अन्यथा प्रियांका गांधींची मुलेच अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून समोर यायचे आणि पक्षातील नेते ‘काँग्रेसचे नेतृत्व आता तरुण नेत्यांकडे गेले’ म्हणून गजर करायचे!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी
  • Tue , 25 August 2020
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress गांधी परिवार Gandhi family पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी प्रियांका गांधी

कुठल्याही देशात वा राजकीय व्यवस्थेत सक्षम विरोधी पक्ष अस्तित्वात असणे, हे त्या व्यवस्थेच्या जिवंतपणाचे लक्षण असते. भारताच्या राजकीय पटलावर ‘राष्ट्रीय’ म्हणावेत आणि मानावेत असे दोनच राजकीय पक्ष आहेत - एक भाजप आणि दुसरी काँग्रेस. बाकीचे राजकीय पक्ष हे तसे मर्यादितच मानावे लागतील, कारण त्यांची वाटचाल व्यक्तीकेंद्री वा फार फार तर कुटुंबकेंद्रीत राहिलेली आहे. भाजप आणि काँग्रेस हे ‘दिल्ली ते गल्ली’ अस्तित्व राखून असलेले पक्षसुद्धा या व्यक्तीकेंद्री राजकीय वाटचालीपासून सुटू शकलेले नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगलेला काँग्रेस पक्ष असो की, २०१४पासून सत्तेवर असलेला भाजप, त्यांना व्यक्तीकेंद्री राजकारण चुकलेले नाही.

केंद्रात सत्तेवर असलेले भाजपचे सरकार, हे नरेंद्र मोदी या एकाच वलयांकित नेत्याभोवती केंद्रित आहे, तर काँग्रेसच्या सत्ताकाळात ‘गांधी’ कटुंबीयांचा बोलबाला. अर्थात भाजपच्या कार्यपद्धतीनुसार या पक्षाचे नेतृत्व कोणी करावे याचा निर्णय त्यांची मातृसंस्था घेत असेल, मात्र काँग्रेसमध्ये नेतृत्वाला चॉईस नसतो. या पक्षाचे नेतृत्व ‘गांधी’ कुटुंबासाठी राखीव असते. नेतृत्वाचे हे राखीव असणे आता त्या पक्षाच्या अस्तित्वास धोकादायक ठरत असल्याचे अधिक तीव्रतेने स्पष्ट होते आहे. देशात सक्षम विरोधी पक्ष असणे आणि त्याचे नेतृत्व एखाद्या कुशल, जमिनीवर पाय असलेल्या नेत्याकडे असणे, ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यावश्यक बाब असते. केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे वर्तन प्रभावित करण्याची क्षमता विरोधी पक्षात निश्चितपणे असते.

आज केंद्रातील भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी खरोखरीच एका खमक्या विरोधी पक्षनेत्याची गरज आहे, हे भाजपचे समर्थकही मान्य करतील. भारतीय राजकारणातील सक्षम विरोधी पक्षाची आणि विरोधी पक्षनेत्याची कसर काँग्रेसनेच भरून काढायला हवी, ही भारतातील १३५ कोटी जनतेची भावना आहे. कारण देशाच्या प्रत्येक राज्यात आजमितीस या पक्षाचे फारसे संख्याबळ नसले तरी संघटनात्मक ढाचा अथवा एक चौकट नक्कीच आहे. राष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात असणारा काँग्रेस हा पक्ष भाजपला पर्याय देऊ शकतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

मात्र हा पक्षच आता नेतृत्वविहीन झाल्याचे अनुभवास येत आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राजीनामा दिला आणि तेव्हापासून सोनिया गांधी या हंगामी अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. पक्षाला प्रभावी नेतृत्व नाही, कार्यकर्त्यांसमोर दिशा नाही, इनमीन बोटावर मोजता येईल अशा राज्यांत सत्ता (आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यातली किती राज्ये हातात राहतील याची शाश्वती नाही), अशा अवस्थेत पक्ष दीर्घकाळ राहिल्यास पक्षाचे भवितव्य अंधःकारमय असेल या तळमळीतून ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी आपल्या भावना उघड केल्या, त्यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे.

पक्षाच्या या दुरवस्थेबाबत कार्यकर्त्यांनी तळमळ करून फायदा नाही, कारण त्यांची तळमळ ऐकणारा या ‘ग्रँड ओल्ड पार्टी’त आहेच कुठे? जिथे प्रादेशिक स्तरावरील सुभेदाराच्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची दखल घ्यायची बुद्धी शेवटच्या क्षणी होते, तिथे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी व्यथा मांडून काय उपयोग? काँग्रेसच्या जुन्याजाणत्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांच्या पक्षाला एक दमदार अध्यक्ष द्या अन संघटनात्मक पातळीवर काम करा, या प्रमुख मागण्या आणखी किती काळ रेंगाळत राहणार, हे आता पुढच्या सहा महिन्यांनी ठरणार आहे. कारण नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या आभासी बैठकीत हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढचा अध्यक्ष सहा महिन्यांनी ठरवू, असे आश्वासन दिले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडली आणि त्या राज्यातील पक्षाची सत्ताही गेली. सचिन पायलट यांचे बंड संख्याबळामुळे फसलेले असले तरी पक्षातील वजनदार नेते पक्ष सोडण्याचा सिलसिला संपलेला नाही. ही अवस्था पाहून अस्वस्थ झालेल्या गुलाम नबी आझाद, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदर हुडा, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर, जितीन प्रसाद, पी.जे.कुरियन, मनीष तिवारी, विवेक तनखा, राजेंद्र कौर भट्टला, राज बब्बर, रेणुका चौधरी, अजय सिंह, अरविंदर सिंग लव्हली, अखिलेश प्रकाश सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दिक्षित आदी नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ सक्रिय आणि जनतेत वावरणाऱ्या अध्यक्षाची गरज असल्याची मागणी केली आहे. पक्षाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करणारे हे पत्र त्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींना पाठवलेले आहे. या पत्रात ना सोनिया गांधींवर टीका आहे, ना राहुल गांधींवर.

वर्षानुवर्षे गांधी घराण्यातील सर्वोच्च नेत्याची ‘री’ ओढण्यात धन्यता मानणाऱ्या मंडळींत सहभागी असलेल्या वरील नेत्यांनाही आता केवळ सोनिया अथवा राहुल गांधी यांच्यात पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता राहिली नसल्याची जाणीव निर्माण झाली असेल तर चांगलीच बाब आहे. आजवर सत्तेचा मलिदा पचवलेल्या या ज्येष्ठ नेत्यांना आपल्या उमेदीची वर्षे संपून गेल्यावर (सत्तेची ऊब अनुभवल्यानंतर) झालेला साक्षात्कार स्वागतार्ह आहे.

यावर राहुल गांधी यांनी या नेत्यांच्या कृतीस ‘बंड व पक्षविरोधी कृती’ संबोधून त्यांनी ‘भाजपच्या सोयीची भूमिका’ घेतल्याचा आरोप केला आहे. या सर्व नेत्यांचे भाजपसोबत साटेलोटे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी आजारी असताना असे पत्र पाठवल्यामुळे राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

राहुल यांचा हा संताप आपल्या पक्षनिष्ठेवर शंका घेणारा असल्याचे नमूद करत कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी सफाई दिली आहे. तर अधीर रंजन चौधरी, अमरिंदर सिंग, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद, अश्विनीकुमार, डी.के. शिवकुमार, सिद्धराम्मया, बाळासाहेब थोरात, कुमारी सेलजा, के.एस. अळागिरी, एम. रामचंद्रन, अनिल चौधरी, गोविंद सिंग दसतोरा या नेत्यांनी गांधी कुटुंबाप्रती आपली निष्ठा व्यक्त करत या पत्र लिहिणाऱ्या नेत्यांच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. हे नेते गांधी कुटुंबियांशी निष्ठावंत तर पक्षाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करणारे नेते बंडखोर, असे चित्र निर्माण करण्यात आले. या पत्रातील ‘पूर्णवेळ’, ‘प्रभावी’, ‘दिसणारा’ आणि ‘सक्रिय’ या शब्दांवरून राहुल गांधी संतापले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेतृत्वपोकळी भरून काढण्याची मागणी करणारे नेते कसेही असोत, पण त्यांना पक्षाचे भवितव्य राहुल गांधींच्या हाती सुरक्षित नसल्याची जाणीव झाली, हेही नसे थोडके!

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ...आणि आणीबाणी लादण्यासारखे भयंकर पाऊल इंदिराजींनी उचलले!

..................................................................................................................................................................

मोदींसमोर राहुल गांधी हे पर्याय होऊ शकत नाहीत, हे समजण्यासाठी वा ही बाब सोनिया गांधी यांना कळवण्यासाठी या मंडळींनी एवढा वेळ का घेतला असेल, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. अर्थात निव्वळ पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व बदलून काँग्रेसला बरे दिवस येणार नाहीत, त्यासाठी पक्षाच्या सर्वच स्तरावर आमूलाग्र परिवर्तन करावे लागणार आहे.

संघटनात्मक बदलासोबतच पक्षाला निश्चित असे धोरण, विचारधारा, स्वतंत्र असा जाहीरनामा असे अनेक पैलू स्वीकारावे लागतील. सर्वसामावेशकतेच्या नावाखाली आजवर राबवलेले ‘सत्तेसाठी सर्व ते’ हे धोरण आता चालणार नाही. आर्थिक मुद्द्यांसह प्रत्येक मुद्यावर पक्षाला निश्चित धोरण, भूमिका असायला हवी, ती वेळोवेळी जनतेला दिसायलाही हवी. अल्पसंख्याक समुदायाची फसवणूक थांबवावी लागेल. त्याखेरीज ‘हिंदूविरोधी’ असल्याचा जनसामान्यांच्या मनातील समजही गैर असल्याचे सिद्ध करावे लागेल.  

पक्षाच्या ज्या कार्यपद्धतीबाबत वा संस्कृतीबाबत या नेत्यांनी तक्रार बोलून दाखवली आहे, ते सर्व याच कार्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक राहिलेले आहेत. त्यामुळेच कदाचित पक्षाच्या शिस्तीचे पालन करून, मर्यादेत राहूनच पक्षाच्या भवितव्यासाठी काही गोष्टी अनिवार्य असल्याचे सांगणाऱ्या (पत्राद्वारे)  या नेत्यांवर पक्षद्रोहाचा वा भाजपशी हातमिळवणी केल्याचा आरोप ठेवत असावेत.

बरे, गत काही दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाबाबत जी काही वक्तव्ये आणि विधाने करण्यात आली आहेत, त्यात प्रियांका आणि राहुल गांधी यांनी नेतृत्व गांधी कुटुंबाबाहेर देण्याबाबत सहमती व्यक्त केली असेही स्पष्ट करण्यात आलेले आहे. आता हीच मागणी पक्षातील ज्येष्ठ नेते करत असतील, तर त्यावरून राहुल गांधी वा त्यांच्या समर्थकांकडून आक्षेप का घेतला जातो आहे?  

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत हा गोंधळ सुरू असताना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्याच नावाचा आग्रह धरत आपले गांधी कुटुंबाप्रती असणारे प्रेम वा निष्ठेचे प्रदर्शन करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या आजच्या दुरवस्थेला कमी-अधिक हातभार लावणाऱ्या महाराष्ट्रातील या गांधी कुटुंबनिष्ठ नेत्यांना त्यांच्या जहागिऱ्या वाचाव्यात, असे वाटत असेल तर त्यात नवल ते काय?  

पुढच्या सहा महिन्यांनी राहुल गांधींचे हृदयपरिवर्तन होऊन ते पुन्हा नव्याने अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील का? ही शक्यता गृहीत धरल्यास त्या पक्षाचे व्हायचे ते होवो, अशी लोकभावना व्यक्त झाली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. केंद्रातील सत्ताधारी भाजप वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपवाद वगळता राहुल गांधींनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी ईच्छा काँग्रेसच्या समंजस कार्यकर्त्यांचीही असणार नाही.  

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा सोपवली जाईल, या शक्यतेबाबतही आशावाद ठेवायला हरकत नाही. गांधी कुटुंबातील सदस्य सोडून अन्य नेत्यांनी पक्षाचे नेतृत्व केलेले नाही, अशातली बाब नाही. गांधी कुटुंबाच्या आज्ञेबाहेर जाणार नाही, याची काळजी घेत आपल्या मर्जीतला व्यक्ती अध्यक्षपदी बसवून काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत लोकशाही असल्याचा देखावा आजवर करण्यात आलेला आहे.

त्यात पी.व्ही. नरसिंह रावांसारखे काही स्वतंत्र बाण्याचे नेतेही अध्यक्षपदी विराजमान राहिलेले आहेत. पंडित नेहरू आणि ढेबर यांच्यानंतर एक वर्ष पक्षाध्यक्षपद भूषवलेल्या इंदिरा गांधी त्यांच्या प्रभुत्वाच्या काळात सलग सहा वर्षे अध्यक्षपदी होत्या. त्यांच्यानंतर हे पद राजीव गांधी यांनी सहा वर्षे भूषवले. राजीव गांधी यांच्यानंतर नरसिंह राव सहा वर्षे आणि सीताराम केसरींची दोन वर्षे सोडली (१९९६-१९९८) तर त्यानंतर गांधी कुटुंबीयांबाहेर हे पद गेलेले नाही. त्यामुळे यानंतर तरी काँग्रेसचे अध्यक्षपद गांधी कुटुंबाबाहेर जाईल, अशी आशा व्यक्त करूयात.  

अन्यथा सहा महिन्यांनी प्रियांका गांधींची मुलेच अध्यक्षपदाचे दावेदार म्हणून समोर यायचे आणि पक्षातील नेते ‘काँग्रेसचे नेतृत्व आता तरुण नेत्यांकडे गेले’ म्हणून गजर करायचे!

..................................................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Wed , 26 August 2020

गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा सोपवली जाईल, या शक्यतेबाबतही आशावाद ठेवायला हरकत नाही.>>> या वाक्यावरून असे दिसते की लेखकाने गांधी कुटुंबाला ओळखलेच नाही. राहुल गांधी स्वत:च्या हुकमती खाली मोदीनविरुद्ध आधाररहित भाषणे देत फिरतो कारण त्याला सोनियाचा पाठींबा आहे. ती असे पर्यंत दूसरा कोणीही कोंग्रेसचा अध्यक्ष होणार नाहीआणी ती होऊ देणार नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......