शब्दांचे वेध : पुष्प सहावे
गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री
मेल्याविना मढ्याला आता उपाय नाही
दोन दिवसांपूर्वी व्हॉटसअॅपवर आलेला एक मॅसेज वाचताना ग़ज़लसम्राट सुरेश भटांचे हे अत्यंत बोलके शब्द मला आठवले. जुन्या काळी राजे-महाराजांना ते दरबारात येताना जी शाब्दिक सलामी दिली जात असे, तिच्याबद्दलची माहिती या संदेशात होती. त्यात या सलामीला ‘गारदी’ असे म्हटले आहे. भटांच्या या शेरातला ‘गारदी’ तो हा ‘गारदी’ नाही. महाराजांना दिला जायचा तो मानाचा मुजरा - गार्ड ऑफ ऑनर. आणि भटांना अभिप्रेत आहे तो गारदी म्हणजे गुंड, भाडोत्री सैनिक, कायदा न जुमानणारा, न जाणणारा धश्चोट इसम. पण उच्चार साधर्म्यामुळे मला ती आठवण आली. मग माझे विचार वेगवेगळ्या दिशांना धावू लागले आणि मी एकदम जुवेनालच्या घरी जाऊन पोहचलो.
ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकाच्या शेवटच्या आणि दुसऱ्या शतकाच्या आरंभीच्या काळात होऊन गेलेला Decimus Junius Juvenalis उर्फ Juvenal जुवेनाल हा एक रोमन कवी आणि प्रहसनकार होता. त्याने त्याच्या ‘Satires’ या प्रसिद्ध कृतीमध्ये (Satire VI, lines 347–348) ‘Quis custodiet ipsos custodes?’ अशी विचारणा केली आहे. या लॅटिन वाक्याचा अर्थ होतो – ‘Who will guard the guards themselves?’ म्हणजे पहारेकरी/राखणदारांवर नजर कोण ठेवेल? थोडक्यात, त्याला हे म्हणायचे होते की, कुंपणानेच जर शेत खाल्ले तर या दुनियेचे कसे होईल? गारद्यांच्या गर्दीत जर रामशास्त्रीही सामील झाले तर न्याय मिळणार तरी कसा?
इंग्रजांनी हिंदुस्थानात झाडांची एक भिंत (कुंपण) घातली होती, हे आत्ताआत्तापर्यंत अनेक लोकांना माहीत नव्हते. Roy Moxhamने आपल्या ‘The Great Hedge Of India’ या पुस्तकात जेव्हा या काटेरी कुंपणाचा इतिहास सांगितला, तेव्हा अनेक डोळे विस्फारले. कारण अविश्वसनीय वाटावी अशीच ही हकीकत होती. आज या कुंपणाचे फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत, नहीं के बराबर. या कुंपणाच्या एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूकडे जाताना मिठाचे स्मगलिंग (चोरटा व्यापार) करू नये, आणि सरकारला कर न देता मिठाची वाहतूक करू नये, असे कारण हे कुंपण घालण्यामागे होते. इंग्रजी सरकार जुलमी तर होतेच, पण आपल्याही अनेक लोकांनी त्यांना साथ दिली. त्यात संस्थानिकही होते आणि सामान्य जनताही. त्यांच्याच मदतीने हे कुंपण अनेक वर्षे अस्तित्वात होते. खरे म्हटले तर १९४७ पूर्वीच या कुंपणाने देशाचे दोन तुकडे केले होते. पुढे जेव्हा इंग्रजांनाच त्याची देखरेख करणे खर्चिक आणि त्रासदायक वाटू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःच त्याला नष्ट केले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
मी जेव्हा हे पुस्तक वाचले, तेव्हाही मला जुवेनालच्या ‘Quis custodiet ipsos custodes?’ या वाक्याची आठवण आली होती. चौकी-पहाऱ्यांवरचे आपले देशी ‘custodes’ म्हणजे पहारेकरी इतके इमानदार आणि इंग्रजांना वाहिलेले होते की, त्यांच्याबाबत त्यांना संशय घेण्यासारखे काही नव्हते. (अर्थात इंग्रजांनी कधीच कोणत्याच भारतीयावर डोळे झाकून विश्वास ठेवला नाही, ही गोष्ट वेगळी.) स्वतंत्र भारतात हेच वाक्य वेगळ्या प्रकारे म्हणावे लागत आहे. राजकारण, सरकारी प्रशासन, पोलीस, पत्रकारिता - सर्वच क्षेत्रांत आज सचोटी, उत्तरदायित्वाची भावना, जबाबदारी, या लोकशाही मूल्यांविषयी एवढी अनास्था, एवढी उदासीनता दिसून येते की, तिथली बजबजपुरी, तिथला सार्वजनिक भ्रष्टाचार, तिथली अनागोंदी पाहून असे म्हणावेसे वाटते की, लोकशाहीच्या या
सर्व रक्षकांवर नजर ठेवणार तरी कोण आणि कशी?
‘Custos’ या लॅटिन शब्दाचा अर्थ ‘गार्डियन्स’ असा होतो. कायद्याच्या परिभाषेत ‘Guardian’ म्हणजे पालक. मूळ अर्थ रक्षक असा आहे. ‘Custodia’पासून इंग्रजीत ‘custodian’, ‘custody’ असे शब्द तयार झाले.
जुव्हेनालच्या वाक्याचे ‘Who will watch the watchmen?’ असेही भाषांतर केले जाते. ‘Watchman’, ‘guard’, ‘keeper’, ‘protector’, ‘warden’, ‘chowkidar’ ही सारी ‘custodian’ या शब्दाची पर्यायी रूपे आहेत. यापैकी ‘चौकीदार’ हा शब्द इंग्रजी भाषेने भारताकडून आयात केला. हल्ली किती इंग्रज तो वापरतात कोण जाणे, पण ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य जेव्हा तळपत होता, तेव्हा भारतातून मायदेशी परत गेलेल्या इंग्रजांमुळे इंग्लंडमध्ये ‘Anglo-Indian’ शब्दांचा भरपूर वापर केला जात असे. ‘Chowkidar’ हा त्यातलाच एक शब्द.
‘Guard’ या शब्दाला लॅटिनमध्ये पर्याय जरूर आहे, पण त्याचे मूळ फ्रेंच आहे. तिथे ‘garder’ पासून ‘garde’ बनला आणि त्याचेच इंग्रजीत ‘Guard’ झाले. मात्र स्पेलिंगमध्ये तो शेवटचा ‘e’ जाऊन ‘g’ नंतर तो ‘u’ का आला, याची चिकित्सा करण्याची गरज नाही. ‘Guard’ हा शब्द पुढे रेल्वेमुळे जास्त प्रचलित झाला. मात्र हा रेल्वेचा गार्ड ‘रिअर गार्ड’ असतो. तो पिछाडीला राहून, मागून गाडीवर लक्ष ठेवतो.
या उलट लष्कराच्या भूदळात ‘व्हॅनगार्ड’ (vanguard) असतात. हे सैनिक सर्वांत पुढे राहून आघाडी सांभाळतात. कोणत्याही क्षेत्रात (विषेशतः कलेच्या क्षेत्रात) आघाडीवर राहून, नेहमीच्या चाकोरीतून बाहेर पडून काही तरी वेगळे, नवीन करून दाखवणारे, सर्जनशील, प्रयोगशील असे जे लोक असतात, त्यांनाही ‘व्हॅनगार्ड’ म्हणतात. पण याबाबतीत याच अर्थाचा ‘avant garde’ (आवाँ गार्द’ हा शब्द जास्त लोकप्रिय आहे. तो फ्रेंच असल्याने म्हणणाऱ्यालाही आपले ज्ञान दाखवता येते. ‘Avant’ म्हणजे आधी किंवा पुढे.
याखेरीज ‘लाईफगार्ड’, ‘बॉडीगार्ड’, ‘कोस्टगार्ड’ या शब्दांतही रक्षण करणारा हा अर्थ येतो. मात्र ‘ब्लॅकगार्ड’ हा असा एक शब्द आहे, ज्यात या गार्डचा भलताच अवतार बघायला मिळतो. अत्यंत नीच आणि अधम मनुष्य म्हणजे ‘ब्लॅकगार्ड’. सोळाव्या आणि सतराव्या शतकात इंग्लंडमधल्या अमीर-उमरावांकडे असलेले त्यांचे खासगी अंगरक्षक काळ्या रंगाचे पोषाख घालत असत. त्यांना ‘ब्लॅकगार्ड’ म्हणत असत असा एक तर्क आहे. पण १७३६च्या आसपास या शब्दाचा हा अर्थ बदलला आणि १७८४ मध्ये त्याने सध्याची अर्थच्छटा धारण केली, असे भाषा शास्त्रज्ञ सांगतात.
आता या इंग्रजी ‘गार्ड’चा आणि आपल्या मराठी ‘गारदी’चा काय संबंध आहे? मराठीत ‘गार्दी’/‘गारदी’ हा शब्द आला कुठून आणि कसा हा कुतुहलाचा विषय आहे.
काहींच्या मते गारदी हे राजस्थानातल्या एका जातीचे नाव आहे, तर काही जण म्हणतात की, तापी नदीच्या दक्षिणेकडे आजच्या तेलंगणा राज्यापर्यंत असलेल्या भूभागात राहणाऱ्या काही विशिष्ट समुदायांतले लोक म्हणजे गारदी. याशिवाय गारदी हे अलेक्झांडर/सिकंदरच्या काळात तुर्कस्तानातून आताच्या अफगाणीस्तान/पाकीस्तानमार्गे आलेले परकीय लोक आहेत, असेही काही लोक मानतात. घोषणा किंवा ललकारी म्हणजेच गारद देणाऱ्यांनाही ‘गारदी’ म्हणतात. ते लढवय्येही असतात. इब्राहिमखान गारदी याचे नाव पानिपतच्या तिसऱ्या लढाईशी कायमचे जोडले गेलेले आहे. आणि एक मत असेही आहे की, ‘गारदी’ हा शब्द इंग्रजी ‘गार्ड’ किंवा फ्रेंच ‘गार्द’चा देशी अवतार आहे. सुरेश भटांच्या कवितेत दिसतो तो गारदी क्रूर आणि निर्दयी आहे. तो पैशांसाठी लढतो आणि पैशांसाठी आपले इमानही विकू शकतो. यातले नक्की खरे काय?
‘विकीपिडीया’ सांगतो की ‘गारदी’ या नावाभोवती एक गूढ वलय आहे.
‘हॉबसन-जॉबसन’ या प्रख्यात शब्दकोशातली (१९०३ ची आवृत्ती) ही प्रविष्टी बघा -
1) GARDEE s. A name sometimes given, in 18th century, to native soldiers disciplined in European fashion, i.e. sepoys (q.v.). The Indian Vocabulary (1788) gives : ‘Gardee - a tribe inhabiting the provinces of Bijapore, &c., esteemed good foot soldiers.’ The word may be only a corruption of 'guard,' but probably the origin assigned in the second quotation may be well founded; 'Guard' may have shaped the corruption of Gharbi. The old Bengal sepoys were commonly known in the N.W. as Purbias or Easterns (see POORUB).
[Women in the Amazon corps at Hyderabad (Deccan), known as the Ẓafar Palṭan, or ‘Victorious Battalion,’ were called gardunee (Gārdanī), the feminine form of Gārad or Guard.]
1762 – ‘A coffre who commanded the Telingas and Gardees… asked the horseman whom the horse belonged to?’ - Native Letter, in Van Sittart, i. 141.
1786 – ‘…originally they (Sipahis) were commanded by Arabians, or those of their descendants born in the Canara and Concan or Western parts of India, where those foreigners style themselves Gharbies or Western. Moreover these corps were composed mostly of Arabs, Negroes, and Habissinians, all of which bear upon that coast the same name of Gharbi... In time the word Gharbi was corrupted by both the French and Indians into that of Gardi, which is now the general name of Sipahies all over India save Bengal... where they are stiled Talingas.’ - Note by Transl. of Seir Mutaqherin, ii. 93.
[1815. – ‘The women composing them are called Gardunees, a corruption of our word Guard.’ - Blacker, Mem. of the Operations in India in 1817-19, p. 213 note.]
..................................................................................................................................................................
हेही वाचा : प्रेमाच्या अमृते रसना ओलावली (व्हलप्चस ते उमामी ते काहीतरी ‘निराकार’पर्यंत)
..................................................................................................................................................................
मोल्सवर्थसाहेब सांगतात -
गारदी gāradī m A foot-soldier & c. See गाडदी. And गारदाई its derivative signifies Insurrectionary tumult amongst such soldiers; and, hence, tumult, confusion, uproar, more generally: also dense and clamorous crowding; wild pressing and thronging: also laxly, ruin, disorder, damage, spoiledness;
गाडदी gāḍadī m (Guardá. Port. The word, however, is found in the oldest records, and is not viewed as foreign.) A soldier, an infantry-soldier, esp. a soldier employed about the person of the Peshwá or of other Rájá; a guardsman or guard. More frequently understood of Musalmans...
..................................................................................................................................................................
हेही वाचा : वात्सल्य, पान्हा, पदर, अंकल, आण्टी आणि बरेच काही…
..................................................................................................................................................................
दात्यांच्या शब्दकोशानुसार
गारदी—पु. गाडदी पहा. ‘ते गारदी निष्ठूर, त्यांजला दया कोठून? इच्छारामपंत गाईच्या आड पडला असतां, गाई- सुद्धां गारद्यांनीं इच्छारामपंतास ठार केलें.’ -पेब
गार- दाई-स्त्री. १ गाडद्यांचा दंगा, बंड. २ (ल.) गोंधळ, दंगा, गलगा, गर्दी, धिंगामस्ती. ३ नाश; नुकसान; खराबा; बिघाड. ‘धनाची मालाची, संसाराची गारदाई.’
[इं. गार्ड-गारदी पहा]
गाडदी—पु. शिपाई, पायदळांतील शिपाई, विषेशतः शरीर संरक्षक शिपाई, पाहारेकरी.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पेशवे, इतर सरदार व राजे यांजवळ असे गाडदी असत. यांत विषेशतः परदेशीय व मुसलमानांचा विशेष भरणा होता. गारदी पहा. [पोर्तु. गार्दा; इं. गार्ड]
‘गार्दी /गारदी’पासून ‘गारद’ किंवा ‘गारत होणे’ असा शब्दप्रयोग तयार झाला की, ‘गारत/द’ पासून ‘गारदी’ हे नक्की सांगता येणार नाही. नष्ट होणे, बुडणे, गाडले जाणे, बिघडणे अशा विविध अर्थांनी आपण तो वापरतो. जोशी-गोरेकर यांच्या उर्दू-मराठी शब्दकोशानुसार ‘ग़ारत’ हा शब्द मूळचा अरेबिक भाषेतला आहे. त्याला ‘गर’ हा फारसी प्रत्यय जोडला तर लुटारू, विध्वंसक, दरोडेखोर असा अर्थ होतो.
गर्दीत गारद्यांच्या... असे भट म्हणतात. यातला ‘गर्दी’ हा शब्दसुद्धा फारसी ‘गर्द’पासून बनलेला आहे. दाट, धूसर, मलीन, म्हणजे गर्द. त्याचा झाला गरदा. आणि त्यापासून झाली गर्दी.
गाद्या-गिरद्यांमधली ‘गिरदी’ ही फारसी ‘गिर्दा’चे अपत्य आहे. ‘गिर्दा’ म्हणजे वर्तुळ. त्यापासून लहान वाटोळी उशी अशा अर्थाचा ‘गिरदी’ हा शब्द तयार झाला. किल्ल्याच्या घेराच्या प्रदेशालाही ‘गिर्दी’ म्हणतात.
शेवटी काय तर अरबी-फारसी-उर्दू-लॅटिन-फ्रेंच-इंग्रजी इतक्या सगळ्या भाषांचा धांडोळा घेऊनही शेवटी ‘गारदी’ म्हणजे नक्की कोण, या कोड्याचे उत्तर मला तरी अजून मिळालेले नाही.
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment