१.
एकेकाळी भारत हा आपला देश गिधाडांच्या बाबतीत अतिशय समृद्ध होता. हो, पक्षी गिधाडांच्या बाबतीत. एका आकडेवारीनुसार १९८०पर्यंत भारतात जगाच्या तुलनेत सर्वाधिक गिधाडे होती. म्हणजे किती असावीत? त्यांची संख्या जवळपास साडेआठ कोटी इतकी होती.
ही गिधाडे काय खातात? तर मेलेली जनावरं. म्हणजे १९८०पर्यंत या देशात जी जनावरे मरत होती, त्यावर साडेआठ कोटी इतकी गिधाडे सुखनैव जगत होती.
पण त्यानंतर अचानक त्यांची संख्या कमी होऊ लागली. पुढच्या २५ वर्षांत गिधाडांच्या संख्येत जवळपास ९७ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर घट झाली.
असं का झालं? काय घडलं नेमकं?
त्याचं कारण होतं – माणसांनी शोधलेलं आणि भारतीय माणसं मोठ्या प्रमाणावर वापरत असलेलं एक रसायन. त्याचं नाव - ‘डायक्लोफिनॅक’. १९९०च्या दशकात हे औषध पशुवैद्यकीय उपचारासाठी वापरात आलं. गंमत पहा, जनावरांच्या अवयवांवर आलेली सूज किंवा त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी ‘डायक्लोफिनॅक’ हे औषध वापरलं जाऊ लागलं. ते खूपच स्वस्त होतं. त्यामुळे ‘स्वस्त ते मस्त’ या न्यायानं ते लवकरच भारतात लोकप्रिय झालं. या औषधामुळे जनावरं बरी होऊ लागली. पण त्याचा अंश त्या जनावरांच्या शरीरात सगळीकडे पसरलेला असे. त्यामुळे ‘डायक्लोफिनॅक’चा वापर झालेली जनावरं म्हातारी होऊन किंवा इतर काही कारणांनी मेली आणि ती गिधाडांनी खाल्ली तर त्यांना विषबाधा होऊन ती मरू लागली.
लंडनच्या ‘पेरिग्रीन फंड’ आणि पाकिस्तानच्या ‘ऑर्निथॉलॉजिकल सोसायटी’ने २०००च्या सुमारास पाकिस्तान एक सर्वेक्षण केलं होतं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, बहुतांश गिधाडे ‘डायक्लोफिनॅक’मुळे विषबाधा होऊन मृत्युमुखी पडताहेत. त्यामुळे या औषधाविरोधात पर्यावरणवाद्यांनी जनजागृती करायला सुरुवात केली. भारतात तर या जनजागृतीने चांगलाच जोर पकडला. त्यामुळे अखेर २००६मध्ये भारत सरकारने ‘डायक्लोफिनॅक’वर बंदी घातली. त्याला पर्याय म्हणून ‘मेलॉक्सिकॅम’ हे रसायन वापरण्याचे निर्देश दिले. गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी, त्यांचे जतन-संवर्धन करण्यासाठी काही केंद्रे स्थापन करण्यात आली.
पुढच्याच वर्षी दै. ‘लोकसत्ता’मध्ये एक बातमी प्रकाशित झाली. ती अशी -
‘गिधाडे परताहेत!’ – सुहास जोशी (२२ मे २००७) : “अलीकडेच झालेल्या २००७च्या वन्यजीव प्रगणेदरम्यान माहुली किल्ले परिसरात (तानसा अभयारण्य) ‘लाँग बील्ड व्हल्चर्स’ आणि फणसाड अभयारण्यात ‘व्हाईट बॅक्ड व्हल्चर्स’चे दर्शन कार्यकर्त्यांना झाले आणि निसर्गप्रेमींच्या आशा पल्लवित झाल्या. अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असणाऱ्या या ‘सफाई कामगार’ म्हणजेच गिधाडांच्या संख्येत २००५ सालापर्यंत तब्बल ९७ टक्के इतकी घट झाली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाणात गिधाडांची संख्या अलीकडे आढळली, ती नाशिक परिसरातील डोंगरकपाऱ्यांमध्ये. अंजनेरी येथे २४ घरट्यांमधून सुमारे ७०-८० गिधाडांच्या वास्तव्यापैकी १८ टक्के, तर चांदवड परिसरात सुमारे १००च्या आसपास ही संख्या जाऊन थांबते. हे सर्व ‘लाँग बील्ड’ वर्गातील आहेत; तर हरिहर किल्ल्याच्या डोंगररांगेत ७०च्या आसपास ‘व्हाईट बॅक्ड व्हल्चर्स’ आढळतात. कोकण किनारपट्टीवर आंजर्ले येथील गिधाडांच्या वस्तीवर चिपळूणची ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ ही संस्था सतत पाच वर्षे महत्त्वपूर्ण नोंदी घेत आहे. संस्थेचे कार्यकर्ते भाऊ काटदरे या संदर्भात वृत्तान्तशी बोलताना म्हणाले की, ‘डायक्लोफिनॅक’च्या संकटाबरोबरच गिधाडे नामशेष होण्यामागील अन्य कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे.’ आंजर्ले परिसरातील गिधाडांना पुरेसे अन्न न मिळण्याच्या समस्येकडे त्यांनी या निमित्ताने लक्ष वेधले. तसेच येथील कॉल्स इनक्युबेशनचे प्रमाण खूप चिंतादायक आहे. गिधाडे अंडी उबविण्यासाठी अनेक दिवस बसली आहेत, पण घरट्यात अंडीच नाहीत, ही परिस्थिती सुमारे ४० टक्के इतकी आढळते. या सर्वांचे चित्रीकरण देखील करण्यात आले आहे. २००६मध्ये येथून १२ घरट्यातून फक्त दोनच गिधाडांची पिल्ले आकाशात विहरू लागली आहेत.”
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
तरीही २००९ सालापर्यंत भारतातील गिधाडांची संख्या तीन ते चार हजार इतकी कमी झाली. म्हणजे १९८० साली जवळपास साडेआठ कोटी गिधाडे भारतात होती, ती त्यानंतरच्या अवघ्या ३० वर्षांत तीन-चार हजारांवर आली. त्यावर संयोग मोहिते या मराठी तरुणाने २००९ साली ‘Vanishing Vultures’ हा लघुपट बनवला. त्यासाठी त्याने १९८० ते २००९ या तीसेक वर्षांतील गिधाडांच्या चित्रणाचा वापर केला आहे. हा लघुपट २००९मध्ये झालेल्या ‘इकोफेस्ट’ या पर्यावरणविषयक लघुचित्रपट महोत्सवात दाखवला गेला. त्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळाले. हा संपूर्ण लघुपट ५९ मिनिटांचा आहे. तो यु-ट्युबवर उपलब्ध नाही. पण १ जून २०११ रोजी या लघुपटाचा जवळपास १७ मिनिटांचा संपादित भाग यु-ट्युबर अपलोड केला गेला. तो आजवर ७३, ८२४ लोकांनी पाहिला आहे. आजही हा लघुपट यु-ट्युबवर पाहता येतो.
मधल्या काळात ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने गिधाडांच्या प्रजातीविषयी अभ्यास करून अनेक अहवाल बनवले. त्यांनी असेही दाखवून देण्याचा प्रयत्न केला की, केवळ ‘डायक्लोफिनॅक’मुळे गिधाडे नष्ट होत नाहीयेत. त्याला इतरही अनेक कारणे आहेत. हिवताप, किटकनाशके आणि खाद्य या तीन गोष्टीसुद्धा गिधाडांच्या मृत्यूसाठी तेवढ्याच कारणीभूत आहेत, असे या संस्थेने दाखवून दिले. दरम्यान केंद्र सरकारनेही ‘डायक्लोफिनॅक’वरील बंदी अंशत: हटवली. शेतकऱ्यांना या औषधाचा वापर मर्यादेत करायला सांगितला.
तरीही दै. ‘लोकसत्ता’मध्ये १३ एप्रिल २०१४ रोजी पुढील बातमी प्रकाशित झाली –
“पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय उपखंडातील नऊ प्रजातींपैकी तीन प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यापैकी पांढऱ्या पाठीचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड आणि पातळ चोचीचे गिधाड, या तीन प्रजाती ९९ टक्के नष्ट झाल्या आहेत. मात्र, त्याचबरोबर आता इजिप्शियन गिधाड आणि राजा गिधाड (रेड हेडेड व्हल्चर) या दोन प्रजातीसुद्धा अनुक्रमे ८० व ९१ टक्के नष्ट झाल्याचे एका संशोधन अहवालातून समोर आले आहे.”
२.
खरं म्हणजे गिधाडे नष्ट होण्याची कारणं वेगळीच होती. विजय तेंडुलकरांना त्याचा सुगावा साठच्या दशकातच लागला होता. त्यांना असं समजलं होतं की, पक्षी गिधाडांची संख्या कमी होण्याचं मुख्य कारण हे माणसांनी गिधाडांची जागा घ्यायला सुरुवात केली हे आहे. माणसं गिधाडांची वृत्ती जोपासण्याच्या इतकी मागे लागली आहेत की, ती दिसलं गिधाड की, त्याचा पंचप्राण काढून घेऊन स्वत:मध्ये घालून घेत आहेत. त्यामुळे निष्प्राण गिधाडे पटापट मृत्युच्या कराळ दाढेखाली सापडत आहेत. हा इतका ‘ड्रॅमॅटिक’ विषय तेंडुलकरांनी हातचा सोडायचा नाही, असं ठरवलं. त्यावर त्यांनी ‘गिधाडे’ या नावानं एक दोन अंकी नाटकच लिहिलं.
आता तेंडुलकर म्हटल्यावर बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावतात आणि ते संशयानं पाहू लागतात. त्यांच्या माहितीसाठी पुरावा द्यायला हवा. कारण त्याशिवाय कुणी विश्वास ठेवणार नाही. एरवी तेंडुलकर जे बोलत त्यावरही लोक विश्वास ठेवत नसत. काहीजण तर तेंडुलकरांना जाऊन १०-१२ वर्षं झाली तरी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तर ते असो.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : चला, जरा सुशांतसिंग राजपूतच्या चित्रपटातील ‘हिंदू-मुस्लीम मैत्री’ आणि इतर ‘गैरसोयीच्या सत्या’बद्दल बोलूया…
..................................................................................................................................................................
तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ या नाटकाचा पहिला प्रयोग २९ मे १९७० रोजी मुंबईत झाला. थिएटर युनिटने हा प्रयोग केला. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते डॉ. श्रीराम लागू यांनी. या नाटकाची संहिता १९७१मध्ये पुस्तकरूपाने पुण्याच्या नीळकंठ प्रकाशनाने प्रकाशित केली. त्याला तेंडुलकरांनी जेमतेम पानभर प्रास्ताविक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात – ‘‘सुमारे दहा वर्षे हे नाटक माझ्या घरची धूळ खात फाटत तुट होते. त्याचा जीर्णोद्धार प्रथम केला सई परांजपे यांनी. दिल्लीच्या हिंदी रंगमंचावर तेथील ‘यात्रिक’ या संस्थेतर्फे या नाटकाचे त्यांनी जिद्दीने प्रयोग केले. त्यानंतर डॉ. श्रीराम लागू यांनी ‘थिएटर युनिट’ या मुंबईच्या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक मराठी रंगभूमीवर आणले… मोजक्या प्रयोगांसाठी केवळ एक ‘धाडस’ म्हणून उभे केलेले हे नाटक गेले वर्षभर नियमितपणे चालू आहे…’’
आणखी एक पुरावा. या नाटकाचा काही भाग कविवर्य नामदेव ढसाळ संपादित ‘भारुड’ या अनियतकालिकाच्या जून १९६५च्या अंकात प्रकाशित झाला आहे.
या दोन पुराव्यांमुळे हे नाटक तेंडुलकरांनी साठच्या दशकातच लिहिलं आहे, यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.
या नाटकात रजनीनाथ, पपा, उमाकांत, रमाकांत, माणिक आणि रमा अशी सहा पात्रं आहेत. या नाटकात सुरुवातीची पाच ‘गिधाडे’ आहेत, तर रमा ही या गिधाडांची ‘शिकार’ आहे. ही गिधाडे कशी आहेत? सेम टू सेम खऱ्या गिधाडांसारखी. मांसासाठी घिरट्या घालणारी, मांसाची वाट पाहणारी, लचके तोडणारी, मांसासाठी भांडणारी आणि परस्परांवर तुटून पडणारी. ती फक्त नावालाच माणसं आहेत. बाकी त्यांच्यात आणि खऱ्या गिधाडांमध्ये काहीच फरक नाही. प्रेम, आस्था, संवेदनशीलता, माणुसकी, चांगुलपणा या गोष्टी या गिधाडांमध्ये शोधूनही सापडत नाहीत. सापडतो तो फक्त स्वार्थ, सत्ताकांक्षा, हाव आणि शेखचिल्लीछाप मनोराज्याचे इमले बांधणारी वृत्ती.
अत्यंत हीन वृत्ती, स्वार्थी, पाशवी वृत्तीची भोगलोलुपता, इतरांबद्दल काडीचंही प्रेम नसलेली, माया नावाच्या गोष्टीला पारखी झालेली आणि केवळ संपत्ती व माणसाचं शरीर यांची शिकार करायला चटावलेली ही गिधाडे अत्यंत क्रूरपणे एकमेकांचे आणि रमाचे लचके तोडत राहतात. रजनीनाथ हा पपाचा अनौरस मुलगा, तर उमाकांत, रमाकांत, माणिक ही औरस मुले. रजनीनाथ हा यातले जरा बरे गिधाड आहे. ते इतर जण रमाचे लचके तोडत असताना मूकपणे पाहत राहते, पण काही करत नाही. इतकी तटस्थ वृत्ती गिधाडांनाच शोभून दिसते. माणसाचा तो गुणधर्म नाही. अर्थात काही माणसं हा गुणधर्म अनेकदा अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतात, पण बहुतेकांना ते जमत नाही. तर ते असो.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : चला, जरा सुशांतसिंग राजपूतच्या चित्रपटातील ‘हिंदू-मुस्लीम मैत्री’ आणि इतर ‘गैरसोयीच्या सत्या’बद्दल बोलूया…
..................................................................................................................................................................
तेंडुलकरांनी या नाटकाविषयी एके ठिकाणी म्हटलं आहे – ‘माणसातले पशुत्व काय जे असेल त्याचे गिधाडेशी नाते आहे.’
या नाटकावर तेव्हा बरेच वादंग माजलं होतं. प्रत्यक्ष गिधाडे एका मेलेल्या जनावरावर जशी तुटून पडतात, तशी या नाटकातील माणसं नावाची गिधाडंही रमावर तुटून पडतात. गिधाड या पक्ष्याची मोठी गंमत असते. हा पक्षी गरुड या पक्ष्यापेक्षाही मोठा आणि ताकदवान मानला जातो, पण तो स्वत:हून कुणाचीही शिकार करत नाही. तर फक्त मेलेल्या जनावराच्या मांसाचे लचके तोडून त्यावर आपले पोट भरतो. म्हणजे गिधाडे जगायची असतील तर कुणाला तरी मरावं लागतं. पण तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’मधली गिधाडे खऱ्या गिधाडांच्या वरताण आहेत.
उदाहरणादाखल एक संवादच पहा –
उमाकांत – माणकी सती गेली. राजाबरोबर.
रमाकांत – हट्! पाय मोडल्यावर कशी सती जाणार? साला बसता येणार नाही – चितेवर…
उमाकांत – पोरावर बसेल… पोटातल्या.
रमाकांत – आयडिया! फर्स्ट क्लास सीन! तुफान गर्दीचा एकशे आठावा आठवडा. आपली माणकी पोटातल्या पोरावर बसून सती जाते. टेक्निकलर साला.
उमाकांत – काय चिता पेटेल!
रमाकांत – आभाळापर्यंत आग भडकेल साला.
उमाकांत – विमानात बसून बघायची. बर्डस आय! (घशात हसतो.)
रमाकांत – टेक्निकलर! तिकिटं लावून पैसा करू साला. सगळी देणी फेडून टाकू. बेंगलो, शोफर कार – पॉश साला.
उमाकांत – पण मूल होणार नाही.
रमाकांत – (एकदम येऊन उमाकांतची गच्ची पकडून कर्कशपणे) शडाप् यू! यू बिच. यू – यू सुव्वर. साला हरामी. आय विल शूट यू!
उमाकांत – (शांतपणे झटकून) शूट माय शू! साला शूट करतो साला. पी आणखी.
रमाकांत – (डोके धरून बसतो) सगळे हरामी साले. एकदम हरामी साला. लकसुद्धा हरामी.
उमाकांत – माणकूचा राजा मेला. खलास!
रमाकांत – हरामी साला.
उमाकांत – हरामी पण मेलेला. डेड.
रमाकांत – ब्रदर, जरा इकडे ये.
उमाकांत – तूच ये.
रमाकांत – साला ये म्हणतो तर. (धडपडत त्याच्याकडे जातो.) इकडे कान कर. (उमाकांत वाकतो.) राजा आहे. माणकीच्या पोटात. साला हरामी साला… दुष्मन साला… दगाबाज… आय शूट हिम ब्रदर!
उमाकांत – नो, शूट माय शू.
रमाकांत – ब्रदर, नो जोक. आपला शत्रू साला… दगाबाज साला… हरामी साला…
उमाकांत – (त्याला जवळ धरून) पाडून टाकू माणकीच्या पोटातला राजा! एक किक्- पुरे.
रमाकांत – साला आयडिया! पाडून टाकू. पाडून टाकू साला. पाडून टाकू. कमअस्सल अवलाद साली… चल ब्रदर… तू चल. राजाची अवलाद खतम करून टाकू साला. चल तू आधी. साला बोंबलू दे माणकीला नरडं फुटेपर्यंत, काय बोंबलेल साला! धमाल साला! पाडून टाकू. राजाला पोटात दडवून ठेवते माणकी! चल ब्रदर… चल.. (दोघे जाऊ लागतात झोकांड्या खात) कमअस्सल अवलाद साली… दगलबाजाची… पाडून टाकू… खतम करू…
उमाकांत – (त्याला बळेच थांबवतो) थांब. (थोडी पिऊन घेतो.) मला फुटबॉलची प्रॅक्टिस नाही. तुला किक् जमेल. (हसतो घशात) किक्!
रमाकांत – चल तू. अशी किक् मारतो की, राजा आभाळापर्यंत उडाला पाह्यजे साला… चल…
या नाटकाची भाषा, त्याचे संवाद, त्यातील शिव्या या सगळ्याबाबत तेव्हा बराच वाद झाला. सेन्सॉर बोर्डानेही त्यावर आक्षेप घेतले होते. शिवाय या नाटकातलं कुटुंब मध्यमवर्गीय. या वर्गातली माणसं या थराला जाऊ शकतात का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला. आणि तेंडुलकर कसे अगोचर आहेत, त्यांना कसं वाईटच दिसतं, सुचतं, यावरही अनेकांनी टीकाटिपणी केली. पण ते असो.
गिधाड हा समूहाने आपल्या शिकारीवर तुटून पडणारा पक्षी. तो सहसा सजीव किंवा प्रबळ प्राण्यांवर हल्ला करत नाही. आपली शिकार प्रेतसदृश होईपर्यंत वाट पाहतो. (‘नॅशनल जिओग्राफिक’च्या एका छायाचित्रकाराने ‘आफ्रिकेत कुपोषणाने मरू घातलेले एक मूल आणि त्याच्या मरणाची वाट पाहत असलेले गिधाड’ असे एक छायाचित्र काढलेले आहे. पुराव्यासाठी ते गुगलवर सर्च करून पाहता येईल.) आणि मग त्याच्यावर हल्ला करतो. तेंडुलकरांच्या या नाटकातली गिधाडे अगदी तशीच आहेत.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
३.
तेंडुलकरांचं हे नाटक तुकड्यातुकड्यांत गेल्या काही दिवसांपासून सारखं आठवत होतं. विशेषत: १४ जून २०२० रोजी सुशांतसिंग राजपूत या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्याने मुंबईत राहत्या घरी आत्महत्या केली, त्यानंतर सुरू झालेल्या तमाशापासून. आरोप-प्रत्यारोप, शंका-कुशंका, नवे नवे पुरावे आणि नवनवे खुलासे होत होत हा प्रकार ज्या थराला पोहचला आहे, त्यावरून तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक भारतातल्या काही वृत्तवाहिन्यांच्या पडद्यावर आणि महाराष्ट्र, बिहार या राज्यांत रोजच्या रोज घडताना दिसत आहे. सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या ही हत्या आहे, हे सिद्ध करण्यासाठी सीबीआय, मीडिया ट्रायल, यांच्यासह अनेक स्वयंघोषित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्या रोज नवनवीन धागेदोरे पुढे आणत आहेत. पुरावे सिद्ध करत आहेत. खुलासे मांडत आहेत. एकमेकांना खोडून काढत आहेत. ते पाहून तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’मधील रजनीनाथ, पपा, उमाकांत, रमाकांत, माणिक आणि रमा ही पात्रं नजरेसमोर तरळायला लागतात.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे १९८०पर्यंत भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे जवळपास साडेआठ कोटी इतकी गिधाडे होती. ती सगळीच्या सगळी काही तेंडुलकरांना आपल्या नाटकात घेता आली नाहीत. (ते जरा त्यांचं चुकलंच. पण नाटकाच्या शेवटी पक्षी गिधाडे कर्कशपणे ओरडतात, तो आवाज मात्र अनेक गिधाडांचा असतो!) पण सुशांतसिंग राजपूतच्या निमित्ताने सुरू झालेल्या नव्या ‘गिधाडे’ नाटकामध्ये मात्र त्यापेक्षा कितीतरी जास्त गिधाडे सामील झाली असावीत, असा एक ढोबळ अंदाज आहे. त्यातली बहुतांश तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’मधील रजनीनाथसारखी कान, डोळे उघडे ठेवून निश्चल आहेत, कुठल्याही हालचालीविना. उरलेली मात्र पपा, उमाकांत, रमाकांत, माणिक यांच्यासारखीच आहेत. अगदी सेम टू सेम. किंबहुना पपा, उमाकांत, रमाकांत, माणिक यांच्या कितीतरी कॉर्बन कॉप्या दिसताहेत या नव्या ‘गिधाडे’मध्ये.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
तेंडुलकरांचं नाटक अवघं दोन अंकी. ते फारतर दोनेक तासांत संपतं. हे नवे ‘गिधाडे’ नाटक मात्र महाकाव्यासारखं प्रदीर्घ दिसतंय. त्याचा इतक्यात शेवट होण्याची शक्यता नाही.
तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ची अनेकांनी समीक्षा केली आहे. अनेकांनी त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं विश्लेषण केलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा अन्वयार्थ लावला आहे. पण या नाटकाचे दिग्दर्शक डॉ. श्रीराम लागू यांचा अन्वयार्थ सर्वाधिक ग्राह्य वाटतो. एका परिसंवादात बोलताना लागू यांनी म्हटले आहे – “माझ्या मते ‘गिधाडे’ नाटकातील पात्रे ही सांस्कृतिक विकृतीने पछाडलेली आहेत. अशी पछाडलेली माणसे मला मनोविकृत वाटतच नाहीत. माझी मनोविकृतीची व्याख्या वेगळी आहे. सिझोफ्रेनिया, पॅराबोइया इ. झालेली माणसे ही खरी मनोविकृत असतात. हे जे ‘गिधाडे’ नाटकात दाखवले आहे, ती त्या समाजावरची कॉमेंट आहे. समाजातील माणसे अशा प्रकारे वागतात; कारण त्यांच्यावर संस्कार नसतात म्हणून ती अशी बेताल वागतात. समाज त्यांना संस्कार देऊ शकत नाही. म्हणून मला ‘गिधाडे’ नाटक मनोविकृतीचे वाटत नाही, तर ते सांस्कृतिक विकृतीचे वाटते.”
सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या किंवा कथित हत्येच्या निमित्ताने सुरू झालेले नवे ‘गिधाडे’ नाटकही भारतातल्या सांस्कृतिक विकृतीचेच नाटक होते, असा कुणी उद्या अन्वयार्थ लावला तर तोही कदाचित अप्रस्तुत ठरणार नाही!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment