जानेवारी महिन्यात भारतात करोनाचा पहिला रुग्ण सापडला. हो सापडलाच म्हणायचे, कारण जगभरात करोनाचे रुग्ण शोधून त्यांना एका कोपऱ्यात ठेवून करोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडायची यंत्रणा कार्यरत झाली होती. एक रुग्ण सापडल्यावर शोधाशोध सुरू झाली त्याच्या साथीदार रुग्णांची. जगभरात असे प्रयत्न चालू झाले. त्यात भारतालाही सामील होणे बांधील होते. त्यामुळेच भारतात रुग्ण दिसायला लागल्यानंतर मार्चमध्ये देशभर लॉकडाऊन जाहीर झाले. प्रत्येक भारतीय नागरीक बाह्या वर सारून करोनाची साखळी तोडण्यासाठी सरसावला. जवळपास प्रत्येक भारतीयाला करोना भारतात आला तर कहर होईल, याची जणू भीती वाटू लागली. राज्यकर्ते, सामाजिक संस्था, डॉक्टर सगळेच कामाला लागले. मार्च ते जून लॉकडाऊन संपले. जुलै गेला, ऑगस्ट उजाडला. वाटलं सगळं सुरळीत झालं आहे. पण तरी अजूनही गावं बंद होत आहेत... म्हणजे आपण आहोत तिथेच आहोत की काय, अशी शंका वाटते आहे.
लॉकडाऊन जाहीर झाले, तेव्हा बहुतेकांनी अनेक दिवसांनी मिळालेली सुट्टी म्हणूनच त्याकडे पाहिले. या उपायामुळे करोना आटोक्यात येईल, या भूमिकेतून सगळ्यांनी त्याचे स्वागतही केले. शिवाय कित्येक दिवसांनी पूर्णवेळ घरी राहता आल्याने सगळ्यांना त्याची मजा वाटली. सक्तीची असली तरी सुट्टी मिळाल्याचा आनंद गरीब, श्रीमंत सर्वांनी लुटला.
पण जसेजसे दिवस जाऊ लागले, तसतसे ज्यांचे पोट हातावर आहे त्यांची अडचण लक्षात आली. ज्यांना घरी बसून भागणार नाही, त्यांनी ‘किमान गावाकडची जमीन कसून मिळेल ते खाऊ, पण समाधानाने तरी राहू’ ही भूमिका स्वीकारली आणि जमेल त्या मार्गाने घर जवळ करण्याचा मार्ग पत्करला. त्यावरील उलटसुलट चर्चा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. काहींनी त्यांना चुकीचे ठरवले, काहींनी बरोबर. ज्याचा जसा चष्मा, तशी त्याची दृष्टी. ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, ते लोकही आता ऑनलाईन फोन, खेळ इत्यादीमुळे जवळ आले. कितीतरी दिवसांनी वेळ मिळाल्याचा आनंद झाला, पण हळूहळू सगळेच कंटाळले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
अनलॉक चालू झाले अन् चैतन्य सळसळले. आता करोनाचे काही का होईना, आम्हांला जीवन जगण्याचा आनंद घेता येईल म्हणून हळूहळू लोक तयार झाले. करोनामुळे घाबरून जाऊन माणसाने केलेल्या नियमावलीच्या कक्षेत का होईना जरा सुखाचे दिवस आले असे वाटू लागले; नव्हे जरा चांगलेच दिवस आले...
नंतर नंतर तर करोनाचा मृत्यूदर फार नाही, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही खूप जास्त आहे, हेदेखील लक्षात येऊ लागले. केवळ इतकेच नाही तर हा काही कोपऱ्यात गाठून ठेचून काढला की संपणारा विषाणू नाही, हेदेखील स्पष्ट झाले. पण माणूस कदाचित भित्रा असावा किंवा त्याचा निसर्गाचा अभ्यास कमी असावा... परिणामी ‘भय इथले संपत नाही’ या उक्तीप्रमाणे वातावरण बनू लागले. कारण एखाद्याला करोना झाला तर तो जणू समाजाचा गुन्हेगार आहे, अशा भूमिकेत त्याच्याकडे पाहण्याची शासन व समाज यांची नजर बनली. करोना झालाय असे कळल्यानंतर रुग्णाला आजारापेक्षाही नातेवाईकांपासून लांब राहणे, नवीन जागेत असणाऱ्या सोयी-गैरसोयींशी जुळवून घेणे, एखाद्या व्यक्तीला वेगळा काही आजार असेल-मदतीची गरज असेल तर त्याच्यासाठी असे एकटे मदतीशिवाय राहणे, अशा एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत होते.
व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात तशी प्रत्येकाची मानसिक अवस्था वेगवेगळी असते. करोना रुग्णांवर उपचार करताना त्याचा प्रसार होऊ नये, यासाठी जसा योग्य विचार झाला, तसा या दुसऱ्या बाजूचा झाला नाही. शासन व्यवस्थेत जे लोक आहेत, त्यांच्यासाठी रोजची आकडेवारीच जास्त महत्त्वाची ठरते. काहीही करून रुग्णांचा आकडा वाढू द्यायचा नाही, एवढेच त्यांचे टार्गेट. त्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र व लॉकडाऊन सोडून शासन पातळीवर दुसरा काही सोपा व शास्त्रीय तोडगा अजूनपर्यंत तरी सापडलेला नाही. त्यामुळे ‘स्टे होम, स्टे सेफ’ असे म्हणत आपण आज सहा महिन्यांनंतर लॉकडाऊनच्या पुढे सरकलेलो नाही.
याचा अर्थ लॉकडाऊन हे शास्त्रीय नाही असं नाही. पण लॉकडाऊनमुळे आकडेवारी नियंत्रणात येत नाही, हे सिद्ध होण्याइतका काळ नक्कीच झाला आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की, त्यातून फायद्यापेक्षा तोटाच जास्त होतो. जितके कडक नियम बनवले, तितके ते पाळणे अवघडही होऊ लागले.
माणूस हा काही एका जागी स्थिर राहणारा प्राणी नाही. त्याचे शरीर भलेही आपण बांधून ठेण्याचा प्रयत्न करू, पण मन कसे बांधावे? त्याहून महत्त्वाचे- पोट कसे बांधावे? अशा वेळी नकळत पळवाटा शोधणे हा देखील मानवी स्वभावाचाच एक पैलू. आणि तसेच होऊ लागले. प्रतिबंधित क्षेत्रातील लोक खाजगी व्यवसायात किंवा नोकरीत असतील तर अपरिहार्य असल्याने जिवावर उदार होऊन घाबरत, लपून-छपून बाहेर पडत होतेच. अनेकांकडे स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पर्याय नव्हता आणि शासनाकडेही वेगळे काही उपाय नव्हते.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘लॉकडाऊन’च्या काळातले दलितांवरील अत्याचार न्यायाची प्रतीक्षा करत आहेत...
..................................................................................................................................................................
जर मी आजारी पडलो तर मला कुठेतरी नेऊन ठेवतील, त्यापेक्षा तपासणीच नको, असा विचार करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे अगदी सुशिक्षित माणूससुद्धा विलगीकरणाला घाबरू लागला. त्यामुळे बरे वाटले नाही, तर गुपचूप घरी बसावे आणि बरे होण्याची वाट पाहावी, अशी सरळ सहज भूमिका लोकांना सोयीची वाटत गेली. परंतु अशा रीतीने जे आजारातून बरे झाले ते तरले, पण अनेकांच्या ते अंगावरही बेतले. अशा अंगावर बेतलेल्या कथा समाजमाध्यमांनी व प्रसारमाध्यमांनी बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे लोकांच्या मनात एकीकडे करोनाची भीती तर दुसरीकडे मला डांबून ठेवतील याची प्रचंड भीती निर्माण झाली.
डॉक्टर म्हणून आम्हाला तर वेगळेच टेन्शन! एखाद्या रुग्णावर दवाखान्यात भरती करून उपचार केले आणि दोन दिवसांनी तो करोनाचा रुग्ण ठरला तर दवाखाना बंद होणार की कसे, याबद्दल कुठल्याच प्रकारची नियमावली नसल्याने रुग्ण तपासावेत की नाहीत? तपासले तर कोणता रुग्ण पॉझिटिव्ह हे कसे ओळखावे? अशा कित्येक अडचणी होत्या-आहेत. प्रत्यक्षात प्रत्येक दवाखान्यात कोविडसाठी पलंग राखीव असल्याने असा रुग्ण जरी एखाद्या डॉक्टरकडे आला आणि त्यावर डॉक्टरांनी उपचार केले म्हणून दवाखाना बंद होण्याची भीती बाळगत दवाखाने चालू ठेवले जात असल्याने रुग्णांना योग्य तो न्याय मिळत नव्हता.
कोविडसदृश रुग्ण डॉक्टरांनी शासनाला कळवणे अपेक्षित होते. पण खाजगी रुग्णालयांवरचा ताण आधीच वाढला होता. ते सगळे सांभाळून एखादा रुग्ण शासकिय दवाखान्यात पाठवलाच तर तिथेही तशीच परिस्थिती असल्याने सगळ्यांची कोविड तपासणी होत नव्हती.
जगभरात करोना हा बरा होणारा आजार आहे, हे माहीत असतानाही समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमे यांच्यामुळे करोना म्हणजे मृत्यू अशीच आशंका मनात दृढ होत गेली. प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने बातम्या दिल्या, त्यावरून कोणताही पेशंट कुठे मरून पडला, त्या रुग्णाला इतर चार आजार असले तरी त्याचा मृत्यू करोनाने झाला, अशा किती तरी बातम्यांनी नाहक भीतीचे वातावरण तयार झाले. मला वाटते, एखादा रुग्ण करोनाचा होता आणि त्याचा मी उपचार करत होते, हे सांगण्याची मुभा डॉक्टरांनादेखील नव्हती.
कारण, प्रश्न हाच की मी जर पॉझिटिव्ह झाले तर नसत्या ठिकाणी किमान १० दिवस राहणे नशिबी येणार. निगेटिव्ह असले तरी मला स्वतःला करोना होण्याची, दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता. त्यामुळे येणारे मानसिक दडपण बाळगत काम करावे लागत आहे. त्यात ग्रामीण भागातील चित्र खऱ्या अर्थाने भिन्न असते. रोज पीपीई कीट घालून प्रॅक्टीस करणे हे आर्थिक, पर्यावरणीय व उपलब्धता या कुठल्याच पातळीवर परवडणारे नसते. शासकीय यंत्रणेवरील लोड कमी करणाऱ्या खाजगी रुग्णालयांसाठी वेगळी नियमावली व स्वायत्तता असणे गरजेचे आहे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : माझ्या डॉक्टर मित्राच्या मृत्यूला करोनापेक्षाही आपली निकृष्ट आरोग्य व्यवस्था जास्त जबाबदार आहे!
..................................................................................................................................................................
समारंभासाठी असणारी नियमावलीही सातत्याने बदलत गेली. विविध समारंभ सामाजिक भान ठेवून साजरे करू द्यायला हवेत. जसे लग्न समारंभ, बारसे, घरगुती सणवार, अंत्यसंस्कार इत्यादी. हे लिहिण्याचे कारण असे की, मध्यंतरी लग्नाला फक्त दहा माणसांनाच एकत्र येऊ देणार असा एक अध्यादेश निघाला होता. हास्यास्पद गोष्ट अशी की नवरा, नवरी, दोघांचे आई-वडील, भावंड, आणि एक ब्राह्मण एवढ्यातच दहा जण संपतात. नवरा-नवरीचा मामा, आत्या-काका यांच्याशिवायच लग्न कसे बरे लागावे? जर दहा लोकसुद्धा नको तर अगदी तीनच पुरे की! नवरा-नवरी आणि ब्राह्मण! करोनाच्या अगदी सुरुवातीच्या काळात साखळी तोडणे या संकल्पनेचा विचार करणे योग्यच होते. पण जसजसा कालावधी वाढू लागला, तसतसा वेगळा विचार करणे आवश्यक झाले आहे.
मला वाटते, आज सहा महिन्यांनी समाजात वावरताना मास्क अनिवार्य असावा. सामाजिक अंतर ठेवून लोकांना कामाची मुभा असावी. ज्यायोगे आजाराबद्दलची भीती हळूहळू कमी होईल. बरे होणाऱ्या लोकांनी समाजातील भीती कमी करण्यासाठी हातभार लावावा. करोनाची तपासणी करण्यासाठी जास्तीत जास्त खाजगी डॉक्टरांना प्रवृत्त करावे व परवानगी द्यावी. विशेषतः ग्रामीण भागात हे अत्यंत गरजेचे आहे. शहरी भागात कदाचित खाजगी सुविधा बऱ्यापैकी उपलब्ध आहेत.
औषधांची निर्मिती व पुरवठा हा देखील महत्त्वाचा विषय आहे. यावर शासकीय आरोग्य खात्याने विचार केला तर बरेच काही साध्य होऊ शकेल. खाजगी पद्धतीने उपचार चालू झाले तर औषधे व करोना तपासण्या यावर शासनाने लक्ष ठेवावे. शासनाकडे डॉक्टरांची, रक्त तपासणी केंद्रांची यादी असल्याने ते सहज शक्य आहे. औषध विक्रेत्यांवरही लक्ष ठेवता येईल.
आपण करोनावर मात करण्यासाठी ‘स्टे होम, स्टे सेफ’ अशी पद्धत सुरू केली होती. आताही तसेच करावे, फक्त जरा वेगळ्या पद्धतीने. ज्या व्यक्तीला करोनाची सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत किंवा अजिबात लक्षणे नाहीत, त्या रुग्णांनी ‘घरी राहावे, सुरक्षित राहावे’. घरात सामाजिक अंतर ठेवून राहण्याने असा रुग्ण घरच्या वातावरणात लवकर बरा होईल आणि त्याच्या घरातून बाहेर न पडण्याने त्याच्यापासून इतरांना करोना होण्याचे प्रमाण कमी होईल. विशेषतः वयस्कर लोकांना जेव्हा फक्त करोना रुग्ण म्हणून वेगळे ठेवण्याची वेळ येते, तेव्हा घरीच ठेवण्याने त्यांची तब्येत जास्त व्यवस्थित राहू शकेल, आणि त्यांची योग्य निगाही राखली जाईल. अशा लोकांचा शासनावरचा भारही कमी होईल.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या लोकांसाठी एक हेल्पलाईन नंबर असावा, ज्याद्वारे त्यांना काही त्रास असेल तर तत्काळ उपचार देता येतील व रुग्णालयात हलवता येईल. असे करताना लोक नियम पाळतील की नाही अशी भीती शासनाला वाटते. पण करोनाच्या बाबतीत ८० ते ८५ टक्के लोक लॉकडाऊन असो, मास्क असो, सामाजिक अंतर ठेवायचे असो, या सगळ्याचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. कारण माणूस कोणत्याही जाती-धर्माचा असला, कशालाही भीत नसला तरी मृत्यूला मात्र तो भितो. त्यामुळे जर एखादी व्यक्ती सौम्य आजारी असेल तरी कुठेतरी अनोळखी जागेत जेवढ्या वेळात बरी होईल, त्यापेक्षा निश्चित कमी वेळात घरी बरी होईल. शासनाने मात्र अशा आजारी लोकांसाठी तत्परतेने काम करणारी एक उत्तम टीम बनवावी, ज्यामुळे घरी असलेल्या रुग्णांना जर जास्त काही त्रास झाला तर तत्काळ उपचार देण्यासाठी अथवा रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
आज शासनाचा कितीतरी पैसा हा पॉझिटिव्ह रुग्णांच्या विलगीकरणावर उगाचच खर्च होतो आहे. त्याऐवजी हा खर्च रुग्णांच्या आपत्कालीन मदतीसाठी झाला तर तीव्र स्वरूपाचा आजार टाळता येईल. लोक आजारी पडल्यानंतर विलगीकरण्याच्या भीतीपोटी तपासणीला घाबरणार नाहीत. जास्तीत जास्त लोकांना आजार तीव्र होण्यापासून वाचवता येईल. त्यामुळे आजारावर मात करायची असेल तर लोकांना घरी राहू द्या, सुरक्षित राहू द्या.
..................................................................................................................................................................
लेखिका डॉ. शुभदा राठी-लोहिया या एम.डी. मेडिसन असून अंबाजोगाई येथे वैद्यकीय व्यवसाय करतात.
shubhada.lohiya@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment