अजूनकाही
ईश्वराच्या आधाराशिवाय माणूस उभा राहू शकेल का? नीतीमूल्यांची संरचना धर्माच्या पायावर उभी केली आहे, ती ज्ञानाच्या पायावर उभी करता येईल का? उत्क्रान्तीवाद मान्य केला, तर सर्वशक्तीमान ईश्वर दुबळा होतो. पण सामान्य जानात ईश्वर दुबळा झाला, तर कोणाला कसलाच धाक राहणार नाही. त्यामुळे नीतिमत्ता ढासळेल आणि नीतिमत्ता ढासळली, तर सर्व समाजव्यवस्थाच रसातळाला जाईल, अशी जाणकारांना भीती वाटते. पण नीतीमत्ता टिकवून ठेवण्यासाठी खरेच का ईश्वराची गरज आहे? मग आज बव्हंशी लोक ईश्वरभक्त असूनही एवढे अनाचार, एवढी अनागोंदी, एवढी अमानुषता का वाढली आहे? मग आपल्या सदसदविवेकबुद्धीचे काय करायचे?
आपण सर्व अनिश्चिततेच्या भोवऱ्यात जगत आहोत, हे स्वीकारणे गरजेचे आहे. अनेक प्रश्नांना आपल्याकडे उत्तरे नाहीत, हे जाणून विज्ञानात पुढचे पाऊल टाकले जाते. विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने अशी अनिश्चितता स्वीकारायची वृत्ती आधी अंगी बाणवली पाहिजे, तरच त्यांच्या हातून काहीतरी भरीव होऊ शकते. या अनिश्चिततेपासून सुटका नाही. त्यामुळे एकदा का अशी चिकित्सक वृत्ती विकसित झाली की, ती सर्वच न पटणाऱ्या गोष्टींना प्रश्न विचारू लागते. म्हणजे ज्याच्या अस्तित्वाचा कोणताही थेट पुरावा आजवर सापडलेला नाही, तो देव खरेच अस्तित्वात आहे का, असा प्रश्न स्वाभाविक ठरतो.
जे संशोधक देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्या अन् आस्तिक लोकांच्या देवावर विश्वास ठेवण्यात बराच फरक आहे... जसा ‘मला देव असावा असे वाटते’ अन् ‘देव आहेच’ या दोन वाक्यांत फरक आहे. देवाच्या अस्तित्वावर आस्तिक माणसाचा संपूर्ण अन् ठाम विश्वास असतो, तर संशोधकाचा त्याच्या अस्तित्वावर संपूर्ण विश्वास नसतो, समर्पण नसते, तर त्याला एक संशयाचा पदर असतो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेला तरुण जेव्हा विज्ञान शिकू लागतो, तेव्हा त्याचा देवावरचा विश्वास पहिल्याइतका अभंग अन् संपूर्ण राहूच शकत नाही, असे मला वाटते. अर्थात ही प्रक्रिया एका दिवसात घडत नाही. प्रथम त्याला मृत्यूनंतर आयुष्य आहे का? देवाच्या अन् संतांच्या चरित्रांमध्ये जे चमत्कार लिहिलेले आहेत, ते खरेच घडलेत का, असे प्रश्न पडायला सुरुवात होते अन् मग त्याच्या मनात अविश्वासाचा शिरकाव होऊन त्याचे प्रमाण वाढत जाते. तेव्हा त्याच्या वडिलांचा देव अन् त्याचा देव वेगळा व्हायला लागतो. माझ्या बाबतीत हेच घडले अन् अनेक तरुणांना असेच अनुभव येतात, हे मी त्या वयात जाणलेले आहे.
खरी गोष्ट अशी आहे की, आपला समाज स्थितिशील आहेत. गती त्याला मानवत नाही. शारिरीक आळसासोबतच वैचारिक आळसही त्याच्यात भिनला आहे. सखोल विचार करणे, चिकित्सा करणे, शंका उपस्थित करणे, प्रश्न विचारणे अशा वैचारिक ‘क्रियां’चा त्याला मनस्वी कंटाळा आहे. त्यामुळे पूर्वसूरींकडून आयत्या मिळालेल्या विचारधनावर तो गुजराण करतो. शिवाय या आळसाची सतत सोबत करत असते ते भय. पोथीत सांगितल्याप्रमाणे आचरण न केल्यास, नवस न फेडल्यास, ग्रहशांती न केल्यास देवाचा वा ग्रहांचा कोप होईल, ही भीती सतत पाठीशी असते. त्याचबरोबर विचारांना विवेकाची बैठक देण्यासाठी जे धाडस लागते, त्याचा पूर्ण अभाव आस्तिकांमध्ये असतो. ही एक वैचारिक दुर्बलताच आहे.
हे भय आणि दुर्बलता लपवण्यासाठी आस्तिक लोक (विशेषत: शिकलेले) त्यांच्याभोवती भारदस्त अशा मोठमोठ्या शब्दांचे जाल विणतात. रंगीबेरंगी शब्दतंतूंचे हे जाल दिसायला सुंदर दिसते आणि त्या आड भय आणि विचारदौर्बल्य ही वैगुण्ये झाकली जातात. मग मोहक शब्दांच्या कोंदणात बसवलेला मूल्यहीन असा ‘श्रद्धे’चा खडा त्यांना भावतो. त्यामुळे या शब्दांच्या भूलभुलैयाच्या आधाराने नास्तिकांवरही ते आस्तिकतेचा शिक्का मारण्याची जादू करून दाखवतात.
आस्तिकता आणि नास्तिकता या दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आपल्या आजूबाजूच्या सगळ्या समाजातील माणसे काही प्रमाणात आस्तिक तर काही प्रमाणात नास्तिक असतात, पण उघड उघडपणे आपण आस्तिक आहोत, असे सांगणाऱ्यांपेक्षा नास्तिक आहोत, असे सांगणाऱ्यांची संख्या कमी आहे. ज्याची धर्मग्रंथांवर, श्रुती-स्मृती, मंत्र-संहिता, उपनिषदांवर परमश्रद्धा आणि वेदाच्या दिव्यतेवर आस्था आहे, अशांना आस्तिक म्हणतात. तर ज्यांचा वेदावर विश्वास नाही, जे वैदिक सिद्धांतावर तर्क-वितर्क करतात किंवा धर्मग्रंथांची निंदा करतात ते नास्तिक आहेत. मात्र नास्तिकता म्हणजे एवढेच नव्हे. नास्तिकता म्हणजे विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी चिकित्सक दृष्टिकोन होय.
आधुनिक कालखंडात भारतातच नव्हे तर जगभरात विज्ञान आणि तंत्रज्ञान याद्वारे माणूस प्रगती करीत आहे. आपण ज्या विश्वात राहतो, त्या विश्वाच्या निर्मितीचे गूढ उकलण्यासाठी याच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार तो घेतो आहे. कारण धर्म आणि धार्मिक ग्रंथ यांमध्ये त्याला आपल्या विश्वनिर्मितीची उत्तरे सापडली नाहीत, म्हणून त्यांची नव्याने चिकित्सा तो करू पाहतो आहे. आपल्या तर्काला जे पटेल ते स्वीकारण्याकडे त्याचा कल वाढतो आहे. त्यातूनच तो नास्तिक होऊ पाहतो आहे. देव, धर्म यांची चिकित्सा करून त्यांच्या आधारे निर्माण झालेले दांभिक कर्मकांड यांना नाकारत आहे. जात, धर्म, पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणसाचा माणूस म्हणून विचार करण्याचा प्रयत्न आजचा माणूस करत आहे.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : निरीश्वरवादी असणे ही एक वास्तववादी आकांक्षा आहे. आणि त्यात धैर्य आहे; संतुलित, नैतिक असे बौद्धिक समाधान आहे.
..................................................................................................................................................................
आजची तरुण पिढी यात आघाडीवर असल्याचे चित्र दिसते आहे. धर्माने निर्माण केलेल्या चौकटी तोडून नास्तिक म्हणून जगण्यास कोणताही धोका नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे. अर्थात आजही अशा नास्तिकांची संख्या कमी आहे, पण ती दिवसेंदिवस वाढत जाईल यात शंका नाही. नास्तिक परिषदेच्या माध्यमातून माणसामाणसातील नास्तिकता वाढवण्यावर, नास्तिक या संकल्पनेविषयी असणारे गैरसमज दूर करण्यावर भर देण्याचा प्रयत्न होतांना दिसतो आहे. तो निश्चितच दखल घेण्याजोगा आहे.
भारतीय परंपरेमध्ये ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हा शब्द जरी नवा असला, तरी या पद्धतीची प्रक्रिया मात्र नवी नाही. ‘चार्वाक ऋषींची परंपरा’ ही एक वेदकालीन परंपरा आहे. चार्वाक त्या काळामध्ये विवेकवाद मांडत असत. या विवेकवादाचं आजच्या काळातलं आधुनिक स्वरूप म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद, असं आपल्याला म्हणता येईल. चार्वाकांचा विवेकवाद ‘प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान’ या स्वरूपाचा होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान याच्या आधारावर जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. जीवनात जे सत्य आपल्याला शोधायचं आहे, त्याचं उत्तर प्रत्यक्ष प्रमाण आणि त्याच्या आधारावर केलेले अनुमान यातूनच आपल्याला मिळणार आहे किंवा तसं सत्य आपल्याला शोधता येणार आहे, या पद्धतीची चार्वाकांची मांडणी होती.
आपल्यात अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रद्धा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सव या सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो. देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून, तसेच ‘हे केल्याने काही नुकसान तर होत नाही ना’ असे म्हणून आपल्यापैकी अनेक जण या गोष्टी करत असतात. त्यांना यात एक भीतीही वाटत असते... बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची. पण धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित् जास्तच भरेल. पण ही सारी ‘सायलेन्ट मेजॉरिटी’ आहे, म्हणून ती ‘मायनॉरिटी’ वाटते. ‘बाबावाक्यम् प्रमाणम्’ ही वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असल्यामुळे भारताच्या संदर्भात हे विधान म्हणजे जरा अतीच आशावादी ठरेल.
आधुनिक भौतिक प्रगतीला आध्यात्मिकहीन ठरवून या देशात त्याच भौतिक प्रगतीचा आधार घेत घेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून, भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, जपतपांतून आज आपण वापरतो, त्यातील साध्यातले साधे अवजारही तयार होत नाही की, आजारही बरे होत नाहीत. म्हणूनच कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो, ना कसलं यश येतं, पण तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपण आपला बिस्तरा पसरवत नेला आहे. कारण तर्कशुद्ध विचार करण्याचं वळण न लावणाऱ्या आपल्या शिक्षणपद्धतीतून बहुतांशी जे बौद्धिक विकलांग निघत रहातात, त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होत नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
भारतीय मानसिकता ही अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी आहे. सणवार-उत्सवातील कर्मकांड करणे, हा त्याचा विरंगुळा आहे. कारण माणसे पोकळीत राहू शकत नाहीत. तेव्हा त्यांना पर्याय दिला पाहिजे. माझ्या मते ते सुरुवात अगदी लहानपणापासून केली पाहिजे. मूल वाढवताना त्याला मोठ्या माणसांना जे धार्मिक संस्कार वाटतात, ते न करता त्याला खुल्या वातावरणात वाढवणे, वाचनाची गोडी लावणे, विचार करायला शिकवणे, प्रश्न विचारायला उद्युक्त करणे, निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे, अभ्यास म्हणजे निव्वळ चांगले मार्क असे न शिकवता अभ्यास हा प्रश्न समजून (to develop analytical mind) घेण्यासाठी करायला लावणे, आपल्या परिस्थितीची जाणीव करून देणे आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधून काढणारा वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवणे, अशा प्रकारे पालकत्वाची भूमिका जर प्रत्येक सुशिक्षित पालकाने पार पाडली तर पुढच्या पिढीत बऱ्याच अंधश्रद्धा कमी झालेल्या दिसतील. आणि माणूस निसर्गाच्या परिवर्तनशीलतेला अनुसरून स्वतः ही काळानुसार परिवर्तनशील बनेल. आणि ही एक दीर्घकाल चालणारी प्रक्रिया आहे, हे त्याला कळू लागेल.
..................................................................................................................................................................
जगदीश काबरे
jetjagdish@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment