शब्दांचे वेध : पुष्प चौथे
‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई’ हे गाणे सगळ्यांच्याच परिचयाचे आहे. ते ऐकताना मला अनेकदा हा प्रश्न पडायचा की, ‘वात्सल्यसिंधू’ या शब्दासाठी इंग्रजीत काय प्रतिशब्द असेल आणि नसला तर तो चपखलरीत्या कसा तयार करता येईल? बराच शोध घेतल्यावर माझ्या असे लक्षात आले की, हाच नाही तर असे अनेक मराठी शब्द आहेत, ज्यांना इंग्रजीत तंतोतंत पर्याय नाहीत. ओढूनताणून बनवलेले किंवा मूळ अर्थाच्या थोडेसे जवळ जाणारे शब्द आहेत, पण नेमकी छटा त्यात नसते.
‘वात्सल्य’ हा असाच एक शब्द आहे. ‘वत्सल’, ‘वत्सलभाव’, ‘वात्सल्य’ या शब्दांमधून जो जिव्हाळा, (आईची) ममता, स्नेह, किंवा त्याहीपेक्षा जास्त पण शब्दांत न पकडता येण्याजोगे असे काहीतरी हृदयस्पर्शी व्यक्त होते, ते इंग्रजीच्या ‘Love’, ‘affection’, ‘fondness’ या शब्दांत आढळत नाही. पण तुम्हाला ‘वात्सल्य’ या शब्दाचे इंग्रजीत भाषांतर करायचे असेल तर यापैकीच काहीतरी वापरावे लागेल.
प्रेमाच्या, मायेच्या, ममतेच्या अनेक छटा आहेत. पण इंग्रजी इतकी समृद्ध भाषा असूनही तिच्यात या सर्वच छटा दिसून येत नाहीत. आईची माया-ममता, आई-वडिलांचा वात्सल्यभाव, आपल्याला मित्रांबद्दल, प्राण्यांबद्दल वाटणारे प्रेम, एखाद्या निर्जीव वस्तूचा लागणारा लळा (‘या शेताने लळा लावला असा असा की’ - ना धों महानोर), भक्ताचे देवावर असणारे प्रेम, प्रियकर-प्रेयसी यांच्यातले प्रेम, अशा विविध प्रकारच्या प्रेमांना इंग्रजी ‘Love’, ‘affection’, ‘fondness’ एवढ्यातच गुंडाळते. काही अन्य भाषांत मात्र ही उणीव भरून काढली गेली आहे. उदाहरणार्थ -
ग्रीक भाषेत :
Έρωτας (Erotas) (known as Έρως (Eros) in Ancient Greek) : शारिरीक प्रेम
Aγάπη (Agape) : उदात्त, निर्हेतुक, किंवा कौटुंबिक प्रेम
Φιλία (Philia) : मैत्रीतले प्रेम, एखाद्या गोष्टीवर केलेले प्रेम
Στοργή (Storgé) : आई-वडिलांचे अपत्य प्रेम (वात्सल्य)
जपानी भाषेत :
Ai : शारिरीक प्रेम सोडून अन्य प्रकारचे प्रेम
Koi : शारिरीक किंवा स्वार्थी प्रेम
तामिळमध्ये प्रेमासाठी डझनावारी असलेल्या शब्दांपैकी काही :
அன்பு (Anpu) : प्रेम, भक्ती, स्नेह
காதல் (Katl) : शारिरीक प्रेम
ஆசை (Achai) : एखाद्यासाठी झुरण्यातून व्यक्त होणारे प्रेम
பாசம் (Pachm) : आई-वडिलांचे वात्सल्य
கைக்கிளை (Kaikkilai) : एखाद्या व्यक्तीवर केलेले एकतर्फी (शारिरीक) प्रेम
स्पॅनिशमध्ये :
Querer : प्रेम, स्नेह
Amar : शारिरीक प्रेम
Encantar: एखाद्या गोष्टीवर केलेले प्रेम
अरेबिक भाषेत :
حب (Habb): प्रेम, स्नेह
عشق (‘Ishq) : शारिरीक प्रेम
شغف (Shaghaf) : प्रेमाने वेडे होणे, वासनायुक्त प्रेम
حنان (Hanaan) : सहानुभुतीतून येणारे प्रेम
(या परिभाषा https://www.fluentin3months.com/words-for-love/ या वेबसाईटवरील मजकुरातून उदधृत केल्या आहेत.)
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
तर मग ‘वात्सल्यसिंधू आई’ हे तुम्ही इंग्रजीत कसे आणणार? ‘Ocean of maternal love?’ असे? पण हे तर तर्खडकरी इंग्रजी झाले. ते शाब्दिक आहे. Idiomatic म्हणजे लौकिक बोलीत काय म्हणाल? नाही आणता येणार ती नक्की छटा.
(विषय निघालाच आहे म्हणून सांगतो - तर्खडकर आणि त्यांच्या अनेक शिष्यांनी मराठी लोकांना इंग्रजी व्याकरणाचे धडे तर जरूर शिकवले, पण दैनंदिन, बोलीभाषेत इंग्रजी कसे बोलावे अथवा लिहावे, याबाबत ते माहिती द्यायला ते कमी पडले. साहित्यिक इंग्रजी तर दूरच राहिली. त्यामुळे त्यांच्याकडून ज्ञान घेणारे आमच्या पिढीचे बरेच लोकही तसेच निघाले. ‘स्वतःच्या हाताने घे’ (असे डायनिंग टेबलवर एखाद्याला सांगणे) याचे भाषांतर ‘Take with your own hands’ असे होत नसून ‘Help yourself’ असे idiomatic इंग्रजीत म्हटले जाते, हे समजायला तर्खडकरांचा उपयोग होत नाही. अर्थात हे मी ४०-५० वर्षांपूर्वीचे सांगतो आहे, आजचे दृश्य कदाचित वेगळेही असू शकेल.)
असाच आणखी एक सुंदर मराठी शब्द आहे – ‘पान्हा’. तान्ह्या बाळाला मांडीवर घेताच आईला ‘पान्हा’ फुटला. आपले वासरू दिसत नव्हते म्हणून त्या गायीने ‘पान्हा’ चोरला. या दोन्ही वाक्यांतल्या पान्ह्याला इंग्रजीत तंतोतंत प्रतिशब्द नाही. मोल्सवर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात पान्ह्याची व्याख्या अशी दिली आहे – ‘Descent of milk into the udder from maternal yearning, applied to the filling with milk of the breast of a woman, the melting of tenderness.’ व्याकरणदृष्ट्या ती बरोबर असली तरी ती योग्य नाही. बाळाचा जन्म झाला की, आईच्या स्तनांतून दूध येऊ लागते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘lactation’ म्हणतात. पण आईला ‘पान्हा’ फुटला यात जे काव्य आहे, सौंदर्य आहे, ममत्व आहे, ते ‘the mother started lactating’ यात येऊच शकत नाही. ही रुक्ष, कोरडी भावनाविरहित शब्दरचना आहे. मोल्सवर्थच्या परिभाषेतले ‘the melting of tenderness’ म्हणजे ममतेला झरा फुटणे आणि ‘maternal yearning’ म्हणजे मातृत्वामुळे आलेली अनावर भावना, इच्छा हे तर ठीक आहे, पण यात ‘पान्हा’ या शब्दाचा भाव नाही. ‘स्तन दाटून फुटला पान्हा, नेत्री ढाळी अश्रूजीवना’, यात जी भावनांची अभिव्यक्ती आहे, ती ‘Descent of milk into the udder from maternal yearning’ यात येऊ शकत नाही. गायीने ‘पान्हा’ चोरला म्हणजे ‘The cow withheld her milk’ याचेही असेच. ‘पान्हा चोरणे’ यामध्ये जी प्रतिमा आहे ती ‘withheld her milk’ (दूध रोखून धरले) यात येऊच शकत नाही.
गंमत म्हणजे हिंदीतही मला (तरी) ‘पान्हा’ या शब्दाला पर्याय सापडला नाही. मराठीने या बाबतीत या दोन्ही भाषाभगिनींवर कुरघोडी केली आहे असे दिसते. असे आणखी काही शब्द वा शब्दप्रयोग आहेत, ज्यांची मराठीतली नज़ाकत अन्य भाषांत आणता येत नाही.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : वाईट किंवा अपशब्दांची भीती वाटणे म्हणजे ‘कॅकोलोगोफोबिया’
..................................................................................................................................................................
पूर्वी मुलगी वयात आली (म्हणजे तिला रजोदर्शन झाले) की तिला ‘पदर’ आला (किंवा न्हाण आले) असे म्हणत असत. यातला जो ‘पदर’ शब्द आहे, तो बहुआयामी आहे. याचे मराठी अर्थ सगळ्यांनाच माहीत आहेत. पण इंग्रजीत यातली एकही छटा जशीच्या तशी आणता येऊ शकत नाही, कारण पदर ही संकल्पनाच इंग्रजीत नाही. मोल्सवर्थच्या शब्दकोशात या शब्दाचे आठ अर्थ सांगितले आहेत. त्यातला ‘the end of a cloth’ हा अर्थ सोडला तर एक आहे आत्मीयता म्हणजे ‘affinity’ (A natural attraction or feeling of kinship); एक आहे रजोदर्शन ‘the first appearing of the menstrual discharge’ आणि एक आहे रजोदर्शनानंतर (पूर्वीच्या काळी) मुलीच्या पोषाखात करण्यात येणारा बदल म्हणजे ‘the ceremony of changing the mode of attiring a girl on her attaining to puberty’. हे सगळे लांबलचक खुलासे आहेत - जे मराठीत ‘पदर’ (येणे/आला) या एका शब्दाने व्यक्त करता येतात.
जी गोष्ट ‘वात्सल्य’, ‘पान्हा’, ‘पदर’ यांची आहे, तीच नातेसंबंधदर्शक शब्दांची आहे. यात बहुतेक बाबतीत आपण इंग्रजीच्या वर आहोत. तर काही असेही शब्द आहेत, जिथे इंग्रजी आपल्याला मागे टाकते. आई, वडील, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी, इथवर ठीक आहे. दोन्हीकडे समांतर शब्द आहेत. Mother, father, brother, sister, son, daughter. मात्र आजी-आजोबा यांच्या बाबतीत हिंदीत नाना-नानी हे आईकडच्या आजी-आजोबांसाठी आणि दादा-दादी हे वडिलांकडच्या आजी-आजोबांसाठी स्वतंत्र शब्द आहेत. मराठीत दोन्हीकडचे फक्त आजी-आजोबा. इंग्रजीतही तसेच - grandfather, grandmother.
पुढची गंमत तर सर्वांनाच माहीत आहे. मामा, काका, आतोबा, मावसा हे सगळे इंग्रजीत ‘uncle’ बनतात, तर मामी, काकू, आत्या, मावशी या सगळ्या ‘aunt’ बनतात. चुलत, मावस, मामे, आत्तेभाऊ, बहिणी हे सरसकट ‘cousin’ बनतात. पुतण्या/भाचा nephew, पुतणी/भाची niece, तर सासरा बनतो father-in-law आणि सासू mother-in-law बनते. बायकोचे बहीण-भाऊ आणि नवऱ्याचे बहीण-भाऊ दोघेही brother-in-law आणि sister-in-law बनतात. साली (किंवा मेहुणी), दीर, वहिनी, या शब्दांत जे भाव आहेत, ते या ‘in-law’मध्ये येत नाहीत. (बायकोच्या मोठ्या बहिणीला विदर्भात थट्टेने ‘अक्कडसासू’ म्हणतात, कारण सासूपेक्षाही तिचा तोरा, नखरा जास्त असतो, म्हणून. आता यात जो चिमटा आहे, तो ‘elder sister-in-law’ किंवा ‘wife's elder sister’ यात कसा येईल बरं?) इंग्रजीत सासर नाही, माहेर नाही, आणि आजोळही नाही.
जवळच्याच नातलगांसाठी ज्या इंग्रजी भाषेत शब्द नाहीत, तिथे दूरच्या नातेवाईकांसाठी तर ती कोरडी असली तर नवल काय? अशा नातेवाईकांचे वर्णन मग ‘first cousin once removed, first cousin twice removed, second cousin once removed’ असे केले जाते. यातली ही जी दूर असण्याची (removed) पातळी आहे, तिचा उलगडा भल्या-भल्या इंग्रज अमेरिकनांना सुद्धा सहजतेने होत नाही. त्यासाठी त्यांना व्यावसायिक वंशावळ - निर्मात्यांची (genealogists) मदत घ्यावी लागते. हे लोक तुमच्याकडून मोबदला घेऊन तुम्हाला तुमची वंशावळ तयार करून देतात आणि तुमच्या खापरपणजोबाच्या बहिणीचा पणतू हा तुमच्यापासून किती लांबचा आहे आणि तुम्ही त्याला कितवा कझिन कितव्यांदा रिमुव्ह्ड म्हणायचे, हे सांगतात. ज्यांना आपण सगोत्र म्हणतो त्या नातलगांना इंग्रजीत ‘agnate’, तर सगोत्र नसलेल्या नातलगांना इंग्रजीत ‘cognate’ म्हणतात.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ज्याचे शब्द सोन्यासारखे अमूल्य आहेत, जो माणूस सोनेरी शब्दांचा आहे, तो ‘सुभाष’...
..................................................................................................................................................................
याबाबतीत एका ठिकाणी मात्र इंग्रजीने आपल्याला मागे टाकले आहे. ही बाब म्हणजे दोन (किंवा अधिक) जवळच्या नातलगांमधल्या परस्परसंबंधांसाठी असलेले शब्द. काही शब्द दोन्हीकडे आहेत. जसे, मातृत्व म्हणजे ‘motherhood’. आई आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही करते ते असते मातृ - प्रेम/कर्तव्य. इंग्रजीत त्याला ‘maternal’ (behaviour) म्हणतात. पिता करतो ते पितृ -प्रेम/कर्तव्य. इंग्रजीत त्याला ‘paternal’ म्हणतात.
इंग्रजीत असलेले पण मराठीत नसलेले शब्द - मुलगा-मुलगी आपल्या आई-वडिलांप्रती जे प्रेम अथवा कर्तव्य करतात ते filial फिलिअल असते. भावाचे भावा/बहिणींप्रती असलेले संबंध ‘fraternal’ आणि बहिणीचे भावा/बहिणीशी असलेले संबंध ‘sororal’ असतात.
इथपर्यंत ठीक आहे. पण एखाद्या अंकलचे (काका, मामा, आतोबा, मावसा) आपल्या पुतणा/णी वा भाचा/ची यांच्याशी जे नाते असते त्याला इंग्रजीत एक खास - शब्द आहे. तो म्हणजे ‘avuncular’. ‘Uncle’चे विशेषण, लॅटिन ‘avunculus’पासून तयार झालेले. खरे तर ‘avunculus’ म्हणजे मामा. पण आता त्यात काका, आतोबा, मावसोबा यांचाही समावेश होतो.
आणि आंटचे काय हो? काकू, मामी, आत्या, मावशी यांचे आपल्या पुतणा/णी वा भाचा/ची यांच्याशी जे नाते असते त्याला इंग्रजीत काय म्हणतात? तो ही एक खास शब्द आहे - materteral. Auntचे विशेषण. या शब्दाचे मूळ लॅटिन आहे. लॅटिनमध्ये ‘mater’ म्हणजे आई. आणि आईची बहीण म्हणजे मावशीला लॅटिनमध्ये ‘matertera’ म्हणतात. म्हणजे आधी हा शब्द फक्त मावशीसाठी वापरला जात असे. आता तो चारही प्रकारच्या आन्टसाठी वापरला जातो. याला ‘materterine’ असाही प्रतिशब्द आहे.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
पी. जी. वुडहाऊसच्या जवळपास सर्वच कथा-कादंबऱ्यांत एखादी तरी आन्ट किंवा एखादा तरी अंकल असतो. आणि ते आपल्या पुतण्या/भाच्यांवर प्रेमाने हक्क गाजवत असतात. या सर्वांतली गाजलेली जोडी आहे बर्टी वूस्टर या भाच्याची आणि त्याच्या खट्याळ, उपद्व्यापी (पण उपद्रवी नव्हे) आत्याची - डेलिया ट्रॅवर्सची. वुडहाऊसने ‘materteral’ हा शब्द जरी कधी वापरला नसला तरी या शब्दाचे अगदी योग्य उदाहरण म्हणून त्याने रंगवलेल्या आत्या-मावश्या आणि त्यांच्या भाचे मंडळींमध्ये असलेल्या संबंधांकडे बोट दाखवता येईल. या दोन्ही शब्दांना योग्य मराठी पर्याय काय असू शकतो?
माझा क्रिस नावाचा एक इंग्रज मित्र आहे. त्याला मी याबाबतीत एकदा छेडले असताना तो म्हणाला, “आम्ही इंग्रज लोक आधीपासून तुसडे आणि स्वतःपुरते जगणारे आहोत. कदाचित त्यामुळेच यापैकी अनेक शब्दांची इंग्रजीत उणीव असावी. पण मला तुझ्या बोलीभाषेतला अक्कडसासू हा शब्द मेमसाहिबच्या मोठ्या बहिणीसाठी वापरायला आवडेल.” तो आपल्या बायकोला ‘मेमसाहिब’ म्हणतो. या मडमिणीजवळ एकदा क्रिसची चुगली करण्याचा माझा विचार आहे!
..................................................................................................................................................................
लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.
the.blitheringest.idiot@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment