नारायण सुर्वे मजूर-कामगारांची भाषा बुलंद राहण्यासाठी, करण्यासाठी पुन्हा पुन्हा आठवत राहायला हवेत…
पडघम - साहित्यिक
टीम अक्षरनामा
  • नारायण सुर्वे आणि त्यांचे पाच कवितासंग्रह
  • Thu , 20 August 2020
  • पडघम साहित्यिक नारायण सुर्वे Narayan Surve ऐसा गा मी ब्रह्म माझे विद्यापीठ जाहीरनामा सनद नव्या माणसाचे आगमन

मराठीतील प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे यांच्या निधनाला कालच्या १६ ऑगस्ट रोजी १० वर्षे पूर्ण झाली. या काळात सुर्व्यांच्या कवितेतला मजूर-कामगार वर्ग देशोधडीलाच लागला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांच्या करोना महामारीच्या काळात तर या मजूर-कामगारवर्गाचा कुणीच वाली उरलेला नाही. या पुन्हा पुन्हा पराभूत होणाऱ्या वर्गाची संघर्षशक्ती अजोड आहे. किंबहुना ती तशी राहण्यासाठी सुर्वे यांची, त्यांच्या कवितेची सतत आठवण करत राहणं, हे अनिवार्य असं काम, कर्तव्य आहे. कारण सुर्वे समूहाची, विशेषत: मजूर-कामगार यांची भाषा बोलतात. ती भाषा बुलंद करण्यासाठी, राहण्यासाठी सुर्वे आठवत राहायला हवेत…

..................................................................................................................................................................

जॉर्ज ऑर्वेल या जगप्रसिद्ध लेखकांनी ‘Why I Wright?’ असा एक लेख १९४६ साली लिहिला आहे. त्यात लेखक का लिहितो त्याची आर्वेल यांनी चार कारणं सांगितली आहेत. ती अशी Sheer egoism, Aesthetic enthusiasm, Historical impulse and Political purpose. राजकीय दृष्टिकोन म्हटलं की, बहुतेक मराठी लेखकांच्या कपाळावर आठ्या पडतात. लेखकाला राजकीय भूमिका/निष्ठा नसते, नसावी असा युक्तिवाद ते करत असतात. अशा लोकांसाठी आर्वेल यांनी ‘राजकीय दृष्टिकोना’ची फोड करताना म्हटलं आहे, “Using the word ‘political’ in the widest possible sense. Desire to push the world in a certain direction, to alter other peoples’ idea of the kind of society that they should strive after. Once again, no book is genuinely free from political bias. The opinion that art should have nothing to do with politics is itself a political attitude.”

नारायण सुर्वे या बाबतीत मात्र जॉर्ज आर्वेलच्या वंशाचे म्हटले पाहिजेत. कारण त्यांचं लेखनही ‘राजकीय दृष्टिकोन’ व्यक्त करणारं आहे. त्यांनी लिहिलं आहे, ‘‘सर्व माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी लेखन करतो. व्यक्तिगत जीवनापासून तो सर्व समष्टीपर्यंतचा आलेख मला काढायचा आहे. माणसातले सौंदर्य व त्याच्या बावन्न कला मला चित्रित करायच्या असतात. मी चित्रित केलेला माणूस पराभूत किंवा क्षणभर निराश जरी वाटला तरी तो पुन्हा नव्या संघर्षातही उभा राहणारा, ताठ पोलादी मानेचा आहे. पराभव हा मानवी इतिहासाचा एक भाग असला तरी प्रगतीचाही तो मोठा वाटेकरी आहे, हे विसरता येत नाही. माणसातले केवळ हरलेपण दाखवण्यापेक्षा त्याचे लढलेपण दाखवणे मला मोलाचे वाटते ते याचसाठी. माझे लेखनसुद्धा याचसाठी असते.’’

सुर्वे यांच्या कवितेने मराठी कवितेत एक नवं युग सुरू केलं ते या अर्थानं. लढणाऱ्या सामान्य माणसाचा पराक्रम त्यांनी महत्त्वाचा मानला. कारण प्रत्यक्षात हीच माणसं इतिहास घडवणारी असतात. त्यांचं योगदान सुर्व्यांच्या कवितेचा आत्मा झाला. कुणाही लेखकाचा जगण्याचा अनुभव, त्याचं थिंकिंग एखाद-दुसऱ्या पुस्तकात येऊन जातं, त्यामुळे त्याची तेवढीच पुस्तकं चांगली होतात. अगदी जागतिक लेखकांनाही हा नियम लावता येईल. पण सुर्व्यांना यापैकी कुठल्याच मर्यादा पडल्या नाहीत. कारण त्यांनी आयुष्यभर आपल्या जगण्याच्या, अनुभवांच्या पलीकडे फारसं काही लिहिलं नाही. त्यांनी मुळात लिहिलंच फार कमी. शेवटच्या दहा-पंधरा वर्षांत तर एकही कविता लिहिली नाही. त्यांच्या म्हातारपणाचा फायदा घेऊन काहींनी त्यांच्याकडून लेख लिहून घेतले, तर काहींनी त्यांचं एरवी पुस्तकरूपात आलं नसतं अशा लेखनाची पुस्तकं करायचा प्रयत्न केला. तरीही, खूप कमी लिहून साहित्यिक म्हणून किती मानाचा धनी होता येतं, याचं सुर्वे हे उत्तम उदाहरण आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठीतला कबीर

सुर्व्यांच्या कवितेत मोठ्या प्रमाणावर ‘मी’ आणि ‘आम्ही’ असे स्वत:बद्दलचे शब्द येतात. पण त्यात आत्मप्रौढी नसते; तर जे ते जगत आले त्याविषयीची तो स्वर असतो. कवी हा कोणी अवचित आकाशातून तुटलेला तारा नाही. त्याला भोवतालची परिस्थिती, त्याचे संस्कार, त्याची आंतरिक घालमेल या गोष्टी खूपशा प्रमाणात कारणीभूत असतात. ‘जसा मी जगत आहे तसाच शब्दांत आहे’ असं त्यांनी एका कवितेत म्हटलं आहे.

स्वत:च्या जगण्यातला संघर्ष समाजात, इतर अनेकांच्या जगण्यातही आहे, हे सुर्व्यांची कविता सहजपणे सांगते. १९९९मध्ये त्यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ मिळाला. या पुरस्कारानं त्यांना सर्वाधिक आनंद झाला. कारण कबीराचं ते सहाशेवं जयंती वर्ष होतं, आणि सुर्वे व कबीर यांच्यातही काही बाबतीत साम्य होतं. कबीर अनाथ. त्यांच्या आईनं त्यांना नदीच्या किनाऱ्यावर सोडून दिलं होतं. सुर्वेही गंगाराम सुर्वे यांना चिंचपोकळीतल्या गिरणीसमोर सापडले. त्यामुळे दोघांच्या लिखाणातही जनसामान्यांविषयीचा कळवळा ओतप्रोत भरलेला आहे. कबीराशी सुर्व्यांचं साम्य आहे ते असं.

१९२६-२७च्या मध्ये एके दिवशी गंगाराम सुर्वे यांना चिंचपोकळीतील गिरणीसमोरच्या रस्त्यावर टाकून दिलेलं एक मूल सापडलं. गंगाराम यांना स्वत:ला मूलबाळ नव्हतं, म्हणून त्यांनी या मुलाला घरी आणलं आणि त्याचं नाव ठेवलं, नारायण. सुर्वे कुटुंब परळच्या बोगद्याच्या चाळीत राहायचं, तिथंच सुर्व्यांचं बालपण गेलं. गंगाराम सुर्व्यांनी त्यांना शाळेत घातलं. १९३६मध्ये सुर्वे चौथी पास झाले. त्याच सुमारास गंगाराम सुर्वे गिरणीतून निवृत्त झाले. त्यामुळे ते आपल्या कोकणातल्या मूळ गावी परतले. सुर्व्यांना त्यांना सोबत नेणं शक्य नव्हतं. त्यामुळे सुर्वे परत अनाथ झाले. मग पोरवयापासूनच चळवळीशी जोडले गेले. १९४०-४१च्या सुमारास सुर्वे दादर स्थानकावर पेपरविक्या पोऱ्या म्हणून काम करत. त्या अनुभवाविषयी पुढे त्यांनी ‘पोर्टरची स्वगते’ ही कविता लिहिली. पत्रं लिहिण्याचं काम करत, त्या अनुभवावर ‘मनीआडर’ ही कविता लिहिली.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : मधुकर अनंत मेहेंदळे : आयुष्यभर अभ्यास-संशोधनावर प्रेम करणारा प्रकांड पंडित

..................................................................................................................................................................

झोपडपट्टी ते टू रूम किचन

सुर्वे आणि सामान्य माणसाचं आयुष्य यात काही फरक नाही. १४-१५व्या वर्षी त्यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभाग घेतला. १९४६च्या आर्मी बंडातही सहभाग झाले. १९४८मध्ये त्यांनी कृष्णाबाई यांच्याशी प्रेमविवाह केला. त्याही अनाथ आणि सुर्व्यांच्या शेजारी. १९५०-५२च्या सुमारास सुर्वे थोडे स्थिर झाले.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून लागलेले सुर्वे १९५७मध्ये व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास झाले. १९६१मध्ये प्राथमिक शिक्षकाची परीक्षाही पास झाल्याने हा नायगावच्या महानगरपालिकेच्या शाळेतला शिपाई त्याच शाळेत मास्तर झाला. तिथंच त्यांना ‘नायगावचे मास्तर’ हे विशेषण मिळालं.

सुर्व्यांची पहिली कविता ‘डोंगरी शेत माझं ग, बेणू किती’ १९५८ साली प्रकाशित झाली. त्याची पुढे ध्वनिफीत निघाली. १९६२मध्ये सुर्व्यांचा पहिला कवितासंग्रह ‘ऐसा गा मी ब्रह्म’ अभिनव प्रकाशनाच्या वा. वि. भट यांनी प्रकाशित केला. या कवितासंग्रहाला सुर्व्यांनी ‘आभार’ या नावानं छोटंसं प्रास्ताविक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात – “जे जाणवले, काळजात सलले, तेच शब्दरूप घेऊन बाहेर पडले. यात माझा काहीच दोष नाही. कदाचित काळाचा असण्याचा संभव आहे… मी स्वस्थ बसेन. शरीर स्वस्थ बसेल. पण आत्मा स्वस्थ बसूच देईना. शब्द मला ढकलीत राहिले. मी ढकलला जाऊ लागलो. विद्यमान मराठी कवितेत आपण कुठे आहोत, असाही केव्हा केव्हा मला प्रश्न पडतो. पण का कोण जाणे, तरीही मी आपला लिहीतच आहे व लिहीत राहणार आहे. त्याशिवाय मला गत्यंतरच नाही. जेव्हा काळजातला ठणका बंद होईल, जेव्हा मला शब्दांसाठी अडून बसावे लागेल, (असाही दिवस येणार आहे) तेव्हा मात्र मला थांबावेच लागेल.”

सुर्वे खारजवळच्या झोपडपट्टीत राहायचे. ती महानगरपालिकेनं पाडल्यावर काही दिवस त्यांनी रस्त्यावरही संसार मांडला. मग राज्य सरकारनं त्यांना अंधेरीत टू रूम किचन फ्लॅट दिला. त्यात ते राहायला गेले. तेव्हा ‘झोपडपट्टीत राहणारा मनुष्य टू रूम किचनमध्ये राहतोय’, अशी काहींनी त्यांच्यावर टीका केली.

पुलंनी सुर्व्यांना ‘परळचा केशवसुत’ असं म्हटलं होतं. केशवसुत-मर्ढेकर-सुर्वे हे मराठी कवितेचे टप्पे मानले जातात; पण सुर्व्यांना ही परंपरा मान्य नव्हती. ‘मला हे दोघंही आवडतात’ एवढंच ते म्हणत. महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी एसटी, वीज पोहोचलेली नाही अशा ठिकाणीही सुर्वे पोहोचलेले आहेत. ते म्हणत, ‘मी मार्क्सवादी आहे, मी डावा आहे, परिवर्तनवादी आहे… मला ज्ञानेश्वर आवडतो, केशवसुत, कुसुमाग्रज आवडतात.’

डाव्या चळवळीशी सुरुवातीपासून बांधीलकी मानणाऱ्या सुर्व्यांनी ‘लोकवाङ्मय गृहा’मध्ये काही वर्षं संपादक म्हणूनही काम केलं. नंतर काही काळ ‘प्रगत प्रतिष्ठान’चं काम केलं. ‘प्रगत’ या नावानं तीन वर्षं दिवाळी अंक काढले, त्याचं संपादन केलं. २००५मध्ये सुर्वे अंधेरीतून नेरळला राहायला गेले. मे २००९मध्ये ते नाशिकला राहायला गेले, पण नोव्हेंबरमध्ये पुन्हा नेरळला परतले. नाशिक काही त्यांना मानवलं नाही. २००६नंतर अधूनमधून त्यांच्या आजाराच्या बातम्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होत राहिल्या. अखेर १६ ऑगस्ट २०१० रोजी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘अ‍ॅनिमल फार्म’ची पंचाहत्तरी साजरी करण्याचे काही प्रयोजन आहे काय?

..................................................................................................................................................................

खरा प्रतिभावंत

सुर्व्यांना खऱ्या अर्थानं आणि पुरेशा गांभीर्यानं ‘प्रतिभावंत’ म्हणता येईल. मराठीत ‘विचारवंत’ या शब्दाची अलीकडच्या काळात जी फरफट झाली आहे, तीच ‘प्रतिभावंत’ या शब्दाचीही झाली आहे. ती ज्यांना हे दोन्ही शब्द नीट समजलेले नाहीत त्यांनी केली आहे. इतरांच्या विचारांची पुनर्मांडणी करणाऱ्यांना ‘विचारवंत’ आणि कल्पनांच्या बेगडी महिरपी रंगवणाऱ्यांना ‘प्रतिभावंत’ म्हटलं जातं! सुर्वे विचारवंत नव्हते, पण ते अस्सल प्रतिभावंत होते. एका अभागी आईनं रस्त्यावर टाकून दिलेलं पोर गंगाराम नावाच्या गिरणीकामगारानं काही काळ सांभाळलं खरं, पण त्यांनाही मर्यादा असल्यानं सुर्वे पुन्हा अनाथ झाले, अनाथ म्हणून मोठे झाले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत, शाळेत शिपाई ते शिक्षक असा प्रवास. पण कविता मात्र त्या वेळच्या साहित्याला स्वत:ची सुभेदारी मानणाऱ्यांना इशारा देणारी. अवघ्या मानवी विश्वाला कवेत घेऊ पाहणारी, कष्टकऱ्यांसाठी पसायदान मागणारी. अशी शहाणीव असायला प्रतिभाच लागते.

जगण्याच्या बाबतीत एका मर्यादेपर्यंत सुर्व्यांचं कबीराशी नातं होतं, तर कवितेच्या बाबतीत बहिणाबाई चौधरींशी. जगण्याचा सच्चा अनुभव गाठीला असेल, मनगटात बळ असेल आणि सोबतीला प्रतिभा असेल तर काय करता येऊ शकतं, याची बहिणाबाई आणि सुर्वे ही दोन उत्कृष्ट उदाहरणं आहेत.

बाजारीकरणापासून दूर

सुर्व्यांना आपली कविता नेमकी कशी आहे याचं पुरेपूर भान होतं. चांगल्या जगण्याचा ‘युटोपिया’ करत राहणं, ही जगण्याची प्रेरणा असते. सुर्व्यांनी या युटोपियावर विश्वास न ठेवता, त्या प्रेरणेसाठी लढणाऱ्यांवर विश्वास ठेवला. माणसांवर थेट समपातळीवरला विश्वास ठेवणारी ही कविता असल्यामुळे त्यांनी या ‘लोकां’चं पुढारपण केलं नाही. तसल्या पुढारपणासाठी कवितेतून क्रांतीच्याही फाजील अपेक्षाही बाळगल्या नाहीत; पण लोकरंजन हाही उद्देश मानला नाही. थोडक्यात त्यांनी कवितेचं बाजारीकरण होऊ दिलं नाही.

‘कविता बरी आहे; पण कवीला छंदशास्त्राचं ज्ञान नाही,’ असं वसंत दावतरांनी सुर्व्यांबद्दल चारेक दशकांपूर्वी म्हटलं होतं. मानवी जगणं प्रत्यक्षात छंदोमय नसतं, याची जाणीव त्या काळीही कविताव्यवहाराशी जोडलेल्या फार थोड्या मंडळींना होती. आपल्या कवितांना कुणाही संगीतकाराला चांगल्या चाली लावता आल्या नाही तरी उत्तम, पण त्यासाठी मी शब्द मोडून देणार नाही, असं ठणकावून सांगणारे सुर्वे हे बहुधा मराठीतले एकमेव कवी असावेत. (हृदयनाथ मंगेशकरांना तर त्यांनी पुन्हा पुन्हा मागूनही कविता दिल्या नाहीत, ही तर फारच थोर गोष्ट म्हटली पाहिजे!)

कवितासंग्रहांचं वेगळेपण

सुर्व्यांचे चारही संग्रह व्यवस्थेवर भाष्य करणारे आहेत. त्यांची भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. सुर्व्यांचा ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ हा पहिला कवितासंग्रह १९६२ साली प्रकाशित झाला. इथल्या प्रस्थापितांविरुद्ध दिलेला तो एल्गार होता. स्वत:च्या आगमनाची अतिशय रास्त आणि निर्धोक आत्मविश्वासानं ललकारी देणारी सुर्व्यांची कविता वेगळी ठरली ती इथेच. त्यानंतरच्या ‘माझे विद्यापीठ’चं शीर्षक मॅक्सिम गॉर्कीच्या ‘माय युनिर्व्हसिटीज’शी साधर्म्य सांगणारं आहे. सुर्व्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तोवर गॉर्की वाचला नव्हता, हे खरं असलं तरी त्यांच्या विद्यापीठाची जातकुळी नेमकी कोणती आहे, हे यातून स्पष्ट होतं. त्यानंतरचा कवितासंग्रह - ‘जाहीरनामा’. तो तर सरळसरळ मार्क्स-एंजल्स यांच्या ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’ याच्याशी नातं सांगणारा होता. ‘सनद’चं शीर्षक सुर्व्यांच्या अजेंड्याला मान्यता मिळाल्याचं द्योतक आहे. ‘नव्या माणसाचे आगमन’ हा शेवटचा संग्रह लेनिनच्या तत्त्वज्ञानाशी, आम्हाला कुठल्या प्रकारचा नवा माणूस घडवायचा आहे, याच्याशी जुळणारा आहे.

या तुलनेमुळे त्यांच्या कवितेला कमीपणा येण्याचं काहीच कारण नाही. उलट सुर्व्यांचं हे मोठेपण की, त्यांनी आपली बांधीलकी कधी दडवली नाही. ‘बांधीलकी’ हा अनेक लेखक-कवींसाठी अडथळा ठरतो, पण सुर्व्यांची कविता त्यापल्याड जाणारी आहे. म्हणूनच तर ती सर्व थरांतल्या, सर्व वयोगटांतल्या, सर्व समाजगटातल्यांपर्यंत पोहोचू शकली, त्यांची मान्यता मिळवू शकली. अशी सर्वमान्यता मिळवणारे बहुधा सुर्वे शेवटचेच ठरावेत.

सुर्व्यांचं लिहिणं हीच त्यांची जगण्याविषयी बोलण्याची भाषा होती. लिहिणं हे जगण्याशी किती सम साधून असतं, याचं उदाहरण म्हणूनही सुर्व्यांचं नाव घ्यावं लागेल. त्यामुळेच सुर्व्यांच्या प्रत्येक कवितेत त्यांचं थोडं थोडं आत्मचरित्र आलं आहे. सुर्व्यांनी आत्मचरित्र लिहिलं नाही, कारण ते त्यांच्या कवितेत आलं होतं. आणि ते लिहिलं असतं तर ‘बाळगलेला’ हे त्याचं नाव त्यांनी ठरवलं होतं. कोल्हापूरच्या रिमांड होममधल्या मुलांशी बोलतना सुर्वे म्हणाले होते, ‘मी बाळगलेला पोर होतो, तुम्ही सांभाळलेली मुलं आहात.’

सुर्व्यांनी आपल्या अनाथपणाचं कधी भांडवल केलं नाही. लेखन ही अतिशय गंभीरपणे करायची गोष्ट आहे असे मानणारे, जाणणारे आणि जगणारे सुर्वे होते. म्हणूनच त्यांच्या कवितेत जगण्याची उमेद आणि ऊर्जा दिसते. साहित्याच्या श्रेष्ठतेची मानकं अशा गोष्टींमुळेच तयार होत असतात. समूहाची भाषा बोलणारं लेखन नेहमीच क्लासिक सदरात मोडत आलं आहे. सुर्व्यांच्या लेखनाचाही तोच दर्जा आहे.

..................................................................................................................................................................

‘नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4305/Narayan-Surve-yanchya-samgra-Kavita

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Swapnil Hingmire

Thu , 20 August 2020

सुर्वेंवरचा लोकसत्तातील अतिशय सुंदर मृत्युलेख http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=93862:2010-08-16-15-50-24&Itemid=1


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......