अजूनकाही
सत्तर-ऐंशीच्या दशकांत हिंदी सिनेमासृष्टीत अनेकानेक आशयघन सिनेमांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत होती. अवतीभवती घडणाऱ्या सामाजिक-राजकीय घटनांपासून अलिप्त न राहता त्या घटनांचे सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर कोणते परिणाम होतात, याचं चित्रण राजकीयदृष्ट्या जागरूक असणारे अनेक दिग्दर्शक आपल्या सिनेमांतून करत होते. या दिग्दर्शकांच्या मांदियाळीत सईद अख्तर मिर्झा यांचंही नाव घेतलं जातं. त्यांच्या निबंधवजा आठवणींचं ‘Memory In The Age of Amnesia - A Personal History Of Our Times’ हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालं आहे. या निबंधांत बऱ्याचदा कथा, लोककथा, पटकथा यांचाही प्रवेश होतो. स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घटना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या उलथापालथी यांचा संबंध कसा असतो, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो, असं त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे. त्याचा प्रत्यय त्यांचं हे पुस्तक वाचताना येतो.
मुंबईतील माहीम भागात फोन्सेका मॅन्शनमध्ये त्यांचं लहानपण गेलं, अनेक जाती-धर्माचे लोक तिथं एकोप्यानं राहत असत. काही वेळा कडवट अनुभवही येत, पण त्यांचं प्रमाण कमी होतं. वास्तव किती कठोर आहे, याची जाणीव करून देण्यासाठी हेही अनुभव आवश्यकच होतं, असं मिर्झा यांनी लिहिलंय. त्यांच्या जडणघडणीत आई-वडिलांची मोठी भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांना इतरांच्या मतांचा आदर करणं, जी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या पटत नाही, तिला नकार देण्याचं स्वातंत्र्य बहाल करणं, अशा काही गोष्टी आई-वडिलांकडून वारसा म्हणून मिळाल्या. सुरुवातीच्या काही लेखांत हे व्यक्तिगत अनुभव आले आहेत.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
ई-बुक खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/
..................................................................................................................................................................
व्हिएतनाम युद्धानं आपल्या मनात खळबळ उडवून दिली होती, त्या काळात मला अनेक प्रश्न पडत असं त्यांनी या युद्धाच्या काळातील घटनांना उजाळा देणाऱ्या लेखात लिहिलं आहे. त्यांनी व्हिएतनाम युद्धाच्या स्मृतिस्थळाला भेट दिली होती. त्या प्रसंगी तिथली एक व्यक्ती त्यांना म्हणाली होती, की ‘We forgive, but we will never forget.’
आणि हाच दृष्टिकोन मिर्झा यांना महत्त्वपूर्ण वाटतो. त्यांच्या या पुस्तकाचा हाच मुख्य विषय आहे. सगळं काही झपाट्यानं विसरून जाण्याचा हा काळ आहे. अगदी स्थानिक ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील अशा अनेक गोष्टी ज्या सतत मनीमानसी जागत्या ठेवायला हव्यात, त्या विसरल्या जात आहेत, हे मिर्झा अनेक घटनांची उदाहरणं देऊन सांगतात. न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या इमारतीत पाब्लो पिकासो या चित्रकाराच्या ‘गुएर्निका’या प्रसिद्ध चित्राची प्रतिकृती उभी करण्यात आली आहे. सर्व राजकारणी, धोरणकर्ते यांना युद्ध हे काही समस्या सोडवण्यासाठी उत्तर होऊ शकत नाही, हे सतत जाणवत राहावं, हा त्यामागचा उद्देश आहे. मिर्झा लिहितात की, ही सगळी मंडळी या चित्रातून व्यक्त होणाऱ्या युद्धविरोधी भावना साफ विसरली, अन्यथा पुढल्या काळात जी युद्धं घडली, ती घडलीच नसती.
१९९३च्या दंगली, कृष्णा देसाई यांचा खून, गुजरातमधील हत्याकांड या आपल्या देशातील घटना आणि इराक, व्हिएतनाम इथली युद्धं, लिबियाचा सर्वेसर्वा गडाफी याची हत्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना मुख्य प्रवाहातील माध्यमं ज्या तऱ्हेनं आपल्यासमोर आणत होते, त्याविषयी मिर्झा यांचे मतभेद आहेत. या घटनांमागचं सत्य सत्ताधारी आणि बडे उद्योगपती यांच्या दडपणाखाली दडवलं जातं, असं मिर्झा यांचं आकलन आहे. त्यासाठी ते अनेक पुरावेही देतात.
लिबियामध्ये गडाफीने अनेक चांगली कामं केली होती, तसेच तो पश्चिमी देशांच्या वर्चस्ववादाला टक्करही देत होता. म्हणून या देशांनी लिबियामधील माध्यमांना हाताशी धरून गडाफीला ‘खलनायक’ म्हणून जगासमोर आणलं. मार्गारेट थॅचर १९८५ मध्ये नेल्सन मंडेला यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा करत. ओसामा बिन लादेन सोव्हिएत रशियाच्या विरोधात लढत होता, तोवर तो अमेरिकेच्या दृष्टीने ‘स्वातंत्र्यसैनिक’ होता. पण अमेरिकेच्या विरोधात बोलू लागला, तेव्हा ‘दहशतवादी’ झाला.
या बारीक-सारीक निरीक्षणांतून मिर्झा पश्चिमेकडील देशांचा ढोंगीपणा उघड करतात. २००८ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश पायउतार होणार होते, तेव्हा इराकमध्ये निरोपाचं भाषण देण्यात आले. तेव्हा एका इराकमधील एका पत्रकारानं त्यांना बूट फेकून मारला. त्याने असं का केलं, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं, असं मिर्झा लिहितात.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : पत्रकार पांडुरंग रायकरच्या मृत्युच्या निमित्ताने काही प्रश्न…
..................................................................................................................................................................
अमेरिकेने धादान्त खोटे आरोप करून इराकवर युद्ध लादलं आणि त्या देशावर बॉम्बहल्ले करताना तिथल्या तेलाच्या विहिरींना धक्का लागणार नाही, याची मात्र काळजी घेतली. या विरोधातील चीड या कृत्यातून त्या पत्रकाराने व्यक्त केली होती. अशी चीड मनात निर्माण होणं, मिर्झा यांना महत्त्वाचं वाटतं.
पश्चिमेकडील देश मुस्लीम राष्ट्रांच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करून तिथली जी एक लोकशाहीप्रधान व्यवस्था असते, तिला मोडीत काढून त्यांच्याच देशातला पण पश्चिमी देशांच्या तालावर नाचणारा हुकूमशहा आणून बसवतात. या पश्चिमी देशांच्या आणि सोव्हिएत रशियाच्या वागण्यात एक मूल्यात्मक भेद आहे. त्याविषयी मिर्झा लिहितात, ‘रशियात जे काही घडलं ते ख्रुश्चेव्हने खुलेपणाने जगासमोर आणलं, पण अमेरिकेने कधीतरी इराक, व्हिएतनाम इथल्या आपल्या क्रूर कृत्यांबाबबत माफी मागितली का?’
मिर्झा यांनी कन्हैया कुमार, राणा अय्युब, फरीद झकेरिया, अरुंधती रॉय, पी. साईनाथ यांच्यावर आणि अशा इतरही काही महत्त्वाच्या लेखक, पत्रकार, कार्यकर्ते यांच्यावर लेख लिहिले आहेत. त्यातून अनेक सिनेमे, पुस्तकं यांचे संदर्भ दिले आहेत. त्या त्या विषयावर अधिक काही जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्यांनी फ्रान्समधल्या ‘शार्ली एब्दो’ या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत जसं लिहिलं आहे, तसंच काश्मीरमधून हिंदू पंडितांना कराव्या लागलेल्या पलायनाविषयीही लिहिलं आहे.
भूतकाळातील अनेक घटना आपण सहजी विसरतो, त्या तशा विसरता कामा नयेत, त्या कायम स्मृतीत अबाधित ठेवायला हव्या, असा मिर्झा यांचा आग्रह आहे. माध्यमांच्या संदर्भात ते एक महत्त्वाचं निरीक्षण मांडतात की, माध्यमं जाणीवपूर्वक दररोज नवनव्या निरर्थक घटना समोर आणून महत्त्वाच्या घटना आपल्याला विसरायला भाग पाडतात. याचा प्रत्यय आपल्याला आताच्या करोना काळातही येतो आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
आणखी चार वर्षांनी जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा जर कोणी आजच्या परिस्थितीत अपयशी ठरलेली केंद्र सरकारची धोरणं, चुकीचे निर्णय आणि ढासळलेली आरोग्य व्यवस्था, अमुक इतकी मेलेली माणसं यांविषयी बोलू पाहिलं तर त्याला या धामधुमीच्या काळात राममंदिराच्या भूमिपूजनाप्रसंगी पंतप्रधानांनी घातलेल्या ‘साष्टांग दंडवता’ची आठवण करून दिली जाईल. तोवर राम मंदिरही बांधून होईल आणि या वेळेला ते नक्की होईल. हे राम मंदिर आणि साष्टांग दंडवत आताच्या करोना काळातील सरकारचं अनेक आघाड्यांवरचं अपयश लोकांच्या स्मृतीतून पुसून टाकायला हातभार लावील. मंगलेश डबराल हे हिंदीतील महत्त्वाचे कवी आजच्या काळाला ‘भूलने का युग’ असं याच शीर्षकाच्या कवितेत म्हणतात, तेव्हा त्यांचा रोख याच वृत्तीकडे असतो. म्हणून मिर्झा म्हणतात तसं आपण या गोष्टी विसरता कामा नयेत.
सईद मिर्झा यांचं संवादासाठी तत्पर असणारं व्यक्तिमत्त्व या लेखनातून समोर येतं. काही वेळा एदुआर्दो गालिआनो या लॅटिन अमेरिकी लेखकाच्या लेखनाची आठवण येते. त्याची समाजातील अंतर्विरोध, विसंगती नेमकेपणाने टिपण्याची हातोटी मिर्झा यांच्याकडेही आहे. सध्याच्या काळात वाचायलाच हवं असं हे पुस्तक आहे.
..................................................................................................................................................................
Memory In The Age of Amnesia - A Personal History Of Our Times’ by Saeed Akhtar Mirza
मूल्य - ४९९ रुपये.
..................................................................................................................................................................
लेखक विकास पालवे प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.
vikas_palve@rediffmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment