अलीकडच्या काळात वयाच्या नव्वदीनंतरही लेखन-वाचन-संशोधन यांत गढून गेलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती किती, असा प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढीही सापडावयाची नाहीत. काल वयाच्या १०३व्या वर्षी स्वर्गलोकवासी झालेले डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे ते त्यापैकी एक अतिशय महत्त्वाचं आणि कदाचित पहिल्या क्रमांकावर असलेलं नाव म्हणून सांगता येईल.
संस्कृत, प्राकृत, निरुक्त, महाभारत; तसंच ‘अवेस्ता’ या पारशी धर्मग्रंथाचे अभ्यासक, प्रकांड पंडित असलेल्या मेहेंदळे यांच्या कामाची नुसती यादी करायची म्हटली तरी एक मोठा ग्रंथ होईल. डेक्कन कॉलेज, भांडारकर प्राच्यविद्या संस्था या ठिकाणी त्यांनी प्रदीर्घ काळ काम केलं. ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ आणि ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ ही त्यांची छाती दडपून टाकणारी कामं आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणली गेली आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेनं प्रकाशित केलेल्या महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीच्या संपादनामध्येही त्यांचं मोलाचं योगदान आहे. वेद, महाकाव्य, महाभारत, निरुक्त, ऐतिहासिक भाषाशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते. त्यांनी संस्कृत, इंग्लिश आणि मराठी या तिन्ही भाषांमध्ये ग्रंथलेखन केलं आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय आदर असलेल्या या प्रकांड पंडिताविषयी महाराष्ट्रात फारसं कुणाला माहीत नव्हतं, ही दुर्दैवाचीच गोष्ट म्हणावी लागेल. डॉ. अशोक केळकर, कृष्ण अर्जुनवाडकर, रा. ना. दांडेकर, रा. गो. भांडारकर यांच्याविषयी तरी कुठं माहीत असतं! तर ते असो.
मेहेंदळे यांनी आपलं बहुतांश लेखन इंग्रजी, संस्कृतमध्ये केलं असलं तरी त्यांनी मराठीमध्येही अनेक लेख व काही पुस्तकंही लिहिली आहेत.
‘प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती’ हे त्यांचं एक महत्त्वाचं पुस्तक वाईच्या प्राज्ञपाठशाळेनं प्रकाशित केलं आहे. त्याला तत्त्वज्ञानाचे अभ्यासक मे. पुं. रेगे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. रेगे व मेहेंदळे ही १९४६ ते ४८ अशी तीन वर्षं नवसारीच्या गार्डा महाविद्यालयामध्ये सहकारी होते. त्यावेळी रेगे सात्त्विक स्वभावाच्या मेहेंदळे यांच्याकडे आकर्षित झाले. त्यामुळे त्यांनी प्रस्तावनेच्या सुरुवातीलाच लिहिलं आहे – “मला सुरुवातीलाच हे सांगितले पाहिजे की, या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचा अधिकार मला नाही. वेद, महाभारत, रामायण, भगवदगीता इ. ज्या ग्रंथांतील विषयांवरील आणि समस्यांवरील निबंधांचा संग्रह येथे करण्यात आला आहे, त्यांचा मी अभ्यासक नाही. परंतु अधिक विचार करता मला असे वाटते की, ‘अधिकारा’ची परिभाषा वर्ज्य केली तर, ही प्रस्तावना मी लिहिण्यात अनौचित्य होणार नाही. कारण मेहेंदळ्यांनी यांतील बहुतेक लेख सामान्य, सुशिक्षित वाचक डोळ्यांपुढे ठेवून, त्यांना उद्देशून लिहिले आहेत.”
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
मेहेंदळ्यांच्या या बहुमोलाच्या पुस्तकात ‘सत्यमेव जयते, नानृतम्’ या नावाचं दुसरंच प्रकरण आहे. त्याची त्यांनी सुरुवातच अशी केली आहे – “ ‘सत्यमेव जयते, नानृतम्’ हे मुण्डकोपनिषदातील (३.१.६) वचन बहुतेकांच्या परिचयाचे आहे. त्यातील पहिला भाग स्वतंत्र भारताचे ब्रीदवाक्य म्हणूनही निवडला गेला आहे. या वाक्याचा अर्थ ‘सत्याचाच (नेहमी) जय होतो, खोट्याचा नव्हे’ असा आजवर लावण्यात आला आहे. परंतु उपनिषदात ज्या संदर्भात हे वाक्य आले आहे, तो पाहता हा अर्थ योग्य नाही असे वाटते. हा अर्थ करताना उपनिषद्वाक्यात ‘सत्यम्’ यास कर्ता मानिले आहे, परंतु ते योग्य नाही. या वाक्यात ‘सत्यम्’ (आणि ‘अनृतम्’) हे कर्म असून ऋषी हा कर्ता म्हणून घ्यावयाचा आहे. म्हणजे वाक्याचा अर्थ असा होईल : ‘ऋषी सत्य तेच मिळवितो, अनृत (मिळवीत) नाही.’ उपनिषदात ऋषिमुनींचे ध्येय ब्रह्मप्राप्ती करून घेणे हे आहे, आणि हे ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य होय. येथे सत्य हे साध्य आहे. त्या सत्याखेरीज जे काही असेल ते अनृत होय, ते साध्य नव्हे (द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तं च अमूर्तं च | अथ यन्मूर्तं तद् असत्यं, यदमूर्तं तत् सत्यम् | मैत्रि ६.३)”
प्रकांड पंडित म्हटला की, तो विद्वजड, बोजड आणि क्लिष्टच लिहिणार या समजाला मेहेंदळे सणसणीत अपवाद होते, याची प्रचिती वरील परिच्छेदावरून येईल. आणि मेहेंदळ्यांचा अभ्यास किती जाणकारीचा होता, याचा अदमासही लावता येईल. ‘नवभारत’, ‘साधना’, ‘सकाळ’, ‘केसरी’, ‘सत्याग्रही विचारधारा’ या नियतकालिकांतून त्यांनी केलेलं लेखन आवर्जून वाचावं असं आहे. ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकातली त्यांची महाभारतावरची लेखमालाही अशीच सुबोध, सुगम्य आणि विचारपरिलुप्त होती. बहुधा ती अजून पुस्तकरूपानं प्रकाशित झाली नसावी.
शिक्षणानं, पेशानं आणि कर्मानं पुणेकर असलेले मेहेंदळे मूळचे मध्य प्रदेशमधील. तेथील निमार जिल्ह्यातील हरसूड या गावी मेहेंदळे यांचा १४ फेब्रुवारी १९१८ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील तिथं रेल्वेमध्ये नोकरीला होते. प्राथमिक शिक्षणानंतर मात्र मेहेंदळे बडोद्याला आले. १९३७ साली त्यांनी पदवी मिळवली. नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी ते मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये दाखल झाले. तर १९४३ साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी ‘हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत’ या विषयात पीएच.डी. केली. शेवटपर्यंत ते पहिल्या श्रेणीत उत्तीण झाले. त्यांचा पीएच.डी.चा प्रबंध डेक्कन कॉलेजने १९४८ झाली प्रकाशित केला. त्याच वर्षी त्यांचं ‘अशोकन इन्स्क्रिप्शन्स इन इंडिया’ हे पुस्तकही प्रकाशित झालं.
मेहेंदळे हे त्यांच्या कुटुंबातले पहिलेच डॉक्टरेट ही पदवी मिळवणारे. शिक्षणानंतर कर्नाटकातील बागलकोटमधील बसवेश्वर कॉलेजमध्ये ते प्रपाठक म्हणून जॉइन झाले, परंतु लवकरच म्हणजे १९४५ साली नवसारीला परत येऊन एस.बी. गार्डा कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक झाले. १९५१ पर्यंत त्यांनी तिथं काम केलं. त्या दरम्यान त्यांनी वेद आणि संस्कृत ग्रंथांवर लेख लिहायला सुरुवात केली. १९५१ साली मेहेंदळे पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये रीडर म्हणून जॉईन झाले, सात वर्षांनी तिथंच प्राध्यापक झाले. याशिवाय त्यांनी देशातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्यानं दिली आहेत.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘अॅनिमल फार्म’ची पंचाहत्तरी साजरी करण्याचे काही प्रयोजन आहे काय?
..................................................................................................................................................................
१९५२-५४ साली त्यांना जर्मनीतील Goettingen विद्यापीठाने अभ्यागत प्राध्यापक म्हणून बोलावलं. तिथं त्यांनी प्रा. ई. Waldschmidt यांना प्राकृतावरील संशोधनात मदत केली. १९५७-५८ साली त्यांना अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशनची प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळाली. १९७३ साली त्यांची ‘डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स’ या शब्दकोशावर संपादक म्हणून नेमणूक झाली. ए.एम. घाटगे मुख्य संपादक होते. हा शब्दकोश संस्कृतच्या अभ्यासकासाठीच उपयुक्त आहे असे नाही, तर वेद-उपनिषदांची परंपरा, त्यांचा अर्थ, त्यातील संज्ञा समजावून घेण्यासाठीही हा शब्दकोश विश्वसनीय दस्तवेज आहे. चार हजारांहून अधिक पानांचा हा शब्दकोश जगभरातील संस्कृतचे अभ्यासक वापरतात.
निवृत्तीनंतर रा.ना. दांडेकरांनी मेहेंदळे यांना भांडाकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत ‘एपिलॉग ऑफ द महाभारत’चा संपादक म्हणून बोलावलं. तिथं त्यांनी पुढे ‘कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही पूर्ण केला. सलग पंचवीस वर्षं त्यांनी कुठलाही मोबदला न घेता या प्रकल्पावर काम केलं. पाचेक वर्षांपूर्वी त्यांनी भांडारकरसाठी काम करणं थांबवलं. वाचन आणि नातवांसाठी वेळ देता यावा म्हणून. नातवांसाठी त्यांनी ‘द लिटल प्रिन्स’ या जगप्रसिद्ध बालकादंबरीचा मराठी अनुवादही केला आहे.
‘महाभारत’ हा मेहेंदळे यांच्या सर्वाधिक आवडीचा विषय. त्याविषयी त्यांनी काही वर्षं ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकात सदरही लिहिलं आहे. १९९०मध्ये त्यांचं ‘प्राचीन भारतीय द्यूत’ हे महत्त्वाचं पुस्तक प्रकाशित झालं. “संस्कृत वाङ्मयात द्यूताविषयीचे उल्लेख अगदी ऋग्वेदापासून आढळतात. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतात तो एक लोकप्रिय मनोरंजनाचा प्रकार होता. अर्वाचीन काळात सारीपाटाचा खेळ सुमारे चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत बराचसा प्रचारात होता; आणि आजही नवनवीन साधनांच्या साहाय्याने द्यूत जगात सर्वत्र प्रभाव गाजवून आहेे,” असा या पुस्तकामागचा उद्देश मेहेंदळ्यांनी या पुस्तकाच्या प्रास्ताविकात नोंदवला आहे. या पुस्तकाची मूळ प्रेरणा त्यांना प्रा. ल्यूडर्स यांच्या लेखावरून झाली. त्यावरून प्रेरित होऊन त्यांनी या विषयाचा धांडोळा घेतला.
‘महाभारताविषयीच्या अनिवार प्रेमामुळे रामायणाचा अभ्यास करायचा राहून गेला’, असं त्यांनी म्हटलं आहे, पण त्यांचा रामायणाचाही चांगला अभ्यास होता. ‘नवभारत’ मासिकाच्या मे-जून १९८८च्या अंकात मेहेंदळे यांचा ‘रामायण : समज आणि गैरसमज’ हा तब्बल २१ पानांचा लेख आहे. या लेखात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘रिडल्स इन रामायणा’ या पुस्तकाचा साधार व तपशीलवार प्रतिवाद केला आहे. असाच प्रतिवाद त्यांनी भाऊ धर्माधिकारी यांच्या ‘गीताचिकित्सा’ या पुस्तकाचाही (नवभारत, नोव्हें-डिसेंबर १९९२) केला आहे. खरं तर ही दोन्ही भाषणं आहेत.
त्यांच्या अभ्यासाचा आवाका, त्यातील बारकावा आणि ऋजुता या निवडक लेखांतून जाणून घेता येईल. खरा संशोधक नेहमीच नम्र असतो, पण तो तितकाच परखडही असतो. नम्रता व्यक्ततेत असते आणि स्पष्टता विचारांत असते, याचा नितांतसुंदर प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : फेसबुकला ‘जबाबदार’ होण्यासाठी भाग पाडणे, हाच एक मार्ग आहे…
..................................................................................................................................................................
ऑक्टोबर १९९६च्या अंकात मेहेंदळे यांनी विनोबा भावे यांच्या ‘उपनिषदांचा अभ्यास’ या पुस्तकाचं सविस्तर परीक्षण केलं आहे. त्याच्या शेवटी ते म्हणतात – “विनोबांनी उपनिषदांचा सूक्ष्म अभ्यास आणि त्यावर दीर्घकाळ चिंतन केले आहे ह्यात संशय नाही. खेरीज त्यांचे अनुभवविश्वही फार मोठे आहे. त्यामानाने माझे वाचन आणि अनुभवविश्व मर्यादित आहे. माझ्याजवळ जी शिदोरी आहे तिच्या आधारे वरील परीक्षण केले आहे. ते पूर्ण झाल्यावर फिरून एकदा म्हणावेसे वाटते की, प्रस्तुत ग्रंथ हे विनोबांचे ओमकार-उपनिषद आणि शान्ति-उपनिषद आहे. त्यांत उपनिषदांत सांगितलेले जसे आहे, तसेच उपनिषदांत न सांगितलेले पण विनोबांनी आपल्या परिणतप्रज्ञेने कल्पिलेले असे बरेचसे आहे. उपनिषदांत ओमकार आणि शान्ति ह्याविषयी काय कल्पना आहे, किंवा काय कल्पना असावी असे विनोबांना वाटते, हे ह्या ग्रंथवाचनाने समजू शकते.”
तुम्हाला वाटेत असेल की, संस्कृत, प्राकृत, वेद, उपनिषदं, महाभारत यांवर इंग्रजी-मराठी-संस्कृतमध्ये लेखन करणारा संशोधक अतिशय बोजड लिहीत असेल. तर तुमची समजूत अतिशय चुकीची आहे, असंच म्हणावं लागेल. विनोबा भाव्यांविषयीच्या वरील परिच्छेदातून त्याची कल्पना येऊ शकेल. मेहेंदळे यांचं मराठी लेखन अतिशय सोपं, सुगम आणि विचारगर्भ असतं. मराठीच्या प्राध्यापकांनी मेहेंदळे यांचं लेखन आवर्जून वाचायला हवं. अतिशय विद्वताप्रचूर विषयांवरही किती साध्या, सोप्या पद्धतीने लिहिता येतं, याचा वस्तुपाठ म्हणून मेहेंदळे यांच्या लेखनाचा हवाला देता येईल.
आयुष्यभर लेखन-संशोधनात गढून गेलेले मेहेंदळे यांचं त्यांच्या पत्नीवर निरतिशय प्रेम होतं. त्या काळी त्यांनी जातीबाहेर जाऊन त्यांच्याशी लग्न केलं. त्यांचं सहजीवनही गांधीवादी विचारानं समृद्ध झालेलं होतं. त्यांचं नाव कुसुम काशिनाथ परळीकर. १४ डिसेंबर १९४१ रोजी त्यांचा विवाह झाला. गांधीवादी असणाऱ्या कुसुमताईंनी शेवटपर्यंत खादीची वस्त्रं वापरली. मेहेंदळेही खादीची वस्त्रं वापरत. कुसुमताईंनी डेक्कन कॉलेजमध्ये सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम केलं. त्यांना अशोक आणि प्रदीप अशी दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी कुसुमताईंचं निधन झालं.
१४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. तेव्हाही ते विनोदबुद्धी राखून होते. ऐकायला कमी येत असलं तरी स्मरणशक्ती बऱ्यापैकी खणखणीत होती. त्याआधी सहा महिन्यांपूर्वीच त्यांना साहित्य अकादमीनं त्यांना ‘भाषा सन्मान’ देऊन गौरवलं होतं.
वर उल्लेख केलेल्या प्रस्तावनेत रेगे यांनी पुढे लिहिलं आहे – “मेहेंदळ्यांचे वैशिष्ट्य असे की, ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे, प्राच्यविद्येत मौलिक संशोधन करणारे पंडित असले तरी या विषयांतील जटिल प्रश्नांवर मराठीतून लिखाण करतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती वाचकांना चोखपणे सादर करतात. अगोदरच्या संशोधकांनी काढलेले निष्कर्ष त्यांच्या आधारांसह नमूद करतात. त्यांचे नि:पक्षपातीपणे मूल्यमापन करतात, आणि अखेरीस आपला निर्णय देतात. या साऱ्या समालोचनात कुठेही, यत्किंचितही अभिनिवेश नसतो. उदा. कौरवांचा राग नाही, पांडवांवर लोभ नाही, श्रीकृष्णावर आंधळी भक्ती नाही, त्याच्या हातून अनुचित कर्म होणारच नाही, असा अगोदरच निर्वाळा दिलेला नाही. मेहेंदळ्यांचा समतोलपणा असाधारण आहे. त्यांची भेदक मर्मदृष्टीही तितकीच असाधारण आहे. त्यांच्यासोबत ग्रंथवचनांचा मागोवा घेत, त्यांनी मांडलेल्या युक्तिवादांना अनुसरून वाचक जातो, तेव्हा ज्या प्रश्नाची चर्चा होत असते, त्याच्या गाभ्याला आपण भिडलो आहो, प्रश्नाची उकल करण्याची किल्ली हातात आली आहे, असा प्रत्यय त्याला येतो.”
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
१४ फेब्रुवारी हा जगभरातल्या प्रेमिकांचा दिवस. जगभर तो ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा होतो. याच दिवशी जन्मलेल्या मेहेंदळ्यांनी आयुष्यभर अभ्यास-संशोधन यावर प्रेम केलं. ‘यः क्रियावान् स पण्डितः ।’ (विद्वतेसोबत जो क्रियावान असतो, तोच पंडित असतो!) हे पुणे विद्यापीठाचं बीद्र मेहेंदळ्यांच्या आयुष्याचं ब्रीद होतं.
अशा या प्रकांड पंडिताला, प्राच्यविद्येच्या अभ्यासकाला, समतोल विद्वानाला आणि नि:पक्ष अभ्यासाला ‘अक्षरनामा’ची भावपूर्ण आदरांजली!
..................................................................................................................................................................
म. अ. मेहेंदळे यांची काही इंग्रजी पुस्तके : १) हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत, १९४८, २) निरुक्त नोटस, भाग १, १९६५, ३) निरुक्त नोटस, भाग २, १९७८, ४) वेदा मॅन्युस्क्रिप्टस, १९६४, ५) सम अॅस्पेक्टस ऑफ इंडो-आर्यन लिंग्विस्टिक्स, १९८६, ६) डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स – डॉ. घाटगे-मेहेंदळे, १९७३, ७) रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स – डॉ. घाटगे-मेहेंदळे, १९७३, ८) मधुविद्या, २००१
मराठी पुस्तके : १) ऋग्वेद संहिताकार आणि फादर इस्तेलर, १९७६, २) मराठीचा भाषिक अभ्यास, १९७९, ३) वैदिक वाङ्मयातील प्रश्नोत्तरे, १९८०, ४) वरुणविषयक विचार, ५) प्राचीन भारतीय द्यूत, १९९०, ६) प्राचीन भारत – समाज आणि संस्कृती, २००१, ७) वेदार्थनिर्णयाचा इतिहास, २००६, ८) खेळ मांडीयेला - मूळ लेखिका व्हर्जनिया एम. अॅक्सलिन, स्वैर अनुवाद डॉ. म. अ. मेहेंदळे, डॉ. संजय ओक, २००६, ९) वैदिक वाङ्मयातील प्रश्नोत्तरे
..................................................................................................................................................................
डॉ. मधुकर मेहेंदळे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याविषयीची बनवलेली फिल्म -
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 26 August 2020
डॉक्टर मधुकर अनंत मेहेंदळे यांच्या विद्वत्तेस व योगदानास अभिवादन. समयोचित श्रद्धांजलीबद्दल अक्षरनामाचे आभार.
अशा विद्वानांची ओळख त्यांच्या हयातीत वाचायला आवडेल. जमल्यास आमची हौस पुरवावी ही विनंती.
-गामा पैलवान