१.
जगप्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑर्वेल यांची ‘Animal Farm’ ही कादंबरी १७ ऑगस्ट १९४५ रोजी प्रकाशित झाली. त्याला काल ७५ वर्षं पूर्ण झाली.
या कादंबरीच्या गेल्या ७५ वर्षांत अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत- वेगवेगळ्या प्रकारांत, वेगवेगळ्या आकारात. जगभरातल्या अनेक भाषांमध्ये तिचे अनुवादही झाले आहेत. जगभरातल्या अनेक भाषेतल्या अनेक समीक्षकांनी, अभ्यासकांनी तिच्याविषयी वेगवेगळ्या अंगानं लिहिलं आहे.
त्यामुळे या कादंबरीविषयी काही समजही प्रचलित झाले आहेत. त्यातले काही बाळबोध आहेत, काही स्वत:चा कपाळमोक्ष करून घेणारे आहेत. काही सोयीस्कर आहेत, तर काही इतरांवर शरसंधान करू पाहणारे आहेत.
या कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीच्या मुखपृष्ठावर ‘A FAIRY STORY’ (एक परीकथा) असा उल्लेख होता. नंतर तो गाळला गेला. ऑर्वेलनीसुद्धा ही कादंबरी ‘FABLE’ (दंतकथा) असल्याचं म्हटलं आहेच. म्हणजे काय? तर ही कादंबरी ‘इसापनीती’सारखी आहे. ज्यात प्राणी माणसारखं बोलतात, वागतात, जगतात. त्यामुळे वरकरणी या कादंबरीविषयी अनेकांची फसगत होते किंवा होऊ शकते. त्यात नावही ‘Animal Farm’. त्यामुळेच २०१६ साली एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मुलांच्या कल्पनाशक्तीत वाढ होण्यासाठी ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’, ‘हॅरी पॉटर’ या पुस्तकांबरोबरच ‘अॅनिमल फार्म’ या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. या कादंबरीमुळे मुलांना प्राणिमात्रांवर प्रेम कसं करता येईल आणि त्यांची काळजी कशी घेता येईल याबाबतची माहितीही मिळेल, अशा स्वरूपाची विधानं केली होती. त्यावरून शिल्पा शेट्टीवर नंतर सोशल मीडियावर बरीच टीकाही झाली. खरं तिची काहीच चूक नव्हती. खरी चूक आहे ती जॉर्ज ऑर्वेलचीच. त्यांनी ‘Animal Farm’ असं या कादंबरीचं नाव ठेवलं. रुडयार्ड किपलिंग या प्रसिद्ध कादंबरीकाराचं ‘The Jungle Book’ (१८९४) नावाचं गोष्टींचं पुस्तक आहे. यातील प्राणी माणसांसारखंच बोलतात. शिवाय त्यात मोगली नावाचा एक माणसाचा मुलगाही आहे. तो प्राण्यांसारखं वागतो, जगतो. त्यामुळे शिल्पा शेट्टीला ऑर्वेलचं पुस्तकही तसंच वाटलं असावं बहुतेक.
नामसाध्यर्म्यावरून कुणीही फसगत होऊ शकतेच की! कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी न जाता, न वाचता किंवा त्याविषयी जाणून न घेता बोलायला गेलो की, असं होतंच. ‘इसापनीती’, ‘जंगलबुक’ या नावांशी साध्यर्म्य असणारं ‘Animal Farm’ हे नाव आहेच ना!! त्यामुळे शिल्पा शेट्टी किंवा इतरही कुणाचं या प्रकारचं निरीक्षण क्षम्यच मानायला हवं.
त्यात या कादंबरीचा आकार म्हणजे तिची पानेही जेमतेम ७०-७५. मुलांची पुस्तकं अशीच बारकुली असतात. (‘हॅरी पॉटर’चा अपवाद म्हणायला हवा. पण अशा भरगच्च पृष्ठसंख्या असलेल्या मुलांच्या पुस्तकांची संख्याही तशी कमी आहे.)
शिवाय ‘रूपककथा’ऐवजी आणि तिच्यामागच्या पार्श्वभूमीऐवजी पहिल्या आवृत्तीवर असलेल्या उल्लेखाप्रमाणे केवळ ‘परीकथा’ म्हणून ही कादंबरी वाचली तर ती मुलांसाठीच लिहिलेली असावी, असं शहाण्यांनाही वाटू शकतंच की! असो.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
२.
सध्या अमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या नावाची चर्चा चालू आहे. भारतात तर जरा जास्तच कौतुक होतंय. त्या निवडून आल्या तर अमेरिकेच्या इतिहासात क्रांती होईल असं म्हटलं जात आहे. कारण एक महिला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पदावर निवडली जाईल. कमला या अर्ध्या भारतीय. म्हणजे त्यांच्या आई भारतीय. त्यामुळे भारतीयांनाही त्यांचं कौतुक वाटतंय.
तसंच कौतुक भारतीयांना जॉर्ज ऑर्वेल यांच्याविषयीही वाटायला हवं. कारण त्यांचा जन्म भारतातला. त्यांचे वडील मोतीहारी या तेव्हा बंगाल आणि आता बिहारमध्ये असलेल्या गावी इंडियन कस्टम खात्यात ब्रिटिशांच्या नोकरीत होते. याच गावी २५ जून १९०३ रोजी ऑर्वेल यांचा जन्म झाला. त्यांचं शालेय शिक्षण मात्र लंडनमध्ये झालं. पण घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे त्यांना वयाच्या १९व्या वर्षी शिक्षण थांबवून नोकरी धरावी लागली. ते ब्रह्मदेशात ‘इंडियन इम्पीरिअल पोलीस’ सेवेत दाखल झाले. पाच वर्षांनंतर ही नोकरी त्यांनी सोडून दिली आणि लेखक व्हायचं ठरवलं. मानवी क्रौर्य, जुलूम, जबरदस्ती, दडपशाही या ब्रिटिशांच्या धोरणाला ऑर्वेल वैतागले होते, हेही नोकरी सोडण्यामागे एक कारण होतंच.
ते लंडनला परतले, पण तिथं त्यांचे हाल झाले. मग त्यांनी पॅरिसची वाट धरली. वर्तमानपत्राचे गठ्ठे उचल, हॉटेलात वेटर म्हणून काम कर, झोपडपट्टीत रहा, फुटपाथवर झोप, अशा गोष्टी त्यांच्या नशिबी आल्या. आपण ब्रह्मदेशात केलेल्या पापाची ही शिक्षा आहे, असं समजून ऑर्वेलनी तेही केलं. इंग्लंड व पॅरिसमधल्या या दारिद्रयाच्या अनुभवावर ऑर्वेलनी पुस्तक लिहिलं – ‘डाउन अँड आउट इन लंडन अँड पॅरिस’. ते १९३३ साली प्रकाशित झालं. या त्यांच्या पहिल्या पुस्तकाला खूप यश मिळालं नाही, पण ऑर्वेलची लेखक म्हणून ओळख मात्र निर्माण झाली.
नंतर त्यांनी लंडनमध्ये शाळामास्तरची नोकरी धरली. पण सततच्या आजारपणालामुळे ती सोडून ते हॅम्पस्टीडला राहायला गेले. तिथं सुरुवातीला एका पुस्तकाच्या दुकानात अर्धेवेळ विक्रेता म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ते एका इंग्रजी साप्ताहिकासाठी कादंबऱ्यांची परीक्षणं करू लागले. दरम्यान १९३४ साली त्यांनी ब्रह्मदेशातल्या अनुभवावर ‘बर्मीज डेज’ ही कादंबरी लिहून प्रकाशित केली. त्याच्या पुढच्या वर्षी ‘अ क्लर्जिमन्स डॉटर’ आणि त्याच्यापुढच्या वर्षी ‘कीप द अॅस्पिडिस्ट्रा फ्लाइंग’ या त्याच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. या तिन्ही कादंबऱ्यांना फारश यश मिळालं नाही. पण त्यांच्यामुळे ऑर्वेल यांची ‘कादंबरीकार’ म्हणून ओळख निर्माण झाली. ते स्वत:ही आपल्या या चारही पुस्तकांवर फारसे खुश नव्हते. लंडनहून हर्टफोर्डशायरला राहायला गेलेल्या ऑर्वेल यांनी आपल्या प्रकाशकाच्या सांगण्यावरून लंडनच्या उत्तर भागाचा दौरा करून ‘द रोड टू वायगन पीअर’ (१९३७) हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचा प्रकाशक डावा आणि पुस्तकात ब्रिटिशांवर टीका, यामुळे ऑर्वेल कम्युनिस्ट असल्याचा गवगवा सुरू झाला.
खरं तर ऑर्वेल कम्युनिस्ट नव्हता, पण नाईलाज को क्या इलाज?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
३.
दरम्यान ऑर्वेलचे लग्न झालं. ओढगस्तीचा संसार सुरू झाला. १९३६च्या शेवटी ऑर्वेल स्पेनला गेले नि तिथल्या यादवी युद्धात सहभागी झाले. स्पॅनिश हुकूमशहा जनरल फ्रँकोच्या विरोधात त्या देशातील बंडखोरांनी युद्ध पुकारलं होतं. या फ्रँकोला जर्मनी आणि इटलीच्या हुकूमशहांनी उघडपणे मदत केली. युरोपातल्या इंग्लंडसहित इतर राष्ट्रांनी या यादवीकडे दुर्लक्ष केलं. कारण कम्युनिस्टांचा बिमोड फॅसिझमकडून होत असेल तर त्यांच्यासाठी ती आनंदाचीच बाब होती. खरं तर ऑर्वेल गेला होता बातमीदारी करायला, पण हे सगळं राजकारण पाहून त्यानं थेट युद्धातच सहभाग घेतला. हे युद्ध दीडेक वर्षं चाललं. दरम्यान यातून हुकूमशहांचा पाडाव होऊन लोकशाहीची स्थापना स्पेनमध्ये होईल, ही ऑर्वेलची आशा फोल ठरली. कारण युद्धखोरांच्या दोन्ही बाजूला हुकूमशाही प्रवृत्ती होत्या. त्यांना लोकशाहीचं प्रेम नव्हतं. हे पाहून ऑर्वेल अस्वस्थ झाले. त्याविषयी ऑर्वेलने बोलायला सुरुवात केली, तेव्हा तेच अडचणीत आले. मग काय, त्यांना पत्नीसह इंग्लंडला परतावं लागलं.
कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट यांच्या सर्वंकष साम्राज्यवादी सत्ताकांक्षेचं जे दर्शन ऑर्वेल यांना या काळात झालं, त्यातून त्यांनी ‘होमेज टू कॅटॅलोनिया’ (१९३८) आणि ‘कमिंग अप फॉर एअर’ (१९३९) या दोन पुस्तकांचं लेखन केलं. पहिलं पुस्तक हे ऑर्वेल यांच्या या युद्धातल्या प्रत्यक्ष अनुभवाचं वार्तांकन होतं. ते या युद्धात सहभागी झाले खरे, पण डोंगराळ प्रदेशात युद्धाचा फारसा जोर नव्हता, त्यांच्यावर गोळीबार करण्याचे प्रसंगसुद्धा फारसे आले नाहीत. तरीही स्वत:चे अनुभव सांगायचे असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी शैली निवडली ती अनुभव व इतिहास कथन, अशा दुहेरी स्वरूपाची. स्वत:चे अनुभव, त्यांचं विश्लेषण, निरीक्षणं, निष्कर्ष असं या पुस्तकाचं स्वरूप आहे. त्यातून त्यांनी युद्धामुळे दुभंगलेला स्पेनचा समाज उभा केला.
तर ‘कमिंग अप फॉर एअर’ ही कादंबरी भविष्यात येऊ घातलेल्या महायुद्धाची भविष्यवाणी करणारी होती. पण १९३९ साली परत महायुद्ध होणार, ही कल्पना अनेकांना वेडगळपणाची वाटली. त्यामुळे या कादंबरीला कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नाही.
याच दरम्यान राजकारण हा ऑर्वेल यांच्या आवडीचा विषय झाला. ऑर्वेल शाळेत शिकत होते, त्यावेळचे इंग्लंड हे कम्युनिझमबद्दल आस्था बाळगणारं होतं. ब्रह्मदेशातून लेखक होण्यासाठी ऑर्वेल इंग्लंडला परतले तेव्हाही रशियातल्या कम्युनिझमच्या प्रयोगाबद्दल भरभरून कौतुक केलं जात होतं. पण १९२७-२९मध्ये भीषण आर्थिक मंदी आली आणि सोव्हिएत रशियाचा प्रयोगला ‘दंतकथे’चे स्वरूप आलं. पण कम्युनिझमबद्दलचं इंग्लंडमधल्या लेखक-कलावंतांचं प्रेम भरातच होतं. भांडवलशाही, साम्राज्यवाद यांच्या विरोधात असलेल्या आणि त्याविरोधात लिहिणाऱ्या ऑर्वेलचा समावेशही ‘डाव्या’ लेखक-कलावंतांमध्ये होऊ लागला होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
४.
पण स्पेनहून परतलेले ऑर्वेल पूर्वीचे राहिले नव्हते. कम्युनिझमबद्दल जिव्हाळा वाटत असला तरी हिटलरचा जर्मनी आणि स्टालिनचा रशिया यांच्यातली हातमिळवणी पाहून त्यांचा भ्रमनिराश झाला होता. भविष्यातल्या महायुद्धाची चाहूल त्यांना स्पष्टपणे दिसू लागली होती. ‘कमिंग अप फॉर एअर’ या कादंबरीत त्या विषवृक्षाच्या सावल्या त्यांनी स्पष्टपणे मांडल्या. ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं.
ऑगस्ट १९४१मध्ये ऑर्वेल बीबीसीच्या भारतीय विभागात निर्माता म्हणून रुजू झाले. पण अवघ्या दोन वर्षांतच त्यांनी ही नोकरी सोडून ‘ट्रिब्युन’ या वर्तमानपत्राचे संपादक म्हणून काम करायला सुरुवात केली. १९४३मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं. पत्नी सारखी आजारी पडत होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सावल्या लांबवर पसरल्या होत्या. त्यांचं दारिद्रय त्यांची परवड करत होतं. पण ऑर्वेल द्रष्टे होते. त्यांना भविष्यात काय घडणार हे दिसू लागलं होतं. त्यामुळे १९४३ सालच्या अखेरीला त्यांनी आपली नवी कादंबरी लिहायला सुरुवात केली. तिचं नाव - ‘अॅनिमल फार्म’. फेब्रुवारी १९४४मध्ये ती लिहून पूर्ण झाली. स्पेनहून परतलेल्या ऑर्वेलनी ‘कमिंग अप फॉर एअर’सारखी कादंबरी लिहिली होती, पण त्यानंतरही त्यांच्या आयुष्यात, मनोविचारात उलथापालथ होत होती. दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे ऑर्वेलनी ‘अॅनिमल फार्म’साठी परीकथा आणि राजकीय उपहास यांचं अफलातून मिश्रण असलेला फॉर्म निवडला. कादंबरी लिहून झाली, पण महायुद्ध चालू असल्यामुळे ती प्रकाशित करता येईना. १९४५च्या उत्तरार्धात या महायुद्धाला उतार पडायला सुरुवात झाली. पुढच्या दोन-तीन महिन्यात महायुद्ध थांबेल असं दिसू लागलं, तेव्हा १७ ऑगस्ट १९४५ रोजी ‘अॅनिमल फार्म’ एकदाची प्रकाशित झाली.
कादंबरीचा विषय अफलातून होता, तिची मांडणीही भन्नाट होती आणि शैलीही जबरदस्त. त्यामुळे ही कादंबरी अल्पावधीतच लोकप्रिय झाली. ऑर्वेल यांच्या आधीच्या कादंबऱ्यांपेक्षा ही कादंबरी पूर्णपणे वेगळी होती.
माणसांची जाचक सत्ता झुगारून देण्यासाठी या कादंबरीतल्या डुकरांसह इतर प्राणी एकत्र येतात आणि आपल्या मालकाला हाकलून देतात. क्रांती करतात आणि प्राण्यांची सत्ता स्थापन करतात. आता सगळ्या प्राण्यांना इतरांचे हुकूम पाळायची गरज नाही, आता आपल्या सर्वांची सत्ता आली आहे, आता आपल्याला ‘अच्छे दिन’ येणार, असं या कादंबरीतली डुकरं इतर प्राण्यांना सांगतात. तेही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. दोन पायांच्या प्राण्याकडून चार पायांच्या प्राण्यांकडे सत्ता येते खरी, पण यातले काही चतुष्पाद लवकरच ‘All animals are equal, but some animals are more equal than others’ हे सत्तासूत्र प्रस्थापित करून इतर प्राण्यांवर जुलूम करायला लागतात.
‘All men are equal’ असं मार्क्सवाद सांगतो. पण लेनिन-स्टालिन यांच्या रशियात ते कधीच पाहायला मिळालं नाही, याचा उपहास करण्यासाठी ऑर्वेलनी ‘All animals are equal, but some animals are more equal than others’ हा वाक्यप्रयोग केला आहे. त्यातून सर्वंकष क्रांतीची भाषा करणारे सत्ताधारी होतात, तेव्हा कसे वागतात, हे अधोरेखित केलं आहे. सर्वंकष हुकूमशाही, त्यातही कम्युनिस्ट रशियातल्या हुकूमशाहीची या कादंबरीतून ऑर्वेल यांनी खिल्ली उडवली आहे, असं म्हटलं जातं.
पण ही कादंबरी आहे रूपकात्मक. त्यामुळे तिच्याकडे पाहण्याचे अनेक दृष्टीकोन आजवर मांडले गेले आहेत. वाचणाऱ्या प्रत्येकाला त्यात वेगवेगळी प्रतिबिंब दिसतात. काहींना सोयीची, काहींना गैरसोयीची. काहींना आपल्या फायद्याची, तर काहींना गैरफायद्याचीही.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
५.
परिकथेल्या दु:स्वप्नासारखी ही कादंबरी आहे, यात काहीच शंका नाही. त्यामुळे तिच्याविषयी कुणी काय समज करून घ्यावा किंवा तिच्याकडे कसं पाहावं, यावरही बंधन नाही. आता हेच पहा ना- काहींना या कादंबरीत झार, लेनिन, स्टालिन यांच्या प्रतिमा दिसतात, काहींना ही कादंबरी जगातल्या कुठल्याही क्रांतीची शोकांतिका वाटते. काही डाव्यांना ही कादंबरी किंवा ऑर्वेलचीच ‘1984’ ही कादंबरी, दोन्ही भांडवलशाही आणि हुकूमशाहीविरोधी वाटतात. काही डाव्यांनी तसे प्रयत्नही केलेले आहेत.
थोडक्यात काहींना ही कादंबरी कम्युनिझमविरोधी वाटते, काहींना भांडवलशाही विरोधी वाटते, काहींना हुकूमशाहीविरोधी वाटते, काहींना साम्राज्यवादविरोधी वाटते, काहींना सर्वंकषवादाविरोधी वाटते. त्यामुळे काहींना ती ‘प्राणीकथा’ वाटते, यावर फारसा आक्षेप घेता येत नाही.
ऑर्वेलना काय वाटतं? त्यांनी ही कादंबरी का लिहिली? स्पेनच्या यादवी युद्धात त्यांना काय पाहायला मिळालं? स्टालिनचा समाजवाद आणि हिटलरची हुकूमशाही या अंतिमत: मानवी स्वातंत्र्याच्या शत्रूच असतात, ‘सर्वंकषवाद’ हाच दोघांचाही अजेंडा असतो, या विदारक अनुभवानंतर हा ऑर्वेलनी ही कादंबरी लिहिली.
पण ही झाली पार्श्वभूमी. तेवढंच ऑर्वेलना या कादंबरीतून सांगायचं नाहीये. त्यांचा दृष्टीकोन अधिक शाश्वत सत्य सांगण्याचा प्रयत्न करणारा आहे. ‘All animals are equal, but some animals are more equal than others’ हे या कादंबरीतलं विधान भलेही मार्क्सवादाच्या उपहासातून आलेलं असलं तरी त्याची प्रचिती लोकशाही, समाजवाद, साम्यवाद, हुकूमशाही, एकाधिकारशाही, अशा सर्वच शासनप्रणाल्यांमध्ये येताना दिसते. त्या व्यक्तिरिक्त मानवी आयुष्यातही त्याची प्रचिती येतेच. माणसांचा आजवरचा इतिहास या विधानाला बळकटी देणाराच आहे. जगातल्या काही देशांत, विशेषत: इंग्लंड-अमेरिकेत लोकशाही आहे. ती भारतीय लोकशाहीपेक्षा अधिक चांगली नक्कीच आहे. पण आदर्श नाही. जगात आदर्श स्वरूपाची लोकशाही कुठेच नाही. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही, झारशाही, एकाधिकारशाही जगातल्या अनेक देशांमध्ये पाहायला मिळते. अर्थात ‘आदर्श लोकशाही’ हा ‘युटोपिया’च आहे. त्यामुळे काल, आज, उद्या जगात कुठे ना कुठे ‘अॅनिमल फार्म’मधली पात्रं वावरताना दिसत आलीत, दिसतात आणि दिसत राहतील.
ऑर्वेलनी म्हटलं आहे – “स्वातंत्र्यात सुरक्षित असणाऱ्या इंग्रजांना भविष्यातील समाजाचं भयावह चित्र दाखवण्यासाठी मी हे पुस्तक लिहिलं आहे. हे पहिलंच पुस्तक असं आहे की, ज्यात मी राजकीय हेतू आणि कलात्मक दिशा एकत्र करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे.” यातल्या पहिल्या विधानात इंग्रजांऐवजी प्रत्येकानं आपापला समाज कल्पून पाहावा. त्यातून केवळ आपल्या भविष्यातल्या समाजाचंच नाही तर आजच्या-उद्याच्या समाजाचंही प्रतिबिंब कसं दिसतं, हे पाहावं.
या कादंबरीनं प्रकाशित झाल्यापासून म्हणजे गेल्या ७५ वर्षांत ‘अ फेअरी स्टोरी’पासून उत्तरोत्तर ‘अ रिअल स्टोरी’ असा प्रवास केला आहे. त्याचं देश, स्थिती, गती, प्रकार, पद्धत यांनुसार कमी-अधिक प्रमाण पडेल, पण बाकी बरंचसं सारखं वाटू शकतं. अनेकांना ऑर्वेल यांच्या कादंबऱ्या त्यांच्या गद्यलेखनाच्या तुलनेत ‘सामान्य’ वाटतात. पण ‘Animal Farm’ असो की, ‘1984’ त्यांतील वर्णनं, स्थिती आजही जगभरातल्या अनेक देशांमध्ये दिसून येते. कदाचित त्या सा‘मान्य’ असल्यामुळेच इतकं ‘साम्य’ त्यातून दृष्टोपत्तीला येत असावं!
६.
परिकथेतली दु:स्वप्नं वाचून आपण भयभीत होत नाही. त्याची आपल्याला गंमत वाटते, ती ज्यांच्या वाट्याला येतात त्या परिकथेतल्या पात्रांविषयी कणव, सहानुभूती वाटते. पण आपण ही दु:स्वप्न कधी प्रत्यक्षात यावी किंवा प्रत्यक्षातल्या कुणाच्या (आपल्या वा इतरांच्या) वाट्याला यावीत, अशी अपेक्षा-आकांक्षा बाळगत नाही. पण आपल्या आजूबाजूचं वास्तव ‘Animal Farm’ या परीकथेतल्या दु:स्वप्नासारखं वाटू लागतं, तेव्हा आपण काय करायचं? या ‘प्रश्ना’च्या शोधातच या कादंबरीची पंचाहत्तरी आज का साजरी करायची, याच ‘उत्तर’ दडलेलं आहे. ज्यांना ते शोधायचं आहे, त्यांनी शोधावं. ज्यांना ते शोधायचं नाही, त्यांनी ही कादंबरी ‘प्राणीकथा’ वा ‘परीकथा’ म्हणून वाचावी! गेली पंचाहत्तर वर्षं ती वाचली जातेय, विकली जातेय, त्यामुळे निदान तेवढं करायला तरी हरकत नसणारच कुणाची! निदान अजून तरी.
..................................................................................................................................................................
या कादंबरीचा सारांश इंग्रजीत समजून घेण्यासाठी पहा -
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment