ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे ‘पायपीट समाजवादासाठी’ हे आत्मकथन लवकरच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
“दि प्रेसिडेंट हॅज डिक्लेअर्ड इमर्जन्सी. बट देअर इज नथिंग टू पॅनिक.’’ (‘राष्ट्रपतींनी आणीबाणी घोषित केली आहे. पण घाबरून जाण्याचे कारण नाही.’)
एका सहप्रवाशाकडील रेडिओवर पंतप्रधान इंदिरा गांधींचा आवाज ऐकू आला. तो दिवस होता, २६ जून १९७५
पटना जंक्शन स्टेशनच्या रिटायरिंगमध्ये आदल्या दिवशी आम्ही पोहोचलो होतो. जहानाबाद तहसिलातील एका खेड्यात हिंद खेत मजदूर सभेच्या अधिवेशनासाठी एसेम अण्णा, सुरेंद्र मोहन, बा. न. राजहंस व मी गेलो होतो. अधिवेशन संपवताना अण्णा म्हणाले की, ‘आज (२५ जून रोजी) दिल्लीत जे.पीं.ची सभा होणार असे पेपरात आले आहे. रात्री पटण्याला पोहोचतील. आपण त्यांना भेटायला जाऊ.’ तेथील कार्यकर्त्यांना निरोप देण्यासाठी राजहंसनी एसटीडी बूथवरून फोनाफोनी केली होती. पण व्यर्थ. रात्री नऊला पोहोचल्यावर थोडेसे खाऊन वरच्या मजल्यावरील रिटायरिंग डॉर्मिटरीमध्ये आम्ही झोपलो. सकाळी पाचला मी खाली जाऊन चहा घेतला. पेपरची चौकशी केली, तर “नहीं आये,’’ असे उत्तर मिळाले. परत वर आलो तर इंदिराजींचा आवाज कानी पडला. अण्णांना उठवून सांगितले. इंग्रजी बातम्यांची वेळ संपून हिंदीत परत इंदिराजींचा आवाज - “राष्ट्रपतीने आपात् स्थिती की घोषणा की है. घबराने की कोई बात नहीं... चंद फासिवादी ताकतोंने सरकार उखाड फेकने तथा देशमें उधम मचाने की साजिश रची थी. उनका पर्दाफाश हो गया है...’’
“अखेर बाईंनी लोकशाहीच्या गळ्याला नख लावले तर!’’ अण्णा उद्गारले. पटण्याच्या आपल्या साथींशी संपर्क होतो का, म्हणून राजहंस व सुरेंद्रजी प्रयत्न करू लागले. तास दीड तासाने ज्येष्ठ नेते रामानंद तिवारी तीन-चार जणांसह येऊन पोहोचले. “दिल्ली में कल शाम रामलीला मैदान में उनकी सभा हुई. रातही को यहां पहुंचने का कार्यक्रम था. लेकिन कोई खबर नहीं मिल रही हैं. अखबार भी बंद हैं.’’ ते म्हणाले. “चलो, शहर जायेंगे.’’
वृत्तपत्रेसुद्धा निघू दिली नाही, अशी जबरदस्त कारवाई सरकारने केली होती. विरोधी कार्यकर्त्यांची धरपकड चालू असेल. आपण इथे अडकून पडू नये, सुरेंद्रजींनीही इथे न थांबता दिल्लीला जावे असे मी सुचवले. अण्णा व राजहंसना घेऊन तिवारीजी गावात गेले.
१९७१ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिराजींच्या विरोधात निवडणूक लढवलेले सोशलिस्ट पार्टीचे नेते राजनारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली होती. तिचा निकाल १२ जून १९७५ रोजी लागला. बाईंनी आपला ‘निवडणूक प्रतिनिधी’ (इलेक्शन एजंट) म्हणून भारत सरकारच्या नोकरीत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला नेमले होते. ‘पिपल्स रिप्रेझेंटेशन अॅक्ट, १९५०’ अन्वये तसे करणे बेकायदेशीर होते. शिवाय इंदिराजींना मत द्यावे यासाठी ‘त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला ब्लॅकेंटे फुकट वाटली’ असे काही मतदारांनी न्यायालयासमोर सांगितले. तसे करणे हाही कायद्यानुसार गैरप्रकार (करप्ट प्रॅक्टिस) होता. अशा कारणांवरून न्यायालयाने त्यांची निवडणूक रद्द ठरवली होती. त्यामुळे त्यांना लोकसभेत मतदानात भाग घेता येणार नाही व खासदारकीचा किंवा पंतप्रधानपदाचा पगार घेता येणार नाही, असेही या निकालपत्रात म्हटले होते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
गैरप्रकार केल्याच्या कारणावरून त्यांची निवडणूक रद्द ठरवली गेल्याने पंतप्रधानपदी राहण्याचा कायदेशीर व नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी, वृत्तपत्रांनी, विचारवंतांनी व नागरिकांनी केली. २५ जूनच्या संध्याकाळी झालेल्या जाहीर सभेत जयप्रकाशांनीही मागणी केली. जर इंदिराजींनीही राजीनामा दिला नाही, तर तो मागण्यासाठी २९ जून पासून देशभर आंदोलन सुरू केले जाईल असेही जे.पीं.नी जाहीर केले.
औरंगाबादच्या दैनिक ‘मराठवाडा’च्या दिवाळी अंकात अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल द्यावा व त्यावर चर्चा घडवावी, असे संपादक अनंत भालेराव यांनी ठरवले होते. त्या निकालाची प्रत मला मिळवायला सांगितली होती. म्हणून पटण्याहून निघून मी दुपारी दीड दोनला अलाहाबादला पोहोचलो. वकिलांकडे गेलो. वाटेत एका चौकात अश्रुधुराची नळकांडी पडली होती. चौकशी केल्यावर कळले की, जनेश्वर मिश्र (ज्यांना ‘छोटे लोहिया’ म्हटले जायचे व जे त्या वेळी लोकसभा सदस्य होते) यांना अटक करायला पोलीस गेले असता, तेथे मोठ्या जमावाने पोलिसांना विरोध केला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर सोडला होता. वकीलसाहेबांशी बोलून मी दिल्लीला गेलो. रफी मार्गावरील विठ्ठलभाई पटेल भवनमध्ये प्रा. मधु दंडवतेंची खोली होती. रात्री तेथे मुक्काम केला.
विरोधकांची धरपकड व सेन्सॉरशिप
सकाळी पार्टी कार्यालयात रामकिशनची भेट झाली. दंडवते व अडवानी संसदीय समितीच्या बैठकीसाठी बंगलोरला गेले होते, तेथेच त्यांना अटक झाली. दिल्लीत जे. पी., मोरारजी देसाई व अन्य काही जणांना अटक झालीय, पण कुठे ठेवले ते पोलीस सांगत नव्हते. मधु लिमये, शरद यादव, रघु ठाकूर यांना रायपूरला अटक झाली. जे.पीं.च्या नवनिर्माण आंदोलनात सहभागी असलेल्या समाजवादी, जनसंघ, संघटना काँग्रेस, लोकदल या पक्षांच्या तसेच सर्वोदयाच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. ‘सिद्धराज ढढ्ढा, ठाकूरदास बंग या ज्येष्ठ नेत्यांनाही स्थानबंद केले आहे,’ असे कुणीतरी म्हटले. २५ जूनला रात्री वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली. त्यांच्या कार्यालयात सरकारी अधिकारी जाऊन बसले. त्यांनी पास केल्याशिवाय कोणताही मजकूर छापू नका असा आदेश देण्यात आला. दिल्लीतले नामांकित दैनिक ‘स्टेट्समन’ याची व इतरही काही दैनिकांची वीज काही काळ तोडण्यात आली. ‘स्टेट्समन’चा अंक उशिरा निघाला. त्यांनी अग्रलेखाची जागा कोरी ठेवली होती.
पक्षाचे सरचिटणीस व ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेम भसीन लांब राहत होते. रामकिशनसोबत त्यांच्या घरी गेलो. आणीबाणीच्या रूपाने देशावर हुकूमशाही राजवट लादली गेली आहे. लोकशाहीवादी पक्ष, श्रमिक संघटनांना काम करता येणार नाही, असे दिसू लागले. या हुकूमशाहीला विरोध केला पाहिजे. कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यासाठी शांततेच्या मार्गाने काम करण्याचे ठरले. माहिती पाठवणे, गुप्तपत्रके छापून किंवा हाताने लिहून पाठवणे, एकेकाशी संपर्क साधणे, सगळ्यांचे मनोबल टिकवणे, परिस्थिती उलगडत जाईल तसे तसे उपक्रम करण्याचे ठरले. “तू परिपत्रक तयार कर, रामकिशन सर्वांना पाठवण्याची व्यवस्था करील,’’ असे ते म्हणाले. मी त्याप्रमाणे इंग्रजी व हिंदी परिपत्रक करून दिले.
खोलीवर परतल्यावर मुंबई, पुणे, बार्शीला फोन केले. पुण्यात महापौरपदी असलेल्या भाई वैद्यांनी शनिवारवाड्यावर निषेधाची सभा घेतली. सभेनंतर त्यांना कार्यकर्त्यांसह येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. ‘मुंबईतून जॉर्ज गुप्त मार्गाने पसार झाले आहेत. मृणालताईंनी व मी सावध राहावे’, असा बापू काळदातेंचा निरोप आला. चार-पाच दिवसांनी पुण्यात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची बैठक ठरवून तसे निरोप दिले. मुंबईत नेहमीच्या ठिकाणी न जाता राजकारणात नसलेल्या मित्राकडे उतरलो. दोन दिवसांनी पुण्याला गेलो. बैठकीच्या दिवशी वीणेलाही पुण्याला यायला सांगितले. मी वेषांतर केले तरी उंचीमुळे ओळखला जाईन, म्हणून सोलापूर जिल्ह्यात जायचे नाही असे ठरवले.
२५-२६ जूनच्या रात्री रामलीला मैदानावरील सभा संपवून जे.पी. मिंटो रोडवरील गांधी शांती प्रतिष्ठानच्या अतिथीगृहात परतले होते. रात्रीची गाडी चुकल्याने सकाळच्या गाडीने पटण्याला जायचे ठरले. रात्री दोन वाजता पोलीस आले. जे.पीं.ना झोपेतून उठवून खास विमानाने चंदीगढला डाक बंगल्यात नेऊन ठेवले. मोरारजीभाईना हरयाणातील सूरजकुंड येथील डाक बंगल्यात ठेवले. दंडवते, अडवाणी, मधु लिमये आदींना पोलिसांनी नेऊन लांब लांबच्या एकांत जागी ठेवले ते मिसा कायद्याखाली- हे खूप उशिरा कार्यकर्त्यांना कळले. गावोगावच्या पोलिसांनी समाजवादी, जनसंघ, संघटना काँग्रेस लोकदल आदींच्या कार्यकर्त्यांची नावे शोधून शोधून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावे मिसाखाली आदेश काढले. तो घेऊन पोलीस त्या घरी गेल्यावर काही ठिकाणी कळले की, ते गृहस्थ कधीच हे जग सोडून गेले आहेत. तरी त्यांच्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेला धोका आहे, असे जिल्हाधिकाऱ्यापासून ते विविध राज्यांच्या केंद्राच्या गृहसचिवांना वाटले!
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
१९७१च्या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’ची घोषणा दिल्याबद्दल लोकांनी इंदिराजींना डोक्यावर घेतले व नंतरच्या बांगला देश युद्धातील यशाबद्दल मधु लिमयेंसारख्या कट्टर विरोधकानेसुद्धा “दीड हजार वर्षांनंतर भारताला एवढा मोठा विजय त्यांनी मिळवून दिला,’’ असे प्रशंसोद्गार काढले होते. त्या इंदिराबाईंनी इतकी अन्यायी पावले उचलली ही नामुष्कीची गोष्ट आहे. अनेक जाणकार पंडितांनी इंदिराजींना जर्मन हुकूमशहा हिटलर व सोव्हिएट युनियनचा सर्वंकष सत्ताधारी स्टॅलिनच्या पंक्तीला नेऊन बसवले ते त्यामुळेच.
मिसाखाली देशभरातील सुमारे ३७ हजार कार्यकर्त्यांना व काही पत्रकारांना तुरुंगात बेमुदत विनाचौकशी डांबण्यात आले होते, असा अंदाज आहे.
आणीबाणी विरुद्ध देशभर प्रतिकार आंदोलन चालवण्यासाठी दिल्लीत लोकसंघर्ष समिती स्थापन झाली. एसेम पटण्याहून पुण्याला परतले होते. जे.पी., दंडवते आदींना तुरुंगात डांबले आहे, ही बातमी एव्हाना विविध कामगार संघटनांपर्यंत पोहोचली होती. जॉर्ज, मृणालताई यांना उघडपणे वावरता येत नाही, हेही लोकांना कळले होते. पण मुंबई बंद करणारे हजारो-लाखो कामगार वा लाटणे मोर्चात सहभागी होणाऱ्या मध्यमवर्गीय गृहिणींपासून कोळणी-माळणी-कुणीच सरकारविरुद्ध निषेधाचा शब्द काढायला तयार नव्हते. खरे तर २६ जूनला मुंबईत हुतात्मा चौकात आचार्य कुपलानी, मृणालताई आदींनी सभा घेतली; पण त्याची बातमी आली नाही. सरकारी दडपशाहीमुळे सर्वत्र भीतीचे साम्राज्य पसरले आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लोकशाहीच्या पुनरुज्जीवनाची चळवळ कशी चालवायची यावर चर्चा झाली. ठिकठिकाणच्या कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवण्यासाठी त्यांना मधूनमधून पत्रे-पत्रके पाठवावीत. ज्यांची सत्याग्रह करायची -म्हणजे तुरुंगवास भोगायची तयारी आहे अशांची नोंदणी करावी. मृणालताईंनी व मी भूमिगत राहून अशा प्रकारची कामे करणारी यंत्रणा उभारून चालवावी असे ठरले. त्यानुसार आम्ही कामाला लागलो.
दुसऱ्या दिवशी बाबा आढावनी मला एक-दोन जणांना भेटायला स्कूटरवरून नेले, तेव्हाच मनात पाल चुकचुकत होती. संध्याकाळी दिवेलागणीला विमलताईंच्या घरी (म्हणजे नानासाहेबांच्या तळमजल्यावर) पोहोचलो. आतल्या खोलीत चहा घेत बसलो होतो. दाराची बेल वाजली. तिकडे जाऊन विमलताईंनी दरवाजा उघडला. आत येऊन मला हळूच म्हणाल्या, ‘या मागच्या दाराने तुम्ही निघून जा.’ मी उठलो. चप्पल तिकडे होती. ती न घेताच बाहेर पडलो. सुदैवाने पैशाचे पाकीट खिशात होते. लांब एका ओळखीच्या घरी जाऊन थांबलो. हुश्श करून घाम पुसला. दोन-तीन दिवसांनी विमलताईंना फोन करून मी कुठे आहे ते सांगितले. त्या सावकाशीने भेटायला आल्या. म्हणाल्या, ‘ते तिघे जण आयबीचे होते. मी त्यांना पाणी दिले. ते म्हणाले, ‘सुराणांना बोलवा ना. आम्ही त्यांना तुमच्या घरात शिरताना पाहिले आहे.’ मी म्हटले, ‘ते नाही बुवा इकडे आले.’’ त्यांनी सगळे घर शोधले. हिरमुसले होऊन बाहेर पडले.
२ ऑक्टोबरला देशात अनेक ठिकाणी आणीबाणी विरोधक मंडळींनी आपल्या छातीवर ‘निर्भय बनो’चे बिल्ले लावले. शहाण्या पोलिसांची पंचाईत झाली. मंत्रिगण ज्यांच्या पुतळ्यासमोर फुले वाहतात, त्यांचाच फोटो असलेले बिल्ले विरोधकांच्या छातीवर लटकलेले आहेत. मग त्यांना अडवावे-पकडावे कसे? गांधी जयंतीच्या समारंभातून त्यांना ‘चलो, हटो, हटो’ एवढे ते म्हणायचे. काही राज्यांतले नवे रिक्रूट म. गांधींना ओळखत नव्हते. हे काहीतरी सरकारविरोधी आहे, असे मानून काही जणांनी ते बिल्ले ओढून काढून पायदळी तुडवले. त्याच्या निषेधार्थ घोषणा देणारांना ताबडतोब गजाआड करण्यात आले.
पुढे अहमदाबादेत नागरी हक्क संरक्षण परिषद झाली. त्यावेळी पुरेशी सावधगिरी बाळगत मृणालताई व मी जॉर्ज फर्नांडिसला भेटायला गेलो.
“आपली पत्रके बहुतेकांना मिळत असावीत. युरोपातील वर्तमानपत्रात इंदिराजींवर सडकून टीका होते आहे. पण त्याचा कितपत परिणाम होणार? देशातच आपण काहीतरी केले पाहिजे.’’ असं जॉर्ज म्हणाले.
“मग करावे तरी काय?’’ ताई.
“महाराणीला न् युवराजाला चांगली अद्दल घडेल असे काहीतरी केले पाहिजे.’’ जॉर्ज.
“त्याचा तरी काय उपयोग होणार आहे? आपण काही लष्करी अधिकाऱ्यांना हाताशी धरणार आहोत का? ते असा आततायी मार्ग पसंत करतील का? आणि देशात लोकशाही व्यवस्था टिकवण्याला ते उपयोगी पडेल काय? शांततेचा मार्ग सोडून चळवळ करणे कदापि समर्थनीय ठरणार नाही. भारतीय जनतेला ते आवडेल असे मला वाटत नाही.’’ मी म्हणालो.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
“एसेम, नानासाहेब यांचेही असेच मत आहे’’, असे सांगून मृणालताई पुढे म्हणाल्या, “ध्येयनिष्ठ, कार्यक्षम व झोकून देणाऱ्या कार्यकर्त्यांची साखळी उभी झाल्याशिवाय राजकारणात प्रभावी हस्तक्षेप करता येत नाही, असा अनेक देशांचा अनुभव आहे. शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने जायला जास्त दमदारपणा दाखवावा लागणार आहे. आपण उतावळेपणा करून उपयोग नाही. लोकांचा विवेक आज ना उद्या जागा होईल. आपण संघटनेची ताकद उभी केली तर लोकांना धीर येईल. त्यांची हिंमत वाढेल.’’
त्यावर जॉर्ज काही बोलले नाहीत. चहा घेऊन आम्ही उठलो. बाहेर येताना ताई म्हणाल्या. “आपले म्हणणे त्याला काही पटलेलं दिसत नाही. काहीतरी वेगळे करायचे बेत चाललेले असणार.’’
दुसऱ्या दिवशी आम्ही अमदाबाद-हावडाने निघालो. ताईंचा मुक्काम अकोल्याला योजला होता. मी पुढे नागपूरला जाणार होतो. त्या मार्गावर आम्हाला ओळखणारे कुणी भेटायची शक्यता नव्हती. आणीबाणी लादण्यासारखे भयंकर पाऊल इंदिराजींनी का उचलले, यावर आम्ही बोलत होतो. गेल्या चार-पाच वर्षांतील घटना, घडामोडी नजरेसमोरून सरकत होत्या.
..................................................................................................................................................................
‘पायपीट समाजवादासाठी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5220/Paaypeet-Samajwadasathi
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment