माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २० ऑगस्ट रोजी ७६वी जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या एका जवळच्या मित्राने जागवलेल्या या आठवणी...
..................................................................................................................................................................
२१ मे १९९२ रोजी राजीव गांधींची पहिली पुण्यतिथी होती. सोनिया गांधींनी राजीव गांधींबरोबर तो पंतप्रधान असताना काम करणाऱ्या ३०-३५ सहकाऱ्यांना स्मरणभेटीसाठी बोलावले होते. मी सोनिया गांधींच्या बाजूलाच बसलो होतो. कदाचित मी राजीवचा जवळचा जुना मित्र म्हणून असेल. हळूहळू बाकी साऱ्यांनी आपल्या राजीवसोबतच्या आठवणी काढल्या. त्याचे उमदे, लोभसवाणे व्यक्तिमत्त्व, विज्ञान-तंत्रज्ञानाची त्याची जाण, तंत्रज्ञानाची त्याने धरलेली कास, चपळ बुद्धी, हजरजबाबीपणा असे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्यांच्या बोलण्यात आले. एकदम माझ्या लक्षात आले की, सारे राजीवला ‘पंतप्रधान’ म्हणून जाणणारे, मी एकटाच राजीवला फार आधीपासून जाणणारा. ते सारे बोलले पंतप्रधान राजीव गांधींबद्दल.
मी अॅव्हरो पायलट राजीवचा १९७४पासूनचा मित्र. बोलणारा मी शेवटला होतो. बोलणार काय? मी माझ्या मित्राच्या १८ वर्षांतील काही आठवणी काढल्या आणि शेवटी म्हटले, “राजीव माझा १९७४ पासूनचा जवळचा मित्र होता. मला वाटते की, इंदिराजींच्या अकाली मृत्यूनंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे त्याला अगदी अचानक, पुरेसा अनुभव मिळण्याआधीच पंतप्रधानपद स्वीकारावे लागले आणि तितक्याच अचानकपणे तो आपल्यातून गेला. त्याला विसरणे कठीण आहे.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
राजीव साधा आणि सरळ तरुण होता. राजकारणातील विविध डावपेच, खाचखळगे, बनवाबनवी अवगत होण्यापूर्वीच त्याला जबरदस्तीने पंतप्रधानपद स्वीकारावे लागले. ते स्वीकारण्यास त्याने खूप विरोध केला. ३० ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाली. त्या संध्याकाळी काँग्रेसच्या उच्च पुढाऱ्यांनी त्याला पंतप्रधानपद स्वीकारण्यास भाग पाडले. राजीव-सोनिया या दोघांचाही पंतप्रधानपद स्वीकारण्यास कडाडून विरोध होता. पण त्याच्यावर दबाव टाकण्यात आला. “तुमचा जीव धोक्यात आहे, पंतप्रधान झालात तरच पूर्ण संरक्षण देता येईल, नाहीतर संरक्षण पुरेसे मिळणार नाही” अशी भीतीही दाखवण्यात आली.
तो पंतप्रधान झाला तो अशा प्रकारे! सोनिया स्वतः त्याची साक्षी आहे. राजीवला पंतप्रधान करण्याचे आणखी एक कारण होते. काँग्रेस पुढाऱ्यांना प्रणव मुखर्जी पंतप्रधान व्हायला नको होते. त्यामुळे राजीवसाठी सर्वांनी इतका जोर लावला.
त्या काळात राजकारणात भ्रष्टाचार प्रचंडपणे बोकाळलेला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीची अनेक माणसे राजकारणात आली होती. राजकारणाचे शुद्धीकरण करण्याची राजीवची खूप इच्छा होती, पण आपल्या आईकडून मतलबी आणि खुनशी राजकारण्यांना कसे हाताळायचे, हे शिकायच्या आधीच त्याला सत्ता स्वीकारावी लागली. देशवासीयांनी मात्र त्याला डोक्यावर घेतले. देशातील राजकारणाला समाज विटलेला होता आणि राजीवच्या उमद्या आणि स्वच्छ व्यक्तिमत्त्वावर लोक फिदा झाले होते. आता राजकारण बदलेल अशी सर्वांची अपेक्षा होती. त्यामुळे १९८४च्या लोकसभा निवडणुकात राजीवच्या काँग्रेसला प्रचंड बहुमत देऊन लोकसभेतील ४१२ जागांवर विजय मिळवून दिला. राजकारणात मुरण्यापूर्वीच सत्ता राबवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. अपेक्षा अनेक होत्या, पण राजीव खरोखर कसा माणूस होता?
डावीकडे राजीव गांधी आणि उजवीकडे लेखक प्रभाकर देवधर
अत्यंत आकर्षक, शांत व्यक्तिमत्त्व आणि त्याला शोभेल अशी नम्र व विनयशील वागणूक असणारा राजीव सर्वांनाच मित्र म्हणून हवाहवा वाटेसा. बाई-बाटलीपासून तो कोसो दूर होता. समोरच्या व्यक्तीला तो आदराने वागवे. पाहणाऱ्याला भुरळ पडावी असे त्याचे व्यक्तिमत्त्व होते. त्याचे स्मितहास्य कुणालाही जिंकून घेत असे.
१९७३पासून राजीव आठवड्यातून तीन दिवस दिल्ली-मुंबई-दिल्ली ही अॅव्हरो फ्लाईट जयपूरमार्गे चालवत असे. दुपारी दोनच्या सुमारास फ्लाईट मुंबईला पोहोचायची आणि दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला फ्लाईट पायलट करत तो दिल्लीला परतत असे.
१९७४च्या जूनमध्ये त्याचा तिसावा वाढदिवस साजरा झाल्यावर दोन दिवसांनी २२ जूनला आमची प्रथम भेट झाली, आम्हा दोघांचे खास मित्र कॉस्मिक रेडिओचे मालक मनुभाई देसाई यांच्या घरी. राजीवचा जन्म २० जून १९४४चा. ३० वर्षांच्या राजीवशी पहिल्या भेटीतच आमचे ग्रह पुरते जुळले. मनुभाईने माझी वावभर स्तुती केली. आमच्या तिघांच्या मैत्रीतील ‘इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान’ हा फार मोठा दुवा. तो पुढे खूप घट्ट होत गेला. झपाट्याने मैत्री जवळची झाली.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
पुढील सहा वर्षे, १९८० पर्यंत, आठवड्यातून एक दोनदा तरी आम्ही भेटत असू. त्या काळात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान सर्वांना आकर्षित करत असे. हायफाय ऑडिओ इंजीनिअरिंगमध्ये त्या काळात कॉस्मिकचे नाव अग्रगण्य. राजीव आणि मनुभाई जवळ आले ते संगीतामुळे. मनुभाईंची मैत्री करण्याची हातोटीने त्यांना खूप जवळ आणले. मनुभाई आणि त्याचे चार भाऊ सांताक्रूझ विमानतळाच्या समोरच्या इमारतीत राहत. विमान मुंबईला पोहोचल्यावर राजीव कपडे बदलण्यासाठी त्यांच्या घरी जाई, आणि रात्री ताजमहाल हॉटेलात मुक्कामाला. आठवड्यातून अनेकदा मी संध्याकाळी त्यांच्या घरी जात असे. त्या वेळी विविध विषयांवर गप्पा होत किंवा आम्ही बाहेर हिंडायला जात असू. आम्ही व्हिस्कीचा स्वाद घेत असू आणि राजीव कोकाकोलाचा!
बाहेर हिंडताना राजबिंड्या राजीवला लोक वळून पाहत, पण ओळखत मात्र नसत. पंतप्रधान इंदिरा गांधींचा मुलगा असूनही जवळजवळ कोणीही त्याला ओळखत नसे. अनेकदा आम्ही माझ्या वरळीच्या घरी जात असू. गप्पा माझ्या घरी होत. नंतर दुकानात खरेदी करायला, इतर जवळच्या मित्रांना भेटायला आम्ही जात असू. क्वचित सांताक्रूझमधील गोकुळ आईस्क्रीम खायला जायचो, तर कधी तुशे रेस्टॉरंटमध्ये जेवायला. अनेकदा लॅमिंगटन रोडच्या इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये जात असू. मला वाटतं, त्या काळात राजीवला मुंबईतील सामान्यांचे जीवन खूप जवळून पाहता आले. काही वेळा तो ‘अॅपलॅब’ या माझ्या कंपनीत येई आणि फॅक्टरीच्या शॉपफ्लोअरवर वेळ घालवत असे. त्या सहा वर्षांत आम्ही खूप जवळ आलो.
मी आणि मनुभाई अनेकदा सरकारच्या इलेक्ट्रॉनिक उद्योगनीतीवर जोरदार टीका करत असू. उद्योगाच्या वाढीला आपली नीती आळा घालते, या तंत्रज्ञानाच्या जगातील वाढीपासून आपण दूर जात आहोत, यावर आमचा जोर होता. राजीव ते ऐकत असे, पण त्यावर भाष्य करत नसे. सरकारपासून आणि राजकारणापासून तो स्वतःला ठामपणे दूर ठेवत असे.
मुंबईला सातत्याने येत असूनही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला किंवा सरकारी अधिकाऱ्याला तो कधीही भेटल्याचे मी पाहिलेले नाही. त्याच्या बोलण्यातही तसे कधी आले नाही. त्याला पोलीस संरक्षण होते, पण तेही जुजबी. देशातील सर्वांत जबरदस्त व्यक्तीचा मुलगा असूनही राजीव स्वतःला सरकारपासून पूर्णपणे अलिप्त ठेवत असे. त्याच्या मनाचा असा खंबीरपणा मला अतिशय भावत असे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
आणीबाणीच्या काळात पुण्यातील माझ्या एका मित्राचे वडील तुरुंगात होते. ते कोठे आहेत, कसे आहेत, याची काळजी मित्राला वाटली. त्याने मला फोन करून राजीवच्या माध्यमातून काही कळेल का, याची विचारणा केली. मी राजीवला त्या बाबत विचारताच त्याने काहीही करण्यास नकार दिला. मी नाराज आहे हे पाहून तो म्हणाला, “त्यासाठी मला मुंबईच्या पोलीस कमिशनरला विचारावे लागेल. एकदा का असा संवाद मी साधला, तर अनेक सरकारी अधिकारी माझा फायदा घेऊ पाहतील. ते मला अजिबात नको आहे.” अशी त्याची स्वच्छ विचारसरणी आणि कडक शिस्त होती.
आणीबाणीच्या काळात संजयचे आणि त्याचे संबंध अधिक बिघडले होते. इंदिरा गांधींच्या राजकीय अडचणींना संजय जबाबदार होता, असे त्याचे मत होते. धीरेंद्र ब्रह्मचारीवर त्याचा विशेष रोष होता. संजय गेल्यावर राजीव आणि त्याची आई खूप जवळ आले. इंदिरा गांधींना तो काल अडचणीचा होता.
१९८० साली संजय गांधी दिल्लीतील विमान अपघातात मरण पावेपर्यंत राजकारण आणि राजकारणी यांच्यापासून राजीव कोसो दूर असे; मुंबईत आणि दिल्लीतही. पण १९८१पासून ते हळूहळू बदलले. संजय गेल्यानंतर राजीवला साहजिकच आईला मदत करणे आवश्यक झाले. त्यातला एक भाग होता इंदिराजींना रोज देशवासियांकडून येणारी पत्रे. संजयची ती जबाबदारी आता राजीववर आली. त्यातील तंत्रज्ञानाबद्दलच्या पत्रांना उत्तर देण्यासाठी राजीवच्या मदतीला शनिवार-रविवारी मी दिल्लीला जाऊ लागलो. १९८१मध्ये असे एक पत्र होते सॅम पित्रोडाचे. खेड्यातही विना एअरकंडीशनिंग चालू शकेल असे डिजिटल एक्स्चेंजचे तंत्रज्ञान देशाला देऊन ते हिंदुस्थानात बनवण्याचा प्रस्ताव होता. त्या वेळी अमेरिकेविषयी आणि विशेषतः सीआयएविषयी देशात भीती होती. सीआयए सॅम पित्रोडाच्या माध्यमातून हे करत असावी, अशी भीती जी. पार्थसारथी यांना होती. त्यामुळे इंदिराजी असेपर्यंत विशेष झाले नाही. १९८६ साली शेवटी त्याच्यासाठी सी-डॉट निर्माण केली गेली. टेलिकॉम मंत्रालयाचा मात्र त्याला विरोध होता.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत राजीव अतिशय चौकस बुद्धीचा होता. मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, डिजिटल कम्युनिकेशन इत्यादी विषय त्याच्या आवडीचे. त्यात काहीही नवीन घडले की, त्यावर आमची चर्चा होत असे. हिंदुस्थानात काय करता येईल हा प्रश्न नेहमीचा. अॅपलॅबमध्ये मी काही नवी वस्तू निर्माण केली तर त्यावर विस्तृत चर्चा कायम होत असे. १९८० साली आम्ही दोघांनी बीबीसी मायक्रो कम्प्युटर विकत घेतले. मीच दोन्ही खरीदले, पण त्याची किंमत मला दिल्यावरच त्याने तो घेतला. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नातही त्याला विशेष रस होता. गरिबांविषयी आस्था होती. आमच्या बरोबर त्याने मुंबईतील सामान्य जनतेचे, विशेषतः गरीब कुटुंबांचे जीवन जवळून पहिले होते.
राजीवची वागणूक पूर्णपणे शिस्तबद्ध असे. त्याचे कुटुंब हे त्याला सर्वांत जवळचे. तो एकनिष्ठ पती होता. तो अतिशय देखणा तरुण होता आणि तरुण स्त्रियांचा तो विशेष आवडता होता. पण त्याचे पाऊल वाकडे पडलेले मी कधीही पहिले नाही. वायफळ बडबड आणि सेक्सी विनोदांचे त्याला वावडे होते. कधी रागवला तर तो बोलत नसे, पण त्याचे कान लाल व्हायचे.
डिसेंबर १९८९ नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. लोकसभेत तो विरोधी गटाचा प्रमुख झाला. संसदभवनातील विरोधी पक्ष नेत्याच्या त्याच्या केबिनमध्ये मी त्याला भेटायला गेलो. मी त्याला म्हटले, “पंतप्रधानपदाची जबाबदारी संपल्यावर तुला आता सुटल्यासारखे वाटत असेल.” त्याचे उत्तर - “नाही प्रभू! आता मला नवी काळजी आहे. पंतप्रधान असताना कामाचे कारण सांगून मी आमच्या पुढाऱ्यांना दूर ठेवू शकत होतो. आता त्यांना चुकवणे शक्य होणार नाही.”
असा होता राजीव गांधी! भारतातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सत्ताधारी स्त्रीचा तो मुलगा होता. पण त्याच्यासारखा सौम्य, भिडस्त, निर्व्यसनी आणि दुसऱ्यांचा मान राखणारा मुलगा मी इतर कुठल्याही राजकारणी परिवारात पाहिलेला नाही. इंडिअन एअरलाईन्समध्ये तो केवळ एक सामान्य पायलट म्हणून काम करत होता. अॅव्हरोसारखे साधे विमान तो चालवत होता. मला ही असामान्य गोष्ट वाटते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
दिल्लीला राजीव आईबरोबर १, अकबर रोड इथे राहत असे. त्या मोठ्या बंगल्यात एका वेगळ्या फ्लॅटमध्ये त्याचे कुटुंब राहत असे. लिव्हिंग रूम मोठी होती. दोन मोठी पुस्तकांची कपाटे होती. एरोनॉटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, वाङमयीन क्लासिक्स अशा अनेक विषयांवरची पुस्तके त्यात होती. पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा तो शौकीन. त्यामुळे कॉस्मिकची हायफाय म्युझिक सिस्टीम होती. मोठे बास स्पीकर्स होते. अॅमॅच्युअर रेडिओ त्याची हॉबी. काही इलेक्ट्रॉनिक गीझ्मोही होते. आम्ही दोघांनी घेतलेला बीबीसी सिनक्लेअर झेडएक्स ८० आणि ८१ टेबलावर होते. त्या काळात राजीवच्या आयटीमधील रुचीला सुरुवात झाली. हवाई उड्डाण मात्र त्याची पहिली आवड. विमानातील पायलटच्या समोर असलेल्या साऱ्या एक्विपमेंटविषयी त्याला खोलवर माहिती होती. त्याचा स्वभाव अतिशय चौकस होता. विमानाचा त्याचा अभ्यास खोलवर होता. फ्लायिंग आणि विमाने हे त्याचे पहिले प्रेम.
राजीवचा पिंड मूलतः खाजगी. स्वतःविषयी बोलणे तो कटाक्षाने टाळत असे. भाषा सौम्य असे. पुढे मणिशंकर अय्यरच्या नादाने त्याने काही वादात्मक विधाने केली, पण तो त्याचा मूळ स्वभाव नव्हे. आम्ही दोघेच असलो की, त्याच्या बालपणाविषयी तो बोलत असे. पण त्याविषयी मी काही बोलणार नाही. त्याचे बालपण विशेष आनंददायी नव्हते इतकेच सांगतो. अनेक वर्षांच्या मैत्रीनंतर आम्हा दोघांत मोठा विश्वास होता. तो पंतप्रधान असण्याच्या काळात काही वेळा आम्ही दोघे त्याच्या ऑफिसमध्ये गप्पा करत असू. मनुभाईवरही त्याचा गाढ विश्वास होता.
पंतप्रधान झाल्यावर आमच्या भेटी पूर्वीप्रमाणे शक्यच नव्हत्या. अनेक वेळा ऑफिशिअल भेटी होत, पण वर्षातून काही वेळा तो मला बोलवून घेत असे. कदाचित माझी टीका त्याला ऐकायला आवडत असावी. भेट अनेकदा तासभर चाले. तो विमानाने कुठे जात असला तर काही वेळा मला बरोबर नेत असे. तेव्हा आम्हाला खाजगी वेळ मिळत असे. मी त्याला काही वेळा माझ्या नोट्स पाठवत असे. अखेरपर्यंत मी त्याला ‘राजीव’ या एकेरी नावानेच संबोधत असे. काही वेळा ऑफिशिअल मिटिंगमध्येही अनवधानामुळे मी तसेच संबोधित करायचो. त्याचे स्मितहास्य पाहून मी खजील होई.
माझ्या मते लादलेले पंतप्रधानपद हा राजीववर अन्याय होता. राजकारण हा त्याचा विषयच नव्हता. त्याच्या भोवतालच्या अनेक राजकीय पुढाऱ्यांविषयी त्याचे मत चांगले नव्हते. राजकारणात येण्यापूर्वी इंदिराजींची हांजीहांजी करताना त्याने अनेकांना पाहिले होते. त्यांचा दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा त्याने घरात पाहिला होता. संजयपुढे कापणारे काँग्रेस पुढारी त्याने पहिले होते. त्यांच्या लाचार चेहऱ्यामागे कशा प्रकारचा माणूस आहे, हे त्याला ठाऊक होते. त्याविषयी पूर्वी आम्ही बोलत असू. आणीबाणीच्या दरम्यान त्यांची वागणूक त्याने पहिली होती. तो आमच्याशी बोलताना त्यांचा विषय टाळत असे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
भारत फोर्जचे नीलकंठ कल्याणी माझ्याकडे येत. शरद पवारांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश हवा होता, पण राजीव त्यांना भेट देत नव्हता. कल्याणी माझ्या मागे लागले की, पवारांच्या भेटीला राजीवला राजी करावे. एकदा त्याच्या फार्महाउसवर जाताना मी राजीवला त्याबाबत विचारले. राजीव म्हणाला, ‘तो मनुष्य मला आवडत नाही. कारस्थानी आहे.’ महाराष्ट्रातील राजकारणात पवारांचे महत्त्व मोठे आहे आणि ते काँग्रेसमध्ये आले तर पार्टीला खूप मदत होईल. तुला नावडत असले तरी तू त्यांना भेटले पाहिजेस. माझ्या आग्रहामुळे तो राजी झाला. पुढे औरंगाबादमध्ये पवारांनी इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तीन-चार महिन्यांनी आम्ही एकत्र असतांना जॉर्जने पवारांचा फोन आल्याचे सांगितले. राजीव फोन घ्यायला राजी नव्हता. मी त्याला सांगितले, पवार आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तुझी नाराजी बाजूला ठेव आणि बोल.
फक्त काही पुढाऱ्यांबरोबर त्याचे चांगले जमे. माधवराव सिंदिया आणि नरसिंहराव त्यातले. मणिशंकर अय्यर त्याच्या खूप जवळचा. त्याच्या मुळे राजीवने पुढे काही वाह्यात विधाने केली आणि माध्यमांनी त्याला फैलावर घेतले, सुरुवातीच्या काळात विश्वनाथप्रसाद सिंगवर त्याचा खूप विश्वास. पण का कोणास ठाऊक, मला मात्र त्यांच्या डोळ्यात एक खुनशी भावना कायम दिसे. पुढे त्यांनीच राजीवला दगा दिला. विश्वनाथ प्रताप सिंग वित्तमंत्री होते. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था राजीवच्या पंतप्रधानकीच्या अखेरीला मोडकळीस आली. नंतर नरसिंहरावांना मदत करून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला वाचवले आणि अर्थव्यवस्था सुधारली.
राजीव पंतप्रधान झाला त्या वेळी असंख्य प्रश्न देशापुढे होते. पंजाब आणि पूर्वोत्तर भागात राजकीय आणि सामाजिक अशांतता होती. अर्थव्यवस्था काळजी करण्यासारखी होती. देशाची परकीय चलनाची गंगाजळी धोक्याचा पातळीवर होती. पाकिस्तान सीमा आणि विशेषतः श्रीलंकेतील सशस्त्र तामिळ उठाव युद्ध पातळीवर पोहोचला होता. या सगळ्या संकटात देशाच्या इतर गहन प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य बाबतीतचे गरजेचे प्रश्न बाजूला पडले. पहिली दोन वर्षे हनिमून चालू होता, पण नंतर लगेच त्याला अनेक क्लिष्ट प्रश्नांनी घेरले. त्याने असंख्य वेळा मंत्रिमंडळात फेरफार केले. आमचे दिल्लीतील मित्र सांगतात की, विविध प्रदेशातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत तो अस्वस्थ आणि हताश दिसत असे. अनुभव नसल्याने त्याला मिळालेल्या ८२ टक्के मतांचा तो फायदा घेऊ शकला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट. जरूर लागली तर देशाची राज्यघटना, संविधान, बदलण्याची ताकद त्याला देशवासीयांनी दिली होती, पण ती वाया गेली.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
खरे तर संघर्षापेक्षा सलोख्याने प्रयत्न करणे हे राजीवच्या स्वभावाला धरून होते, पण मला वाटते तो संभ्रमात पडल्यावर त्याला मिळालेला सल्ला तो मानत असे. सुरुवातीला त्याच्यासोबत अतिशय हुशार मित्र-सहकारी होते. पक्षाच्या स्वार्थी आणि फसव्या नेत्यांना त्याने दूर ठेवले होते. पण हळूहळू त्याच्या लक्षात आले की, त्यातील बहुतेकांचा स्वतःचा एक अजेंडा होता. जे चांगले होते त्यांचा सल्ला न मानल्याने हळूहळू त्याला सोडून गेले. ठाम विचारांती ठरवलेली आर्थिक धोरणे आणि त्यातून जरुरीच्या सुधारणा केल्या गेल्या नाहीत. मात्र त्याने केलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर क्षेत्रात केलेल्या अमूलाग्र सुधारणा पुढे देशाला अतिशय उपयुक्त आणि फायद्याचा ठरल्या.
मी इलेक्ट्रॉनिक कमिशनचा अध्यक्ष होतो. त्या बाबतीत अनेकदा आम्ही भेटत असू. त्या काळात या क्षेत्रातील वार्षिक वाढ सातत्याने ४० टक्क्यांवर होती! अमेरिकन आणि युरोपिअन कंपन्यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रात हिंदुस्थानात गुंतवणूक केली. सुरुवातीला आम्ही देशात चार शहरात सॉफ्टवेअर पार्क सुरू केले. सॉफ्टवेअरची निर्यात वाढू लागली. (त्यामुळे पुढे २००० साली या क्षेत्रातील देशातील सॉफ्टवेअर निर्यात झपाट्याने वाढली.) १९८६ साली टेलीकॉम मिनिस्ट्रीच्या विरोधाला न जुमानता सॅम पित्रोदासाठी सी-डॉटची सुरुवात केल्याने देशातील टेलीकॉम क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली. ग्रामीण भागातही अंतरराष्ट्रीय फोन सुविधा आम्ही पोहोचवली. व्यापारमंत्री दिनेशसिंग राजीवचे शत्रुत्व करत. त्यांनी राजीवने सुचवलेल्या सुधारणा मानल्या नाहीत. पंचायतराज ही राजीवने देशाला दिलेली अतिशय महत्त्वाची देण आहे. १९८८ पर्यंत मी इलेक्ट्रॉनिक कमिशनचा अध्यक्ष होतो. त्याच्या सल्ल्यांचा सरकार आदर करत नाही, हे जाणल्यावर मीच पुढाकार घेऊन कमिशन गुंडाळले. त्या काळात राजीव बोफोर्सच्या झंझावात सापडला होता. तो मला म्हणाला तूसुद्धा सोडून चाललास? भालचंद्र देशमुख तेथे उभे होते. ते म्हणाले, आता देवधरांनी तुझे इलेक्ट्रॉनिकी सल्लागार म्हणून काम करण्याचे मान्य केले आहे.
त्याला सल्ला देणारे अनेक होते. मला वाटते, त्याला कोणता सल्ला मानावा याचा प्रश्न पडत असावा. सगळ्यात आश्चर्यकारक निर्णय म्हणजे श्रीलंकेत शांतता राखण्यासाठी आपले सैन्य पाठवणे. तंटा होता तामिळ भाषिक श्रीलंकन नागरिक आणि श्रीलंकेचे सरकार. त्यात आपण भाग घेणे अतिशय धोक्याचे होते. आपले सैन्य आणि तामिळ बंडखोर यांच्यातच युद्ध सुरू झाले. दक्षिण भारतातील लोक या निर्णयाने अतिशय दुखावले गेले. त्या चुकीच्या निर्णयाची जबरदस्त किंमत राजीवला द्यावी लागली.
नंतर आले बोफोर्सचे वादळ. विश्वनाथप्रतापसिंग अतिशय खुनशी माणूस. न पटल्याने खुनशीपणाने राजीवला त्यात अडकवले. विरोधी पक्षाला एक मोठे हत्यार मिळाले. माझी स्वतःची खात्री होती की, राजीव स्वच्छ होता. पण त्या झंझावात तो पुरा अडकला. माझ्या मते त्याचा मित्र अरुणसिंग याने त्याला दिलेला सल्ला अतिशय योग्य होता. त्यामुळे संसदेत सुरू झालेला गदारोळ शमवणे सहज शक्य होते. पण राजीवने ते मानले नाही. पुढे अरुणसिंहनेही राजीनामा दिला. तो राजीवचा शालेय दोस्त. दोघे एकाच वयाचे. दोघांचे सख्य इतके की, अरुणसिंगचा सरकारी बंगला राजीवच्या ७ रेसकोर्स रोडवरील बंगल्यालगतचा. दोन्ही बंगल्यांना जोडणारे एक विकेटगेटसुद्धा होते! राजीव अमेठीतून जिंकून लोकसभेचा सभासद व्हायच्या आधीपासून दोघे बरोबर होते. राजीव अनेक निर्णय त्याला विचारून घेई. पण बोफोर्सवरून त्यांचे बिनसले. बहुतेक सारे मित्र एव्हाना त्याला सोडून गेले. राजीवचा विश्वास गमावल्याने मी सरकार सोडले असे अरुणसिंगने नंतर सांगितले. संसदेत राजीवने स्पष्ट केले होते की, या व्यवहारात माझा काडीचाही हात नाही. स्वीडनच्या पंतप्रधानांनीही स्पष्टपणे सांगितले होते की, यात कुठलेही कमिशन नव्हते. पुढे १८ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने बोफोर्स घोटाळ्यातून राजीवला दोषमुक्त केले. राजीव मला पूर्णपणे ठाऊक होता. त्याची नीतीमत्ता मी अनेक वेळा पाहिली होती. त्यामुळे माझ्या नजरेत तो आधीपासूनच दोषमुक्त होता.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
राजीवचा सर्व कार्यकाळ पाहिला तर देशाला मिळालेल्या पंतप्रधानात त्याचा नंबर फार खाली येतो, हे सत्य आहे. त्याच्यावर काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी लादलेले पंतप्रधानपद त्याच्यासारख्या व्यक्तीला सांभाळणे शक्य नव्हते. त्याने ते स्वीकारले ही त्याची मोठी चूक. शाहबानू केस किंवा बाबरी मस्जिदच्या बाबतीत त्याने घेतलेले निर्णय चुकीचे होते. लंकेला आपले सैन्य पाठवणे ही तर घोडचूक होती. सल्ला देणारे अनेक होते. कोणाचे ऐकावे? शेवटी २१ मे १९९१ रोजी त्याला त्याची जबरदस्त किंमत द्यावी लागली.
एक गोष्ट मात्र नक्की की, त्याने तंत्रज्ञान क्षेत्रात देशाला भरभराटीच्या मार्गावर बाजी मारण्यासाठी तयार केले. देशातील राजकारणाला त्याने दिलेली आधुनिक तंत्रज्ञानाची झालर अतिशय महत्त्वाची. इतिहास त्याला ते श्रेय नक्कीच देईल. १९८१ पासून तो जाईपर्यंत मी त्याला माझ्या कुवतीप्रमाणे सतत मदत केली. ‘इन्फर्मेशन टेक्नोलॉजी’ हा शब्द निर्माण होण्यापूर्वीच आम्ही भारताला त्यासाठी तयार करू शकलो हे माझे भाग्य!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vivek Date
Fri , 04 September 2020
With due respect to frienship of Deodhar with Rajiv Gandhi his argument is senseless. H entered politics on 16 February 1981, when he addressed a national farmers' rally in Delhi. On 4 May 1981 he became candidate for the Amethi constituency and won it and became MP on 17 August. In December the same year, he was put in charge of the Indian Youth Congress. He was in politics well before he became PM after assassination of his mother Indira Gandhi. She was killed for meddling in Sikh politics of religion and he was foolish to deploy Indian Army in the civil war of Sri Lanka, used by Jayawardene. So to say they that he was unwilling and forced to become PM is absolute nonsense. It is hard believe they were not corrupt. There is enough evidence out there for their corruption.