अजूनकाही
एकुणातच सध्या समाजमाध्यमांवर ऐकीव माहितीवर आधारित, पण तज्ज्ञांच्या आविर्भावात ‘पोस्टाय’ची फॅशन काँग्रेस गवत आणि भक्तांपेक्षा जास्तच जोरदार फोफावलेली आहे. आमच्या लहानपणी कुणी, अपुरी माहिती किंवा वायफळ बडबड करायला लागलं की, वडीलधारी मंडळी ‘उचलली जीभ आणि लावली टाळूला’ असं करत नको जाऊस, या शब्दांत झापून त्याला गप्प करत असतं. समाजमाध्यमांवरच्या काही पोस्ट खरंच गंभीर असतात, काही पोस्टमधील मतप्रदर्शन आवर्जून दखल घ्यावी असं असतं, हे खरं असलं तरी बहुसंख्य पोस्ट एक तर कर्कश एकारला प्रतिवाद करणाऱ्या असतात किंवा सुसंस्कृतपणाची पातळी पूर्ण सोडून केलेली शेरेबाजी असते किंवा त्यापुढे जाऊन आणखी काहीतरी केलेलं सुमार लेखन असतं.
हे आठवण्याचं कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी एक विशेष विमान केंद्र सरकारनं नुकतंच खरेदी केलेलं आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या दौऱ्यासाठी एअर इंडियाच्या ताफ्यात असं खास विमान गेल्या चाळीस तरी वर्षांपासून आहे; असंच एक विमान संरक्षण मंत्र्यासाठी राखून ठेवलेलं असतं! तर ते विमान काही नरेंद्र मोदी यांच्यासाठी नाही तर देशाच्या पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांच्या दौऱ्यासाठी आहे. त्यावर बरीच शेरेबाजी वाचायला मिळाली.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
तशीच (नेहमीच केली जाणारी) शेरेबाजी पंतप्रधानांसोबत परदेश दौरे करणाऱ्या पत्रकारांबद्दलही वाचायला मिळाली. तशीही माध्यमं आणि माध्यमातील बहुसंख्य पत्रकार सध्या ‘बदनाम नावाच्या जमाती’चे सदस्य झालेले आहेत, ही वस्तुस्थिती असली तरी पत्रकारांच्या संदर्भात पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्तानं झालेली शेरेबाजी अजिबात वस्तुस्थितीला धरून नाही, हे नमूद केलं पाहिजे. ही शेरेबाजी आणि वस्तुस्थिती यात महदअंतर आहे.
पंतप्रधानांशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अनेकदा (विमानानं) देशात आणि परदेशातही दौरे करण्याची संधी एक पत्रकार म्हणून मला मिळालेली आहे. ‘पंतप्रधानांच्या विमानातून’ अशी डेटलाईन असणारी बातमी लिहायला मिळावी, असं प्रत्येकच पत्रकाराचं स्वप्न असतं. मला तो अनुभव दोनदा घेता आला. माझा शेवटचा असा दौरा तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत रशियातील सेंटपीटसबर्ग येथे भरलेल्या ‘जी-२०’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्र समूहाच्या बैठकीच्या निमित्तानं झाला. अमेरिका, रशिया, फ्रान्स, भारत यासारख्या जगातील २० राष्ट्रांच्या प्रमुखांचं विविध विषयांवर विचार आदान-प्रदान करण्याचं व्यासपीठ म्हणजे ‘जी-२०’ आहे.
या दुसऱ्या दौऱ्याच्या वेळी जाणवेली बाब म्हणजे १९९०च्या आधी पंतप्रधानांसोबत होणारे पत्रकारांचे परदेश दौरे आणि मनमोहनसिंग यांच्यासोबत झालेला २०१३ मधील रशियाच्या दौऱ्याच्या स्वरूपात खूप बदल झालेले होते. १९९० पूर्वी संचार आणि संवाद वहनाचं तंत्र भारतात पुरेशा प्रमाणात पोहोचलेलं नव्हतं. इंटरनेट (म्हणजे माहितीच्या महाजाला)चा स्फोटही भारतात व्हायचा होता. त्या काळात पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्याची छायाचित्रं, त्यांच्या कार्यक्रमाचा ‘आँखो देखा हाल’ भारतात माध्यमांपर्यंत पोहोचवणं अतिशय कठीण होतं. कारण त्या वेळी आता लुप्त झालेल्या तारे (Telegram) व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध नव्हते. पंतप्रधानांसोबत जाणारे पत्रकार काही वृत्तांत तारेने भारतात पाठवत आणि मायदेशी परतल्यावर त्या दौऱ्यावर आधारित वृत्तमालिका किंवा सविस्तर लेख लिहीत. आता कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही, पण अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होईपर्यंत आपल्या देशातले पंतप्रधान त्यांच्या विमानानं एकदा उड्डाण केलं की, ते कुणाशीही संपर्क साधू शकत नसत, अशी दयनीय परिस्थिती तेव्हा होती. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आदी अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांची विमानं सुरक्षा व्यवस्था आणि संदेश वहन या बाबतीत भारताच्या हजार पट पुढे तेव्हा होती आणि आताही आहेत.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘पिता-पुत्र’ : बाप-लेक या नात्यातले ताणेबाणे दाखणाऱ्या विविधांगी कथा
..................................................................................................................................................................
आपल्या देशात आधुनिक तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले, ते राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर. मग सॅटेलाईटद्वारे फोटो पाठवणे सुरू झालं, पण त्यावर होणारा खर्च मोठा बडे माध्यम समूह वगळता कुणालाच परवडणारा नव्हता. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यावर जागतिकीकरण, तसंच खुल्या अर्थव्यवस्थेचं युग आलं आणि राजीव गांधी यांच्या स्वप्नातलं दूरसंचार आणि संवाद वहनाचं स्वरूप प्रत्यक्षात येण्याची स्थिती निर्माण झाली. तोवर पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यात जाणाऱ्या पत्रकारांची संख्या ७० ते ७५ असायची, पण तंत्रज्ञानात बदल झाल्यानं त्या दौऱ्याची छायाचित्रं आणि बातम्याही विविध माध्यमांना वेगानं मिळू लागल्या. तेव्हा म्हणजे २०१३मध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगतो की, नरसिंहराव यांच्या काळातच पंतप्रधानांच्या दौऱ्यातील पत्रकारांची संख्या निम्म्यानं म्हणजे ३५ ते ४० एवढी करण्यात आली. यातील १० जागा केंद्रीय प्रशासनाच्या माहिती आणि जनसंपर्क खात्याच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असतात. हे अधिकारी इंग्रजीसह देशातील प्रमुख प्रादेशिक भाषांमधील असतील याची काळजी घेतली जाते. आंतरराष्ट्रीय दैनिकं आणि वृत्तसंस्थांसाठी ५, राष्ट्रीय दैनिकांसाठी ५, प्रकाश वृत्तवाहिन्यांसाठी ५ आणि उर्वरित जागी देशाच्या विविध प्रादेशिक भाषांतली दैनिकांच्या पत्रकारांना संधी दिली जाते.
ही आकडेवारी जर लक्षात घेतली तर पंतप्रधानांसोबत ‘शेकडो’ पत्रकार दौरे करतात हा सार्वत्रिक पसरलेला गोड गैरसमज कसा आहे हे सहज लक्षात यावं. बहुधा नरसिंहराव किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आलं तेव्हापासून पत्रकारांना तोवर परदेशात उपलब्ध करून देण्यात येणारी निवास आणि खाण्या-‘पिण्या’ची सोयही काढून घेतली गेली. स्वानुभवावरून सांगतो तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासोबत केलेल्या रशिया दौऱ्यात माझ्या निवास आणि भोजनावर लोकमत वृत्तपत्र समूहाने सुमारे दोन हजार डॉलर्स खर्च केलेले होते. सहा दिवसांसाठी झालेला हा खर्च तेव्हा प्रतिदिन साधारण १८००० हजार रुपये होता, हे लक्षात घेतलं तर पंतप्रधानांचा दौरा म्हणजे केंद्र सरकारनं पत्रकारांची केलेली ‘खातिरदारी’ आहे, असं समजण्याचं मुळीच कारण नाही. मात्र हे जाणून घेण्याच्या भानगडीत कुणी पडत नाही.
आणखी एक मुद्दा म्हणजे पत्रकारांसाठी सुरक्षा व्यवस्थेच्या निकषांवर उतरण्यासाठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधानांसोबतचा दौरा प्रत्येक वेळी केलेली काट्यांवरची कसरत असते. हे तिन्ही नेते खाजगी कामासाठी मौजमजा करण्यासाठी परदेश दौरे करतात, हा समज देखील भ्रमच आहे. ही नेते मंडळी दिवसभर १२-१४ तास विविध बैठका, मसलती, कार्यक्रम यात आकंठ बुडालेले असतात. एखाद्या पर्यटनस्थळाला त्यांनी दिलेल्या भेटीची या सर्व नेत्यांच्या या कार्यक्रमांचा ‘आँखो देखा हाल’ वाचकांना देण्यासाठी पत्रकारांचे १५ तर कधी १७-१८ तास धावपळ सुरू असते. मात्र अशा परदेश दौऱ्यांवर पत्रकार ‘मौज’ करण्यासाठी किंवा ‘मजा’ मारण्यासाठी केंद्र सरकारच्या खर्चानं जातात असा आता जवळजवळ संपूर्ण भारतीय जनमनाचा ठाम ग्रह झालेला आहे आणि तोही एक (गोड) गैरसमज आहे!
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘अ बर्निंग’ : असहाय, निरपराध, गरीब, मुसलमान तरुणीची करुण, टोकदार शोकांतिका
..................................................................................................................................................................
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असो की पंतप्रधान, हे परदेशात भारतीय प्रजासत्ताकाचं प्रतिनिधित्व करत असतात. अशा दौऱ्यात शिष्टाचार, संकेत यांचे अनेक पायंडे रूढ झालेले आहेत आणि ते दोन्ही बाजूंनी निगुतीनं पाळले जातात. देशातल्या एखाद्या समस्येची पंतप्रधानांना त्या काळात काळजी नसते, असं काही नसतं, पण परदेश दौऱ्यात हसतमुखानं वावरणं ही त्यांची अपरिहार्य अगतिकताही असते. त्यांच्यासोबत त्या दौऱ्यात सहभागी झालेल्या अधिकारी आणि पत्रकारांनाही ते शिष्टाचार, ते संकेत आणि त्या कार्यक्रमासोबत सतत धावपळ करावी लागते.
या विमांनाची रचना पत्रकार आणि अधिकाऱ्यांसाठी बसण्यासाठी प्रशस्त व्यवस्था, तसंच पंतप्रधानांच्या कार्यालयासाठी एक आणि एक शयन कक्ष अशी असते. शिवाय बाकी नियमित सोयी असतात. कार्यालयाला लागूनच पत्रकारांच्या बसण्याची सोय असते आणि याच जागेवर पत्रकारांना ब्रिफिंग केलं जातं. नियोजित स्थळी जाताना विमानांनं उड्डाण भरलं की, एखादा ज्येष्ठ मंत्री किंवा विदेश सेवेतील ज्येष्ठ अधिकारी एक ब्रिफिंग घेतो. विमान लँड होण्याआधी त्यावर आधारित बातमी तयार ठेवावी लागते. आता लॅपटॉपवर टायपिंग करता येत असल्यानं सोय झाली आहे, पण पूर्वी उडणाऱ्या विमानात हातानं बातमी लिहिणं ही एक कसरतच होती. उतरल्यावर सर्वात पहिली घाई बातमी पाठवण्याची असते. परतीच्या प्रवासात पंतप्रधानांचं ब्रीफिंग होतं आणि तीही बातमी विमान लँड होण्याच्या आत तयार ठेवावी लागते व लगेच पाठवावी लागते, कारण माध्यमांत असणारी स्पर्धा. आता डिजिटल युगात आता विमानानं भारतीय भूभागात प्रवेश केला आणि ते लँड होण्याच्या तयारीत असतानाही बातम्या पाठवता येऊ लागल्या आहेत
ब्रीफिंग संपल्यावर पंतप्रधानांना विमानात १४ ते १५ प्रश्न विचारले जाऊ शकतात. यातही पुन्हा शिष्टाचार असतो, झालेल्या इव्हेंटवर म्हणजे फलश्रुती काय, नवीन करार-मदार कोणते झाले वगैरे यावर आधारित तीन किंवा चार, आंतरराष्ट्रीय विषयावर चार ते पाच, देशाच्या स्थितीवर चार ते पाच आणि एकाद-दुसरा प्रश्न प्रादेशिक असे या पत्रकार परिषदेचं स्वरूप असतं. पत्रकार परिषदेचं नियंत्रण परदेश सेवेतील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे असल्यानं काटेकोरपणे शिष्टाचार आणि वेळेचं बंधन पाळून सर्व काही केलं जात असतं. सध्या संयुक्त राष्ट्रसंघात असलेले अकबरुद्दीन यांच्याकडे मनमोहनसिंग यांच्या पत्रकार परिषदेची सूत्रं होती. त्यांच्याशी चांगली गट्टी जमल्यानं मलाही पंतप्रधानांना एक प्रश्न विचारण्याची संधी मिळाली होती.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
या दौऱ्याची एक हृद्य आठवण सांगायला हवी. मनमोहनसिंग अतिशय ऋजू स्वभावाचे आणि विनयशील असल्याचं जे बोललं जातं, त्याचा प्रत्यय आम्हाला रशियातून परत येत असताना आला. विमानातली पत्रकार परिषद सुरू होण्याची सूचना मिळाल्यावर काहीच वेळात मनमोहनसिंग त्यांच्या कार्यालयातून बाहेर आले आणि चक्क प्रत्येक पत्रकाराच्या आसनापाशी जाऊन त्यांनी प्रत्येकाशी हस्तांदोलन केलं, प्रत्येकाशी किमान दोन वाक्य ते ते बोलले... इतक्या मोठ्या पदावरील व्यक्ती विनयानं बहरलेला डेरेदार वृक्ष कसा असतो, याचा तो प्रसन्नदायी अनुभव होता. मायदेशी परतल्यावर काही ज्येष्ठ सहकाऱ्यांशी बोलल्यावर पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी हेही असंच विनयानं वागत असत, असं समजलं.
एक मात्र वादातीत, विमानांत खाण्या-‘पिण्या’ची चंगळ असते!
एकंदरीत, पत्रकारांविषयी गोडगैरसमजच जास्त असतात, हे खरेच की!!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment