अजूनकाही
“कुवेतमधून माझा भाऊ गोव्यात कालच आलाय गणपतीला. तू पण येतोस का टोंका-मार्सेलला माझ्या घरी गणेशोत्सवाला?”
‘नवहिंद टाइम्स’चा छायाचित्रकार संदीप नाईकने मला विचारले. फार काही विचार न करता मी लगेच होकार दिला. गणेश चतुर्थीला ‘नवहिंद टाइम्स’ आणि गोव्यातील सर्व दैनिकांना सुट्टी असणार होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्या सुट्टीच्या दिवशी संपूर्ण गोव्यात सर्व व्यवहार पूर्ण बंद राहणार, याची मला कल्पना होती. सडाफटिंग असल्याने माझा दुसरा काहीच कार्यक्रम नव्हता.
मला वाटतं, १९८५च्या आसपासची ही घटना असावी. चतुर्थीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही टोंका-मार्सेलला बसने पोहोचलो. गोव्यातील कुठल्याही गावात असते, तसेच संदीपचे घर होते. कौलारू घराच्या आसपास पूर्ण हिरवाई. संदीपच्या वडिलांनी अगदी मनमोकळे हसत आमचे स्वागत केले. संदीपचे वडील चंद्रहास नाईक हे स्वातंत्र्यसैनिक होते. गोव्याच्या स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी लाठीमार खाल्ला होता, काही दिवस तुरुंगवासही अनुभवला होता. ते पोर्तुगीज सोल्जरांची नजर चुकवून स्वातंत्र्यचळवळीची पत्रके आणि इतर काही साहित्याची कशी वाहतूक करत असत, याचे ते वर्णन करत असत. एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून गोवा राज्य सरकारची आणि केंद्राचीही त्यांना पेन्शन मिळत होती.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
पारतंत्र्यातील ब्रिटिश राजवटीचे स्वातंत्र्यसैनिकांबाबतचे धोरण आणि पोर्तुगीज राजवटीचे गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांविषयीचे धोरण यात जमीन-अस्मानाचा फरक होता. गोव्यातली लष्कराची दडपशाही आणि मारपीट याचा १९५०च्या दशकातील गोवामुक्ती चळवळीत सेनापती बापट, समाजवादी नेते ना. ग. गोरे, शिरुभाऊ लिमये वगैरे महाराष्ट्र आणि भारतातील इतर राज्यांतील लोकांनी अत्याचाराचा अनुभव घेतला होता. ही पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे संदीपच्या अल्पशिक्षित वडिलांची छोटीशी का होईना, पण अभिमानास्पद कृती होती, याची मला जाणीव होती.
स्वातंत्र्यसैनिक असले तरी त्यांचे वय फार नव्हते, ते फार तर साठ-पासष्ट वयाचे असावेत. कारण भारतातील स्वातंत्र्यसंग्रामाच्या तुलनेने गोव्याची स्वातंत्र्यचळवळ तशी फार अलीकडची. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोर्तुगीज अंमलाखालील गोवा, दमण आणि दीवमध्ये भारतीय सैन्य पाठवून १८ आणि १९ डिसेंबर १९६१ या दोन दिवसांत हा प्रदेश भारतीय संघराज्यात सामिल केला. त्यामुळे माध्यमिक शिक्षणासाठी मी गोव्यात आलो, तेव्हा येथे साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीच्या अनेक खुणा अस्तित्वात होत्या. संदीपच्या वडलांनी आपल्या नोकरीतून आता निवृत्ती घेतली होती.
संदीपच्या वडिलांशी या गप्पाटप्पा होत असताना घरात सजावटीची लगबग वाढत होती. संदीपने आणि त्याच्या भावाने सजावटीचे म्हणजे मखराचे आणि इतर साहित्य मार्सेलच्या बाजारातून आधीच आणून ठेवले होते. संदीपची आई स्वयंपाकघरात राबत होती आणि शेजारच्या खोलीत आम्ही सर्वजण सजावटीला लागलो होतो. मला नक्की आठवते- गणपतीच्या आगमनाआधी मध्यरात्रीपर्यंत आम्ही सजावटीच्या कामात दंग होतो. सकाळी गणपती बाप्पांना आणण्याआधी सगळे काही व्यवस्थित झाले आहे, याची खातरजमा करून मगच आम्ही सर्व जण झोपायला गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आठच्या दरम्यान तयारी करून आम्ही सर्वजण गावातल्याच एका दुकानात बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी गेलो. बहुतेक सर्वांनी डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, एकदोन जणांच्या हातांत टाळ होते. रिमझिम पावसात ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत मूर्ती घेऊन घरी आलो. घरातल्याच कुणीतरी पूजा करून मूर्तीची प्रतिष्ठापना केली, त्यानंतर आम्ही आरतीत भाग घेतला. त्या दिवशी परत दुपारी आणि संध्याकाळीही आरती झाली. माझ्या लहानपणी अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुरात जिल्हा परिषदेच्या जीवन शिक्षण मंदिर शाळेत दर गुरुवारी दत्ताची पूजा व्हायची, तेव्हा गुरु दत्ताबरोबरच इतरही आरत्या व्हायच्या. त्यामुळे बहुतेक सर्व आरत्या मला तोंडपाठ व्हायच्या. नेमकी केव्हा स्वतःभोवती गोलगोल प्रदक्षिणा घ्यायची याचीही माहिती होतीच.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘अ बर्निंग’ : असहाय, निरपराध, गरीब, मुसलमान तरुणीची करुण, टोकदार शोकांतिका
..................................................................................................................................................................
बहुसंख्य हिंदू समाजात राहणारे आमचे कुटुंब धार्मिक ख्रिस्ती असले तरी माझ्या आईवडलांनी आम्हा मुलांना शाळेत व हिंदू मित्रांच्या घरी पूजा किंवा आरतीमध्ये सहभागी होण्यापासून, तिथला प्रसाद खाण्यापासून वा कपाळावर गुलाल लावण्यापासून कधी रोखले नव्हते. माझ्या सहभागामुळे ना त्यांचा कधी धर्म भ्रष्ट झाला, ना माझा धर्म!
या मनमोकळ्या भावनेमुळेच औरंगाबादला ‘लोकमत टाइम्स’मध्ये मी असताना आमचा ‘क्राईम रिपोर्टर’ मुस्तफा आलम याच्या मोटारसायकलवर बसून अनेकदा शुक्रवारी दुपारी मशिदीत नमाज पढायला मी त्याच्याबरोबर जायचो. त्याच्याबरोबर तिथल्या वाहत्या नळावर हातपाय धुऊन डोक्यावर रुमाल लावून त्याच्याबरोबर नमाजाला बसायचो. त्या एक वर्षभराच्या काळात त्या मशिदीतील इतरांना मी मुसलमान नाही, याची कधी जाणीवही झाली नाही, तसे कळाले असते तरी काही फरकही पडला नसता. असो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आरती झाल्यानंतर लगेचच गणपती बाप्पांना निरोप देण्याची तयारी सुरू झाली. याचे कारण म्हणजे गोव्यात बहुतेक घरांत दीड दिवसांचा गणपती बसवतात. काही घरांत तीन दिवसांचा गणपती असतो, पण अकरा दिवसांचा गणपती असणारी घरे फार कमी. दुपारी साडेबारा-एकच्या दरम्यान निरोपाची आरती होऊन पुन्हा आम्ही सर्वजण टोप्या घालून बाप्पांची मूर्ती एका हातगाडीत इतरांच्या मूर्तींसह ठेवून नदीवर गेलो आणि पूर्ण रीतीरिवाजांसह मूर्तीचे विसर्जन करून आलो.
गोव्यात महाराष्ट्रासारखा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात नसतो, मात्र या दीड दिवसांच्या, तीन दिवसांच्या आणि पाच दिवसांच्या गणेशोत्सवाच्या बाबतीत लोकांचा उत्साह महाराष्ट्रातील लोकांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक असतो. बाहेरगावी असलेल्या कोकणातील माणसांना गणेशोत्सवसाठी आपापल्या गावी परतण्याचे वेध लागतात, अगदी तसेच पुण्या-मुंबईत असलेली गोयंकार मंडळीही आपल्या घरी हमखास परततात.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : पत्रकारांचे पंतप्रधानांसोबतचे परदेश दौरे : समज आणि गैरसमज
..................................................................................................................................................................
मी गोव्यात १९७७ ला राहायला आलो, तेव्हा गोव्याची राजधानी पणजी गणेशोत्सवात चार दिवस अगदी हरताळासारखी बंद असलेली पाहिली अन मला धक्काच बसला होता. त्या दिवसांत पणजी येथे रस्त्यावर बाहेर कुठे साधा चहाही प्यायला मिळत नसे. गणेशोत्सव साजरा करत नसलेले पणजी शहरातील दोन-तीन उडुपी हॉटेलांचे मालकसुद्धा या दिवसांत हॉटेलांची साफसफाई, धुणे वगैरे कामे काढत असत. बहुतेक मार्गावरील खासगी बसेसची वाहतूक ठप्प पडत असे. गोवा सरकारच्या कदंब बससेवेची तोपर्यंत सुरुवात झालेली नव्हती. नेमक्या याच दिवसांत गोव्यांत सुट्टीनिमित्त आलेल्या पर्यटकांचे काय हाल होत असतील, याची नुसती कल्पनाच केलेली बरी!
त्या काळात पणजी येथील अल्तिन्हो (म्हणजे पोर्तुगीज भाषेतील म्हणजे टेकडी!) येथील गोवा राखीव पोलीस दलाच्या आवारात गोवा पोलिसांचा २१ दिवसांचा गणपती असायचा. भारतात बहुधा इतरत्र कुठेही अगदी पुण्यातही अकरा दिवसांहून अधिक काळ गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात असे वाटत नाही.
महाराष्ट्रात चार-पाच दिवसांचा दिवाळसण जितका महत्त्वाचा, तितका गोमंतकात नसतो. गणेशोत्सवासारखे गोमंतकाचे स्वतःचे असे काही खास धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहेत. गोव्यातील हिंदू लोक फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास म्हणजे मार्च महिन्यात ‘शिगमो’ हा सुगीचा उत्सव उत्साहाने साजरा करतात. अगदी त्याच पद्धतीने आणि तितक्यात उत्साहात गोव्यातील ख्रिश्चन मंडळी मार्च-एप्रिल महिन्यांत येणारा ‘कार्निव्हल फेस्टिव्हल’ साजरा करतात. ख्रिस्ती धर्मियांचा ४० दिवसांचा उपवासकाळ ज्या दिवशी सुरू होतो, त्या ‘अँश वेन्सडे’ किंवा भस्म बुधवाराच्या आदल्या शनिवारपासून चार दिवसांचा कार्निव्हल फेस्टिव्हल जगभर पूर्वीच्या पोर्तुगीज वसाहती असलेल्या प्रदेशांत सुरू होतो.
अर्थांत कार्निव्हल फेस्टिव्हल साजरा करण्याचे स्वरूप पाहून जगभरातील आणि गोव्यातील ख्रिश्चन चर्चनेसुद्धा या सणापासून कधीच फारकत घेतली आहे. त्यामुळे शिगमो आणि कार्निव्हल फेस्टिव्हल हे दोन्ही उत्सव गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे गेली अनेक वर्षे साजरे केली जात आहेत. या दोन्ही उत्सवांकडे हल्ली पर्यटनउद्योगाला चालना देण्याची संधी म्हणूनच पाहिले जाते. त्या तुलनेत गोव्यातील गणेशोत्सव आणि ख्रिस्ती समाजाचा ख्रिसमस हे दोन्ही सण आजही कौटुंबिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राहिले आहेत. या दोन्ही सणांनिमित्त मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने त्यांना बाजारू महत्त्व आले असले तरी हे उत्सव धार्मिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असतात.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘सकाळ टाइम्स’ दैनिकातील पुण्यातील माझा एक तरुण सहकारी लग्नानंतरच्या पहिल्याच वर्षी तीन दिवसांच्या गणपती सणानिमित्त सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या गोयंकार बायकोच्या घरी दोन-तीन दिवसांपूर्वी गोव्यात गेला आहे. सध्याच्या करोना साथीमुळे वैद्यकीय तपासणी, इ-पास वगैरे मिळवून विमानाने ते दोघेही कोरतालिम येथे आता पोहोचलो आहेत, असे त्याने मला फोनवर सांगितले. त्यामुळे ३०-४० वर्षांपूर्वीच्या गोव्यातील गगणेशोत्सवाच्या या आठवणी डोळ्यांसमोर तरळल्या.
गोव्यात गणेशोत्सवाची जुनी परंपरा असली तरी या प्रदेशात सार्वजनिक गणेश मंडळांचे पुण्या-मुंबईइतके स्तोम नाही. करोनामुळे आज तिथेही गणेशोत्सवाच्या खासगी व सार्वजनिक समारंभांवर, वाहतुकीवर, प्रवासावर आणि सण साजऱ्या करण्यावर मर्यादा आल्या आहेत, तरी मूळच्या कोकणवासीयांप्रमाणेच अनेक गोमंतकीय लोक विविध कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून, ‘होम क्वारंटाईन’ला सामोरे जाऊन गणपतीचे स्वागत करायला आपापल्या घरी पोहोचले आहेत. करोनाच्या भयानक साथीने सगळ्या जगाला विळखा घातलेला असताना यंदा गणेशोत्सवात सहभागी होताना आणि आरती म्हणताना सर्वांचे त्यांच्या लाडक्या बाप्पांकडे काय मागणे असेल, हे ओळखायची गरज नाही.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment