अजूनकाही
प्रकाश झा हे हिंदी चित्रपट-दिग्दर्शक आपल्या प्रत्येक चित्रपटातून वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या किंवा त्याच्याशी संबंधित समस्या मांडतात. अगदी पहिल्या चित्रपटापासून हे दिसून येतं. त्यांच्या ‘गंगाजल’मध्ये भ्रष्ट व्यवस्थेमुळे आपली जबाबदारी निभावू न शकणाऱ्या व वरिष्ठांचा दबाव असणाऱ्या एका पोलिसाची कथा आहे, ‘राजनीती’मध्ये सत्तेसाठी एका राजकीय घराण्यात आपापसात चाललेला भावंडांचा संघर्ष दिसतो, ‘चक्रव्यूह’मध्ये सरकारच्या भांडवलवादाकडे वाढणाऱ्या झुकावामुळे कशा प्रकारे तरुण माओवादाकडे वळतात हे दाखवले गेले.
‘आश्रम’ ही त्यांची नवी वेबमालिका नुकतीच ‘मॅक्स प्लेअर’वर सुरू झाली आहे. ही कथा काल्पनिक असली आणि २०१२च्या काळात म्हणजेच आठ वर्षांपूर्वी घडणारी असली तरी बऱ्याच सत्य घटना, प्रसंग त्यात कथेचा भाग म्हणून येतात. कथा सुरू होते एका गावातील जातीयवादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणापासून आणि त्यात अन्यायाविरुद्ध उभं राहून न्याय करणाऱ्या काशीपूर या काल्पनिक गावातील बाबा निराला (बॉबी देओल)पासून.
आध्यात्मिक क्षेत्रात या बाबाने निर्माण केलेलं स्थान, त्यांच्या भक्तांची त्यांच्याप्रती असणारी आस्था, विश्वास आपल्याला दिसत राहतो. पम्मी (आदिती पोहनकर) ही एक चांगली कुस्तीपटू असते. पण जातीयवादाचा डोंगर तिच्या प्रगतीच्या आड येतो. तो काही अंशी कमी करण्याचं काम या बाबाच्या हातून घडतं आणि एक आदर्श म्हणून बाबाचं स्थान तिच्या मनात निर्माण होतं. इथून हळूहळू कथा उलगडायला सुरुवात होते.
ही वेबमालिका बघताना मँक्लेन वे व चँप्लेन वे यांच्या ‘वाईल्ड वाईल्ड कंट्रीज’ या नेटफ्लिक्सवरील वेबमालिकेची आठवण येते. त्यातही आध्यात्मिक गुरू ओशो यांचं आध्यात्मिक आणि सामाजिक वर्चस्व दाखवलं होतं. पण ‘आश्रम’ ही वेबमालिका त्यावरून प्रेरित आहे, असं म्हणता येणार नाही.
प्रकाश झा यांच्या चित्रपटात दिसणारी उत्तर भारतातील गुंडगिरी, गुन्हेगारीचं इथंही ठळकपणे दिसून येते. आपलं वर्चस्व, स्थान अबाधित राखण्यासाठी बाबा निराला सर्व प्रकारे प्रयत्न करताना दिसून येतो.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘कॉल हिम एडी’ - ‘स्पर्शा’बाबतचे भयानक आणि भयंकर गैरसमज दूर करणारा लघुपट
..................................................................................................................................................................
ही वेबमालिका नऊ भागांची असून प्रत्येक भाग ३५-४० मिनिटांचा आहे. तिसऱ्या भागानंतर कथेला येणारा वेग घटनांची स्पष्टता ठळकपणे मांडायला सुरुवात करतो. त्यात एका आयएएस पोलीस अधिकाऱ्याची प्रेमकथाही दाखवली जाते. ‘सेक्रेड गेम्स’प्रमाणे बाबाचं पात्र जास्त वेळेपर्यंत गूढ ठेवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला नाही, कारण इथे मुख्य कथा बाबाचीच आहे. हा बाबा निराला अनेक ठिकाणी स्वतःला स्वयंघोषित संतही म्हणताना दिसून येतो.
आपल्या देशात अनेक स्कँडलमध्ये आरोपी म्हणून पकडले गेलेले आध्यात्मिक बाबा आहेत. आणि ज्यांच्यावर कायदेशीर कारवाया किंवा न्यायालयीन खटले दाखल झालेले नाहीत, असेही अत्याचारी, जुलमी, कपटी, कारस्थानी बुवा-बाबा काही कमी नाहीत. भक्तांच्या भावनांचा वापर आपली पोटे भरण्यासाठी करून प्राचीन ‘आश्रमसंस्कृती’चं नाव बदनाम करणाऱ्या अनेक तथाकथित बुवा-बाबांचा काळा चेहरा अनेकांनी या आधीही पाहिलेला आहे. अनेक बुवा-बाबांचे राजकीय नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि त्यांच्यातील देवघेवही अनेकदा प्रसारमाध्यमांतून पाहायला-वाचायला-ऐकायला मिळते.
सद्यस्थितीतले अनेक दाखले या वेबमालिकेत अप्रत्यक्षरीत्या बघायला मिळतात. बऱ्याच चित्रपटांत ज्या प्रकारे आध्यात्मिक बाबाचं जसं उपहासात्मक चित्रण केलं जातं, तसं इथं नाही. काही प्रसंग विनोदी आहेत ते कथेची गरज म्हणून. राजकीय, धार्मिक, सामाजिक सर्वच क्षेत्रात बाबा निरालांचं वर्चस्व आहे. आश्रमातील उत्तराधिकारीही त्याचा जवळचा मित्र आहे. तो मतदारांना निवडून देण्यासाठी लागणारी मतेही विकताना दिसतो. सर्वत्र अराजकता निर्माण होतानाही बाबा निराला मात्र आपली जरब कायम ठेवतो.
या बाबा निरालाने काही पुस्तकेही लिहिली आहेत, ज्यात त्याचा उपदेश आहे. त्याच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भक्तांची दिशाभूल करण्यात हा बाबा निराला यशस्वी ठरला आहे. पम्मीचा भाऊ सत्ती (तुषार पांडे) सुरुवातीला बाबाविषयी साशंक असतो, पण नंतर तोही त्याचा भक्त होतो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
बऱ्याच दिवसानंतर पडद्यावर दिसलेल्या बॉबी देओलने बाबा निरालाची भूमिका उत्कृष्ट केली आहे. त्याचे हावभाव व देहबोलीतून आध्यात्मिक बाबाचीच वाटते. या वेबमालिकेचं कास्टिंगही छान आहे. तुषार पांडे, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, आदिती पोहनकर, अनुप्रिया गोएंका, त्रिधा चौधरी या सर्व सहकलाकारांच्या भूमिकाही चांगल्या आहेत. शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमनही यात एका छोट्या भूमिकेत आहे.
कला दिग्दर्शकानेही उत्कृष्ट सेट निर्माण केलाय. त्यामुळे कथेला अनुरूप वातावरणनिर्मिती झाली आहे. ‘क्राईम थ्रिलर’ला अनुरूप अशा या वेबमालिकेमध्ये रंगसंगतीचे प्रयोग मात्र जाणीवपूर्वक टाळले असावेत. मुळात कथा संथ गतीची आणि तिचा बाजही सरळधोपट असल्याने गडद रंगाचा वापर टाळलाय.
थोडक्यात आपल्या विकृत मानसिकतेवर भक्तीचा बुरखा पांघरून भक्तांचा गैरफायदा घेणाऱ्या ढोंगी बाबा-बुवांचा समाचार ही वेबमालिका घेताना दिसून येते.
..................................................................................................................................................................
ऋषिकेश तेलंगे
rushikeshtelange1999@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment