‘सोशल मीडिया’ होतोय ‘व्हायरल’, ‘चावड्या’ होताहेत ‘नावडत्या’!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
मोतीराम पौळ
  • या लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत
  • Wed , 25 January 2017
  • पडघम चावडी Chavadi व्हॉटसअॅप Whatsapp फेसबुक Facebook निवडणूक Election ग्रामीण राजकारण Rural Politics खेडं Village

गाव म्हटलं की, तिथं चावडी आलीच. तिथूनच सर्व गावगाडा चालायचा. गाव जणू एक स्वतंत्र प्रदेश होता. त्याची एक आपली वेगळी संस्कृती होती. तेथील माणसांसाठी गाव हेच एक जग होतं. कारण बाहेरच्या गावांशी फारसा संपर्क नसायचा. अशा वेळी गावातील सार्वजनिक पार, चावडी जनसंपर्काचं, मनोरंजनाचं आणि समाजप्रबोधनाचं जणू विद्यापीठच होतं. गावचा पार, चावडी, शाळेचा ओटा, न्हाव्याची ओसरी अशी काही मोक्याची ठिकाणं गावातील खबरबातीची उत्तम आणि प्रभावी ठिकाणं होती. त्याशिवाय गावातील कोणाचं पानही हलायचं नाही. एखादी बातमी या पारावरून सुटली की, ती वाऱ्यासारखी गावभर पसरायची. तिथं कुठलाच विषय वर्ज्य नसायचा.

गावचा एखादा पुढारी वा असामी कुठे आठ-दहा दिवस बाहेर गावी जाऊन आल्यानंतर चावडीवर बसला रे बसला की, गावातील बितंबातमी त्याला एका दमात समजायची आणि बाहेरच्या खबरा गावात पसरायच्या. राजकारणातील गप्पांचा फड असो, एखाद्याची टिंगलटवाळी असो, अखंड हरीनाम सप्ताह असो, पीकपाण्याच्या गप्पा असो की, गावातील एखादं प्रेमप्रकरण असो… असे एक ना अनेक गप्पांचे फड चावडीवर रात्र-रात्र रंगायचे. चटणी-मीठ लावून त्याचं पार चर्वितचर्णव व्हायचं. चावडीवर रंगलेल्या पत्त्यांच्या डावावर चहाचे ग्लासच्या ग्लास रिचवले जायचे, तर गाय छापच्या उग्र वासाबरोबरच विड्यांचे धूर उठायचे. तर कधी गावातील गुरुजीही इथंच बाराखडीचा तास रंगवायचे.

थोडक्यात, शिक्षणाची, मनोरंजनांची फारशी साधनं नसलेल्या गावांमध्ये चावड्यांचं गावाच्या व्यक्तिमत्त्व विकासात फार मोठं योगदान होतं.
राजकारण आणि मराठी माणसाचं तर अतूट नातं. ग्रामीण राजकारण प्रत्येकाच्या नसानसांत भिनलेलं. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या की, गावात रणधुमाळी सुरू व्हायची. पार, चावडी ही ठिकाणं माणसांच्या गर्दीनं पार फुलून जायची. मग रात्र-रात्र राजकीय गप्पांचा फड रंगायचा. गावातील शहाणी माणसं, राजकीय पुढारी, मोठी माणसं, म्हातारीकोतारी ते नव्यानचं मिसरूड फुटलेली तरुण पोरं गप्पात रंगून जायची. निवडणूक जाहीर होईपासून ते निकाल लागेपर्यंत या ठिकाणी माणसांचा प्रचंड राबता असायचा. चावडी हेच प्रचार कार्यालय असायचं, इथूनच निवडणूक प्रचाराचा नारळ फुटायचा अन् प्रचाराचा धुरळा उठायचा. निवडणुकांच्या दिवसांत तर चावड्यांना सुगीचे दिवस यायचे. त्या भरभरून व्हायच्या.

मात्र २१ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे संपूर्ण जग झपाट्यानं बदललं. इंटरनेट, मोबाईलच्या उदयानं संपूर्ण जग छोट्या खेड्यासारखं भासू लागलं. सोशल मीडियाच्या उदयानं तर सर्वांच्या जगण्याचे आयामच बदलले. एका क्षणात मानवी जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या सोशल मीडियामुळे मानवाचं आयुष्यच बदलून गेलं आहे. आयुष्यातील कोणतीही घटना-प्रसंग त्यापासून वजा केला जाऊ शकत नाही. मग निवडणुका सुटल्या नाहीत तरच नवल! २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाचा अत्यंत कल्पक आणि प्रभावी वापर करत अनुकूल आणि सकारात्मक वातावरण निर्माण केलं. ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. ही सोशल मीडिया आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कमाल आहे.

गावागावात सिमकार्ड आणि त्यावर इंटरनेट पॅक फ्रीमध्ये वाटले जाताहेत. शिवाय प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यानं गावकरी, विशेषतः तरुण पिढी टेक्नोसॅव्ही झाली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढलाय. शहरात गेलेली तरुण मंडळी व्हॉट्सअॅप, फेसबुकमुळे गावाच्या सतत संपर्कात आली. प्रत्येक गल्लीचे गणपती मंडळाचे फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर ग्रुप तयार झाले. त्यावरून सकाळ-संध्याकाळ संवाद साधला जाऊ लागला. गावातील सार्वजनिक ठिकाणच्या जागा ओस पडू लागल्या आणि ग्रुपवरील मेसेजचे ढिगारे वाढू लागले. राजकीय पुढाऱ्यांनी या टेक्नोसॅव्ही पिढीचा खुबीनं वापर करायला सुरुवात केली आहे. ग्रामसंस्कृतीतील चावडीची जागा आता सोशल मीडियानं घेतली आहे.

खेड्यात जवळपास घरटी मोबाईल आहे. शिकलेली नवी पिढी त्याचा सहजपणे वापर करू लागल्याने गावातील जिवंत इतिहासाचं प्रतिबिंब असलेल्या चावड्यांची जागा फेसबुक, व्हॉटसअॅप यांनी घेतली आहे. गावातील तरुण मुलं, शहाणी माणसंही आता आपला बराचसा वेळ त्यावर घालवतात. निवडणुकीचे फडही त्यावरच रंगू लागले आहेत. गावातील प्रत्येक व्हॉटसअॅप ग्रुपवर प्रचार-प्रसार सुरू झाला आहे. त्यावरूनच मतदारांचं मनं वळवण्याचा प्रयत्न उमेदवार करू लागले आहेत. प्रचार साहित्य, व्हिडिओ, छायाचित्रं, माहितीपत्रकंही थेट प्रत्येकाच्या हातात जाऊन जाऊ लागली आहेत. विकासाची आश्वासनंही आता इथूनच दिली जात आहेत. प्रचाराची नवनवीन घोषवाक्यं व्हॉट्सअॅप ग्रुपवरून फिरू लागली आहेत. प्रचाराचे फोटो व्हायरल केले जात आहेत.

सध्या गाजू लागलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचा राजकीय फडही व्हॉटसअॅपवरही झिंगझिंगाट करत आहे. सध्या निवडणुकीच्या हंगामात गावागावात सोशल मीडिया भरभरून वाहत असल्याचं अन् चावड्या ओस पडत चालल्याचं विदारक चित्र दिसतंय. परिणामी ग्रामसंस्कृतील चावड्या नष्ट होत चालल्या आहेत. खरं तर या चावड्या शेकडो निवडणुकांच्या साक्षीदार. अनेक राजकारणी नव्याने जन्मताना, तर अनेक संपताना याच चावड्यांनी पाहिलेत. खेड्यातल्या माणसांचं आयुष्य या चावड्यांनी व्यापून टाकलं होतं. हे वैभव आता लयाला, विस्मरणात जात आहे. येणाऱ्या नव्या पिढीला ‘चावडी’ हा प्रकार कदाचित चित्र काढूनच दाखवावा लागेल.


लेखक संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर अडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस इथं जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

motirampoulpatil@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......