‘झुंड’ हा शब्द काही विशेष अर्थाने येथे वापरण्यात आला आहे. कोठल्याही राष्ट्रीयत्वाच्या, व्यवसायाच्या किंवा लिंगभेदाच्या व्यक्ती जेव्हा कोणत्याही कारणाने एकत्रित जमा होतात, तेव्हा त्या जमावाला झुंड म्हटले जाते. झुंड शब्दाचा हा परिचित अर्थ. परंतु याच शब्दाचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून होणारा अर्थ अगदी वेगळा आहे. मानसशास्त्रीय अर्थाची झुंड ही संघटित झुंड असते. त्या झुंडीतील माणसांमध्ये मानसिक एकजूट तयार झालेली असते. ही माणसे काही विशिष्ट प्रसंगाच्यानिमित्ताने एकत्र झालेली असतात. एकत्र झाल्यामुळे नेहमीपेक्षा काही वेगळ्या गुणांचा संचार त्यांच्या ठिकाणी होतो. त्या सर्वांचे विचार आणि विकार एकाच विशिष्ट दिशेने जात असतात. त्यांचे बोध (कॉन्शस) व्यक्तित्व लुप्त झालेले असते आणि त्या बोध व्यक्तित्वाऐवजी तेथे अबोध सामूहिक व्यक्तित्व प्रकट झालेले असते. अर्थात अल्प काळासाठी. कारण तो विशिष्ट प्रसंग उलटून जाताच तेथील प्रत्येक व्यक्तीचे मूळचे व्यक्तित्व पुन्हा प्रस्थापित होते. मात्र जितका काळ अबोध सामूहिक व्यक्तित्वाचा अंमल जमावावर चालतो, तितका काळ त्या जमावाच्या प्रतिक्रिया अगदी वेगळ्या होऊ लागतात. जमावाच्या प्रतिक्रिया बदलल्यामुळे तो जमाव ‘झुंड’ नामाभिधानाला प्राप्त होतो. साध्या जमावाचे रूपांतर जेव्हा संघटित झुंडीत घडते तेव्हा जमावातील व्यक्ती स्वत:चे स्वतंत्र व्यक्तित्व गमावून बसतात. किंबहुना त्या सर्व व्यक्तींची मिळून तेथे एक महाकाय व्यक्ती तयार झालेली असते; आणि या महाकाय व्यक्तीची विचार करण्याची, वागण्याची पद्धती सुट्या व्यक्तींच्या पद्धतीपेक्षा सर्वस्वी भिन्न असते. तिची उद्दिष्टेसुद्धा सुट्या व्यक्तींच्या उद्दिष्टांपेक्षा भिन्न असतात. झुंडीची उद्दिष्टे व्यक्तींच्या उद्दिष्टांपेक्षा भिन्न असतात; तिची विचार करण्याची, वागण्याची पद्धतीसुद्धा भिन्न असते. याच विशिष्ट लक्षणांमुळे साधा जमाव जमाव न राहता झुंड बनत असतो.
झुंड संघटित होऊ लागताच तिच्यामध्ये दोन ठळक लक्षणे दृग्गोचर होऊ लागतात. एक, झुंडीत परिणत होऊ लागलेल्या मानवी घटकांची बौद्धिक जाणीव लुप्त होऊ लागते, आणि दोन, त्या घटकांच्या भावना आणि विचारांत पालट होऊन त्या एकलक्ष्यी बनतात; एका हेतूवर केंद्रित होतात. झुंड तयार होण्यासाठी त्या झुंडीत सामील असणारी माणसे शरीराने एकत्रित जमा झाली पाहिजेत असे नाही. वेगवेगळ्या जागी असलेली हजारो माणसे त्यांच्या त्यांच्या जागी राहूनसुद्धा एखाद्या प्रसंगी काही विशिष्ट तीव्र भावनांच्या प्रभावामुळे झुंडीत परिणत होऊ शकतात. उदाहरणार्थ, राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रसंगी संपूर्ण देशच्या देश झुंडसृदश वागू शकतो. उलट कधी कधी केवळ पाचसहा जणांचा गटदेखील झुंड या नावाला पात्र होऊ शकतो. एखादा लहानमोठा मानवी गट झुंड ठरणार अथवा नाही ही गोष्ट त्या गटाची मानसिक स्थिती आणि तिच्या संभाव्य वैचारिक व शारीरिक प्रतिक्रिया याच्यावर ठरते. सारांश, प्रसंगी शेपाचशे लोकांचा समुदाय एकत्र येऊनसुद्धा झुंड या नावाला पात्र होणार नाही; उलट पाचसहा लोकांचा गट त्या गटाच्या एकंदरीत प्रतिक्रियांमुळे झुंड ठरेल. मानवी समुदाय झुंड ठरणार अथवा नाही हे त्या समुदायात किती माणसे एकत्र आली आहेत याच्यावर ठरत नाही.
एकदा जमावाचे रूपांतर झुंडीत झाले म्हणजे त्या झुंडीमध्ये काही विशेष लक्षणे निर्माण होतात. ही लक्षणे तात्पुरती असतात. तरीही ती कोणती ते सांगता येईल. ज्या प्रकारच्या लोकांचा भरणा झुंडीत असतो त्याच्यावरसुद्धा ही लक्षणे ठरतात. ही लक्षणे विचारात घेता झुंडीचे दोन गट करता येतात. एका गटाला एकजिनसी - होमोजिनस गट, तर दुसऱ्याला बहुजिनसी - हेटरोजिनस गट म्हणता येईल. एकजिनसी झुंडीतील घटक सम लक्षणांचे असतात, तर बहुजिनसी झुंडीतील विषम लक्षणांचे असतात. धार्मिक पंथ, जाती इत्यादी झुंडी एकजिनसी झुंडींच्या वर्गात मोडतील.
झुंडींच्या विशेष लक्षणांचा अभ्यास करण्यापूर्वी त्यांच्या सामान्य लक्षणांचा आढावा घेणे युक्त ठरेल. झुंडींच्या मनाचे अचूक वर्णन करता येणे बरेच कठीण आहे. झुंडी कितपत एकजीव होतात याच्यावर हे वर्णन अवलंबून असते; आणि हे एकजीव होणे झुंडीत सामील होणारी माणसे एका जातीची, एका वंशाची वगैरे आहेत वा नाहीत आणि त्यांचा प्रकार काय आहे याच्यावर ठरते. त्याचबरोबर झुंडीवर ज्या ज्या कारणांचा प्रभाव पडतो त्याच्यावरही ठरते. थोडक्यात, झुंडीचे मन अत्यंत प्रवाही असते. आणि अनेक प्रकारच्या बाह्य गोष्टींचा प्रभाव त्या मनावर चालतो. हे काहीसे व्यक्तिमानसाप्रमाणेच आहे. फक्त कथा-कादंबऱ्यांतील पात्रांचेच मन काय ते प्रारंभापासून शेवटपर्यंत आधी जसे असते तसेच शेवटपर्यंत टिकून असते. बाह्य परिस्थिती कायम जशीच्या तशी टिकली तरच मानवी मनसुद्धा सतत एकाच प्रकारच्या प्रतिक्रिया दाखवील. परंतु तसे होत नाही. साहजिकच मानवी मन चंचल असते. झुंडीसुद्धा चंचल मनाच्याच असतात. तेव्हा असे म्हणता येईल की, मानवी व्यक्ती आणि झुंडी दोन्हींच्याही बाबतीत अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया संभवनीय असतात. या प्रतिक्रिया व्यक्त होणार अथवा नाही हे कोणत्या बाह्य परिस्थितीला त्या व्यक्तीला वा झुंडीला तोंड द्यावे लागणार याच्यावर ठरते.
झुंडी प्रथमपासून एकजीव बनलेल्या नसतात. त्या टप्प्याटप्प्याने एकजीव बनतात. येथे प्रत्येक टप्प्याचे वर्णन करता येणार नाही. फक्त अखेरच्या टप्प्याचे, म्हणजे झुंडीतील घटकांची एकजूट पूर्णत्वाला पोहोचली की ते वर्णन करता येईल. याचा अर्थ, झुंडीचे नेहमीचे स्वरूप कसे असते हे सांगता येणार नाही. झुंड पूर्णपणे एकजीव बनली की तिचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते. मात्र तसे असले तरी ती झुंड कोठल्या वंशाच्या वा जातीच्या घटकांपासून बनली आहे याच्यावरसुद्धा झुंडीचे स्वरूप बरेचसे अवलंबून असते. कारण मानवी वंश आणि जातिजमाती स्वत:ची विशेष लक्षणे बरोबर घेऊनच झुंडीत सामील होत असतात. त्यामुळे त्यांच्या लक्षणांचे प्रतिबिंब झुंडीत उमटते. या मूळ लक्षणांमध्ये झुंडीचा अविभाज्य भाग बनल्याने काही नवीन लक्षणांची भर पडते. झुंडींच्या मूळ लक्षणांमध्ये नवीन लक्षणांची भर पडताच झुंडीचे विचार आणि भावना एकलक्ष्यी बनतात. एकाच समान दिशेने दौडू लागतात.
मानसशास्त्रीय दृष्टितील झुंडींचे विशेष गुण पुढीलप्रमाणे असतात. झुंडींत सामील होणाऱ्या व्यक्तींचा सामाजिक दर्जा कोणताही असो, त्याची जीवनदृष्टी, त्यांचे शिक्षण, त्यांचा व्यवसायधंदा, त्यांचा स्वभाव अथवा त्यांची बौद्धिक प्रगती यांत साम्य असो वा नसो, त्या सर्व व्यक्ती झुंडीत सामील झाल्या एवढ्याच एका कारणामुळे मनाने एकजीव बनतात. त्या स्वतंत्रपणे विचार करायच्या थांबतात. त्यांचे मन सामूहिक मनाच्या अंमलाखाली येते. जगाकडे व स्वत:कडे पाहण्याची त्यांची दृष्टी बदलते. त्या व्यक्ती बेभान बनतात आणि त्या बेभान अवस्थेत संघटित कृती करतात. जे विचार आणि भावना नेहमीच्या जीवनात त्यांनी कधीच प्रकट केल्या नसत्या ते विचार आणि भावना झुंडीच्या प्रभावाखाली बिनदिक्कतपणे प्रकट केल्या जातात. हर्बर्ट स्पेन्सर या इंग्लिश समाजशास्त्रज्ञाचे मत यापेक्षा वेगळे आहे. स्पेन्सर म्हणते की झुंडीत सामील झाल्याने लोकांच्या मूळ गुणधर्मामध्ये भर पडत नाही. झुंडी फक्त एकूण गुणधर्माची सरासरी दाखवतात. परंतु ज्यांनी झुंडीच्या वागण्याचा बारकाईने अभ्यास केला आहे ते स्पेन्सरचा निष्कर्ष कधीच मान्य करणार नाहीत.
झुंडीत सामील होताच व्यक्तीची मानसिकता पूर्णपणे बदलते. एकेकट्या व्यक्तीच्या वागण्यापेक्षा झुंडीचे वागणे भिन्न असते. हे किती भिन्न असते हे कदाचित स्पष्ट करता येईल. परंतु त्यामागची कारणपरंपरा सांगता येणे कठीण आहे. मानवी मनाचे व्यक्त मन आणि सुप्त मन किंवा बोध मन आणि अबोध मन असे दोन भाग केले तर कदाचित झुंडीच्या वागण्याचा थोडाबहुत छडा लागू शकेल. बोध मनापेक्षा अबोध मनाचे सामर्थ्य नेहमीच अधिक असते. आता प्रश्न असा की हे अबोध मन घडते कसे? प्राण्यांचे शरीर उत्क्रांत होत होत आज ज्याला आपण मानवी शरीर म्हणतो, त्या अवस्थेला आले आहे. मानवी मनसुद्धा उत्क्रांतिप्रक्रियेतच तयार झाले आहे. बोध मन याच अबोध मनाच्या आधाराने आपले कार्य करते.
मानवी मनाचे दोन भाग आहेत. एक बोध भाग आणि दुसरा अबोध भाग. पैकी अबोध भाग बोध भागापेक्षा अधिक प्रभावी असतो. या जगामध्ये अनेक मानववंश आहेत. प्रत्येक मानववंशाचा मूलभूत प्रकृतिस्वभाव अथवा त्या वंशाची प्रतिभा त्याच्या त्याच्या अबोध मनावर, त्या मनामध्ये जे घटक सुप्तरूपामध्ये वास करतात त्याच्यावर ठरत असते. त्या त्या वंशातील सगळ्या व्यक्तींसाठी हे घटक समान असल्यामुळे त्या घटकांपुरती त्या सर्वांची स्वभावप्रकृती समान असते असे त्यावरून म्हणता येईल. याच्या उलट प्रगट मनाचा संबंध शिक्षण आणि संस्काराशी असल्याने, या घटकांपुरता प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगवेगळ्या होत असतो असेही म्हणता येईल. एकाच वंशातील किंवा जातिजमातीमधील दोन माणसे समान प्रश्नावर वेगवेगळ्या प्रकारे विचार करू शकतात. परंतु भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांच्यामध्ये साम्य दिसून येते. कारण भावनांचा संबंध उपजत प्रवृत्तींशी असून, उपजत प्रवृत्ती अनुवांशिकतेच्या तत्त्वानुसार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होतात. याच कारणाने मनोविकार आणि भावनांच्या बाबतीत (उदाहरणार्थ, धर्म, राजकीय भूमिका, नैतिक आचारविचार, मित्रत्व आणि शत्रुत्व या बाबतीत) त्या त्या विशिष्ट वंशातील वा जातिजमातीमधील श्रेष्ठ पुरुष हा सामान्य माणसापेक्षा अधिक बरा वा अधिक वाईट असतो असे म्हणता येत नाही. या बाबतीत त्या राष्ट्रातील सर्व जण एकाच समान पातळीवर असतात. बौद्धिक कुवतीचाच फक्त विचार केला तर एखादा गणिती आणि पाणक्या या दोघांमध्ये अनुल्लंघनीय भिंत उभी आहे असे म्हणता येईल. परंतु त्यांच्या प्रकृतिस्वभावाची तुलना केली तर नाव घेण्यासारखा कोणताच फरक त्या दोघांमध्ये आढळणार नाही.
कोणत्याही राष्ट्राच्या ठिकाणी जे सामान्य गुणधर्म असतात ते गुणधर्म म्हणजे तेथील झुंडींचा समान वारसा होय. हे गुणधर्म कोणते हे आपण सांगू शकतो. परंतु त्यांच्या पाठीमागे काम करणारी प्रेरक शक्ती कोणती हे आपण सांगू शकत नाही. झुंडीच्या मनस्थिती नागरिक गेले की त्यांची बौद्धिक वैशिष्ट्ये आणि त्याचबरोबर व्यक्तिवैशिष्ट्ये कमकुवत बनतात. म्हणजेच व्यक्तिवैशिष्ट्ये सामुदायिक वैशिष्ट्यांमध्ये लुप्त होतात. परिणामत: व्यक्तीच्या सुप्त मनातील प्रवृत्तींना बाहेर पडायला वाव मिळतो. झुंडीच्या ठिकाणी असलेली बुद्धी नेहमीच सामान्य दर्जाची असते. साहजिकच तरल बुद्धीची आवश्यकता असलेल्या कृती झुंडी करू शकत नाहीत. मूढता हाच झुंडींचा विशेष असतो. मात्र माणसे झुंडीत सामील झाली आहेत, एवढ्या एका कारणामुळे त्या माणसांमध्ये काही विशेष लक्षणे दूर दिसू लागतात आणि ही लक्षणे त्या माणसांमध्ये आधी दिसून येत नाहीत. या लक्षणांचा उगम कशात असतो?
या लक्षणांची काही कारणे अशी : माणसे एकेकटी असतात त्यापेक्षा अगदी वेगळे वर्तन ती झुंडीत सामील होताच करू लागतात, कारण त्यांची नेहमीची आयडेंटिटी तेव्हा नष्ट होते. माणसे अनामिक बनतात. अनामिक बनल्याने त्यांच्या इन्हिबिशन्स, त्यांचे आंतरिक निषेध निकामी होतात. झुंडीतल्या माणसांना आपल्या अंगी काही वेगळे सामर्थ्य संचारले आहे, आपणाला आता कोणतीही शक्ती अडवू शकणार नाही असे वाटू लागते; आणि ती माणसे त्यांच्या उपजत प्रवृत्तींच्या आहारी जातात. त्यांचा त्यांच्या बुद्धीवरचा ताबा लटका बनतो. झुंडीत सामील होताच शिकल्यासवरलेल्या व्यक्तीसुद्धा बेफाम बनतात, बेफाम वागतात, त्याचे कारण हे आहे. दैनंदिन व्यवहारात माणसे एकएकटी वावरतात. एकएकटी वावरत असल्याने जबाबदारीने वागतात. आपण चुकीचे कृत्य केले तर लोक आपणाला नावे ठेवतील हा विचार त्यांच्या डोक्यात तेव्हा कायम असतो. झुंडीत शिरताच वैयक्तिक जबाबदारीची भावना त्यांना सोडून जाते आणि चेव आल्यासारखी ती वागू लागतात.
झुंडीत सामील झालेली माणसे बेफाम बनतात याचे दुसरे कारण सांसर्गिकता किंवा संगत. एकमेकांच्या संगतीमुळे माणसे झुंडीत शिरताच बेफाम बनतात. त्यांना जणू परस्परांचा संसर्ग बाधतो. झुंडीच्या आचारविचारांचा अर्थ लावताना हे सांसर्गिकतेचे तत्त्व वापरले तर झुंडीच्या ठिकाणी दृग्गोचर होणाऱ्या विशेष लक्षणांचा उलगडा तर होतोच, परंतु विशिष्ट झुंडी पुढे कोठली दिशा घेतील, कोणत्या कृतींना प्रवृत्त होतील हेसुद्धा त्याच तत्त्वाच्या मदतीने बरेचसे अचूक सांगता येते. तथापि एकमेकांच्या संसर्गामुळे माणसे कशी वागतील ते सांगता आले तरी ‘संसर्ग’ म्हणजे नेमके काय हे सांगता येणार नाही. आपण फक्त एवढेच म्हणू शकतो की खूप माणसे एकत्र आली की त्यांच्या मनावर परस्परसंसर्गाचा परिणाम होऊ लागतो, ती संमोहित होतात. झुंडीत असताना केली जाणारी प्रत्येक कृती आणि व्यक्त होणारा प्रत्येक मनोविकार सांसर्गिक स्वरूपाचा असतो. माणसे मनाने एकत्र झाल्याचा तो परिणाम असतो. ही सांसर्गिकता अत्यंत प्रखर असते. इतकी प्रखर आणि तीव्र की, त्या सांसर्गिकतेच्या प्रभावाखाली आलेल्या व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या हितावर निखारे ठेवावयास मागेपुढे पाहत नाहीत. वस्तुत: हे वर्तन कोणत्याही व्यक्तीच्या स्वभावाविरुद्ध आहे. व्यक्तीला स्वार्थ अधिक जवळचा असतो. व्यक्ती जर का झुंडीत सामील झाली नाही तर ती आधी स्वार्थ व मग परमार्थ असेच वागेल.
झुंडीत शिरताच माणसे बेफाम व बेफिकीर बनतात याचे तिसरे कारण म्हणजे, झुंडीतली माणसे दुसऱ्याच्या बुद्धीने वागू लागतात. झुंडी नेहमी कुणा ना कुणा पुढाऱ्याच्या तालावर नाचतात. कारण त्या सूचनाक्षम असतात. झुंडींना दिलेल्या सूचना झुंडी तात्काळ ग्रहण करतात आणि अंमलात आणू पाहतात, हा सांसर्गिक सूचनासुलभतेचाच परिणाम होय. सूचनासुलभता (सजेस्टिबिलिटी) म्हणजे काय आणि सूचनासुलभतेचा प्रकार कसा घडतो हे समजून घ्यायचे असेल तर संमोहनशास्त्राकडे एक धावता दृष्टिक्षेप टाकावा लागेल. संमोहक एखाद्याला संमोहित करतो तेव्हा त्याचे बोध किंवा जागृत मन झोप घालवून अबोध मन जागे करतो. हे अबोध मन आता संमोहकाच्या आज्ञांच्या कक्षेत येते. संमोहक ज्या ज्या सूचना संमोहित व्यक्तीला देतो त्या त्या सूचना ती व्यक्ती मुकाट्याने अंमलात आणते. अगदी असाच प्रकार झुंडीत सापडलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडतो. झुंडीत सापडलेली व्यक्ती काही काळासाठी झुंडीच्या हातातील जणू बाहुले बनते. झुंडीची आवड तीच तिची आवड आणि झुंडीची नावड ती तिची नावड. झुंडीचे शत्रू ते तिचे शत्रू नि मित्र ते तिचे मित्र. झुंडीची प्रत्येक इच्छा ती व्यक्ती अंमलात आणू पाहते आणि त्यासाठी काहीही किंमत देण्याची तिची तयारी असते. हे असेच का घडते याचे नेमके कारण सांगता येत नाही. कदाचित झुंडींच्या आकर्षणशक्तीच्या तो परिणाम असेल. किंवा दुसरेसुद्धा एखादे कारण असेल. एवढे बाकी खरे की झुंडीच्या तडाख्यात सापडलेली व्यक्ती संमोहननिद्रेत अडकलेल्या व्यक्तीप्रमाणे पूर्णपणे झुंडीच्या आधीन होते.
संमोहकाने संमोहित केलेल्या व्यक्तीच्या काही मानसिक शक्ती बधिर होतात, तर त्याचवेळी अन्य काही शक्ती नेहमीपेक्षाही जास्त तल्लख बनतात. नेमका हाच प्रकार झुंडीच्या तडाख्यात सापडलेल्या व्यक्तीच्या बाबतीत घडतो. त्या अवस्थेत कोणतेही आततायी कृत्य करायला ती व्यक्ती मनाने तयार असते. मोहनिद्रेतील व्यक्तीपेक्षाही झुंडीतील व्यक्ती अधिक आततायी असते. कारण झुंडीतली व्यक्ती त्या क्षणी अनेक व्यक्तींच्या बरोबर वावरत असते आणि त्या सर्व व्यक्तींना एका वेळी फक्त एक सूचना दिली गेलेली असते. त्यामुळे त्या सूचनेचा प्रभाव शेकडो पट वाढलेला असतो. झुंडीतील माणसे मनाच्या अबोध पातळीवर परस्परांवर परिणाम करतात व त्यामुळे झुंडीला दिली गेलेली सूचना जास्तीत जास्त तीव्र बनते. झुंडीच्या विरुद्ध जाण्याइतकी शक्ती झुंडीत सामील झालेल्यापैकी एकाहीमध्ये असत नाही. ती शक्ती असलेला माणूस झुंडीत शिरतच नाही.
जागृत व्यक्तित्वाचा लोप, सुप्त व्यक्तिमत्वाचा उदय, पुढाऱ्याकडून दिली गेलेली ठाम सूचना आणि खूप जणांचे एकत्रित जमा होणे या चार कारणांमुळे झुंडीत सामील झालेल्या इसमांच्या भावनेला व विचारांना एकेरी दिशा मिळून ते इसम विचारांचे रूपांतर कृतीत करण्यासाठी अधीर बनतात. झुंडीत सामील झालेल्या व्यक्तींच्या ठिकाणी प्रामुख्याने वरील गुणविशेष आढळतात. झुंडीतल्या इसमांचे स्वत:वर नियंत्रण नसते. ते पूर्णपणे झुंडीच्या नियंत्रणाखाली व आज्ञेत असतात.
झुंडीत सामील होणे ही केवळ एकच क्रिया व्यक्तीच्या तात्पुरत्या सांस्कृतिक पतनाला पुरेशी असते. व्यक्ती एरवीच्या आयुष्यात कितीही सुसंस्कृत असू द्या, झुंडीत भरती होताच सुसंस्कृतपणाच्या अनेक पायऱ्या उतरून ती शेवटच्या पायरीवर दाखल होते. एकटी असताना ती व्यक्ती भले किती का शिस्तप्रिय असेना, झुंडीत शिरताच तिच्यासारखी बेशिस्त फक्त तीच होय. तिच्या अंगी आता रानटीपणा संचारलेला असतो. रानटी मनुष्याची क्रौर्याची हौस, त्याच्या हिंसक प्रवृत्ती, त्याचा आवेश – सर्व त्या व्यक्तीमध्ये तुम्ही साक्षात पाहू शकता. झुंडीच्या तडाख्यात अडकलेली व्यक्ती ही जणू सोसाट्याच्या वाऱ्यात सापडलेल्या पालापाचोळ्यासारखी असते.
झुंडीत सामील होताच माणसे निर्लज्ज आणि बेफिकीर बनतात. वाटेत ते निंद्य कृत्य करायलाही ती तयार असतात. झुंडीत सामील झाल्याने आणखीसुद्धा अनेक प्रकारचे बदल माणसांमध्ये घडून येतात. त्यांचा स्वत:वरचा ताबा जातो. ती आपले स्वातंत्र्य गमावतात. परंतु ही क्रिया पूर्ण होण्याच्या आधीच त्यांच्या विचारांमध्ये आणि मनोविकारांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आलेले असते. हे मानसिक परिवर्तन इतके जबरदस्त असते की झुंडीत प्रवेश करण्यापूर्वी कवडीचुंबक असलेली व्यक्ती झुंडीत शिरताच उधळी बनते. नास्तिकाचा पूर्ण आस्तिक, चारित्र्यवानाचा चारित्र्यहीन, नि भित्र्या भागुबाईचा महापराक्रमी शूरवीर बनतो; झुंडीत काहीही होऊ शकते!
झुंडीचे मानसशास्त्र – विश्वास पाटील, प्रभात प्रकाशन, मुंबई, नोव्हेंबर २०००, पाने – २५६, मूल्य – १७५ रुपये.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment