अजूनकाही
फारशी कुठली राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी वा वारसा आणि जनाधार नसलेल्या प्रणव मुखर्जी यांनी सार्वजनिक आयुष्यात जे मिळवले ते अनन्यसाधारणच मानावे लागेल. त्यांच्या या वाटचालीमागे राजकारणात लागणारे चातुर्य, व्यासंग, धोरणीपणा अशा अनेक गोष्टींचा समावेश राहिलेला आहे.
आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते, याखेरीज अन्य कुठले राजकीय धागेदोरे जुळत नसलेल्या प्रणव मुखर्जी यांची पक्षातील ओळख भलेही ‘इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय’ अशी असली तरी त्यांच्या राजकीय वाटचालीत या ओळखीशिवाय लागणाऱ्या सर्वच बाबी कारणीभूत राहिलेल्या दिसतात. अर्थात प्रणवदांच्या वडिलांनी दोन वेळा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेला होता, मात्र ही बाब त्यांना लोकप्रियता वारसाहक्काने मिळाली असे म्हणण्याइतपत मोठी मानता येत नाही.
काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षातल्या बहुतांशी नेत्यांची पार्श्वभूमी पाहिल्यास ही मंडळी कुठे ना कुठे सत्तेच्या आसपास असणारी (संस्थानिक, राजकीय वारसा) आणि एखाद्या प्रांतात/प्रदेशात प्रचंड जनाधार असलेली (त्यामुळेच प्रचंड जनाधार असल्याचा अहंगंड बाळगणारी) आढळते. यातले काहीच नाही, मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा, संयम, अभ्यास आणि राजकारणाकडे वस्तुनिष्ठपणे बघण्याचा दृष्टीकोन असलेल्या प्रणव मुखर्जी यांनी इंदिरा गांधी यांचा विश्वास जिंकला.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
काँग्रेससारख्या गांधी कुटुंबाभोवतीच प्रकाशझोत रेंगाळणाऱ्या राजकीय पक्षात सत्तेची विविध पदे मिळवण्यासाठी जे काही करण्याची पद्धती वा संस्कृती रुजलेली होती, त्यात अपवाद म्हणून जी काही मोजकी नावे घेता येतील, त्यात प्रणवदांचे नाव अग्रभागी होते.
कृष्ण मेनन यांच्या निवडणुकीचे, प्रचारमोहीमेचे व्यवस्थापन करणारा कुशल युवा अशी ओळख झालेल्या मुखर्जी यांनी इंदिरा गांधी यांच्या काळात मिळालेल्या संधीत स्वकर्तृत्व दाखवून दिलेच, मात्र राजकारणात आवश्यक धोरणीपणाचे, मुत्सद्देगिरीचेही धडे गिरवले.
राजकारणात वावरणाऱ्या ज्या व्यक्तीस संभाव्य शक्यता, संधी, घडामोडींचा अंदाज इतरांपेक्षा लवकर आणि अचूक येतो, तोच या स्पर्धेत टिकतो अन पुढे वाटचाल करत राहतो, असे म्हटले जाते.
या कसोटीवर मुखर्जी हे अगदी खरे उतरल्याचे स्पष्ट झालेले आहे. आपण ‘लोकनेता’ नाही, याची पुरेपूर जाण असलेले प्रणव मुखर्जी काँग्रेसच्या दरबारी राजकारणात मात्र ‘चाणक्य’ समजले जात. कारण दरबारी राजकारणासाठी अनिवार्य सर्व ती कौशल्ये त्यांच्यात उपजत होती.
याशिवाय काँग्रेससारख्या सतत निष्ठावंत दिसण्यासाठी धडपडणाऱ्या मर्जीबहाद्दर नेत्यांच्या पक्षात आपण आपले स्थान कसे उच्चतम राखू शकतो, यासाठीच्या पक्षांतर्गत डावपेचांचा अनुभव मुखर्जी यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात घेतला असावा.
काँग्रेसमधील स्वतःचा आब राखून असलेल्या अत्यंत धोरणी नेत्यांत पी.व्ही. नरसिंह राव आणि प्रणव मुखर्जी यांचा उल्लेख केला जातो. काँग्रेससारख्या गांधी कुटुंबाभोवतीच प्रकाशझोत रेंगाळणाऱ्या राजकीय पक्षात सत्तेची विविध पदे मिळवण्यासाठी जे काही करण्याची पद्धती वा संस्कृती रुजलेली होती, त्यात अपवाद म्हणून जी काही मोजकी नावे घेता येतील, त्यात प्रणवदांचे नाव अग्रभागी होते.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : प्रणव मुखर्जी : खूप काही पाहिलेला, अनुभवलेला; पण काँग्रेससाठी ‘संकटमोचका’च्याच भूमिकेत राहिलेला राजकीय नेता
..................................................................................................................................................................
राजकारण ही कला आणि शास्त्र पक्के पचवलेल्या प्रणवदांनी त्यांच्या आजवरील राजकीय वाटचालीत धक्कादायक वाटावीत, अशा काही खेळी उघडपणे केलेल्या दिसत नाहीत. मात्र त्यांनी असे काही डावपेच खेळलेले नाहीत, असे मात्र नाही. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर असताना राज्य सहकारी बँकेवर प्रशासक बसवण्याचा निर्णय ही यातील अशीच एक छोटीशी खेळी.
लोकनेता नसण्याचे फारसे वाईट वाटून न घेता वा त्यामुळे येणारे न्यूनत्व न बाळगता सत्तास्पर्धेत यशस्वी राहणाऱ्या प्रणवदांनी दिल्लीचे चलनवलन, सरकारची निर्णयपद्धती अशा अनेक प्रांतात प्रावीण्य मिळवलेले होते. नियोजन आयोग, परराष्ट्र, अर्थ, संरक्षण अशा विविध खात्यांचा कारभार केलेल्या प्रणवदांचा संसदीय प्रणाली, लोकशाही व्यवस्था, भारतीय इतिहास व संस्कृतीसह राज्यशास्त्राचा प्रचंड अभ्यास होता. ओघवते वक्तृत्व नसले (कुठे काय बोलावे यापेक्षा राजकारणात कुठे काय बोलू नये हे कळने महत्तम) तरी मोजके बोलण्यातून आपल्या हवे ते व्यक्त करण्याची आणि समोरच्या व्यक्तीचे समाधान करण्याची प्रामाणिक इच्छा स्पष्ट दिसून येत, अशी शैली असणाऱ्या प्रणवदांचे सख्य सर्वपक्षीय नेत्यांशी होते.
सकृतदर्शनी प्रणव मुखर्जी करारी, उग्र आणि मितभाषी भासत असले तरी बंगाली अभिजातपणा अंगी असलेल्या प्रणवदांसोबतच्या गप्पागोष्टींत वा संभाषणात संगीत, साहित्य, इतिहास असे विषय वर्ज्य नसल्याची कबुली हा योग आलेल्या नेत्यांनी दिलेली आहे.
राजकारणात आहोत म्हणजे आपण काहीतरी वेगळे आहोत, असा आभास कायम ठेवत कुठलातरी मुखवटा लेवूनच जगायचे, असला काही प्रकार मुखर्जी यांच्याबाबत नव्हता. आपण एका राजकीय प्रक्रियेचा भाग असून यात शक्यतांचा खेळ चालतो, एवढी वस्तुनिष्ठता अथवा वास्तववाद प्रणवदांकडे होता. त्यामुळेच पात्रता असूनही पंतप्रधानपद डावलले गेल्याची सल त्यांनी कायमस्वरूपी मनात ठेवली नसावी. वेळ पडली तेव्हा स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. मात्र योग्य वेळ येताच हा पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जितही करून टाकला. आपल्या प्रत्येक राजकीय कृतीकडे वास्तववादी दृष्टीकोनातून पाहण्याची सवय असलेल्या प्रणवदांनी राजकारणात अस्पृश्यता बाळगल्याचे दिसत नाही.
सार्वजनिक आयुष्यात प्रदीर्घकाळ व्यतीत करणाऱ्या प्रणवदांनी राजकारणातील वास्तववादाचे भान कधीच सुटू दिलेले नाही. मिळेल त्या संधीचे सोने करत विविध पदे भूषवणाऱ्या मुखर्जी यांना काँग्रेसचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जात.
सत्तास्थानी असलेल्या राजकीय पक्षाला कराव्या लागणाऱ्या तडजोडी, त्यासाठी इतर मित्र पक्षातील आणि प्रसंगी विरोधी पक्षातील नेत्यांसोबतही चर्चा, सुसंवाद साधत स्थैर्याकडे वाटचाल करत राहण्यात राजकीय प्रवाहाचे व व्यवस्थेचेही हित असल्याचा विचार मुखर्जी यांनी केला. प्रणव मुखर्जी यांच्या राजकीय वाटचालीत पंतप्रधानपदाची हुलकावणी आणि राष्ट्रपतीपदी संधी या दोन घटना बहुचर्चित ठरल्या. स्वतंत्र बाणा ही कदाचित त्यांच्यासाठी पंतप्रधान बनण्यातील अडचण ठरली. प्रणवदांनी पक्षाने राष्ट्रपदीपदासाठी दिलेली संधी स्वीकारली अन या पदावरून त्यांच्या स्वतंत्र बाण्यास अधिक झळाळी आली.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : राजीव (गांधी) : जबरदस्तीने पंतप्रधानपद स्वीकारावे लागलेला माझा मित्र
..................................................................................................................................................................
संसदीय कार्यपद्धतीचा दांडगा अभ्यास असलेल्या आणि सरकारी यंत्रणा कशी कार्यरत असते, याचा दीर्घकाळ अनुभव घेतलेल्या प्रणवदांनी या पदाची प्रतिष्ठा अबाधित राखली. कारण या घटनात्मक पदाची महती जाणून असलेल्या काही मोजक्या नेत्यांमध्ये प्रणवदा होते. तसे पाहिल्यास हे पद पक्षातीत असते, मात्र भारताच्या राजकीय प्रक्रियेत या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीकडून पक्षासाठी काहीतरी अपेक्षित वर्तनाची एक अनिष्ट परंपरा पडून गेलेली आहे.
प्रणवदा या पदावर विराजमान झाले अन केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती असा संघर्ष पाहावयास मिळणार हा भल्याभल्यांचा कयास धुळीस मिळाला. पक्षात बरीच पदे उपभोगून झाल्यावर ज्यांच्या उपद्रवमूल्याचा त्रास नको, अशा ज्येष्ठ नेत्यांना राज्यपालपदासारखी घटनात्मक जबाबदारी सोपवली जाते. बरे हे नेतेही या पदावरून त्या-त्या राज्यात सत्तेवर असलेल्या विरोधी पक्षाच्या कार्यात अडसर निर्माण करण्याखेरीज अथवा स्वपक्षाच्या सरकारला अनुकूल भूमिका घेण्यापलीकडे काहीच करत नाहीत. इथे तर पक्षासाठी आजवर संकटमोचक ठरलेले प्रणवदा राष्ट्रपतीपदी विराजमान त्यामुळे काँग्रेसच्या अपेक्षा वाढलेल्या असणे स्वाभाविक होते.
लोकसभेत बहुमत मात्र राज्यसभेत अल्पमतात असलेल्या मोदी सरकारच्या कार्यपद्धतीत प्रणवदा हस्तक्षेप करतील, अशी अटकळ बांधलेल्या काँग्रेसवासीयांची अपेक्षा भंगली. मात्र असे करताना मोदी सरकारला चुकीचे पायंडे पाडण्याची संधीही मुखर्जी यांनी कधी दिलेली नाही.
या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतर मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील कार्यक्रमाला लावलेली हजेरी हा मुद्दाही प्रचंड चर्चिल्या गेला. केवळ काँग्रेसच नव्हे तर देशातल्या पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक संस्था-संघटनांनी मुखर्जीच्या या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. प्रणवदा संघाच्या व्यासपीठावर काय बोलले? संघाने त्यांचे भाषण कितपत गांभीर्याने घेतले? यापेक्षाही प्रणवदांनी तिथे लावलेली हजेरी हा विषय अधिक चर्चेचा बनला होता. याबाबत प्रणवदांनी त्यांची भूमिका कधी स्पष्ट केलेली नाही. कदाचित त्यांच्या डायरीमधून यावर अधिक प्रकाश पडेल.
राजकारणात पक्षाची भूमिका हा कधीच शाश्वत विषय असत नाही. सत्तेपूर्वीची भूमिका सत्तेत आल्यावर कितीकाळ कायम ठेवली जाते, हासुद्धा विनोदाचा विषय बनला आहे. दीर्घकाळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसनेही ‘सत्ताप्राप्तीसाठी सर्व ते’ यापलीकडे कोणती भूमिका घेतल्याचे ज्ञात नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना झापडबंद पद्धतीने वा चौकटी आखून चालत नाही, हाच कदाचित त्यांच्या कार्यपद्धतीचा स्थायीभाव मानता येईल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
प्रणवदांच्या या कृतीमुळे भाजप वा संघाने आपला राजकीय लाभ करून घेतला, असा आक्षेप काही पुरोगामी वा काँग्रेसकडून घेतला जातो. राजकारणाकडे अत्यंत तटस्थ व वास्तववादी दृष्टीने पाहणाऱ्या प्रणवदांनी आपल्या प्रत्येक कृतीतून असा स्वतंत्र बाणा कायम राखल्याचे दिसून आलेले आहे. प्रचंड अभ्यास, पक्षभेद विसरून राजकीय प्रक्रियेत समन्वयाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रणव मुखर्जी यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले.
आपल्या कार्याचा आहे, त्यापेक्षाही प्रचंड मोठा आभास निर्माण करण्याचा ट्रेंड प्रचलित असताना ‘सर्व काही ज्ञात’ असूनही त्याबाबत गहजब न करण्याची हातोटी असलेल्या प्रणवदांनी कधी धक्कादायक विधाने केली नाहीत की, घेतलेल्या निर्णयाचे अवाजवी ‘विपणन’ करण्याची त्यांना कधी गरज वाटली नाही. विरोधकांचे मुद्देही तिथल्याच तिथे खोडून काढणाऱ्या किंबहुना वादापेक्षा प्रश्न सोडवण्यास महत्त्व देणाऱ्या प्रणवदांना मुत्सद्दी, धोरणी वा चतुर राजकारणी म्हणता येईल, मात्र दीर्घकाळ राजकीय प्रवाहात केवळ सहभागीच नव्हे तर त्या प्रवाहास गती प्रदान करणाऱ्या अन त्याबाबत चकार शब्दही न बोलणाऱ्या प्रणवदांना ‘स्थितप्रज्ञ राजकारणी’ हीच उपाधी रास्त असेल.
..................................................................................................................................................................
लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.
shirurkard@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment