अजूनकाही
सापडला… आणि सापडलीसुद्धा! नरेंद्र मोदी यांचे राज्य सुरू झाल्यापासून भारत कसकसा बदलला ते कादंबरीतून सांगणारा एक लेखक सापडला!! त्याच्यासोबत अर्थातच त्याची साहित्यकृतीही. भारतात शोधायचा प्रयत्न केलात तर मुश्किल होईल. आहेत काही बाया. त्या धाडसी निघाल्या. पुरुषमंडळी निपचित, पायचित आणि त्रिफळाचित झालेली आहेत. तर हा लेखक तसा मूळचा भारतीय वंशाचा. केनयात जन्मला, टांझानियात वाढला आणि कॅनडात स्थिरावला. आता तो स्वत:ला कॅनडियन म्हणवतो.
एम. जी. वस्सानजी हा तो लेखक आणि ‘अ दिल्ली ऑब्सेशन’ ही त्याची कादंबरी. २०१९च्या अखेरीस ती पेंग्विनतर्फे प्रकाशित झाली आहे. तसे हे वस्सानजी आफ्रिकेत व कॅनडात खूप मानमरातब मिळवून आहेत. पण आपला वंश भारतीय मानत असल्याने ते अनेकदा येत-जात. बहुधा भारतीय लेखकांची दया येऊन त्यांनी ही कादंबरी लिहून काढली. एक मुसलमान म्हणूनही त्यांना भारतात व अन्यत्र चिक्कार भेदभाव सोसावा लागला, तसा जातीयवादी पक्षाचे राज्य येथे स्थापन झाल्यावर त्यांना अस्वस्थता अन दु:ख सोसावे लागले. म्हणून त्यांनी त्यांच्या प्रिय देशाचे वास्तव एका कादंबरीतून रेखाटले आहे. ज्यांना देशापेक्षा आपले प्राण प्रिय वाटतात, त्यांना दाखवला गेलेला हा एक आरसा समजा.
गंमत म्हणजे कादंबरीचा नायक एक कॅनेडियन लेखकच आहे. दोन-चार पुस्तकांमुळे माफक प्रसिद्धी मिळवलेला. नाव मुनीर असलम खान. स्कॉटिश बायकोचे अपघाती निधन झाल्याने व मुलगी रझिया अमेरिकेत असल्याने एकाकी विधुरपण जगणारा. लेखक म्हणून आटून गेलेला. शेजारी एक भारतीय कुटुंब राहायला आल्यावर त्याला भारतात जाण्याची अनिवार ओढ लागते. त्याचे आजोबा लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकणाऱ्या रासबिहारी बोस यांच्या क्रांतिकारक टोळीतील होते. पोलीस मागे लागतात, म्हणून लपतछपत शिमल्यात व तिथून आफ्रिकेत परागंदा होतात. केनियात स्थायिक होऊन सुवर्णकाम व दागिने तयार करण्याचा व्यवसाय चालवतात.
बस्स! एवढ्या ऐकिव माहितीवर मुनीरला आपल्या पूर्वजांचा मागोवा घेण्यासाठी दिल्लीची आस लागते.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘सातपाटील कुलवृत्तांत’ : मानवी ‘अहं’ना नख लावणारी कादंबरी!
..................................................................................................................................................................
खरे तर दिल्लीचे हेच ऑब्सेशन! परंतु तिथे मोहिनी सिंग नामक एका ‘सोशालाईट’ प्रौढ विवाहितेची गाठ पडते. पन्नाशीच्या पारचे मुनीर व आतील मोहिनी एकमेकांच्या प्रेमात पडतात. मग सुरू होते हिंदू-मुस्लीम संबंधांमधील ताणतणाव, अज्ञान, गैरसमजुती आणि शुद्ध मानवी आकर्षण यांची दुसरी गोष्ट. हे दोघे भेटत असतात, तिथे जेठालाल या हिंदुत्ववादी व घोर मुस्लीमविरोधी नेत्याच्या व त्याच्या टोळक्याच्या पहाऱ्यात अडकतात.
मेघा मजुमदार (‘अ बर्निंग’) हिने जशी तीन पात्रे तयार करून त्यांची प्रकरणे आलटूनपालटून मांडली, तशी वस्सानजींनी मुनीर व मोहिनी यांची पात्रे लिहिली आहेत. दोघांच्या व्यक्तिमत्त्वातून त्यांचा परिवार मांडला आहे. मोहिनी पाकिस्तानातून फाळणी झाल्यामुळे परागंदा झालेल्या आई-वडिलांची मुलगी. त्यामुळे घरात मुसलमान म्हणजे परका, अन्य…
नॅशनॅलिस्ट पार्टी, नॅशनल सर्व्हिस स्कीम अशी नावे कादंबरीत भाजप व रा. स्व. संघ यांची आहेत. तर जेठालाल नथुरामचे गोडवे गाणारा, गोमातारक्षक आणि अयोध्येतील कारसेवक आहेत. एका हिंसक, आक्रमक, पांढरा गणवेश करणाऱ्या टोळक्याचे नेते आहेत. मुनीर दिल्लीत असतानाच एक दहशतवादी बॉम्बस्फोट होतो. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मुस्लिमांच्या झालेल्या हत्या त्याला माहीत असतात. तरीही कधी एकटा, तर कघी मोहिनीसह मुनीर दिल्ली व आजोबा यांचा ठावठिकाणा जाणून घेतो.
मोहिनी म्हणजेच भारत, तिची आपल्यावरची ‘मोहिनी’ म्हणजेच आपले भारतावरील प्रेम, असे मुनीरला वाटत राहते. किंबहुना मोहिनी व ऑब्सेशन या लेखकाने पर्यायवाची प्रतिमा म्हणून वापरलेल्या दिसतात. वस्सानजींनी एका मुलाखतीत तसे म्हटलेही आहे. आपली मुळे शोधायला तीनदा दिल्लीत आलेला आणि जयपूर, भुवनेश्वर, शिमला येथील पाहुणचार उपभोगून कॅनडाला परतायला निघालेला मुनीर दिल्लीत भोसकला जाऊन ठार होतो. मोहिनी तिच्या मोटारीच्या अपघातात गाडीसह जळून खाक होते. या मागे जेठालाल व त्यांची टोळी असल्याचा संकेत देऊन वस्सानजी कादंबरी संपवतात.
आपले खूप काही निकटचे हरवलेय अन त्याचा एकसारखा चाललेला शोध, हे या कादंबरीचे सूत्र. मोहिनीचे वडील फाळणीच्या वेळी रेल्वेमधूनच बेपत्ता झालेल्या धाकट्या भावाचा शोध घेतात. मुनीर आपल्या आजोबांच्या रहिवासाचा... एक लेखक म्हणून दिल्लीवरच्या राज्यकर्त्यांचा. मोहिनी संसारातून निसटलेल्या सुखाचा व आनंदाचा. तिचा नवरा रवी गुप्तहेर सेवेत असल्याने तो सतत संशयात बुडालेला. मुनीर देवळात नमस्कार करतो अन निजामुद्दिन दर्ग्यालाही भजतो.
तो खरं तर नमाज पढणे विसरलाय, तर मांसाहाराबद्दल निरिच्छ झालाय. आपले मुस्लीमपण आपण टाकून दिले आहे, मात्र भारतात सारखी धर्मावरून ओळखण्याची इतरांची सवय किती त्रासदायक आहे, असा तो विचार करतो. त्याची मुलगी अमेरिकेत एका ज्यू प्रोफेसरशी लग्न करते. त्यांच्या पोटी जोश्वा जन्मतो. जावयाचे आई-वडील अमेरिकेत त्याला सहज स्वीकारतात. भारतात मात्र सदानकदा धर्माची ओळख.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
वस्सानजींनी या कादंबरीत बरेच धीट विषय मांडले आहेत. हिंदू विवाहिता व विधुर मुस्लीम यांचे प्रेमसंबंध असोत की, मुसलमानांविरुद्ध पेटलेल्या जातीयवादी हिंदूंच्या भावना; अपप्रचार अन अफवा यांचा प्रभाव असो की, शाळा-महाविद्यालयांत प्रमुख पाहुणे म्हणून जाणाऱ्यांची फजिती व त्यातील पोकळपणा; मोहिनीच्या आईचे दीराविषयीचे आकर्षण असो की, आपल्या स्कॉट पत्नीचा पूर्वीचा प्रियकर! कादंबरीचा शोकांत तर अगदी एका पानात गच्च भरलेला, पण अत्यंत धक्कादायक…
चला, या निमित्ताने भारतीय लेखकांच्या भेकडपणाचाही प्रत्यय आला. मोदींनी ‘मोर’ पाळल्याचे नुकतेच दाखवले गेले. त्यांची ‘सरस्वती’ बहुधा पळून गेली असावी किंवा एखाद्या खोलीत कैदेत…
..................................................................................................................................................................
‘अ दिल्ली ऑब्सेशन’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/Delhi-Obsession-Novel-M-G-Vassanji/dp/0385692854
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment