नसो!!
माणसातील ‘Teacher’ हा मान दोन तत्त्ववेत्त्यांकडे दिला जातो. पहिला मान अर्थातच अॅरिस्टॉटलकडे जातो. दुसरा मान अल फ़राबी (Al-Farabi – ८७२-९५०) या अरबी तत्त्ववेत्त्याकडे जातो.
अल् फराबी
ग्रीक तत्त्वज्ञान आणि अरबी जगत
दहाव्या शतकात बगदाद हे तत्त्वज्ञानाचे मोठे केंद्र होते. हा काळ ‘इस्लामी सुवर्ण युग’ समजला जातो. तेथील अरबी मातीत अॅरिस्टॉटलवादाचे बी रूजवण्याचे महत्त्वाचे काम चार अरबी तत्त्ववेत्त्यांनी केले. पहिला अल् किंदी (जन्म -८६६ किंवा ८७३), दुसरा अल् फ़राबी (८७२-९५०), तिसरा इब्न सीना (९८०-१०३७) आणि चौथा इब्न रशीद (११२६-९८).
या साऱ्यांनी इस्लामची केलेली सर्वांत मोठी सेवा म्हणजे त्यांनी समस्त अरबी इस्लामी संस्कृतीला आणि विचारवंतांना ग्रीक वैचारिक आणि सांस्कृतिक वारशाचा करून दिलेला परिचय! तत्कालीन अरबी विचारवंत अनेक प्रकारच्या वैचारिक व्यामोहात गोंधळून गेले होते. इस्लामचा धार्मिक दबाव असूनही ते शुद्ध सामाजिक व वैज्ञानिक ज्ञानाचे भक्त होते. त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा होता. पण ज्ञानाची पद्धशीर मांडणी करण्याची रीत त्यांना अज्ञात होती. विशेषत: खगोलशास्त्रात ते प्रगती करीत होते. पण दिशा सापडत नव्हती. पण वर उल्लेखलेल्या चार अरबी विचारवंतामुळे ग्रीक तत्त्वज्ञानाचा आणि ज्ञानाची सुव्यवस्थित मांडणी शिकवणारा अॅरिस्टॉटल त्यांच्या जीवनात आला. अॅरिस्टॉटलच्या एकूण तत्त्वज्ञानामुळे अरबी इस्लामी विचारवंतांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे सुलभ झाले. अॅरिस्टॉटलच्या ज्ञानापुढे ते दिपून गेले. आश्चर्यचकित झाले. असा ज्ञानी विचारवंत त्यांनी पाहिला नव्हता, ऐकला नव्हता.
अॅरिस्टॉटलचा ज्ञानाधिकार, त्याचे योगदान आणि त्यांच्या स्वत:वर पडलेला प्रभाव पाहून अरबी विचारवंतांनी अॅरिस्टॉटलला अरबी ज्ञानविश्वाचा ‘The First Teacher’ (आद्य गुरू) हा बहुमान दिला. अॅरिस्टॉटलला अरबी भाषेत ‘Aristutalis’ असे नाव आहे. त्याचे प्रचलित रूप ‘Aristu’ किंवा ‘Arastoo’ (अरस्तू) हे अरबी रूप उर्दू-हिंदीत आले. आजही अॅरिस्टॉटलला अरबी जगतात ‘the wise man’ म्हणून ओळखले जाते.
अल् किंदीने अरबी जगतास ग्रीक संस्कृतीचा परिचय करून दिला, पण ग्रीक विचारांचा प्रचार व प्रसार अरबी जगतात फारसा झाला नाही. ते महत्त्वाचे काम अल् फ़राबीमुळे पूर्ण झाले.
अल् फ़राबी (जन्म : ८७२ तुर्कस्थान आणि मृत्यू : १४ डिसेंबर ९५० ते १२ जानेवारी दमास्कस - अन्य नाव : अबु नस्त्र अल् फराबी.) हा इस्लामी तत्त्ववेत्ता केवळ इस्लामी तत्त्वज्ञानापुरताच महत्त्वाचा नसून एकूण जागतिक तत्त्वज्ञानात मूलभूत भर घालणारा म्हणून वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्ता म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचा स्वत:चा संप्रदायही होता.
फराबीने ग्रीक संस्कृती आणि अॅरिस्टॉटलचा इस्लामी विज्ञान व तत्त्वज्ञान यांच्या संदर्भात नव्याने शोध घेतला. प्लेटोवाद आणि अॅरिस्टॉटलवाद या दोघांचेही विचार फ़राबीने इस्लामी जगतात नव्या रूपात रूजवले. हे करताना प्लेटोवाद आणि अॅरिस्टॉटलवाद यांचा वेगळ्या रीतीने त्याच्याकडून समन्वय झाला. असा प्रयत्न खुद्द ग्रीक परंपरेतही झाला नव्हता. ते अनेक शतकांनंतर एका इस्लामी तत्त्ववेत्त्याकडून म्हणजे फ़राबीकडून झाले. त्यामुळे त्यास ‘नवप्लेटोवादी’ असे म्हटले जाते. त्याचा संप्रदाय ‘फ़राबीवाद’ किंवा ‘अल् फ़राबीवाद’ (Farabism or Alfarabism) नावाने प्रसिद्ध आहे.
फ़राबीची ग्रंथसंपदा
अल् फ़राबीने खगोलशास्त्र, तर्कशास्त्र, संगीत, गणित, राजकारण आणि शिक्षण, तसेच आज ज्यास मानसशास्त्र म्हटले जाते, त्या विषयावर प्रचंड लिखाण केले. दुदैवाने त्याचे अनेक ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झाले, पण ११७ पुस्तकांचा शोध लागला असून त्यात ४३ तर्कशास्त्रावर, ११ तत्त्वज्ञानावर, सात नीतीशास्त्रावर, सात राज्यशास्त्रावर, १७ संगीत, औषधे, समाजशास्त्र यावर आणि ११ इतरांवरची भाष्ये आहेत. अॅलेक्झांड्रियातील नव-अॅरिस्टॉटलवादाचा त्याच्यावर प्रभाव होता. नव-अॅरिस्टॉटलवादास नव संजीवनी देणे आणि नवा शोध घेणे या हेतूने त्याने हे सारे लिखाण केले.
फराबीचे महत्त्वाचे दोन ग्रंथ म्हणजे ‘किताब अल् हुरफ़’ (Kitab al-huruf - The Book of Letters), आणि दुसरा ग्रंथ ‘अल् मदिना अल्-फ़दीला’ (Al-Madina al-Fadila) किंवा (Ara Ahl al-Madina al-Fadila - 'The Model City'). या ग्रंथाचे पूर्ण नाव - Kitab fi mabadi' ara' ahl al-madina al-fadila - The Book of the Principles of the Opinions of the People of the Virtuous City. हा फ़राबीचा राज्यकारभाराविषयीचा ग्रंथ प्लेटोच्या ‘रिपब्लिक’ ग्रंथाइतकाच दर्जेदार असून तो विचारविश्वात मान्यता पावलेला आहे.
फ़राबीच्या मते, जगात तत्त्वचिंतनाचा अंत झाला आहे, इस्लाममध्ये मात्र तत्त्वज्ञानास नवसंजीवनी लाभू शकते. अर्थात ‘एखाद्या तत्त्ववेत्त्यास आवश्यक असणाऱ्या वैचारिक साधनांची गरज’ इस्लाम एक धर्म या भूमिकेतून पुरवू शकत नाही, असे त्याचे मत होते. तत्त्वचिंतनाशी परिचय नसणाऱ्या जनसामान्यांना प्रतीकात्मक चिन्हांच्या रूपात धर्म सत्याचे दर्शन घडवते, पण त्या मूढांना सत्याचे निखळ शुद्ध स्वरूप जाणता येत नाही, असे त्याचे तत्त्वज्ञान होते. ईश्वर जसे विश्वाचे नियंत्रण करतो, तसे तत्त्ववेत्त्यांनी राज्यावर राज्य करावे, अशीही त्याची भूमिका होती. त्याची मते प्लेटोच्या ‘रिपब्लिक’मधील विचारांशी जुळतात.
दहाव्या शतकानंतर आधुनिक विज्ञानाचा उगम होईपर्यतच्या अनेक शतकांवर फराबीचा मोठा प्रभाव होता. तत्त्कालिन विज्ञान आणि तत्त्वज्ञान फ़राबीवादाने भारलेले होते. तत्त्वज्ञान आणि सुफ़ीवाद यांचा समन्वय करणारा तो आद्य तत्त्ववेत्ता होता. फ़राबीने अॅरिस्टॉटलचे जणू शिष्यत्व पत्करले होते. अॅरिस्टॉटलच्या ‘पेरिपेटेटीक स्कूल’चा तो इस्लामी प्रणेता होता. ज्ञानाच्या तुलनेत तो अॅरिस्टॉटलला समतुल्य होता. म्हणून तर त्यास इस्लामी बुद्धिप्रामाण्यवादी तत्त्ववेत्त्यांनी ‘Al-Mou’allim al-Than’ - The Second Teacher’ (‘दुसरा गुरू’) हा सर्वोच्च दर्जा बहाल केला.
आता ‘Professor’, ‘Sir’ आणि ‘Prinicipal’ या संज्ञांचीही कूळकथा पाहू.
Professor
ज्याच्याकडे सांगण्यासारखे (to Profess) काहीतरी आहे तो ‘Professor’. जुन्या फ्रेंचमधील professeur, लॅटिनमधील professusपासून मध्ययुगीन इंग्लिशमध्ये professour असा तयार होतो. अन्य व्यत्पत्तीनुसार Professour हा शब्द अँग्लो-नॉर्मन भाषेतील Proffessurपासून व्युत्पन्न होतो. या सर्वांचे भूतकालीन धातुसाधित रूप profiteor (profess) असे आहे. पण Professor हे पद कॉलेजात नसते, तर विद्यापीठांमध्ये असते. पण विद्यापीठात शिकवणारे सगळेच Professor नसतात. या पदवीचा इतिहास विकीपीडियात पुढीलप्रमाणे दिला आहे. प्रत्येक देशात याचा अर्थ काहींसा बदलतो, पण मतितार्थ एकच आहे. ज्याने किमान मास्टर्स आणि पीएच.डी. पदवी मिळवली आहे आणि ‘‘ज्याच्याकडे सांगण्यासारखे काही आहे’’ तोच ‘प्रोफेसर’. अर्थात काही विद्यापीठे कलाकार, खेळाडू, राष्ट्रपतीसारखे प्रथम नागरिक यांना ‘सन्माननीय प्राध्यापक’ या पदाने बहुमान करतात, पण त्यांना शिकवण्याची परवानगी नसते. जागतिक पातळीवर प्रोफेसरपदाचे तीन वर्ग करण्यात आले आहेत -
१. प्रोफेसर (Professor) : ज्येष्ठ, अनुभवी आणि संशोधक, मार्गदर्शक प्राध्यापक. काही वेळेस अशा प्राध्यापकांना त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ‘Full Professor’ म्हणण्याची रीत आहे.
२. असोसिएट प्रोफेसर (Associate Professor) : ज्येष्ठ, अनुभवी, शिक्षणप्रक्रियेची जाण असणारा. विद्यमान संशोधन नाही पण ते करण्याची तयारी असणारा तसेच ते सिद्ध करणारा.
३. असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor) : अध्यापन क्षेत्रात नुकताच पदार्पण करणारा, मास्टर्स आणि पीएच.डी. ही किमान पात्रता असणारा, विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन करणारा, अनुनभवी, विद्यमान संशोधन नाही, पण ते करण्याची तयारी असणारा तसेच ते सिद्ध करणारा.
या खेरिज ‘प्रोफेसर एमिरिटस’ (Emeritus Professor) असेही एक पद असते. पण ते दुर्मीळ असते आणि फारच प्रज्ञावंत, एकूण मानवी ज्ञानरचनेत नवी भर टाकणाऱ्या, त्याच्या संबंधित विषयाला नवी वळणे-कलाटणी-दिशा देणाऱ्या प्राध्यापकास हे पद सन्मानाने बहाल केले जाते. विद्यापीठात, महाविद्यालयात अशा दर्जाचा प्राध्यापक असणे, ही अतिशय अभिमानाची घटना असते. ते विद्यापीठ, महाविद्यालय अथवा शिक्षणसंस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावते. काही देशांमध्ये या पदाचे नामकरण ‘Distinguished Professor’ किंवा ‘Endowed Chair’ असे केलेले असते. विद्यापीठ निधी, खासगी व्यक्ती किंवा प्रतिष्ठान यांच्यामार्फत या पदाचा ‘Full Professor’ दर्जाचा आर्थिक भार उचलला जातो. असाच प्राध्यापक मग त्या विषयाच्या संशोधन व अभ्यास मंडळाचा अध्यक्ष म्हणून निवडला जातो. सर्व साधारणपणे निवृत्त प्रोफेसरच या पदाला पात्र ठरू शकतात. ‘Emeritus’ हा शब्द दोन संज्ञांचा संधी आहे. ‘e’ -आणि ‘merēre’ (जसे की ex-). ‘e’ म्हणजे ‘च्या पासून’ किंवा ‘च्या बाहेर’ आणि ‘merēre’ म्हणजे ‘उत्पन्न’. ‘Emeritus’ याचा एकूण अर्थ ‘जी प्राध्यापक व्यक्ती उत्पन्नाच्या बाहेर आहे’. अर्थात ‘जी पैशासाठी काम करत नाही तर केवळ शुद्ध ज्ञानाच्या प्रेमासाठी काम करते’. ‘Emeritus’ हे ‘emerere’चे भूतकालीन रूप आहे. ‘सुप्रतिष्ठित प्राध्यापक’ असे साधारण मराठी भाषांतर म्हणता येईल.
Sir
‘Sir’ या नामाचे मूळ मध्ययुगीन फ्रेंचमधील Sire, जुन्या फ्रेंचमधील sieur आणि लॅटिनमधील seniorयामध्ये आहे. Sieur हे Seigneur याचे लघुरूपांतर असून त्याचा अर्थ lord’. या सन्मानदर्शक नामापासून messier बनतो. त्याचा त्याचा अर्थ mylord. लॅटिनमधील senior (elder), हाच इंग्लिशमध्येही senior झाला. Sire हा १२०५ पासून प्रचलित होता. १२२५ पर्यंत पुरुषांसाठीच वापरला गेला. १२५० मध्ये त्याला ‘father, male parent’ हा अर्थ जोडला गेला. १३६२ पासून ‘mportant elderly man’ (महत्त्वाचा ज्येष्ठ माणूस(पुरुष)’) हा अर्थ पक्का झाला. आज ‘Sir’ पदवी युरोपियन भाषांमध्ये आदर व्यक्त करण्यासाठी दिली जाते. हे भाषिक राजकारण उघडच पुरुषपक्षपाती आहे, हे सांगणे न लगे! ‘Sir’ हा शब्द युरोपीय परंपरेत केवळ शब्द उरला नाही तर ती कालांतराने पदवी बनली. अॅकेडेमिक अर्थाने आणि सामाजिक अर्थानेसुद्धा ती पदवी म्हणून विकसित झाली.
Prinicipal (प्राचार्य)
‘Prinicipal’ या संज्ञेचे मूळ लॅटिनमधील prīncipālis या शब्दात आहे. त्याचा अर्थ पहिला, मुख्य. Prīncip+ ālis -al असा संधी बनतो. Prīncipālisपासून prince शब्द बनतो. अंदाजे १२५०-१३०० दरम्यान हा अर्थ वापरात होता. नंतर शिक्षणसंस्थेचा प्रमुख, व्याज द्यावे लागते, ती मुद्दलाची रक्कम इत्यादी अर्थ जोडले गेले. पण मुख्य असणे हा अर्थ सर्वत्र समान होता. प्रिन्स किंवा ‘राजपुत्र हा राजाच्या नंतरचा मुख्य’ असल्याने तेच महत्त्व शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या prinicipalला असते. राजपुत्राप्रमाणेच ‘prinicipal’ हा शिक्षणसंस्थेचा सत्ताधिकारी असतो. संस्थेची ध्येयधोरणे, अमलबजावणी ही कर्तव्ये तो बजावतो.
हे सगळे अर्थ आपण मुळापासून शुद्ध स्वरूपात बिनभेसळीचे कसे बनतात, ते पाहिले आहे. हाच गृहीत धरून या सर्वांना समान असणारा शिक्षक हा आदरणीय मानला गेला. तो आदरभाव गृहीत धरून जगात ‘शिक्षक दिन’सुद्धा साजरा केला जातो. पण ‘भारतीय शिक्षक दिन’सुद्धा असाच शिक्षकांविषयी आदरभावानं व्यक्त करण्याचा दावा केला जातो, पण प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे शिक्षक दिन ‘मास्तरडे’मध्ये रूपांतरीत होतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
भारतीय शिक्षक दिन
भारताचे पहिले उपराष्ट्रपती (१९५२-१९६२) आणि दुसरे राष्ट्रपती (१९६२-१९६७) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ०५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला. त्यांचा जन्मदिन हाच ‘भारतीय शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो. डॅा. राधाकृष्णन यांची १९६२ साली राष्ट्रपतीपदी निवड झाली, त्या वेळी ते ७४ वर्षांचे होते. म. गांधींजींच्या सत्याग्रही चळवळीचा मोठा दबदबा जगात होता. पं. नेहरूंची वैज्ञानिकता आणि विज्ञानेप्रम यांची मोठी कदर केली जात होती. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळाने राधाकृष्णन यांची ‘देशाचा प्रथम नागरिक’ म्हणून निवड केली होती. व्यक्तिगत पातळीवर राधाकृष्णन यांच्या जागतिक कीर्तीचा सुगंध एक उत्तम शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, कुशल नैतिक प्रशासक आणि तत्त्वज्ञ, विशेषत: भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान यांचा सुयोग्य मेळ साधणारा भारतीय तत्त्वचिंतक म्हणून पसरला होता. केवळ ‘देशाचा प्रथम नागरिक’ या प्रतिमेपेक्षाही राधाकृष्णन यांची ‘सुसंस्कृत देदीप्यमान भारताचा चेहरा’ ही जागतिक प्रतिमा जास्त उजळ व प्रभावी होती. १९५४ ला ‘भारतरत्न’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
राधाकृष्णन यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर त्यांचे काही विद्यार्थी, शिक्षणतज्ज्ञ व मित्र यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची विनंती केली. त्या वेळी त्यांना राधाकृष्णन यांनी ‘मी मूलत: शिक्षक आहे. माझा वाढदिवस असा खासगीरीत्या साजरा करण्यापेक्षा, एका शिक्षकाचा बहुमान म्हणून सर्वत्र तो ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा झाला, तर मला जास्त आनंद वाटेल’ असे सांगितले. तेव्हापासून ०५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ मानला जातो. एका राष्ट्रपतींचा वाढदिवस तो मूलत: शिक्षक असल्यामुळे ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा होतो, ही भारतातील फारच सुसंस्कृत व दर्जेदार घटना मानली पाहिजे.
शिक्षकांना फुले देणे, पुष्पगुच्छ देणे ही परंपरा. काही वेळेस शिक्षक निवृत्त होत असताना त्यांना मानपत्रही दिले जात असे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘एक दिवसाचा शिक्षक’ बनून हा दिन साजरा होई. आजही काही ठिकाणी या प्रकारे आदरभाव व्यक्त होतो. गेल्या काही वर्षांत शुभेच्छापत्रे देण्याची प्रथाही सुरू झाली. आज ई-मेल आणि एसएमएस तसेच ई-पत्रे देणे ही आधुनिक रीत बनली आहे.
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास हेमाडे संगमनेर महाविद्यालय, संगमनेर इथं तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
shriniwas.sh@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment