‘सातपाटील कुलवृत्तांत’ : मानवी ‘अहं’ना नख लावणारी कादंबरी!
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
नीतीन रिंढे
  • ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 29 August 2020
  • ग्रंथनामा बुक ऑफ द वीक सातपाटील कुलवृत्तांत Satpatil Kulvruttant रंगनाथ पठारे Rangnath Pathare

१.

मराठी कादंबरीकार वर्तमान आणि भविष्यकाळ यांच्याकडे पाठ फिरवून भूतकाळात, इतिहासातच अधिक रमतात असं मत अलीकडे ऐकू येतं. महाराष्ट्राला पेशवेकाल-शिवकालापलीकडे भूतकाळ नाही, आणि शिवशाही-पेशवाईपलीकडे इतिहास नाही, अशा उथळ समजुतीतून लिहिलेल्या कादंबऱ्या (ज्यांना थेट ‘ऐतिहासिक कादंबऱ्या’ असंच म्हणतात) मराठीत महामूर आहेत हे खरंच. पण मराठी कादंबरीत कृतक्-इतिहासाचा हा रोग शिरला आहे, तेवढ्यावरून कादंबरी या साहित्यप्रकाराने इतिहासापासून, भूतकाळापासून फटकून राहिलं पाहिजे, असा आग्रह धरणं देखील गैर आहे. उलट ज्या समाजाला हजारो वर्षांचा जिवंत आणि सलग इतिहास आहे, आणि ज्या समाजाच्या वर्तमानातल्या वर्तनात या इतिहासाचे अनेक सूक्ष्म तंतू अद्यापही जिवंत असलेले दिसतात, अशा समाजांतले अनेक लेखक उत्कटतेने, जिज्ञासेने आपल्या इतिहासाकडे, भूतकाळाकडे वारंवार वळताना स्वाभाविकपणे दिसतात.

लॅटिन अमेरिकेत ‘बूम जनरेशन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिढीतल्या लेखकांनी आपल्या इतिहासालाच कादंबरीच्या रूपात मांडलं. या पिढीतला एक प्रसिद्ध लेखक मारियो वर्हास योसा (Mario Vargas Llosa) म्हणतो की, लॅटिन अमेरिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या युरोपीय सत्तांनी कादंबरीवर (म्हणजे कादंबऱ्या लिहिणं, छापणं आणि वाचणं देखील) बंदी घातली होती. अशा घुसमटीच्या परिस्थितीत लॅटिन अमेरिकी लेखकांनी आपला इतिहास कादंबरीरूपात लिहायला सुरुवात केली. कादंबरी आणि इतिहास यांच्यातलं नातं नेमकं कसं असतं याचं उत्तम भान या लेखकांच्या कादंबऱ्यांमधून प्रकटतं. मराठीतल्या लेखकांना मात्र हे भान फारसं असल्याचं दिसत नाही. नंदा खरे (‘अंताजीची बखर’ आणि ‘बखर अंतकाळाची’), दिनानाथ मनोहर (‘मन्वंतर’), आनंद विनायक जातेगावकर (‘अस्वस्थ वर्तमान’), भालचंद्र नेमाडे (‘हिंदू’) या मोजक्या लेखकांनी इतिहास आणि फिक्शन यांचा असा मेळ साधण्याचं भान दाखवलं आहे. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीमुळे रंगनाथ पठारे यांचाही या लेखकांच्या लहानशा यादीत समावेश करावा लागेल.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही शीर्षकातून सुचवल्याप्रमाणे सातपाटील कुळाचा शोध घेणारी कादंबरी आहे. असा स्वकुळाचा शोध घेणाऱ्या कादंबऱ्यांचा एक आकृतिबंध अलेक्स हेलीच्या ‘द रूट्स’पासून रूढ झालेला आहे. ‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीने हा आकृतिबंध स्वीकारलेला असला तरी ‘द रूट्स’पेक्षा ‘सातपाटील…’ काही बाबतींत पूर्णतः वेगळी आहे. महत्त्वाचं वेगळेपण असं की, ‘द रूट्स’मधला नायक काळा आहे आणि त्याचे पूर्वज गुलाम म्हणून आफ्रिकेतून अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या कादंबरीतून गुलामगिरीचा इतिहास उभा राहतो. ‘सातपाटील...’चा निवेदक देवनाथ सातपाटील हा मराठा-कुणबी या सामाजिक रचनेतल्या साधारणतः मध्यम स्तरावरच्या जातीतला आहे. परंपरेने तो ग्रामव्यवस्थेतल्या बलुतेदारांचा पोशिंदा आहे. त्यामुळे या कादंबरीतून ग्रामीण समाजातल्या जातीय रचनेचा मराठाकेंद्री सामाजिक इतिहास उभा राहतो. पठारे यांनी या लेखनाला मराठाकेंद्री न होऊ देण्याचा अतिशय कसोशीने प्रयत्न केल्याचं जागोजागी जाणवतं. पण एका विशिष्ट घराण्याच्या वंशवेलीचा शोध कादंबरीच्या कथानकातलं मध्यवर्ती कथासूत्र असल्याने, आणि ते अत्यंत प्रभावी रीतीने उतरल्याने, त्यांना ही गोष्ट नीट साधता आलेली दिसून येत नाही.

मात्र एका बाजूने हे स्वाभाविक आहे असंच म्हणावं लागेल. भारतीय समाज अनेक जातिसमूहांचा मिळून बनलेली व्यवस्था आहे. ही व्यवस्था आकाराला आणण्यात काही जातींचा विशेष हात आहे. त्यांना कळीचं स्थान आहे. यात ब्राह्मण, मराठा आणि पूर्वाश्रमीचे महार या तीन जाती ठळक आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासलेखन परंपरेत एक ब्राह्मणकेंद्री इतिहास लेखनाची परंपरा आहे. या लेखनाचा प्रारंभ साधारणपणे शिवकाळापासून होतो. वि. का. राजवाडे आणि इतर राष्ट्रवादी इतिहासकारांनी हा इतिहास लिहिला आहे. याला पर्यायी अशी ब्राह्मणेतर जातिसमूहकेंद्री इतिहासलेखनाची परंपरा विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून मराठीत निर्माण झाली. त्यात मराठा आणि महार यांच्या संदर्भात मांडणी झाली आहे. या परंपरेत वि. रा. शिंदे, राजारामशास्त्री भागवत यांचं इतिहासलेखन येतं. ‘सातपाटील...’मधली इतिहासदृष्टी या पर्यायी इतिहासलेखन-परंपरेने संस्कारित झालेली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

.................................................................................................................................................................. 

याचबरोबर वंचितांचा इतिहास (Subaltern History), मौखिक इतिहास अशा इतिहासलेखनशास्त्रातल्या अलीकडच्या संकल्पनांचाही प्रभाव लेखकाच्या इतिहासदृष्टीवर आहे. मराठीतल्या रूढ ऐतिहासिक कादंबऱ्या या राजे, युगपुरुष, कर्तबगार घराणी यांच्या कहाण्या सांगतात. इतिहासदेखील एकेकाळी राजेरजवाड्यांचाच लिहिला जात असे. पण समाजातल्या सामान्य मनुष्याचाही इतिहास असतो, ही जाणीव गेल्या पन्नासेक वर्षात इतिहासलेखनशास्त्रात रूजली आहे. ‘सातपाटील...’चा फोकस समाजाच्या सर्वसामान्य स्तरावर आहे. या कादंबरीचे नायक दत्ताजी शिंदेच्या किंवा दुसऱ्या बाजीरावाच्या सैन्यातले साधे शिपाई आहेत. फार तर गावच्या पाटीलकीपर्यंत त्यांची मजल जाते. अव्वल इंग्रजांच्या काळात या घराण्यातले नायक पोलीस शिपाई बनतात किंवा ट्रक ड्रायव्हर. एरवी शेती हाच त्यांचा व्यवसाय राहतो.

दुसरी संकल्पना ‘मौखिक इतिहासा’ची. खरं तर इतिहास ही आधुनिक संकल्पना. वेळोवेळी नोंदवून ठेवलेल्या अशा लिखित किंवा उत्खननात सापडलेल्या पुरातत्त्वीय आधारांच्या सहाय्याने घटनांचा वस्तुनिष्ठ दृष्टीने मांडलेला अन्वय हे इतिहासाचं प्रमुख वैशिष्ट्य. ही आधुनिक दृष्टी आहे. आपल्याकडे प्राचीन काळापासून चालत आलेली मौखिक आख्यानं, आख्यायिका, लोकगीतं, लोककथा यांना या इतिहाससंशोधनात स्थान नव्हतं. परंतु अलीकडे या मौखिक रूपांचं विश्लेषण करून त्यातही इतिहासाचे कण शोधता येतात, हे मत मान्य झालं आहे. विशेषतः इतिहासाचा फोकस सर्वसामान्य व्यक्तीकडे वळला, तेव्हा त्याच्या सांस्कृतिक इतिहासासाठी मौखिक रूपं फार उपयुक्त ठरू लागली. धर्म, परंपरा, रीतीरिवाज यांचा इतिहास लिहिण्याचं हे महत्त्वाचं साधन ठरलं. रा. चिं. ढेरे यांनी ‘शिखर शिंगणापूरचा शंभूमहादेव’ या पुस्तकात भोसले घराण्याचा इतिहास अशा बव्हंशी मौखिक साधनांच्या सहाय्यानेच लिहिला आहे. ‘सातपाटील...’चा निवेदक देवनाथ याला देखील या आख्यायिका वगैरे मौखिक कथनांबद्दल विशेष आस्था आहे. आपल्या मुळांचा शोध घेत तो वांबोरी गावी पोहचतो, तेव्हा तिथं त्याला भेटणारे माणिक बल्लाळ गुरुजी वांबोरीचा इतिहास त्यांना आख्यायिकांच्या रूपात सांगतात. देवनाथला ते ‘काळाला बांधून न घेणारे... कालातीत असण्याची प्रवृत्ती’ असलेलं कथन फारच भावतं. इतिहास असाच सांगितला पाहिजे, असं त्याला वाटतं. तो वाचकांना उद्देशून म्हणतो देखील :

“अन् काटेकोर इतिहासाचे काय! त्या प्रकारचा इतिहास लिहिणारे लोक आपण नाहीच आहोत मुळात. प्राचीन काळात या भरतखंडात घडलेल्या महायुद्धाची आपल्या पूर्वजांनी महाकाव्ये केली. ती पिढ्यान् पिढ्या अनेक कलाप्रकारांमधून, म्हणजे; नृत्य, काव्य, नाट्य अशा अनेक कलांद्वारे जगभर – विशेषतः आशिया खंडात – सतत विस्तारत पुन्हा पुन्हा घडत राहिली. ती सतत समकालीन आहेत. काटेकोर इतिहास हे करू शकला असता काय? अगदी अलीकडच्या काळात आपण बखरी, पोवाडे, लावण्या, भेदिके अशा अनेक पद्धतींनी इतिहासाचे जतन करत राहिलो. आपण इतिहासाला काव्य, कादंबरी अशा जिवंत कलाप्रकारात ओवत त्याला चिरंजीव आणि स्फुरणशील ठेवण्याची परंपरा असलेले लोक... खरे-खोटे काय तुम्हाला समजायचे ते समजा. निवडायचे ते निवडा. नाहीतरी काटेकोर इतिहास तरी कुठे निखळ सत्य असतात? अन् त्यांच्यात पुन्हा सामान्य माणसाचा इतिहास कितीसा असतो? त्यापेक्षा इतिहासाने असे कलात्मक पातळीवर जाण्यात जोमदारपण आहे असेच म्हणावे लागते.” (पृ. ७४८)

हा दीर्घ उतारा इथं देण्यामागे एक हेतू असा की, या उताऱ्यात लेखकाची केवळ इतिहास-कल्पनाच स्पष्ट होत नाही, तर इतिहास आणि फिक्शनचा मेळ घालण्याचा खटाटोप तो का करतो आहे आणि त्यासाठी त्याने मौखिक कथनपरंपरेशी मिळताजुळता आकृतिबंध का स्वीकारला आहे, याचंही उत्तर मिळतं. देवनाथने कथन केलेल्या या स्वकुळाच्या शोधाच्या कहाणीला उल्फी आणि भीमाबाई या दोघींच्या लिखित आत्मकथनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही लिखित संहितेचा आधार नाही. घराण्यात चालत आलेल्या कथा-आख्यायिका, बल्लाळ गुरुजींसारख्यांनी सांगितलेल्या अघळपघळ गोष्टी यांच्या सहाय्याने आपण ही कहाणी रचली आहे, हे कथनाच्या ओघात स्पष्ट होतं. कादंबरीच्या शेवटी तीर्थक्षेत्राच्या पुजाऱ्याला तो म्हणतो की, आपल्याकडे वंशवृक्ष आहेत, पण वंशजांच्या चरित्रांचे तपशील नाहीत. आपण काही एक अन्वयार्थ लावण्यासाठी ते कल्पनेने जोडले आहेत (पृ. सातशे शहाण्णव).

..................................................................................................................................................................

हेही वाचा : राजीव (गांधी) : जबरदस्तीने पंतप्रधानपद स्वीकारावे लागलेला माझा मित्र

..................................................................................................................................................................

पण लेखकाची ही भूमिका केवळ इतिहासाविषयीची नाही, हेही लक्षात घ्यावं. लेखक एकंदरच भाषेद्वारे काही ‘सत्य’ मांडता येतं काय याविषयी शंका घेत आहे. “सत्य काय; ते नेहमीच हुलकावण्या देणारे असते,” असं देवनाथ म्हणतो. त्याच्या मते यावर उपाय म्हणजे “हुलकावण्यांचेच जाळे तयार करायचे अन् त्यात सत्याला शोधायचे...” (पृ. ७४९).

थोडक्यात, ‘सातपाटील...’ ही कादंबरी हा इतिहास सांगणाऱ्या अनेक संभाव्य कथनांपैकी एक असं, देवनाथ सातपाटील याच्या दृष्टिकोनातून केलेलं कथन आहे. याहून भिन्न कथनांद्वारे हा इतिहास आणखी निरनिराळ्या प्रकारे मांडता येईल, अशी ही भूमिका आहे. पण तरीही या कादंबरीत लेखकाने स्वतः प्रमाणित केलेलं म्हणून एक सत्य आहेच. त्याविषयीच इथं चर्चा करायची आहे. आता एक प्रश्न : ही कादंबरी समजावून घेण्यासाठी इतिहासशास्त्राची ही चर्चा आवश्यकच आहे का? तर मुळीच नाही. इतिहासातल्या वरील संकल्पना विचारात न घेताही या कादंबरीचा आस्वाद उत्तम प्रकारे घेता येऊ शकतो. मात्र एखाद्या कादंबरीत इतिहास हे प्रमुख आशयसूत्र म्हणून अवतरत असेल आणि तसा इतिहास मांडण्यामागे लेखकाचा काहीएक दृष्टिकोन असेल, तर आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. असो.

२.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीची दोन शक्तिस्थानं म्हणजे तिचा रूपबंध आणि कथनाची वाचनीयता. वर इतिहास-कथनाविषयीची लेखकाची जी भूमिका दिलेली आहे, तिला अनुरूप असा कादंबरीचा रूपबंध आहे. आख्यायिका-लोककथांमध्ये असतात, तसे अशक्य वाटावेत इतके योगायोग या कादंबरीत जागोजागी आहेत. प्रत्येक सातपाटील आयुष्याच्या अंतकाळी अचानक पश्तुनी बोलायला लागतो अशी वास्तवाच्या चौकटीत न बसणारी गोष्टही आहे. कथनाचा बाज बखरीसारखा आहे. अखेरच्या प्रकरणात चरित्रातले तपशील कल्पनेने भरल्याची निवेदकाची कबुली आहे.

सात प्रकरणांमध्ये सात वेगवेगळे नायक आहेत. पहिल्या प्रकरणातला नायक श्रीपती तेराव्या शतकाच्या अखेरचा आहे. सातव्या प्रकरणाचा नायक विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला आहे. तेरावं शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासक्रमातला एक नवा ठळक टप्पा म्हणून ओळखलं जातं. धार्मिक क्षेत्रात महानुभाव आणि वारकरी पंथांनी प्रस्थापित ब्राह्मण धर्माला आव्हान दिलं. तेराव्या शतकात महाराष्ट्रावरच नव्हे, तर एकूण दक्षिण भारतावर इस्लामी राजसत्तेकडून अलाउद्दिन खिलजीच्या रूपाने पहिलं आक्रमण झालं आणि चौदाव्या शतकात इस्लामी राजवटीची स्थापना झाली. तेराव्या-चौदाव्या शतकात सूफी संत उत्तरेतून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आले. सूफींमुळे महाराष्ट्रीयांचा केवळ एका नव्या धर्मश्रद्धेशी परिचय झाला असं नव्हे, पारंपरिक ब्राह्मण पुरोहितांना नव्या इस्लामी राजवटीत एक नवा स्पर्धक वर्ग निर्माण झाला. त्यांच्या धार्मिक सत्तेत इस्लामी मौलवी हे वाटेकरी झाले. पंधराव्या शतकात पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीज उतरले आणि बहुधर्मीय समाजाकडे आपली वाटचाल सुरू झाली (त्यापूर्वी जैनधर्मीय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होते, परंतु एव्हाना ब्राह्मण धर्म, जैन आणि बौद्ध यांच्यातल्या सीमारेषा पुसट झाल्या होत्या. इस्लाम आणि ख्रिस्ती हे खऱ्या अर्थाने परकीय धर्म होते). या सर्वच अर्थांनी तेरावं-चौदावं शतक हा महाराष्ट्रासाठी खोलवरच्या उलथापालथींचा काळ होता. या काळात महाराष्ट्रातल्या माणसाची ‘मऱ्हाटा’ ही ओळख (जातवाचक नव्हे, तर प्रदेशवाचक व भाषिक अर्थाने) प्रस्थापित झाली होती. तेराव्या शतकाच्या अखेरच्या ‘लीळाचरित्र’, ‘स्मृतिस्थळ’ या ग्रंथांमध्ये हा शब्द याच अर्थाने वापरला गेला आहे. मराठा समाजाचा इतिहास मांडणारी ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी या इतिहासबिंदूपासून सुरू होणं या वस्तुस्थितीला सुसंगत आहे.

‘सातपाटील...’चा दुसरा नायक साहेबराव हा (शिवकालापूर्वीच्या) निजामशाही काळातला आहे. निजामशाही काळाला मराठी वाङ्मयाचे इतिहासकार ‘तमोयुग’ म्हणून हिणवतात. या काळात मुस्लीम राज्यकर्त्यांनी एतद्देशीय प्रजेवर अनन्वित अत्याचार केले आणि त्या तडाख्यात सापडलेली महाराष्ट्रीय रयत निष्क्रीय बनली, थिजून गेली, असा एक ब्लँकेट निष्कर्ष प्रस्थापित झालेला आहे. तिसरा नायक दसरत सातपाटील हा पानिपत युद्धाच्या काळातला, म्हणजे पेशवाईच्या ऐन भराच्या कालखंडातला आहे. तर चौथा नायक या दसरतचा नातू जानराव सातपाटील हा दुसऱ्या बाजीरावाचा-पेशवाईचा अस्त आणि इंग्रज राजवटीचा प्रारंभ – या काळातला आहे. पाचवा नायक रखमाजी १८५७च्या आसपासचा आहे. त्याचा नातू शंभूराव हा सहावा नायक, पहिल्या-दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानचा आहे, तर अखेरचा नायक आणि ‘सातपाटील...’ कादंबरीचा निवेदक असलेला देवनाथ सातपाटील हा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला एक मराठी लेखक आहे. अशा रीतीने तेराव्या शतकापासून तो विसाव्या शतकापर्यंत या सात नायकांच्या माध्यमातून सातशे वर्षांचा महाराष्ट्रीय समाजाच्या स्थित्यंतराचा एक विशाल पट या कादंबरीत उलगडलेला आहे.

सबंध कादंबरीचं कथन देवनाथ सातपाटील याने केलेलं आहे. कादंबरीच्या अखेरच्या प्रकरणात तो स्वतः पात्र म्हणून अवतरतो. आणि संपूर्ण कादंबरीचा निवेदक म्हणूनही उघड होतो. श्रीपतीपासून शंभुरावपर्यंतच्या देवनाथच्या पूर्वजांची कहाणी सांगताना देवनाथने केलेलं कथन कथाबाह्य निवेदकाच्या सुरात आहे. पण अखेरच्या प्रकरणात कथानक देवनाथच्या पिढीत शिरतं आणि कादंबरीचं कथन पात्रमुखी बनतं. कादंबरीचा निवेदक एक, पण कथनपद्धती मात्र दोन असं ‘सातपाटील...’चं कथनरूप आहे. त्यातून देवनाथने स्वतःच्या जीवनकहाणीचं केलेलं आत्मपर कथन आणि त्याने आपल्या पूर्वजांच्या जीवनकहाण्यांचं केलेलं कथाबाह्य निवेदकाच्या दृष्टिकोनातून केलेलं तटस्थ कथन, अशा दोन कथन-पातळ्या निर्माण झाल्या आहेत.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

.................................................................................................................................................................. 

याशिवाय कथनाची तिसरीही एक पातळी या कादंबरीत आहे : प्रत्येक प्रकरणाच्या आरंभी आणि क्वचित अधेमधे देखील, संबंधित प्रकरणातलं कथानक कोणत्या ऐतिहासिक काळाच्या पटावर घडतं आहे, हे स्पष्ट करणारा मजकूर येतो. तुकड्यातुकड्यांनी येणाऱ्या या कथनात तटस्थ निवेदकाने नोंदवलेला इतिहास प्रमाणित, वस्तुनिष्ठ आहे. त्यात कल्पित काही मिसळलेलं नाही. या कथनाचं वेगळेपण अधोरेखित व्हावं म्हणून तो मजकूर तिरप्या ठशात तर छापलेला आहेच, पण या दृश्य मांडणीसंदर्भातल्या प्रयोगाहून आणखी एका मार्गाने लेखकाने इतिहासाचं कथन आणि कल्पित कथानकाचं कथन या दोन पातळ्यांमधलं अंतर ठळकपणे दाखवणं साधलं आहे : ‘सातपाटील...’च्या कथानकात ऐतिहासिक प्रसंग मिसळू शकतात, इतिहासातल्या व्यक्ती पात्र म्हणून अवतरू शकतात. मात्र या कथानकाच्या पार्श्वभूमीदाखल केल्या जाणाऱ्या इतिहास कथनामध्ये फिक्शनला (कथानकातल्या कल्पित पात्र-प्रसंगांना) अजिबात स्थान नाही.

उदाहरणार्थ, पहिल्या प्रकरणात, नेवाशाच्या मंदिरात बसून उपस्थित श्रोत्यांना ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या ज्ञानेश्वरांना पाहण्यासाठी श्रीपतीचा मित्र दासोपंत भटजी नेवाशाला जाऊ शकतो. किंवा पानिपतच्या मुख्य युद्धाच्या काही महिने आधी यमुनेच्या तीरावर झालेल्या चकमकीत दत्ताजी शिंदेचं मस्तक उडवलेलं पाहून त्याच्यासोबतच्या सैन्यात शिपाई म्हणून असलेला आपला कथानायक दसरत जीव वाचवण्यासाठी पळत सुटतो. कल्पित कथानकातल्या प्रसंगांची ऐतिहासिक घटनांशी केलेली गुंफण इथे दिसते. पण प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला ऐतिहासिक पार्श्वभूमीदाखल केल्या जाणाऱ्या कथनात मात्र अशा कल्पित प्रसंगांना स्थान दिलेलं नाही. त्यामुळे कथनाची एक वेगळी पातळी निर्माण झाली आहे. पण ही इतिहासकथनाची पातळी काहीशी मुख्य कथनप्रवाहापासून तुटक वाटते. त्यातून केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमीचे तपशील दिले जातात. मुख्य कथनप्रवाहात ज्याप्रमाणे कल्पितामध्ये इतिहास मिसळलेला दिसतो, तसं या पातळीवर होत नाही. या कथनातला इतिहास हा केवळ बॅकड्रॉपसारखं काम करतो. इतिहासातल्या ज्ञात घटनांचा एक रंगीत पडदा सोडला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर मग कथानक पुढं सरकतं. हे काही ठिकाणी अगदीच कृत्रिम वाटतं. इतिहास असा वेगळा काढून वाचकापुढे ठेवणं आवश्यकच होतं का असा प्रश्न उभा राहतो.

मात्र त्यामुळे कादंबरीची वाचनीयता मुळीच कमी होत नाही हे मात्र खरं. पात्रं तर सगळीच अगदी रसरशीतपणे रंगवली आहेत. कथन कालदृष्ट्या जसजसं देवनाथच्या पिढीजवळ येऊ लागतं, तसतसं निवेदक आणि कथानक यांच्यातलं अंतरही कमी कमी होत जातं. पात्रांना निवेदक जवळून पाहू, अनुभवू लागतो. त्याच्या लगतच्या पिढ्यांचं अत्यंत तपशीलवार जीवन कथनात येतं.

ऐसपैस गोष्ट सांगण्याचा बाज लेखकाने या कादंबरीच्या कथनासाठी जाणीवपूर्वक निवडला आहे. काळाच्या मोठ्या पटावर सहजपणे मागंपुढं जाता यावं, इतिहासातल्या प्रसंगांचा अन्वयार्थ लावण्यासाठी आधुनिक मर्मदृष्टींचा कथनामध्ये वापर करता यावा असा त्यामागचा हेतू आहे. कादंबरीचा निवेदक असलेला विसाव्या शतकातला देवनाथ लेखक तर आहेच; पण त्याचबरोबर तो महाराष्ट्राच्या-जगाच्या इतिहासापासून तर विज्ञानापर्यंत बरंच काही वाचलेला गृहस्थ आहे. श्रीपती, साहेबराव, दसरत हे त्याचे पूर्वज त्याच्यापूर्वी शेकडो वर्षं अगोदर होऊन गेले. त्यांच्या जीवनातल्या घटनांचं कथन देवनाथने कथाबाह्य, तटस्थ निवेदकाच्या भूमिकेतून केलेलं असलं तरी प्रत्यक्ष निवेदनात ही भूमिका त्याने काही ठिकाणी सोडून दिली आहे. अनेकदा आपल्या जन्मापूर्वीच्या चारसहाशे वर्षं अगोदरच्या घटनांचं कथन करताना काळाची मर्यादा तोडून आपल्या मनातले विचार, वाचनातून मिळालेल्या मर्मदृष्टी यांच्यासह तो बिनधास्तपणे अवतरला आहे. त्यामुळे आधुनिक काळातला एखादा विचार मध्ययुगीन काळातल्या घटनांच्या कथनात मध्येच चमकून जातो. पण देवनाथला ते सांगण्यात काही वावगं वाटत नाही. निवेदकाची ही लकब त्याच्या एकंदर अघळपघळ गोष्टीवेल्हाळ शैलीला सुसंगत ठरते. उदाहरणार्थ, निजामशाही राजवटीतल्या वांबोरीच्या मराठ्यांबद्दल, त्यांच्यातल्या जातीपालटाबद्दल बोलताना मध्येच विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी मराठ्यांबद्दल केलेलं विधान येतं : “पुढच्या काळात म्हणजे अव्वल इंग्रजी आमदानीतील एक विद्वान विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठा लोकांस उघड्या तोंडाची जात म्हटले...” आणि लगेच निवेदक वाचकांना आधुनिक काळातून मध्ययुगात आणण्यासाठी म्हणतो, “ह्या पुढच्या गोष्टी आता करण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष ठेवणे योग्य.” (पृ. १३९).   

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या (किंवा कथित हत्या!) आणि विजय तेंडुलकरांचे ‘गिधाडे’

..................................................................................................................................................................

घटनाप्रधानता हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक पिढीतल्या सातपाटलाचं आयुष्य भल्याबुऱ्या घडामोडींनी भरलेलं आहे. त्यात स्थलांतरं आहेत. गावं-वस्त्या यांची उभारणी आहे. जीवावर बेतलेले प्रवास आहेत. आणि या सर्वांभोवती सातत्याने बदलणारं समाजजीवन आहे; सांस्कृतिक जग आहे. अगदी श्रीपतीपासून सुरुवात केली, तर अलाउद्दिन खिलजीच्या आक्रमणामुळे यादव राजवटीचा झालेला अंत, महानुभाव व वारकरी पंथामुळे धार्मिक क्षेत्रात झालेलं मोठं स्थित्यंतर, बहामनी राजवटीच्या शेवटी निजामशाहीची स्थापना, पेशवाईला पानिपतच्या लढाईने दिलेला धक्का, एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मराठे पराभूत होऊन इंग्रज राजवटीची झालेली स्थापना, त्यानंतर उद्योगप्रधान आधुनिक मुंबईची उभारणी, महाराष्ट्रात अवतरलेलं प्रबोधनयुग, राजकीय स्वातंत्र्याची चळवळ – अशा सर्व स्थित्यंतरांचा हा सातशे वर्षांचा पट आणि त्या पटावर शंभरीपार पात्रं एवढा या कादंबरीचा पसारा आहे.

या पसाऱ्यात नेवाशाच्या मंदिरात पैसाच्या खांबाला टेकून श्रोत्यांना ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वर प्रत्यक्ष दिसतात; पैठण शहरातले व्यापारी, ब्राह्मण आणि यादवांचे कारभारी दिसतात; गणिकांचे रंगमहाल दिसतात; निजामशाही, आदिलशाही या दक्षिणेतल्या राज्यसत्तांचा वापर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी लोक कसा करून घेत हे दिसतं; संधी मिळाली की हत्यार आणि घोडा घेऊन सैन्यात भरती होऊन मुलुखगिरी करणारे मराठे दिसतात; त्यातून मिळणारी लूट हे दख्खनच्या खडकाळ पठारावरच्या मराठे लोकांचं उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. एका गावाहून दुसऱ्या गावी स्थलांतर करून नव्या आयुष्याला सुरुवात करणारे मराठे दिसतात; नवं गाव वसतं, लागवडीखाली जमीन आणली जाते, तेव्हा बलुतेदार गोळा होतात, त्यांमधून गावगाडा आकाराला येतो हे दिसतं; पानिपत युद्धानंतर त्या परिसरात स्थिर झालेल्या मराठ्यांपासून रोड जात तयार झालेली दिसते; इंग्रज राजवटीत आधुनिक विचार समाजात हळूहळू कसा झिरपत गेला; शिक्षणाकडं, सरकारी नोकरीकडं, नव्या व्यावसायिक संधींकडं हा समाज कसा वळला ते दिसतं. गेल्या सातशे वर्षांतल्या महाराष्ट्राच्या सामाजिक स्थित्यंतरातले बरेच बारकेबारके प्रवाह रंगनाथ पठारे यांनी या कादंबरीत फिक्शनच्या रूपात टिपले आहेत. त्यामुळेच ही कादंबरी सातपाटील घराण्याचीच केवळ न राहता, महाराष्ट्रीय समाजाचाच इतिहास सांगणारी कादंबरी ठरते.

बरं हे केवळ इतिहासाच्या रूपात राहात नाही. लेखकाने ते फिक्शनच्या पातळीवर नेलं आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीचं प्रतीक म्हणावं अशी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती साहेबराव-आरेना यांच्यासोबत थेट अफगाणिस्तानात जाते. तिथं पिढ्यान् पिढ्या राहते. शिवरामबावांनी परमुलखात स्थलांतर करणाऱ्या साहेबरावाला विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आपल्या ‘मुलखाची आठवण’ म्हणून भेट देणं. काही पिढ्यानंतर ती मूर्ती पुन्हा सातपाटलांच्याच घराण्यात महाराष्ट्रात येणं आणि त्या मूर्तीखाली कोरलेल्या एका वाक्यावरून देवनाथने आपल्या वंशाचा धागा उलगडत मागं जाणं – हे अन्वर्थक आहे. लेखकाने या विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीच्या सहाय्याने महाराष्ट्राच्या अवघ्या सांस्कृतिक इतिहासाला फिक्शनमध्ये गुंफलं आहे.

३.

आपल्या पूर्वजांच्या शोधात मागं मागं निघालेल्या देवनाथला तेराव्या शतकापर्यंत, डोंगरकिनी-वांबोरी गावांपर्यंत, श्रीपतीपर्यंत जाता आलं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भूतकाळात चाचपडत एक रेघ तयार केली. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, ज्याला आपण वंशवृक्ष म्हणतो त्या भल्याथोरल्या वृक्षाची एखादी फांदीच केवळ आपल्याला फार फार तर दिसू शकली. आणि म्हणून तो या निष्कर्षाप्रत आला की, “आपल्याला किती थोडेसेच दिसते!” (पृ. ७८२). त्र्यंबकेश्वरच्या क्षेत्रोपाध्यायांना तो सांगतो, की वंशवृक्षाच्या अरण्यात शिरल्यावर आपल्याला खऱ्या अर्थाने अज्ञाताची जाणीव झाली; आपण एकूण सजीव-निर्जीव सृष्टीच्या, या कालातीत ब्रह्मांडाच्या जगङ्व्याळ पसाऱ्यात किती नगण्य आहोत याची जाणीव झाली. ही जाणीव दंभाचा नाश करणारी असते. देवनाथ अखेरच्या प्रकरणात जे चिंतन करतो, आपल्या संपूर्ण कथनाचं सार काढण्याचा प्रयत्न करतो, त्याद्वारे लेखकाने मानवजातीच्या काही असाध्य दंभांना सुरुंग लावला आहे.

पहिला दंभ आहे, कुल-जात-वंश श्रेष्ठत्वाचा. महाराष्ट्रातल्या ज्या सामाजिक स्तरात स्वतःच्या कुळाच्या शुद्धत्वाचा कालबाह्य, फाजील अहंगंड अद्यापही खुमखुमत आहे, त्या स्तरातल्या सातपाटील घराण्याचीच निवड लेखकाने आपली गोष्ट सांगण्यासाठी करणं हे या संदर्भात सूचक आहे. या घराण्यात श्रीपतीपासून पिराजीपर्यंत विविध जाती, धर्म आणि वंशांच्या स्त्रिया कशा येत गेल्या, आणि त्यातून सातपाटलांचा वंश कसा विस्तारत गेला, याची ही कहाणी आहे. यात सातपाटलांच्या घराण्यात आलेली रोहिणी एडकेसारखी ब्राह्मण स्त्री आहे, आरेना आणि आफिया या पठाण स्त्रिया आहेत, उल्फीसारखी कोल्हाटीण आहे. हा प्रवास याहूनही अधिक गुंतागुंतीचा आहे : रोहिणी ज्या ब्राह्मण केशीराज एडकेची पत्नी असते, ते एडके घराणं मुळात काही पिढ्यांपूर्वी धनगर होतं, अशी लोकस्मृती असते. सातपाटलांच्या घराण्यातली भीमबाई स्टुअर्ट लेसिंग या इंग्रजासोबत पळून जाऊन इंग्लंडात ख्रिस्ती धर्मात वंशविस्तार करते. पिराजी सातपाटलाने उचलून आणलेली कोल्हाटीण उल्फी ही मुळात कोल्हाटी बाप आणि मराठा आई यांच्यापासून झालेली संतती असते आणि पिराजीच्या हत्येनंतर ती अँथनी ब्लॅकस्मिथसोबत संसार करते. मराठा पिराजीपासून उल्फीला झालेला मुलगा जालिंदर उर्फ जालन हा पुढं इंग्लंडमध्ये अँथनी ब्लॅकस्मिथ याचा मुलगा म्हणून वाढतो.

भारतीय समाज हा अनेक वेळोवेळी स्थलांतरं करून आलेल्या विविध वंशांच्या सरमिसळीतून प्राचीन काळापासून तयार होत आला आहे, असं इतिहास सांगतो. या इतिहासाचेही काही संदर्भ निवेदक देवनाथ याने अखेरच्या प्रकरणात दिले आहेत. त्यात सिंधू संस्कृतीपासूनच्या वांशिक सरमिसळीचे तपशील आहेत. कादंबरीच्या मुख्य आशयसूत्राला पूरक असा हा इतिहास लेखकाची भूमिका अधिक स्पष्ट करणारा आहे.     

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

सातपाटील घराण्यातल्या अनेकांनी स्थलांतरं करून नव्या गावांमध्ये वसती करून आपापल्या आयुष्याला आकार दिल्याच्या कहाण्या या कादंबरीत येतात. परंतु कर्तृत्ववान म्हणून त्यांचं व्यक्तिमत्त्व रंगवलेलं नाही. बहुतेकांच्या हातून चुकून, अपघाताने घडलेली कृती पराक्रम मानली गेली, आणि त्याच्या परिणामी मिळालेल्या चांगल्या संधीचा वापर करून हे सातपाटील आपापली आयुष्यं घडवताना दिसतात. ते सणकी आहेत, आणि जुनं जगणं मोडल्यावरही नव्याने आयुष्याची मांडामांड करण्याची जिगर त्यांच्यात आहे, हे जाणवतं. पण लेखकाने त्यांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अशी प्रतिमा कुठंही बहाल केलेली नाही, हेही तितकंच खरं. त्यांच्या हातून घडलेल्या चुका, क्वचित दाखवलेलं क्रौर्य, त्यांचा अडाणीपणा यातलं लेखकाने काहीही लपवलेलं नाही. त्यामुळे सातपाटील घराण्यातली ही माणसं हाडामांसाची स्खलनशील माणसं म्हणूनच उभी राहतात.

दुसरा दंभ लेखकाने फोडला आहे, तो पुरुष-श्रेष्ठत्वाच्या जाणिवेचा. घराण्यांमध्ये कर्तृत्व पुरुष गाजवतात असा एक रूढ समज असतो. मराठा घराण्यांमध्ये तर फारच. त्याच्या विपरित या कादंबरीत घडतं. सातपाटील घराण्यातले पुरुष मनाने कमकुवत, भोळे, आयुष्य जगताना जागोजागी गोंधळलेले दिसतात. त्यांच्या आयुष्याच्या दोऱ्या आपल्या हाती घेऊन त्यांना आपल्या मनाप्रमाणे दिशा देण्याचं कार्य स्त्रिया करतात. श्रीपतीला पैठणहून वांबोरीला रोहिणी घेऊन जाते; साहेबरावाला आदिलशाही पुण्यात नेते ती आरेना. तिथं खराडीचं नवं गाव वसवण्याची प्रेरणाही ती देते आणि त्यानंतर आयष्याच्या उत्तरकाळात साहेबरावाला घेऊन आरेना सरळ अफगाणिस्तान गाठते. “इतका काळ मी तुझ्या मुलखात राहिले. तुझी होऊन राहिले. आता तू माझ्या मुलखात चल. माझा होऊन राहा. मी तुला माझा करून टाकीन...मी तुझ्यासाठी मऱ्हाटण झाले. आता तू माझ्यासाठी अफगाण हो.” (पृ. २५५) हे तिचे शब्द आहेत. प्रेमाला लेखकाने इथं सर्वोच्च मूल्य दिलं आहे आणि ‘वांशिक अस्मिता’ प्रकारच्या बाबी त्यासमोर एकदम किरकोळ ठरवून टाकल्या आहेत. आरेना जशी साहेबरावाला अफगाणिस्तानात घेऊन जाते, तशीच काही पिढ्यांनंतर पानिपतच्या युद्धानंतर अफगाणिस्तानात जाऊन पडलेल्या दसरता आफिया पुन्हा महाराष्ट्रात घेऊन येते आणि त्याच्यासोबत संसार करते. पुढं आफियाची मुलगी भीमबाई स्वतः पुढाकार घेऊन स्टुअर्ट लेसिंगसोबत पळून जाते. कोल्हाट्याची पोर असलेली उल्फी पिराजी सातपाटलाला म्हणते, “तू मला इथून उचल. तू मला पळवून ने. माझा बाप भामटा आहे. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. नेतोस मला?” (पृ. ४७४).

‘सातपाटील कुलवृत्तांत’मधल्या अनेक स्त्रिया असं आव्हान देणाऱ्या, हिमतीनं जगणाऱ्या, आक्रमक आहेत. मराठ्यांच्या सैन्यातल्या बंकट भोसल्याशी शय्यामैत्री करणारी पानिपतावरच्या कुंजपुऱ्याच्या दुकानदाराची बायको; किंवा उत्तर भारतातल्या एका गावात जमीनदाराच्या वाड्यात दसरत सातपाटलाला भेटलेली महक नावाची दासी, जी दसरतला सुटकेचा मार्ग सांगते आणि पलायनात स्वतःही त्याला सोबत करते. जानराव सातपाटलाची बायको सरूबाई आपल्या मुलीसाठी राजकुमार येईल असं स्वप्न पाहते आणि नवऱ्याला अरेतुरे करून स्वतःचा निर्णय स्वीकारणं भाग पाडते. स्त्रियांचं हे अग्रेसरत्व कादंबरीतल्या पुरुष पात्रांना आणि एकूणच पुरुषी अहंभावाला पार झाकोळून टाकतं. पुरुष नव्हे, तर स्त्रियाच जीवनाच्या शिल्पकार असतात हे लेखकाने यातून अधोरेखित केलं आहे. अखेरच्या प्रकरणात देवनाथने केलेल्या प्रदीर्घ चिंतनात निसर्गातलं स्त्रीतत्त्व पुरुषतत्त्वाला वापरून घेत अस्तित्वाची रेषा पुढे चालवत ठेवतं असं म्हटलं आहे. हे स्त्री-पुरुषांच्या बाबतीतही खरं आहे असं देवनाथ म्हणतो. “...सारा खेळ खेळणाऱ्या स्त्रियाच आहेत...प्रेमभावना, नातेसंबंध, स्नेहभाव ही सारी भूमीतत्त्वाच्या अखंड नर्तनाची वेगवेगळी रूपे होत. स्त्री हा पृथ्वीचा सच्चा अंश होय. ती पुन्हा पुन्हा स्त्री निर्माण करते आणि तीच पुरुष निर्माण करते,” असं देवनाथ म्हणतो (पृ. ५८९). हे स्त्रियांचं पोकळ शाब्दिक गौरवीकरण नाही. पिढ्यान् पिढ्यांच्या इतिहासात स्त्रीत्वच कसं अग्रेसर ठरतं त्याचा प्रभावी आविष्कार, हे या कादंबरीचं एक प्रमुख आशयसूत्र आहे.

‘सातपाटील कुलवृत्तांत’मध्ये आणखी एका मानवी दंभाची चर्चा आहे. मानवजातीला असलेला स्वतःच्या शक्तीचा दंभ. स्वतःला सृष्टीच्या केंद्रस्थानी समजून आधुनिक मानवजातीचा प्रवास सुरू आहे. वंशशुद्धीच्या, पुरुषी श्रेष्ठत्वाच्या कल्पना भ्रामक आहेत, हे ज्याप्रमाणे देवनाथने स्वतःच्या कुळाचा इतिहास शोधायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, त्याचप्रमाणे देवनाथला हेही जाणवतं की अखिल मानवजातच स्वतःच्या श्रेष्ठत्वाच्या भ्रमात जगते आहे. विशेषतः युरोपकेंद्री आधुनिक जाणिवेने माणसामध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास फारच घातक आहे. पृथ्वीचा करोडो वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर मानवजातीचं इथलं अस्तित्व अतिशय क्षुद्र आहे. पृथ्वीने (म्हणजे निसर्गाने) इथे अनेक खेळ मांडले आणि मोडले. आपण हे विश्व घडवलं आणि तहहयात घडवणार आहोत, असा फाजील आत्मविश्वास मानवामध्ये निर्माण झाला आहे. प्रत्यक्षात पृथ्वीला कोणताही प्राणीवंश डोईजड होतो, तेव्हा या सृष्टीचं संतुलन बिघडून तो नष्ट होतो. पृथ्वी पुन्हा नव्याने जीवांचा खेळ मांडते. देवनाथ म्हणतो, “तुम्ही एकदा खतम झालात की झालात. व्हालच तुम्ही. पण पृथ्वीतत्त्व उरेल, भूमी उरेल. ती आणखी कशाला तरी जन्म घालील. ती निर्विकार आहे. निर्मम आहे. ती आई असूनही तशी आहे. तुम्हाला खेळविणे हा तिच्या जगण्याचा धर्म आहे. पृथ्वीतत्त्वाचे हे नर्तन आपल्या पुरुषी जगातल्या व्यवहारात सत्तास्थानी असलेल्या लोकांना कळले तरच पुढे आपल्या पुढच्या पिढ्यांना जगण्याची संधी आहे.” (पृ. ७९०).

देवनाथ असंही म्हणतो की, या पृथ्वीचे सम्राट आपणच आहोत या भ्रमात माणसाने राहू नये. कारण मानवजातीपेक्षाही शक्तिशाली आहेत ते लाखो प्रकारचे विषाणू, जे या पृथ्वीवर आणि वातावरणात कोट्यवधी वर्षांपासून आहेत. त्यांना मृत्यू नाही, कारण ते जिवंतच नाहीत. आणि तरीही ते अस्तित्वात आहेत. माणूस नष्ट होईल इतर प्राणी येतील आणि जातील तरी हे विषाणू अस्तित्वात राहतीलच. मानवापेक्षा अधिक शाश्वत ते आहेत. त्यांना टिकून राहण्यासाठी कोणतं तरी माध्यम लागतं, आणि मानवाचं शरीर हे त्यांच्यासाठी उत्तम माध्यम आहे. मनुष्यप्राणी जन्माला आल्यानंतर रडण्यासाठी तोंड उघडतो तेव्हाच हवेतले विषाणू त्याच्या शरीरात प्रवेशतात आणि त्याचं शरीर वापरायला सुरुवात करतात. त्याचं शरीर मृत्यू पावून नष्ट होईपर्यंत ही प्रक्रिया आतल्या आत सुरूच राहते. मानवजात अशाप्रकारे त्या विषाणूंकडून ‘वापरून घेतली’ जाते.

अशा प्रकारे, पृथ्वी किंवा निसर्गासाठी मानव एक खेळणं आहे, तर विषाणूंसारख्या अस्तित्वांसाठी मानव केवळ एक माध्यम आहे. आणि मानवजातीत पाहिलं तर स्त्रीवर सत्ता गाजवू पाहणाऱ्या पुरुषाला आपल्या हेतूंसाठी त्याच्याही नकळत वापरून घेणारी स्त्रीच आहे. अशा निष्कर्षापर्यंत देवनाथ येऊन पोहोचतो. आपल्या वंशाचा इतिहास शोधता शोधता देवनाथला जे अज्ञाताचं विराट दर्शन घडतं, त्या अज्ञाताच्या पोटात त्याला झालेला हा साक्षात्कार आहे.

४.

या कादंबरीच्या लेखकाला भूतकाळाबद्दल अतिरेकी प्रेम नाही. भूतकाळ आणि त्याच्या धांडोळ्यातून गवसलेला इतिहास, हे या कादंबरीचं मुख्य आशयसूत्र आहे. या इतिहासाच्या आकलनानंतर नायक-निवेदकाला जीवनाबद्दलची जी ‘शहाणीव’ उमजते, तो या कादंबरीमागचा विचार आहे. आधी आपल्या पूर्वजांची कहाणी तटस्थपणे सांगणारा देवनाथ अखेरच्या प्रकरणात आत्मकथन करू लागतो आणि त्याच्या मनात सुरू असलेलं अखंड चिंतनही मांडू लागतो. त्यातून हे विचार प्रकटपणे कादंबरीत मांडले आहेत.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘सातपाटील कुलवृत्तांत’  : या कादंबरीने मराठी कादंबरीला जगातील गाजलेल्या व मान्यताप्राप्त झालेल्या कादंबऱ्यांच्या रांगेत नेऊन उभे केले आहे!

..................................................................................................................................................................

पण इथं एक बाब खटकते. जाती-वंशांची शुद्धता आणि पुरुषश्रेष्ठत्वाची कल्पना या भ्रामक आहेत, याचं देवनाथला आलेलं भान त्याने स्वतःच्या कुळाचा जो इतिहास शोधला, त्यातून आलेलं आहे. तो कादंबरीत मांडलेला केवळ एक सुटा विचार नसून, त्याचा कादंबरीच्या कथानकाशी आणि आशयाशी जैविक संबंध आहे. एकंदर निसर्गाकडून मानवजातीला वापरलं जाणं यासंबंधीचा देवनाथला झालेला साक्षात्कार मात्र कादंबरीत काहीसा सुटा राहतो. देवनाथचं व्यक्तिमत्त्व वाचनाने, चिंतनाने अतिशय समृद्ध झालेलं आहे, आणि त्यामुळे त्याला असा विचार सुचणं, त्याने कथनाच्या ओघात तो वाचकांसमोर मांडणं स्वाभाविक आहे, असं म्हणता येईल. विचार म्हणून तो फार प्रगल्भ आहे. पण तो विचार कादंबरीच्या आशयाशी एकजीव झालेला दिसत नाही.   

स्वतःच्या पूर्वजांचा घेतलेला शोध, हे या कादंबरीचं मुख्य आशयसूत्र आणि कथानकाचंही मुख्य रचनासूत्र असलं, तरी कादंबरी तेवढ्यापुरतीच मर्यादित राहू नये असा प्रयत्न लेखकाने केला आहे. अखेरचं प्रकरण त्यासाठी आहे. या प्रकरणात स्टुअर्ट लेसिंग आणि रविंद्र इंगळे चावरेकर हे देवनाथचे दोन इतिहाससंशोधक स्नेही उपस्थित होतात. या दोघांनीही महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर, संशोधन केलं आहे. त्यांनी सिंधू संस्कृतीपर्यंतचा विचार केलेला आहे. आणि त्या विचारात ‘मराठे’ हे प्रमुख सूत्र आहे. ‘मराठा’ म्हणजे विशिष्ट जात नव्हे, तर प्राचीन काळापासून महाराष्ट्रीय समाज ज्या वांशिक समुहांनी आकाराला आला आहे त्या सर्वांसाठी ‘मराठा’ ही संज्ञा वापरली आहे. आणि हे मऱ्हाटे सिंधू संस्कृतीचे मूळ वारसदार होते. महार आणि मऱ्हाटे हे त्यातूनच निर्माण झाले आणि त्यांनी महाराष्ट्राची वसाहत स्थापन केली, असा एक विचार तिथं आहे.

ज्या राजारामशास्त्री भागवत, वि. रा. शिंदे यांच्या मराठ्यांविषयीच्या, जातींविषयीच्या संशोधनाचा उल्लेख देवनाथ करतो, त्यांच्या भूमिकेशी हा विचार बराचसा सुसंगत आहे. स्वतःच्या कुळाच्या शोधाकडून एकंदर मराठ्यांचं मूळ काय, अशा एका थोड्या अधिक शोधाकडे इथं देवनाथ वळला आहे, आणि एकूणच मानवजातीचं मूळ शोधण्यात अर्थ नाही असा सर्वसमावेश निष्कर्ष त्यावरून त्याने काढला आहे. त्याने केलेलं मानवजातीविषयीचं चिंतन याला जोडून आलं आहे. आधीच्या प्रकरणांमधला गोष्टीवेल्हाळ निवेदक देवनाथ अखेरच्या प्रकरणात मात्र एकदम धीरगंभीर चिंतकाचा सूर धारण करून आपलं चिंतन मानवाच्या अस्तित्वाच्या वैय्यर्थकतेपर्यंत नेतो. या दोन कथनांमधली दरी थोडीफार सांधली जायला हवी होती. तसं न झाल्यामुळे या कादंबरीचा आकृतिबंध ‘आधी गोष्ट आणि शेवटी सांगितलेलं तिचं तात्पर्य’ असं काहीसं रूप धारण करतो. 

मराठ्यांच्या इतिहासात जी खोलवरची बुडी लेखकाने मारली आहे, त्यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित झाला आहे. ‘सातपाटील कुलृत्तांत’मधलं एक ठळक आशयसूत्र म्हणजे महाराष्ट्रीय समाजाची विविध जातींच्या लोकांनी एकत्र येऊन केलेली घडण : गावगाडा. अशा एकंदर ग्रामरचनेबद्दल लिहिताना लेखकाने तत्कालीन समाजवास्तवातले जातीय संघर्षाचे बिंदू टाळले आहेत. त्यांना कथानकात स्थान दिलेलं नाही. मध्ययुगीन महाराष्ट्रात गावं कशी वसत याचा इतिहास नेमक्या तपशिलांसह कथानकात येतो. या इतिहासात महार आणि मराठे (कुणबी) यांना काय स्थान होतं, तेही कथानकात नेमकेपणाने दाखवलं आहे. या दोन प्रमुख जातींमध्ये पूर्वी कधीतरी संघर्ष झाला असेल. महारांकडून ही भूमी मराठ्यांनी हिसकावून घेतली असं लेखक सूचित करतो. असा विचार ज्या राजारामशास्त्री भागवतांनी मांडला आहे, त्यांच्या लेखनाचा मागोवाही तो घेतो. हे मान्य की लेखकाने कथानकात आणलेला काळ महाराष्ट्रातल्या इतिहासातला असा प्रत्यक्ष काळ आहे की, जेव्हा हे संघर्ष थंड झाले होते आणि या दोन जातींचं स्थान निश्चित झालं होतं. पण सिंधू संस्कृतीपर्यंत मराठ्यांचं मूळ शोधताना लेखक या प्रश्नाला बगल का देतो, असाही प्रश्न उपस्थित होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या कादंबरीत मराठ्यांचं एक जात म्हणून गौरवीकरण केलेलं नाही, हे खरंच आहे. पण कथानकात मध्ययुगीन जातीय संघर्षाचे पदर मात्र टाळले आहेत. काळाच्या प्रवाहात माणसांच्या जाती बदलू शकण्याइतपत मध्ययुगात जातिव्यवस्था लवचीक होती; शिवकालापासून पुढं सैन्यामध्ये जातीपातीची बंधनं पाळली जात नव्हती, अशी निरीक्षणं निवेदकाने नोंदवली आहेत. पण याचा अर्थ त्या काळात जातीय संघर्ष मुळीच नव्हते असं नव्हे. कोणत्या जातीय ताण्याबाण्यांतून हे गावगाड्याचं समाजवास्तव निर्माण झालं असेल, या प्रश्नाकडे जाणं लेखकाने टाळलं आहे.

यात शोषणाचाही मुद्दा येतो. नागवणारा आणि नागवला जाणारा यांच्याबद्दल रोहिणीच्या तोंडून लेखकाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे : ती श्रीपतीला म्हणते, “कुठं ना कुठं डल्ला मारता आल्याखेरीज जगता न येणं हा माणसाच्या जगण्याचा सारांश असतो. जगणं अन जगू देणं इतकंच आपल्याला करता येतं. ती माणून म्हणून आपली मर्यादा. तिला माणुसकी असं गोड नाव द्यायचं.” (पृ. ८८). स्वार्थमूलक वर्चस्वाची भावना, बळी तो कान पिळी हे तत्त्व इत्यादी गोष्टी मानवी अस्तित्वाचा अपरिहार्य भाग म्हणून लेखकाने स्वीकारल्या आहेत.

आणि तरीही याच रोहिणीच्या तोंडून लेखकाने आपला जातिभेदाविषयीचा, सामाजिक शोषणाविषयीचा संताप नोंदवलेला आहे; तो मात्र अगदी आधुनिक परिभाषेत आहे. रोहिणी म्हणते, “माणसांना साधं माणसांसारखं तुम्ही वागवत नाही. कदाचित त्याच्यामुळंच खिलजीला संधी मिळाली असं म्हणावं लागेल.” रामदेवराव यादव राजाच्या राजवटीत महाराष्ट्रात जातिभेद पराकोटीला गेला होता. ब्राह्मण पुरोहितवर्ग राजावर आणि समाजावरही वर्चस्व गाजवत होता. त्यामुळे खिलजीसारख्या परकीय राजाला यादवांवर विजय मिळवणं सोपं गेलं असावं, हा आधुनिक इतिहासातला एक मतप्रवाह आहे. पण त्या काळात जगणाऱ्या एखाद्या व्यक्तीला (ती कितीही सुजाण असली तरी) भोवताली घडणाऱ्या घटनांचा असा अन्वयार्थ लावता येणं, हे अतिशयोक्तीचं वाटतं.

रोहिणी चार्वाकपंथी कुटुंबातून आली आहे. ती मिथकांचा नवा अन्वयार्थ लावते; स्त्रीवादी दृष्टीने अहल्या, वृंदा (जरासंधाची बायको) यांच्याकडे पाहते; चार्वाकपंथी लोक नास्तिक होते हे मान्य. पण ते इतके ‘आधुनिक’ नक्कीच नव्हते. शेवटी तर रोहिणीच्या तोंडून निघालेला एक निष्कर्ष विसाव्या शतकातल्या पाश्चात्य विचारविश्वात जन्माला आलेला आहे. रोहिणी म्हणते, “जो जिंकतो ना, इतिहास त्याच्या बाजूला असतो.” एखादी मध्ययुगीन समाजातली स्त्री चार्वाक पंथी असली तरी इतका अत्याधुनिक विचार मांडते, हे पचायला जरा जड जातं. आणि इथं असाही प्रश्न निर्माण होतो की हा लेखक तेराव्या शतकातल्या एका स्त्री-पात्राला इतकं अत्याधुनिक चिकित्सक व्यक्तिमत्त्व देऊ शकतो, तर तो महाराष्ट्राच्या सामाजिक घडणीतल्या संघर्षाचे पदर शोधणारी दृष्टी त्याच्या एकाही पात्राला का देत नसावा?

पुढं इंग्रज राजवटीच्या काळात शंभुराव सातपाटलापर्यंत महात्मा फुल्यांचं कार्य आणि विचार पोहोचतात. शंभुराव हा बऱ्यापैकी चाकोरीपलीकडचा विचार करणारा माणूस आहे. तो जातिभेदाला फारसं महत्त्व देत नाही. पण तरी गावात जातीपातींचं बऱ्यापैकी पाळलं जातं. शंभूराव मुंबईला आल्यावर मात्र जात पाळत नाही. आपल्या गावातल्या राघु (महार) व लियाकत या तरुणांच्या घरीच तो उतरतो. पण तरीही महात्मा फुल्यांचे विचार ऐकून त्याला वाटतं की, त्यांचे विचार शहरी समाजासाठी आहेत. खेड्यात या विचारांचा काही उपयोग नाही. महात्मा फुल्यांनी रंगवलेला शोषक ब्राह्मण पुरोहित खेड्यात दिसत नाही, असं शंभूरावचं मत असतं.  (पृ. ५८२). तर दुसरीकडं तो म्हणतो की, “महानगरात जाती जात नाहीत, पण त्या तितक्या बोचत सुद्धा नाहीत...तुम्ही तिथे अधिक मोकळा श्वास घेत जगू शकता.” (पृ. ५७९).

शंभूरावच्या विचारांत अंतर्विरोध आहे. की लेखकाच्याच भूमिकेत अंतर्विरोध आहे? कादंबरीचं कथानक एकोणिसाव्या-विसाव्या शतकात पोहोचल्यानंतर त्या कथानकाच्या अवकाशात, म. फुले आणि त्यांचे अनुयायी यांना विद्रोही विचारासकट स्थान मिळतं. पण सातपाटलांपैकीच नव्हे तर इतरही कोणत्याच पात्रांवर या विचारांचा प्रभाव पडत नाही. लेखकाने प्राचीन काळापासूनच्या महाराष्ट्रीय समाजाच्या जातीय घडणीतल्या काटेरी, संघर्षशील वास्तवाकडं दुर्लक्ष करणं आणि प्रबोधनयुगातही कादंबरीतल्या पात्रांनी स्थितीशील राहणं खटकतं. तेराव्या शतकातल्या सामाजिक परिस्थितीतही रोहिणीच्या रूपाने पराकोटीची पुढारलेली स्त्री दाखवणारा, आणि एकंदरीतच अतिशय बंडखोर स्त्रीरूपं रेखाटणारा हा लेखक समाजाच्या जातीय घडणीबाबत मात्र पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाण्याचं टाळतो, यात लेखकाच्या भूमिकेतला अंतर्विरोध उघड होतो.

‘सातपाटील कुलवृत्तांत’ या कादंबरीतली आशयसूत्रं आणि त्यामागची लेखकाची जीवनदृष्टी यांचं स्वरूप आणि त्यांच्या मर्यादा यांचं स्वरूप अशा प्रकारचं आहे. या मर्यादा नोंदवल्यानंतरही ही मराठीतली एक महत्त्वाची कादंबरी आहे. कारण तिचा वैशिष्ट्यपूर्ण घाट आणि संपूर्ण समाजाला कवेत घेऊ पाहण्याचा लेखकाचा प्रयत्न. ही कोण्या एका समूहाची, प्रदेशाची कादंबरी नाही. एका कुळाचा शोध घेण्याचा आकृतिबंध धारण केलेली ही कादंबरी एका समाजाच्या सातआठशे वर्षांतल्या बहुस्तरीय अवस्थांतरांचा वेध घेते आणि अखिल मानवजातीविषयी काहीएक चिंतन मांडते. ती एकाच वेळी अतिशय रंजक आणि सखोल चिंतनशील कादंबरी आहे. आणि अशा कादंबऱ्या मराठीत मोजक्याच आहेत. 

..................................................................................................................................................................

‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या त्रै-मासिकाच्या जानेवारी-फेब्रुवारी-मार्च २०२०च्या अंकातून पूर्वपरवानगीसह साभार

..................................................................................................................................................................

‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही कादंबरी ऑनलाईन खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5166/Saatpatil-Kulvrutant

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......