‘द हीट ऑफ विंटर’ : पं. नेहरूंच्या हत्येची काल्पनिक गोष्ट
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • ‘द हीट ऑफ विंटर’ या कादंबरीची तीन मुखपृष्ठे
  • Sat , 15 August 2020
  • पडघम देशकारण नेहरू Nehru द हीट ऑफ विंटर The Heat of Winter होवार्ड हर्ट Howard F. Hirt संघ RSS हिंदू महासभा Hindu Mahasabha

काहीही म्हणा परदेशी लेखक फार धाडसी अन अचाट कल्पक. कादंबऱ्या लिहाव्यात त्या त्यांनीच. त्यांच्यापुढे आपले मराठी लेखक पार पिचके. कशावरही भूमिका घेणे यांच्या जिवावर येते. मोदींच्या बाजूचे आहात की विरोधात? हिंदूराष्ट्र हवे की नको? मुसलमानांची, दलितांची, आदिवासींची बाजू घेणार की नाही? पर्यावरणाच्या ऱ्हासाला उद्योगपती व सत्ताधारी जबाबदार की गरीबबापुडे आपण? समाजात द्वेष आणि तिरस्कार फार पसरलाय की नाही? काहीही विचारा, त्यावर लिहायला सांगा, यांची दोन डगरींवर तोल सांभाळायची स्थिती कायम. गेली सहा वर्षे अवघा राज्यकारभार एकांगी, एकतर्फी, एकचालकानुवर्ती होत असताना ही मंडळी समतोल साधण्यात व्यग्र. दोन-चार लेखक असतात विरळे, पण ते अवघे सारस्वतमंडळ नव्हे ना!  त्यांच्यापेक्षा त्या नयनतारा सहगल, गीता हरिहरन, मेघा मुजुमदार यांनी कादंबऱ्यांमधून; तर स्वाती चतुर्वेदी व राणा अय्युब यांनी स्वानुभवावर आजचा भयंकर काळ मांडला आहे. इंग्रजीत तर इंग्रजीत! त्यात काय बिघडले? इंग्रजांना कधी विरोध केला नाही, ते इंग्रजीच्या नावे खडे फोडणारे संस्कृतीभक्त ढोंगीच की! इंग्रजी काही अभिजात भाषा नाही, ना ती ज्ञानभाषा. पण भाषा माणसाच्या दर्जावरून स्वीकारायच्या की उपयुक्ततेवरून, हे ज्यांना कळत नाही ते उर्दूविरोधक कळूनही न कळल्यासारखे दाखवणार. माताच इंग्रजी बोलणाऱ्या निपजू लागल्यावर मातृभाषेचा आग्रह काय कामाचा?

जाऊ द्या, मूळ प्रश्न विलायती लेखकांच्या धीट व अभ्यासू वृत्तीचा आहे. होवार्ड हर्ट (Howard F. Hirt) हे त्यापैकी असावेत. त्यांच्या नावे एकच कादंबरी असून ती आतापर्यंत चार निरनिराळ्या प्रकाशकांनी काढलेलीय. लेखक अनेक वर्षे भारतात वास्तव्य करून अमेरिकेतील मेसॉच्युसेटस येथील फ्रेमिंगहॅम स्टेट कॉलेजात भूगोल शिकवतात, अशी तीन ओळींची माहिती, बाकी काही नाही. पण कादंबरीचा आशय एकदम थरारक. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या खुनाचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना हिंदू महासभेच्या मदतीने कसा आखते आणि तो अखेरीस कसा फसतो, हे मुख्य सूत्र.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

कादंबरी प्रकाशित झाली १९८४ साली. मात्र तिचा काळ जानेवारी व फेब्रुवारी १९५२चा आहे. रामगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या पदग्रहण समारंभासाठी खुद्द पंतप्रधान नेहरू येणार असल्याने त्यांना ठार करण्याची आयती संधी या दोन हिंदुत्ववादी संघटना घेऊ पाहतात. मात्र संघ व महासभा यांचे तसेही पटत नाही. उलट त्या संघटना कशा परस्परांच्या प्रतिस्पर्धी आहेत, त्याचे नेमके वर्णन लेखक करतो. लेखक हर्ट परदेशी असले तरी जाती, हेतू, राजकीय मते, संघटना, भारताची राजकीय परिस्थिती, हिंदू-मुस्लीम संबंध, स्त्री-पुरुष संबंध, दिल्लीचे रस्ते व स्थळे असे बारीक तपशील बरोबर देतात.

ही कादंबरी महत्त्वाची यासाठी की, तिचा नायक महंमद अब्दुल करीम पोलीस अधीक्षक म्हणून रामगढला रेल्वेने निघाला असून त्याला ठार करण्यासाठी त्याचा डबाच पेटवला जातो ही घटना. ती गोध्रातील अशाच एकीचे स्मरण करून देते. रामगढ स्थानकात करीमचा डबा सायडिंगला टाकला जातो. त्याचा एक सहप्रवासी सरदारजी ‘पहाटे कुठे शोधत जाता’ म्हणून आपल्या पेट्रोलपंपावर न्याहारीसाठी करीमला घेऊन जातो, सामान नंतर घेऊन जाता येईल या हिशेबाने. पोचल्यावर त्यांना माघारी काही वेळाने जाळ दिसतो. पोलीस अधिकारी म्हणून तो धाव घेतो, तर त्याचाच डबा भस्म झालेला. बाहेरून एक कुलुप लागलेले. त्याला ठार करण्यासाठीच हे कारस्थान आखले गेलेय, असा त्याला संशय येतो. मात्र कारण उशिरा समजते. हा करीमच्या डब्ब्याचा प्रसंग आणि नेहरूंचा ताफा एका गावातील वळणावर उभ्या ट्रकमुळे कसा अडतो आणि मागल्या बाजूला दुसरा ट्रक येऊन उभा राहतो, तो प्रसंग हर्ट यांनी एखाद्या सराईत थरारकथालेखकाप्रमाणे रंगवला आहे.

हिंदुत्ववादी नेत्यांची वर्तनेदेखील हर्ट यांनी अचूक केली आहेत. त्यांची जात, धोतर वा शेरवानी हा पोशाख, व्यापार व व्यवसाय, गोड खाण्याची सवय, संस्कृतीचे रक्षण करण्याची भाषा, मुस्लिमांचा तिरस्कार, नेहरूंचा प्रचंड द्वेष, गुप्त बैठका आणि उक्ती व कृती यांत जाणीवपूर्वक ठेवलेले अंतर, कुटिल स्वभाव, हिंसा करण्याची सहजप्रेरणा आणि हिंदूराष्ट्र स्थापन करण्याची अतीव इच्छा, यांचे कितीतरी प्रसंग लेखक नीट चितारतो.

१९५२ साली संघावर बंदी नव्हती, ती १९४९ साली उठली होती. मात्र कादंबरीकाराचे कल्पनांचे स्वातंत्र्य हर्ट यांनी घेतलेय. कादंबरीचे ‘द हीट ऑफ विंटर’ हे नाव उत्तर प्रदेशातील कडक थंडीच्या वातावरणात रामगढ विद्यापीठाच्या निमित्ताने नेहरूंची हत्या व हिंदू-मुस्लीम दंगली याचे मोठे कारस्थान कसे उष्णता निर्मिते ते सांगते.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सॅम हॅरिस- माजिद नवाझ यांच्या चर्चेत मुख्यत्वे इस्लाम व ख्रिश्चन धर्मांचे संदर्भ येतात, पण त्यांच्या चर्चेमागची भावना सर्वच धर्मियांना उपयुक्त ठरावी

..................................................................................................................................................................

सुरेन्द्र गुप्ता हा संघाचा कार्यकर्ता. रामलाल प्रसाद हा हिंदू महासभेचा नेता व नगरपालिकेचा अध्यक्ष. कुलपांचा कारखानदार आणि व्यापारी. हा गुप्ता नेहरूंचा ताफा त्या गावात अडवण्याचा डाव आखतो. त्याप्रमाणे घडतेही. तो शेजारी रस्त्यालगतच्या घरात पिस्तुल व रायफल घेऊन सज्ज आहे. मात्र त्याच्या कयासाप्रमाणे वाहने थांबताच नेहरू काय झाले ते बघायला (सवयीप्रमाणे) उतरत नाहीत. त्यांचे अंगरक्षक, सचिव त्यांना काय घडले ते काचा खाली करून सांगतात. काही क्षणांत पोलिसांची कुमक रस्ता मोकळा करते आणि नेहरू रामगढकडे रवाना होतात. प्रचंड निराश झालेला गुप्ता नेहरूंच्या खुनासाठी रामगढ विद्यापीठातील जाहीर सभेत मुस्लिमासारखा पोषाख घालून जातो. पकडला जातो आणि करीमला जखमी करून अखेर करीमच्याच गोळीने ठार होतो. मुस्लीम विद्यापीठातच नेहरूंची हत्या घडवून आणल्यास मुस्लीम खुनी असल्याचा संशय उत्पन्न होईलच, शिवाय आपणही तसा प्रचार करून जातीय दंगली घडवायचा असा गुप्ताचा कट असतो.

अगदी सरळसोट आणि सोपी अशी ही कादंबरी. रहस्य वा थरार लिहिणाऱ्याला जशी गुंतागुंत व उत्कंठावर्धक मांडणीची गरज असते, तशी हर्ट यांना वाटलेली नाही. त्यांना शैलीदार लेखणीही नाही. मात्र भारतीय राजकारणाची व हिंदू-मुस्लीम संबंधांची नेमकी जाण या कादंबरीचा प्राण आहे. दिल्लीत एका कार्यक्रमाला नेहरूंच्या मोटारीवर दोन डझन सायकलस्वार तरुण ‘हिंदू राज, हिंदू राज’च्या घोषणा देत जोडे व चपला आपटतात, असा एक प्रसंग रंगवून आरंभापासून संघाचा पंतप्रधानांवर राग असल्याचे हर्ट यांनी दाखवून दिलेय. वकील असलेला सुरेन्द्र गुप्ता नेहरूंचे नावही आले तरी पिसाळणारा आहे. ‘गांधीजींच्या खुनाशी संघाला जोडणे मूर्खपणा आहे’, असे एक वाक्य गुप्ताच्या मनात उमटते, असे लिहून लेखक हुशारीने भारतीय राजकारणाचा त्याचा अभ्यास दाखवतो.

संघाने भारत-पाक फाळणीच्या वेळी पाकिस्तानात मारल्या गेलेल्या हिंदूंचा बदला घेऊन कसे चांगले केले, असेही हा गुप्ता मानतो. पण हा सारा भूतकाळ. भविष्यकाळ हिंदूराष्ट्राचा आहे. अशा भारतात प्राचीन देवदेवता आणि पुराणी मूल्ये सर्वोच्च राहतील व हिंदूंचे राज्य येईल. आता या मुस्लीमप्रेमींना तात्पुरता विजय मिळाला म्हणून काय झाले? तो गणेश मला नक्की यश बहाल करेल, असा गुप्ताचा विचार. समाजवाद, समानता आणि भारतीयांच्या वैविध्यपूर्ण परंपरांचा गौरव करणारे नेहरूंचे संसदेतील भाषण वाचताना गुप्ता दातओढ खातो. मुठी आवळतो. नेहरू म्हणताहेत, ‘शेजाऱ्यांशी शांतीपूर्ण नाते हवे. पाकिस्तानबरोबर काश्मीरचा प्रश्न सुटला पाहिजे!’ ‘पाकिस्तान’ हा शब्द आल्यासरशी गुप्ताचे माथे ठणकते - ‘हे नेहरू, गांधी आणि त्यांचे काँग्रेसी टोळके नसते तर हे पाकिस्तानही नसते. हजारो वर्षे गेली तशी मुस्लीम व ब्रिटिश राजवटीला हिंदू धर्म नष्ट करता आलेला नाहीय. हे नेहरू-गांधी नसते तर १९४७ साली ब्रिटिश निघून जाताच हिंदू राष्ट्र नसते का झाले स्थापन!’ ‘टाइम्स’ वाचताना गुप्ता माओ व चिनी क्रांती यांवरच्या लेखापाशी येतो. लेखात ‘पॉवर कम्स फ्रॉम द बॅरेल ऑफ ए गन’ हे माओचे तत्त्व वाचून गुप्ताला माओबद्दल आदर वाटतो. भारतावर ताबा मिळवायचा असेल तर तुमच्यापाशी योग्य वेळी अन योग्य ठिकाणी बंदुका असल्या पाहिजेत, हे त्याचे मत!

रामगढच्या स्थानिक राजकारणावर पकड असलेल्या हिंदू महासभेवरही गुप्ताचे चिंतन चालूय. शिवप्रसाद यांच्या पश्चात त्यांचा मुलगा रामलाल कोणत्याही आव्हानावाचून कसा काय नेता झाला, हा प्रश्न त्याला पडलाय. काँग्रेसचा छुपा समर्थक तर नसावा रामलाल? आपल्याला आमदारकी किंवा राज्यमंत्रीपद मिळावे असे वाटतेय का त्याला? त्याच्या निष्ठा नेमक्या कुठेयत?

..................................................................................................................................................................

हेही वाचा :

The many plots to kill Jawaharlal Nehru from 1948 to 1955

The Assassination Of Jawaharlal Nehru

Nehru might be assassinated, a fear that kept Sardar Patel awake: 4 foiled plots

..................................................................................................................................................................

महंमद अब्दुल करीम आपल्या गावात एस. पी. म्हणून येतोय असे रामलालशी बोलताना गुप्ता सांगतोय आणि पुढे म्हणतोय, या करीमचा भाऊ पाकिस्तानात सैन्यात आहे. काँग्रेसने लष्कर व पोलीस यांत मुस्लीम हेर अन देशद्रोही यांची भरती करायचे ठरवलेय की काय? सांगा प्रसादजी अशा मुस्लीम एस.पी.ची नेमणूक म्हणजे काँग्रेस सरकारने महासभेला दिलेले आव्हान आहे, असे वाटत नाही का तुम्हाला?

‘अहो, हे काम लखनौत इन्स्पेक्टर जनरल करत असतो, मुख्यमंत्री नाही! हा पोलिसांचा खातेअंतर्गत निर्णय असावा’, असे उत्तर मिळाल्यावर गुप्ताची खात्री पटते की, महासभेची नक्कीच राजकीय तडजोड झालेलीय. पुढे तो स्वत:च काही जमवाजमव करतो आणि मुस्लीमविरोधी भावना चेतवत राहतो. मशिदीत डुक्कर फेकणे असो की, मुस्लीम विद्यापीठात स्फोट घडवणे, अखेरीस तोच एकटा सरसावतो व संपतो.

हिंदुत्वाचे राजकारण हिंसेभोवती कसे गुंफलेलेय याची हर्ट यांची मांडणी गुप्ताच्या कपटी पण फसव्या स्वभावातून व्यक्त होते. हिंदुत्वाची अंतर्गत स्पर्धाही त्यांनी बरोबर मांडलीय.

कथानायक मुस्लीम असल्याने मुसलमानांच्याही काही जीवनसरणीची ओळख लेखक करून देतो. कादंबरीत धुळीचे रस्ते, सायकल रिक्षा, छोटी हॉटेले, गजबजलेला बाजार, पोलीस शिपाई, प्राध्यापक, सरकारी अधिकारी आदी पात्रे व वातावरण ग्रामीण अर्धनागरी भारताची ओळख करून  देते.

मात्र अशा कादंबऱ्यांत गंभीर चर्चा वा विश्लेषण केले जात नाही. आधुनिक व पुरोगामी ब्राह्मणाला ठार करू पाहणारे ब्राह्मणच आहेत. ते सनातनी आहेत. म्हणून त्यांच्यामधील वैचारिक संघर्ष तात्त्विक पातळीऐवजी मुस्लिमांची बाजू आणि विरोध एवढ्यापुरताच नक्की करणे, हे हर्ट यांचे सूत्र. एकंदर ते संघीय विचारसरणीचा यथायोग्य अभ्यास असल्याचे सांगते. पाश्चात्य आधुनिकता स्वीकारणारा मुस्लीम मध्यमवर्ग विद्यापीठाच्या अस्तित्वामुळे जन्माला येतोय, मात्र त्याच वेळी तो धर्माग्रह सोडायला तयार नसल्याचे पुसटसे दाखलेही लेखक देतो. १९५२ नंतर हिंदू महासभा व मुस्लीम लीग हे दोन्ही कडवे पक्ष विरत गेले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

नेहरूंना ठार करण्याचे कट भारतात झाले होते का, याची मला तरी माहिती नाही. समजा कादंबरीतल्याप्रमाणे तो कट सफल झाला असता तर हिंदू राष्ट्र स्थापनेला संधी मिळाली असती का? सुरेन्द्र गुप्ता सशस्त्र सत्तांतरावर विश्वास असणारा संघी आहे. एक अमेरिकन प्राध्यापक नेहरूंची हत्या करून हिंदूराष्ट्र निर्मितीच्या कल्पनेवर कादंबरी रचतो, याचा अर्थ सदर लेखकाला त्याच्या वास्तव्यात असे काही समजले होते का? त्याने सेवाभावी स्वयंसेवक न चितारता असा जहाल मुस्लीमद्वेष्टा स्वयंसेवक निवडण्याचे कारण काय? गांधीजींच्या खुनावर कादंबरी न लिहिता कादंबरीकार मनोहर माळगावकर यांनी ‘द मेन हू किल्ड गांधी’ असे पुस्तक का लिहावे?

होवार्ड हर्ट यांच्या लिखाणात जहाल हिंदुत्ववादी मन उमटते, तसे ते भारतीय लेखकांकडून कसे काय उमटले गेले नाही? फाळणीवर अत्यंत तुरळक साहित्यकृती आहेत. त्यात गांधींच्या हत्येवर एकही नसावी? फाळणी व गांधी यांचा काही संबंध नव्हता, पण त्यांच्याविरुद्ध विकृत प्रचार करून अखेर त्यांची हत्या रास्त ठरवण्याचाही प्रकार देशात घडला. नथुराम गोडसेला अजूनही वंदनीय ठरवण्याचा खटाटोप त्याचाच एक नमुना!

हर्ट यांना भारतात राहताना या त्रुटी जाणवलेल्या दिसतात. म्हणूनच त्यांनी असा एक प्रक्षोभक विषय निवडून त्यावर एक कादंबरी लिहिली. त्यांचे धाडस प्रशंसनीयच नव्हे, तर अनुकरणीयही आहे.

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Shriniwas Hemade

Sat , 15 August 2020

भारतात अशी कादंबरी नक्की लिहिली जाईल, पण दोनशे वर्षांनी....! आत्ताच समकालीन लेखन कोणी केले तर तर ....त्याचा दाभोळकर, पानसरे होईल


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......