अजूनकाही
‘पिता-पुत्र : नाते, अंतर आणि अंतरंग’ हा कथासंग्रह पुस्तक मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केला आहे. काही नाती ही सतत चर्चेत असतात आणि काही नात्यांबद्दल बोलणे खूप अवघड होते. पिता-पुत्र हे असेच एक नाते आहे, ज्याबद्दल क्वचितच बोलले जाते. आपण या पुस्तकातील कथा संदर्भात बोलूयात. या संग्रहात पहिल्या भागात सहा मराठी लेखकांच्या कथा आहेत आणि दुसऱ्या भागात सात अनुवादित कथा आहेत. अनुवादित कथा या प्रामुख्याने हिंदी आहेत. शिवाय ओडिसी, कन्नड कथा आहेत. सर्व कथा या फक्त पिता-पुत्र भावबंधाबद्दल आहेत. स्वत: धर्मापुरीकर यांच्या दोन कथा यात आहेत.
‘डीप्टी कलेक्टर’ या कथेत (मूळ हिंदी- लेखक अमरकांत) शकलदीपबाबू आणि त्यांचा मुलगा नारायण यांच्यातील अपेक्षांचे ताणेबाणे आहेत. ‘डीपटी कलेक्टर’ जागेसाठी मुलाची मुलाखत आहे. क्षणात उल्हासित बबुवाच्या भविष्याची स्वप्ने पाहणारे शकलदीपबाबू अचानक हळवे होतात. एखाद्या निरागस बालकाच्या उर्मीने ते आपले दैन्य आता संपले अशी बातमी गावभर करतात. आता त्यांना एकच ध्यास आणि विषय असतो. नारायणबाबू आता ‘फीट’ रहायला हवेत, म्हणून ते अनेक प्रकार करतात. इतके सगळे होऊनदेखील त्यांचा आणि मुलाचा संवाद आईमार्फतच चालत असतो. हे सगळे प्रसंग कथेत विस्ताराने येतात. अखेर नारायण पास होतो, पण त्याला कॉल येत नाही. त्याचे नाव ‘वेटिंग लिस्ट’वर राहते. शकलदीपबाबू एकदम बिथरतात. बेचैन होतात. आता त्यांना बबुवाची काळजी निर्माण होते. ती इतकी की, घरी येऊन झोपलेल्या बाबुवाचा श्वास चालू आहे ना बघतात. ‘बबुवा सो रहे है’ म्हणत ते आपल्या खोलीत जातात. अपेक्षा, चिंता, स्वप्न, त्यांचा ताण हे सगळे आहेच. तरीही ‘बाप’ बनू पाहणारा शकलदीपबाबू शब्दांत पकडणे अवघड.
‘पिता-पुत्र’ या पुस्तकातील मूळ मराठी कथा एकत्र संपादित करून धर्मापुरीकर आपल्यासमोर ठेवतात. मराठीतल्या या कथा वाचकांना माहिती आहेत. त्यांची स्वत:ची ‘मोचक’ ही कथा मात्र वेगळी आहे. कारण ती ‘आजच्या बापाची’ कथा आहे. केवळ त्यातील संदर्भ आधुनिक आहेत म्हणून नाही, तर त्यातील आर्थिक तफावतीचे सूत्र वेगळ्या पातळीवर पुढे येते. खरे तर, ते केवळ तसेही नाही. मुलाच्या पिढीला सर्व समस्या पैशाने सुटतात असे भासते, त्याच वेळी वडिलांच्या सुखाच्या, समाधानच्या कल्पना किती भिन्न असतात, हे या कथेत सूचित होते. घरातील ड्रेनेज तुंबण्याची समस्या वडिलांच्या मनात किती आंदोलने निर्माण करते, हे वाचण्यासारखे आहे. मुलाची ही पिढी खलनायक नक्कीच नाही. परंतु हे अवस्थांतर मानसिक उदासी निर्माण करते. ड्रेनेज कामासाठी आलेला मुलगा जवळचा वाटणे, हा एक उदासी दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील अकारण तणाव हा सामाजिक विषय आहे. लेखक एक वैचारिक प्रक्षेपण करून एका अस्वस्थ वर्तमानाची चाहूल फक्त देतात.
आज सभोवताली मुलगा नेमके काय करतो, याबद्दल अनभिज्ञ असलेले वडील मी पाहिले आहेत. मुलांनादेखील आपल्या नव्या कल्चर’ची (!) माहिती वडिलांना देणे गरजेचे वाटत नाही. साहजिकपणे व्याख्या करता येणार नाही, असा एक दुरात्मभाव निर्माण होतो आहे. आपल्या मुलांचे आर्थिक भक्कम आयुष्यसुद्धा बापाला धुक्यातले भासते आहे. त्यामुळे आजपर्यंत महत्त्वाच्या वाटणाऱ्या अनेक संकल्पना कालबाह्य ठरत आहेत. तरीही आपण त्याच गोष्टींचा हट्ट धरत आहोत, हे बापाला कळते आहे. मात्र संवाद न होता हे अंतर केवळ वाढते आहे काय? बदल होतच असतात. ते होऊ नयेत असे कुणी म्हणणार नाही. पण नात्यातील हे अंतर का असावे? भौगोलिक अंतर आज अनेक कारणांनी अनिवार्य म्हणून स्वीकारले आहेच.
आणखी एका कथेत अशीच एक गंमत आहे. आपले वडील उग्र दिसतात, उग्र वागतात हे मुलाला कळते, पण त्याबद्दल एक मनात एक खंत इतकेच त्याचे स्वरूप राहते. ‘श्रद्धा’ या कथेत असेच एक नाते आहे. श्रीनिवास वैद्य यांची ही मूळ कन्नड कथा उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केली आहे. नोकरीच्या निमित्ताने मुलगा आता मुंबईला चालला आहे. धारवाड सोडून तो जातो आहे. बापाचे उग्रपण गळून पडते. पण अशा मानसिक तणावातसुद्धा मुक्त होत नाही. जणू हे नाते त्याला तशी सवलतच देत नाही. आईमार्फत मुलाला मुंबईत कसे राहायचे या सूचना मिळत राहतात. दोघांच्या मनात हे नाते अनेक प्रश्न निर्माण करते. रेल्वे फलाटावर मित्रांच्या गराड्यात त्याला आपला बाप आल्याचे कळते. ते बळजबरी त्याला अधिक पैसे देतात. आपला बाप अचानक वृद्ध कसा झाला, हे मुलाला समजत नाही. त्याला फक्त इतकेच वाटते की, आपल्या वडिलांनी हे असे वागायला नकोय! ‘अप्पा, शोभत नाही हे तुम्हाला. तुम्ही तसेच पहिल्यासारखे उग्रच रहा!’ पण हे त्याचे ‘वाटणे’ मनातच राहते. आणि मनातच राहणारे, हे नाते अव्यक्त शब्दात आणखीच गूढ बनते.
वरकरणी असा भास होतो की, हे चित्र ‘काल’चे आहे, आधीच्या पिढीचे आहे. पिता-पुत्राचे नाते हे आज मैत्रीचे झाले आहे, असे कुणी म्हणू शकेल! बाह्य-रीवाजामुळे ते तसे वाटू शकते, मात्र आजसुद्धा ते अंतर तसेच आहे. या संकलनाबद्दल आपली भूमिका लिहिताना धर्मापुरीकर एका कथेतील एक संवाद उदधृत करतात. ‘पिता’ हे ती कथा या संग्रहात आलेली नाही. “बाप कभी दोस्त नहीं हो सकता राहुल! वो दोस्तोंकी तरह बिहेव भलेही करे, लेकीन वो बाप ही है… और उसे बाप होनाही चाहिये..” क्षणभर घड्याळाचे काटे उलटे फिरवल्यासारखे वाटते. परंतु ते तसेच आहे हेच खरे. बापाने आपल्या स्वप्नांचे जू मुलाच्या मानेवर देणे यात आक्षेपार्ह काय आहे, हे आजच्या काळात कळणे अवघड आहे. मुलाच्या मनात असेच काही आहे! आपल्या अतीतापासूनची आपली फारकत अटळ आहे. त्यामुळे धागे तोडण्याखेरीज उपाय नाही, हे त्याचे नशीब आहे. अशा अवस्थेत ते दोघे ‘मित्र’ तरी कसे होतील आणि किती होतील?
‘घर’ या ओडीसी कथेत (लेखक - गौरहरी दास) एकत्र कुटुंबाचे स्वप्न पाहणारे वडील आहेत. विस्मृतीचा रोग असलेले हे वडील हरवतात. ते नेमके कुठे गेले असतील याचा अंदाज मुलांना असतो. गावाकडील जमिनीच्या एका तुकड्यावर सर्वांची सोय असणारे घर बांधायचे त्यांच्या मनात आहे. मुलांना हे माहिती असते. वडील तिथे सापडतात, पण खूप उशीर झालेला असतो. या कथेत एक आर्थिक ताण आणि परिस्थितीची अपरिहार्यता आहे. जग बदलत जाते, त्यासोबत मूल्येसुद्धा बदलतात. वयोमान आणि व्याधी यामुळे वडील हतबल आहेत आणि मुले तर त्यांच्या कडेकोट नव्या जीवनपद्धतीत कैद आहेत. अशा परिस्थितीत हे कानकोंडे जीवन हेच फक्त वास्तव उरते. एका कुठल्यातरी पिढीला हे बदलाचे डंख सोसणे भाग असते.
पार्किन्सन आणि स्मृतिभ्रंश झालेल्या पित्याच्या अतर्क्य वर्तणुकीची एक कथा ‘थट्टा’मध्ये अंतर्मनात असलेली दुष्ट खेळ आहेत. मूळ हिंदीतली ही कथा कुमार अंबुज यांची आहे. वडिलांच्या अजब मागण्या त्यांच्या कलाने घेत, त्यांना उत्तरे देत संवाद साधायचा, ही महाभयंकर थट्टा आहे सगळ्याच वास्तवाची. लेखक यात जे प्रश्न निर्माण करतो, ते खूपच अंतर्मुख करतात. वडिलांची शुश्रुषा करणारा मुलगा त्या दुर्धर आजारापुढे हात टेकतो. खुद्द त्याचे मानसिक संतुलन प्रश्नांकित करणारे ते प्रसंग मन व्यथित करतात. अखेर लेखकाला वाटते की, आलम दुनियेलाच हा रोग जडलाय. हजारो वर्षे त्यावर संशोधन चालू आहे. एका मर्यादित चौकटीत मुलाचे हे ‘फिलिंग’ खोटे नाही.
सर्व कथांमधून आपण पिता-पुत्र हेच नाते तपासत राहतो. श्री.दा. पानवलकर यांची ‘सूर्य’ ही कथा अशीच एका अगम्य अवस्थेला आपल्याला नेऊन सोडते. आपल्या मुलाने पोलीस खात्यातच गेले पाहिजे, असा आत्ताहास ठेवून सक्ती करणारा हा बाप आहे. मुलगा त्याचा प्रतिवाददेखील न करता त्या हडेलहप्पी बापाची प्रतिकृती होऊन जातो. त्याला कसलाही चॉईस राहत नाही.
या उलट ‘मोसम’ या कथेत (हिंदी- मूळ लेखक: महम्मद आरिफ) वडील स्वत: पोस्ट ग्रॅज्युएट असून (या कथेत सगळेच उच्चशिक्षित आहेत) नोकरी करत नाहीत आणि मुलांनादेखील नोकरी करू देत नाहीत. सामान्य सुखवस्तू आयुष्य जगू पाहणाऱ्या या मुलांना आपले वडील असे का करतात, हे कधीच समजत नाही.
सखा कलाल यांच्या ‘ढग’ या मराठी कथेतील वातावरण ग्रामीण आहे. इथे बाप-लेकाचा एक लोभस पैलू दिसतो. दोघा भावांच्या वाटण्या झाल्या आहेत आणि म्हातारा-म्हातारी धाकट्याकडे राहत आहेत. त्या अस्वस्थ मुलाच्या मनात हा सल आहे. ‘का रं… मी तुमचं लेकरू नव्हं?’ या प्रशाचे उत्तर शोधत तो स्वस्थपणे नुसताच बसलाय. बिगर कामाचा. त्याला वाटलं आपण का जाऊ नये म्हाताऱ्याला भेटायला? तिरीमिरीत तो निघतो, मात्र ओढ्याच्या पलीकडे त्याचे पाय रेटत नाहीत. पुन्हा घरी येऊन बसतो. डोक्यात पुन्हा तेच काहूर. त्याच नादात तो चिलीम पेटवतो. नाका-तोंडातून धूर फक्कन बाहेर पडतो अन त्याच वेळी एक थकलेला आवाज कानावर येतो- “चिलीम कवाधरनं बडाय लागलास?” बाप समोर उभा असतो. दोघांनाही काय बोलावं हे न सुचून नुसतेच बसून राहतात..
या सर्व कथा प्रसंगनिष्ठ आहेत. त्यामुळे त्या समोर घडल्यासारख्या वाटतात. भाषेला अकारण अलंकृत करायचा कसला आग्रह न धरता त्या सादर होतात. एकाच वेळी कुठल्या व्याख्येत न बसणारे स्नेहबंध आणि त्याच वेळी एक दुरात्मभाव हे या नात्याचे आगळेपण आजचे नाही. गोंधळात टाकणारे तर आहेच आहे. आजच्या पर्यावरणात यात काही चकाचक बदल दिसतात, पण तरीही ते अंतर कायम आहे. संवादासाठी शब्दांची वानवा तशीच आहे. यातील अनेक छटा माझ्या पिढीने अनुभवल्या आहेत. प्रत्येक कथेची छटा आणि व्यथा वेगळी आहे. लेखक कथेद्वारे फक्त समस्या मांडतात. उत्तरे आपण शोधायची.
धर्मापुरीकर यांनी पिता-पुत्रांचे हे संमेलन भरवले आणि तो अनुभव एकत्रितपणे दिला. त्यासाठी त्यांचे अभिनंदन.
..................................................................................................................................................................
‘पिता-पुत्र : नाते, अंतर आणि अंतरंग’ या कथासंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5216/Pita-Putra
..................................................................................................................................................................
लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.
jayantraleraskar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment