अजूनकाही
दरवर्षी प्रजासत्ताक दिन येतो आणि आपण तो दरवर्षी साजरा करतो. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या राष्ट्रपुरुषांविषयी आपली छाती- खरं तर आपल्यापेक्षा शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांची- अभिमानानं फुलून येते. गळा दाटून येतो. अन आपण भारावून जाऊन ‘प्रजासत्ताक दिन चिरायू हो’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देतो. रस्त्यारस्त्यावरचे लाऊडस्पीकर ढाणढाण आवाजात ‘देशाभिमान’, ‘देशप्रेम’ दिवसभर आपल्याला पाजत असतात. (ते बोधामृत न आवडणारे लोक हे ‘देशद्रोही’, ‘गद्दार’च असतात!) पण तरीही हा दिवसही थोड्याफार फरकानं आपल्या लेखी नेहमीसारखाच असतो. जे दिवस इतर अनेक दिवस आपण साजरे करतो तसाच हाही. ऑफिसला सुट्टी मिळालेली असते. म्हणून आपण घटका दोन घटका इकडे-तिकडे मिरवून घेतो. तिरंगा शर्टाच्या खिश्याला, बाईकच्या हँडलला किंवा कारच्या काचेला अडकवत फिरतो. मिरवतो. फार तर खड्या आवाजात राष्ट्रगीत वगैरे म्हणतो. शिंची, हल्लीही सिनेमागृहात त्याची सक्तीच केलीय!
घरी आल्यावर वर्तमानपत्रातल्या बातम्या, लेख वाचतो, मग आपल्या देशाला स्वातंत्र्य वगैरे मिळून सत्तरेक वर्षं झाल्याचं कळतं. किती पटापट संपतात नाही दिवस, असे नि:श्वास टाकत आपण राजगुरू-सुखदेव-खुदीराम बोस-भगतसिंग, म.गांधी, नेहरू-पटेल यांच्याविषयी वाचतो, ऐकतो. त्यांची जिद्द, महत्त्वाकांक्षा, धाडस, समर्पण, बलिदान… आपण सदगदित होऊन जातो. मनोमन त्यांना सलाम करतो. आज असे लोक राहिले नाहीत असं पुटुपुटत सरकार नावाच्या व्यवस्थेला शिव्या घालतो. आपल्यालेखी देश खड्ड्यात घालणाऱ्या राजकीय नेत्यांना शिव्या घालतो… त्यांना हाकलण्याची, हत्तीच्या पायाखाली देण्याची भाषा करतो… या लोकांनीच आपल्या मातृभूमीचं वाटोळं केलं… एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या देशाला कोळसा खाणीचं रूप आणणाऱ्या तमाम खंडणीदारांना फासावर लटकवण्याचा विचार करतो. आजही देशातील ५० टक्के जनता अर्धनग्रन, अर्धपोटी राहतो, झोपते, याबद्दल आपल्याला वाईट वाटतं. शहराला वेटाळत जाणाऱ्या झोपडपट्ट्यांविषयी आपण चिंता व्यक्त करतो. समाजाच्या सांस्कृतिक अध:पतनाबद्दल काळजी करतो. आजकाल लोकांत ‘देशप्रेम’ नावाची गोष्ट औषधालाही शिल्लक राहिली नसल्याचा आपल्याला विषाद वाटतो. मोबाईल संस्कृतीच्या जंजाळात सापडलेल्या तरुणाईबद्दल… देशाच्या अधोगतीबद्दल… माणूसपणाच्या ऱ्हासाबद्दल काळजी करू लागतो… कुठे जाणार हा देश? काय होणार या देशाचं, असे प्रश्न आपल्याला काही क्षण ग्रासून टाकतात. आपण चिंताग्रस्त होतो. विचार करू लागतो देशाचा… त्यातल्या लोकांचा… पुरुष मंडळींचा, स्त्रियांचा, प्रौढांचा, म्हाताऱ्याकोताऱ्यांचा आणि अर्थात तरुणांचा. त्यांच्या भविष्याचा… या सर्वांच्या काळजीने आपण काळवंडून जातो.
आपला भूतकाळ मोठा रम्य आहे… त्याच्या चैतन्यदायी आठवणी आपल्या काळजात पुन्हा पुन्हा पेटत राहतात. तशी आपली ट्यूब पेटत जाते. देशासमोरचे असंख्य प्रश्न आपल्या नजरेसमोर तरळू लागतात. बेकारी, दारिद्रय, बेरोजगारी, निरक्षरता, खून, मारामाऱ्या, दरोडे, अपहरण, बलात्कार, कुपोषण, बालमृत्यू, भ्रूणहत्या, अन्याय, अत्याचार, भूकंप, त्सूनामी, अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई अशा असंख्य अस्मानी-सुलतानी समस्या आपल्या समोर फेर धरून नाचू लागतात. त्यांच्या त्या चक्रव्यूहानं आपण घेरले जातो. आपलं डोकं गरगरू लागतं. आपण भेलकांडतो, पडतो, क्वचित प्रसंगी सावरतो…स्वत:लाच प्रश्न विचारतो. गेल्या सत्तर वर्षांत देशातल्या राजकारण्यांनी या देशासाठी काय केलं? आपलं राहणीमान उंचावण्यासाठी काय केलं? देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी कोणते धोरणात्मक निर्णय घेतले? पण यापैकी आपल्याला कुठल्याच प्रश्नांची उत्तरं समाधानकारक रीतीनं मिळत नाही आणि थातूरमातूर उत्तरावर आपण संतुष्ट होत नाही. मग आपण यच्चयावत राजकारण्यांचा उद्धार करतो…त्यांच्या नावानं आंघोळ करतो आणि मोकळे होतो!
सगळ्याच गोष्टींपासून, प्रश्नांपासून, समस्यांपासून आणि संकटांपासून आपण असेच मोकळे होतो!
एव्हाना संध्याकाळ झालेली असते. सावल्या लांबत जातात. संधिप्रकाशात आपल्या मनाची खिन्नता आणखीनच वाढत जाते. आपणही या देशाचे नागरिक आहोत… या देशाशी बांधिल आहोत. आपलीही काही जबाबदारी आहे…कर्तव्य आहे. या देशाशी बांधीलकी आहे. समाजाशी आपुलकी-सामिलकी आहे. आपण या देशाचे, त्यात राहणाऱ्या समाजाचं काही देणं लागतो, त्यांचा आपल्यावर आणि आपला त्यांच्यावर काहीएक हक्क आहे… या देशाचा नागरिक म्हणून, समाजाचा प्रतिनिधी म्हणून आपल्याप्रति काहीएक उत्तरदायित्व आहे, असे प्रश्न आपल्याला सहसा पडत नाहीत… आपण ते पडूही देत नाही. निष्काम कर्मयोगसाराख्या संकल्पना कधीच कालबाह्य झाल्या… त्यामुळे पुराणातली वांगी पुराणातच ठेवलेली बरी…
आपल्या देशाचा भूतकाळ उज्जवल आहे यात शंका नाही आणि त्याच्या भविष्यकाळाची एखाद्या कोळ्यानं पखालीनं पाणी वाहावं तशी आपण काळजी वाहतोच आहोत. या दोलकात वर्तमानाचा विचार करायला आपल्याला वेळ आहेच कुठे? या देशाचा वर्तमानकाळ काय? आपला वर्तमान काळ काय? आपण सध्या जगत आहोत, तो काळ नेमका कोणता? भूतकाळ, भविष्यकाळ की वर्तमानकाळ?
जाऊ द्या, उगाच काळजी कशाला करायची? त्याचा काही उपयोग आहे का? अॅडव्हान्स बुकींग करून ठेवलेलं असेल आणि अजून शाहरूख खानच्या ‘रईस’ला किंवा हृतिक रोशनच्या ‘काबिल’ला गेला नसाल तर लगोलग तिकिटं बुक करा, संध्याकाळच्या शोला जा. नाहीतर तुम्हाला संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरचं भाषण ऐकावं लागेल! कुठल्याच ‘काबिलियत’शी आपला आजकाल फारसा संबंध राहिलेला नाही, तेव्हा ‘रईस’ हाच ऑप्शन जास्त बरा राहिल. ‘गुजरात के हवा मेंही बेपार है!’ असं शाहरूख कान ‘रईस’मध्ये किती गर्वानं म्हणतो! आणि पैसा कमवणं हाच तर आजचा आपला कर्मयोग आहे!
देशात आरक्षणाच्या प्रश्नावरून मुद्दामहून उठवलं जात असलेलं काहूर, महाराष्ट्रात म. गांधींविषयी द्वेष पसरवणारं नाटक, त्याचं समर्थन करणारा एक राजकीय पक्ष, आम्हाला पटत नाही म्हणून रा.ग.गडकरी यांचा पुतळा फोडणारी संघटना, राजकीय आरोप-प्रत्योरापांचा धुरळा… निवडणुकांच्या दंड-बैठका… देशाच्या एकंदर हवेत वाढत चाललेला ‘क्राइम’… यांच्याशी आपला संबंध तो काय! उद्या प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे. सत्तावीसची सुट्टी टाका आणि सलग चार दिवस कुठेतरी फिरून या. जगण्याच्या आपाधापीतून थोडाफार तरी निवांत वेळ मिळायला नको का? प्रजासत्ताक दिन काय दरवर्षीच असतो. सलग चार दिवस सुट्टी नेहमी नेहमी घेता येत नाही!
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment