अजूनकाही
भारतातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पं. जसराज यांचं १७ ऑगस्ट २०२० रोजी वयाच्या नव्वदाव्या वर्षी अमेरिकेतील न्यू जर्सी इथं निधन झालं. ‘रसराज’ या नावाने ओळखले जाणारे जसराजजी मेवाती घराण्याचे गायक.
आपल्याकडे ‘घराणेशाही’ची चर्चा अनेकदा तावातावानं केली जाते. पण शास्त्रीय संगीतात मात्र ‘घराण्याला’ अतिशय मानाचं स्थान आहे. प्रत्येक घराण्याची परंपरा वेगळी, गायकी वेगळी. घराण्याची गायकी ही कुलीन, घरंदाज आणि खानदानी समजली जाते. उदा. किराना, आग्रा, अंत्रोली, ग्वाल्हेर, पतियाळा, इंदौर, जयपूर इत्यादी. या घराण्याच्या गायकीतून पुढे आलेल्या गायकांनी उच्च आणि अभिजात गायकीचा आदर्श निर्माण केला. आपल्या गायकीने घराण्याच्या गायकीच्या कक्षा रुंदावल्या, आपली घरंदाज गायकी पुढे नेली.
त्यापैकीच एक नाव म्हणजे पं. जसराज.
पं. जसराजजींचं मेवाती हे घराणं तसं ग्वाल्हेर घराण्याजवळचं. ग्वाल्हेर घराण्याचे एक गायक म्हणजे छगे नजीरसाहेब. त्यांचे शिष्य नथ्थूलालजी. ते पं. जसराजचींचे मामा. असो. मेवाती घराण्यात भक्तिरसपर रचना प्रामुख्यानं गायल्या जातात. त्यामुळे शब्दांना आणि भावनेला या गायकीत विशेष महत्त्व असतं. त्यामुळे या गायकीकडे केवळ ‘कला’ म्हणून न पाहता ‘उपासनापद्धत’ म्हणून पाहिलं जातं. पं. जसराजजी आयुष्यभर त्याच भावनेनं आपल्या गायकीकडे पाहत राहिले.
२८ जानेवारी १९३० रोजी पं. जसराजजींचा जन्म हरियाणातील हिसार या गावी झाला. त्यांच्या घराण्यात चार पिढ्यांपासून संगीताची परंपरा होती. त्यांचे वडील पं. मोतीराम हे मेवाती घराण्याचे प्रसिद्ध गायक होते. पण जसराजजी तीन-चार वर्षांचे असतानाच त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या काकांनी केला. वयाच्या १४व्या वर्षांपर्यंत ते तबला शिकले. वयाच्या १५व्या वर्षी म्हणजे १९४५ साली त्यांनी लाहोरमध्ये झालेल्या कुमार गंधर्व यांच्या संगीत मैफलीमध्ये तबल्याची साथ दिली होती. दुसऱ्या दिवशी कुमार गंधर्व त्यांना म्हणाले की, ‘जसराज तुम मरा हुआ चमड़ा पीटते हो, तुम्हें रागदारी के बारे में कुछ नहीं पता.’ त्यानंतर ते तबला सोडून गायकीकडे म्हणजे सुरांकडे वळले. आणि तेथून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
भारतीय संगीताच्या इतिहासात पं. जसराज यांचा अतिशय गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्यांच्या सहजसुंदर, गोड आणि आकर्षक गायकीने अनेक वर्षं भारतीय आणि भारताबाहेरील कितीतरी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांचं गाणं आनंदाच्या लाटा निर्माण करतं.
पं. जसराज यांचं व्यक्तिमत्त्वही मोठं आकर्षक होतं आणि त्यांची गायकीही. पातळ, लवचीक, मुलायम आवाज, रसिला लगाव आणि कठीण रागही सहजपणे गाण्याची त्यांची हातोटी रसिकांच्या काळजाला हात घालते.
सुंदर रीतीनं मींड घेणं, अतिमंद्रापासून अतितार सप्तकापर्यंत सहजपणे संचार करणं, अतिशय सुंदर व आकर्षक लयकारी, सहज स्वराविष्कार, लहान-मोठ्या पल्ल्याच्या ताना, आवाजावर प्रभुत्व, चमत्कृतीपूर्ण सरगम, शब्दोच्चारातून भाव निर्माण करणं, भावनांनी भिजलेले स्वर लावणं, यांमुळे पं. जसराजची यांची गायकी ही एक प्रकारचा आनंदसोहळा असे. रसिकांना तो पुन्हा पुन्हा ऐकावा, पाहावा, अनुभवावा असं वाटतं.
पं. जसराजजी यांच्या ऐटदार शैलीला घरंदाज खानदानीपणा होता. ते सबंध मैफलभर फक्त ख्याल गाऊ शकत असत. इथंच हे सांगायला हवं की, शास्त्रीय संगीतात ख्याल हा सर्वोच्च प्रकार मानला जातो. ख्यालाला ‘सम्राट’ (तर ठुंबरीला ‘सम्राज्ञी’) असं म्हटलं जातं. या ख्यालगायकीत पं. जसराजजी अतिशय निष्णात आणि वाकबगार होते.
दरबारीकानडा, जोग, बसंत, शुद्धनट, हंसध्वनी, शुद्धधबरारी, नटनारायण, खमाजबहार, हिंदोली, गोरखकल्याण, पूरिया, नानकमल्हार, दिनकी पूरिया, पटदीपकी, पूर्वा, धनाश्री, बिलासखानी तोडी, अहीरभैरव, शुद्धसारंग, अडाणा, मालकंस, ललित, तोडी इत्यादी राग पं. जसराजजी तयारीनं गात. सकाळची, संध्याकाळची किंवा रात्री, कुठल्याही प्रहरातली मैफल असो पं. जसराजजी मैफल सतत चढती ठेवत. त्यांना अतिशय तन्मयतेनं, ध्यानमग्न अवस्थेत गाताना पहात राहावंसं वाटे.
भाषेचा अडसर पार करून त्यांची गायकी रसिकांना मोहून टाकत असे. चर्चमधील पवित्र संगीताचा भास त्यांच्या गायकीत होतो, असं पाश्चात्य देशांतल्या अनेक जाणकार रसिकांनी सांगितलं आहे. सुरांनी ओथंबलेली गायकी पवित्र असतेच. सूर भाषिक मर्यादा पार करून जातात. सुरांना भाषेची गरज नसते. कारण सुरांची भाषा ऐकणाऱ्यांच्या काळजाला स्पर्श करते.
पं. जसराजजींची गायकी अगदी तशीच काळजाला हळूवार स्पर्श करते. ‘नादवेध’ (२००५) या सुलभा पिशवीकर-अच्युत गोडबोले यांच्या पुस्तकात पं. जसराजजी यांच्या एका मैफलीची आठवण सांगितली आहे. ती अशी - “कुठेही ‘बसंत’ राग ऐकला की, १९७२च्या जूनमध्ये आमच्या भावाच्या विवाहाप्रीत्यर्थ झालेली, जसराजांची मैफल आठवते. त्या रात्री त्यांनी बसंत रागातली ‘और राग सब बने बराती, दूल्हा राग बसंत, मदनमहोत्सव आज सखी री, बिदा भयो हेमंत’ ही बंदिश मुद्दाम गायली. जसराजांच्या सुरांनी ‘बसंत’ नवरदेवासारखा सजला होता आणि सुरांचा तो आविष्कार, म्हणजे ‘मदनमहोत्सव’च होता. यौवनाचा तजेलदारपणा आणि सळसळता उत्साह, ‘वसंता’बरोबरच नव्या उल्हासानं भरून येणारं आपलं देहमन यांची खूण म्हणजे तो ‘बसंत’ होता. त्याचे सूर नव्या पालवीचं कोवळेपण लेवून आले होते.”
‘मधुराकष्टकम’ या श्रीकृष्णाची स्तुती असलेल्या भजनाने जसराजजी यांचं नाव भारतात सर्वदूर पसरलं. मैफलींमध्ये त्यांना नेहमी हे भजन म्हणण्याची फर्माईश केली जाई. या भजनातील ‘अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं.... हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं’ हे शब्द पं. जसराजजींच्या मुखातून मधासारखे रसाळ होऊन येत, तेव्हा रसिकांची अवस्था भक्तिमय होऊन जाई.
हरियाणा सरकारने पं. जसराजजींना सत्तरच्या दशकात ‘संगीत मार्तंड’ अशी पदवी देऊन गौरवलं होतं. देश-विदेशात त्यांना इतरही कितीतरी मानसन्मानांनी गौरवण्यात आलं. पं. जसराजजींनी जवळपास ८० वर्षं संगीतासाठी दिली. भारत, कॅनडा, अमेरिका या देशांमध्ये अनेकांना गायकीचं शिक्षण दिलं. ‘जसरंगी’ हा स्त्री-पुरुष गायकांना एकाच वेळी सारख्याच स्वरात गाता येईल असा गायनप्रकार त्यांनी सिद्ध केला. त्यासाठी त्यांनी ‘मूर्छना’ या संगीतप्रकारातील प्रत्येक स्वराला षडजाचे स्वरूप देऊन ‘जसरंगी’ हा नवा राग निर्माण केला. भक्तिसंगीतालाही त्यांनी आपल्या गायकीतून वेगळ्या उंचीवर नेले.
आता हा सुरांचा आनंदसोहळा कायमचा थांबला आहे. पण हे तितकंसं खरं नाही. सत्य इतकंच आहे की, आता कुणी त्यांची प्रत्यक्ष मैफल ऐकायची ठरवलं तर ते शक्य नाही. पण त्यांचं गाणं ऐकणं मात्र शक्य आहे. डीव्हीडी, व्हीसीडी, सीडी यांच्या माध्यमातून ते सहजसाध्य आहे. आणि यू-ट्युब तर आहेच आहे. त्यावर जाऊन तर तुम्ही दिवसाच्या किंवा रात्रीच्या कुठल्याही प्रहरी त्यांना ऐकू शकता, अनुभवू शकता. त्यांच्या सुरांत चिंब होऊ शकता.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment