‘Wall Street Journal’ या वर्तमानपत्राने त्यांच्या १५-१६ ऑगस्टच्या वीकेंड आवृत्तीमध्ये ‘Facebook Hate-Speech Rules Collide With Indian Politics’ हा लेख प्रकाशित झाल्यापासून भारतात एकच खळबळ माजली आहे. फेसबुक आणि सत्ताधारी भाजप यांच्यातलं साटंलोटं या लेखातून सविस्तरपणे मांडलं असल्यामुळे देशातील माध्यमांनी या लेखावर आणि सत्ताधारी, फेसबुक यांचे प्रवक्ते आणि विरोधी पक्षांची टीका यांची माहिती देणाऱ्या बातम्या, वृत्तलेख छापण्याचा सपाटा लावला आहे. जणू काही हे पहिल्यांदाच उघड झालं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेत रशियाने कशी महत्त्वाची कामगिरी बजावली हे उघड झालं, तेव्हा ‘केंब्रिज अॅनालिटिका’ ही संस्था, भारतातील सत्ताधारी पक्षांचा आयटी सेल, ट्रोल, २०१६मध्ये पहिल्यांदा इंग्रजीत प्रकाशित झालेलं आणि नंतर अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालेलं ‘I Am a Troll: Inside the Secret World of the BJP's Digital Army’ हे पुस्तक आणि अनेक पत्रकार-अभ्यासकांचे लेख अशी कितीतरी उदाहरणं आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉटसअॅप, टयु-ट्युब या सोशल मीडियावरील मजकूर, छायाचित्रं आणि व्हिडिओ यांबाबतीत कशी गडबडीची धोरणं असतात, सोशल मीडियाचा कसा आणि किती गैरवापर होतो आहे. याविषयी गेल्या तीन वर्षांत ‘अक्षरनामा’वर अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. त्यातील काही निवडक लेखांची ही झलक...
..................................................................................................................................................................
सोशल मीडियाचे ‘अन-सोशल’ करणारे, जीवावर बेतणारे घातक दुष्परिणाम - आकांक्षा कांबळे
२४ ऑगस्ट २०१७
‘ब्लू व्हेल चॅलेंज गेम’च्या व्यसनातून भारतात व जगभरात काही मुलांनी केलेल्या आत्महत्या, आई-वडिलांनी मोबाईल काढून घेतल्यामुळे हरियाणातील चौथीतल्या मुलानं हाताच्या नसा कापून केलेला आत्महत्येचा प्रयत्न, नागपूरमध्ये नौकाविहारासाठी गेलेल्या तरुणांना ‘फेसबुक लाइव्ह’ करायच्या नादात बोट उलटून मिळालेली जलसमाधी, मुंबईतल्या मरीन ड्राइव्हवर पावसाचा आनंद घ्यायला गेलेल्या एका तरुणीचा सेल्फी काढायच्या नादात समुद्रात पडून गेलेला जीव, चार महिन्यांपूर्वी अर्जुन भारद्वाज नावाच्या तरुणानं आत्महत्येच्या तयारीचं सोशल मीडियावर चित्रीकरण करून इमारतीवरून उडी मारून केलेली आत्महत्या, १४-१५ वर्षांच्या मुलांनी शाळेतील शिक्षिकेला लिहिलेलं अश्लील पत्र आणि लहान मुलींवर होत असलेले बलात्कार, अशा काही उदाहरणांवरून सोशल मीडिया नकारात्मक रूपात आपल्या समोर येत आहे.
या माध्यमाचं अतिरेकी व्यसन लहान मुलं, तरुण यांना अमलीपदार्थाप्रमाणे जगण्यातून उठवू पाहत आहे. काय आहेत या मागची कारणं? का वाढत आहे सायबर व्यसनाधिनता? त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल? यांबाबत आता खरंच विचार होणं गरजेचं झालं आहे.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1176
..................................................................................................................................................................
सोशल मीडियाचं घडवणारं आणि बिघडवणारं राजकारण - किशोर रक्ताटे
१९ ऑक्टोबर २०१७
सोशल मीडियावर असणं आत्ताच्या काळाची अनिवार्य गरज झाली आहे. तिथं नसणं काळाबरोबर नसल्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे काळानं निर्माण केलेलं हे माध्यम समाजानं आपलंसं करणं स्वाभाविक आहे. हे माध्यम आत्ताच्या समाजमनाचा आरसा आहे. बदलत्या राजकारणाला समजून घेताना सोशल मीडियाला वगळून पुढे जाता येत नाही. सध्याच्या काळात एकूणच राजकारण अन समाजकारण अधिक समकालीन होत चाललं आहे, असं एका बाजूला वातावरण आहे; तर दुसर्या बाजूला माध्यमांचं लोकशाहीतील स्थान व महत्त्व, राजकारणाशी आपले संबंध घट्ट करून ठेवण्यात हे माध्यम यशस्वी झालं आहे. लोकशाही ज्या देशात आहे, तिथं ही बाब सयुक्तिक मानायला हवी. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा गुंता समजून घेण्यात बदलत्या राजकारणाचा वेध दडलेला आहे.
राजकारण परिवर्तनशील असतं, तसंच माध्यमंदेखील सतत बदलत असतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे राजकारणातील परिवर्तनात कळीची भूमिका माध्यमं बजावतात असतात. सोशल मीडिया हे अंतिमतः माध्यम आहे. मात्र, मुद्दा एवढाच आहे की, राजकारण बदलतं तशी माध्यमं बदलतात का? माध्यमं राजकारणाला बदलवतात का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एकाच वेळी होकारार्थी अन नकारार्थी येतील.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1376
..................................................................................................................................................................
सोशल मीडियाचे धक्कादायक, अशोभनीय ‘उद्योग’! - भूषण निगळे
९ नोव्हेंबर २०१७
अमेरिकेच्या २०१६च्या अध्यक्षीय निवडणुकांत रशियाने हस्तक्षेप केला असा अहवाल अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी प्रकाशित केल्यावर अमेरिकेच्या सिनेट व काँग्रेसने अनेक चौकशी समित्या सुरू केल्या. त्यातल्या गुप्तचर समितीने साक्ष द्यायला गेल्या आठवड्यात गुगल, फेसबुक आणि ट्विटर या तीन कंपन्यांच्या प्रतिनिधींना पाचारण केले होते. समितीच्या प्रश्नांना उत्तर देताना या प्रतिनिधींनी जी माहिती उघड केली आहे, ती बरीच धक्कादायक आहे. लोकशाही आणि समाजमाध्यमे (सोशल मीडिया) यांच्या परस्परसंबंधांवर यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
समितीसमोर आलेल्या माहितीनुसार रशियन सरकारी यंत्रणांच्या मदतीने केलेल्या ८०,००० पोस्ट्स तब्ब्ल १२६ दशलक्ष अमेरिकन मतदारांपर्यंत पोहोचल्या. (अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांत २५० दशलक्ष मतदार असतात. म्हणजे जवळजवळ ५० टक्के मतदारांनी रशियाने बेमालूमपणे केलेला प्रचार पहिला.) शिवाय एका वादग्रस्त रशियन मीडिया कंपनीने केलेल्या ३००० जाहिराती १० दशलक्ष मतदारांनी पहिल्या. यातल्या बहुतांश जाहिरातींची किंमत प्रत्येकी १००० डॉलर्सपेक्षा कमी होती.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1444
..................................................................................................................................................................
राजकीय बॉट्सचे\ट्रोल्सचे हल्ले वा फेक न्यूज परतवून लावता येतात - सॅम्युएल वुली आणि मरिना गोर्बीस
१३ नोव्हेंबर २०१७
समाजमाध्यमे वापरणाऱ्या माणसांवर बॉट्स प्रभाव टाकू शकतात का?
२०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी या बॉट्सचा (म्हणजे संगणकीय प्रोग्राम्सचा) वापर केला गेल्याची भीती निर्माण झाली, तेव्हापासून हाच प्रश्न सांसदीय तपासणी अधिकारी समाजमाध्यम कंपन्यांना विचारत आहेत. सॉफ्टवेअरमधील या तुलनेने सोप्या बॉट्स नामक प्रोग्राममध्ये लोकांच्या मनावर परिणाम करण्याची ताकद आहे, हे अर्धशतकापूर्वी ज्या मूठभर संशोधकांना दिसत होते त्यात आम्ही होतो. २०१२ मध्ये ‘द इन्स्टिट्यूट फॉर द फ्युचर’ या संस्थेत आम्ही काम करत होतो. तेव्हा या बॉट्सचा वापर करून ट्विटर वापरणाऱ्या लोकांवर कसा प्रभाव पाडता येईल, हे बघण्यासाठी आम्ही एक प्रायोगिक तत्त्वावर स्पर्धा आयोजित केली होती. त्यात जिंकलेला बॉट एका ‘बिझिनेस स्कुलमधील पदवीधर’ होता आणि त्याला आधुनिकोत्तर (विसाव्या शतकाच्या अखेरीच्या) कला सिद्धान्तात खूप रस होता. त्याला जिवंत माणसांपैकी एकुण चौदा फॉलोअर्स मिळाले आणि १५ उत्तरे मिळाली. यावरून आमची खात्री पटली की, बॉट्सनाही फॉलोअर्स निर्माण करता येतात आणि संभाषण करता येते.
दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर ते समाजमाध्यमे वापरणाऱ्या व्यक्तींवर प्रभाव टाकू शकतात. समाजाच्या भल्यासाठी हाती आलेले भावी साधन म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहात होतो. ते भूकंपाबद्दल लोकांना सावध करतील किंवा शांततेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकमेकांशी जोडतील असं आम्हाला वाटत होतं. परंतु समाजात विष पेरण्यासाठीसुद्धा त्यांचा वापर होईल, खोटेपणा पसरवण्यासाठी आणि ऑनलाईन मतदानाच्या वेळेस पूर्वग्रह निर्माण करण्यासाठीसुद्धा त्यांचा वापर होईल, हेही आम्हाला दिसत होतं.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1458
..................................................................................................................................................................
फेसबुक स्कँडल नक्की आहे काय? - निलेश पाष्टे
२३ मार्च २०१८
मागच्या दोन वर्षांत जागतिक राजकीय पटलावर थक्क करणाऱ्या दोन घटना म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजय आणि ब्रिटनला युरोपियन संघातून बाहेर पडायला लावणारा ब्रेक्झिटचा निर्णय. हे दोनही निर्णय दूरगामी परिणाम करणारे आणि तितकेच अनपेक्षित होते. या घटनांचं विश्लेषण करताना अनेकांनी जागतिकीकरणाबद्दल पाश्चात्य देशांतील सामान्य जनतेत वाढत असलेल्या असंतोषाकडे बोट दाखवलं. परंतु याबरोबरच या निवडणुकींच्या प्रचारात समाजमाध्यमांचा गैरवापर झाल्याचा दावा काही लोक करत होते. ‘चॅनल ४’ व ‘गार्डियन’ या ब्रिटिश वृत्तसंस्थेनं नुकत्याच प्रकाशित केलेल्या शोधपत्रकारितेतून ‘केंब्रिज अॅनलिटीका’ या ब्रिटिश कंपनीची या दोनही घटनांमागच्या राजकीय प्रचारातील भूमिका आणि राजकीय प्रचाराचं त्यांचं तंत्र समोर आलं आहे. यामुळे एकूणच समाजमाध्यमं, बिग डेटा आणि प्रायव्हसीच्या मुद्दांवर सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
आपण इंटरनेटवर ज्या काही गोष्टी करतो, त्यांची डिजिटल पाउलखुण आपण मागे ठेवत असतो. आपण गुगलवर काय सर्च करतो? कुठली वेबसाईट कधी आणि किती वेळ वापरतो? आपण त्यावेळी कुठे असतो? आपण कशाला लाईक देतो? काय फॉलो करतो? विकत घेण्यासाठी कुठल्या वस्तू शोधतो? या सर्व गोष्टी रेकॉर्ड होत असतात. कोट्यावधी युझर्सच्या व्यापक माहितीच्या अशा संकलनाला 'बिग डेटा' असं म्हणतात. त्यातच फेसबुक आणि गुगल या दोन संकेतस्थळांचा वापर इतका वाढला आहे की, संपूर्ण इंटरनेटचं ते प्रवेशद्वार बनल्या आहेत. (आजच्या घडीला फेसबुकचे सर्वांत जास्त अकाउंट - २४ कोटी - भारतात आहेत.) त्यामुळे त्यांच्याकडे कोट्यावधी लोकांचा जनसांख्यिकीय (डेमोग्राफिक), तसंच आवडीनिवडी, ऑनलाईन अॅक्टिव्हिटीचा बिग डेटा साठवलेला आहे.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1915
..................................................................................................................................................................
‘फेसबुक’च्या पडद्यावर खेळलं जातंय ‘मत-परिवर्तना’चं विषारी युद्ध! - राहुल माने
२६ मार्च २०१८
“माणूस फक्त आशा आणि भय यांच्या तालावर नाचत असतो”, हे वाक्य साहित्यिक किंवा कोणत्या तरी आध्यात्मिक गुरूचं नसून प्रोपागंडा करणाऱ्या एका व्यापारी चमूचं आहे, असं सांगितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. हाच नियम निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांनाही लागू होतो. त्यामुळे त्यांच्या मनातील अव्यक्त भावनांना हात घालून त्यांना नियंत्रित करणं किंवा त्यांची दिशाभूल करणं शक्य होतं. फेक न्यूज, धार्मिक उन्माद, निर्वासितांविरुद्ध पसरवत चाललेला विद्वेष आणि टोकाची प्रादेशिक/राष्ट्रवादी भूमिका, अशा संकुचित विचारधारांच्या जोरावर धुमाकूळ घालणारे अनेक गट\संस्था\पक्ष कार्यरत झाले आहेत.
फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इतर समाजमाध्यमांच्या विस्फोटामुळे आपल्या जीवनामध्ये काही सकारात्मक बदल झाले आहेत, नाही असं नाही. त्यातून बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुप्रादेशिक जणांमध्ये संवाद वाढावा, एकोपा वाढावा आणि सामंजस्य वाढावं अशी आशा होती. परंतु एका मर्यादेनंतर ती होताना दिसत नाही. समाजमाध्यमांवर जन्माला घातल्या जात असलेल्या फेक न्यूज, विरोधाला हिंसक पद्धतीनं संपवण्याच्या द्वेषाचं जे विषारी वादळ आलं आहे, ते खूपच भयानक आहे. त्यामुळे साम, दाम, दंड, भेद या पलीकडे जाऊन एका अतिशय क्रूर परंतु छुप्या पद्धतीनं सामाजिक मनाच्या मनोव्यापाराची शस्त्रक्रिया करणारं एक ताकदवान शस्त्र तयार केलं गेलं आहे.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1925
..................................................................................................................................................................
लोकशाहीच्या दिवाणखान्यातला सोशल मीडिया नावाचा हत्ती (पूर्वार्ध) - ऋषिकेश
३० मार्च २०१८
इंटरनेट हे तुलनेने सर्वांत नवे माध्यम मानवी आयुष्याच्या विविधांगांना स्पर्श करते आहे. गेल्या काही वर्षांत इतर प्रस्थापित माध्यमांच्या बरोबरीने या माध्यमानेही चांगलेच बाळसे धरले आहे आणि येत्या काळात पारंपरिक माध्यमांपेक्षा इंटरनेटचा प्रभाव मानवी आयुष्यावर अधिक असेल असे म्हणणे घाईचे ठरणार नाही. काही वर्षांपूर्वी पुस्तकासारखी एकदाच लिहून ठेवलेली माहिती वाचण्यासाठी, जुजबी वैचारिक देवाणघेवाण वा पत्रव्यवहार करण्यासाठी, आणि फार तर काही चित्रफिती (व्हिडिओज) वगैरे चढवण्यासाठीच्या वापरापर्यंतच सीमित असणारे हे माध्यम ‘सोशल मीडिया’च्या उदयानंतर गेल्या दशकभरात घराघरात पोचले आहे. इंटरनेट व सोशल मीडियाची भूमिका केवळ दोन व्यक्तींमधील गप्पा किंवा निरोप यांपर्यंतच मर्यादित न राहता, आता या ‘जालावरच्या पारावर’ एकमेकांची ‘ओळख’ घडवण्या- बिघडवण्या-समजण्यावर - तसेच परस्परसंबंधांची वीण कशी असेल यावरही या माध्यमाचा बराच प्रभाव पडू लागला आहे. कोणत्याही सामाजिक परिणामाच्या पाठोपाठ त्या परिणामाचे राजकीय पडसाद उमटू लागतात. या नव्या माध्यमाच्या उदयानंतर काही वर्षांतच या माध्यमाचा प्रभाव राजकारणावरही दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांत बहुतांश लोकशाही व्यवस्थांमध्ये हे माध्यम स्थिरावले आहे व मोठ्या जनमानसावर परिणाम करणारे माध्यम म्हणून सिद्ध झाले आहे.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1935
..................................................................................................................................................................
लोकशाहीच्या दिवाणखान्यातला सोशल मीडिया नावाचा हत्ती (उत्तरार्ध) - ऋषिकेश
३० मार्च २०१८
२०१४ची भारतातील निवडणूक (किंवा केजरीवाल वा नीतिश कुमार यांची निवडणूक) ही समाजमाध्यमांच्या व तंत्रज्ञानाच्या जोरावर लढवल्याचे व जिंकल्याचे भारताने पाहिले. मात्र त्यात वापरण्यात आलेली बहुतांश पद्धत ही वर चर्चिलेली ‘ओबामा-काळ’ पद्धती होती जी तोवर काहीशी परिचित झाली होती. आपल्या जनतेला ती नवी असली, तरी त्या क्षेत्रातील जाणकारांना ती आधीपासूनच परिचित होती. मात्र त्यानंतर झालेल्या ट्रम्प-क्लिंटन लढतीत (व काही अंशी ब्रेग्झिट लढतीत) अनेक बाबतीत बदल झाले. नुकत्याच गाजत असलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश कंपनीच्या ‘विदा चिकित्से’च्या (डेटा अॅनालिटिक्स) पद्धतींनी ओबामा पद्धतीला कैक योजने मागे सारले. आता आपण ट्रम्प-क्लिंटन लढतीसोबत आलेल्या नव्या मार्गांची ओळख करून घेऊ या.
फेसबुक, गूगल आदी माध्यमे ओबामा-काळापेक्षा ट्रम्प-काळात कितीतरी अधिक प्रगत झाली आहेत. शिवाय हे तंत्रज्ञान नवे तर राहिले नाहीच, पण महागही न राहिल्याने नगरसेवक पातळीच्या उमेदवारानांही ते वापरता येते. भारतातही ते वापरले जाऊ लागले आहे. आता नगरसेवकांचे फेसबुक पेज असते, ते नियमित अद्ययावत होते. पुण्यातील एका नगरसेवकाचे तर एक उपयुक्त मोबाईल अॅप आहे. क्लिंटन- ट्रम्प यांच्या लढतीसाठी इतका मूलभूत आणि साधा विदा असणारे तंत्रज्ञान पुरेसे नव्हते.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/1934
..................................................................................................................................................................
‘सायबर-युद्धा’ची घोषणा आणि ‘फेक-न्यूज’चा भस्मासूर - राहुल माने
१६ जुलै २०१८
सध्या भारत जगभरातील समाजमाध्यमांच्या बाबतीत प्रगतिशील आणि बदनामीकारक अशा दोन्ही भूमिका पार पडत आहे. प्रगतिशील यासाठी की, भारत सध्या जगातील सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. जगातील सर्वांत जास्त संख्येने समाजमाध्यमांचा वापर करण्यामध्ये तरुण भारतीयांचा पहिला क्रमांक लागतो. त्याचबरोबर जगभरामध्ये ज्या अर्थव्यवस्थेतील वाढीचा वेग व राष्ट्रीय उत्पन्न समाधानकारक प्रगतीने पुढे जात आहे, त्या काही मोजक्या देशांमध्ये भारत आहे. त्याच जोडीला आर्थिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या काही मूलभूत संस्थात्मक रचना या स्वतंत्र भारताच्या घटनात्मक लोकशाहीमध्ये अशा काही वाढल्या की, त्यामुळे आपल्याकडे उच्च शिक्षणाची व संशोधनाची दारे मुला-मुलींना खुली झाली आहेत. या सर्व घडामोडी अतिशय सकारात्मक असून त्याच जोडीला भारताची विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये उत्पादन, सेवाक्षेत्रांमध्ये प्रगती होत आहे. यावरून असे लक्षात येते की, आधुनिकतेकडे जाणाऱ्या भारताच्या प्रवासामध्ये काही महत्त्वाचे असे काही घडते आहे, त्याची नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे. समाजमाध्यमे हे त्यांपैकीच महत्त्वाचे क्षेत्र आहे, जे एकविसाव्या शतकातील भारत देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब दिसणारे एक महत्त्वाचे सार्वजनिक व्यासपीठ आहे.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/2287
..................................................................................................................................................................
सोशल मीडियावर तुमचं जे जे काही आहे, ते आता गुप्त राहिलेले नाही! - सागर शिंदे
६ मार्च २०१९
परवा एका काश्मिरी मित्राकडे गेलो होतो. त्याला हेडफोनवर गाणी ऐकायची सवय आहे. त्याने मला ‘एक गाणं ऐक’ म्हणून माझ्याकडे हेडफोन दिले. मी गाणं ऐकायला सुरुवात केली. हेडफोन खूप चांगल्या दर्जाचा होता. गाणं खूप चांगलं ऐकू येत होतं. एखाद्या थिएटरला बसल्याचा एकूण फील येत होता. त्यानंतर मी त्याला त्या हेडफोनची किंमत विचारली. त्याने त्याची किंमत २३०० रुपये सांगितली. आणि तो तितक्या किमतीचा होताही.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी माझं इन्स्टाग्राम ओपन केलं. आणि समोर लगेच एक हेडफोनचं पेज असलेली पोस्ट आली. आणि त्यात किमतीही आल्या. ज्या हेडफोनवर मी गाणं ऐकलं होतं, त्याचीही जाहिरात आली. मी कुणाजवळ काहीही याबद्दल बोललो नव्हतो. मग इन्स्टाग्रामला हे कळलं कसं? ‘बुक माय शो’वर एका सिनेमाची वेळ पाहिली असता. नंतर त्या सिनेमाबद्दल युट्यूबवर व्हिडिओ येऊ लागले. गूगलवर एखाद्या देशाबद्दल जर सर्च केलं, तर त्या देशाबद्दल तिथल्या पर्यटनाबद्दल फेसबुकवर जाहिराती येऊ लागतात. कधी कधी तिथली पेजेस ‘लाईक करा’ म्हणून फेसबुक सांगते. आपण कुणाला मित्र-विनंती पाठवली तर आपल्याला फेसबुक त्याच्याशी मिळतेजुळते प्रोफाइल असणारे लोक ‘पीपल यु मे नो’मध्ये दाखवतं.
इन्स्टाग्रामवरदेखील काही पेजेसची आपण माहिती घेतली, तर लगेच त्याबद्दल किंवा साधर्म्य असणाऱ्या पेजेसची माहिती दुसऱ्या दिवशी आपल्या समोर हजर असते. असे काही अनुभव तुम्हालाही आले असतील.
असं का होतं याचा खरं तर आपण विचार करत नाही. फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा युट्यूब यासारखी अनेक सोशल मीडिया अॅप आपली माहिती नकळत जगजाहीर करत असतात. आणि आपण त्याबद्दल साधा विचारही करत नाही. मग फेसबुक, इन्स्टाग्राम मालकाला जाब विचारणं दूरच.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3055
..................................................................................................................................................................
ट्रम्प आणि मोदी तर येत-जात राहतील, माध्यमांना जिवंत राहायचंय, मोकळ्या हवेत श्वास घ्यायचाय! - आशुतोष
१५ ऑगस्ट २०१९
काही क्रांत्या गुपचूप येतात आणि काही तुफान घेऊन येतात. १९१७ची रशियन क्रांती आपल्यासोबत हिंसेचा असा वणवा घेऊन आली की, संपूर्ण जग हादरलं. साम्यवादी क्रांत्या अशाच असतात, अफरातफर माजवणाऱ्या, खूनखराबा करणाऱ्या! पण मागच्या काही दिवसांत जी क्रांती माध्यमांमध्ये झाली आहे, तिचा फार काही जोर दिसला नाही. पण जेव्हा परिणाम समोर आले तेव्हा प्रत्येक जण हैराण आणि परेशान झालेला आहे.
ही क्रांती गुपचूप आलेली आहे. ती कधी आपल्या घरात घुसली, काहीच कळलं नाही. आपल्या जीवनाचा भाग बनली, आपल्याला काहीच सुगावा लागू न देता. ही क्रांती बंदुकीच्या नळीतून निघाली नव्हती. एक अदृश्य अशी दुनिया आपल्या अवतीभवती तयार होत गेली आणि आपण झोपा काढत राहिलो! अचानक एक दिवस कळलं की, फेसबुक, ट्विटर, यू-ट्युब आणि व्हॉटसअॅप यांच्याशिवाय एक मिनिटही श्वास घेणं मुश्किल होऊन बसलं आहे.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3562
..................................................................................................................................................................
राजकीय प्रचाराचे राक्षसीकरण कोण करतंय? कशासाठी करतंय? - योगेश बोराटे
१० डिसेंबर २०१९
सोशल मीडियावर सकाळच्या ‘गुड मॉर्निंग’पासून ते ‘गुड नाईट’पर्यंतच्या मेसेजने सर्वच स्मार्टफोनधारकांचे मोबाईल ओसांडून जात असतात. वेगवेगळे मिम्स, जोक्स, काही माहिती, दुर्मीळ फोटो, उपयुक्त माहिती असे याचे स्वरूप असते. मात्र गेले काही महिने या सगळ्याच्या केंद्रस्थानी राजकारण आले. अगदी राजकारणाचा पिंड नसलेल्या व्यक्तीसुद्धा सोशल मीडियावरील भरमसाठ पोस्ट्समुळे व्यक्त होऊ लागल्या. त्यालाच जोडून राजकारणासाठीच्या जाहिरातींना वाहिलेल्या फेजबुक पेजच्या चर्चाही झाल्या. यातूनच सोशल मीडिया किती प्रभावी आहे आणि राजकारणात त्याचा कसा वापर झाला, याची झलक आपल्याला दिसली. सोशल मीडियाच्या आधाराने रंगलेल्या अशाच राजकीय प्रचाराच्या सद्धस्थितीचे हे अंतरंग.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3858
..................................................................................................................................................................
मजकूर अपमानकारक असतो, तेव्हा ‘यू-ट्युब’ सर्वदूर पोहोचलेले असते! - मॅथ्यू इनग्रम
२५ जानेवारी २०२०
फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल. अनेक आठवडे चुकीची माहिती आणि त्रास देणे यावर कसलीही कृती न करण्याबद्दल हे प्रचंड समाज माध्यम काही टीकाकारांकडून चर्चेत होतं. त्या ऐवजी या आठवड्यात प्रकाशझोत यू-ट्युबवर आला आहे. गूगलची मालकी असलेल्या व्हिडिओ शेअर करणाऱ्या साईटने सुट्टीच्या आठवड्याची सुरुवातच चुकीची केली. याचे कारण यू-ट्युबचा निर्माता स्टीवन क्राउडर हा सातत्याने समलैंगिक लोकांची निंदानालस्ती करत होता आणि त्याच्यावर कसलीही कारवाई केली जात नव्हती. त्याचा रोख वॉक्सचा पत्रकार कार्लोस माझावर होता आणि तो कार्लोसच्या म्हणण्यानुसार गेले अनेक महिने होता. जेव्हा यू-ट्यूबने म्हटले की, क्राउडरच्या व्हिडिओने कोणतेही नियम तोडलेले नाहीत आणि म्हणून ते काढून घेतले जाणार नाहीत, तेव्हा ‘काहीही कारवाई न करण्याबद्दलच्या’ रागात भर पडली. “आम्हाला भाषा उघडच अपमानकारक वाटली तरी पोस्ट केलेले व्हिडिओ आमच्या नियमांचा भंग करणारे नाहीत.” यू-ट्यूबने ट्विटरवर म्हटले.
संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3986
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment